झरझर झरझर झरणाऱ्या कातरवेळी
मुलीला घेऊन मुलाने खेळायला जाऊ नये...
तिचे धावते पाय थबकतात,
घरातच विलांटी घेऊन
मैदानाकाठचे गवत
डोळ्यांनी खुडत राहतात...
.....
‘थांब थांब पळू नकोस
माजलेले गवत,
त्यात सापविंचू,
मी आलो आलो
नको नको पळू नकोस ....’
ऐकू येते इतके स्पष्ट
भुडूक अंधारावर
खेळगड्याचे नाव
कोरत राहते ती
दोन डोळ्यांवर वाकून
....
खेळातले नियम
मुलीला माहित नसतात
मुलाला माहित असतात,
पण तो ते पाळत नाही....
नियमावाचून मुक्त खेळ तो
टाळ्या किती, हसू किती
अंधार उजेडावर लाटा किती!
घरी निघण्याची वेळ येताच
मुलगी फ्रॉक झटकते,
मुलगा घाम पुसतो
कोवळ्या कोवळ्या अंधाराला
रानफुलांचा वास येतो....
शाळेत जाताना मुलगी
वेणीत अनंत माळते
त्या रानफुलांचा वास
वहीतल्या रेघांवर झुलवत ठेवते...
......
कातर कातर कातर वेळी
मुलगी एकदम मोठी होते
देवापाशी समंजस दिवा लावते....
तिला प्रार्थना जमत नाही,
शुभं करोति येत नाही, पण
जोडले हात स्वस्तिक होतात
फ्रॉकवरच्या फुलांमध्ये
मुलाच्या घामाचा गंध शोधू लागतात....
.....
खरंच,
झरझर झरझर झरणाऱ्या कातरवेळी
मुलीला घेऊन मुलाने खेळायला जाऊ नये
Shivkanya
प्रतिक्रिया
23 Jul 2019 - 8:27 am | जव्हेरगंज
विलक्षण
23 Jul 2019 - 9:47 am | यशोधरा
तरल, सुरेख.
23 Jul 2019 - 6:35 pm | शिव कन्या
धन्यवाद.
23 Jul 2019 - 6:51 pm | प्रचेतस
लयबद्ध
23 Jul 2019 - 8:53 pm | चांदणे संदीप
मऊशार उबदार वाळूत लिहावं तसं लेखन आहे तुमचं. कधीतरी निवांतपणे तिथेच बाजूला बसून वाचता येतं किंवा कधी ते लगेच लाटेच्या पाण्यासोबत वाहून जातं. कधी तिथल्या वाळूचा उबदारपणा हवाहवासा वाटतो कधी गरम चटकेही बसतात.
त्या वाळूचे गरम चटके बसल्यावर आम्ही उठून जाऊ शकतो पण तुम्ही तिथेच आणि तसेच लिहित रहा.
Sandy
23 Jul 2019 - 10:56 pm | शिव कन्या
तुमच्या भावना पोहचल्या हो...:))
किती तो वाळूला त्रास!! :)))
23 Jul 2019 - 10:32 pm | नाखु
अलगूज वाजते तशी ओढ वाटणारी कवीता.
राग ताल नाही समजले तरी ऐकायला आवठते अशी अलगूज धून
आकाशवाणी रसिक श्रोता वाचकांची पत्रेवाला नाखु
23 Jul 2019 - 10:57 pm | शिव कन्या
दाद दिल ले गयी...
शुक्रिया..
23 Jul 2019 - 11:08 pm | वीणा३
तुमच्या कविता बरेचदा कळत नाहीत तरी वाचाव्याश्या वाटतात परत परत. लिहीत रहा.
24 Jul 2019 - 12:36 am | जॉनविक्क
का जाऊ नये समजले नाही जरा विस्तार कराल काय ?
24 Jul 2019 - 11:36 am | इरामयी
खूप छान कविता आहे. लहानपण आठवलं. लहानपणचे स्पर्धा, नियम, चाकोर्या नसलेले वेगवेगळे खेळ आठवले.
अवांतरः आणि खरंच, आपल्या लहान मुली किती समंजस असतात आणि निवांत.
मुलगे म्हणजे नुसता धांगडधिंगा आणि मारामार्या. बहिणीबरोबरसुद्धा सतत बरोबरी आणि भांडाभांडी. पण आपल्या बहिणीला थोडं जरी लागलं खुपलं की तितकेच भावूक होतात.
24 Jul 2019 - 12:12 pm | टर्मीनेटर
बापरे! इतका निरागस भावार्थ होता का ह्या कवितेचा? मला काही भलताच अर्थ लागला होता!
ह्याच कारणासाठी कविता ह्या साहित्य प्रकारापासून मी चार हात दूर राहतो. कवी/कवियत्रीला सांगायचे काही वेगळेच असते आणि वाचणारा आपापल्या परीने अर्थ लावतो.
एकवेळ काहीच समजले नाही तरी ठीक पण अर्थाचा अनर्थ लावणे म्हणजे कवितेवर नकळत केलेला अत्याचारच कि!
24 Jul 2019 - 1:07 pm | चांदणे संदीप
तुम्हाला समजलेला अर्थ योग्यच आहे. :(
Sandy
26 Jul 2019 - 8:01 pm | इरामयी
प्रत्येक गोष्ट काय अगदी उलगडूनच लिहायला हवी का?
आणि तुम्ही अवांतरचा कवितेशी संबंध जोडला की काय?
असू द्या.
24 Jul 2019 - 12:37 pm | गवि
नॉट समझींग्ड..
24 Jul 2019 - 2:05 pm | यशोधरा
तेच बरं आहे.. :(