सेक्रेड गेम्स २
लेखनप्रकार (Writing Type)
लहानपणी आजीच्या कुशीत शिरून गोष्टी एेकताना, त्यात पुढे काय होईल याची उत्सुकता आपल्याला शांत बसू देत नाही. हि उत्सुकता ती गोष्ट/कथा उत्कृष्ट असण्याचं द्योतक म्हणता येईल आणि त्या गोष्टीशी आपण एकरूप झाल्याचं लक्षण म्हणता येईल.
या उत्सुकतेपोटीच 'गेम आॅफ थ्रोन्स'च्या आठही सिझन्सना जगभरातल्या तमाम प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या सर्वांग सुंदर सिरीजचा २०११ ला सुरू झालेला प्रवास नऊ वर्षांनी २०१९ ला संपला, कारण या मालिकेची कथा उत्कृष्ट होती आणि तिने प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचे काम अतिशय चोख केले.
'कट्टप्पाने बाहुबलीला का मारले'? या प्रश्नाच्या उत्सुकतेमुळे बाहुबलीच्या दुसऱ्या भागाने राजामौलीला न भुतो न भविष्यती असा बिझनेस मिळवून दिला.
अगदी याच उत्सुकतेपोटी परवा १५ आॅगस्टला सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन पाहिला. पहिला सिझन अनपेक्षितपणे सुपर डुपर हिट ठरलेल्या या सिरिजने २५ दिवसांत काय होणार आहे? गणेश गायतोंडे, सरताज सिंग, बंटी, कांताबाई, भोसले, पारुळकर, त्रिवेदी या पात्रांचं पुढे काय होतं? सरताज मुंबईला वाचवू शकेल का? हे आणि असे अनेक अनुत्तरीत प्रश्न प्रेक्षकांच्या डोक्यात निर्माण केले आणि त्या सर्वांच्या उत्तरांची या दुसऱ्या सिझनपर्यंत उत्सुकता अबाधित ठेवली हे या मालिकेचे खरे यश!
जुलै २०१८ ला सेक्रेड गेम्सचा पहिला सिझन रिलिज झाला होता. सुरूवातीला फार प्रतिसाद नसलेल्या या सिरिजने भारतीय प्रेक्षकांची हळू हळू चांगली पकड घेतली. २०१८ च्या आॅगस्ट महिन्यात, एका रात्री दहा वाजता सहज उत्सुकता म्हणून पहिला भाग पाहिला आणि झपाटल्यागत नंतरचे सगळे भाग सलग सकाळी सहा वाजेपर्यंत पाहुन काढले होते. प्रचंड आवडला होता पहिला सिझन!
त्या भागात सगळ्याच पात्रांचा अभिनय अतिशय दमदार झाला होता. मुख्य पात्रांच्या बरोबरीने कुक्कू, सुभद्रा, बदरीया, त्रिवेदी, अशी दुय्यम फूटेज असणारी पात्रही प्रेक्षकांच्या चांगली लक्षात राहिली होती. 'भगवानको मानते हो?', 'अपुनही अश्वत्थामा है' त्यातल्या या आणि अनेक शिवराळ संवादांनी अक्षरशः धुमाकुळ घातला होता. विक्रमादित्य मोटवाने आणि अनुराग कश्यपचं दिग्दर्शन अगदी अफलातून होतं.
पहिल्या सिझनला या अत्यंत वेगवान कथानकाने वाढवलेली उत्सुकता, दुसऱ्या सिझनच्या अगदी शेवटच्या भागापर्यंत टिकून ठेवली असं म्हणायला हरकत नाही. मध्ये काही ठिकाणी स्लो डाऊन झालेले कथानक, क्लायमॅक्सला अर्धवट ठेवून प्रेक्षकांनी ते आपापल्या दृष्टीने पूर्ण करावे हा दिग्दर्शकांना सुचलेला भारी प्रकार आहे.
वेब सिरिज म्हणून सेक्रेड गेम्सचा जो काही कंटेट होता, तो पहिल्यांदाच भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि त्याने इथल्या प्रेक्षकांची वेब कंटेंट प्रकारामध्ये विशेष रुची निर्माण केली. नाही म्हणायला, त्यापूर्वी इनसाईड एज, ब्रिद अशा अनेक चांगल्या मालिका आल्या होत्या, पण सेक्रेड गेम्सच्या वाट्याला जी लोकप्रियता आली तशी इतर मालिंकाच्या वाटेला कमीच आली. नेटफ्लिक्सने अतिशय चतुराईने सेक्रेड गेम्सच्या माध्यमातून भारतात दमदार पाऊल ठेवले. त्यापूर्वीही नेटफ्लिक्स भारतात प्रक्षेपित होत होते, पण सेक्रेड गेम्सच्या माध्यमातून भारतीय प्रेक्षकाला वेब सिरिजच्या बाबतीत चोखंदळ बनवत, त्यांचे महागडे सबस्क्रिप्शन घ्यायला भाग पाडले हे नाकारता येण्यासारखे मुळीच नाही.!!
प्रतिक्रिया
सिजन 2 चा शेवट (६० सेकंद) मास्टर स्ट्रोक आहे.
विस्कळीत आणि अनावश्यक प्रव्होकेटीव्ह
कल्ट चे चित्रीकरण त्याची थीम
बर्यच गोश्ति अर्ध वट होत्या
सेक्रेड गेम्स पाहिली नाही
ऑफकोर्स यु लव इट ओर हेट इट
हि मालिका अजून बघितली नाही पण
काय ? हे परीक्षण आहे ?
पहिला सीजन सैफ आणि फ़क़्त सैफ
नाही पाहिले
दुसरा सीजन = बलिदान
महा रटाळ प्रकार (सीझन २ हा)