असा बालगंधर्व पुन्हा न होणे

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
14 Aug 2020 - 11:28 am

आजच्या काळात बालगंधर्व माहिती नसलेला मनुष्य सापडणे जरा कठीणच. बालगंधर्व चित्रपटामुळे त्यांचं कार्य आताच्या पिढीला कळलं त्याच बरोबर त्यांचा स्वभाव कलेप्रती असणारी निष्ठा, प्रेक्षकांसाठी उच्च तेच सादर करण्याचा स्वभाव सुद्धा माहिती झाला. त्यांचे असेच काही अपरिचित प्रसंग इथे सादर करतोय.

मुंबईत असतांना एकदा बालगंधर्व काही कामाकरिता व्हिक्टोरियांत बसून बाहेर पडले.काम आटोपून मुक्कामी परत आल्यावर त्यांनी व्हिक्टोरियावाल्यास विचारले, "तुला किती पैसे द्यावयाचे ?' आता व्हिक्टोरियावाला पडला बालगंधर्वांचा भक्त त्याला त्यांच्याकडून पैसे कसे मागायचे म्हणून कानकोंडे व्हायला झालं.
तो म्हणाला  "साहेब ? मी आपलेकरिता दोन तास खर्च केले. नियमाप्रमाणे दोन तासाचे अमुक पैसे होतात ते द्यावेत म्हणजे झाले. व्हिक्टोरियावाल्याचे हे शब्द ऐकतांच बालगंधर्व म्हणाले “अरे, माझी भीड धरून इतके थोडे पैसे सांगतोस. तुला आमचें नाटक पहावयाचे असल्यास त्याबद्दल काही काळजी करूं नकोस. तूं आपले भरपूर पैसे घेतलेस तरी मी रागावणार नाही. उद्या नाटकाला सोडण्याबद्दल मी बाळासाहेब पंडित यांना सांगतों."

एकदा मुंबईस मुक्काम असतांना गंधर्व मंडळीस २ बाज्याच्या पेट्या घ्यायच्या होत्या. तेव्हां बालगंधर्व एका स्नेह्यासह पेट्या खरेदी करण्यास गेले. त्या साठी फोर्ट मधले सगळी दुकानं त्यांनी पालथी घातली . अखेरीस काळबादेवीरोडवरील टी. एस. रामचंद्र यांच्या दुकानांतील दोन हार्मोनिअम पेट्या त्यांना पसंत पडल्या. त्यांनी मालकाला किंमत विचारली. दुकानाच्या मालकांनी किंमत सांगितली. बालगंधर्व म्हणाले "अहो, अगोदर लढाईचे दिवस. सर्व माल महाग. किंमती दुपटीतिपटीने वाढल्या आहेत. असे असतांना तुम्ही आम्हांला इतकी थोडी किंमत सांगतां-काय हे आश्चर्य ? आम्ही तुमचे जुनें गि-हाईक आहोत म्हणून आपणांकडेच माल घेत जाऊं. मात्र आपण आपले नुकसान करून घेऊ नका. भरपूर किंमत सांगा. आम्हांला त्याबद्दल काही वाटणार नाही." सध्या असा दिलदारपणा दुर्मिळच.

१९११ साली मुंबई मुक्कामी असतांना किर्लोस्कर मंडळींचा मानापमान नाटकाचा मुहूर्ताचा प्रयोग ठरला होता पण त्या दिवशी सकाळी बालगंधर्वांचे पहिले अपत्य काळाने हिरावून नेले . तेव्हा आजचा प्रथमच होणारा 'मानापमाना' चा प्रयोग बंद ठेवावा असं श्री.खाडिलकर, श्री.जोगळेकर, श्री. मुजुमदार वगेरे प्रमुख मंडळीनी ठरवले आणि बालगंधर्वांना तसे कळवले पण त्यांनी यासाठी नकार दिला आणि प्रयोग उत्तमपणे रंगवला. हि बातमी बाहेर कळल्यावर बालगंधर्वांच्या या धाडसाचे सर्वोतमुखी कौतुक झाले. याच्या अगदी उलट घटना १९३० साली घडली. त्या वेळी बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळी सुरु केली होती. एके शनिवारी त्यांनीं 'द्रौपदी' नाटक लावले होते. खेळ सुरूं होण्याची वेळ आली होती. हजार पंधराशेची तिकिटे खपली होती; त्याकाळी पंधराशे म्हणजे बरीच रक्कम. त्याच वेळी बालगंधर्वांच्या घरून बातमी आली कि गर्भारपणामुळे त्यांच्या मंडळींच्या पोटात दुखू लागले. तेव्हा हि बातमी ऐकताच बालगंधर्वानी ताबडतोब खेळ रद्द करून प्रेक्षकांचे पैसे परत दिले. तसे पाहता दोन्ही घटना अगदी उलट आहे पण पहिल्या घटनेचा विचार केला तर मानपमानाचा आद्य प्रयोग बंद झाला तर सर्वानी केलेली मेहनत व्यर्थ जाईल. वर प्रेक्षकांचा विरस होईल त्यांना कष्टी होऊन परत जावे लागेल या सर्वांचा विचार करून त्यांनी तो प्रयोग केला. तर दुसऱ्या प्रसंगावरून त्यांना पैश्याची पर्वा नव्हती असे दिसून येते. पण किर्लोस्करांचा मुहूर्ताचा प्रयोग रद्द झाला असता तर तो आपल्या किर्तीस कलंक लागेल असे वाटून त्यांनी तो प्रयोग पूर्ण केला.

मांडणीनाट्यइतिहासप्रकटनआस्वादमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

15 Aug 2020 - 5:56 am | प्रचेतस

रोचक किस्से आहेत.

गामा पैलवान's picture

15 Aug 2020 - 1:31 pm | गामा पैलवान

आजून वाचायला आवडलं असतं.
-गा.पै.

दुर्गविहारी's picture

16 Aug 2020 - 11:04 pm | दुर्गविहारी

सुंदर लेख ! अश्या आठवणी आणखी येउ देत.

सिरुसेरि's picture

21 Aug 2020 - 11:43 pm | सिरुसेरि

सुंदर लेख देवा . +१ . "दया छाया घे निवारुनिया , प्रभु मजवरी कोपला " असे सध्याच्या करोना काळाबद्दल म्हणावे लागेल.