जे न देखे रवी...

अनुस्वार's picture
अनुस्वार in जे न देखे रवी...
16 May 2020 - 22:32

पुण्य

माझा कातर स्वर आज गातो भेसूर लयीत
वाट चालतो घरची काटा-काचा तुडवीत.

स्वप्न पाहून मोठाली सोडला मायेचा मी गाव
आलो शहराच्या खुराड्यात घालून पंखावर घाव.

राब राब राबलो आटवून रक्त आणि पाणी
सटवाईने लिहिली भाळी जिंदगी दीनवाणी.

हात राठ झाले आणि तळव्याची चप्पल
पिलं मोठी झाली त्यांना देऊ कोणती अक्कल.

मन्या ऽ's picture
मन्या ऽ in जे न देखे रवी...
16 May 2020 - 14:05

गणितं..

गणितं..

आयुष्याच्या पाटीवरची
गणितं माझी चुकली
चुका लपवण्यासाठी
मी ती पटापट पुसली
मनाचा शिक्षक आहे थोर
कडक शिस्तीचा
पुसलेली गणितं
परत परत विचारली

SwapnilB.0611's picture
SwapnilB.0611 in जे न देखे रवी...
15 May 2020 - 19:26

देवा, थांबव हा कहर....

आता तरी फुटू देरे देवा तुला पाझर,
खूप झाला आता हा कोरोना चा कहर...

कोण करतो कोण भरतो,अशी येथे गत आहे,
श्रीमंतांनी आणला आजार,गरीब आता भोगत आहे...

मुठभर लोकांच्या नालायक पना मुळे, हा आजार पसरतो आहे,
त्यांच्या सोबतच मरणाऱ्या गरिबांना, तू का विसरतो आहे...

मान्य करतो चूक आमची, माजलो होतो जास्त,
कळली चूक आम्हाला, अजून किती करशील त्रस्त...

कौस्तुभ भोसले's picture
कौस्तुभ भोसले in जे न देखे रवी...
15 May 2020 - 13:57

डाग

त्या रात्री त्याला
चंद्रावरचा डाग
स्पष्ट दिसला.
आणि मग त्यानं
घट्ट मिटून घेतली
खिडक्यांची दार...

सताड उघडी ठेवली
भयाण काळोखात
नयनांची कवाडं...

त्या स्मशान शांततेत
निर्दयीपणे ओढल्या त्याने
रक्ताळलेल्या रेघा
आपल्याच हातावर

आणि मग पुन्हा
पहाटच झाली नाही...

-कौस्तुभ

मन्या ऽ's picture
मन्या ऽ in जे न देखे रवी...
15 May 2020 - 02:50

त्या स्वप्नांना..

त्या स्वप्नांना..

काय करु? समजत नाही.
मनास माझ्या मी
कसा आवर घालु?
हे मज आता उमजत नाही..
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..

स्वप्न आहेत ती
काही श्रावणातल्या पावसाची
तर काही बहरलेल्या वसंताची..
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जे न देखे रवी...
14 May 2020 - 12:32

आत्मनिर्भर

मार्ग खडतर, लक्ष्य दुर्धर होत गेले
आणि अंतर आत्मनिर्भर होत गेले

शब्द जितके आत्मनिर्भर होत गेले...
अर्थ सारे अस्थिपंजर होत गेले

सुख जगू शकलेच नाही त्या ठिकाणी...
दुःखसुद्धा फक्त जर्जर होत गेले

बांधण्यासाठी नवे सेतू फुकटचे
माणसांचे स्वस्त पत्थर होत गेले

चालणे नशिबात होते का म्हणू मी...
राहण्यासाठी कुठे घर होत गेले?

मन्या ऽ's picture
मन्या ऽ in जे न देखे रवी...
13 May 2020 - 09:49

घे भरारी..

घे भरारी..

स्वप्नसुखांचे लेवुन पंख
घे भरारी गगनात
आभाळ आहे तुझेच परि
तु तुझिया मायेला विसरु नको

श्वासात घे भरुन तु
ती अविरत ऊर्जा त्या भानुची
घे भरारी गरुडापरि तु
असुदेत एक नजर भूवरी

नंदादीप तो जळत राहो
तुझ्या इच्छा-आकांक्षाचा
निसर्गाचे ते अनमोल देणे
तु परतवत रहा त्याला

- Dipti Bhagat

मन्या ऽ's picture
मन्या ऽ in जे न देखे रवी...
13 May 2020 - 00:13

मैत्री असावी...

मैत्री असावी...

मैत्री
मैत्री असावी
खळखळत्या वाहत्या
झऱ्यासारखी
रातराणीच्या सुगंधासारखी
आसमंतात दरवळणारी

मैत्री
मैत्री असावी
उनाड वाऱ्यासारखी
केसाची बट अलगद
झुलवणारी
मनसोक्त हसणारी
हसविणारी
संकटसमयी धावुन
येणारी

कौस्तुभ भोसले's picture
कौस्तुभ भोसले in जे न देखे रवी...
12 May 2020 - 15:14

उसणं अवसान

मी उसणं अवसान आणून म्हंटल होत.
तुझ्यासाठी मी
चंद्र तोडून आणीन...
चांदण्यांचा गजरा करून
तुझ्या केसांत माळीन...

पण ते सार अशक्य होत..!

अन् तरीही तू,
माझ्या सोबत
सुखाने संसार केलास...
माझ्या प्रत्येक स्वप्नांना
तू आकार दिलास...

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
12 May 2020 - 14:59

रंग रंग तू, रंगिलासी

रंग रंग तू, रंगिलासी

दंग दंग तू, दंगलासी

भंग भंग तू, भंगलासी

वेड्यापिश्या रे जिवा

जाशी उगा जीवाशी

अव्यक्त बोल रे तुझे

शब्दांचे झाले तुला ओझे

का धावीशी उगा तू रे

कुणी नाही वेड्या रे तुझे

तो सूर्य देई एकला शक्ती

समिंदराची ओहोटीभरती

आकाश झेलते तारे

मग का हवे रे , तुला सारे ?

का जन्म घेतलासी ?

कौस्तुभ भोसले's picture
कौस्तुभ भोसले in जे न देखे रवी...
11 May 2020 - 11:09

चिश्ती रेषा

अंधार गवसला मागे
तू पुढे रात्र उसवली.
होती नव्हती पणती
मी हळूवारपणे विझवली.

पहाडा मागून आल्या
कोर्‍या चिश्ती रेषा.
केसरी हिरवा रंग
नेसून बसली वेश्या.

मुंग्यांचे फूटले वारूळ
अलवार धुक्याच्या वेळी.
सख्याचं उमटलं गोंदण
क्षितीजाच्या अलगद भाळी.

-कौस्तुभ

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
11 May 2020 - 10:32

माझी काळोखाची कविता

मी न चाहता उगवतीचा
येईल त्याला जातो सादर
पसरूनि अंगावरती घेतो
अंधाराची काळी चादर

मोहक तिरिपा उजेडाच्या
मृगजळ फसवे तिथेच होई
त्याहूनी प्रिय, मजला घेणे
बरबटून काळोखाची शाई

नवे समर नव्या दिसाचे
तयां सोबत आरवतेची
हलके घाव देते भरूनि
तमात शांती नीरवतेची

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
10 May 2020 - 20:03

स्वप्नाला पडली भूल

स्वप्नाला पडली भूल
उन्हाची चूल.
दे चंद्रभाकरी
थकल्या जीवा.

रानीचा वणवा
ताटावर ओणवा….
एकलाच गातो जोगी
थकलेले गूढ मंत्र…
एकटाच चेतवी जाळ
थकल्या सांजवेळी

स्मरणाचे पाप
जाळीतो लावून आग..
स्मरणाचा कचरा होतो
आशेची होते राख.

मन्या ऽ's picture
मन्या ऽ in जे न देखे रवी...
10 May 2020 - 15:47

बापजन्म!

बापजन्म!

काल पाहिला मी एक
बाप जन्मताना
O.T. बाहेर
अस्वस्थ घुटमळताना
होणाऱ्या चिमुकल्या जिवासाठी
तिळ तिळ तुटताना

कोण म्हणतं
कि मातृत्वाच्या वेदना
फक्त आईलाच होतात
बापालाही होतच
असतात.. पण त्या
त्यालाच व्यक्त
करायच्या नसतात

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
9 May 2020 - 20:40

सनईचे.. सूर वाजले.. दारी

मुलगी :

गालावर.. लाजची गं.. लाली
हळदीची.. काया माझी.. ओली

सुखाची गं..सर ही.. आली
हुरहुर.. मनी माझ्या न्हाली ||१||

वीज झडे.. आतुन गं..कोवळी
कळी कळी.. श्वासांची ग बोली

गालावर.. लाजची गं.. लाली
हळदीची.. काया माझी.. ओली ||२||

आई:

कौस्तुभ भोसले's picture
कौस्तुभ भोसले in जे न देखे रवी...
9 May 2020 - 16:14

चांदणरात

पैजणी चांदणरात
तुझ्या स्पर्शात
हे प्राण घेऊनी आली...
स्पर्श संदिग्ध
जरासे मंद
गुलाब फिरले गाली...

ढवळते वारा
छेडील्या तारा
आकाश असे सचित्र...
उधळती रंग
पसरले गंध
हे भास मला विचित्र...

उरी मोगरा
प्रसविते झरा
तुझी मधुर काया...
क्षणाची भूल
उठविते झूल
निळी सावळी माया...

- कौस्तुभ

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
9 May 2020 - 15:27

कवितेच्या विषाणूने

कवितेच्या विषाणूने तुला दंश केला
(एक चांगला इसम कामातून गेला)
जे न पाहू शके रवि ते तुला दिसते
चांदण्यांची धूळ तुझ्या पायाशी लोळते
विसरशी व्यवहार, शब्द हेची धन
ऐन कोलाहलातही करीसी चिंतन
न बोलले, अव्यक्तसे तुला ऐकू येते
जाणिवेच्या पल्याडचे तुला खुणाविते
कळेना रचसी अशी कोणती कविता

मिपा काव्यस्पर्धेमध्ये टाक..
..आज
..आत्ता!

कौस्तुभ भोसले's picture
कौस्तुभ भोसले in जे न देखे रवी...
9 May 2020 - 12:38

असा एक शत्रूच खुद्दार व्हावा

असा एक शत्रूच खुद्दार व्हावा.
पुरावा परंतू न गद्दार व्हावा.

अशी स्निग्ध व्हावी घरे ही नभाची.
उभ्या आसमंतात उद्धार व्हावा.

कुण्या मोगऱ्याचा दिसावा पसारा.
उभा श्वास माझा ग मंदार व्हावा .

कशाला कुणाची करावी अपेक्षा.
स्वत:चा स्वत:लाच आधार व्हावा.

तुझ्या स्पंदनाची गती सैल व्हावी .
नि डोळ्यांत साऱ्या ग अंधार व्हावा .

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
9 May 2020 - 08:35

||चंद्रवेळ||

1 आकाशातून खिडकीत, खिडकीतून फोटोत उतरलेला चंद्र,
तुला WhatsApp वर पाठवला की मग कुठे माझी पौर्णिमा सुरू होते.
अन तुझा त्यावर reply आला की ती शारदीय होते.

2माहीत असतं, "छान, ओके किंवा तूच माझा चंद्र"
याहून दुसरा तुझा reply येणार नाही.
पण तरी मी खूष असते कारण मला कळतं
याहून अधिक तुला खरंच काही सुचणार नाही.

कौस्तुभ भोसले's picture
कौस्तुभ भोसले in जे न देखे रवी...
8 May 2020 - 09:37

वणवा

असा पेटतो वणवा
उरी घर्षती झाडे,
आणि भणानून उठती
दु:खाचे धूसर वाडे.

रात्र वेशीला अडली
अंधारच इथे सजलेला,
अग्नीच्या तप्त तमांतून
मोगरा कसा भिजलेला?

कुणी हाक देऊनी स्वर्गी
वणवा असा रोखावा,
वनमेघ दाटूनी विवर्त
वळीवाचा पाऊस यावा.

-कौस्तुभ