खरे तर पहिला भाग टंकून खूप दिवस झाले होते. पण कथा पूर्ण होण्याचा योग लवकर येत नाही असे लक्षात येताच पहिला भाग वाचकांसाठी देत आहे.
दुसरा आणि अंतिम भाग लवकरच देईन.
नमस्कार रसिक वाचकहो,
भाग २ येथे पहा
संपूर्ण कथा पीडीएफ स्वरुपात वाचण्यासाठी PDF येथे क्लिक करा.
प्रस्तावना:
कथा अर्थातच पूर्णपणे काल्पनिक आहे...कोणत्याही गोष्टीशी साम्य आढळल्यास योगायोग समजावा...इ..इ..आहेच. पण ही कथा वाचण्यापूर्वी माझी भूमिका वाचकांना कळावी असे वाटले म्हणून हे दोन शब्द.भर तारुण्यात प्रवेश करणार्या युवकाच्या मनःस्थितीचा विचार समोर ठेवून हे कथानक लिहिले आहे. यातील काही व्यक्तीरेखांवर मी स्वत: पाहिल्या असलेल्या व्यक्तींचा प्रभाव असल्याची शक्यता मी नाकारत नाही. पण लहान सहान गोष्टींवरुन टोकाची भूमिका घेणारे अनेक लोक मी स्वतः पाहिले आहेत्...अनुभवले आहेत... आपले स्वतःचेच उदाहरण घ्या ना... घरचा नळ खराब झाला आहे आणि प्लंबर २-३ वेळा येऊनही काम नीट झाले नसेल तर आपण काय करतो? रागाने अंगाचा तिळपापड होतो खूप. त्या प्लंबरच्या डोक्यात हातोडा घालतो आपण. पण ते मनातल्या मनात. मुकाट्याने आपण लगेच दुसरा प्लंबर शोधतो की नाही? आपला कथानायक मनात आलं की करुन टाकतो... पण योग्य वेळी :) तेवढा संयम आपल्या कथानायकात नक्कीच आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लेखक स्वत: स्त्रीचा खूप आदर करतो. या कथेत दाखवलेले ’सविता’चे पात्र केवळ एका विशिष्ट प्रकारच्या मनोवृत्तीचे द्योतक आहे... तेव्हा सर्व स्त्री वाचकांना विनंती की गैरसमज करुन घेऊ नये. हीच कथा स्त्रीच्या भूमिकेतूनही लिहिता येईन.
थोडे चाकोरीबाहेरचे कथानक असलेल्या ह्या कथेमुळे वाचकांचे किती मनोरंजन झाले हे वाचकांनीच ठरवावे. आपल्या सूचना व अभिप्राय यांची अपेक्षाही आहे आणि त्यांचे स्वागतही...
~सागर
*****************************************
सूड (भाग - १)
आज मी समाधानानं माझी ही सूडकथा तुम्हाला सांगतोय. माझ्यावर जो प्रसंग आला होता त्या परिस्थितीत दुसरा कोणी असता तर जाऊ दे म्हणून माघार घेतली असती. काही माणसे आपल्या तत्त्वांशी पूर्णपणे एकनिष्ठ असतात म्हणूनच की काय या व्यावहारीक जगात मानमरातब, पैसा, प्रसिद्धी या गोष्टी त्यांना बघायलाही मिळत नाहीत. आहे त्यात संतुष्ट राहण्याकडे त्यांचा कल असतो. पण त्याउलट असेही दिसते की आपल्या या तत्त्वांच्या आधारेच काही जण प्रसिद्धी, पैसा व मानमरातब या सुखांचा उपभोग घेत असतात. मी माझी गणना पहिल्या प्रकारात करतो. असो... तर आता मी माझ्या कथेकडे (माफ करा सूडकथेकडे) वळतो.
तर माझा स्वभाव हा असा असल्याने त्या छोट्याशा प्रसंगाने माझ्या स्मृतिकोषातील बरीच जागा व्यापली होती. कोवळ्या मनावर झालेले घाव वाढत्या वयाबरोबरच अधिक दृढ होतात असे म्हणतात याचे प्रत्यंतर किमान माझ्या स्वतःच्या बाबतीत तरी मला आले. कोवळ्या वयात घडलेला तो साधा क्षुल्लक प्रसंग. पण तो प्रसंग माझ्या पुढच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. शाळेत मी दहावीत असताना घडलेला प्रसंग आजही माझ्या डोळ्यांसमोर अगदी आत्ताच घडल्यासारखा तरळतोय. पण प्रसंग सांगण्याआधी त्यामागची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो.....
२० जून १९८९
एस.एच.एस.पी. हायस्कूल, पुणे
आज शाळेचा पहिला दिवस होता. काय होईल अन् काय नाही याची उत्सुकता इतर मुलांप्रमाणेच मलाही लागून राहिली होती. शाळा भरल्याची घंटा वाजली आणि आम्ही सर्व मुले आपापल्या वर्गात पळालो. वर्गात आल्यावर मला दिसले की १०-१२ मुली वर्गात बसल्या आहेत. नववीपर्यंत शाळेला हे शहाणपण सुचलं नव्हतं आणि दहावीसारख्या महत्त्वाच्या वर्षात मुला-मुलींना एकत्र करण्याचं शहाणपण शाळेकडे कुठून आलं? असा मला मोठ्ठा प्रश्न पडला होता. अर्थात हिंदी चित्रपट पाहून प्रेमाच्या उदात्त विचारांनी भारावून गेलेल्या मुलांसाठी ही पर्वणीच होती. शाळेच्या निकालावर आता परिणाम होणार याची मला शंभर टक्के खात्री होती. आणि बोर्डाचा निकाल लागल्यावर माझा हा अंदाज खराही ठरला. पण निकालावर परिणाम होणार्याह विद्यार्थ्यांच्या यादीत माझाही समावेश असेल याची मला कल्पनादेखील नव्हती. तेव्हा मी अभ्यास एके अभ्यासच करणार, मुलींकडे बघणार नाही, वगैरे उदात्त विचारांनी भारला गेलो होतो. माझी ही भारलेली स्थिती पहिल्या दोन दिवसांतच खाली आली. शेवटी आपल्या वर्गात काय नमुने आहेत याची उत्सुकता होतीच की. पण खरंच मुली चांगल्या होत्या. पहिल्या दोन महिन्यांत बहुतेक सर्व मुली बर्याहच मुलांशी बोलू लागल्या होत्या. गुपचुप वह्यांची देवाण-घेवाण होऊ लागली होती. मधल्या सुट्टीत चर्चा झडू लागल्या. अर्थात त्या भाग्यवान मुलांमध्ये मी नव्हतो. का कुणास ठाऊक मला मुलींशी बोलायची भीती वाटायची.
एक दिवस मी मधल्या सुट्टीत गृहपाठ पूर्ण करत बसलो होतो, एकदम हसण्या-खिदळण्याचा आवाज आला. मी सहज मान वर करुन पाहिले तर दोन मुली गप्पा मारताना दिसल्या. एक माझ्या वर्गातली होती. दुसरी मात्र दुसर्या वर्गातली होती. मैत्रीणीशी बोलायला म्हणून ती आमच्या वर्गात आलेली होती. 'सविता' नाव होतं तिचं. त्या मुलीला मी पाचवीत असल्यापासून पहात होतो. पण आजचं तिचं हास्य मला अधिक भावणारं वाटलं. बस्स त्याच दिवसापासून आमचे डोळे एकमेकांच्या डोळ्यांत अर्थ शोधू लागले....
अरे! तिचं नाव सांगितलं एवढं लांबलचक प्रास्ताविक केलं. माझी स्वतःची माहिती द्यायला नको? मी 'सुंदर बोरुंदे'. सध्या जरी एका गॅरेजमधे काम करीत असलो तरी मी समाधानी आहे. डोक्यावर आता कुठलेही दडपण नाहीये. पाच वर्षांनंतर जरी मी सूड घेतलेला असला तरी आता संपूर्ण तारुण्य माझ्या हातात आहे. स्वतःच्या पायावर उभा राहील इतपत सामर्थ्य माझ्यात नक्कीच आहे...
+ + +
जानेवारी १९९० चा एक दिवस
सारसबाग, पुणे
"सुंदर, असे वाटते की हे दिवस संपूच नयेत. तू मला सोडून तर जाणार नाहीस ना?" तिच्या भावूक आवाजानं माझ्या काळजाला हात घातला.
"तसा विचार देखील मनात आणू नकोस सविता..." मी ही भावूक होत उद्गारलो.
+ + +
या प्रसंगानंतर शाळेची प्रिलियम परिक्षा चालू झाली. पण सविताच्या विचारानं माझ्या डोक्याचा एवढा भाग व्यापलेला होता की त्यात ज्ञानाच्या कणांनाही जागा नव्हती. शेवटी व्हायचे तेच झाले. नववीपर्यंत साठाच्या पुढे टक्के मिळवणारा सुंदर बोरुंदे दहावीच्या प्रिलियम परिक्षेत सहापैकी चार विषयांत पूर्णपणे नापास झाला. इतिहास्-भूगोल व संस्कृत हे आवडीचे विषय होते आणि अवांतर वाचन बरेच असल्याने त्यात पास होण्यास अडचण आली नव्हती. गणितात तर भोपळाच मिळाला होता. रिझल्ट मिळाल्यावर शाळा सुटली. आता परत कोणीही भेटणार नव्हतं. मी वर्गाबाहेर आलो व सविताच्या वर्गाकडे पळालो. तेवढ्यात मला सविता घाईघाईत वर्गाबाहेर येताना दिसली. ती आत्ता भेटली नाही तर तिला मी परत भेटू शकलो नसतो. कारण उद्यापासून शाळेला बोर्डाच्या परिक्षेपर्यंत सुट्टी लागणार होती.
"सविता... सविता" मी तिला हाक मारली. पण तिने मला पाहूनही पाठ फिरवली आणि चालू लागली. मला ते चमत्कारिकच वाटले तेव्हा. पण तरी मी पुढे सरसावलो. तिच्यासमोर थांबून तिचा मार्ग मी अडवला. "सविता आपली भेट आता कुठे होणार?"
माझ्या या प्रश्नावर तिनं पहिली कृती कोणती केली असेल तर ती माझ्या श्रीमुखात भडकविण्याची.
"माझ्यासारख्या सोज्वळ मुलीला असं बोलताना लाज नाही वाटत?"
तिचे हे शब्द ऐकून मला माझ्या पोटात भक्ककन पोकळी निर्माण झाल्याचं जाणवलं. डोकं सुन्न झालं. डोळ्यांत टचकन् पाणी आलं. प्रेमभंगाचा एवढा जबरदस्त धक्का मला पहिल्या-वहिल्या प्रेमातच मिळाला होता. प्रेमभंग म्हणजे काय? हे कथा-कादंबर्यांतून बरंच वाचलं होतं. पण प्रत्यक्ष अनुभव सहन करताना मात्र मला खूप त्रास झाला. मुलीने मुलाच्या तोंडात मारली म्हटल्यावर बरीच मुलं जमा झाली होती. माझ्याजागी दुसरा कोणी असता तर त्याने सरळ तिच्या तोंडात भडकावून दिली असती. पण मी मात्र निमूटपणे तिथून सरळ घरी निघून आलो.
+ + +
घरी आल्यावर मी उशीत तोंड खुपसुन मनसोक्त रडलो. दोन आठवडे मला काहीच सुचत नव्हते.या अपमानाचा सूड घेण्याचे मी तत्क्षणीच ठरवले. स्वतःला कसेबसे सावरुन अगदी थंड डोक्याने सविताने माझ्या निरागस प्रेमाचा केलेल्या अपमानाचा सूड घेण्याचा विचार करु लागलो. पूर्ण प्लॅन मी तयार केला होता. त्यात कुठेही चूक नव्हती. तो प्लॅन मी पाच वर्षांनंतर अंमलात आणणार होतो. संपूर्ण वेळापत्रक मी ठरवले होते. पाच वर्षे मी ह्या सूडाची तयारी करण्यासाठी दिले होते.
संपूर्ण सुट्टी मी अभ्यासावर केंद्रीत केली होती. मी माझ्या बुद्धीमत्तेच्या आणि रात्रंदिवस जागून केलेल्या अभ्यासाच्या जोरावर पास झालो. पण साठाच्या ऐवजी इतर कोणाही सर्वसामान्य विद्यार्थ्याला मिळतात तेवढेच ५१ टक्के मिळाले. काहीच नसण्यापेक्षा हे बरं होतं. माझ्या हातात बोर्डाच्या परिक्षेचा निकाल देताना माझ्या वर्गशिक्षकाचा आ वासलेला चेहरा अजूनही मला आठवतो... नाहीतर काय ... चार विषयांत प्रिलियम परिक्षेमधे नापास झालेला मुलगा बोर्डाच्या परिक्षेत चक्क ५१% मार्क मिळवून उत्तीर्ण होतो हे आश्चर्यच होते त्यांच्यासाठी तरी. खास करुन त्यांच्या स्वतःच्या विषयात - गणितात - भोपळा असताना चक्क मला ७५ मार्क मिळाले होते.
निकाल लागला. मला नू.म.वि. कॉलेजला अॅडमिशन पण मिळाली. सकाळचं कॉलेज होतं. बारा वाजायच्या आत घरी येऊन मी एका इलेक्ट्रॉनिक्स् च्या दुकानात जात असे. सवितावर सूड उगवण्यासाठी मला इलेक्ट्रॉनिक वस्तूंची फार मदत होणार होती. जोडीला रोज सकाळी माझा जोर-बैठकांचा व्यायामही चालू होता. या व्यायामामुळे होणार्या बलदंड शरीराचा उपयोग मला २ वर्षांनंतर गॅरेजकाम शिकताना होणार होता. माझं संपूर्ण लक्ष सवितावर होतं. तिचं लग्न व्हायची वाट मी पहात होतो. कारण कसबा पेठेसारख्या गजबजलेल्या वस्तीत तिच्या जवळपास जाणंदेखील अशक्य होतं.
ऑगस्ट १९९० ची एक पावसाळी सकाळ
सकाळी कॉलेजमधे जात होतो तेव्हा नुकतेच पावसाचे टपोरे थेंब पडू लागले होते. घराबाहेर पडतानाच पाऊस पडेल असे वाटत होते. आजच्यासारख्या आटलेला पाऊस ७-८ वर्षांपूर्वी नव्हता पडत. पाऊस कसा दमदार असायचा. पडला तर असा मुसळधार पाऊस पडायचा की जणू आभाळ खरोखर रडत आहे असा भास व्हावा ...तर मी रेनकोट अंगावर चढवूनच घराबाहेर पडलो होतो. एव्हाना मला सविताच्या घराबाहेर पडायच्या वेळा चांगल्या माहित झाल्या होत्या. फडके हौदापासून एक रस्ता थेट वसंत टॉकिजपाशी जातो. त्या रस्त्याने मी भरभर चालत होतो. तेवढ्यात ब्राह्मण समाजाच्या कार्यालयापाशी मला सविता एका उंचापुर्या मुलाबरोबर दिसली. दोघे एका छत्रीच्या आडोश्याने चालत होते. मी पुरेसे अंतर राखून त्यांच्यामागून जाऊ लागलो. हात थंडीने गारठल्यामुळे मी ते रेनकोटच्या खिशात कोंबले होते. सविताने तीन-चार वेळा मागे वळूनही पाहिलं कोण येतंय म्हणून. पण मी मान खाली घालून चालत होतो. डोक्यावर रेनकोटचीच मोठी टोपी होती. त्यामुळे माझा बराच चेहरा झाकला जात होता. मान खाली घातल्यामुळे ती मला ओळखणार नाही याची खात्रीच होती... माझी नजर जमिनीकडे असली तरी कान मात्र दोघांच्या बोलण्याकडे होते. माझ्यात आणि त्यांच्यात जवळपास सात - आठ फुटांचे अंतर होते.
" किशोर असं वाटतं हे दिवस संपूच नयेत. तू मला सोडून तर जाणार नाहीस ना?"
सवितानं तिच्या त्याच भावूक आवाजात विचारलं. हाच भावूक आवाज माझं काळीज भेदून गेला होता, बरोबर सात महिन्यांपूर्वी. तिच्या या प्रश्नाला मी मनातल्या मनात कुत्सितपणे हसलो. आणि तिच्याबरोबर असलेला तिचा मजनू काय म्हणतो याकडे मी उत्सुकतेने कान केले. हे प्रियकर महाशय तिला सांगत होते -
"सविता, जग विरुद्ध झालं तरी मी तुला सोडणार नाही. तुझ्यासाठी मी काहीही करेन."
त्या बिचार्याची काय चूक म्हणा. 'सविता'च्या प्रेमात वाहून गेलेला 'किशोर'च तो. तिच्या भावूक आवाजामुळे भारावून तिच्यासाठी काहीही करण्याची प्रतिज्ञा तो न करता तर नवलच होते.
+++
एप्रिल १९९२
नुकतीच माझी बारावीची परिक्षा संपली होती. म्हणावा तितका अभ्यास झालेला नव्हता. पण मी पास तर नक्कीच होणार होतो. आणि एकदा पेपर्स देऊन झाल्यावर रिझल्ट्चा तो काय विचार करायचा? कॉलेजमधे मी बरेच मित्र जमा केले होते. त्यात मी ज्या ग्रुप मधे असायचो तो तर कलहप्रिय मुलांचाच होता. कॉलेजची सगळी मुलं-मुली आमच्या ग्रुपला टरकून असायचे. मुलींची छेड काढणे, मारामार्या करणे हे सारं सारं माझे मित्र करत होते. हे सगळे मित्र सिगारेट , दारु वगैरे व्यसनांत गुरफटले होते. मी मात्र या ग्रुप मधे माझं वेगळेपण टिकवून होतो. एक सज्जन, आदर्श असा मी एकमेव मुलगा या ग्रुपमध्ये होतो. माझे हे सर्व मित्र आया बहिणींवरुन सारखे एकमेकांना शिव्या द्यायचे. त्यांच्या तोंडात हे शब्द असले तरी मनात मात्र तसं नसायचं हे अनुभवावरुन मला माहित झालं होतं. केवळ संगत चांगली नसल्यामुळे ते तसे वागत होते. मला मात्र माझे हे मित्र बराच मान द्यायचे. जेव्हापासून मी या ग्रुपमध्ये आलो तेव्हापासून माझ्या मित्रांनी शिव्यांच्या भाषेत बोलण्याचे प्रमाण बरेच कमी केले होते.
सविता आता अकरावीला होती. दहावीत ती नापास झाली होती. मग बाहेरुन परिक्षा देऊन ती पास झाली होती. आमच्या कॉलेजजवळच तिचे कॉलेज होते. मी मनात आणलं असतं तर मित्रांना सांगून सविताला त्रास देऊ शकलो असतो. पण ही गोष्ट माझ्या स्वभावातच नाही. "जे काही करायचं ते स्वतःच्या हिंमतीवर करायचं. त्यासाठी दुसर्या कोणावर अवलंबून रहायचं नाही." हे माझं तत्त्व असल्याने मी मित्रांना माझ्या या सूडप्रकरणात भागीदार होऊ दिलं नव्हतं.
मी आता अभ्यासाच्या व्यापातून मोकळा झालो होतो. सुट्टी माझ्या स्वप्नांना आकार देण्यासाठी मला खुणावत होती. मला हवे ते सहकार्य मिळवून देण्याचे मोठे काम या सुट्टीने केले. झाले असे की एक दिवस मी नेहमीप्रमाणे नगर वाचन मंदीराच्या वाचनालयात पुस्तक बदलून दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मंदीराच्या बाहेरच थांबलो. दर्शन घेऊन मी परत जायला वळणार तेवढ्यात माझे लक्ष एका गृहस्थांकडे गेले. साधारण ४२-४५ वयाचे ते गृहस्थ होते. खिशातून रुमाल काढताना त्यांच्या खिशातून शंभराच्या नोटांचे एक बंडल पडले. पुणं कसं आहे ते तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही. त्यामुळे मी तत्परतेने पुढे होऊन ते नोटांचे बंडल उचलून त्या गृहस्थांना म्हणालो -
"सर ! तुमच्या खिशातून रुमाल काढताना हे पैसे पडले होते"
ते गृहस्थ चांगल्या सूटाबुटात होते. त्यामुळे मी त्यांना सर म्हणालो होतो. क्षणभर त्यांनी नोटांकडे पाहिले आणि माझ्याकडे पाहिले. मग एकदम लिंक लागल्यासारखे म्हणाले - " अरे थँक यू.. थँक यू ...."
ते गृहस्थ मला त्या बंडलातील शंभराची एक नोट देऊ लागले. मी नम्रपणे ते पैसे घेण्यास नकार दिला.- "हे माझे कर्तव्यच आहे .. वगैरे...वगैरे..."
एखादे सत्कृत्य केल्यानंतर भारावल्यासारखे मी माझे विचार प्रकट केले.
त्या गृहस्थांनी विचारलं-" काय करतोस?"
मी काय बोलणार?... सांगितलं - " सध्या बारावीची परिक्षा दिली आहे. सकाळी नऊ ते दुपारी तीन पर्यंत एका इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानात शिकाऊ कामगार आहे. आणि आता संध्याकाळी गॅरेजचे काम शिकायचा विचार आहे."
"अस्सं आहे होय? अरे मग माझ्या गॅरेजमधे येत जा की. तुला माझ्या गॅरेजमधे भरपूर कामही मिळेल आणि पैसेही मिळतील"
मी आनंदाने तयार झालो. माझं लक फारच जोरावर असावं. प्रत्यक्ष परमेश्वरालादेखील माझा हा सूड कदाचित मान्य असावा. कुठल्याशा गॅरेजमध्ये काम शिकायचं होतं तर मला भेटलेला हा गृहस्थ चक्क सुप्रसिद्ध मेहेंदळे गॅरेजचा मालकच निघाला. एवढं मोठं गॅरेज म्हटल्यावर मला भरपूर काम मिळणार होतं. कष्ट उपसायला तर मी तयारच होतो. शिवाय पाचशे रुपये देखील महिन्याला मिळणार होते.
आता माझा दिनक्रम जवळजवळ ठरुनच गेला होता. सकाळी उठून पन्नास जोर-बैठका मारुन झाल्या की झटपट सगळं आवरुन नऊच्या आत मी दुकानात हजर होई. तीन वाजता काम संपलं की साडेतीन पर्यंत घरी येत असे. जेवण करुन थोडा वेळ आराम करायचो व साडेचार ला गॅरेजमध्ये जायचो. तन मन समर्पित करुन मी काम करायचो. घरी परत यायला रात्रीचे नऊ वाजायचे.
माझ्या या कष्टांचे आईला खूप कौतुक वाटायचे. आत्तापासूनच मुलगा कमवायला लागला हे ती फार अभिमानाने शेजार्यांना आणि नातेवाईकांमध्ये सांगायची. पण माझे हे पाच वर्षांचे कष्ट एका सूडाच्या पूर्तीसाठी होते याची तिला तरी काय कल्पना म्हणा. मी देखील आईचा हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या दिवशी मेहेंदळेंशी भेट झाली त्याच्या दुसर्या दिवशी संध्याकाळी त्यांनी मला गॅरेजवर बोलावले होते. त्या दिवशी त्यांनी गॅरेजचे व्यवहार सांभाळणार्या एका अनुभवी व्यक्तीशी माझी ओळख करुन दिली.
"बहुतुले... हा सुंदर बोरुंदे. आजपासून आपल्याकडे काम शिकणार आहे. आणि सुंदर..."
माझ्याकडे वळून मेहेंदळे म्हणाले - " हे साईराज बहुतुले. येथील सर्व कामगारांवर लक्ष ठेवायचे काम यांचं. आजपासून तुला शिकवण्याचं काम हे स्वतः जातीनं करतील. "
"बहुतुले तुम्ही या पोराला चांगलं तयार करा. पोरगं चांगलं आहे. चला मी निघतो आता.."
असं म्हणून मेहेंदळे तेथून निघून गेले. गॅरेजवर मेहेंदळे फारसे येत नसत. पण जेव्हा येत तेव्हा मात्र माझ्या प्रगतीची ते नेहमी चौकशी करायचे. हे बहुतुले मला उगाच हरभर्याच्या झाडावर चढवायचे. म्हणायचे - " साहेब, पोरगं फार मेहनती आहे बर का... असेच हा काम शिकला तर कुठलेही बिघडलेलं वाहन हा दुरुस्त करु शकेन. " त्याच वेळी मी मनात म्हणायचो - " आणि कुठलेही चांगले वाहन बिघडवू देखील शकेन.."त्याचसाठी तर मी ही मेहनत घेत होतो. माझ्या मेहनतीचे मला विशेष काही वाटायचे नाही. कारण मी जेवढे कष्ट करतो तेवढेच कष्ट दुसरा कोणीही करु शकतो. फक्त आळस न करता माणसानं मन कामात गुंतवावं लागतं. बाकीचे कामगार काही या प्रवृत्तीचे नव्हते. फक्त पैशासाठी काम करायचे ते सर्व. काहीतरी शिकावे असे त्यांना वाटतच नव्हते. बहुतुलेंनी सांगितले हे कर की ते करायचे.
मी मात्र बहुतुलेंना सारखे विचारायचो - " हा बोल्ट नसेल तर काय होते?... ही वायर महत्त्वाची का? ... ब्रेक ची कार्यक्षमता कशावर अवलंबून असते?...असंच का करायचं? तसं केलं तर काय होईल?...वगैरे... वगैरे..." माझ्या चौकस स्वभावाला बहुतुले मुळीच न कंटाळता मला त्यांची उत्तरे द्यायचे व मी ही या ज्ञानाची नोंद माझ्या मेंदूत करुन ठेवायचो...
+ + +
(क्रमशः ...)
सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती आहे की, माझ्या कथा तुम्ही तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पाठवू शकता वा तुमच्या संगणकावर साठवून ठेवू शकता। मात्र कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी वा तत्सम व्यवहारासाठी माझी परवानगी आवश्यक आहे
धन्यवाद,
सागर
प्रतिक्रिया
20 Aug 2009 - 6:10 pm | सूहास (not verified)
सुरुवात छान....
सविताच नेमक "कॅरेक्टर" पुढच्या भागात फुगवशील असी आशा आहे...
आता पर्यत सुडाच्या ध्यासाने पेटलेला, पण धीरोदत्त तरुण झकास रगंवलाय.
सू हा स...
20 Aug 2009 - 7:24 pm | सागर
सुहास,
अरे ही कथा आहे, त्यामुळे या कथेत तिला आवश्यक तेवढेच स्थान दिले आहे. आणि हो पुढच्या भागात सविताच्या 'कॅरेक्टर' वर नक्की थोडा प्रकाश टाकेन. आधी माझ्या डोक्यात कादंबरीएवढे मोठ्ठे कथानक घोळत होते. मग मी एवढे कधी लिहिणार या वास्तव-वादी जाणीवेतून कथेमध्ये मर्यादित केले.
ही सूडकथा असल्यामुळे आपल्या कथानायकाच्या भूमिकेतून लिहिली आहे. तेव्हा नायकाला त्याचा सूड घेण्यात यश मिळाले की नाही ... सूड घेतला तर कसा ... आणि नाही घेतला तर का नाही?.... ही उत्सुकता वाचकांना आहे याची जाणीव मलाही आहेच. त्यामुळे लवकरच दुसरा भागही देईन. :)
धन्यवाद
सागर
20 Aug 2009 - 6:15 pm | दशानन
छान सुरवात... वाचतो आहे... :)
20 Aug 2009 - 6:18 pm | अवलिया
हेच बोल्तो
--अवलिया
20 Aug 2009 - 6:20 pm | अनामिक
मी पण हेच बोल्तो.
-अनामिक
20 Aug 2009 - 6:45 pm | प्रभो
१ नंबर झालय्...सागर राव....
पुढचा भाग लवकर टाका......
-(नव्याचे नऊ दिवस) प्रभो-
20 Aug 2009 - 6:51 pm | समंजस
एकदम झक्कास झाला आहे हा भाग! >:)
उत्कंठा वाढली आहे, पुढील भागा साठी!!
20 Aug 2009 - 7:08 pm | योगी९००
झकास..
पुढील भागाची आतूरतेने वाट पहात आहे.
(साईराज बहूतुले हा एक क्रिकेटपटू पण आहे ना..?)
खादाडमाऊ
20 Aug 2009 - 7:27 pm | सागर
हा हा हा... खरे आहे ते... :)
पण जेव्हा हे पात्र माझ्या मनात जन्माला आले तेव्हा साईराज बहुतुले या नावाचा क्रिकेटपटू आहे हे मला नंतर कळाले... हा खरेच निव्वळ योगायोग आहे.
छान निरिक्षण आहे तुमचे...
20 Aug 2009 - 7:45 pm | Dhananjay Borgaonkar
सागर भाऊ पहिला भाग तर झकासच झाला आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे..लवकरात लवकर टाकावा ही नम्र विनंती...
20 Aug 2009 - 8:05 pm | रेवती
लई म्हंजी लईच विंटरेष्टींग हाये.
पुढचा भाग लवकर टाकाल अशी आशा आहे.
रेवती
21 Aug 2009 - 2:45 pm | विशाल कुलकर्णी
सागर सुरुवात छानच आहे. फक्त केवळ एका नकाराने तो सूडाच्या निर्णयापर्यंत येतो हे थोडेसे खटकतेय. त्यानंतर त्याने तिला तु अशी का वागलीस हे विचारण्याचीही तसदी घेतली नाहीये. आणि अचानक तिने आपला निर्णय का बदलला याचाही कुठे उहापोह नाहीय. तुमच्या कथेचा मुळ मुद्दा, सेंट्रल आयडीया म्हणजे तिने केलेला विश्वासघात आणि त्यावरची त्याची प्रतिक्रिया हा आहे.
पण एकदम एवढा टोकाचा निर्णय घेण्यामागची त्याची भुमिका लक्षात येत नाही. मला वाटते नायकाचे पात्र, त्याचा स्वभाव, आवडीनिवडी अजुन थोडे फुलवता येइल्.प्रयत्न करुन बघताय का?
मुळ कारणच सशक्त नसल्याने त्याचा सुडाचा निर्णय हा अतिरेकी वाटतोय.
माफ करा पण कथानक खरोखर छान असल्याने हे सुचवावेसे वाटले. चुभुदेघे. :-) आणि पुढचा भाग लवकर येवु द्या!
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
21 Aug 2009 - 4:42 pm | सागर
विशालभौ ,
सूचनेबद्दल मनापासून धन्यवाद...
पुढच्या भागात तुमच्या सूचनांची दखल नक्की घेईन मी....
फ्लॅशबॅक हे तंत्र या कथेत मी वापरलेले आहेच त्या अनुषंगाने पुढचे सगळे तुम्हालाही कळेन... तोपर्यन्त सस्पेन्स ;)
21 Aug 2009 - 5:38 pm | विशाल कुलकर्णी
तसे असेल तर उत्तमच ! पुलेशु ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
21 Aug 2009 - 5:36 pm | स्वाती२
छान झालाय पहिला भाग.
22 Aug 2009 - 9:53 pm | पक्या
छान झालीये सुरवात. पुढचा भाग येउ द्या लवकर.
23 Aug 2009 - 5:34 pm | मन
सागर शेठ.
पुढचा भाग येउ द्या लवकर.
वर लिहिल्या प्रमाणं पातत्रांच्या वागण्याची संगती लागेल पुढील भागातुन अधिक, अशी आशा करतो.
आपलाच,
मनोबा
23 Aug 2009 - 8:11 pm | वेताळ
पुढच्या भागात काय काय म्हणुन तुम्ही सांभाळुन घेणार आहात?तिचा सुड घेताना फक्त तिचा नकार आणि मुस्काट हे कारण पटत नाही. काहीतरी सबळ कारण हवे नाहीतर कथा नायक ,नायक न ठरता मानसिक विकृत खलनायक वाटतो.ज्याला प्रेमच उमगले नाही.त्यामुळे पुढचा भाग येताना सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण करत चला.सुडाचे कारण फक्त एक दोन ओळीत नको.बाकी लिखाण वाचकाला गुंतवुन ठेवते.पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
वेताळ
24 Aug 2009 - 11:57 am | सागर
जरा सबुर वेताळबुवा
एक गोष्ट मी सुरुवातीलाच स्पष्ट केली आहे की हा कथानायकाच्या शालेय जीवनात झालेला हा प्रसंग आहे.
कोवळ्या मनावरचे आघात एकदम दाट आणि खोलवर असतात हे कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाने कोणता ना कोणता अनुभव स्वतःच्या तारुण्याच्या उंबरठ्यावर घेतलेलाच असतो... आपण मनात दाबून ठेवतो... आपला हा कथानायक करुन टाकतो एवढाच फरक आहे.
पुढच्या भागात फ्लॅशबॅक ने मी हा भाग सविस्तर सांगणारच आहे
तेव्हा तूर्तास तरी पुढच्या भागाची वाट पहा हि विनंती :)
प्रतिसादाबद्दल तुमचे आणि सर्वांचेच आभार
धन्यवाद
सागर
23 Aug 2009 - 10:06 pm | यशोधरा
पहिला भाग आवडला. पुढचा भाग लवकर टाका.
23 Aug 2009 - 10:18 pm | मदनबाण
ह्म्म...पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.
मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo