मालवणचे देवधर: काही मौखिक आठवणींची नोंद

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जनातलं, मनातलं
2 Jan 2021 - 6:20 pm

(नोंद: या आठवणी त्रोटक आहेत. एका संध्याकाळी दोनतीन तास चाललेल्या गप्पांवरून दुसऱ्या दिवशी जे व जितके आठवले तसे नोंदले आहे. यात जातिसंस्था, शिवाशीव वगैरे प्रथांचा उल्लेख काळानुरूप आला असला तरी त्यांचे उदात्तीकरण करण्याचा मुळीच हेतू नाही. कुणाला ते तसे उल्लेखही अनुचित वाटण्याची शक्यता आहे, त्यांची आधीच माफी मागतो)
***

संध्याकाळी आम्ही आमच्या कुटुंबातील Grand Old Man मनोहरमामा देवधर (मूळ गाव देऊळवाडा, मालवण, पण बरेचसे आयुष्य गुजरातेत काढले. आताही वास्तव्य तिथेच) यांच्या घरी गेलो होतो. हे खरेतर आईचे मामा, माझे आजोबाच. पण आम्हीही सगळे त्यांना मामाच म्हणतो. नव्वदीचे वय. पण तुलनेत तब्येत धडधाकट व आवाज चांगला खणखणीत.

तिथे मालवण हा विषय निघणे ओघाने आलेच. जुनी जुनी नावे आठवली गेली. डॉ. झांट्ये, शशी झांट्ये, बाळू अभ्यंकर, बाळू पुराणिक, बाबल मराठे (हमो मराठे यांचे ज्येष्ठ बंधू), आवबा कुडाळकर वगैरे.

मग अजून पुरातन गोष्टी निघाल्या. एकेकाळी ब्राह्मण मनोहरमामांनीही भिक्षुकीसाठी कोळंब ते तारकर्ली- देवबाग हा भाग पायी पालथा घातलेला आहे. (नंतर नोकरी धरून ते मालवणातून कायमचे बाहेर पडले व यथावकाश गुजरातला स्थायिक झाले) त्या आठवणी निघाल्या. त्याकाळी गणेशोत्सवात पूजा आटोपल्याशिवाय घरचे लोक पाण्याचा थेंब घेत नसत. सांगणारे भटजी मोजके, तेच सगळीकडे जाणार. पण त्यांना कितीही उशीर झाला तरी अगदी घरातील पोरेटोरेही तहानभूक सहन करीत बसून रहात. जाती- सोवळ्याचे नियम कडक असल्यामुळे स्वतः भटजी कुणाच्याही घरी जेवत नसत. तहान लागली तर स्वतः पाणी शेंदून पीत. ब्राह्मणेतर यजमानांनाही भटजींना जेवणखाण विचारण्याचे धारिष्ट्य होत नसे. (मनोहरमामांना ते लहान असताना एकदा त्यांच्या काकांसोबत तारकर्लीहून परतायला पहाट झाली, तेव्हा भुकेने व्याकुळ झाल्यामुळे वाटेत सामंतांच्या घरी चहा पिण्याची 'परवानगी' मिळाली होती!)

मालवणातल्या एका विशिष्ट समाजाच्या (स्पष्ट नामोल्लेख टाळत आहे) आळीत कुणीच भटजी जात नसत. मात्र माझे सख्खे आजोबा भाऊ पुराणिक हे गणपतीत पूजा सांगायला जात.

वायरीला महादेव तारी नामक गृहस्थ होते. ते गाबीत समाजातील असूनही स्नानसंध्या, संपूर्ण पूजाविधी, आचार, कर्मकांडे यात पारंगत होते. हे ज्ञान त्यांनी सदर मनोहरमामांच्या काकांकडून घेतले. भिक्षुकी अर्थातच ते करू शकत नव्हते. पण त्यांनी (शाकाहारासहित) संपूर्ण ब्राह्मणी जीवनशैली स्वोकारली होती. त्यांच्या मालकीच्या चार होड्या होत्या पण मासे पकडायला किंवा विकायला ते स्वतः कधीच गेले नाहीत. गाबीत समाजातील धर्मकार्ये ते स्वतः करीत असत. मालवणातील तत्कालीन ब्रह्मवृंदास हे अमान्य होते. हे ज्ञान एका ब्राह्मणेतरास दिले म्हणून देवधरांवर कडक बहिष्कारही टाकण्यात आला होता.

देऊळवाड्यातील देवधरांकडे दूधदुभते मुबलक असे. मालवणात बाजार करून भर उन्हात घाटी चढून पायी गावी (कुंभारमाठ इ.) परतणाऱ्या भारेकरी बायकांसाठी घाटीच्या वर ताकाचा हंडा रोज ठेवला जाई. त्यांना ताक पाजणे ही देवधरांकडील परकऱ्या पोरींची जबाबदारी असे.

हे देवधर मालवणात कुठून आले याचा नीटसा तपास लागत नाही. सावंतवाडीजवळ होडावडे ग्रामपंचायतीत 'आपली वीस एकर जमीन देवळाला दान करून सर्व देवधर मालवणास निघून गेले' अशी जुनी नोंद बाडात आहे. पण त्याचा कालखंड किंवा त्या पूर्वजाचे नाव ज्ञात नाही. तेच देवधर ते हे का, हेही उमजत नाही.

आता देवधरांची घरे ओस पडत चालली आहेत. तरुण पिढीपैकी फारसे कुणी देऊळवाड्यात नाही, बहुतांश मुंबई- पुण्याला किंवा परदेशात आहेत. आईवडिलांची पिढीही मुलांकडे स्थलांतरित होत आहे. मागे राहिलेल्या मोजक्या वृद्ध लोकांचे ती घाटी चढता-उतरताना फारच हाल होतात. त्यामुळे तिथे राहण्यास फारसे कुणी उत्सुक नाही.

देवधरांची ती घरे पुन्हा तिथे नांदती कधीच होणार नाहीत कारण त्यांचे देव (मामांच्या आधीच्या पिढीत) मूळ घरातून हलवून दुसरीकडे स्थापित केले गेले. तो कोप देवधरांवर झाला असा समज आहे.

खरे कारण अर्थातच तरुण पिढीचे स्थलांतर हे आहे. मग एकेक नावे निघाली. (सगळी माझ्या ओळखीची नव्हती). घरोघरी तीच कथा. आईबापांनी हौसेने मोठी घरे बांधली पण मुले काही येऊन रहाण्याचे चिन्ह दिसत नाही. उलट वाट पाहून हताश झालेले व गात्रे थकलेले आईवडीलच मुला-मुलीकडे जाऊन रहात आहेत.

इतिहाससमाजजीवनमानअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

भीमराव's picture

2 Jan 2021 - 7:01 pm | भीमराव

विशिष्ठ समाजाला हे मान्य करायचंच नाही कि अमुक एक तारणहार सोडला तर इतर कोणत्याही हिंदू विशेषतः बामणानं त्यांच्या उद्धारासाठी काय कार्य केलं असेल.

तुम्ही गृहीत धरलेला समाज कोणता ते मला माहीत नाही. पण इथे समाजनाम महत्वाचे नाही. दोन पिढ्यांमागच्या काळात कोकण किनारपट्टीच्या एका लहानशा गावात (आता मालवणात पर्यटक वाहनांमुळे रोज भयानक गजबजाट व वाहतूक खोळंबा होत असतो ते निराळे) एका विशिष्ट वर्गाची जीवनपद्धती कशी होती हे नोंदवण्याचा माझा उद्देश होता.

प्रदीप's picture

3 Jan 2021 - 10:01 am | प्रदीप

आवडल्या. अतिशय त्रयस्थपणे आपण ह्या नोंदींतून तेथील तत्कालिन समाजाचे, त्यांतील प्रचलित चालीरितींचे सुंदर दस्तावेजीकरण केलेले आहे.

असे अजून येऊंद्यात.

प्राची अश्विनी's picture

3 Jan 2021 - 2:36 pm | प्राची अश्विनी

+1

चलत मुसाफिर's picture

3 Jan 2021 - 3:51 pm | चलत मुसाफिर

दस्तावेजीकरण हा भारदस्त शब्द विसरलोच होतो. :-)

आता त्या पिढीचे आमच्या कुटुंबात फारसे कुणी उरलेले नाही. सहज गप्पा मारताना या जुन्या आठवणी निघाल्या होत्या. मी स्वतः चाळिशीपार असूनही मला त्या सर्व नवीनच होत्या. त्या आपण नोंदवून ठेवल्या पाहिजेत असे मला प्रकर्षाने वाटले व मी लागलीच त्या लिहून काढल्या.

प्रचेतस's picture

3 Jan 2021 - 10:16 am | प्रचेतस

सुरेख लिहिलंय.

चलत मुसाफिर's picture

3 Jan 2021 - 3:46 pm | चलत मुसाफिर

प्रोत्साहन दिल्याबद्दल.

सौंदाळा's picture

3 Jan 2021 - 8:50 pm | सौंदाळा

लेख मस्त आहे पण थोडक्यात आटपल्यासारखा वाटला
मनोहरमामा देवधरांच्या कोकणातील अजून आठवणी वाचायला आवडतील.

चलत मुसाफिर's picture

3 Jan 2021 - 9:00 pm | चलत मुसाफिर

पुन्हा कधी अशा गप्पा घडल्या तर नक्की लिहीन

चलत मुसाफिर's picture

12 May 2021 - 6:58 pm | चलत मुसाफिर

कळविणेस दुःख होते की मनोहरमामा देवधर यांचे गेल्या आठवड्यात बडोदा (गुजरात) येथे देहावसान झाले.

विद्याधर३१'s picture

13 May 2021 - 10:22 am | विद्याधर३१

भावपूर्ण श्रद्धांजली.

दस्तावेज मध्ये माझ्या पिगीबैंक मधले चार आणे

आपण उल्लेख केलेल्या पैकी एका गावाजीकच्या गावात माझे बालपणातल्या बर्याच सुट्ट्या व गणेशोत्सव गेले असल्याने पूर्ण गावात पूजा करून भटजीकाका (पूर्वीच्या भटाला मी काका बोलायचे आत्तता येतो तो त्यांचाच मुलगा- पण तोही भटजीकाका च) येईस्तो पूजा थांबवणे (व मुख्य म्हणजे नैवेद्य ही) व त्यामुळे भूकेने जीव व्याकुल होणे हे आठवतेय.
अजून एक भटजीकाका आमच्या घरी आमच्या विहिरीतून स्वतःच पाणी शेंदून आणित, घरात मोटर पंप असताना.
ब्राह्मण भोजन नामक प्रकार असे त्यात शिधा देत किंवा भटजीकाका स्वतःच ३दगडच्या चूलीवर रांधत (सर्वांसाठी म्हणजे १०-१२ घरांसाठी). तेव्हा लहान असलेने काही समजत नसे पण आईला विचारले होते त्यांना जेवायला बोलवायचे आणि त्यांनीच सर्वस्वयंपाक करायचा असे कसे. मी काहीपण विचारत असे जसं जुनीयर.भटजीकाका ला टपरीवर भजी खाविशी वाटली तर ते काय करतात, भटजीकाका आपल्या घरी जेवतात तर काकींच्या जेवणाचे काय, इ.इ. मेन्यू पण नेहेमीचाच असे दाल, भात, बटाटा किंवा फणस गरेची भाजी , भरपूर खोबरं घालून,सोलकढी असा सामान्य बेत पण भारी चविष्ट. ते सोलकढीला फोडणी देत तेही आठवतंय

लहानपणी काहीच समजत नव्हते व तिथे स्थथायिक नसलेने गांभीर्य हीनव्हते
आत्ता आमच्याही गावात बहुतेक म्हातारे कोतारे आहेत, मूलं नातवंड देशात परदेशात व तेव्हढी ओढही राहीली नाहीय मीही गेली ३ वर्ष जाऊ शकले नाही

मला वाट्ट हे मालवणात असावं कारण आईच्या घरी (माहेरी) व माझ्या सासरच्या गावी पूजा अर्चा (गणेशोत्सव वगैरे) मध्ये आमका कित्याक भट व्हयो, आमचा काय असात ता आमीच करतंव टाईप उत्तरं येतात. त्यामुळे आमची आईदेखिल 'तो येता, पाय लावन् जाता केश वाय नमः माधवाय नमः इतक्याच बोलता पण तंवसर आमका उपाशी रवाचा लागता' असे बडबडत असे. तिच्या मते मला जास्त श्लोक स्तोत्रं प्रार्थना आरत्या.येतात!

धागाकर्त्याचे डिसक्लेमर माझ्या प्रतिक्रिये लाही लागू

चलत मुसाफिर's picture

18 May 2021 - 7:39 am | चलत मुसाफिर

प्रतिसादाबद्दल सादर धन्यवाद.

पौरोहित्य हे जन्माधारित किंवा वंशपरंपरागत असणे, पौरोहित्याचा मक्ता विशिष्ट समाजाकडे (तोही केवळ पुरुषांकडे) असणे हे मला योग्य वाटत नाही. पौरोहित्य शिकण्याची, करण्याची व त्या अनुषंगाने येणारी बंधने पाळण्याची इच्छा व तयारी असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस पौरोहित्य करण्याची मुभा असली पाहिजे असे माझे मत आहे.

पूजा, प्रतिष्ठापना, आचार यावर विश्वास नसेल किंवा त्यात रस नसेल तर त्यापासून दूर रहावे, केवळ हौसेमौजेची सबब म्हणून धार्मिक विधि करू नयेत असेही मला वाटते.

सिरुसेरि's picture

18 May 2021 - 10:21 am | सिरुसेरि

माहितीपुर्ण लेख आणी प्रतिक्रिया .