कंपीत गात्र होई तू छेडिल्या सुरांनी
श्वासात खोल जाई मिसळून रातराणी
बेहोष मंद तांडे निघताच चांदण्यांचे
क्षितिजास अन पहाटे ही चंद्रिका दिवाणी
उठती अनेक हलके हलके तरंग कोठे
गंधीत रात्र होई घुमवीत धुंद गाणी
आल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा
लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी
(हळुवार मंद होई हा दीप तेवणारा
वारा तशात गाई बेधुंदशी स्वराणी)
वितळून या क्षणी मी माझीच ना उरावे
उजळून जात काया, लावण्य हे नुराणी
घेई टिपून हलके हे क्षण यौवनाचे
दृष्टीस आज सांगे बघ मौन होत वाणी
हलकेच गूज सांगे ती रात्र पांगताना
बेधुंद मीलनाची अन् ठेवते निशाणी
वर्षाव अमृताचा .. मी त्यात चिंब व्हावे
लाजून चूर व्हावे , स्मरताच ही कहाणी..
- प्राजु
प्रतिक्रिया
12 Mar 2009 - 11:45 pm | चकली
कविता आवडली
चकली
http://chakali.blogspot.com
12 Mar 2009 - 11:45 pm | अवलिया
वा! क्या बात है !!!
आज काय सुंदर सुंदर कवितांचाच दिवस आहे काय?
विशेष आवडले !!
मस्तच ऽऽऽ अजुन येवु द्या :)
--अवलिया
12 Mar 2009 - 11:48 pm | बिपिन कार्यकर्ते
सुंदर!!!
बेहोष मंद तांडे निघताच चांदण्यांचे
क्षितिजास अन पहाटे ही चंद्रीका दिवाणी
सुंदर!!!
बिपिन कार्यकर्ते
12 Mar 2009 - 11:49 pm | मानस
तुझ्या प्रतिभेचा शृंगार असाच फुलत राहो, हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना....
घेई टिपून हलके हे क्षण यौवनाचे
दृष्टीस आज सांगे बघ मौन होत वाणी
या ओळी खासच ....
12 Mar 2009 - 11:51 pm | क्रान्ति
खूप गोड कविता आहे प्राजु! एकदम नाजूक आणि तरल भाव! खूप खूप आवडली.
तूच कविता, नाजूक कविता
शरण तुला प्राजक्ता मी ग शरण तुला प्राजक्ता!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
13 Mar 2009 - 12:15 am | प्राजु
तुलाच धन्यवाद.
कवितेला नाव सुचवल्याबद्दल. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Mar 2009 - 11:52 pm | शितल
सुंदर कविता केली आहेस प्राजु. :)
संपुर्ण कविता आवडली. :)
12 Mar 2009 - 11:56 pm | आपला अभिजित
अल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा
लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी
वारा तशात गाई बेधुंदशी स्वराणी)
वितळून या क्षणी मी माझीच ना उरावे
उजळून जात काया, लावण्य हे नुराणी
सुंदर आहेत ओळी!!!
खूपच छान कविता!
जियो...!!
अवांतर : तुम्ही प्रतिभा उसनी देता का?
13 Mar 2009 - 12:12 am | मराठमोळा
अप्रतिम काव्य्..ओळ अन् ओळ अर्थपुर्ण... सुरेख
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
13 Mar 2009 - 12:16 am | आनंदयात्री
एक नंबर. मेजवानी !!
13 Mar 2009 - 12:43 am | जयवी
जियो जानेमन :)
संपूर्ण कविताच इतकी अलवार आहे ना.... सौंदर्यस्थळं तर अगदी जागोजागी आहेत. खूप खूप छान !!
नव्या लेखनासाठी मनापासून शुभेच्छा :)
13 Mar 2009 - 1:39 am | बेसनलाडू
आवडली अगदी!
मात्र एकंदर काफियासंच पाहता सुरांनी हा काफिया (मला तरी) खटकला. न-ण, ड-ढ, क-ख, ज-झ अशा जोड्यांचे काफिये योजावयाची युक्ती म्हणजे दोन मतले लिहावेत. म्हणजे काही अडचणराहत नाही. अर्थात, अशा कोणत्या बंधनांमध्ये कवी/कवयित्रीने स्वतःला किती अडकवून घ्यायचे हा ज्याचात्याचा/जिचातिचा प्रश्न. असो.
(आस्वदक)बेसनलाडू
13 Mar 2009 - 7:18 pm | प्राजु
आपण सांगितलेल्या गोष्टीचा नक्की विचार करेन. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Mar 2009 - 5:18 am | धनंजय
लयदार गाणे.
13 Mar 2009 - 7:42 am | सहज
अचानक विचाराचा एक थेंब येउन त्याचे तरंग मनाचा पूर्ण ताबा घेतात.
सुरेख!
13 Mar 2009 - 7:54 am | मदनबाण
बेहोष मंद तांडे निघताच चांदण्यांचे
क्षितिजास अन पहाटे ही चंद्रिका दिवाणी
सॉलिट्ट्ट... :)
चांदण्यांचा वर्षाव
असाच सुरु राहावा
पुनवेचा चंद्र हा
नभी सदा रहावा...
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
13 Mar 2009 - 7:58 am | मनीषा
हळुवार कविता ...
शब्द, लय .. सारेच सुरेख !
उठती अनेक हलके हलके तरंग कोठे
गंधीत रात्र होई घुमवीत धुंद गाणी .....मस्तच .
13 Mar 2009 - 8:30 am | विसोबा खेचर
अतिशय सुरेख गझल.. प्राजू, जियो..!
तात्या.
13 Mar 2009 - 8:40 am | चतुरंग
प्राजू, अतिशय सुरेख गजल!
चतुरंग
13 Mar 2009 - 8:44 am | मिसळभोक्ता
"कंपीत गात्र होई", ऐवजी "कंपून गात्र जाई" कसे वाटते ? इतक्या हळूवार कवितेला पास्ट पार्टिसिपल्स टाळावेत.
- मिसळभोक्ता
13 Mar 2009 - 7:17 pm | प्राजु
सुचवणी लक्षात ठेवेन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Mar 2009 - 9:47 am | घाटावरचे भट
'कंपू' हा शब्द किंवा त्याची कोणतीही रूपे वापरताना काळजी घ्यावी.
13 Mar 2009 - 9:19 am | चन्द्रशेखर गोखले
भावतरल कविता..! खर तर शब्दातीत अनुभुती, शब्दात व्यक्त करण कठिण असत, आपण यशस्वी झालात ...!!!
13 Mar 2009 - 1:27 pm | दत्ता काळे
त्यातलं हे फारच आवडंल
आल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा
लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी
13 Mar 2009 - 2:35 pm | राघव
छान गझल..नेहमीप्रमाणेच उत्तम!
आल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा
लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी
हलकेच गूज सांगे ती रात्र पांगताना
बेधुंद मीलनाची अन् ठेवते निशाणी
वर्षाव अमृताचा .. मी त्यात चिंब व्हावे
लाजून चूर व्हावे , स्मरताच ही कहाणी..
हे खास!! :)
राघव
13 Mar 2009 - 5:33 pm | अविनाशकुलकर्णी
खुप सुन्दर
13 Mar 2009 - 5:40 pm | शाल्मली
सुंदर काव्य!
मस्त!
--शाल्मली.
13 Mar 2009 - 5:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर कविता !
13 Mar 2009 - 6:31 pm | लिखाळ
सुंदर कविता .. आवडली :)
-- लिखाळ.
13 Mar 2009 - 6:33 pm | श्रावण मोडक
तरल, भावूक, लाघवी...
13 Mar 2009 - 7:04 pm | अमोल खरे
मस्त कविता प्राजुताई.
13 Mar 2009 - 7:47 pm | अनामिक
सुंदर कविता प्राजु ताई... खुप खुप आवडली!
आल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा
लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी
ह्या ओळी तर लाजवाब! काय सुंदर कल्पना आहे, नव्हे हेच वास्तव असावे!!
-अनामिक
14 Mar 2009 - 9:42 am | प्राजु
सर्वांचे मनापासून आभार. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/