“नानी ये देखोsss!”, “नाना ये देखोsss!”. आमच्या ४ वर्षाच्या नातवाच्या डोळ्यातील चमकदार भाव, अत्यंत आनंदानी उड्या मारत हातातला डायपर आमच्यापुढे नाचवत नाचवत तो उत्साहानी, आनंदानी दाखवत होता आणि आईला कसं शेवटी माझं ऐकावंच लागलं आणि मला ‘ते’ तिला द्यावंच लागलं, अशा विजयी नजरेनी तो अगदी ‘सुखावला’ होता. लगेच त्यानी ‘ते’ घातलं आणि तो ‘ब्रम्हानंद’ घेण्यात रमला.
आणि इकडे त्याची आई म्हणजे माझी मुलगी “आई बघं ना गं, त्याला शेवटी डायपर द्यावंच लागलं, आज चौथा दिवस. डायपरशिवाय त्याला 'ते' होत नाहिये आणि त्यामुळे आता तो काही खातपीतपण नाहिये! म्हणून निराश झालेली, आणि जगातल्या समस्त आयांप्रमाणे याला योग्य वळण कसं, केव्हा लागणार या काळजीत! महिनाभर ती त्याच्यावर ‘ते’ संस्कार करण्याच्या मागे होती. पण यश काही येत नव्हतं. माहेरी पुण्यात आल्यानी ती सांगत होती.
आमच्या लहानपणी डायपर आस्तित्वात होता की नाही माहीत नाही. आमच्या मुलीच्या वेळेस फक्त बाहेर जाताना सोयीसाठी तो वापरला जायचा. त्यामुळे टॉयलेट ट्रेनिंग नावाचा गृहपाठ करावा लागतो हे आमच्या अनुभवविश्वात नव्हतंच. पण नवीन अनुभव घ्यायला वयाची अट नसते.
त्यानंतर चारच दिवसांनी मी मुलीकडे, दिल्लीला गेले. मी आणि मुलीनी मग ‘ते’ प्रोजेक्ट हातात घ्यायचं ठरवलं. सुदैवानी तिला एक दिवस सुट्टी होती. आणि माझ्या नातवाला आजही ‘न होऊन’ तीन दिवस झाले होते. घरात मुलीचे सासरे होते. नातवाला प्रेशर येत आहे हे जाणवत होतं. पण ‘त्याच्याशिवाय’ तो त्याचं ‘ते’ प्रेशर रिलीज करू शकतच नव्हता. त्याला बाथरूम मध्ये घेवून गेलो. त्याची छानशी मऊसर सीट कमोडवर ठेवली व त्यावर त्याला बसवण्याचा प्रयत्न करू लागलो, पण तो पठ्ठा खूप आरडाओरडा, किंचाळाकिंचाळी, लाथा झाडायला लागला. मुलगी त्याला ‘गुड बॅाय’ ची सर्व लक्षणं सांगत होती, मी मात्र त्याचं डोकं इतर कुठेही आपटणार नाही याचीच काळजी घेत होते. त्याच्या त्या प्रचंड तांडव नृत्यात अगदी क्षणभर तो त्या सीटवर बसला. आणि त्याला जाणवलं हे तर छान मऊ आहे पण त्याची ‘मर्दा’ची जात! लगेच मान्य करेल तो ‘तो’ कसला! सासऱ्यांना ऐकू जाऊ नये म्हणून बाथरूमचं दार आणि शिवाय बेडरूमचं दार, दोन्ही बंद. पण याचा जमदग्नीचा आवाज बाहेर गेलाच. याचा ‘दादूsss’ चा गजर जोरजोरात सुरू होताच. दोन्ही दारं उघडून दादू आत आले आणि त्यांनी अत्यंत प्रेमभरानी त्याला कुशीत घेतलं. आणि त्याला ‘डायपर’ देण्याचं फर्मान काढलं. "जगातला प्रत्येकजणं हे शिकतोच आणि करतोच. कसली तुम्हा आताच्या मुलांना एवढी घाई असते समजत नाही. तो आपोआप सोडेल तेव्हां सोडेल. त्याला असा रडवायचा नाही!" असं ऐकवून डायपर द्यायला सुनेला भागच पाडलं!
“चार वर्षांच्या मुलांनी शाळेतील कमोड वापरणे अपेक्षित आहे. आम्ही त्याचा डायपर बदलणार नाही.” अशा आशयाची तक्रारवजा पत्रं शाळेतून जी यायची ती दादूंच्या खिजगणतीतही नव्हती!
हातातोंडाशी आलेला विजय थोडक्यात निसटला होता. सर्व भिस्त ‘त्या’ एका क्षणावर होती. आता परत हा सुवर्णयोग कधी येईल याची चिंता करत होतो. मी तिच्याकडे असणं, तिला सुट्टी असणं, सासरे घरी नसणं आणि त्याच वेळी नातवाला प्रेशर येणं, असे बरेच व्हेरिएबल्स होते. दुसर्या दिवशी कुमक आली! नाना म्हणजे स्वीट टॉकरही दिल्लीला आला.
योग्य वेळ लवकरच आली, आणि सुवर्णयोग घेवून आली! नाना आणि दादू कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात समस्त स्त्री राज्य होतं. आणि त्याला प्रेशर आल्याची लक्षणं दिसू लागली. लगेच मी मुलीला बोलावलं. कळा यायला लागल्याबरोबर आपण गर्भवतीला हॉस्पिटलमध्ये हलवतो तसंच त्याला उचलून टॉइलेटमध्ये नेलं. आश्चर्य म्हणजे नातू पण न कुरकुर करता कमोडवर बसला. त्याचा तोच मूड कायम रहावा म्हणून मुलगी त्याला गोष्टी सांगू लागली, मी त्याला नाचून दाखवू लागले. तो पण ‘त्याच्यासाठी’ त्याच्या परीने प्रयत्न करत असतांना दिसत होता. पण १५ मिनीटं बसून सुध्दा उपयोग झाला नाही. आम्ही दोघी परत निराश, पण तो तिथे बसला, हे ही नसे थोडके!
दोन तासांनी परत ‘ती’ सर्व लक्षणं नातवात दिसायला लागली. मात्र आता पुरुषवर्ग घरी येण्याची शक्यता होती. त्यामुळे वातावरण मघासारखं तणावमुक्त नव्हतं. लगोलग नानाला फोन लावला आणि तोफांचे बार होईपर्यंत काहीही झालं तरी खिंड लढवायचीच, दादूला घरी येऊ द्यायचं नाही अशी कामगिरी त्याच्यावर सोपवली!
आम्ही परत सर्व तयारीनिशी तयार. यावेळेस मात्र मी तिच्या बेडरूममध्येच थांबले, मायलेकाचं बाथरूममध्ये कधी हितगुज तर कधी द्वंद्व चाललेलं. इकडे माझा एक कान बाथरूमकडे, आणि दुसरा गाडीच्या आवाजाकडे! आणि अखेरीस तो आवाज आलाच!
‘डुबुक’!
नातवानी आरोळीच ठोकली “नानी sssss पॅाटी sssss”. बाथरूम थरारलं, सगळं घर आनंदलं! मी मुलीला मिठीच मारली!
मला गीतरामायणातलं दणदणीत म्यूजिक असलेलं रामजन्माचं गाणं आठवलं आणि त्यावरून काव्य स्फुरलं!
नानीने कन्येसह व्यूह योजिला |
दादूच्या इगोला क्षेम रक्षिला |
बाळाचे पोट साफ, हर्ष जाहला sss |
डायपर त्यागिला ग सखे, डायपर त्यागिला sss ||
प्रतिक्रिया
28 Aug 2019 - 5:36 pm | यशोधरा
=))
28 Aug 2019 - 6:03 pm | जॉनविक्क
लेकीच्या कर्तबगारिबाबत शँकाच नाही, पण नेमके काय उपाय करून डुबुक करायला भाग पडले काईच समजले नाही.
बरे तुम्ही काय उपाय केले तर कमोडला छान सीट बनवली इतकेच पण ते पुरेसे न्हवते असं आपणच सांगितले आहे. म्हणजे तेही अपूर्णच...
पुन्हा नानाजीनी आल्यावर त्यांनी काही क्लुप्ती लढवली काय विचार केला तर तो ही धागा अपुराच राहिला... ते भलंतीच खिंड लढवत राहिले...
मग नक्की केलं काय ? आणि मोठा सस्पेन्स म्हणजे लेकीच्या धाग्यात जावयाला चक्क अनुल्लेखाने...
संसारात सगळं कर्तृत्व स्त्रियाच दाखवतात(असा माझा समज) पण कर्तृत्व काय ज्याने पेच संपला ते लिहायचे राहिलेय की ? पुढील भाग येणार आहे ?
28 Aug 2019 - 6:16 pm | पद्मावति
=))
:) मस्तं लिहिलंय.
28 Aug 2019 - 7:44 pm | कंजूस
शेवटी ते कसं घडवलं ते कळलं नाही. वाचक अत्रुप्तच.
या शिकवण्याच्या बाबतीत कच्छी आयाच हुशार असतात. पोरगं एकदाच रडतं पण नंतर सर्वांना हसवतं .
उभं राहू लागल्यावरच शिकवतात.
28 Aug 2019 - 8:18 pm | उगा काहितरीच
हे असं पण असतंय होय ! अज्जिबात कल्पना नव्हती .
28 Aug 2019 - 9:54 pm | स्वीट टॉकरीणबाई
नवीन काहीही केले नाही! जे पूर्वीपासून मुलांना वाढवताना करतो तेच. पेशन्स दाखवणे.
पूर्वी जी गोष्ट बिनबोभाट व्हायची ती इतकी नाट्यमय झाली हेच आश्चर्य आणि विनोद. पुढचा भाग नाहिये.
29 Aug 2019 - 3:01 pm | जॉनविक्क
तरीच विडणबण आलं नाही
29 Aug 2019 - 3:14 pm | ज्ञानोबाचे पैजार
मला वाटल हा लेख म्हणजे "ब्रिटीश" काकांच्या या लेखाचे विडंबन आहे
पैजारबुवा,
29 Aug 2019 - 7:08 pm | जॉनविक्क
30 Aug 2019 - 11:01 am | ज्ञानोबाचे पैजार
हे आवडले असेल तर पेठकर काकांच्या डुबुक इडलीची मजा लुटा
पैजारबुवा,
29 Aug 2019 - 11:16 am | रायनची आई
मस्तं लिहिलंय. खुपश्या बाबा, आजोबाना ह्यां मधली गंमत, थ्रिल कळणार नाही....
29 Aug 2019 - 2:56 pm | अनिंद्य
डायपर त्यागिला ग सखे, डायपर त्यागिला sss
एकदम हसायला आले :-))))
ऑन अ सिरीयस नोट, लहानग्याने ४-४ दिवस 'तिकडे' न जाणे योग्य नाही. त्याची योग्य दखल/तपासणी करून घ्यावी.
29 Aug 2019 - 4:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारी लिहिलंय !
एक सांसारिक प्रसंग असला तरी, वाचताना तो एखाद्या "समरांगणावर चालला आहे' असे वाटत होते आणि 'पुढे काय होणार' ही उत्कंठा तर कायमच होती ! =)) =)) =))
शेवटची कविता पण मस्तंच.
29 Aug 2019 - 6:38 pm | तुषार काळभोर
त्याची आणि तुमची सुटका झाली आणि जीव भांड्यात पडला! :D
आमचे चिरंजीव पाच वर्षाचे झालेत. आता कुठं बसून करायला शिकलेत. इतकी वर्षे उभं राहून कार्यक्रम व्हायचा!!
29 Aug 2019 - 7:14 pm | गौरीबाई गोवेकर नवीन
चिंचेतल्या काड्या फिरवायच्या गं खाली. आपसूक झाली असती. मस्त लिहिलयस पण.
29 Aug 2019 - 7:57 pm | Namokar
मस्तं लिहिलंय
30 Aug 2019 - 11:59 am | श्वेता२४
अगदी हाच अनुभव रोज घेते. माझा मुलगा देखील डायपर शिवाय करत नाही. मी डायपरला नाही म्हणते म्हणून हळूच आजीच्या कानात जाऊन शी करायचीय म्हणून सांगतो. आणि आजीकडून डायपर लावून घेतले की विजयी विराच्या थाटात माझ्याजवळ येऊन उभा राहतो आणि म्हणतो 'शी करतोय'. आता तो ३.५ वर्षाचा आहे. तुमच्या घरी डुबुक झाल्याबद्दल अभिनंदन. आमच्या घरी कधी होणार याच्या प्रतिक्षेत आहे. लेखाशी १०० टक्के सहमत.
31 Aug 2019 - 9:34 am | स्वीट टॉकरीणबाई
@ज्ञानोबांचे पैजार - दोन्ही लेख सही आहेत. पण डुबुक इडली मुद्दामच वाचला नाही. डोक्यात इडली आणि डुबुक चं कनेक्शन झालं की आमचं इडली खाणंच बंद व्हायचं!
@रायनची आई - बरोबर आहे. मला डिस्क्रिमिनेशन करायचं नाही, पण बहुतांशी घरांमध्ये ही बाब बायका हाताळतात.
@अनिंद्य - तो लागत नव्हती म्हणून जात नव्हता असं नाहिये. लागून सुद्धा डायपरशिवाय करायचीच नाही ह्या हट्टामुळे तो धरून ठेवत होता. आता अर्थातच सगळं सुरळित झालं आहे. तुमच्या काळजीबद्दल धन्यवाद.
@डॉक्टरसाहेब - तीच तर मजा आहे. आता साध्यासाध्या गोष्टींनी लढाईचं रूप घेतलेलं आहे!
@गौरीबाई - मी जरी आजी झाली असले तरी माझ्याकडे 'आजीबाईचा बटवा' नाहिये. खरं तर असायला हवा होता!
@श्वेता - एकत्र कुटुंबपद्धतीचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेतच. म्हणूनच तर आम्हाला व्यूह रचावा लागला ना!
31 Aug 2019 - 10:01 am | जॉनविक्क
आपने तो मेरे मुकी बात छिन्नली. मीही लेख यासाठीच वाचला नाही :)
31 Aug 2019 - 10:12 am | नाखु
मुले कायम मोठ्यांचे अनुकरण करतात.
त्यामुळेच लेकाला शिकवावे लागले नाही,लेकी जात्याच हुशार असल्याने प्रश्न उदभवला नाही
संसारी घरगृहस्थी नाखु