स्वराज्याचा लढा आणि पुरंदरचा तिढा ! ( भाग ३)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in जनातलं, मनातलं
22 Jan 2021 - 8:55 pm


पुणे शहरात आता या माय लेकरांनी प्रवेश केला खरा, मात्र रहायचे कोठे हा खरा प्रश्न होता ? कारण आदिलशाही फौजेने वाडे तर जाळून टाकले होते. मात्र पुण्याचे पाटील, झांबरे-पाटील यांचा वाडा अजून सुस्थितीत होता. सुरवातीचा काळ जिजाउ व शिवबांनी ईथेच काढला. शहाजी राजांकडे यावेळी पुणे प्रांतीची चोवीस गावे होती. आता या गावांचा कारभार सुरु करण्याची म्हणजे अक्षरशः शुन्यातून सुरवात करण्याची वेळ आली होती. जिथे धड माणसांना रहायला जागा नव्हती तिथे देवांची काय कथा. आता नव्याने सुरवात करायची म्हणजेच श्रीगणेशा करायचाच तर तो गणपतीपासून करावे असे जिजाउसाहेबांनी मनावर घेतले. विनायकभट ठकार यांच्या मालकीचे कसबा पेठेत गणपतीचे मंदिर होते. निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याने या देवस्थानाला जमीनीचे उत्पन्नही लावून दिले होते. मात्र सतत होणार्‍या शाही स्वार्‍यात देउळ पुर्णपणे उध्वस्त झाले होते. फक्त मुर्तीच काय ती शिल्लक राहिली होती. पुर्वीच्या देवळाचे खांब वापरून मंदिर पुन्हा उभे करण्याचे जिजाउंनी मनावर घेतले. मंदिर उभारले गेले, पुजाअर्चेचे काम वेदमुर्ती विनायक ठकार यांच्याकडेच देण्यात आले. पहाटेच्या काकड आरतीचे स्वर पुन्हा पुण्यात निनादू लागले आणि पुन्हा एकदा पवित्र वातावरणात पुजा-अर्चा, नैवेध्य सुरु झाले. हे मंदिर होते कसबा गणपतीचे.त्याचबरोबर कसब्यापासून थोड्या लांब अंतरावर एका झाडाखाली एक देवीची मुर्ती होती. तीची प्रतिष्ठापणा करुन देउळ बांधले व बेंद्रे यांच्याकडे देवळाची व्यवस्था सोपवली. हि देवी होती, "तांबडी जोगेश्वरी".
बिकट परिस्थितीतही माता जिजाऊंनी शहाजीराजांच्या विश्वासु व कर्तबगार लोकांच्या मदतीने जहागिरीची व्यवस्था व घडी नीट बसवण्याचे कार्य सुरू केले. जिजाबाईंचा देशाभिमान, करारीपणा आणि कठीण प्रसंगांतून निभाऊन जाण्यासाठी लागणारे धैर्य, या त्यांच्या गुणांच्या तालमीत शिवाजीराजे तयार झाले. त्यांच्या या शिकवणीतून शिवाजीराजांना स्वराज्यस्थापनेची स्फूर्ती मिळाली. आपल्या जहागिरीच्या संरक्षणासाठी गड, किल्ले आपल्या ताब्यात असले पाहिजेत, ही जाणीव त्यांना बालवयापासून झाली.
पुण्यात आल्यावर शिवाजीराजांच्या नव्या आयुष्यास सुरुवात झाली. व्यायाम करून आणि आखाड्यात कुस्ती मारून राजांचे शरीर घाटदार होऊ लागले. मनगटे पोलादाच्या कांबीसारखी झाली. छाती वज्राची झाली. तलवार चालविण्यात, दांडपट्टा खेळण्यात राजे पटाईत झाले. घोड्यावर बसून राजे जहागिर्रीच्या प्रदेशात संचार करू लार्ले. जहागिरीच्या कारभाराशी राजांचा परिचय होऊ लागला. जहागिर्रीतील कुळकर्णी, पाटील, देसाई, देशपांडे, देशमुख सारे येऊन राजांना र्भेटून जात होते. फडाला भारदस्तपणा आला होता; आदब आली होती. कारण दप्तरी आता पेशवे, डबीर, अमात्य होते. राजांना दादाजींनी फडात गुंतवल्यामुळे राजांना दप्तराची माहिती होऊ लागली, कारभार पत्रव्यवहार कसा पाहावा ह्माचे शिक्षण मिळू लागले. राजे दादाजींच्या बरोबर मावळ फिरत होते. वाड्यात दप्तर पाहत होते. जिजाबाईंच्या संगतीत राहून आईंनी सोडविलेला न्यायनिवाडा लक्षात घेत होते. त्यावेळेपासून ते शहाजीराजांच्या महाराष्ट्रांतील जहागिरीचा कारभार दादाजी कोंडदेवाच्या व आईच्या मदतीने पाहू लागले.
पुण्यात एकेक सुधारणा करण्यास आउसाहेबांनी सुरवात केली. सुरवात आरोग्यविषयक सुधारण्यापासून करण्यात आले. हडकीची म्हणजे कमावलेल्या कातड्याच्या कामाची जागा मुठा नदीच्या किनार्‍यावर होती, ती पर्वतीच्या उत्तरेला हलवली गेली. नुकताच अनुभवलेल्या दुष्काळामुळे पाण्याच प्रश्न गंभीर झाला होता. सहाजिकच मुठा नदीला दक्षिणेकडून येउन मिळणार्‍या आंबिल ओढ्यावर बंधारा बांधण्यात आला.

सतत पडलेला दुष्काळ, त्यातच भर म्हणून आलेल्या सुलतानी स्वार्‍यांमुळे एकेकाळचे नांदते, गजबजते पुणे बरेच ओस पडले होते. सगळीकडे झाडी माजली होती. पायरवा आभावी वाटा मोडल्या होत्या, माणसाचा वावर संपल्याने जंगली प्राण्यांचे फावले होते. वाघ, तरस्,लांडगे, कोल्हे यांचेच राज्य होते. शेती करावी तो एकाकडे औत नाही, तर दुसर्‍याकडे बैल नाहीत अशी गत झाली होती. त्यासाठी आधी पुढची पाच वर्ष शेतसारा माफ केला गेला आणि पाच वर्षानंतर मागील हिशोबाने वसुली ठरवली गेली. जमीनीची मोजणी करुन प्रतवारी लावली.

या रोजच्या कामकाजातच शिवाजी महाराजांचे शिक्षण होत होते. आता आणखी एका गैरसमजाचे निराकरण करु. शिवाजी राजांविषयीचा एक गैरसमज म्हणजे ते निरक्षर होते असा निराधार आरोप होय. मात्र हा आरोप करणारे हे विसरतात की शिवाजी महाराज हे एक राजे होते व त्यांनी प्रत्येक पत्र व लेख स्वतःच्या हाताने लिहीणे सक्तीचे नव्हते. त्यासाठी त्यांनी कारकून व लेखनिकांची योजना केलेली होती व ते स्वतः अत्यंत धावपळीत असल्याने त्यांची बालपणाची लेखणाची सवयही सुटली होती. या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की त्या काळी ब्राम्हण या लेखनीचा सर्वाधिक वापर करणार्‍या जमातीतही सर्वच व्यक्ती स्वतःच्या हाताने लिहीत नसत व अनेकांना तर लिहीण्याची सवयही नसे म्हणून ते सर्व निरक्षर असत असा आरोप कोणीही केला नाही. असो.
शिवाजी महाराज निरक्षर होते असे ग्रँट डफ आपल्या ग्रंथात लिहीतो आणि सर जदुनाथ सरकारसारख्या इतिहासकारांनी त्याची रि ओढली आहे. मात्र असे काही नव्हते याचा लेखी पुरावे आहेत व तो इंग्रजांसारख्या महाराजांच्या शत्रूनेच लिहून ठेवले आहेत.
राजापुरावर केलेल्या स्वारीच्या वेळी शिवाजी राजांनी रेव्हिंग्ट्न्,गिफर्ड, टेलर यांना वासोटा व सोनगडावर कैदेत ठेवले होते. त्यांची सुटका व्हावी म्हणून सुरतेच्या ईंग्रजांनी पत्र लिहीताना वकीलाला स्पष्ट आदेश दिला आहे कि, "पत्र थेट शिवाजी राजांच्या हाती द्यावे, त्यांच्या ब्राम्हण मंत्र्याना नको, हे लोक कदाचित त्यांना वाटेल तो मजकुर घुसडतील".( प.सा.सं. खंड १ पृ-२०२) हे पत्र १० जुन १६६१ रोजी लिहीले आहे.
त्यानंतर दुसरे पत्र ६ फेब्रुवारी १६६३ रोजीचे आहे. यावेळी रेव्हिंग्टन, गिफर्ड यांची सुटका कोकणचे सुभेदार रावजी पंडीत यांनी शिवाजी महाराजांच्या आदेशावरुन केली होती. या पत्रावर महाराजांचा चंदनात बुडवलेला हाताचा ठसा आहे.
ईंग्रजांचे तिसरे पत्र १० जानेवारी १६७७ रोजी सुरतेहून मुंबईस लिहीले आहे. यामध्ये यापुर्वी ईंग्रजांची राजापुरची वखार लुटली होती, तर यापुढे असा उपद्रव दिला जाउ नये अशी मागणी केली होती. हि मागणी मंजुर करणार्‍या पत्रावर स्वतः शिवाजी महाराज्,पेशवा, अणाजी दत्तो यांच्या सह्या आहेत. (प.सा.सं.खं.२, पृ-५६६)
याशिवाय आणखी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. शहाजी राजे आणि बंधू संभाजी राजे संस्कृतचे चांगलेच जाणकार होते.जयराम पिंडे ,संगीतकार मकरंद देव असे सुमारे ३० विद्वान शहाजी राजांच्या पदरी होते, असे राधामाधवविलासचंपु मध्ये म्हणले आहे. यासंदर्भात एक हकीकत जयराम पिंडे यांनी लिहीली आहे. शहाजी महाराजांच्या भेटिस जयराम पिंड्ये गेला असताना त्यांनी जयरामला "शतचंद्र नभस्तलम" हि समस्या घातली, असे सांगून शहाजी राजांच्या दरबारातील इतर विद्वानांनी व संभाजी राजांनी कोणती समस्या घातली त्याचे वर्णन केले आहे. शहाजी राजे संस्कृतप्रेमी होते, त्यांना फारसीचे ज्ञान होते, शिवाय काही काळ कानडी मुलुखात गेल्यामुळे त्यांना कानडी येत असावे. तेव्हा आगामी राज्यकारभाराच्या सोयीसाठी याचे महत्व किती आहे, याची शहाजी राजांना कल्पना असल्यामुळे त्यांनी शिवाजी राजांना शिक्षण दिले नसणार हे अशक्य वाटते. पुण्याची जहागिरी जर शिवाजी राजांवर सोपवायची तर शिक्षण हे आवश्यकच होते.शिवाय शिवाजी राजांचे पुत्र संभाजी राजे संस्कृतचे उत्तम जाणकार होते. त्यांनी लिहीलेला "बुधभुषणम" हा ग्रंथ उपलब्ध आहे. याचा अर्थ पिताश्री संस्कृतचे ज्ञानी, पुत्राला संस्कृतमध्ये गती व फक्त शिवाजी राजे निरक्षर असे समजणे यात काडीचेही तथ्य नाही.
शिवाय महाराजांनी जे गड ताब्यात घेतले आणि त्यांचे नामकरण केले ते सर्व संस्कृत भाषेत केले आहे. उदा.-तोरण्याचा प्रचंडगड, भोरप्याचा प्रतापगड, मुरुंबदेवाचा राजगड, ई. शिवाजी महाराजांची मुद्रा संस्कॄतमध्येच आहे. शिवाय राजधानी रायगड बांधल्यानंतर हिरोजीने स्वतःसाठी कोरलेला "सेवेचे ठायी तत्पर" हा शिलालेख मोडीत असला तरी राजधानीच्या बांधकामाचे वर्णन करणारा शिलालेख संस्कृतमध्ये आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. याचा स्पष्ट अर्थ संस्कृतवर शिवाजी महाराजांचे उत्तम प्रभुत्व असणार.
पुरंदरच्या युध्दाच्या वेळी आणि तहादरम्यान मिर्झाराजे जयसिंहांच्या छावणीत ईटालियन प्रवासी निकोलाय मनुची हा होता. त्याने लिहीलेल्या "स्टोरीयो द मोगोर"या ग्रंथात स्पष्ट लिहीले आहे कि शिवाजी राजे त्याच्याशी हिंदुस्थानीत बोलले. याचा अर्थ स्पष्ट आहे, महाराज बहुभाषाकोविद असले पाहिजेत.
शिवाजीराजांच्या राज्यात सर्वच प्रजेला लालमहालात येऊन दाद मागण्याचा अधिकार होता मग भलेही ती तक्रार एखाद्या चोर दरोडेखोराविषयी असेल वा शेतात घरात घुसून जीवा मालाला हानी पोहोचवणार्‍या जंगली जनावराविरूद्ध असो वा जहागिरीतील एखाद्या श्रीमंत पाटील वा गावप्रमुखाविरूद्ध प्रत्येक तक्रार खुद्द शिवाजीराजे व जिजामाता ऐकत व त्यावर योग्य तो न्याय देत.
मातोश्री जिजाबाई व शिवाजी राजे पुणे प्रांती आले तरी व दादोजीपंत दिवाण असले तरी न्याय ईन्साफ स्वता: जिजाबाईसाहेब करीत. पुढे १६४७ मध्ये दादोजी निधन पावल्यानंतर व शिवाजीराजे कुलमुखत्यार असले तरी त्यांच्या गैरहजेरीत कारभार पहात. याचे उदाहरण म्हणून सन १६५१-५२ चे एक खुर्दखत आहे. हे त्यांनी हुद्देदार व मुकादम बेहारवडे, परगणे पुणे यांच्याकडे पाठविले आहे.( प.सा.सं.खंड १ पॄ. १३१ ) त्यात म्हणले आहे,"गणो गणाजी तबीब, कसबे पुणे यास बेहरवडे येथील जमीन, खुद्दाचे फर्मान वजीर्,महाराज व शिउबा यांच्या खुर्दक्खताप्रमाणे चालु आहे.सालमजकुरी ईनाम अनामत करण्याबध्दल चिरंजीव राजेश्री राजे यांचे पत्र आले तरीही ईनाम अमानत न करिता पुर्वीप्रमाणे चालु ठेवणे,चिरंजीव राजेश्री शिउबाचे खुर्दखताचा उजूर न करणे". अश्या कर्तव्यकठोर जिजाउसाहेब होत्या.अगदी त्यांच्या लाडक्या शिवबाचे निर्णयही त्यांनी फिरवले आहेत. याच कारणाने आपल्या मातोश्रीचा शब्द शिवाजी राजे अंतिम मानीत याचे एक उदाहरण आहे. १३ जुलै १६५३ रोजी शिवाजी महाराजांनी जेजुरीच्या श्रीमार्तंडभैरवाचे पुजारी यांच्याकडे पाठविलेल्या कौलनाम्यात म्हणले आहे, "गुरवातील मिराशीचा गरगसा होता.त्याचा निवाडा मातोश्री साहेबी करुन सलासा कारणे कौल दिधला असे.तेणेप्रमाणे साहेबाचाही कौल असे". (प.सा.सं.खं. १ पृ-१३८)
यादव साम्राज्यानंतर काळानंतर मुघल, आदिलशाही आणि निजामशाहीत पिळवणूक सहन करून नुकतेच स्वराज्याचे स्वप्न रयत बघु लागली होती, परंतु वतनदारी मिळालेले काही सरदार रयतेला वेठीस धरण्याचे प्रकार वारंवार होत होते. पाटलांच्या,वतनदारांच्या मनात खोलवर चिखलात रुतून पडलेल्या जनावराप्रमाणे घर करून बसलेली मोगलाई मात्र उतरायचे नावच घेत नव्हती. उगवत्या सूर्याकडे आशेने पाहताना रयत राजरोज हुंदक्या मागून हुंदके देत होती. कुंपणानेच शेत खाल्लं तर न्याय मागायचा कुणाला आणि आपलं दुःख सांगायचे कुणाला. अशी रयतेची स्थिती होती. एके दिवशी असाच एक प्रकार घडला, अशीच एक तक्रार होती एका सामान्य शेतकर्‍याची एका श्रीमंत व घमेंडखोर पाटलाविरूद्ध. पुण्यापासून नऊ कोसांवर असलेल्या रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ़ भिकाजी गुजर याने एका स्त्री सोबत गैरवर्तन केल्याचे महाराजांच्या कानी आले. रांझे,रांझे गावचा पाटील, भिकाजी गुजर याचे नाव आधीपासूनच असल्या गुन्ह्यासाठी प्रसिद्ध होते. पण गावचा पाटील म्हणजे कोण अडवणार, कोण शिक्षा करणार ? याआधी सुद्धा पाटलाने असेच शेण खाल्ले तरीही कोणी निवाडा केला नसल्याने लोकं निमूटपणे अन्याय सहन करत होते.
तो पाटील होता राजमाता जिजाऊंच्या खाजगी खर्चासाठीच्या खेड शिवापुर गावठाणातील रांझे या गावचा व त्याने एका स्त्रीवर बलात्कार केला होता. आजच्या आपल्या जणु लकवा मारलेल्या समाजाला या तक्रारीबाबत काही विशेष वाटणार नाही पण शिवबाराजांना अशा गुन्हयाविषयी अत्यंत चिड होती. त्यांच्या दृष्टीने परस्त्री मग ती कोणीही वा कोणत्याही जाती धर्माची असो पुजणीय होती म्हणून लगेच रांझाच्या पाटलाला न्यायसभेसमोर बोलावले गेले. तो आला तर नाही पण त्याने त्याला बोलवायला गेलेल्या दादोजी कोंडदेवाच्या माणसांच्या घोड्यांच्या शेपट्या तोडल्या, यामुळे अधिकच रागावलेल्या शिवाजी राजांनी तातडीने सेनेची तुकडी पाठवून त्याला जेरबंद केले. यावेळी लाल महालात खुद्द माँसाहेब जिजाऊ न्यायनिवाडा करण्यास बसल्या होत्या. त्यांना ही बातमी समजताच त्यांच्या रागाचा पारा चढला, ज्या रयतेने एवढे वर्ष अन्याय सहन केला त्या रयतेवर आपल्या अधिपत्याखाली असा अन्याय होतोय यावरून त्या चवताळल्या.
रांझे हे गाव जिजाऊंच्या मालकीचे त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी ह्या गावची मालकी आऊसाहेबांकडे आणि त्यांच्याच गावात हा गुन्हा म्हणजे घोर पाप कारण रयतेवर प्रेम करणारी आई रयत नासवना-यांच्या विरुद्ध जणू चंडीचे रूपच धारण करण्याची वेळ आली होती. परंतु राजे आता जाणते झाले होते, त्यांनी याचा निवाडा करण्याचे ठरवले. न्यायनिवाडा करण्यासाठी सर्वांसमोर महाराजांनी बाबाजीची चौकशी केली, चौकशीअंती गुन्हा सिद्ध झाला. या गुन्ह्याला आता महाराज कोणती शिक्षा देणार याचा अंदाज कोणालाही लागत नव्हता. बाबाजीला साधी शिक्षा केल्यास रयतेत उठसुठ कोणीही हे दुष्कर्म करत फिरेल याची महाराजांना जाण होती.
शिवरायांनी कठोर शिक्षा देण्याचे फर्मान दिले, त्वरित त्याची पाटीलकी जप्त केली गेली. इतकेच नव्हे तर त्याला या दुष्कर्माबद्दल त्याचे हात पाय कलम केले गेले. सर्वांसमक्ष बाबाजीला चौरंग करण्याची शिक्षा म्हणजे दिली गेली. पण हात पाय कलम केल्यानंतर रक्तस्त्राव होउन दगावू नये यासाठी जखमा गरम तुपात बूडवल्या गेल्या. गैरकृत्याला माफी नाही मग तो कोणीही असो याची जान सर्वांना यावी यासाठी महाराजांनी ही चौरंग शिक्षा अशी कठोर शिक्षा दिली.
जनतेला ३०० वर्षाच्या मोगलाई नंतर न्याय देणारा वेगळा राजा स्वराज्यातील जनतेच्या लक्षात आले!
चौरंग शिक्षा केल्यानंतर शिक्षा पूर्ण करून त्याच्या पालनपोषणाची व्यवस्था मृदू मनाच्या महाराजांनी केली. बाबाजी निपुत्रिक असल्याने त्याच्या अपंगावस्थेत त्याचा सांभाळ करायची तयारी गुजर कुळीच्याच सोनजी बिन बनाजी गुजर याने दर्शविली. महाराजांनी याबदल्यात मेहेरबान होऊन रांझेची पाटीलकी सोनजीच्या नावे करत बाबाजीस पालनपोषणार्थ त्याच्या स्वाधीन केले.या घटनेचे संदर्भ २८ जानेवारी १६४६ चे शिवरायांची मुद्रा असलेले पत्र सापडले आहे त्यात सापडते.

आजकाल आपल्या आसपास बलात्कार प्रकरणे एवढी वाढली असूनही गुन्हेगाराला कठोर शिक्षा दिली जात नाही. आपण या शिवशाहीतून नेमका धडा घेणार आहोत कि नाही ?
रांझ्याच्या पाटलाचे हात पाय तोडून चौरंगा करण्याबाबत खुर्दखत
आपल्याच रयतेवर बदअंमल केल्याबाबत, शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाला चौरांगा करण्याची शिक्षा सुनावली, त्याचे मूळ खुर्दखत

खुर्दाखत 'प्रतिपच्चंद्र' मु.

अजरख्तखाने राजेश्री शिवाजी राजे दामदौलत ज्यानिब कारकुनानि हाल व इस्तकबाल देसमुखानि व देसकुलकर्णीयानि तर्फे खेडेबारे बिदानद के सुहूर सन सीत अर्बैन अलफ बाबाजी बिन भिकाजी गुजर मोकदम मौजे रांझे तर्फ म।।र हा मौजे मजकुरची मोकदमी करीत असता याजपासुन काही बदअमल झाला. हे हकीकत हुजूर साहेबासी विदित झाला, त्यावरून बहुकुमी तलब करून साहेबी हुजूर आणून वाजपुस करिता खरे जाले. याजकरिता बाबाजी म।। याची वतनी मोकदमी हुजूर अमानत केली. बाबाजीचे हातपाय तोडून दूर केला. ते वख्ती सोनजी बिन बनाजी गुजर किले पुरंदर हे जनात गोत म्हणून देऊन अर्ज केला जे आपले हाती देणे. बराये अर्ज खातीरेस आणून बाबाजी म।। याचे माथा गुन्हेगारी होन प।। तीनसे करार केले ते सोनजी म।। याने देऊन बाबाजीस हाती घेतले. याचे पोटी संतान नाही. हे कुळीचे गुजर, म्हणून साहेबी मेहेरबान होऊन मौजे रांजे त।। म।।ची मोकदमी सोनजी बिन बजाजी गुजर याचे दुमाला करून याजपासून दिवाणात सेरणी होन प।। दोनसे करार करून घेऊन मोकदमी यास दिथली असे. यास कोणी मुजहीम न होणे. असल पत्र फिरावून भोगवटीयास देणे. उजूर न करणे. मोर्तब सूद. रुजू सुरु निवीस.

शिवकालीन न्यायव्यवस्थेतील दिव्ये
१७ व्या शतकात म्हणजेच शिवकालात न्यायव्यवस्थेचा एक भाग म्हणजे दिव्य. विश्वसनीय लेखी वा तोंडी पुरावा उपलब्ध नसल्यास आरोपीला दिव्य करावे लागे. दिव्य म्हणजे आरोपीने काही कठीण (शकत्यो शारीरीक) परीक्षेतुन जायचे. दिव्याच्या सफलतेवर न्यायदान होत असे. तसे पाहीले तर ही दिव्ये आणि अचूक न्यायाचा संबंध नाहीच पण 'सत्यमेव जयते' या सूत्रानुसार आणि देवावरील/खरेपणावरील श्रध्देपोटी हा दिव्याचा मार्ग निघाला असावा. पुराव्याअभावी तंटा अडकला की दिव्य करावे लागे पण नंतर विश्वसनीय पुरावा मिळाल्यास गोतसभा निर्णय बदलत असे.
दिव्य करायलाही विशिष्ट पध्द्दत आखली होती. दिव्यासाठी वेळ व ठिकाण ठरवले जाई. गोतसभेच्या आणि गावक-यांच्यां उपस्थितीत दिव्य होई. दिव्य देणारा आणि करणारा दोघांनाही दिव्यापूर्वी १-२ दिवस उपवास करावा लागे. ठरलेल्या वेळी सर्वांच्या उपस्थितीत होम केला जाई. देवतांचे पूजन, घटस्थापना होई. ज्या संबंधी दिव्य करायचे त्या मजकुराची एक पत्रीका दिव्य करणा-याच्या कपाळाला बांधत. मग तो दिव्य करण्यास तयार होई. या सर्व पुजापठनाचा हेतू असा की एक धार्मीक वातावरणनिर्मीती होई. त्या काळात सत्य आणि धार्मीकतेचा जवळचा संबंध होता.
दिव्याचे प्रकार :
१. अग्निदिव्य
२. जलदिव्य
३. तंदूलदिव्य
४. वातीची क्रिया
अग्निदिव्य
तयारी : अग्निदिव्यात लोखंडाचा एक गोळा ३ वेळा लालबुंद तापवून पाण्यात घालुन शुध्द करुन घेत. १६ अंगुले व्यासाची ९ मंडले आखली जात. ९ व्या मंडलात कुंड बनवत व त्यात कणिक ठेवत. दिव्य करणा-याची नखे कापुन त्याचे हात स्वच्छ धुवुन त्याच्या हस्तरेषा मांडून ठेवत. पंच गोळा नीट तापलाय का याची खातरजमा करुन घेत.
दिव्याची क्रिया :
दिव्य करणारा पहिल्या मंडलात उभा राही. त्याच्या हातात ७ पिंपळाची पाने ठेउन त्यावर तप्त गोळा ठेवायचा. मग त्याने ७ मंडले चालत जाउन ९ व्या मंडलात तो गोळा टाकायचा. तप्त गोळ्याने कुंडातली कणित पेट घेई.
न्यायनिवाडा :
दिव्यानंतर त्याची हात तपासणी होई. हात भाजलाय का हे पाहीले जाई. जर प्रथमदर्शनी कळाले नाही तर दुस-या दिवशा हस्तरेषा पाहुन त्या आधीच्या मांडणीसोबत ताडून पाहत. जर भाजल्याने, फोड आल्याने त्या जुळल्या नाहीत तर दिव्य देणारा हरला. जर हाताला अग्निस्पर्श झाला नाही हे सिध्द झाले तर दिव्य देणारा जिंकला. त्यानुसार न्यायनिवाडा होई.
जलदिव्य
तयारी : हे दिव्य नदीकाठी करावयाचे दिव्य. तीर-कमान पुजन करुन उपवास केलेल्या ब्राह्मण वा क्षत्रियास दिले जाई. त्याने सरळ मार्गावर ३ तीर सोडायचे. हे तीर खाचखळग्यात, चिखलझाडीत सोडू नयेत. तीरंदाजाजवळ २ जवान तैनात रहात. दिव्य देणारा पाण्यात उभा राही. पाणी बेंबीला लागेल इतक्या पातळीवर उभे रहावे. त्याजवळ तरबेज पोहणारा कोळी उभा राही. दिव्य देणारा घाबरला, बुडू लागला तर त्याला बाहेर काढायची जबाबदारी त्यावर असे.
दिव्याची क्रिया :
दिव्य देणा-याने पाण्यात बुडी मारावी. मग तिरंदाजाजवळ असणा-या जवानांनी पळावे. पळत जाउन ३ तीरांपैकी मधला तीर उचलून आणावा. ते परत तिरंदाजाजवळ येईपर्यंत दिव्य देणा-याने पाण्याच्या आतच रहावे.
न्यायनिवाडा :
जर दिव्य देणा-याचे कान,नाक,डोळे, तोंड तीर आणणा-या जवानांना दिसले तर दिव्य देणारा हरला. आणि जवान परत तिरंदाजाजवळ ईपर्यंत दिव्य देणारा पाणयातच राहिसा तर तो जिंकला. मग त्यानुसार न्यायनिवाडा होई.
तंदूलदिव्य
तयारी : ठरवल्यानुसार एखाद्या धातूचे (सोने, चांदी, तांबे) गोलाकार कडे बनवायचे. हे कडे तापवून तुपात अर्धे बुडेपर्यंत ठेवावे.
दिव्याची क्रिया :
दिव्य देणा-याने हे कडे 'अंगुष्टांगुलीयोगेन' बाहेर काढुन दाखवावे.
न्यायनिवाडा :
बोटाला फोड आला तर दिव्य देणारा हरला. त्यानुसार पुढे न्यायनिवाडा होई.
वातीची क्रिया
तयारी : दोन्ही पक्षांनी स्नान करुन यावे. पंच दोन्ही पक्षांना सारख्याच वजनाची कणीक आणि कापुस देत. कणकेचा दिवा करावा व कापसाची वात.
दिव्याची क्रिया :
दोन्ही दिव्यात सारख्याच मापाचे तेल टाकुन दोन्ही दिवे एकदम प्रज्वलित करायचे. हे दोन्ही दिवे मग देवापुढे ठेवायचे.
न्यायनिवाडा :
ज्या पक्षाचा दिवा आधी विझला तो पक्ष हरला. त्यानंतर दुसरा दिवा ३०० टाळ्या वाजेपर्यंत टिकला तर तो पक्ष जिंकला. जर तो आधीच विझला तर निर्णय व्हायचा नाही. निर्णय पुढे ढकलला जाई.
अशा प्रकारे गोतसभा पुराव्याअभावी अडलेल्या खटल्यांचा निकाल दिव्य घेउन करे. खटला जिंकणा-याला 'जयपत्र' मिळे तर हरणा-यास 'यजितपत्र' मिळे.
संदर्भ : शककर्ते शिवराय (लेखक- विजयराव देशमुख)

यासंदर्भात एक शिवकालीन प्रसंग पाहू. गुंजन मावळात मोहरी गावाजवळ एक प्राचीन शिवमंदिर आहे, "अमृतेश्वर". शिवपूर्वकाळापासून येथे न्यायनिवाडे होत असल्याचे तसेच दिव्यही केल्याचे उल्लेख आहेत. याच अमृतेश्वर मंदिर' परिसरात एक न्यायनिवाडा आणि दिव्य दोन्ही पार पडल्याचा एक प्रसंग शिवाजी महाराजांच्या' काळात झाला. या न्याय निवाड्याला स्वत: 'छत्रपती शिवाजी महाराज' हजर होते असे म्हणतात. याबद्दल पत्रांमधून काही उल्लेख सापडतात.दिनांक ३० मे १६३१ रोजी कोढीत येथील मुकादमी संबंधी 'बाबाजी नेलेकर' आणि 'जनाजी खैरे' यांच्यात काही वाद झाला,हा झगडा 'दादाजी कोंडदेव' यांच्याकडे नेण्यात आला, तेव्हा या वादाचा निर्णय हा मोहरीच्या 'अमृतेश्वर मंदिरामध्ये' झाला. यामध्ये 'जनाजी खैरे' याने दिव्य केले आणि तो खरा ठरला. याप्रसंगी 'दादाजी कोंडदेव' यांच्या बरोबर मावळातील अनेक मातब्बर 'देशमुख' हजर होते.

२८ जानेवारी १६४६ या तारखेचे शिवाजी राजांचे एक न्यायनिवाड्याविषयक एक पत्र उपलब्ध आहे, त्यावर हि राजमुद्रा पहायला मिळते.
वास्तविक पुणे परगणा हि मुळ आदिलशाही मालकीची.त्यांनी शहाजीराजांना जहागिरदार नेमलेल, तर शहाजी राजांच्या वतीने शिवाजी राजे या जहागिरीचा कारभार सांभाळत होते, म्हणजे अप्रत्यक्ष शिवाजी राजे आदिलशाही जहागिरीचा कारभार बघत होते. मात्र शिवाजी राजांनी आदिलशाही राजवट आपल्या मनातून कधीही मानली नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराजांची राजमुद्रा. यात ते शहाजीचा पुत्र म्हणून मी कारभार बघतो आहे, असे स्पष्ट म्हणतात. याचा अर्थ आपल्याला स्वताचे असे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे आहे याची त्यांना स्पष्ट कल्पना होती आणि अगदी राजमुद्रेपासून त्यांनी ती अमंलात देखील आणली होती.
आता शिवाजी राजांना मावळात आपला जम बसवायचा होता. वास्तविक या मावळात अनेक वतनदार होते, पण त्यांचे एकमेकांत अजिबात पटत नव्हते. अर्थात सगळेच असे होते हे नक्कीच नाही. मावळात दोन वतनदार चांगल्या वागणूकीचे होते. एक हिरडस मावळातील कारीचे कान्होजी जेधे आणि दुसरे मोसे खोर्‍यातील बाजी पासलकर. बाजी पासलकर पौडजवळील तव गावात रहायचे. या नामांकित देशमुख एकदा शिवाजी राजांना मानयला सुरवात केली त्याबरोबर बाकीच्या देशमुखांनाही आपोआप वचक बसला. या सर्व वतनदारांचे न्यायनिवाडे लालमहालात होउ लागले. अर्थात काही नाठाळ प्राणी होतेच. रामजी चोरघे, फुलजी शिळीमकर आणि कृष्णाजी बांदल. अर्थात असे उडदामाजी काळेगोरे सोडले तर बाकीचे वतनदार जसे कानद खोर्‍यातील झुंजारराव मरळ देशमुख, गुंजण मावळांतील हैबतराव शिळीमकर देशमुख, मोसे खोर्‍यांतील बाजी पासलकर देशमुख, खेडेबार्‍याच्या शिवगंगा खोर्‍यांतील कोंडे देशमुख, मुठे खोर्‍यांतील पायगुडे देशमुख, कर्‍यात मावळचे विठोजी शितोळे देशमुख, रोहिड खोर्‍यांतील जेधे देशमुख, खोपडे वगैरे मंडळी शिवाजी राजांना मानू लागली. अर्थात हे सर्व वजनदार असामी होते, शिवबाचे हनुमान्,अगंद, सुग्रीव्,जांबुवंत वगैरे अजून लांब मावळच्या दर्‍याखोर्‍यात होते, त्यांची गाठ पडण्याचाही लवकरच योग आला.
(क्रमशः)

आपण माझे सर्व लिखाण एकत्रित वाचु शकता.
भटकंती सह्याद्रीची

इतिहासलेखमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

22 Jan 2021 - 10:15 pm | तुषार काळभोर

रांझ्याच्या पाटलाची हकीकत सर्वश्रुत आहेच.
बाकीच्या बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा कळल्या. वेगवेगळी दिव्ये पहिल्यांदाच वाचली. एक प्रकार वाचून माहिती होता, उकळत्या तेलात हात बुडवणे. हा बहुधा चोरीसाठी वापरला जायचा. आता चुकीच्या वाटल्या तरी या गोष्टी तत्कालीन मान्यता व समजुती नुसार होत्या.

एक अवांतर शंका आहे.
देशमुख, देसाई, कुलकर्णी, पाटील, देशपांडे या कारभारी / अधिकाऱ्यांची कामे काय होती?
माझ्या समजुती नुसार, देशमुख कडे काही तालुक्यांचा आकार असलेल्या प्रदेशाचा जनरल कारभार + वसुली हक्क होता. साधारण आताचा जिल्हाधिकारी.
पाटलाकडे गावाचा जनरल कारभार होता. वसुली करून सरकारात जमा करणे असे असावे. साधारण आताचा सरपंच.
कुलकर्णी म्हणजे गावच्या कारभाराचा हिशोब ठेवणारा. सारा वसुली चा हिशोब, गावचा जमा खर्च ठेवणे.
देसाई म्हणजे माहिती नाही.
देशपांडे कदाचित देशुमख सारखे, पण ब्राह्मण.
सगळ्या वैयक्तिक समजुती आहेत. चुकीच्या असतील तर करेक्शन आवडेल.

देखमुखाकडे सारा वसुलीचे आणि जमीन लागवडीखाली आणण्याचे काम असे. देशपांडे म्हणजे देखमुखाकडचे हिशोब पाहण्याचे काम करणारा अधिकारी. पाटील गावाच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पाहणारा थोडक्यात फौजदार. कुळकरणी म्हणजे गावाचा लेखापाल. प्रत्येकाकडची जमीन किती, त्यावर सारा किती, वसुली किती झाली आहे, किती व्हायची आहे याचा हिशोब ठेवणारा. देसाई हे मुख्यतः तळकोकणात त्यातही गोव्याच्या बाजूचे असत. त्यांचे कामही हिशोब पाहणे, सारावसुली वगैरे असे.

तुषार काळभोर's picture

23 Jan 2021 - 6:44 pm | तुषार काळभोर

अजून कोणी अधिकारी होते का ब्रिटिश पूर्व काळात? विशेषतः स्थानिक, गाव - प्रांत पातळीवर?

प्रचेतस's picture

23 Jan 2021 - 3:58 pm | प्रचेतस

उत्कृष्ट लिहिले आहे.

गामा पैलवान's picture

25 Jan 2021 - 3:31 pm | गामा पैलवान

दुर्गविहारी,

एका रोचक व रंजक लेखमालेबद्दल आभार! :-)

भिकाजी गुजराने बदअमल म्हणजे नेमकं काय केलं, असा प्रश्न उद्भवतो. हा इच्छेविरुद्ध बलात्कार असेल तर त्यासाठी शिरच्छेद व्हायला हवा होता. मला वाटतं की भिकाजीने घोड्यांच्या शेपट्या तोडणे वगैरे जे अतिरिक्त अपमान केले त्यांची भरपाई म्हणून त्याला जिवंत ठेवून चौरंग केला असावा. ही दोनतीन अपराधांची एकत्रित शिक्षा दिसते आहे.

'मी निपुत्रिक असल्याने पुत्राच्या आशेने सदर वर्तन केले' म्हणून भिकाजीने माफी मागितली असती तर शिवरायांनी इतकी कठोर शिक्षा दिली नसती. असं मला वाटतं.

बाकी, स्त्रियांचा आदरसन्मान राखला पाहिजे याविषयी दुमत नाही. माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे कर्नाटकात स्वराज्याशी वैर असलेल्या कुण्या एका देसाईणीशी गैरव्यवहार केल्याने महाराजांनी आपल्याच एका माणसाचे डोळे काढवले होते.

आ.न.,
-गा.पै.