नमस्कार रसिक वाचकहो,
माझ्या "सूड्"कथेचा दुसरा भाग देण्यास थोडा विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व.
पहिल्या भागाला मिळालेल्या वाचकांच्या प्रतिक्रियांमुळे मी कथानकात मूळ ढाचा न बदलता थोडेफार फेरबदल केले आहेत, ते कितपत यशस्वी झाले आहेत ते वाचकांवरच सोपवतो. माझ्या "सूड" या कथेचा दुसरा आणि अंतिम भाग देताना आनंद होत आहे.
तुम्हा सर्वांच्या अभिप्रायाची अपेक्षा आहे.
भाग १ येथे पहा
संपूर्ण कथा पीडीएफ स्वरुपात वाचण्यासाठी PDF येथे क्लिक करा.
धन्यवाद
सागर
******************************
सूड (कथा) - भाग - २
******************************
मे १९९५
आजच परिक्षा संपली. रिझल्ट लागून मी पास झालो की पदवीधर होईन. सूड घेण्याची वेळ आता आली होती. ह्याच सुट्टीत मी एक इलेक्ट्रॉनिक उपकरण तयार करणार होतो. तसा तो शोध माझाच म्हटला तरी चालेल. मी अनेक वेगवेगळे पार्टस एकत्र करुन ते उपकरण तयार करणार होतो.
मी सूड घेण्याच्या इर्ष्येने पेटून पाच वर्षे पूर्ण झाली होती. गेल्या तीन वर्षांत मी आता कोणतीही गाडी दुरुस्त करता येईल असा आत्मविश्वास मिळवला होता. परिक्षा जवळ आल्यामुळे मी मेहेंदळेंना सांगून गॅरेजमधून सुट्टी घेतली होती. परिक्षेनंतर २ महिने गावाला जाणार आहे असेही सांगितले होते. हे २ महिने मी पूर्णपणे स्वत:चा सूड घेण्यासाठी वापरणार होतो.. आता मी इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानात सकाळी नऊ ते रात्री नऊ असा सलग १२ तास काम करायचो. मधे जेवणासाठी तासभर सुट्टी घेऊन घरी यायचो तेवढाच काय तो ब्रेक. माझ्या दुकानाचा मालक एक मुसलमान होता. दर शुक्रवारी माझा मालक काही दुकानात यायचा नाही. तेव्हा दुकान पूर्णपणे माझ्यात हातात असायचे. मी जाणून-बुजूनच असे दुकान निवडले होते की जिथे मला माझ्या प्रयोगांना वाव मिळेन. मात्र माझा मालक हुशार होता यात काही वाद नाही. त्याचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करायचे व दुरुस्त करण्याचे कौशल्य मान्य केलेच पाहिजे. त्यांच्या घरातला टी.व्ही. आणि टेपरेकॉर्डर (होय त्यावेळी सीडी प्लेयरची क्रेझ नव्हती.) त्याने स्वत: तयार केलेला होता.
मी एक रिमोट कंट्रोल तयार करणार होतो. आणि स्प्रिंगच्या आधाराने दोन धारदार पण छोटीशी पाती असलेली इलेक्ट्रॉनिक कात्री तयार करणार होतो...माझ्या हातातील रिमोटचे बटन दाबल्यावर स्प्रिंगला सेलची पावर मिळून झटका बसणार होता. त्यामुळे दोन पात्यांच्या मधे येणारी कोणतीही वस्तू झटकन कापली जाणार होती. माझ्या या वस्तू तयार करण्यासाठी काय काय लागेल हे मी आधीच माहिती करुन घेतले होते. त्याप्रमाणे मी वेगवेगळ्या क्षमतेचे रेझिस्टर्स , डायोड्स , स्प्रिंग्ज वगैरे सर्व साहित्य घरी आणून ठेवत होतो. बरेचसे साहित्य मी काम करत असलेल्या दुकानातूनच आणत होतो.
पहिल्या शुक्रवारी मी रिमोट कंट्रोलचं सर्किट तयार करणार होतो. त्यासाठी लागणारी तांब्याची तार, एंटेना, एक छोटासा इलेक्ट्रिक चिप-बोर्ड व इतर वस्तू माझ्याकडे होत्या.सोल्डरगन मी दुकानातलीच वापरणार होतो.दुसर्या शुक्रवारी मी इलेक्ट्रीक कात्री तयार करणार होतो. आणि तिसर्या शुक्रवारी मी स्प्रिंग व सेल कात्रीला जोडून रिमोट वर चालते का नाही ते टेस्ट करणार होतो. साधारणपणे सविता चालवण्यार्या गाडीचे ब्रेक फ़ेल करुन तिला अपघाताने मारायचा माझा विचार होता.
+ + +
जुलै १९९५
माझे सर्व काम पूर्ण झाले होते.
आता फ़क्त मी माझी योजना अंमलात आणायचेच तेवढे बाकी होते. मी दहावीच्या त्या प्रसंगानंतर सविताची माहिती तुम्हाला सांगितलीच नाही का? ... आता सांगतो...
मी बारावीत गेलो तेव्हा ती अकरावीत होती. माझ्यासारख्या निष्पाप जीवाला फ़सवल्याची शिक्षा म्हणूनच की काय देवाने तिला दहावीत नापास केले अशी मी माझी समजूत करुन घेतली होती. तर मी बारावी झाल्यानंतर मला सारसबागेत एकदा ती दिसली होती. यावेळी तिच्याबरोबर एक वेगळाच पण हॅंड्सम तरुण होता. अजून दोन वर्षांनंतर मला कळाले की तिचा साखरपुढा झालाय. तेव्हा मी बी.कॉमच्या शेवटच्या वर्षाला होतो. तिचा साखरपुडा जानेवारीत झाला होता. माझी परिक्षा संपल्यावर मी मोकळा झालो होतो, तेव्हा सविताची मी माहिती काढली तर कळाले की तिनं लव्ह?-मॅरेज केले आहे आणि ती पुण्यातच आहे. तिचा नवरा तिच्यापेक्षा सात वर्षांनी मोठा होता पण श्रीमंत होता बर्यापैकी. सवितानं पैसा पाहूनच लग्न केले असणार याची मला खात्री होती. ती नवर्याबरोबर कोथरुडला फ़्लॅट संस्कृतीचा प्रभाव असलेल्या ठिकाणी रहात होती. ही गोष्ट माझ्या पथ्यावरच पडणार होती. कारण फ़्लॅट संस्कृतीतील लोक आपलं घर सोडून फ़ार कोणाशी विशेष संपर्क ठेवत नाहीत. शेवटी मी सवितावर लक्ष ठेवण्याचं ठरवलं.
मी भल्या सकाळीच बाहेर पडायचो. सकाळी सात वाजता सविता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडायची. मस्त फ़्रेश दिसायची ती. लिपस्टीक, पावडर लावून सविताचे मॉर्निंग वॉकला जाणे काही केल्या मला पटत नव्हते. तिचं हे मॉर्निंग वॉक म्हणजे नक्की काय? हे मला लगेच कळाले. सविता तेथून जवळच असलेल्या सुमार दर्जाच्या लॉजच्या एका रुम मधे जायची. आणि साधारणपणे आठ-साडे आठच्या सुमारास एखादी मिळत नसलेली गोष्ट मिळाल्याचा आनंद चेहर्यावर घेऊन ती एका बलदंड तरुणाच्या मागोमाग बाहेर पडायची.
सदाशिव पांढरे, सविताचा नवरा, त्याची कुठलीशी फ़र्निचरच्या कामाची फ़र्म होती. असली व्याभिचारी बायको त्याला मिळाली म्हणून मला तिच्या नवर्यासाठी खरेच वाईट वाटले होते. म्हणून मी त्यांना भेटून सविता कशी आहे ते सांगायला एका निवांत दुपारी त्यांच्या फ़र्मवर गेलो. फ़र्मचे शटर ओढलेले होते म्हणून सहज कोपर्यातल्या अर्धवट उघड्या असलेल्या खिडकीतून नजर टाकली तर तिथे मला भलतेच बघायला मिळाले. सदाशिवराव एका तरूण मुलीच्या शरीराचा उपभोग घेत होते. ती मुलगी नाराज दिसत होती पण चेहर्यावर नाईलाजाचे भाव दिसत होते. म्हटले आता पांढरे महाशयांवरदेखील लक्ष ठेवणे आले. आणि लक्ष ठेवून काढलेल्या सगळ्या माहितीने मला हादरवून सोडले.
तेथे अकाऊंटंट म्हणून काम करणार्या दोन गरीब मुली होत्या. हा हरामखोर पैशाच्या बळावर त्या दोन पोरींची शरीरे उपभोगायचा. मला त्या दोन गरीब मुलींविषयी खूप सहानुभूती वाटत होती कारण दोन्ही मुलींना वडील नव्हते आणि घर चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती. केवळ पैशासाठी त्या दोन गरीब पोरींना आपल्या शरीराचा नैवेद्य पांढरे महाशयांना द्यायला लागत होता. संतापाची एक तिडीक डोक्यात आली. मी काही समाज सुधारण्याचा मक्ता नाही घेतला. पण समोर अन्याय होत आहे एवढे स्पष्ट दिसत असतानाही मी स्वस्थ बसणे अशक्य होते. गरीबीचा फ़ायदा घेऊन त्या दोन पोरींची शरीरे उपभोगणार्या नराधमाला जगात राहण्याचा काहीच अधिकार नाही असे माझे मत झाले होते. सविता एक व्याभिचारिणी आणि तिचा नवराही तसाच भ्रमर वृत्तीचा. दोघांनाही एकाच वेळी नरकाचे द्वार दाखवण्याचे मी ठरवले. मनात हिशोब केला – एकाच्या जागी दोन एवढाच फ़रक. शिवाय त्या गरीब मुलींचे लाचार झालेले निष्पाप चेहरेही माझ्या डोळ्यांसमोर तरळत होतेच.
+ + +
१५ ऑगस्ट १९९५
आज देशाचा स्वातंत्र्यदिन. स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी हे सत्कृत्य करताना मनाला खूप समाधान वाटत होते. दोघे नवरा बायको सिंहगडावर त्यांच्या कार मधून ट्रिपला जाणार होते. काल संध्याकाळी ते एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते आणि त्यांच्या बोलण्यातूनच हे मला कळाले होते. मला आपला हा सूड पूर्ण करण्याची संधी एवढ्या लवकर मिळेल असे अजिबात वाटले नव्हते. मी भल्या पहाटेच उठून त्यांच्या फ़्लॅट पाशी आलो होतो. सावधपणे मी पार्किंग प्लेसमध्ये उभ्या असलेल्या त्यांच्या मारुती व्हॅनजवळ गेलो. आवाज न करता मी गाडीच्या खाली गेलो आणि स्वत:च्या कमरेस लावलेला टॉर्च हातात घेतला. टॉर्च छोटासाच होता पण माझ्या कामास पुरेसा होता. मी गाडीच्या ब्रेक वायर्सना माझी इलेक्ट्रॉनिक कात्री लावली. गाडीखालून बाहेर आलो तर कुठलसं एक कुत्रं मालकाला आपली इमानदारी दिसावी म्हणून माझ्यावर भुंकत आलं. मी त्याला दगड फ़ेकून मारला तसं केकाटत पळून गेलं. मग मी ही घरी आलो.
+ + +
सकाळचे साडेनऊ वाजत आले होते. मी खडकवासला धरणाच्या पाण्यात पोहत बसलो होतो. खरं तर मी पोहत नव्हतो. माझं सगळं लक्ष सिंहगड रोडवरुन येणार्या नेपच्यून ब्लू कलरच्या मारुती व्हॅन कडे लागलं होतं. पांढर्याची कार निळी हा एक विनोदच होता. आधी सविता नवर्याबरोबर वाटेतल्या एका हॉलिडे रिसॉर्ट वर जाणार होते. साधारण दहाच्या सुमारास नेपच्यून ब्लू कलरची मारुती व्हॅन सिंहगडाकडे जाताना मला दिसली आणि माझी शिकार आलीय हे मी लगेच ओळखले. सविताचा नवरा गाडी चालवत होता आणि सविता त्याच्या बाजूलाच बसली होती. त्यांनी बरोबर दुसर्या कोणाला आणले नव्हते हे बरेच झाले. कारण पापी लोकांपायी दुसर्या कोणाचा जीव जावा हे माझ्या मनाला पटले नसते. माझी शिकार सिंहगडावर त्यांच्या आयुष्यातला शेवटचा आनंदोत्सव साजरा करायला गेली आणि मी अगदी शांत चित्ताने पोहत बसलो. साधारणपणे पावणे बाराच्या सुमारास मी पाण्याबाहेर आलो. कपडे घालून मी माझ्या सायकलवरुन सिंहगडाकडे कूच केले तेव्हा माझ्या घड्याळात बरोबर बारा वाजले होते. सविता आणि सदाशिव पांढरे यांचेही बारा लवकरच वाजणार होते.
सिंहगडावर जाण्यासाठी दोन रस्त आहेत. एक रस्ता थेट पायथ्यापाशी जातो. हा रस्ता गिर्यारोहणाची आणि दुर्गभ्रमणाची आवड असणारे हौशी पर्यटक वापरतात. आणि दुसरा रस्ता थेट गडावर जातो जो फ़क्त सिंहगडाला एक सहलीचे ठिकाण मानणार्या लोकांनाच आवडतो. अर्थातच मी थेट सिंहगडावर जाणार्या रस्त्याची निवड केली. अगदी रमत गमत एका हातात सायकल घेऊन मी चालत होतो. मला हव्या त्या ठिकाणी पोहोचायला मला दुपारचे तीन वाजले होते. बरोबर खाण्यासाठी मी डबा आणि पाणी बरोबरच्या पिशवीत आणलेले होते. शिवाय चालून चालून मी पण बराच दमलो होतो. त्यामुळे दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर पहिला मी पोटोबा केला. वाट पाहण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता.
+ + +
बसल्या बसल्या एखादा चित्रपट पहिल्यापासून सुरु होतो तशा भूतकाळातील सर्व घटना माझ्या डोळ्यांपुढून तरळू लागल्या. सविताने शाळेत सर्वांसमोर माझा जोकर केल्यानंतर दोन आठवडे माझा अगदी देवदास झाला होता... शेवटी तिला एकदा गाठायचे ठरवून मी तिच्या घरावर लक्ष ठेवताना एक दिवस ती कुठेतरी खरेदीसाठी म्हणून बाहेर पडताना दिसली. तिचा पाठलाग करत घरापासून पुरेशा लांब अंतरावर आल्यावर मी तिला गाठले. तसे सवितावर लक्ष ठेवण्याची आयडिया माझ्या डोक्यात या प्रसंगा नंतरच आली. माणुसकीच्या नात्याने विचार केला तर प्रेमभंगाच्या चुकीसाठी आपण एका व्यक्तीचे आयुष्य संपवणे काही योग्य नव्हे हे मलाही पटत होते. माणुसकी का सूड असे द्वंद्व मनात सतत चालू होते. मनाने सविताला एक संधी देण्याचे ठरवले. प्रेमात माणूस खूप आशावादी असतो हेच खरे. कदाचित तिला आपली चूक उमगेल आणि पुन्हा माझ्या प्रेमाचा स्वीकार करेन अशी मला एक वेडी आशा होती.
पण नाही....शेवटी विश्वासघातामुळे माझ्या मेंदूत धावत असलेल्या गरम रक्ताचाच विजय झाला.
झाल्या प्रकाराचा नाही म्हटले तरी मला खूप रागच आलेला होता. भावनेच्या भरात मी माझ्या प्रेमभंगाचा सूड घेण्याचा प्रण करुन बसलो होतो. तसा मी शांत डोक्याचा, पण पहिले प्रेम हे खूप नाजूक असते. आणि मला ज्या वयात पहिल्या प्रेमाचे हे फ़ळ चाखावयास मिळाले ते वयही तसे कोवळेच होते. सविताला सर्वस्व समजून मी मनाने तिच्यात पूर्णपणे गुंतलो होतो. पहिल्या प्रेमात बसणार्या विश्वासघाताचा फ़टका एवढा जबरदस्त होता की मी आतून पार कोलमडूनच गेलो होतो. आज सविताला याचा जाब विचारायचाच असे ठरवून तिला मी गाठले होते.
“सविता असे तू का केलेस? माझ्या प्रेमात काय कमी होती?”
“ए येड्या ...आलास का माझ्यामागे परत?... चल फ़ुट इथून मला त्रास देऊ नकोस.” सविता वैतागून म्हणाली.
“तुझ्याशिवाय जगण्याची कल्पना पण मला सहन होत नाही सविता. माझे प्रेम तुला का नको याचे मला तू उत्तर दिलेच पाहिजेस. माझे प्रेम हे काही एकतर्फ़ी नव्हते... ते आपले प्रेम होते...त्यात...”
माझे बोलणे अर्धवट तोडत ती म्हणाली – “ ए भुक्कड ... तुझ्या अजून लक्षात नाही का आले? मुलांना खेळवणे हा माझा छंद आहे... मुलांनी माझ्या मागे लागलेले मला फ़ार आवडते. मग तुला काय वाटते याच्याशी मला काहीही देणं-घेणं नाही. यापुढे परत मला तुझं माकड थोबाड दाखवू नकोस”
मला फ़टकारुन सविता पुढे चालू लागली. एखाद्याला फ़सवणे वेगळे. पण फ़सवून मिजासीने तोंडावर सांगितलेले ऐकणे जास्त क्लेशदायक असते. माझ्या कपाळावरची शीर तडतड उडू लागली. रागाने मनावरचा ताबा जाऊ लागला. माझ्या खर्या प्रेमाचा अपमान मला अजिबात सहन झाला नाही.... आधी सविताने माझ्या थोबाडीत मारली होती तेव्हा अविचाराने मी ठरवले होते तिला धडा शिकवण्याचा...पण आता मात्र असह्य झाले होते. माझा आधीचा माणुसकीच्या दुविधेत सापडलेला विचार आता ठाम झाला होता...रागाच्या भरातच मी ओरडलो...
“सविता यापुढे एकदाच तुला माझे हे थोबाड दाखवेन... तेव्हा तुला पश्चाताप होईन ... नक्कीच होईन... पण तेव्हा वेळ गेलेली असेन एवढे लक्षात ठेव...” असे बोलून मी तेथून घरी निघून आलो आणि सूडाच्या तयारीला लागलो.
+ + +
हा प्रसंग आठवून माझे डोळे पाणावले होते पण ह्या आठवणीमुळेच माझी सूड घेण्याची इच्छादेखील तेवढीच प्रबळ झाली. मी पूर्ण तयारीत होतो. साडेपाच वाजता सदाशिवराव पांढरेंची मारुती व्हॅन खाली येताना दिसली. मी त्या महत्त्वाच्या यू टर्न वर उभा राहून त्यांचीच वाट पहात होतो. मी दोघांकडे एक नजर टाकली. दोघंही एकमेकांच्या अंगाशी झटे घेत आणि खिदळत होते. गाडी जरा कमी गतीने येत होती. मी केलेली कृती समजण्यासाठी आधी मी उभा असलेल्या स्थळाचे नीट वर्णन करणे आवश्यक आहे. सिंहगडावरुन खाली येण्यासाठी रस्ता सुरु झाला की चार पाच वळणांनंतर एक मोठा यू टर्न आहे. त्या स्पॉटला गाडी अगदी संथ गतीने न्यावी लागते. वेगात येणारी गाडी खोल दरीत कोसळल्याशिवाय राहिली नसती. कारण यू टर्न आधीचा रस्ता बराच उताराचा होता. तो उतार ब्रेक नसलेल्या गाडीला दरीत भिरकावून देण्याइतकी गती देण्यास पुरेसा होता.
गाडी जवळ आली. शेवटचे वळण घेऊन गाडी उताराला लागताच मी माझ्याकडच्या रिमोटचे बटन दाबले आणि मी गाडीच्या दिशेने चालू लागलो. रस्त्यावर पडलेली इलेक्ट्रिक कात्री उचलून मी खिशात टाकली. हो मला कोणताही पुरावा ठेवायचा नव्हता, म्हणून तर ही मेहनत घेतली होती. त्या दोन पापींच्या खुनाने जरी माझे हात बरबटणार असले तरी त्यांच्या संपणार्या आयुष्याबरोबर माझ्या आयुष्याची माती करण्यास मी तयार नव्हतो. मला तोपर्यंत गेली पाच वर्षे प्रतिक्षा करत असलेली सविताची किंकाळी ऐकू आली. मी धावत मागे वळून त्या यू टर्न पर्यंत गेलो. गाडी आपटत खाली जात होती आणि अचानक गाडीचा मोठा स्फ़ोट झाला. बहुतेक पेट्रोल ची टाकी एखाद्या दगडावर आपटून फ़ुटली असावी.
आणि हो एक सांगायचे राहिलेच. मी व्हॅनच्या दिशेने जाताना सविताला माझा चेहरा दाखवला होता. मला बघताच प्रचंड घाबरल्याचे भाव तिच्या चेहर्यावर मला एकदम स्पष्ट दिसले होते. त्यामुळे तर मला माझा सूड पूर्ण झाल्याचे मोठे समाधान मिळाले होते.
“सिंहगडावरुन मारुती व्हॅन खोल दरीत कोसळून एक नव-विवाहित दांपत्य निधन पावले” अशा आशयाची बातमी दुसर्या दिवशी सर्व वर्तमानपत्रांत झळकली होती. रोजच्याप्रमाणेच ही अपघाताची एक बातमी होती. इतरांनी तिला महत्त्व देण्याचे काहीच कारण नव्हते. पण माझ्या दृष्टीने मात्र त्या बातमीचे महत्त्व काही औरच होते. पाच वर्षांच्या खडतर कष्टाचे फ़ळ मला मिळाले होते. बातमी वाचून मोठमोठ्याने मी हसत होतो. पाच वर्षांनंतर प्रथमच मी एवढा मनसोक्त हसलो असेन.
(संपूर्ण)
सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती आहे की, माझ्या कथा तुम्ही तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पाठवू शकता वा तुमच्या संगणकावर साठवून ठेवू शकता. मात्र त्यासंबंधित कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी वा तत्सम व्यवहारासाठी माझी परवानगी आवश्यक आहे.
धन्यवाद,
सागर भंडारे
प्रतिक्रिया
27 Aug 2009 - 1:45 pm | कानडाऊ योगेशु
काहीतरी ट्विस्ट असेल ह्या संभ्रमातच कथा वाचुन काढली.
साधी सरळ सूडकथा आहे.(काहीही ट्विस्ट नसणे हा ही एक ट्विस्ट असु शकतो का?)..
पण लेखनशैली खिळविणारी आहे हे नक्की.
असो.
पु.ले.शु.
आणि
इश्वर मृतात्म्यांना शांती देवो..!!!!
27 Aug 2009 - 2:21 pm | सूहास (not verified)
जे आहे...जस आहे...तसे...
ही लेखन शैली आवडली...
<<<<काहीतरी ट्विस्ट असेल ह्या संभ्रमातच कथा वाचुन काढली.
साधी सरळ सूडकथा आहे.(काहीही ट्विस्ट नसणे हा ही एक ट्विस्ट असु शकतो का?)..>>>>
योगेशभाऊ , मला असे काही वाटले नाही...(सागर, जरा सुशी ची , शिरीष कणेकरांची, नारायण धारपांची अजुन दोन-चार पुस्तके कोळुन पी बर म्हणजे त्यांच्या शैलीत तुला लिहीता येईल आणी आमच्या योगेशदादांना आवडेल.. )
सू हा स...
27 Aug 2009 - 2:26 pm | प्रभो
सागर्....छानच आहे रे....असंच लिहीत रहा भौ...
पण खरं सांगू तर अजुन एखादा 'क्रमशः' टाकून मज्जा वढवता आली असती.
पहिल्या भागाच्या प्रतिक्रियांचा विचार पण केला आहेस छान...
27 Aug 2009 - 4:13 pm | दशानन
असेच म्हणतो...
मस्त लिहले आहे.... क्रमश: चा वापर करुन तुम्ही अजून लज्जत वाढवू शकला असता हे नक्की :)
मस्त भट्टी जमली आहे कथेची... आवडली !
27 Aug 2009 - 3:22 pm | अश्विनि३३७९
प्रतिक्षेतच होते मी ... वाचताना खूप मजा आली..
आसेच लिहित रहाणे..
27 Aug 2009 - 3:33 pm | येडा अण्णा
एकदम झकास! पण थोडा ट्विस्ट असता म्हणजे अजून मजा आली असती.
27 Aug 2009 - 3:36 pm | योगी९००
सागर शेठ.. मस्त कथा ...लेखनशैली छानच...
एकच गोष्ट खटकली..कारचे ब्रेक्स असे वायर्स कापून फेल होतात हे पटत नाही. (त्या वायर्स बहूतेक ब्रेक लाईट च्या असतात). त्यापेक्षा brake fluid गळती सुरू करण्याचे उपकरण बनवून ब्रेक्स निकामी केले असे जास्त realistic वाटले असते.
अशा आणखी कथा आवडतील. (तुमचे संकेतस्थळ सुद्धा छान आहे. त्यावरील चंद्रगुप्त कथा तर मस्तच..)
(वरचा योगेश मी नाही..मी दुसरा योगेश)
खादाडमाऊ
27 Aug 2009 - 5:52 pm | सागर
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद
कथेत अजून काय काय ट्विस्ट (टविस्ट असा का दिसतोय?) देता आला असता याबद्दल वाचकांनीच आयडीया दिल्यात तर मजा येईन... कदाचित या ट्विस्टच्या कल्पना वापरुन एखादी नवीन कथा सुचेन...
खादाडमाऊ , तुम्ही कदाचित कार क्षेत्रातील तज्ञ असाल. मला तितकीशी सखोल माहिती नाहिये.. पण मारुती (ओमनी) व्हॅनच्या ब्रेक वायर्स कापता येतात अशी माहिती मिळाल्यामुळे आणि सोपी वाटल्यामुळे ही कन्सेप्ट वापरली :)
चूकभूल द्यावी - घ्यावी
अवांतरः
(वरचा योगेश मी नाही..मी दुसरा योगेश)
खादाडमाऊंचे खरे नाव कळाले या निमित्ताने ;)
पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद
- सागर
27 Aug 2009 - 7:13 pm | अनामिक
सागर... चांगली लिहिली आहेस कथा.
प्रेमभंगामुळे अश्या प्रकारचा सुड घेण्यापर्यंत मजल जाऊ शकते का असे क्षणभर वाटले, परंतु मुलीने नकार दिला म्हणून चेहर्यावर अॅसीड फेकणारे तरूणही आहेतच... तेव्हा माझी शंका रास्त नाही हे जाणवले. तरीही अशी सुडभावना अंगी जोपासली जाणे आणि ति पुर्णत्वास नेणे कथानायकाची विकृती दर्शवते.
-अनामिक
27 Aug 2009 - 11:56 pm | प्राजु
लेखन शैली चांगली आहे.. मात्र कथा तितकीशी भावली नाही. बरेचसे लूप्स ओपन आहेत.
एक तर कोणी मुलगी, "ए भुक्कड ... तुझ्या अजून लक्षात नाही का आले? मुलांना खेळवणे हा माझा छंद आहे... मुलांनी माझ्या मागे लागलेले मला फ़ार आवडते. ...." असं काही सांगते हे वाचून हसू आलं. दुसरी गोष्ट, सविताचा नवरा.. त्याची कहाणीही थोडी लेचिपेची वाटली. तो जर ऑफिसातल्या मुलींना आपली शिकार बनवतो तर कशाला उगाच नसती धोंड गळ्यात बांधून घेईल. लग्नाशिवायच जर संबंध ठेवता येत आहेत.. तर लग्न कशाला? तिसरी गोष्ट, सूड घेण्यासाठी पाच वर्ष थांबणं... हे पटत नाही. राग आला असला तर तेव्हाच सूड घ्यायला हवा होता.. अथवा प्रेम तरी उशिरा म्हणजे कॉलेजच्या दिवसांत करायला हवं होतं.. सूड कथा असली तरी यात सस्पेन्स हवा होता.. ती कात्री तयार केली तेव्हाच कथेचा शेवट समजला होता.
असो.. वरची सगळी माझी मते आहेत. लेखकाला आपली कथा आपल्या मताप्रमाणे लिहिण्याचा पूर्ण अधिकार आहे.
पु ले शु.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Aug 2009 - 11:02 am | विशाल कुलकर्णी
प्राजुशी सहमत.
सागरभौ, तुमची लेखनशैली मस्तच आहे. पण मुळात कथेतच खुप कच्चे दुवे आहेत. ती एलेक्ट्रीक कात्री कुठे फिक्स केली होती? कशी फिक्स केली होती ? याबद्दल कुठेच काही माहिती नाही. या पद्धतीने ब्रेक्स फेल करता येवु शकतात का? सुज्ञ मंडळी सांगतीलच.
कथेतले बरेच प्रसंग अर्धवट सोडल्यासारखे वाटतात. प्राजुने म्हटल्याप्रमाणे कुठलीही स्त्री असे काही स्पष्टपणे सांगेल असे वाटत नाही. पुन्हा खुनाची पद्धत ती अजुन थोडी सविस्तर रंगवायला हवी होती. असे मला वाटते.
पण काहीही असो, तुमची शैली छानच आहे, फक्त कथेच्या बारकाव्यांकडे अजुन थोडे लक्ष देता येते का ते पाहणार का?
पुलेशु.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
28 Aug 2009 - 12:37 am | रेवती
पहिल्या भागाएवढा हा भाग रंगला नाही बरं का!
सुडकथा जरा हिंसक वाटली. काही गोष्टी पटल्या नाहीत.
स्त्री पुरूषांचे संबंध अधिक सुचकपणे दाखवले असते तर नायकाच्या मनाचे दुखावलेपण जास्त ठळक झाले असते असे वाटले.
साधारणपणे प्राजुशी सहमत.
आपले पुढील लेखन वाचायला आवडेल.
धन्यवाद!
रेवती