अलिकडेच मी शनिवारवाड्याचे रहस्य ही रहस्यकथा आणि सूड ही कथा लिहीली होती... नकारात्मक भूमिका असलेल्या नायकाच्या (खरेतर खल-नायकाच्या) सूड या कथे नंतर वाचकांना कदाचित ही वेगळ्या प्रकारची हलकीफुलकी कथा आवडेल अशी आशा आहे... ही कथा माझ्या ब्लॉगवर असल्यामुळे काही जणांनी अगोदरच वाचली असण्याची शक्यता आहे...
पण मिसळपाव वर ही माझी कथा प्रथमच देताना आनंद होतो आहे.
सूड हे वेगळे कथानक होते त्यामुळे प्रस्तावनेची गरज होती.
पण स्पर्श ही अनुभूति आहे त्यामुळे प्रस्तावनेची गरज वाटत नाही....
"स्पर्श" ही कथा पीडीएफ फॉर्मॅट मधे वाचण्यासाठी PDF इथे क्लिक करा
आपल्या अभिप्रायांचे स्वागतच आहे :)
धन्यवाद
- सागर
— प्रारंभ —
रात्रीची दोन वाजताची वेळ होती.
मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात एका खाजगी रुममध्ये शलाका बेडवर पडली होती.
डोळे उघडे होते पण त्यांत कोणतीही संवेदना जाणवत नव्हती.
तिच्या डोक्याभोवती पूर्ण बँडेज गुंडाळले होते. अजूनही रक्ताने माखलेली तिची आवडती आंबा कलरची साडी तिच्या अंगावर होती. आजूबाजुला चार नर्सेस आणि दोन शिकाऊ डॉक्टर उभे होते. डॉक्टर अभिजीत नुकतेच सहका-यांना तिची काळजीपूर्वक देखभाल करण्यासाठी सांगून गेले होते.
ते स्वत: शलाकाचे मेंदूचे C.T. Scan चे रिपोर्टस् बघायला चालले होते.
डॉक्टर अभिजीत यांना शलाकावरचे उपचार आणि आईंची समजूत घालणे हे दोन्ही बघावे लागत होते. आदित्यच्या आईच्या डोळ्यांतून अखंड अश्रूधारा वहात होत्या. गेल्या तीन तासांत ती सतत रडतच होती.
डॉक्टर अभिजीत शलाकाचे रिपोर्टस् बघायला जाताच आईचे विचारचक्र सुरु झाले.
आदित्यची आई,सावित्रीबाई, अतिशय देवभोळी, शकुन-अपशकून आणि पायगुण मानणारी होती. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची सांगड तिला देवाशी, शकुनाशी किंवा त्या व्यक्तिच्या पायगुणाशी घालण्याची सवयच होती.
शलाका घरातून निघतानाच आईला समोरच्या जोशी काकूंच्या घरचे मांजर दिसले होते.
आई म्हणाल्यापण होत्या - "अगं घरातून बाहेर जाताना मांजर दिसणं चांगलं नसतं. तू नको जाऊस."
"आई मी गेले नाही तर ह्यांची खबरबात कशी मिळेल. मला जायलाच हवं. रोजच तर ते मांजर दिसते." असं म्हणून शलाका आदिची कार घेऊन वेगाने एअरपोर्टकडे निघाली होती.
सावित्रीबाई शलाकाशेजारीच बसल्या होत्या. बघता बघता सावित्रीबाईंच्या अश्रूनी ओल्या झालेल्या डोळ्यांसमोर गेल्या चार तासांतील घडामोडी धूसरपणे दृश्यरुप घेऊ लागल्या.
—१ —
आज सकाळपासूनच शलाका भलतीच खुशीत होती.
अगदी पहाटे पाचलाच ती उठली होती. उठल्या उठल्या स्नान करुन लगेच देवपूजेला देखील बसली होती.
देवाची पूजा करून होताच मग ती आपल्या सासूच्या,सावित्रीबाईंच्या, सेवेस लागली.
नेहमी प्रमाणे तिने त्यांना सकाळचा नाश्ता दिला. आज सासूबाईंच्या आवडीचे कांदापोहे शलाकाने केले होते.
शलाकाच्या हातात कांदापोहे असलेली डिश् बघूनच सावित्रीबाई म्हणाल्या-
"आज आदि येणार आहे म्हणून माझी चांगलीच चंगळ होणार असे दिसतेय."
आदित्य आज अमेरिकेहून दुबईमार्गे येणार होता.
"हे हो काय आई?" शलाका लटक्या रागाने म्हणाली - "दुपारच्या जेवणाला मग तुम्हाला कांदाभजी देणार नाही मी"
नाहीतरी अभिजीत काकांनी तुम्हाला तळलेले पदार्थ खायला मनाई केली आहेच."
सावित्रीबाई मनाने चांगल्या होत्या. तशीच त्यांची सून शलाका पण स्वभावाने खूप चांगली होती. मुख्य म्हणजे ती देव मानणारी आणि मोठ्यांना मान देणारी होती. छोट्या छोट्या गोष्टींवरुन आजकालच्या मुलींसारखी सासूशी भांडणारी अजिबात नव्हती.
-- थोडेसे मागे --
शलाकाचे वडील दामोदरपंत सप्तर्षि एकदम कर्मठ ब्राह्मण होते. समाजात त्यांना संस्कृतचे प्रकांड पंडीत आणि वेदांचे गाढे अभ्यासक म्हणून खूप मान होता. घरातदेखील अतिशय सुसंस्कृत वातावरण होते.पुण्यातील एक नावाजलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा लौकीक होता.
दामोदरपंत जरी धार्मिक असले तरी त्यांना विज्ञानाची कास होती, म्हणूनच त्यांनी आपल्या मुलांना चांगल्या संस्कारांबरोबरच विज्ञानाचा दृष्टीकोणदेखील दिला होता. त्याचाच परिपाक म्हणून त्यांची दोन मुले वेगवेगळ्या क्षेत्रांत वैज्ञानिक म्हणून नावलौकीक मिळवते झाले होते. शलाका ही सर्वात धाकटी आणि सर्वात हुशार मुलगी. तिने स्वत:च संगणकतज्ञ व्हायचं ठरवलं होतं.
जेव्हा पुणे विद्यापीठांतील हुशार स्नातकांना एका नावाजलेल्या कंपनीने मुलाखती घेऊन निवडायचे ठरवले तेव्हा शलाकाची त्यांत निवड होणे अपेक्षितच होते. त्याप्रमाणे तिची निवड झाली देखील.खरेतर शलाकाने एक गंमत म्हणून ही मुलाखत दिली होती फक्त स्वत:चे मूल्यमापन करण्यासाठी.कंपनीचे ऑफिस नवी मुंबईला असल्याने पुणे सोडून तिकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. पप्पांची ती खूप लाडकी असल्याने पप्पा तिला परवानगी देणार नाही याची तिला खात्री होती.
एक दिवस ती 'जावा'च्या क्लासवरून घरी येताच दामोदरपंतांनी तिला बोलावले.
"अगं शलू, हातपाय धुवून आधी इकडे ये बघू"
"आलेच. दोन मिनिटांत येते" म्हणून खरोखरंच ती दोन मिनिटांत आली.
"अगं तुझं पत्र आलंय. हे काय आहे? कंपनीचं नेमणूक पत्र आलंय. "
"ओह्, ते होय? अहो पप्पा मी सहज गंमत म्हणून मुलाखत दिली होती. त्यामुळे तुम्हालाही सांगायचे विसरले."
"अगं पण कंपनी खूप चांगली आहे. आणि ही संधी तू गमवू नयेस असे मला वाटते"
दामोदरपंतांच्या तोंडून परवानगीचे हे शब्द ऎकताच तिचा एक क्षण विश्वासच बसेना.
"पप्पाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" म्हणत तिने एकदम दामोदरपंतांना मिठी मारली.
मनातून शलाकाला ही संधी गमावू नये असेच वाटत होते. पण दामोदरपंतांच्या आकस्मिकपणे मिळालेल्या परवानगीने सगळे चित्रच बदलून गेले होते. दामोदरपंतांनी शलाकाची रहाण्याची व्यवस्था नवी-मुंबईलाच त्यांच्या बहीणीकडे केली होती.
आणि बघता बघता शलाकाचे करियर सुरु झाले.
दोन वर्षांत शलाकाने कंपनीत आपले स्थान पक्के तर केले होतेच. पण तिच्या मनमोकळ्या पण घरंदाज स्वभावाने सर्व थरांवरच्या लोकांशी अतिशय चांगले संबंध तिने निर्माण केले होते.अशातच गेल्या एक वर्षापासून कंपनीतील एका इंजिनिअरने, आदित्यने, तिचे लक्ष (खरे तर चित्त)वेधून घेतले होते. आदित्य हा देखील अगदी मनमोकळ्या स्वभावाचा आणि सर्वांना स्वत:चे कामदेखील संभाळून सतत मदत करण्यास तत्पर रहात असे. एक वर्षापूर्वी जेव्हा आदित्यला सर्वोत्कृष्ट नवीन कर्मचा-याचे पारितोषिक जाहीर झाले तेव्हाच शलाकाला त्याचे मनमोकळे आणि प्रसन्न व्यक्तीमत्त्व आवडले होते. पण तिचा त्याच्याशी बोलण्याचा धीर होत नव्हता. तिला असे वाटायचे की त्याला देखील तिच्यात रस आहे. पण हे केवळ वाटणेच असेल तर? असा विचार करुन ती गप्प बसली होती. दरवर्षीप्रमाणे आज पुन्हा कंपनीत समारंभ होता. आणि सर्वोत्कृष्ट कर्मचा-याचे पारितोषिक आदित्यलाच मिळाले. मॅनेजमेंटने त्याला प्रमोशन देऊन शलाकाच्या प्रोजेक्टवर आता रिक्रूट केले होते.
खरे तर शलाकाला मनापासून आनंद झाला होता. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत दोघांची घनिष्ठ मैत्री झाली.
हळू हळू बाहेर भेटणे, फिरायला जाणे या गोष्टी होऊ लागल्या. एवढेच नव्हे तर तो तिला घरीदेखील सोडत असे.
लवकरच शलाकाच्या आत्याच्या कुटुंबालादेखील आदित्यने आपल्या मनमोकळ्या स्वभावाने जिंकले.
आणि ऎके दिवशी आदित्यने तिला गेटवे ऑफ इंडियाला फिरायला नेले. तेथे त्याने तिच्यावरचे प्रेम व्यक्त करुन तिला लग्नासाठी मागणी घातली ती पण एकदम स्पष्ट शब्दात. मला तुला काही सांगायचे आहे वगैरे फाटे न फोडता.
"शलाका! माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न करशील का?"
एक क्षण शलाका बावरुनच गेली. मग लगेच तिच्या गालावर रक्तिमा पसरला. त्यातच तिचा होकार सामावलेला होता.
नंतर बराच वेळ दोघे बोलत होते.
शलाका म्हणाली - "तू केव्हापासून माझ्या मनात भरला होतास. पण तुझ्याशी बोलायची पण भिती वाटत होती."
हसून आदि म्हणाला - "तुला काय वाटतं मी तुझ्या प्रोजेक्टवर कसा रिक्रूट झालो?"
"मी डायरेक्ट आपल्या प्रोजेक्ट मॅनेजरला सांगितले की मला या प्रोजेक्टवर काम करायचे आहे म्हणून.
मी त्यांचा आवडता असल्याने त्यांनीही लगेच सूत्रे हलवून मला इकडे शिफ्ट केले होते."
यावर शलाका थोडीशी लटक्या रागाने म्हणाली- "म्हणजे सगळे तू ठरवून केले होतेस तर"
"आता रागवू नका बाईसाहेब. तुमच्यासाठीच हे सर्व मी केले होते."
आदिने शलाकाला त्याची सगळी माहिती सांगीतली.
आनंदराव पाटील म्हणजे एक हरहुन्नरी व्यक्तीमत्त्व होतं. व्यवसायाने डॉक्टर असलेला हा माणूस कुस्तीचा शौकीन होता.
मूळचे कोल्हापूरचे असल्याने कुस्तीचा वारसा त्यांना उपजतच मिळाला होता. स्वत: आनंदरावांनी त्यांच्या तरूणपणी कोल्हापूरच्या मी मी म्हणणा-या मल्लांना अस्मान दाखवले होते. अर्थातच तो त्यांचा शौक होता, ध्येय नव्हते.
इतिहासाची अतिशय आवड असणा-या आनंदरावांनी घरातील एका खोलीत इतिहासाच्या पुस्तकांचे एक छोटेसे ग्रंथालय पण केले होते. ते पण कमी होते की काय म्हणून त्यांना भटकंती करायची खूप हौस होती. स्वारी दोन तीन महीन्यांतून एकदा तरी भटकंतीसाठी जात असे. अशातच आनंदरावांची बदली मुंबईला झाली. आणि गेले १५ वर्षांपासून ते तिथेच स्थायिक झाले होते.
अशाच एका भटकंतीच्या नादात आनंदरावांचे एका गडावरून खोल दरीत पडून अपघाती निधन झाले होते.
आनंदरावांच्या निधनानंतर मोठे दोन्ही भाऊ बायकांच्या मुठीत असल्याने त्यांनी वेगळी बि-हाडे थाटून आईची सगळी जबाबदारी लहानग्या आदित्यवर टाकली होती. तेव्हापासून आदित्यचाच सावित्रीबाईंना आधार होता.
आदित्य देखील हुशार होता. वयाच्या पंचविसाव्या वर्षीच एका आंतरराष्ट्रीय संगणकप्रणालीच्या कंपनीत नोकरीला लागला होता. अर्थात त्याने खूप कष्ट केले होते. रात्रंदिवस काम आणि अभ्यास दोन्ही केले होते.
हळू हळू एकमेकांच्या सहवासात धुंद होऊन कधी खंडाळा तर कधी एलेफंटा केव्हज् या सफरी होऊ लागल्या.
तरीही दोघे घरंदाज असल्याने त्यांनी प्रेम करताना कुठेही मर्यादा ओलांडली नव्हती.
अशा रितीने प्रेम-प्रकरण फुलल्यानंतर काही महिने मजेत गेले.
नंतर शलाकाच्या आईने शलाकासाठी स्थळ बघण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतल्यावर आपल्या प्रेमवीरांना जाग आली.
शलाकाने आधी आईला एवढी काय घाई आहे असे सांगून टाळायचा प्रयत्न केला होता. पप्पांनादेखील पुढे केले होते.
पण तिच्या आईने या बाबतीत तरी मी तुमचे काही ऎकणार नाही असे सुनावून तो मार्ग बंद केला होता.
त्यामुळे आदि आणि शलाकाला याबाबतीत काय करावे हे सुचेनासे झाले. एक दिवस शलाकाला हिरमुसलेली बघून आत्याने तिला विचारले - "काय गं, काय झालं"
शलाकाच्या आत्याला एव्हाना त्या दोघांचे प्रेमप्रकरण माहीत होते.
आदिचे त्यांच्या घरी येणे-जाणे तर होतेच पण काकू मला भूक लागली आहे काहीतरी खायला द्या असे हक्काने सांगू शकेल असे घरोब्याचे संबंध निर्माण झाले होते. आणि तिचा त्यांना पाठींबादेखील होता.
शलाकाने सगळी हकीगत आत्याला सांगितली.
आत्या म्हणाली - "एवढंच ना? तू अजिबात चिंता करु नकोस.शांतपणे जाऊन झोप बघू.मी बघते काय करायचे ते"
आत्याने मदत केल्याने अनपेक्षितपणे हा मोठा तिढा सहजपणे सुटला होता.
आत्याचे म्हणणे डावलायची हिम्मत दामोदरपंतांच्या घरात कोणातच नव्हती एवढा तिचा दरारा होता.
पण स्वत:च्या मुलीचाच प्रश्न असल्याने सुरुवातीला दामोदरपंतांनी तिच्याशी वाददेखील घातला.
आत्याने त्यांना नीट समजावून सांगितले-"मुलाला मी चांगले ओळखते. आपली शलाका अगदी सुखी राहील त्याच्याबरोबर"
काही झाले तर मला जबाबदार धरा. तुम्हाला हवं तर आधी तुम्ही मुलाला बघा. मगच तुमचे मत सांगा"
दामोदरपंत आपल्या बहिणीला चांगले ओळखून होते.
आपली बहीण एवढ्या खात्रीने हमी देत आहे म्हणजे मुलगा नक्कीच चांगला असणार. भेटून तर बघू असे म्हणून सुरुवात झाली
आणि लवकरच सर्वसंमतीने आदि-शलाकाचे लग्न देखील झाले.
- पुन्हा वर्तमानात...
आदित्यचे लग्न होताच अवघ्या चार महीन्यांत तिने आपल्या वर्तनाने सासूचा पूर्ण विश्वास जिंकला होता.
आता तर तिच्याशिवाय त्यांचे पानदेखील हलत नव्हते.
तेव्हा सावित्रीबाई हसू लागल्या. "तू कधीही असे करणार नाहीस हे मला माहीत आहे.
तूच तर माझी काळजी घेते आहेस.पोटच्या २ मुलांनी मला वा-यावर सोडले तेव्हापासून आदिच माझं सगळं बघायचा.आणि आता तर तू देखील मला काही कष्ट करु देत नाहिस की काही कमी पडू देत नाहीस."
त्यांचं म्हणणं अगदी खरं होतं. आनंदराव जेव्हा अचानकपणे अपघातात गेले तेव्हापासून धाकटा असूनही आदिच आईची सगळी काळजी घ्यायचा.
जेव्हा आदित्यने आईला सांगितले "आई माझे एका मुलीवर प्रेम आहे. आणि तिच्याशी मला लग्न करायचे आहे."
तेव्हा आईने तसे आधी नाक मुरडले होते की आदि स्वत:च्या पसंतीच्या पोरीशी लग्न करणार म्हणून.तेही दुस-या जातीच्या.
शलाका ही देशस्थ ब्राह्मण आणि आदि हा मराठा.
मुलगी उच्च कुलीन असो वा नसो तिला दुसरा समाज सहसा स्वीकारायला तयार होत नाही. तसेच झाले होते.
आदित्य आईवर खूप प्रेम करत होता. त्यामुळे आईची सहमती अत्यावश्यक होती. आदित्य म्हणाला
"आई, तू एकदा शलाकाला बघ तरी. तुला पसंत नाही पडली तर मी नाही तिच्याशी लग्न करणार..."
सावित्रीबाईंनी विचार केला की बघायला काय जातंय? किमान आदिचे मन राखण्यासाठी एवढेतरी आपण करू शकतो. पण आदित्यला शलाकाबद्दल खात्री होती. तेव्हा आईने शलाकाला बघायचे ठरवले तेव्हाच तो मनातून हसला होता.
आणि आदित्यने जेव्हा शलाकाला आईला भेटण्यासाठी घरी आणले तेव्हा मात्र आईच्या कौतुकाला पारावार राहिला नाही.
शलाका हि दिसायलाही गोरीपान, देखणी, हुशार, आणि संगणक तज्ञदेखील होती.
तिच्या घरंदाज वागण्याला बघून सावित्रीबाईंनी मनोमन हे मान्य केले की अशी देखणी, हुशार आणि मोठ्यांना मान देणारी सून आपण काही आदिसाठी शोधू शकणार नाही.
जणू आईच्या चेह-यावरचे हावभाव वाचूनच आदिने आईला विचारले.
"काय आई, नाही म्हणून सांगू का हिला?"
आई एकदम उत्तरली "काहीतरीच काय म्हणतोस आदी? मला पसंत आहे शलाका."
बोलल्यानंतर एकदम सावित्रीबाईंना उमगले की आपण आपला होकार देऊन बसलो आहोत. आदी हसू लागला-
"मला माहीत होते आई म्हणूनच तर तुला आत्ता विचारले. अजुनही तुझी आकस्मिक प्रश्नाने गडबडून जायची सवय काही गेली नाही."
"अरे लबाडा! असा दावा साधलास होय. माझा गैरफायदा घेतोस होय? थांब बघतेच आता"
असे म्हणत सावित्रीबाई आदिमागे धावल्या.
तेवढ्यात शलाकाने त्यांना पडता पडता वाचवले आणि हसत हसत म्हणाली - "आई, आदिला तुम्ही सोडून द्या, तुमचा राग मी शांत करते." असे म्हणून ती आईच्या पाया पडली.
"सुखाने संसार कर हो मुली" असा अवचितपणे त्यांच्या तोंडून शलाकाला आशिर्वाद दिला गेला.
ते पाहून आदि अजूनच जोरजोरात हसू लागला.
आई म्हणाली - "छान, तुम्ही दोघा मुलांनी माझी चांगलीच फिरकी घेतलीत."
— २ —
लवकरच दोघांचा विवाह सोहळा वैदीक पद्धतीने थाटामाटात पार पडला. लग्नाची सगळी आर्थिक बाब आदित्यने स्वत: संभाळली होती. एकाही पै ची मदत कोणाकडून घेतली नव्हती. लग्नानंतर नोकरी सोडायचा निर्णय हा सर्वस्वी शलाकाचाच होता. आणि आईची काळजी घेण्याच्या दृष्टीने तो आवश्यक देखील होता.
लग्नाला दोनच महिने झाले होते आणि आदित्यला कंपनीने तीन महिन्यांसाठी अमेरिकेला पाठवायचे ठरवले होते.
आई म्हणाली - "गृहलक्ष्मी लाभली हो तुला आदि. शलाकाचा पायगुण खूप चांगला आहे."
खरंतर लग्नाला फक्त दोनच महिने झाले होते आणि आदि अमेरिकेला जाणार म्हणून शलाका हिरमुसली झाली होती.
पण भविष्यकाळाच्या दृष्टीने अमेरिकेची वारी करणे आदिला आवश्यक होते. हे शलाका चांगले समजून होती.
शेवटी तीन महीन्यांची ताटातूट आज संपणार होती.
आदिची फ्लाईट रात्री ११.३० वाजता एअरपोर्टवर येणार होती.आणि ती त्याला रिसिव्ह करायला पण जाणार होती.
सकाळपासूनच ती तयारीला लागली होती. आदिच्या आवडीचे पदार्थ करायचे सर्व ताजे सामान तिने बाजारातून आणले होते.
— ३ —
संध्याकाळी साडे आठला तिचा स्वयंपाक झाला होता. आणि आदिसाठी ती थांबणार असल्याने आईला जेवायला देऊन ती नेहमीप्रमाणे टी.व्हीवर आईसोबत बातम्या पाहू लागली.
तोच बातम्यांमध्ये दुबईवरुन येणारे विमान अपघातग्रस्त झाल्याची बातमी तिला बघायला मिळाली. सर्व प्रवासी मरण पावले होते.मृतांच्या नातेवाईकांसाठी विमानतळावर एक हेल्पलाईन काऊंटर उघडले होते.
संबंधितांनी अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष विमानतळावर चौकशी करावी असे आवाहन करण्यात आले होते.शलाकाच्या काळजात तर एकदम् धस्स झाले.लगेच उठून ती म्हणाली "आई मी आत्ताच एअरपोर्टवर जाऊन येते."
एअरपोर्टजवळच एका सिग्नलपाशी तिला सिग्नल सुटलेला दिसला. तेथे ती थांबली असती तर पुन्हा ४-५ मिनिटे गेली असती. तिने तो सिग्नल पकडता यावा म्हणुन जोरात गाडी घातली. तिची गाडी सिग्नल ओलांडून तर गेली पण त्यावेळी लाल दिवा लागलेला होता, त्यामुळे डाव्या बाजूने येणा-या वोल्व्हो गाडीकडे तिचे लक्षच गेले नाही. तिचे सर्व लक्ष आदिची माहीती घेण्याकडे होते. आणि तिला लवकरात लवकर एअरपोर्टवर पोहोचायचे होते.एखाद्या महामार्गावर एक-दोन सेकंदाचे दुर्लक्ष खपूनही गेले असते. पण शहरातल्या रहदारीत अजिबात नाही.याचा व्हायचा तोच परिणाम झाला.
त्या वोल्व्हो गाडीने शलाकाची कार उडवली आणि शलाका रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
— ४ —
पोलिस तेथेच असल्यामुळे त्यांनी शलाकाची पर्स पाहिली तर त्यात त्यांना डॉ.अभिजित देशपांडेंचे कार्ड मिळाले होते.
पोलिसांनी फोनवर शलाकाचे वर्णन सांगताच ते म्हणाले की ती माझ्या परिचयाची आहे. तिला ताबडतोब हिंदुजा रुग्णालयात पाठवा. शलाका रुग्णालयात येईपर्यंत डॉक्टर अभिजीत यांनी ऑपरेशनची सर्व तयारी केली होती तसेच आदिच्या एका मित्राला सांगून आईला देखील रुग्णालयात बोलावून घेतले होते.
आनंदराव सरकारी नोकरीत आरोग्य खात्यात मोठे अधिकारी होते तेव्हाची ही गोष्ट. त्यांनी अभिजीत देशपांडे या हुशार तरुणाला डॉक्टर होण्यासाठी खूप मदत केली होती. आनंदरावांना नेहमीच चांगल्या माणसांची कदर असायची. पैशाअभावी गुणांना वाव मिळत नसेल तर प्रसंगी स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करायचे ते. त्यामुळेच अभिजीत आनंदरावांना खूप मानत असेल. त्यांच्या निधनानंतर देखील तो त्यांचा कुटुंबीयांशी संबंध ठेऊन होता आणि आज त्या उपकारांचा उतराई होण्याची संधी त्याच्यासमोर आलेली होती.
शलाकाला दोन - सव्वा दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर सर्व उपचार करुन तिच्या खोलीत आणण्यात आले.
डॉक्टर अभिजीत आईंना समजावून सांगत होते, पण आईंना अश्रू आवरत नव्हते. तेवढ्यात कोणीतरी डॉक्टरांना सांगितले की C.T. Scan चे रिपोर्टस् तयार आहेत. तेव्हा डॉ. अभिजीत गेले होते.
शलाकाचा मोबाईल आईकडेच होता. तो अचानक वाजू लागला. आईला नवलच वाटले. आईला या सगळ्या धामधुमीत शलाकाच्या आई-वडीलांचा विसरच पडला होता. त्यांना शलाकाच्या अपघाताबद्दल त्या काही सांगू शकल्या नव्हत्या.
कदाचित् त्यांचाच फोन असावा म्हणून आईंनी फोन घेतला.
— ५ —
तो काय आश्चर्य आईंना आदित्यचा आवाज ऎकू आला.
"आई! अगं कुठे आहात तुम्ही? घरी कोणी फोन का नाही उचलत?"
"अरे! तु कुठे आहेस?" सावित्रीबाई एकदम उत्तेजित स्वरात म्हणाल्या
"अगं आई मी आत्ताच एअरपोर्टवर आलोय. माझी अमेरिकेची फ्लाईट उशीरा आली त्यामुळे मला दुस-या फ्लाईटने यावे लागले."
"तू लवकर हिंदुजा ला ये बरं, शलाकाला अपघात झालाय, "
"काय? शलाकाला अपघात? कसा झाला आई" आदित्यचा तो जे ऎकत होता त्यावर विश्वास बसत नव्हता.
"अरे तुझ्या दुबईच्या फ्लाईटला झालेल्या अपघाताची बातमी ऎकून ती लगेच एअरपोर्टवर जायला निघाली अन् वाटेत हे झाले.
तू आधी इकडे ये बरं"
"बरं" म्हणून आदित्यने फोन ठेवला. फोन ठेवताच आदित्य फोनच्या जागीच खाली बसला. तो एकदम सुन्न झाला होता.
काय करावे हे त्याला सुचलेच नाही. १० मिनिटांनी जेव्हा सिक्युरिटी गार्डने विचारले, "भईसाहब क्या चाहिये?" तेव्हा तो भानावर आला आणि लगेच त्याने हिंदुजाकडे धाव घेतली.
इकडे C.T. Scan चे रिपोर्टस् पाहून डॉक्टर अभिजीत आईंशी बोलायला आले.
तोपर्यंत सावित्रीबाईंनी शलाकाच्या वडीलांना फोन करुन कळवले होते. आणि ते लगेच पुण्याहून यायला निघाले होते.
"काकू, मी सगळे रिपोर्टस् पाहिले, गाडीने डाव्या बाजूने ठोकर मारल्यामुळे शलाकाला मुका मारच जास्त लागला आहे.
आणि ब-याच ठिकाणी रक्त आले आहे पण त्या दुखापती फारशा गंभीर नाहियेत.
फक्त डोक्याला झालेली दुखापत मला गंभीर वाटत होती म्हणून मी C.T. Scan केले होते.
पण ते रिपोर्टस् देखील एकदम Normal आहेत. मला अजूनही कळत नाहिये की, ती कोमात का गेली आहे"
"काय कोमात?" आई एकदम घाबरुन उद्गारल्या.
"होय कोमात. शलाकाला आदित्यच्या जाण्याचा एकदम मानसिक धक्का बसला आहे, त्यामुळे..."
डॉक्टर अभिजीत यांचे बोलणे आई तोडत मधेच म्हणाल्या.
"पण आदि जिवंत आहे अभिजीत, आत्ताच त्याचा फोन आला होता मला.तो इथेच येतोय"
"मग तर खूप चांगलं झालं. आता आदित्य आल्यावर शलाकाला आपण कोमातून बाहेर आणायचा प्रयत्न करु
आदि आल्यावर डॉ. अभिजीत त्याला म्हणाले - "शलाकाचे सर्व रिपोर्टस् एकदम Normal आहेत. पण शलाका आत्ता कोमात आहे. तिचे डोळे उघडे आहेत, पण त्यांत संवेदना नाहिये आदि."
तू येतोय ही बातमीदेखीला आईंनी शलाकाला सांगितली तरी तिची पापणीदेखील हलली नाही.
आदित्य म्हणाला- "काका मला आधी शलाकाला पहायचंय"
— शेवट —
डॉक्टर त्याला घेऊन शलाकाच्या रुमपाशी आले.
आदित्यला पाहताच आई त्याला बिलगून एकदम स्फुंदून रडायला लागली.
"आदी असं कसं रे झालं हे?" आदिच्या डोळ्यांतून पण अश्रू वहात होते.
पण लवकरच त्याने स्वत:ला आणि आईलादेखील सावरले. आदित्य शलाकापाशी बसला.
तिला हाक मारली."शलाका.....अगं ऎकलस का?"
अगं.... तुझा आदी आलाय...बघ ना माझ्याकडे....
तरीही शलाकाचा प्रतिसाद आला नाही. आदित्यचा कंठ दाटून आला.
तो तिचा हात हातात घेऊन रडू लागला.
एवढा वेळ आवरलेले अश्रू आता अविरत वहात होते.
तेवढ्यात शलाकाचा हात थरथरु लागल्याची जाणीव त्याला झाली. दुसरा हात तिने आदिच्या डोक्यावर ठेवला.
आदिने पाहिले तर शलाका त्याच्याकडे बघून मंदपणे हसण्याचा प्रयत्न करत होती.
डॉक्टर अभिजीत एकदम आनंदाने म्हणाले की "अरे वा....अभिनंदन आदित्य, शलाका कोमातून बाहेर आली. तुझ्या स्पर्शानेच तिला कळाले की तू आला आहेस म्हणून.खरंच स्पर्शात खूप शक्ती असते. कधी कधी आपल्याला बाह्य गोष्टी दिसत नाहित पण स्पर्शाची भाषा मात्र नक्की कळते." यावर शलाकाने हलकेच स्मित केले.
जणू आदिच्या स्पर्शानेच तिला पुनर्जीवन मिळाले होते
तेवढ्यात पुन्हा डॉक्टरांचा आवाज ऎकू आला.
आणि बरं का? या सगळ्या गोंधळात मी एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरलो होतो. ती आता सांगतो.
एक गोड मुलगी आई होणार आहे बरं.
"काय?" आ वासून आदित्य आणि आई डॉक्टरांकडे पाहू लागली.
हे खरं होतं की आईला आणि शलाकाला देखील लहान मुले खूप आवडत असल्याने पहिल्या बाळाच्या बाबतीत प्लॅनिंगच्या भानगडीत पडायचे नाही असे आदी आणि शलाकाने ठरवले होते. पण लगेच देव आपल्या पदरी हे दान देईल असे दोघांनाही अपेक्षित नव्हते.
आई लगेच म्हणाली - "बघ हो आदि, मुलाचा पायगुण चांगला आहे. बेट्याने जन्माला येण्याआधीच आपल्या आईला वाचवले."
आईचे हे बोल ऎकताच शलाका आणि आदिच्या ओठांवर हसू उमटले.
लवकरच सकाळपर्यंत शलाकाचे आई-वडील तिच्या आत्याला घेऊन आले.
तेथे येताच त्यांना नातू होणार असल्याची बातमी मिळाली.
दामोदरपंत सावित्रीबाईंना म्हणाले - "अहो केवढे घाबरवून टाकले तुम्ही आम्हाला? आणि येथे बघतो तर काय?
आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे"
दामोदरपंतांची ही अस्सल पुणेरी फोडणी ऎकून सगळेच जण हसू लागले...
• • • समाप्त • • •
- सागर
© 2006-2009, सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.
या कथेतील कोणताही भाग किंवा कोणतीही कल्पना कोणत्याही कारणासाठी वापरण्यासाठी लेखकाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे
प्रतिक्रिया
30 Aug 2009 - 4:29 pm | प्रसन्न केसकर
लिहिली आहे कथा तुम्ही. एव्हढेच म्हणतो.
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
30 Aug 2009 - 4:53 pm | कानडाऊ योगेशु
बघ हो आदि, मुलाचा पायगुण चांगला आहे. बेट्याने जन्माला येण्याआधीच आपल्या आईला वाचवले
हे काहीतरी वेगळे वाचायला मिळाले.(नाहीतर मुला/ली च्या पायगुणाने आई जाणे आणि पुढे कथाभर/चित्रपटभर त्या मुला/ली ला सख्ख्या नातेवाईकांकडुन सावत्र वागणुक मिळणे हेच परिचयाचे आहे.)
बाकी कथा वाचनीय.
प्रारंभ,थोडेसे मागे,शेवट असे कथाभाग करुन कथा लिहायची तुमची एक वेगळीच अनौपचारिक शैली तयार होत आहे. लगे रहो..
31 Aug 2009 - 1:23 pm | सागर
पुनेरी आणि योगेशभाऊ दोघांनाही धन्यवाद ...
आधीच्या सूड या कथेच्या तुलनेत ह्या कथेवर इतर वाचकांचे सविस्तर अभिप्राय नाही मिळालेत. पण वाचनसंख्या थोडा दिलासा देऊन गेली.
असो...
अभिप्राय देणार्या आणि न देणार्या वाचकांचे मनापासून आभार
आता थोडी गॅप घेईन म्हणतो कथा लेखनासाठी ...
- सागर
31 Aug 2009 - 2:36 pm | पक्या
लेखन शैली छान वाटली. कथा ही छान आहे. पण कोम्यात गेलेला पेशंट हातात हात घेतल की लगेचच शुध्दिवर आला हे जरा पचनी पडलं नाही.
31 Aug 2009 - 4:35 pm | सागर
पक्याभाऊ
कोमा म्हणजे तात्पुरती शुद्ध हरपणे असते. बर्याच वेळा मानसिक धक्क्यामुळेच माणूस कोमात जातो. मग कोमातील व्यक्ती १ तासात शुद्धीवर येते कधी १० वर्षांनी पण शुद्धीवर येते किंवा कधी येतही नाही.
प्रस्तुत कथेत कथानायकाचा विरह हा नायिकेच्या कोमास कारणीभूत ठरला आहे. आणि त्याचाच स्पर्श नायिकेला जाणवला तर कोमातून बाहेर येण्यास सबळ कारण आहेच.
अशा केसेस मेडिकल सायन्स मधे घडलेल्या आहेत. अर्थात तो माझा विषय नाही. जाणकार कदाचित अधिक माहिती देऊ शकतील.
तेव्हा ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो त्या व्यक्तीचा स्पर्श माणसाला कोणत्याही परिस्थितीतून बाहेर आणू शकतो आणि प्रेमाची शक्ती महान आहे एवढेच या कथेतून दर्शवायचे आहे :)
धन्यवाद
सागर
31 Aug 2009 - 4:23 pm | विशाल कुलकर्णी
छान कथा ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
31 Aug 2009 - 4:37 pm | सूहास (not verified)
सू हा स...
31 Aug 2009 - 6:03 pm | ऋषिकेश
कथा ठिक वाटली.
कथाविषय नेहमीचाच असल्याने नाविन्याची उणीव जाणवली.. शेवट अचानक गुंडाळाल्या सारखा वाटला.
काळ मागे पुढे करण्याची पद्धत आवडली, मात्र वर तसे लिहायची गरज होती असे वाटत नाहि.
शैली मात्र थोड्या जुन्या काळच्या लेखकांसारखी :) .. एकदम सातव्या/आठव्या दशकांतील दिवाळी अंकातील कथा वाचतोय असा भास झाला..
ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ६ वाजून ०२ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "होटोंसे छु लो तुम...."
31 Aug 2009 - 6:32 pm | अनामिक
सागर.. छान लिहिली आहेस कथा.
-अनामिक
31 Aug 2009 - 7:38 pm | प्राजु
आपली लेखन शैली चांगली आहे. मात्र कथा तीच ती आहे..
कित्येक सिनेमातून, मालिकांतून.. हे कथा बीज वापरलं गेलं आहे. ऋषी म्हणतो त्याप्रमाणे नाविन्याची उणिव जाणवली नक्कीच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/