गोव्याचा इतिहास- शिवकाल

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in जनातलं, मनातलं
27 Nov 2020 - 1:48 pm

काही वर्षापुर्वी मिसळपाव.कॉमवर गोव्याचा इतिहासाची सविस्तर माहिती देणारी नितांत सुंदर मालिका टिम गोवा या आय.डी.ने लिहीली होती.त्याच्या सर्व भागांची एकत्रित लिंक खाली दिलेली आहे.
आमचें गोंय - समारोप - आजचा गोवा
या मालिकेत भाग ५ मध्ये शिवकाल आणि मराठेशाहीविषयी माहिती लिहीली आहे.त्याची लिंक खाली दिलेली आहे.
आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही
मात्र हि माहिती पुरेशी सविस्तर नसल्याने या कालखंडातील इतिहासावर दोन धागे लिहायचे ठरविले.त्यातील पहिला भाग आज लिहीला आहे.पुढच्या आठवड्यात दुसरा भाग प्रकाशित करेन.

इ.स. १५७० च्या सुमाराला बहामनी सत्तेचे ५ तुकडे झाले. आणि तिसवाडी, बार्देश व साळशेत हे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले ३ तालुके वगळून बाकीचे तालुके इस्माईल आदिलशहाच्या ताब्यात आले. इ.स. १५८० मध्ये पोर्तुगालवर स्पेनची सत्ता प्रस्थापित झाली. इथून पुढे इ.स. १६४० पर्यंत पोर्तुगालवर स्पेनची सत्ता सुरू राहिली. अर्थातच, या काळात गोव्यावर अप्रत्यक्षपणे स्पेनची सत्ता होती. या काळात पोर्तुगीज सत्ता काहीशी दुर्बल झाली होती. या काळात हॉलंड आणि स्पेन यांचं शत्रुत्व होतं. इ.स. १६०३ मध्ये वलंदेज म्हणजेच डच लोकानी मांडवीच्या मुखात ठाण मांडून गोव्याची नाकेबंदी सुरू केली. इ.स. १६०४ मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध, डच आणि कालिकतचा झामोरिन यांच्यात तह झाला. डच आणि पोर्तुगीज यांच्यातल्या चकमकी सुरूच राहिल्या. इ.स. १६४० साली श्रीलंका तर इ.स. १६४१ साली मलाक्का हे दोन प्रांत डचानी पोर्तुगीजांकडून हिसकावून घेतले. समुद्रातून गोव्याची नाकेबंदी इ.स. १६४० च्या दरम्यान परत सुरू झाली. नंतर इ.स. १६६० पर्यंत हे असंच सुरू राहिलं. इ.स. १६६० मधली महत्त्वाची घटना म्हणजे कॅथरिन या राजकन्येच्या विवाहात मुंबई बेट पोर्तुगालकडून दुसर्‍या चार्ल्सला हुंडा म्हणून मिळालं आणि भारताच्या पश्चिम किनार्‍यावर इंग्रजांना एक महत्त्वाची जागा मिळाली. आता भारतात पोर्तुगीजांचं राज्य दीव-दमण, वसई, चौल आणि गोव्यातले ३ तालुके एवढ्यापुरतंच उरलं.

छत्रपति शिवाजी महाराज

या दरम्यान, शिवनेरीवर एक तेजस्वी, महापराक्रमी शक्ती १९ फेब्रुवारी १६३० ला उदयाला आली होती. राजे शिवाजी स्वराज्य आणि सुराज्याची स्थापना करून त्याच्या मजबुतीचं काम करत होते. इ.स. १६५६ मध्ये महाराजांनी जावळीवर आक्रमण करुन चंद्रराव मोर्‍यांचे उच्चाटन केले आणि पुर्ण जावळी व त्यानंतर पुढच्या दोन- तीन वर्षात बराचसा उत्तर आणि दक्षीण कोकण ताब्यात घेतला. हा पराक्रम जेव्हा गोव्याच्या पोर्तुगीज व्हॉईसरॉयला समजला तेव्हा त्याने ५ मे १६५८ रोजी पोर्तुगॉलच्या बादशहाला लिहीलेल्या पत्रात शिवाजी महाराजांची दखल "शहाजीचा पराक्रमी मुलगा" अशी घेतली.
या द्रष्ट्या महापुरुषाने तेव्हाच्या कोणत्याही भारतीय शासकाने फारशा न केलेल्या अनेक गोष्टी केल्या. त्यातली एक म्हणजे आरमाराची स्थापना. भूदुर्गांबरोबरच जलदुर्गांची स्थापना. सन १६५७ रोजी मुंबईजवळ कल्याण बंदरात सुवर्णाक्षरांत नोंद घेण्यासाठी एक घटना घडत होती. ते म्हणजे शिवाजी महाराजांचे आरमार. आपला देश, आपला समुद्र असूनही तत्पूर्वी त्यावर आमचा हक्क नव्हता. दूरदेशावरून आलेल्या पोर्तुगिजांकडे समुद्राची मालकी, त्या जोडीला इंग्रज, डच, सिद्धीही त्यावर हक्क आणि मालकी सांगायला. या सर्वांशी संघर्ष करायचा तर नौदल हवेच.

शिवाजी महाराजांनी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर स्थानिक कोळी, भंडारी, मराठे, प्रभु यांना जवळ केले आणि आपला नौदलाचा विचार त्यांच्यापुढे मांडला, पण नौदल – म्हणजे लढायांसाठी लागणार्‍या नौका मागील कित्येक पिढ्यांनी तयार केल्याच नव्हत्या. नौदलाचे तंत्रज्ञान होते युरोपीय पोर्तुगिजांकडे. पोर्तुगिजांचा कारागीर लुई लैतांव व्हिएगस हा त्याकाळी प्रसिद्ध होता. त्यास शिवाजी राजांनी बोलावून नौदल उभारण्याची जबाबदारी दिली. त्याच्या हाताखाली स्थानिक भंडारी, कोळी लोकांना मदतनिस म्हणून दिले. लुई लैतांव हा, शहाजीराजांचा बंडखोर मुलगा शिवाजीराजे यांच्यासाठी नौदल उभारतोय हे पोर्तुगीज गव्हर्नरला कळले. गव्हर्नरने ताबडतोब लैतांवकडे निरोप पाठवून गुपचूप काम बंद करून निघून येण्यास सांगितले. लुई लैतांव आणि त्याचा मुलगा फेर्नाव व्हिएगस हे क्षणाचाही विलंब न लावता रातोरात स्वत:ला मिळालेले काम आणि त्यासाठी मिळणार्‍या पैशांवर पाणी सोडून पळून आले. का? तर हे तयार होणारे नौदल आज ना उद्या आपल्याच देशबांधवांविरुद्ध – म्हणजे पोर्तुगिजांविरूद्ध वापरले जाणार आहे म्हणून. पण पोर्तुगीज कारागिरांनी अर्धवट सोडलेले नौदल महाराजांच्या स्थानिक कारागिरांनी असे काय उभे केले की, ते पोर्तुगीज, इंग्रज या बलाढ्य युरोपीयनांनाही पाणी पाजू लागले.

या आरमाराची पोर्तुगीजांनाही एवढी दहशत होती की, त्यांनी राजांच्या नौकांना आपल्या बंदरात येऊ द्यायला नकार दिला होता!
अफझलखानाचा वध आणि पाठोपाठ फाझलखान, रुस्तुमजमा यांचा रायबागजवळ पराभव यामुळे गोव्याच्या व्हॉईसरॉय यास आगामी संकंटाची चाहुल लागली. १२ मार्च १६६० च्या पत्रात तो कळवितो, "सरदार शहाजीचा पुत्र शिवाजी सध्या विजापुराजवळ असून विजापुरच्या सरदारांशी त्याचे युध्द सुरु आहे. त्यात त्याने काही सरदारांचा पराभव करुन त्यांचे बरेच घोडे व शिपाई ठार केले आहेत. चौलपासून बांद्यापर्यंतचा सर्व मुलुख शिवाजीच्या ताब्यात आहे.त्याने या मुलुखातील पुष्कळ शहरे आणि समुद्राकाठची बंदरे काबीज केली आहेत, तशीच बरीच संपत्ती मिळवली आहे. विजापुरचा आदिलशहा त्याच्याविरुध्द लढाईची तयारी करीत आहे, पण ती पुर्ण होईल कि नाही याविषयी शंका आहे.कारण एक तर त्याच्या राज्याची अवव्यस्था आणि दुसरे शिवाजीने त्याचे हुशार व वजनदार सेनापती मारले आहे. हल्लीचा विजापुरचा राजा हा दासीपुत्र असल्यामुळे शिवाजी विजापुरच्या तक्तावर दुसरा एक राजपुत्र बसविणार आहे, अशी एक अफवा उठली आहे" ( पत्रसार संग्रह खंड-१ पृ-१८४ )
यानंतर पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांची दहशत घ्यावी अश्या दोन घटना घडल्या. एक १६६३ एप्रिलमध्ये लाल महालात शाहिस्तेखानावर घातलेला धाडसी छापा आणि कुडाळ प्रांतावर केलेली स्वारी. दुसर्‍या घटनेमुळे शिवाजी राजांचे संकट आता दाराशी आले, अशी पोर्तुगीजांची खात्री पटली. पुढचा संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी गोव्याच्या पोर्तुगीज व्हॉईसरॉयने तह करण्याचा घाट घातला. त्याला महाराजांनी दरबारी प्रत्युत्तर दिले. १६ एप्रिल १६६३ मध्ये व्हॉईसरॉयने उत्तर पाठविले," तुमचे पत्र आल्याने पुढील पत्रव्यवहाराला मोकळीक झाली आहे. मी आता डॉन अल्वारो डी आटेड या वजनदार गृहस्थाला तुमच्याशी तहाचे बोलणे करण्याकरिता पाठवून देत आहे. पण तुमचे आमचे बोलणे गुप्त राहिले पाहीजे. तुमच्याविरुध्द कोणतीही गोष्ट त्याने करु नये असे आम्ही त्यास सांगितले आहे" ( पत्रसार संग्रह खंड-१ पृ-२२६ )
वरील पत्रातील आशयास अनुसरुन व्हॉईसरॉयने त्याच्या ठिकठीकाणच्या अधिकार्‍यांना व किल्लेदाराना हुकुम पाठवून, 'शिवाजी जोपर्यंत आपल्याशी स्नेहाने वागत आहे तोपर्यंत त्यांनी मोगल छावणीला कसलीही अन्नसामुग्री पुरवू नये', असे सांगितले.
अर्थात शिवछत्रपतीनी जो पुढचा व्युह रचला होता, त्याप्रमाणे पुर्ण कोकणकिनारपट्टी या सर्व आक्रमकांपासून मुक्त करणे याच ध्येयाशी निगडीत होता. वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या सिद्दी, ईंग्रज आणि पोर्तुगीजांचे मुळापासून उच्चाटन करायचे तर त्यांच्या तोडीचे किंबहुना त्यांच्यापेक्षा प्रबळ आरमाराची आवश्यकता होती, शिवाय कोणत्याही शत्रुला दाद न देणारे बळीवंत जलदुर्गांची उभारणी करणे आवश्यक होते. एका रात्रीत होण्यासारखे हे कार्य नसले तरी त्याची पायाभरणी केल्यानंतरच या आक्रमकांना कायमचा शह देता येणार होता. संपूर्ण कोकण किनार्‍यावर महाराजांनी अनेक जलदुर्ग उभारले. पोर्तुगीजांना धडकी भरवणारा सिंधुदुर्ग इ.स. १६६४ मध्ये अस्तित्त्वात आला. सुरुवातीच्या काळात आदिलशहाच्या विरोधात लढण्यासाठी शिवाजी राजांनी पोर्तुगीजांकडे मैत्रीचा हात पुढे केला होता, पण पोर्तुगीज घाबरले आणि त्यांनी या लढ्यात गप्प राहणे पसंत केले. या काळात सावंतवाडी संस्थानात लखम सावंतची सत्ता होती. त्याने शिवाजी राजांचे आधिपत्य मान्य केले. कोकणातून राजांचे सैन्य कुडाळ जिंकून पेडण्यात उतरले. इ.स. १६६४ मध्येच डिचोली तालुका आदिलशहाकडून राजांच्या ताब्यात आला. इथे राजांनी आपला तळ उभारला.
खवासखानाची स्वारी
सन १६६४ ऑक्टोबर मध्ये खवासखान हा आदिलशाही सरदार परत कुडाळ प्रांत जिंकून घेण्यासाठी आला, तेव्हा शिवाजी महाराजांनी प्रथम खवासखानाच्या मदतीस येणार्‍या बाजी घोरपडे याला त्यांच्या गावातच मुधोळ (उत्तर कर्नाटक) येथे गाठून ठार मारले. तेथून त्वरेने येऊन कुडाळ जवळील माणगावच्या खोर्‍यात मुक्काम ठोकणार्‍या खवासखानाचा दारुण पराभव करत शिवाजी राजांनी त्याला विजापुरास पिटाळून लावले. खवासखानाच्या पराभवानंतर शिवाजी महाराज कुडाळहून वेंगुर्ले येथे गेले. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची दहशत बसून पेडणे, डिचोली, साखळी येथील आदिलशाही अधिकारी पळून गेले. तेव्हा पेडणे, डिचोली, सत्तरी हे तालुके प्रत्यक्ष लढाई न करता आणि स्वत: प्रत्यक्ष येथे न येताच शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील झाले. त्याच वर्षी २४ नोव्हेंबर रोजी मालवणच्या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचे भूमीपूजन केले. सिंधुदुर्ग म्हणजे १८ टोपीकरांच्या उरावरील शिवलंकाच होती. अठरा टोपीकर म्हणजे अनेक परदेशी व्यापारी सत्ता होत. त्यात गोव्यातील पोर्तुगिजांना सर्वांत जास्त दहशत होती. सिंधुदुर्गाच्या बांधकामासाठी महाराजांनी हरहुन्नरी जंजिरे (किल्ले बांधणारे गवंडी) कुंभारजुवे येथून नेले होते.
शिवरायांचे आरमार
सिंधुदुर्गाचे बांधकाम सुरु सुरू करून शिवाजी महाराज एका अनोख्या मोहिमेच्या तयारीस लागले. ही मोहीम होती नौदल मोहीम.त्यात अनोखे असे काय होते? त्याकाळी समुद्रावर पोर्तुगीज स्वत: सम्राट समजत. त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही व्यापार करू शकत नसत. त्यामुळे लढाऊ युद्धनौका तर दूरचीच गोष्ट. या पार्श्‍वभूमीवर पोर्तुगिजांच्या उरावरून म्हणजे गोव्याच्या समुद्रातून आणि सिंधुसागरातून स्वत: युद्धनौका घेऊन कर्नाटकातील पोर्तुगीज आणि आदिलशहाचे बंदर असणार्‍या बसरूरवर स्वारी करणारा हा पहिला भारतीय राजा होय.

फेब्रुवारी १६६५ च्या सुरुवातीला स्वत: शिवाजी महाराज ८५ गलबते आणि तीन मोठ्या युद्धनौका घेऊन मालवणहून शिडे उभारून पोर्तुगिजांच्या डोळ्यांदेखत आग्वाद, वास्कोच्या किल्ल्यासमोरुन सिंधुसागरातून गेले. बसरुर बंदरात आदिलशहा आणि पोर्तुगीज यांच्याकडून वसुली घेऊन महाराज परत फिरले आणि गोकर्ण येथे जहाजातून उतरुन गोकर्ण – महाबळेश्‍वराचे दर्शन घेऊन जमीन मार्गाने कारवारला आले. तेथे इंग्रज व अदिलशहाकडून जबरदस्त वसुलीचे नजराणे स्वीकारून शिवाजी महाराज गोव्यातील सत्तरी तालुक्याच्या सीमेवर भीमगड येथे मुक्कामास आले. गोकर्णहून महाराजांचे गोवा मार्गे येणारे नौदल पोर्तुगिजांनी मुरगाव (वास्को) च्या समुद्रात अडविले. येथे दोन्ही नौदलांची लढाई झाली. त्यात तांदळाने भरलेल्या अकरा बोटी पोर्तुगिजांनी पकडल्या, पण लगेच सोडून दिल्या. याच काळात गव्हर्नरने मुघलांच्या सेवेत असणारा पोर्तुगीज अधिकारी फ्रांसिस्कु-द-मेलु याला लिहिलेल्या पत्रात पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो – ‘‘मागील जयाबद्दल शिवाजीस इतका गर्व झाला की, त्याने मुरगावच्या बेटाजवळ आपले आरमार पाठवून या शहरासाठी (म्हणजे गोव्यासाठी) धान्य घेऊन येणार्‍या जहाजांना प्रतिबंध करण्याचे धाडस केले. पोर्तुगीज आरमाराने त्यांच्या अकरा नौका पकडल्या. याचा अर्थ बसरुर वरून जाताना पोर्तुगीजांच्या ताब्यातील समुद्रात शिवरायांच्या नौदलाने खोडी काढून आव्हान दिले होते. पोर्तुगीजांच्या उत्तर सीमेजवळ असलेल्या सिंधुदुर्गाप्रमाणेच दक्षिण सीमेवर रामाचे भूशिर इथला मूळात रामदेवरायाचा जलदुर्ग मजबूत करून घेतला. त्यानी जणूकाही पोर्तुगीजाना त्यांची सीमा आखून दिली की याच्या पुढे तुम्ही यायचं नाही.
सभासदाच्या बखरीत या स्वारीचे असे वर्णन केले आहे,"शिवाजी फोंडा घेउन कडवाड (कारवार) शिवेश्वर, मिर्जान, अकोले,कदरे, सुपे,उडवे हे कोट कुलवे घेउन गोकर्ण महाबळेश्वर आणि वर-घाट सुपे येथवर सरद ( सरहद्द) लाविली. गोव्याचे फिंरगीयास दबावून त्यांच्याजवळून तोफा, नख्त जडजवाहीर घेउन आपलेसे करुन त्यास उदीमास कौल देउन आला. असे कुल कोकण काबीज केले ( सभासद बखर पृ- ७१)
फोंड्याच्या मुक्ततेचा प्रयत्न
इ.स. १६६५ मध्ये राजांना मिर्झाराजेंबरोबर तह करून आग्रा भेटीला जावं लागलं. मार्च, १६६६ मध्ये शिवाजी राजे आग्रा भेटीस निघाले असता इकडे फोंडा आदिलशहांच्या तावडीतून मुक्त करण्याचा प्रयत्न चालू होता. आदिलशहाच्या सैन्याला फोंडा येथे पोर्तुगिजांनी अनेक प्रकारची मदत केली. फोंडा जिंकण्याचा प्रयत्न पोर्तुगिजांमुळे अयशस्वी झाला. पोर्तुगिजांना शिवाजी राजासारखा पराक्रमी आणि ध्येयवादी राजा आपल्या शेजारी नको होता. कल्याण – भिवंडीतील नौदल स्थापना ते फोंडा स्वारी या काळात शिवाजीराजे नक्की काय चीज आहे हे पोर्तुगिजांनी चांगलेच ओळखले होते. त्यामुळे या काळात पोर्तुगीज शिवाजी महाराजांची तुलना युरोपीय महान योद्धे अलेक्झांडर आणि सीझर यांच्याशी करू लागले होते, तर दुसरीकडे पोर्तुगिजांच्या कानावर अशाही आख्यायिका येऊ लागल्या होत्या की, शिवाजी राजांना अनेक जादूई विद्या अवगत आहेत. ते एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होऊ शकतात. किंवा ते कित्येक फर्लांग लांब उडी मारू शकतात. अशा अचाट आख्यायिका कानी पडण्यास कारणेही तशीच होती. अफझलखान, मिर्झा राजे जयसिंग अशी अनेक जिवावरची संकटे ज्या अद्भुत शौर्याने, धैर्याने त्यांनी परतवून लावली, त्यामुळे गोव्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंतही शिवरायांच्या पराक्रमांच्या आख्यायिका कानी पडू लागल्या. अशा पराक्रमी शिवरायांचा प्रत्यक्ष गोमंतक भूमीवर पोर्तुगीजांबरोबर सामना अजूनही झाला नव्हता. पण लवकरच पोर्तुगीजांच्या कर्माने तो दिवस येणार होता.या आधी पोर्तुगीज थेट शिवरायांच्या वाट्याला गेलेले नाहीत; पण "जो प्रबळ आहे, त्याची बाजु घ्यायची" या न्यायाने जयसिंग- शिवाजी महाराज संघर्षात जयसिंगाची सरशी दिसताच, पोर्तुगीजांनी जयसिंगाला पत्र पाठवून शिवरायांचे आरमार समुद्रात बुडवू, त्यासाठीचा खर्च मुघलांनी द्यावा, असे सांगितले;विशेष म्हणजे हेच शिवाजीराजे आग्य्रावरून सुखरूप स्वराज्यात आल्याचे समजल्यावर निर्लज्ज पोर्तुगीजांनी पत्र पाठवून ( ५ जुलै १६६७ ) शिवरायांचे अभिनंदन केलेले आहे. म्हणजेच, वरून शिवरायांचे अभिनंदन करायचे आणि आतून शिवरायांना विरोध करायचा, हे पोर्तुगीजांचे धोरण शिवराय ओळखून होेते. त्यामुळेच पोर्तुगीजांना धडा शिकवायचा निर्णय शिवरायांनी घेतला.
पोर्तुगीजांनी आग्र्याहून झालेल्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांचे जे अभिनंदन केले त्याची एक काहीशी मनोरंजक हकीकत आहे. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर २० नोव्हेंबर १६६७ रोजी महाराज राजगडास येउन पोहचले. त्यानंतर काही दिवसांनी सावंतवाडी, कुडाळजवळच्या मनोहरगडावर येउन दोन महिने राहीले. पोर्तुगीज व्हॉईसरॉयला महाराज ईतके जवळ येउन एवढ्या काळ रहातात, यात धोका वाटून त्याने सुटकेसाठी अभिनंदनाचे पत्र घेउन रामजी शेणवी कोठारी यास मनोहरगडावर जाण्यासाठी फरमावले. पण मनोहरगड उंच, त्यात त्याची शेवटची खडतर चढण त्यामुळे रामजी तिथे जाण्यासाठी टाळाटाळ करु लागला. शेवटी व्हॉइसरॉयने तो नाद सोडला आणि शिवाजी राजे रायगडावर पुन्हा रहायला गेल्यानंतर ५ जुलै १६६७ आपला वकील रामजी शेणवीला पाठविले.
इ.स. १६६६ च्या अत्यंत थरारक अशा आग्र्याहून सुटकेनंतर राजांनी अजिबात उसंत न घेता कोकणातून गोव्यावर स्वारी केली. टाकोटाक आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या मर्दनगडाला वेढा घातला. लगेच पोर्तुगीजांनी आदिलशाही सैन्याला मदत सुरू केली. महाराजांनी तरीही हा किल्ला जिंकून घेतला.
२२ सप्टेंबर १६६७ रोजी पोर्तुगीज गव्हर्नरने एक अजब आणि धक्कादायक हुकूमनामा काढला. बारदेशमध्ये जे शिल्लक राहिले आहेत, त्यांनी दोन महिने मुदतीच्या आत धर्मांतर तरी करावे किंवा घरदार सोडून जावे, असा तो हुकूम होता. बारदेशमध्ये त्या काळात उघडपणे हिंदू धार्मिक विधी करण्यास बंदी होती आणि त्यांना सरकारी नोकरीही मिळत नसे. त्यात अशा हुकुमामुळे तर त्यांची परिस्थिती भयंकरच झाली. त्यातच शेजारी शिवाजी महाराजांच्या राज्यांतील देसाई मंडळी महाराजांचे महसूल धोरण त्यांच्या फायद्याचे नसल्यामुळे महाराजांविरूद्ध कारवाया करू लागली, तेव्हा महाराजांनी या देसायांना त्यांच्या पदांवरून हटवून आपल्या कायदा आणि धोरणास अनुकूल अशा देसायांना त्यांच्या जागी नियुक्त करू लागले. असे पदमुुक्त झालेले देसाई पोर्तुगिजांच्या आश्रयास बार्देशमध्ये येऊन राहू लागले. ते पोर्तुगिजांच्या जिवावर स्वराज्यात उपद्रव करू लागले, तेव्हा अशा उपद्रवी देसायांना आणि धर्मांध पोर्तुगिजांना धडा शिकविण्यासाठी शिवाजी महाराज गोमंतभूमीत १९ नोव्हेंबर १६६७ रोजी बार्देशमधील कोलवाळ गावात आपल्या सैन्यासह दाखल झाले.
शिवरायांचे बारदेशमध्ये आगमन
शिवाजी महाराजाची स्वारी बारदेशवर होणार आहे याची बातमी पोर्तुगिजांना अगोदरच मिळाली होती. त्यामुळे पोर्तुगिजांनी बंडखोर देसायांना आग्वादच्या किल्ल्यात आश्रय दिला. तेव्हा बार्देशमध्ये कोलवाळ – थिवीचा सरळ लांब रेषेत तटबंदी असणारा किल्ला महाराजांच्या सैन्याने सहजपणे जिंकून घेतला. पोर्तुगिजांचेे सैन्य घाबरून लगेच आग्वाद किल्ल्याच्या आश्रयास पळून गेले. काही जुन्या गोव्यात आश्रयास जाऊन राहिले. कोणतेही पोर्तुगीज सैन्य शिवरायांचा सामना करण्यासाठी पुढे आले नाही.
स.श. देसाई यांच्या पोर्तुगीज आणि मराठा संबंध या पुस्तकात एका इंग्रज अधिकाऱ्याने दिनांक ३० नोव्हेंबर १६६७ ला लिहून ठेवलेला गोव्यातील एक प्रसंग आहे. त्यामध्ये छत्रपती शिवरायांविषयी त्याने लिहिले आहे, “शिवाजीला हिंदूंच्या छळाबाबत वाईट वाटले व त्याने बार्देशवर स्वारी करून हातात लागलेल्या चार पादऱ्यांना हिंदू होण्यास सांगितले, त्यांनी जेव्हा नकार दिला तेव्हा त्याने त्यांना ठार मारले. विजरईने शिवाजीची दहशत घेतली आणि धर्मांतराबाबतचे कडक निर्बंध मागे घेतले.” यावरून गोव्यातील हिंदुवर पोर्तुगीज कसे नृशंस अत्याचार करीत होते हे समजते.

२२ नोव्हेंबर रोजी शिवाजीराजे बारदेशातून निघून डिचोलीस आले. शिवाजी राजांनी नोव्हेंबर 1667 साली पाच हजार पायदळ आणि एक हजार घोडेस्वार घेऊन पोर्तुगीजांवर हल्ला केला. हजारो सैनिक कैदी केले आणि दीड कोट पगोडा (पोर्तुगीज चलन) हस्तगत केला. त्यानंतर खासा विजरई बार्देश मध्ये आला. तोपर्यंत बार्देशमधील झालेला प्रकार पाहून शिवाजीराजांकडे आपला वकील रामजी शेणवी कोठारी यास डिचोली येथे तह करण्यासाठी पठविले. रामजी शेणवी हा शिवाजी महाराजांचे पत्र घेऊन गव्हर्नरकडे आला. पुढेे या तहाच्या वाटाघाटी ५ डिसेंबर पर्यंत चालल्या व ६ डिसेंबर रोजी तह झाला. तेव्हा पोर्तुगीजांनी शिवाजी राजांच्या संकटातून सुटका करून घेण्यासाठी पाद्री गालेसालू मार्तीस, रामजी शेणवी आणि वकील गोझांलो मार्टिन यांना तह करण्यासाठी शिवरायांकडे पाठवले. 11 डिसेंबर 1667 रोजी पोर्तुगीजांनी शिवरायांशी तह केला. त्या तहान्वये
1) लखम सावंत व केशव नाईक हे विजापुरचे मांडलीक गोव्याच्या हद्दीत पळून आले आहेत, त्यांनी शिवाजी महाराजांचे प्रजानन या विरुध्द कोणतेही कृत्य करु नये.जर तसे त्यांनी केले तर पोर्तुगीजांनी त्यांना गोव्यातून हाकलावे. शिवाजी महाराजांच्या प्रदेशातील देसायांनीही हाच नियम पाळावा.
2) बालाघाटातून जो माल व वहाने गोव्यात येतील त्याला शिवाजी महाराजांच्या फौजेने अडवू नये. तसेच गोवे, साष्टी व बारदेश येथून जो माल व गाड्या स्वराज्याची जकात देउन बालाघाट व ईतरत्र जातील, त्याला शिवाजी महाराज व आदिलशहा यांचे युध्द सुरु असले तरी अडथळा आणू नये. व्यापार हा उभयपक्षी हितावह आहे.
3) धर्मांतराला प्रोत्साहन देऊ नये, शिवाजी राजांनी बारदेशातून ९ नोव्हेंबर १६६७ रोजी जे पोर्तुगीज अधिकारी, स्त्रीया, मुले यांना कैद केले आहे, त्यांना खंडणी न घेता सोडून द्यावे.
४) नारबा सावंत व मल शेणवी हे पोर्तुगीज मुलुखात आहेत. त्यांनी दंगे टाळण्यासाठी साष्टी व बारदेश येथे न रहाता गोवे शहरात येउन रहावे. जो देसाई पुंडावा करेल त्याला पोर्तुगीज हद्दपार करतील.
५) समुद्र व भुमी यांवर उभयतात स्नेह रहावा.
बारदेशच्या मोहिमेच्या दरम्यान पुष्कळ ख्रिस्ती स्त्रिया आणि मुले पकडली गेली होती. त्यांना कोणताही त्रास न देता तसेच त्यांच्याकडून एक रूका (रुपया)ही न घेता शिवाजी महाराजांनी त्यांस सोडून दिले, असे पोर्तुगिजांनी शिवरायांविषयी आदरपूर्वक लिहून ठेवले आहे. ‘‘शिवाजी हा शत्रूंच्या बायकांस अत्यंत आदराने वागवी.’’ हे पोर्तुगिजांचा शिवाजी महाराजांचा चरित्रकार कॉस्मी-द-ग्वॉद त्यांच्या चरित्रात साक्ष देतो.

कॉस्मी-द-ग्वॉर्डा याने लिहीलेले शिवचरित्र

शिवरायांच्या बारदेश स्वारीची धास्ती पोर्तुगिजांना चांगली बसली होती. पोर्तुगिजांना अशा प्रकारे आक्रमण करून धडा शिकविणारा हा पहिलाच भारतीय राजा होता.
शिवरायांचे डिचोलीतील वास्तव्य
या बारदेश प्रकरणानंतर शिवाजीराजे डिचोली येथे पुढे पंधरा दिवस तरी होते, असे अनुमान पोर्तुगीज आणि शिवरायांदरम्यानच्या पत्रव्यवहारावरून तरी दिसते. या पंधरा दिवसांत शिवरायांना येथील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा चांगलाच अंदाज आला होता. येथे नक्की काय केले पाहिजे, इथल्या लोकांना पोर्तुगिजांपासून नक्की काय त्रास होत आहे, त्यावर परिणामकारक कृती काय केली पाहिजे याचा अंदाज आला होता. त्यासाठी नेमकी कृती करण्याच्या तयारीला शिवाजी महाराज लागले. बार्देशच्या तहाच्या वाटाघाटींनुसार पोर्तुगिजांनी बंडखोर देसायांना आपल्या राज्यातून हाकलून लावले. पोर्तुगीज शिवरायांशी, त्यांच्या वकिलाशीे मैत्रीपूर्वक वागू बोलू लागले होते, पण इकडे शिवाजी महाराजांच्या डोक्यात पोर्तुगीजांना गोव्यातून हाकलून लावण्याचा डाव मनात घोळत होता. त्यानुसार परत एक वर्षानंतर शिवाजी महाराज नोव्हेंबर १६६८ मध्ये सैन्य घेऊन डिचोलीस येण्यास राजगडावरून निघाले.

या वेळची मोहीम ही फार आगळीवेगळी होती. आजच्या भाषेत हा एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक होता. त्या योजनेनुसार वेगवेगळ्या वेशांत मराठा सैनिक आधी ओल्ड गोव्यात वावरू लागले. चारशे ते पाचशे लोक वेश बदलून काम करू लागले. कोणी हमाल, तर कोणी काही वस्तू विकण्याचा बहाणा करू लागले. हळूहळू ही संख्या दुप्पट होणर होती. एकदा पुरेशी तयारी झाली की, अचानक रात्री हल्ला करून ओल्ड गोव्यात शिरणारी एखादी पायवाट ताब्यात घायची. मग बाहेरील सैन्याने मोठा हल्ला करीत पोर्तुगिजांचे सैन्य रणांगणावर उभे राहण्याच्या आत हल्ला करून गोवा पोर्तुगिजांकडून मुक्त करायचे असा बेत ठरला. परंतु दुर्दैवाने कुठे तरी माशी शिंकावी तसा प्रकार झाला. पोर्तुगिजांंना संशय येऊन गुप्त वेशातील सर्व मराठा सैनिक पकडले गेले. यावेळी पोर्तुगीज गव्हर्नर साव्हेंसेती हा आजारी होता. अगदी मरणाच्या दारात होता. आजारी असूनही या गुप्त कटाच्या बातमीने तो ताड्‌कन उठला. त्याने त्वरेने शिवाजी राजांच्या गोव्यातील वकिलास बोलावून संतापाने बेभान होऊन दोन-तीन थोबाडीत देऊन त्या वकिलाला आणि गोवा शहरात घुसलेल्या लोकांना हाकलून लावले.
सप्तकोटीश्वराचा जीर्णोद्धार
ही घटना घडली तेव्हा शिवाजी महाराज डिचोलीला येण्याच्या वाटेवर वेंगुर्ला येथे होते. तेथे त्यांना आपला कट उघड होऊन पोर्तुगीज अधिक सावध झाले आहेत हे कळले. या बातमीने शिवाजी महाराज नक्कीच हळहळले असतील, पण निराश झाले नाहीत. त्यांचा अजून एक मोठा बेत होता तो अंमलात आणण्यासाठी ते डिचोली येथे आले.
डिचोलीस आल्यानंतर शिवाजी महाराज नार्वे गावातील सप्तकोटीश्‍वर महादेवाच्या दर्शनास गेले. त्यावेळी सप्तकोटीश्‍वराचे मंदिर आजच्या सारखे नव्हते. महादेवाची पिंडी ही माडांच्या चुडतांच्या झोपडीवजा मंदिरात होती. या झोपडीतील महादेवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की, या महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. हा निर्णय महाराजांनी फार विचारपूर्वक घेतला असावा. आणि त्यासाठी सप्तकोटीश्‍वराची का निवड केली? त्याकाळी डिचोली महालात अनेक देवदेवता या पोर्तुगिजांच्या ताब्यातील बार्देश, तिसवाडी भागातून आणल्या गेल्या होत्या. यातून फक्त सप्तकोटीश्वराचीच निवड का करावी महाराजांनी? बहुधा अगोदरच्या वर्षी बार्देश स्वारीच्या वेळी डिचोलीतील मुक्कामात येथील स्थानिक लोकांकडून पोर्तुगिजांच्या धार्मिक अत्याचारांचा आणि सप्तकोटीश्‍वराचा इतिहास त्यांना समजला असावा.
कदंबांचे राजदैवत
सप्तकोटीश्‍वर हे पोर्तुगीजपूर्व काळातील गोव्यातील समृद्ध आणि वैभवशाली कदंब राजवटीचे आराध्य दैवत. कदंब राजांच्या बिरूदावली मध्ये सुद्धा सप्तकोटीश्‍वराचा उल्लेख श्रीलब्धवरप्रसाद सप्तकोटीश्‍वर असा मिळतो. असे सप्तकोटीश्‍वर महादेवाचे प्राचीन वैभवशाली मंदिर जुन्या गोव्या शेजारील मांडवी नदीच्या पात्रातील दिवाडी बेटावर दिमाखात उभे होते. या वैभवशाली सप्तकोटीश्‍वरावर पहिला घाला घातला बहामनी राजवटीने. १३५८ साली बहामनी आक्रमणात सप्तकोटीश्‍वर मंदिर उद्ध्वस्त करून त्यातील शिवलिंग शेताच्या बांधावर चिखलात घालून त्याची विटंबना केली गेली. परत पुढे काही वर्षांनी विजयनगर राजांनी गोमंतक भूमी बहामनीच्या तावडीतून जिंकून घेऊन गोव्याचा सुपुत्र माधव मंत्री याने परत विजयनगर राजांच्या उदार राजाश्रयाने पुन्हा त्या मंदिराची स्थापना करून शेतातील चिखलातील सप्तकोटीश्‍वराच्या शिवलिंगाची दिमाखात स्थापना केली. १३९१ साली विजयनगर साम्राज्याचा पराभव होऊन गोव्यावर बहामनी आणि नंतर विजापूरची आदिलशहाची राजवट सुरू झाली. या राजवटीत अरब मुस्लीम पुरूष आणि केरळीयन स्त्रिया यांची संतती असलेल्या नायटे लोकांचा त्रास स्थानिक जनतेला फार होऊ लागला, तेव्हा या त्रासापासून मुक्त होण्यासाठी तेव्हाचे अरबांचे कट्टर शत्रू पोर्तुगीज यांना तिमोजी या गोव्यातील मोठ्या प्रतिष्ठीत माणसाने आमंत्रण दिले. पण हे आमंत्रण पुढे गोव्याच्या इतिहासातील काळ्या अंधाररात्रीचे ठरेल याची कल्पना तिमोजी याला नसावी.
सप्तकोटीश्वरावरील घाले
१५१० मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी सेनापतीने गोव्यावर आक्रमण करून आदिलशाही फौजेचा पराभव करून नायटे लोकांची कत्तल केली. गोव्यातील जनतेला नायटे लोकांचा नायनाट झाला म्हणून समाधान वाटले, पण हे समाधान फार काळ टिकले नाही. सतत मिळालेल्या विजयामुळे उन्मत्त झालेल्या पोर्तुगीजांना त्या काळात पोर्तुगालमध्ये सन १५२१ला गादीवर बसलेला तिसरा दो ज्युआंव या धर्मांध राजामुळे धर्मांधतेचे उधाण आले आणि गोव्यातील देवळे मोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
पोर्तुगिजांचा पहिला घणाघात दिवाडी बेटावरील सप्तकोटीश्‍वरावर पडला सन १५४० मध्ये. सप्तकोटीश्‍वर मंदिर उद्ध्वस्त करून त्यातील शिवलिंग एका विहिरीच्या काठावर बसविले गेले आणि त्या विहिरीतून सक्तीने धर्मांतर केलेल्या लोकांना पाणी काढायला लावले जाई. दिवाडी बेटावरील नार्वे भागात असलेल्या या मंदिराला अशाप्रकारे अवकळा प्राप्त झाली. मंदिराचे रूपांतर चर्चमध्ये झाले. त्यावेळी सप्तकोटीश्‍वराचे भक्त असणारे डिचोली महालातील सूर्यराव देसाई यांना हे सोसत नव्हते. त्यांनी एका रात्रीत गुपचूप आपल्या लोकांसह दिवाडी बेटावर जाऊन विहिरीवरील शिवलिंग काढून आपल्या डिचोली महालातील हिंदळे या गावी आणले.
हिंदळे गावातील कुळागरात या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. कदंब राजाचे आराध्य दैवत दिवाडीतील नार्वे या गावातून हिंदळे गावात असे आले. तेव्हा लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या हिंदळे गावचे नाव बदलून नार्वे असे केले. नार्वे गावात माड-सुपारीच्या कुळागरात माडांच्या चुडतांच्या सावलीत निर्वासीतपणे वसलेल्या या कदंबराजांच्या राजदेवताला राजाश्रय दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी.
शिवाजी राजांना साकडे
सप्तकोटीश्‍वराच्या जीर्णोद्धारात महाराजांबरोबर डिचोलीचे खल शेणवी सूर्यराव व नारायण खल सूर्यराव शेणवी हे देसाई होते. हे डिचोलीचे देसाई अगोदरच्या वर्षी बारदेशच्या स्वारीच्या काळात पोर्तुगिजांच्या आश्रयास होते. त्यांना उपरती होऊन ते स्वराज्यात सामील झाले. यावेळी देसायांना माफी देऊन त्यांचे देसकतीचे वतन त्यांच्या मानसन्मानासह त्यांना परत केले. या कौल पत्रात शिवाजी महाराज स्पष्टपणे म्हणतात की, तुम्ही ‘‘पुरातन वैकुंठवासी राजश्री-महाराज -साहेबांपासून साहेबांचे स्थापित ’’. पुरातन वैकुंठवासी राजश्री महाराज साहेब म्हणजे शिवाजी राजांचे वडील शहाजी राजे. शहाजी राजे आणि डिचोलीच्या देसांयांचे संबंध आदिलशाही दरबारात चांगले स्नेहाचे होते, हे डिचोलीच्या देसायांच्या कागदपत्रावरून कळून येते. तसेच सन १६५७ या काळातील शहाजीराजांच्या पत्रात शहाजीराजांनी आपल्या सैन्याचा खर्च भागविण्यासाठी पेडणे आणि भतग्राम हे दोन महाल जहागीर म्हणून आदिलशहाकडे मागीतले होते.
शके १५९० म्हणजे १३ नोव्हेंबर सन १६६८ या दिवशी शिवाजी राजांच्या आज्ञेने सप्तकोटीश्‍वराच्या देवालयाचे बांधकाम प्रारंभ केले असा संस्कृत शिलालेख मंदिराच्या दारावर बसविला आहे. खरे तर शिवाजी महाराजांनी सप्तकोटीश्‍वर मंदिर जिर्णोद्धारासाठी निवडण्याचे कारण काय हे स्पष्टच आहे. नार्वे गावातून नदीपलीकडचा जुने गोव्याचा परिसर स्पष्टपणे दिसतो. त्या काळातील धर्मांध पोर्तुगीजांना स्पष्टपणे संदेश जावा की, तुम्ही येथील राजसत्तेचे प्रतीक असणारे सप्तकोटीश्‍वर मंदिर जसे हट्टाने पाडलेत, तसे आम्ही ते राजाश्रय देऊन परत हिकमतीने बांधणार.
शिवरायांची व्यापारनीती आणि गोवा
‘साता समुद्राचे धनी’ म्हणवून घेणारे पोर्तुगीज शिवाजीराजांच्या बारदेश स्वारी आणि गोव्यावरील गुप्त मोहिमेमुळे पुरते घायाळ झाले. त्यातच पोर्तुगीजांना नमवून केलेल्या तहानंतर शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज परवानगी पत्रे घेण्याचे बंद केले. इतकेच नव्हे तर आपल्या सागरी हद्दीत संचार करणार्‍या व्यापारी जहाजांना आपली दस्तके घेतली पाहिजेत असा हुकूम जारी केला. या हुकुमानुसार मराठा आरमार अधिकारी पोर्तुगीज व्यापारी नौकांना महाराजांची दस्तके घेण्याची सक्ती करू लागले. हा उलटा प्रकार होत असल्याचे पाहून पोर्तुगीजांच्या इंग्रज आणि डचांच्या बळकावलेल्या व्यापारावर परिणाम होऊन पोर्तुगीज आरमारी आणि आर्थिक सत्ता अधिक केविलवाणी झाली.
शिवाजी राजांचे व्यापारी धोरण विदेशी पोर्तुगिजांशी कसे होते हे १६७१ मधील बार्देशच्या मिठावरून कळले. शिवाजीराजांनी समुद्र किनार्‍यावरील मिठाच्या व्यापाराला कर लावून शिस्त लावली. त्यात पोर्तुगीजांचे बार्देशमधील मीठ व्यापार्‍यांना स्वस्त पडू लागले. तेव्हा व्यापारी बार्देशातून पोर्तुगिजांचे मीठ खरेदीस जाणार आणि स्वराज्यातील मीठ बंदराला त्यामुळे नुकसान होणार म्हणून शिवाजीराजांनी पोर्तुगीजांच्या सरहद्दीवरील आपल्या कुडाळचा सुभेदार नरहरी आनंदराव यांस आज्ञा केली. संगमेश्‍वराहून बार्देशचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे, तरी पावेल तेच घटिकेस कुलघाटी जकाती करणे, संगमेश्‍वराहून बार्देशी मीठास जबर निरख पडे ती गोष्ट करणे. त्यामुळे गोव्यातील पोर्तुगीजांचे मीठ ही शिवाजीराजांनी अळणी करून टाकले.
शिवराज्याभिषेकाचा गोमंतकीय साक्षीदार
सन १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकाने भारतवर्षाचा भाग्योदय झाला. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासाने पुन्हा एक वेगळे वळण घेतले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आज आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित समजतो, तो इंग्रज वकील हेन्री ऑक्सीडेन यांच्या वहीतील नोंदीमुळे. हा वकील प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक समयी इंग्रजांचा प्रतिनिधी म्हणून हजर होता. त्याने चौकसपणे निरक्षण केलेल्या नोंदीमुळे राज्याभिषेकाचा तपशील समजतो, पण या इंग्रज वकिलाला राज्याभिषेकाच्या प्रसंगाचे बारकावे समजावून सांगणारी व्यक्ती गोमंतकीय होती. या व्यक्तीचे नाव होते नारायण शेणवी. नारायण शेणवी दुभाषा म्हणून पोर्तुगीज आणि इंग्रजांकडे काम करीत असे. त्याने इंग्रज वकीलास व्यवस्थित वर्णन करून हा प्रसंग सांगितला म्हणून तो आज आम्हा सर्वांस नीट कळतो. योगायोग असा की, शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकाचे सर्वांत प्रसिद्ध असणारे चित्र चितारणारे चित्रकार होते गोमंतकीय सुपुत्र, प्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल. एका गोमंतकीयाने प्रत्यक्ष शिवरायांचा राज्याभिषेक आपल्या डोळ्यांनी पाहून त्याचे व्यवस्थित वर्णन केले आणि दुसर्‍या गोमंतकीयाने सर्वांना तो राज्याभिषेक कसा झाला असावा याचे नेत्रदीपक चित्र रेखाटले.
फोंड्याच्या किल्ल्यावरची मोहीम
राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी परत एकदा गोव्याकडे लक्ष दिले. आता त्यांनी लक्ष केंद्रित केलेते फोंडा महालाकडे. त्याकाळी फोंडा हा प्रांत होता. या प्रांताच्या आधिपत्याखाली हेमाडबार्से (सांगे) पंचमहाल, अष्टागार (केपे ) अडवलकोट (काणकोण) हे आजच्या गोव्यातील तालुके येत असत. माडा – पोफळीची कुळागरे, भातशेती आणि बाराही महिने वाहणार्‍या नद्यांनी हा भाग समृद्ध होता. पण हा भाग अजूनही आदिलशहाच्या ताब्यात होता. सन १६६६ मध्ये शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत झालेल्या मोहिमेत अपयश आले होते, परंतु आता स्वत: शिवाजी महाराज छत्रपती या नात्याने गोव्यात फोंडा जिंकण्यास येत होते. १८ एप्रिल १६७५ रोजी शिवाजी राजांनी फोंड्याच्या किल्ल्यास वेढा दिला. त्याकाळी फोंडा किल्ला फोंड्यातील पंडितवाड्याच्या बाजूस असलेल्या कोट या भागात होता. आदिलशहाच्या येथील किल्लेदाराचे नाव होते रुस्तुमेजमानचा पुत्र महंमद खान. मागील मोहिमेत पोर्तुगीजांनी फोंड्यास आदिलशहाने मदत केली होती. अशी गोष्ट परत होऊ नये म्हणून पोर्तुगीजांनी तटस्थ राहण्याचे वचन घेऊन विजरईकडे आपला वकील ठेवला. असे असून सुद्धा पोर्तुगीजांनी गुप्तपणे फोंड्याकडे मदतीसाठी धान्याने भरलेली दहा शिबाडे आणि काही माणसे पाठवली. पण मराठ्यांनी ती पकडून नेली. महमदखान हा फोंड्यावरून अटीतटीने झुंजू लागला. युद्धाच्या धुमश्चक्रीत दोन्ही बाजूंची बरीच प्राणहानी होऊ लागली. महाराजांनी चार वेळा फोंड्याला सुरुंग लावले. पण महमदखानने तेवढेच सुरुंग लावून त्यांना प्रत्युत्तर दिले. अखेर महाराजांनी तटापासून बारा फुटांवर सैनिकांसाठी संरक्षक भिंत बांधली व फोंडा घेण्याचा निर्धार करून दि. ८ एप्रिल रोजी २००० घोडदळ व ७००० पायदळानिशी फोंड्याला वेढा दिला.
पावसात देखील वेढा सुरु ठेवण्याचे महाराजांनी ठरविले. राजेश्री स्वतः फोंड्यालाच तळ ठोकून बसले होते. त्यांनी आपल्या सैन्याच्या वेगवेगळ्या तुकड्या करून त्यांना आदिलशाही हद्दीतील एटगेरी व गोवळकोंड्याच्या हद्दीतील दोन शहरांकडे लुट करण्यासाठी रवाना केले. मराठ्यांनी सर्व ठिकाणी प्रचंड लुट करून ती सर्व संपत्ती व काही कैद केलेले सावकार फोंड्याला महाराजांजवळ आणले. पोर्तुगीज गुप्तपणे महमदखानला मदत करत होते. त्यांची कुकली व वरुडे हि गावेही मराठ्यांनी लुटली. महमद खानाजवळ फक्त चार महिने पुरेल एवढीच रसद होती. त्याच्या कुमकेस रुस्तमेजमान १५०० घोडदळ व काही पायदळ घेऊन आला. महमदखान नेटाने तोंड देत होता.
महाराजही चिवटपणे वेढा घालून बसले होते. मराठे तटाला भिडण्याचा प्रयत्न करत होते. पण वरून सतत मारा चालू असल्याने मात्रा चालेना. तेव्हा महाराजांनी ५०० शिड्या तयार केल्या. त्यांच्या सहाय्याने ताटवर चढून जाण्याचे धाडस करणाऱ्याला अर्धा शेर वजनाचा तोडा बक्षीस देण्याचे घोषित केले. व असे ५०० तोडे बनविले. मराठ्यांची जिद्द हळूहळू वाढू लागली . पण तेवढ्यातच ८००० घोडदळ व ७००० पायदळासह बहलोलखान चालून येत असल्याची बातमी फोंड्याला येऊन थडकली. त्याला रोखण्यासाठी महाराज तातडीने निघाले. बहलोल मिरजेला होता. त्याने फोंड्याची कुमक करण्याचा प्रयत्न केला. पण महाराजांनी झाडे तोडून त्याच्या वाटा बंद केल्या व सर्वत्र पहारे ठेवून त्याची नाकेबंदी केली.
(कारवारकर इंग्रजांच्या माहितीनुसार मात्र, महाराजांनी मात्र खानाला ५० होनांची लाच दिली तसेच त्याच्या प्रांताला तसवीस न लावण्याचे वचन दिल्यावरून खानाने महाराजांना विरोध केला नाही.)
बहलोलखानाचा बंदोबस्त करून महाराज त्वरेने फोंड्याला परतले. त्यांच्या उत्तेजनावरून मराठे जिद्दीने तटावर चढून गेले. व फोंड्यावरून होणारा मारा बंद पडला असावा असे वाटते. लगेच सुरुंग लावून मराठ्यांनी फोंडा कोट उडवला. शके १५९७, राक्षस नाम संवत्सरे, वैशाख शु. २ ला म्हणजे दि. १७ एप्रिल १६७५ रोजी फोंडा महाराजांनी जिंकला. महमदखान व त्याचे साथीदार कैद झाले. आसपासचे सर्वच आदिलशाही किल्ले मराठ्यांच्या ताब्यात द्यावे असे महाराजांनी त्याच्याकडून लिहून घेतले व मोबदल्यात त्याला जीवदान मिळाले. अन फोंड्याची मुखत्यारी धर्माजी नागनाथला दिली गेली.
इकडे पोर्तुगीजांंनी तटस्थ न राहता गुप्त मदत केल्यामुळे पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी फोंड्याचा वेढा चालू असता २९ एप्रिल रोजी पोर्तुगीजांच्या साष्टी (मडगाव) तालुक्यातील कुंकळ्ळी आणि चांदर या गावावर मराठ्यांच्या दोनशे स्वारांनी हल्ला केला. या आक्रमणाची खबर मिळताच विजरईने शिवाजी राजांच्या वकिलास अटकेत ठेवण्याची आज्ञा केली.

५०,००० चे सैन्य जमा करून इ.स. १६७६ मधे महाराज दक्षिण दिग्विजयासाठी बाहेर पडले. यावेळेला महाराजानी दक्षिणेतील राजांची एकजूट घडवून औरंगजेबाला टक्कर द्यायचं स्वप्न पाहिलं होतं. कुतुबशहाने महाराजांचा मैत्रीचा हात स्वीकारला, पण आदिलशहाने मात्र एवढी समजूत दाखवली नाही. प्रथम महाराजानी तामिळनाडूतील जिंजी आणि वेल्लोर जिंकून घेतले, जे भविष्यकाळात मराठी साम्राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतीव महत्त्वाचे ठरले.
आदिलशाहीची शरणागती
१६ मे रोजी शेवटी फोंडा किल्ल्यातील आदिलशाही फौज शरण येऊन फोंडा प्रांताचे स्वामी शिवाजी राजे झाले. फोंडा जिंकल्यामुळे शिवाजी राजांच्या ताब्यात अंत्रुज, अष्टागार, हेमाडबार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी, काकोडे म्हणजे फोंडा, सांगे , केपे, काणकोण, हे तालुके आले. याच महिन्यात कारवार, अंकोला हे किल्ले जिंकत आपली स्वराज्य सीमा गंगावल्ली नदी पर्यंत नेली. आता कल्याण – भिवंडी पासून कारवार – अंकोला पर्यंतच्या कोकण प्रांताचे स्वामी शिवाजी महाराज झाले होते. पण त्यात मोठा अडथळा होता पोर्तुगीजांचा. गोव्यातील बार्देश , तिसवाडी, सालसेत आणि मुंबईकडील पनवेलपासून वसई, डहाणू पर्यंत भाग पोर्तुगीजांकडे होता. या भागातून त्यांना कायमचे घालविण्याचा प्रयत्न महाराज सदैव करीतच होते.
फोंडा जिंकल्यावर गोवे आता पोर्तुगीजांकडून घेणार ही खात्री इंग्रजांनाही होती. त्यांच्या गोव्यातील वकिलाने मुंबईस लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की शिवाजी आता कारवार प्रांताचा स्वामी झाला असून त्याची पुढची स्वारी गोव्यावर होईल असे बोलतात, पण एकाचवेळी मोगलांशी व पोर्तुगिजांशी युद्ध करण्यात मुसद्दीपणा नव्हता. त्यामुळे शिवाजीने पोर्तुगिजांशी युद्ध टाळले.
वेंगुर्ल्याचेे डच आपल्या पत्रात म्हणतात की, शिवाजी राजे, पोर्तुगिजांची कायमची हकालपट्टी करण्यास आम्ही तुमची मदत करू. पोर्तुगिजांच्या साष्ट, बारदेशवर शिवाजी राजे आपला हक्क सांगू लागल्यामुळे पोर्तुगीज शिवाजी राजांना आपला शत्रू मानून भिऊन वागत होते. पोर्तुगिजांना गोव्यातून कायस्वरूपी हाकलून द्यायचे असूनही त्यांना इतर राजकारणापुढे त्यासाठी सवड मिळत नव्हती.
पोर्तुगीजांचा समुद्रावर ताबा असल्याने त्यांच्या परवानगीवाचून ईतरांची जहाजे ये जा करु शकत नव्हती, मात्र शिवाजी महाराजांच्या गोवा स्वारीनंतर त्यांच्या लहान गलबतांना पोर्तुगीजांची परवानगीची आवश्यकता नव्हती. तरीही पोर्तुगीज कधी कधी मुळ रंग दाखवायचेच. सन १६७८ मध्ये शिवाजी राजांच्या आरमाराचे दोन मचवे वेंगुर्ल्यापाशी पोर्तुगीजांनी पकडले. महाराजांचा वेंगुर्ल्याचा सुभेदार तानाजी सावंत याने पोर्तुगीजांना दम देताच ते मचवे सोडून दिले गेले. यावरुन पोर्तुगीजांनी शिवछत्रपतींची किती दहशत घेतली होती हे समजून येते.
विदेशी शत्रूविरुद्ध मोहीम
सन १६७९ च्या सुरवातीला शिवाजी महाराजांनी पश्‍चिम किनार्‍यावरील इंग्रज, सिद्धी आणि पोर्तुगीज या विदेशी शत्रूसाठी व्यापक मोहीम सुरू केली. तिचा व्याप मुंबईपासून कारवारपर्यंत होता. मुंबईजवळ खांदेरी-उंदेरी हे किल्ले बांधून तिथे मुंबईकर इंग्रजांशी वर्षभर मोठा संघर्ष सुरू केला. जंजिरेकर सिद्धीची नाकेबंदी करून त्याला मर्यादा घातल्या. कारवारला पोर्तुगीजांचे कट्टर शत्रू अरबांना आश्रय देण्याची बोलणी सुरू करून पोर्तुगीजांना घाम आणला आणि गोव्यात पोर्तुगीजांचे नाक दाबण्यासाठी एका महत्त्वाच्या मोक्याच्या जागी किल्ला बांधण्यास सुरवात केली. ती महत्त्वाची जागा म्हणजे आजचा दक्षिण गोव्यातील साळ नदीच्या मुखावरचे बेतुल. साळ नदी मडगावजवळ वेर्णा येथे उगम पाऊन मडगाव, चिचोणे, असोळणा मार्गे बेतुल येथे समुद्रास जाऊन मिळते. या साळ नदीतून पोर्तुगीजांचे व्यापारी पडाव, छोटी गलबते भरतीच्या वेळी मडगाव या मुख्य बाजारपेठेच्या खारेबांध भागापर्यंत जलवाहतूक करीत असत. साळ नदी ही बेतुल येथे शिवाजी महाराजांचे राज्य आणि पोर्तुगीज यांची सीमारेषा होती. उत्तर काठावर पोर्तुगीज राज्य, तर दक्षिण काठावर शिवाजी महाराजांचे राज्य अशी सीमा होती.
बेतुलच्या किल्ल्याची उभारणी
बेतुल येथे शिवाजी महाराजांच्या बाळ्ळीच्या हवालदाराच्या देखरेखेखाली किल्ला बांधला जात आहे हे पोर्तुगीजांच्या लक्षात आले. त्यांचा लष्करी अधिकारी – राशोल किल्ल्याच्या किल्लेदाराने गव्हर्नरकडे सविस्तर वृतांत कळविला, तो असा – असोळणे (साळ) नदीच्या पैलतीरावर शिवाजी राजे यांनी एक किल्ला बांधण्यास घेतला आहे. तो जर बांधून झाला तर आमच्या राज्याच्या सुरक्षिततेला त्यांच्यापासून धोका आहे. असा किल्ला बांधण्याचा विचार आदिलशहाने कधी केला नव्हता, परंतु शिवाजी राजे यांनी त्याचे राज्य घेतल्यावर हा प्रयत्न सांप्रत सुरु केला आहे. तेव्हा रासईच्या कॅप्टनला गव्हर्नरने उत्तर धाडले की, शिवाजी राजे यांनी अशा किल्ल्याचे बांधकाम केल्याने आमच्यात मैत्रीचा जो तह झाला आहे, त्यास बाधा येणार आहे. तेव्हा बाळ्ळीच्या हवालदाराने किल्ल्याचे बांधकाम थांबवावे. तेव्हा बाळ्ळीच्या शिवाजी महाराजांच्या हवालदाराने त्यास उत्तर पाठविले की, मी किल्ला शिवाजी राजे यांच्या आज्ञेवरून बांधीत आहे, परंतु या किल्ल्याचा उपसर्ग तुम्हाला होणार नाही. दुसरी गोष्ट आमच्या राज्यात आम्ही काहीही करण्यास मुख्यत्यार आहोत. त्याचा जाब विचारणारे तुम्ही कोण? बाळ्ळीच्या हवालदाराचे उत्तर ऐकून रासईच्या कॅप्टनने फोंड्याच्या सुभेदारास पत्र पाठविले. पण त्याचे उत्तर लवकर मिळेना. तेव्हा पोर्तुगीज काय समजायचे ते समजले. पण किल्ला पूर्ण झाला तर साष्टीतील जलवाहतूक संकटात येऊन साष्टीच्या सुरक्षिततेची भीती वाटत होती. तेव्हा या किल्ल्याचे बांधकाम गुपचूप काही माणसे ठेवून पाडून टाकावे, पण बांधकाम पाडताना पोर्तुगीज सरकारचा त्याच्याशी काही संबंध नाही हे दाखवावे असे ठरले. पुढील काळात या बेतुलच्या किल्ल्याचे नक्की काय झाले कळत नाही. यावरचा इतिहास उजेडात यायचा आहे, पण आजही पोर्तुगीज पत्रांत वर्णन केलेल्या जागेवर साळ नदीच्या मुखावर बंदुकीच्या गोळीच्या टप्प्यात बेतुल येथे एक बुरूज आणि त्यावर साळनदीकडे मोहरा करून असणारी तोफ साक्ष देत आहे की, पोर्तुगीजांना घाम आणणारा साळ नदीच्या मुखावर शिवरायांच्या आशीर्वादाने बांधला जाणारा हाच तो बेतुलचा किल्ला.
उत्तर कोकणातील पोर्तुगिजांशी संघर्ष :-
गोव्याप्रमाणेच उत्तर कोकणात वसईला पोर्तुगीजांचे दुसरे सत्ताकेंद्र होते. स्वराज्याची सीमा या उत्तर फिरंगाणाला भिडली आणि दक्षीण कोकणाप्रमाणेच उत्तर कोकणातही शिवाजी राजे- पोर्तुगीज संघर्ष सुरु झाला. पुरंदर तहामुळे झालेले नुकसान भरुन काढून इ.स. १६७० पर्यंत सुमारे ६०,००० पायदळ आणि ४०,००० घोडदळाची उभारणी करून महाराजानी मिर्झाराजे जयसिंगांबरोबरच्या तहात गमावलेला बहुतेक सगळा मुलुख परत मिळवला. इ.स. १६७२ मध्ये महाराजांनी उत्तर कोकणातील रामनगरच्या राजावर हल्ला चढवला, आणि तो पोर्तुगीजाना देत असलेली चौथाई आपल्याला द्यावी अशी त्यांनी मागणी केली. यावेळेला पोर्तुगीजांनी रामनगरच्या राजाला मदत केली. नंतर ६ जून १६७४ ला महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि काही काळातच महाराजांनी रामनगरच्या राजाचा पराभव करून पोर्तुगीजांकडे असलेले चौलमधले चौथाईचे हक्क मिळवले.
हिंदु मनुष्य मेला म्हणजे त्याची बायको,मुले अनाथ झाली तर एकतर त्यांची मालमत्ता जप्त केली जाई किंवा त्यांना बाटवून ख्रिस्ती केले जाई. वसईतील या जुलुमाची बातमी शिवाजी राजांना १६७५ मध्ये समजली. त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी वसईला खरमरीत पत्र लिहीले. या झटक्याने वसईचा कॅप्टन जनरल शुध्दीवर येउन हा छळवाद व जुलुम करणारा कायदा रद्द केला.
शिवाजी महाराजांचा मृत्यू
सन १६७९ च्या शेवटी शिवाजी महाराज व पोर्तुगीज यांचे संबंध विकोपास गेले होते. दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी केली गेली. पोर्तुगीजांनी कुंकळ्ळी येथे पाच हजार सैन्य सज्ज ठेवले होत,े ते फोंडा येथे सुभेदार मदाजी अनंतने पोर्तुगीजांशी लढाई करण्याच्या उद्देशाने जय्यत तयारी सुरू केली. इतक्यात १६८० मध्ये शिवाजी राजांचा मृत्यू झाल्याची बातमी आली, तेव्हा पोर्तुगीजांचा श्‍वास मोकळा झाला. पोर्तुगीज शिवरायांविषयी लिहिताना तो आमचा महान शत्रू होता किंवा शिवाजी हा युद्धकाळापेक्षा शांततेच्या काळात अधिक धोकादायक होता असे म्हणत.
शिवाजी महाराजांनी गोव्यातून आदिलशाही सत्तेचे उच्चाटन केले आणि पोर्तुगिजांच्या आक्रमक राजकारणाला आणि धर्मांधतेला आळा घातला, त्याचबरोबर येथील राज्यकारभारात शिस्त आणली. शिवाजी महाराजांच्या काळी आजच्या गोव्याचा भाग त्यांच्या कुडाळ आणि फोंडा या दोन प्रांतांत मोडत होता. कुडाळ प्रांतात पेडणे, डिचोली, सत्तरी हे तालुके होते, तर फोंडा प्रांतात फोंडा, सांगे ,केपे, काणकोण हे तालुके होते. या प्रांताचे प्रमुख सरकारी अधिकारी सुभेदार असे, तर तालुक्यांचा प्रमुख हवालदार असे. शिवाजी महाराजांचे सुभेदार आणि हवालदार आपल्या राज्यातील व्यापार, प्रजेचे संरक्षण या बाबतीत किती दक्ष होते याची उदाहरणे पाहण्याजोगी आहेत.
प्रजाहितदक्षतेचे दाखले
डिचोली तालुक्यातील शिरगावात पोर्तुगीज नागरिक आंतोनियु पाइश हा काही शिपाई आणि दोन होड्या घेऊन येऊन देऊ कामत यांच्या घरातील सहा माणसांना पकडून घेऊन गेला, तेव्हा देऊ कामत डिचोलीचा हवालदार नरसो काळो यांच्याकडेे याबाबत तक्रार घेऊन गेला. तेव्हा हवालदाराने लगेच पोर्तुगीज गव्हर्नरकडे तक्रार करून आंतोनियु पाइश याच्यावर कारवाई करून देऊ कामतच्या कुटुंबियांना सोडवावे अशी मागणी केली. तेव्हा गव्हर्नरने या गुन्ह्याची चौकशी करून आंतोनियु पाइशला कैद करून त्याच्या हातापायास बेड्या घातल्या. अधिक चौकशी केली तेव्हा असे कळले की, देऊ कामत हा पाइश याचे सातशे साठ पादवि देणे होता. तेव्हा नरसो काळो ने देऊ कामतच्या पैशाची हमी देऊन देऊ कामतच्या कुटुंबियांची सुटका केली. अशा प्रकारे आपल्या प्रजेसाठी पोर्तुगिजांसारख्या शत्रुकडेही जामीन राहणारे सरकारी अधिकारी शिवरायांचेच असू शकतात.
व्यापारी, शेतकरी यांच्या होड्या पोर्तुगीज जप्त करीत, तेव्हाही फोंडा, डिचोली, पेडणे येथील अधिकारी तत्पर दखल घेत असल्याचे दिसते. या संबधी असंख्य पोर्तुगीज कागदपत्रांचे दाखले इतिहास संशोधक स. शं. देसाई यांनी आपल्या शिवशाही पोर्तुगीज कागदपत्रे या ग्रंथात दिले आहेत.

माझे सर्व लिखाण एकत्रित माझ्या ब्लॉगच्या खालील लिंकवर आपण वाचु शकता.
भटकंती सह्याद्रीची

संदर्भ ग्रंथ सूची
१) युगप्रवर्तक शिवाजी महाराज- वासुदेव कृष्ण भावे
२) पोर्तुगेज मराठे संबंध – लेखक – पां. स. पिसुर्लेकर, प्रकाशन – महाराष्ट्र राज्य सांस्कृतीक मंडळ. सं. शं. देसाई भाग १,२,३
३) शिवचरीत्र पत्रसार संग्रह भाग १,२,३ प्रकाशन – भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे. संपादन – शिवचरीत्र कार्यालय, पुणे.
४) शिवशाही पोर्तुगेज कागदपत्रे – लेखक – स. शं. देसाई. प्रकाशन – शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
५) जेधे शकावली व करीना – संपादन – अ. रा. कुलकर्णी, प्रकाशन – डायमंड पब्लिकेशन
६) सभासदाची बखर- कृष्णाजी अनंत सभासद
८) जिल्हा गॅझेटीयर
९) राजा शिवछत्रपती – लेखक – ब. मो. पुरंदरे, प्रकाशक – पुरंदरे प्रकाशन

इतिहासलेखमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

गोव्या वरचा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी झाला असता तर? कदाचित आजचा इतिहासही काही वेगळाच असता.


ते एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होऊ शकतात. किंवा ते कित्येक फर्लांग लांब उडी मारू शकतात.

उण्यापुर्‍या पन्नास वर्षांच्या आयुष्यात या माणसाने जे अफाट काम केले आहे त्या वरुन खरच त्यांना या विद्या अवगत असाव्या असे वाटते. नाहीतर कसे शक्य आहे इतकी अचाट कामगिरी करणे?

गोव्याचा इतका डिटेलवार इतिहास माहित नव्हता. लिहिण्याची स्टाईल नेहमी प्रमाणेच उत्तम.

दुसरा भाग लवकर लिहा

पैजारबुवा,

गोव्या वरचा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी झाला असता तर? कदाचित आजचा इतिहासही काही वेगळाच असता.


ते एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होऊ शकतात. किंवा ते कित्येक फर्लांग लांब उडी मारू शकतात.

उण्यापुर्‍या पन्नास वर्षांच्या आयुष्यात या माणसाने जे अफाट काम केले आहे त्या वरुन खरच त्यांना या विद्या अवगत असाव्या असे वाटते. नाहीतर कसे शक्य आहे इतकी अचाट कामगिरी करणे?

गोव्याचा इतका डिटेलवार इतिहास माहित नव्हता. लिहिण्याची स्टाईल नेहमी प्रमाणेच उत्तम.

दुसरा भाग लवकर लिहा

पैजारबुवा,

प्रचेतस's picture

28 Nov 2020 - 10:00 am | प्रचेतस

अतिशय तपशीलवार ,माहितीने खचाखच भरलेला लेख.

दक्षिण सीमेवर रामाचे भूशिर इथला मूळात रामदेवरायाचा जलदुर्ग मजबूत करून घेतला

हे रामाचे भूशिर म्हणजे काबो दि रामा हा किल्ला असावा.

पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहात आहेच.

दुर्गविहारी's picture

28 Nov 2020 - 11:10 am | दुर्गविहारी

प्रतिसादाबध्दल धन्यवाद!

हे रामाचे भूशिर म्हणजे काबो दि रामा हा किल्ला असावा.

बरोबर, येत्या शुक्रवारपासून गोव्यातील किल्ल्यांची मालिका सुरु करणार आहे,त्यामध्ये या काब द रामा उर्फ खोलगडाची सविस्तर माहिती येईलच.

अथांग आकाश's picture

28 Nov 2020 - 11:20 am | अथांग आकाश

सविस्तर माहितीपूर्ण लेख!!
.

आनन्दा's picture

28 Nov 2020 - 12:35 pm | आनन्दा

माहितीपूर्ण लेख.

पुभाप्र

डीप डाईव्हर's picture

28 Nov 2020 - 3:45 pm | डीप डाईव्हर

मस्त माहिती 👍

अशा प्रकारे आपल्या प्रजेसाठी पोर्तुगिजांसारख्या शत्रुकडेही जामीन राहणारे सरकारी अधिकारी शिवरायांचेच असू शकतात.

यातच सगळं आलं !

सौंदाळा's picture

28 Nov 2020 - 11:09 pm | सौंदाळा

मस्त लेख
काही वर्षांपूर्वी सप्तकोटेश्वर देवळात गेलो होतो. गोव्याच्या इतर देवळांच्या मानाने (मंगेश, महालक्ष्मी, शांतादुर्गा, रामनाथ वगैरे) हे देऊळ खूपच साधे आणि जुनाट आहे. पण देवळात खूपच शांत आणि प्रसन्न वाटले. देवळाच्या आजूबाजूला जंगलच आहे. देवळाच्या सभामंडपात शिवरायांचे तैलचित्र आहे.
जाताना पिळगाव नावाचे छोटे खेडेगाव लागले होते, अतिशय सुंदर आणि टुमदार गाव. असो
पुभाप्र

खूपच सुंदर लेखन. खूप धन्यवाद. असेच लिहिते रहा.

अवांतर : शिवरायांना आजच्या काळातील सेक्युलॅरिझम च्या व्याख्येप्रमाणे सेकुलर दाखवण्याच्या नादात काहीही लिहून आपला पिवळ्या कव्हरचा 20-30 पानी महाग्रंथ (जो कि ST स्टॅन्ड च्या बाहेर मिळतो ) प्रकाशित करणार्यां उदयोन्न्मुख इतिहासकारांनी वाचून धडा घ्यावा असा लेख.

बेकार तरुण's picture

29 Nov 2020 - 1:33 pm | बेकार तरुण

नेहमीप्रमाणे लेख खूपच आवडला...

तुमचे मिपावरील लेखन आम्हा सारख्या शिवभक्तांसाठी मेजवानी आहे...

हा धागा पण शिफारशीत टाकावा अशी संम ला विनंती

सुधीर कांदळकर's picture

2 Dec 2020 - 6:31 am | सुधीर कांदळकर

विस्तृत, तपशीलवार इतिहास छानच.


वेंगुर्ल्याचेे डच आपल्या पत्रात म्हणतात की,

आपण थेट ऐतिहासिक दस्तावेज संदर्भासाठी वापरला आहे तेव्हा नि:संशय विश्वासार्ह आहे. याचा अर्थ तेव्हा डच वेंगुर्ल्यात होते. एका कादंबरीत (बहुधा ताराबाईवरील भद्रकाली ही कादंबरी) जिंजीकडे पळतांना आपल्या व्यसनांचा खर्च भागवण्यासाठी राजारामाने वेंगुर्ला पाच गावांसह डचांना कवडीकिमतीला विकले असा उल्लेख आहे. ते विधान बरोबर नसावे. कादंबरी ही अखेर कल्पित कादंबरीच.

असो. माझ्या गावाच्या परिसरातील इतिहासाचा इतिहास आवडला. इथले जाणते काही ऐतिहासिक दंतकथा सांगतात त्यातल्या काहींना दुजोरा मिळाला. अनेक, अनेक धन्यवाद.

टर्मीनेटर's picture

2 Dec 2020 - 12:21 pm | टर्मीनेटर

दर्जेदार ऐतिहासिक लेख!
खूपच आवडला 👍
महाराजांबद्दलच्या कितीतरी नवीन गोष्टी समजल्या.
धन्यवाद 🙏

दुर्गविहारी's picture

2 Dec 2020 - 8:36 pm | दुर्गविहारी

ज्ञानोबाचे पैजार, प्रचेतस, अथांग आकाश, आनन्दा, डीप डाईव्हर, सौंदाळा, बाप्पू,बेकार तरुण,सुधीर कांदळकर, टर्मीनेटर या सर्व प्रतिसादकांना आणी असंख्य वाचकांना मनापासून धन्यवाद !

हा धागा पण शिफारशीत टाकावा अशी संम ला विनंती

आनन्दा सर, याच्यासाठी विशेष धन्यवाद _/\_