अभियांत्रिकीचे दिवस-७

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
25 Sep 2021 - 10:48 pm

होस्टेलमध्ये स्वत:ची रूम सोडून इतर कुणाच्याही रूममध्ये ढुंगण वर करून लोळत पडण्याची परंपरा आणि शिवाय धाडकन दार उघडून कुठंही कधीही घुसण्यात काही गैर आहे, असं कुणाच्या डोक्यातही येणं अशक्य असल्यामुळे तिथं प्रायव्हसीचं साधं सुख मिळण्याचा काहीच विषय नसायचा.

म्हणजे समजा असाच कधीतरी मी माझ्याच रूममध्ये प्रवेश केला असता नेहमीचीच रिकामटेकडी जनता तिथं असभ्य असामाजिक वगैरे अवस्थेत अस्ताव्यस्त पसरून लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहून लाळ गाळते आहे, हे एक दृश्य तसं नेहमीचंच.
कारण स्क्रीनवर चालू असलेल्या रोमॅंटिक सीनमध्ये समजा विदेशी हिरो-हिरोईन मुक्त प्रेमाचा वगैरे आविष्कार सादर करत आहेत.
एवढ्यात "ह्यात काय मजा नाय रांडीच्या ! दुसरी लाव" असा श्री. कोल्हापूरकरांचा आवाज येतोय.
असं का म्हणतायत बुवा हे कोल्हापूरकर, म्हणून मीही निरखून पाहू लागतोय तर बहुदा त्या हिरो-हिरोईनचं ते रोजचंच काम असल्यामुळे किंवा सरावामुळे वगैरे सदर प्रेमाविष्कारात एक प्रकारचा यांत्रिकपणा आलेला असल्यामुळे कसलाही आनंद आमच्यापर्यंत थेट पोहचत नव्हता.!
म्हणून मग दुसरा कुठलातरी डायरेक्ट मुद्द्याला हात घालणारा वगैरे मूव्ही पाहत पाहत आम्ही तात्कालिन दुष्काळी वाळवंटी लोक किमान मानसिक पातळीवर का होईना, पण एका गरमागरम प्रदेशात शिरलेलो दिसतो आहे.

यशस्वी अफेअर करणं आणि पुन्हा ते सगळ्यांपासून लपवून ठेवणं ही काही सहजसोपी गोष्ट नव्हती तिथे.
कारण समजा एखाद्या मुलीच्या अनुषंगाने एखाद्याच्या वागणुकीत, बोलण्यात जरा कुठे फरक जाणवला तर त्या भाद्रपदासंबंधी सूतावरून स्वर्ग गाठत निरनिराळ्या हूली उठवून सदर रोमिओस बेजार करण्याची निरनिराळी बीभत्स तंत्रं तिथं सगळ्यांनाच अवगत होती.. त्यामुळे अशा गोष्टी लपवण्याकडे प्रत्येकाचाच कल.
पण ह्याबाबतीत आमचे परममित्र श्री.औरंगाबादकर ह्यांचा SWAG वेगळा होता..

म्हणजे दिवसभर परिसरात वासूगीरी करत फिरत राहणे,
आणि उदाहरणार्थ..
'तुझे डोळे खूपच सुंदर आहेत !'
'तुझे केस किती छान आहेत !'
'तू फारच क्यूट हसतेस !'

अशा स्वरूपाचा नियमितपणे पाच-दहाजणींशी संवाद साधण्याचा प्रयत्न वगैरे..

मग साधारण दहातल्या पाच प्रकरणात फटके !
दोन प्रकरणात यशस्वी पलायन !
दोन प्रकरणात माफी मागून सुटका !
आणि चुकून एखाद्या प्रकरणात जो काय तुटपुंजा मेळ लागेल, त्याची स्वत:च गावभर दवंडी.. !!
असा एकंदरीत श्री.औरंगाबादकरांचा ढिला कारभार...!

तर उदाहरणार्थ अशाच एका दुर्देवी वेळी, अशीच समजा एक कुमारी ज्युलिएट, श्री.औरंगाबादकर रोमिओ ह्यांच्या स्नेहपूर्ण मधाळ नजरेस पडलेली असावी...!

त्यात श्री.औरंगाबादकरांना संध्याकाळी स्वस्त विदेशी मद्य किंवा त्याचीही सोय न झाल्यास देशी संत्रा वगैरेचं प्राशन अतिप्रिय..!
देशी मद्यामुळे मनुष्याचा गिअर अतिशय तीव्र गतीने बदलतो आणि सुंदर अशी टुन्न अवस्था अतिजलद गाठण्यास मदत होते, ही गोष्ट मध्यरात्री गुत्त्यातून हुसकावले गेल्यानंतर झुकांड्या देत बाहेर पडणाऱ्या मनुष्यांकडे पाहिले असता आपल्या सहजच लक्षात येते..!
अर्थात संत्रा किंवा ज्याला मराठी भाषेत 'चपटी' असेही म्हटले जाते त्या प्रकाराशी, श्री.औरंगाबादकरांच्या शरीराची घनिष्ठ ओळख झालेली असल्यामुळे ते रस्त्यावरून चालताना सहसा फिजिक्सच्या नियमांना अनुसरूनच पावलं टाकताना दिसायचे.

पण नंतर रूममध्ये दरबार वगैरे भरवून बसलेले असताना श्री. औरंगाबादकरांच्या शरीरातील चेतना वाट चुकल्यासारखी एका वेगळ्याच डायमेन्शनमध्ये भरकटत आहे आणि परिणामी ते एका वेगळ्याच 'तोल हललेल्या बिंदूवरून' वस्तुस्थितीकडे बघत आहेत किंवा एका वेगळ्याच राजेशाही दुनियेचा अनुभवत घेत आहेत, ही गोष्ट आम्ही संत्रा वगैरे मारलेली नसल्यास लगेचच लक्षात यायची.

तर ह्या आभासी जादूई वस्तुस्थितीचे उदाहरण म्हणजे, 'कु. ज्युलिएट स्वत:हूनच माझ्या प्रेमात घायाळ वगैरे झालेली आहे आणि त्यामुळेच ती अतोनात व्याकुळ होऊन मला वारंवार फोन करून भेटीसाठी हट्टच करत आहे', असं श्री. औरंगाबादकरांचं विवेचन..!

अर्थात, काही काळानंतर त्या कुमारीचे काही रांगडे मजबूत राजकीय बॅकग्राऊंडचे नातेवाईक, श्री. औरंगाबादकरांची चौकशी करण्यासाठी थेट आमच्या रूमवर येऊन धडकले आणि त्यांच्या तावडीत आम्ही एकटेच सापडलो, तेव्हा आम्हास ह्या जगात न्याय नाही हा अस्तित्ववादाचा धडा मस्तपैकी मिळाला..!
चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी उपस्थित असणे, हा आमचा एक जुनाच ग्रहदोष म्हणावा लागेल..!
मग माफक दमबाजी केल्यानंतर ते तापलेले नातेवाईक आम्हास त्यांच्या गाडीत घालून हॉटेल डीपी येथे पुढील वाटाघाटींसाठी 'तारण' म्हणून घेऊन गेले.

अर्थात अशा पद्धतीच्या गरम मनुष्यांसोबत संवाद साधण्याचा आमच्यापाशी अजिबात पुर्वानुभव नसल्यामुळे डीपीमध्ये बसून, त्या नातेवाईकांना दादा दादा वगैरे किंवा तत्सम गयावया करत राहण्याचं धोरण आम्ही स्वीकारले असेल तर आम्हांस फारसा दोष लागत नाही..!

कारण एका मध्यमवर्गीय सुसंस्कृत कुटुंबात साजूक तुपात वगैरे वाढलेल्या आमच्याकडून इतर कसली अपेक्षा केली जाऊ शकते बरं..!

परंतु शेवटी शेवटी ''उगा लय दादा दादा करू नगू. हे ज्ये कुनी औरंगाबादकर म्हणून लफडेबाज *** बेनं हाय, त्येची जवानी लंपास कराय आलूय आमी. त्येला ** आता ह्या खवन्याफुडं हजर केलं नाय तर आमी तुज्याच तंगड्या कंबरेतनं बाजूला काडतो बगsss ****!!''
अशा स्वरूपातली थंडगार आवाजातली धमकी ऐकून आमचे हरणासारखे नाजूक काळीज लपालप खालीवर होऊ लागले होते आणि शिवाय आमच्या क्षीण आवाजाचा ग्राफही झटक्यात खाली आला होता, ही एक हृद्य आठवण आम्ही मनाच्या तळाशी गच्च जपून ठेवलेली आहे..!

अर्थात श्री.औरंगाबादकर धोक्याची खबर लागल्यानंतर नेहमीप्रमाणे बराच वेळ भूमिगत होऊन बसले होते..पण आम्हास तारण म्हणून धरून ठेविले आहे हे ऐकून आणि आमच्या जीवाचा बऱ्यापैकी उन्हाळा केल्यानंतरच ते घटनास्थळी प्रकट झाले..!
मग समजा जे व्हायचं होतं ते झाल्यानंतर साधारण तासाभराने श्री. औरंगाबादकर जेव्हा आमच्या इतर मित्रपरिवारास भेटले तेव्हा त्यांच्या शरीरातील ऊर्जेची पातळी बरीच कमी झाल्याचं जाणवलं असलं तरीही त्यांचं विजिगूषी मन मात्र पूर्वीसारखंच अभंग होतं, ह्याची झलक त्यांनी लगेच दाखवली..

उदाहरणार्थ..

श्री. औरंगाबादकर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे, ते स्वत: अत्यंत प्रगल्भ आणि धीरगंभीर अशा वृत्तीने ह्या सगळ्या प्रकरणाला सामोरे गेले..!

तसेच त्या आडदांड हिंस्र नातेवाईकांनी, मला निष्कारण झालेल्या मनस्तापाबद्दल माझी माफी मागितली आहे, तसेच सदर कुमारिकेची भविष्यात भावाप्रमाणे काळजी घेऊन त्यासंबंधी अहवाल सवडीने तिच्या नातेवाईकांस सादर करत राहण्याची कामगिरी खुद्द तिच्या नातेवाईकांनीच माझ्यावर सोपवली आहे, असे श्री.औरंगाबादकर ह्यांनी सर्वांस सांगितले..!

आणि विशेष म्हणजे सर्वांनी त्यावर विश्वास ठेवावा,अशी अपेक्षाही श्री.औरंगाबादकरांनी तोंड वर करून व्यक्त केली..!

परंतु सदर प्रकरणात, श्री.औरंगाबादकर ह्यांनी सपशेल माती खाल्लेली आहे, तसेच चारदोन तडाखेबंद फटके मुस्कुटात वगैरे आणि गच्चुरीस वगैरे धरून अस्सल ग्रामीण धार असलेल्या शिव्यांचा आहेरही श्री.औरंगाबादकर जावईबापू ह्यांनी सासुरवाडीकडून मुकाट्यानं स्वीकारलेला असणार, हे सर्वांनी समजून घेतलंच.. अर्थात फूल ना फुलाची पाकळी म्हणून जाताजाता आमचीही मळणी सदर प्रकरणात झाली असल्याचे आम्ही खास औरंगाबादकरांवरच्या प्रेमापोटी उघड केले नाही..
आणि शिवाय माफक घुसळण झालेली असली तरी आपल्या तंगड्या अजून जागेवर शाबूत राहिल्या हैत ही गोष्टही काही वाईट नाही, अशा स्वरूपाचं समाधानही आम्हास तेव्हा पुरेसं वाटलेलं असावं.

विडंबनविनोदशिक्षणप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

सुखी's picture

26 Sep 2021 - 6:52 am | सुखी

भारी, लै हसलो :D

गॉडजिला's picture

26 Sep 2021 - 7:43 am | गॉडजिला

...

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 Sep 2021 - 8:43 am | अनिरुद्ध.वैद्य

हे किस्से मस्त टैम्पास करायचे हास्टेलात!!

Nitin Palkar's picture

26 Sep 2021 - 7:45 pm | Nitin Palkar

औरंगाबादकर भेटत्यात का अजून..?

होय...! परममित्र औरंगाबादकर पुणे दौऱ्यावर आले की आम्हास आवर्जून भेटतात आणि मोठ्या प्रेमाने आम्हास एखाद्या बारमध्ये घेऊन जातात.
त्यांनी त्यांच्या सध्याच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गाजवलेल्या कर्तुत्वासंबंधी निरनिराळ्या पुड्या ऐकवण्यासाठी आमच्याशिवाय योग्य माणूस कोण असणार...! :-))

प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद :-))

बबन ताम्बे's picture

26 Sep 2021 - 10:52 pm | बबन ताम्बे

तुफान विनोदी लेख. बाकी औरंगाबादकर फारच उचापती दिसताहेत .
आमच्याकडे हॉस्टेल वर नांदेडकर आणि नाशिककर असे दोन उचापती होते. पुण्याच्या गणपती च्या गर्दीत डेअरिंग करायला गेले आणि पोलिसांचे चांगलेच फटके खाल्ले .पण आम्हाला सांगितले एका ठिकाणी पडलो.☺️

सोत्रि's picture

27 Sep 2021 - 8:06 am | सोत्रि

खमंग आणि खुसखुशीत!

- (अभियांत्रिक) सोकाजी

विजुभाऊ's picture

27 Sep 2021 - 9:09 am | विजुभाऊ

लै भारी

अनिंद्य's picture

27 Sep 2021 - 11:00 am | अनिंद्य

खूप हसवले :-)

झकास लेख !

Bhakti's picture

27 Sep 2021 - 12:04 pm | Bhakti

हर एक फ्रेंड जरूरी होता है!

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Sep 2021 - 12:44 pm | राजेंद्र मेहेंदळे

हा लेखही आवडलाय!! नेहमीप्रमाणेच खुसखुशीत. येउंद्या अजुन.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

28 Sep 2021 - 4:47 pm | ॲबसेंट माइंडेड ...

मस्त.
मजा आली वाचुन.