आज अखेर मुहूर्त लागलाय मी काही दिवसांपूर्वी सुरू केलेली चित्रपट ओळख पुढे पूर्ण करायला........
***********
मी टॉम मॅकार्थीच्या 'द व्हिजिटर' या चित्रपटाविषयी लिहीतोय.
हा चित्रपट मी तीन महिन्यांपूर्वी भारतात जातांना विमानात पाहिला. पहिल्या दोनेक तासांतच हा चित्रपट पाहिल्यानंतर उरलेल्या १३ तासांत
इतर कोणताच चित्रपट पहावासा वाटला नाही इतकी या चित्रपटाची माझ्यावर पकड बसली. याआधीच्या लिखाणात वर्णन केलेल्या दोन प्रसंगांसारखे अनेक कडू-गोड प्रसंग डोळ्यांसमोर तरळून जात असतांना 'मी इतरांना नक्कीच या चित्रपटाविषयी सांगायचा प्रयत्न करेन' हे तेंव्हाच ठरवून टाकलं होतं.
हा चित्रपट आहे Overture Films या Independent कंपनीचा. प्रसिद्धीचं फारसं वलय नसलेल्या पण चार अफलातून कलाकारांनी यात जीव ओतून काम केलंय. रिचर्ड जेंकिन्स, हियाम अब्बास, हाझ सुलेमानी आणि दनाई जेकेसाई गुरिया हे ते कलाकार. यांपैकी रिचर्ड जेंकिन्स सोडला तर इतर
कोणाचे काही चित्रपट पाहिल्याचं मला तरी स्मरत नाही. (हाझ सुलेमानी याला आधी कुठेतरी पाहिलंय असं वाटतं, पण कुठे ते आठवत नाही, तुमच्यापैकी कोणाला माहित असेल तर सांगा.)
या चित्रपटात कुठेही आक्रस्ताळेपणा, आवेश किंवा हिंसा नाही, तरीही यातील सर्वच कलाकारांच्या अत्यंत संयत अभिनयाने या सुंदर, तरल आणि त्याच वेळी आतून हलवून टाकणारं हे साधंसं कथानक दर्शकाला अनेक निरनिराळ्या पातळ्यांवर भिडतं.
वॉल्टर व्हेल (रिचर्ड जेंकिन्स) एक वयस्कर निवृत्तीकडे झुकणारा कनेक्टीकटच्या एका युनिव्हर्सिटीतला इकॉनॉमिक्स चा प्राध्यापक. त्याच्या आयुष्यात अनपेक्षितपणे येतं एक अमेरिकेत न्यूयॉर्क मध्ये बेकायदेशीरपणे राहत असलेलं एक प्रेमी जोडपं, मध्यपूर्वेतील सिरीया चा तारेक आणि पश्चिम आफ्रिकेतील सेनेगालची झेनब (हाझ सुलेमानी आणि दनाई जेकेसाई गुरिया), त्यांच्यावर गुदरलेल्या एका प्रसंगात त्यांना मदत करण्यासाठी थांबलेल्या वॉल्टरला भेटते तारेक ची विधवा आई मौना (हियाम अब्बास). या चौघांच्या नात्यांची गुंफण पाहता पाहता दर्शक एक तर वॉल्टर मध्ये (बहुधा, अमेरिकन नागरिक असाल तर) नाहीतर इतर तिघांपैकी कुणा एकात (परकीय नागरिक असाल तर) गुंतत जातो.
जसजशी कथा पुढे सरकते तसतसं वॉल्टरला तारेक आणि झेनब कडून आयुष्य आनंदात कसं जगायचं ते कळायला लागतं, ते आवडायला लागतं, आणि अचानक कथा जेंव्हा वळण घेते तेंव्हा त्याला अल्पकाळ का होईना, पण प्रेमाची जाणीव होते. सर्वसाधारण अमेरिकन गोर्या माणसाला जेंव्हा परकीय नागरिकांना अमेरिकेत, क्वचितच, पण कशी सापत्न वागणूक मिळू शकते त्याची जाणीव प्रकर्षाने होते तेंव्हाच्या त्याच्या भावनांचं आंदोलन म्हणजे हा चित्रपट.
उत्तम पियानो वादक असलेली पत्नी निवर्तल्यानंतर एकटया रहाणार्या वॉल्टरला शिकवणं, इतर जग यांपैकी कशातच फारसा इंटरेस्ट नसतो. (येत नसतांना आणि फारशी commitment ही नसतांना) आपणही पत्नीसारखा पियानो शिकावं, असा अयशस्वी प्रयत्न तो करत राहतो. हे सारं पहिल्या पाचच मिनिटांतच सहजपणे आणि प्रभावीपणे दिग्दर्शकाने दाखवून दिलंय. वॉल्टरला पियानो शिकवायला येणार्या चवथ्या शिक्षिकेला तो जेंव्हा तिने यानंतर यायची गरज नाही असं नम्रपणे सांगतो, तेंव्हा ती म्हातारी त्याला खमकेपणाने "Learning an instrument at your age is difficult, particularly if you don’t possess a natural gift for it…" असं ऐकवते, आणि वरती त्याने पियानो वाजवायचं सोडलंच तर 'तो पियानो मला विकत दे' असं सांगायलाही कमी करत नाही. या दृश्यात मारियान सेल्डेसने दाखवलेले वॉल्टरचे कीव करणारे भाव पहाण्यासारखे आहेत. आणि या वेळचा त्याचा stunned चेहेराही खासच!
विद्यार्थ्यांशी वागतांनाचा वॉल्टरचा तुटकपणा, शिकवतांना पाटया टाकल्यासारखं कुणाकडेही न बघता यांत्रिकपणे शिकवणं, मागल्या वर्षीचीच प्रश्नपत्रिका केवळ वर्ष बदलून पुन्हा देणं, या सर्वांतून केवळ त्याचं शैक्षणिक क्षेत्रातलं withdrawal अधोरेखित करतं.
वॉल्टरचा चेअरमन चार्ल्स जेंव्हा त्याला, त्याच्या एका वैद्यकीय विश्रांतीची गरज असलेल्या सहकारी स्त्रीच्या ऐवजी, त्या दोघांचा (वॉल्टर आणि ती सहकारी महिला यांचा) एक शोधनिबंध सादर करायला न्यूयॉर्कला जायला सांगतो, तेंव्हा वॉल्टर पुस्तक लिहिण्याचं कारण सांगून टाळायला पहातो. चेअरमन जेंव्हा डीनचा तसा आग्रह असल्याचं सांगतो, तेंव्हा वॉल्टर अनाहुतपणे -आणि थोडयाश्या दांभिकपणे- बोलून जातो की त्याने खरं तर त्या निबंधात काहीच लिहिलेलं नाहीये, केवळ त्या ज्युनीयर महिला colleague ला मदत म्हणून त्याने आपलं नाव वापरू दिलं होतं.
त्या वेळची चार्ल्स ची जळजळीत नजर म्हणजे या अपप्रवृत्तीवरचा आसूडच वाटते. चार्ल्स त्याला ऐकवतो की 'डीनला हे कारण पटेल असं वाटत नाही, तू काय सांगतो आहेस त्याचा विचार कर!' स्वतःची चूक पटलेला वॉल्टर न्यूयॉर्कला जायला निघतो. न्यूयॉर्क मध्ये शिरतांना वॉल्टरला वाटेत दिसणार्या एका पुलाखालचं होर्डिंग पुढच्या कथानकाची थोडीशी वातावरणनिर्मिती करतं.
न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्यावर वॉल्टर जातो ते सरळ आपल्या बर्याच महिन्यांत न वापरलेल्या अपार्टमेंट मध्ये. दार उघडून आत जाताच त्याला ताजी फुलं असलेली फुलदाणी आणि बाथरूमच्या दरवाजाखालचा उजेड दिसतो.
चक्रावलेला वॉल्टर दबकत दबकत पुढे जाऊन बाथरूमचं दार उघडतो. समोर असते बाथटबमध्ये पहुडलेली पण आता प्रचंड घाबरलेली एक कृष्णवर्णीय स्त्री (झेनब, म्हणजे दनाई जेकेसाई गुरिया).
तिचं किंचाळणं ऐकून घाबरलेला वॉल्टर तिला सांगायचा प्रयत्न करतो की तो चोर नाहीये, तिने घाबरू नये, खरं तर तोच त्या अपार्टमेंटचा मालक आहे. आरडाओरडा ऐकून आलेला तारेक (हाझ सुलेमानी) वॉल्टरला मारायला उठतो, तेंव्हा झेनब त्याला सांगते की वॉल्टर तो मालक असल्याचं म्हणतोय आणि आता त्याने पोलिसांना कळवलं तर ते दोघे गाळात जाणार.
तारेक मग वॉल्टरला सांगतो की त्या दोघांना त्याच्या इस्टेट एजंटने फसवलंय, ते दोघे चूक मान्य करून निघून जाऊ पहातात.
त्यांचा मागे राहिलेला फोटो पाहतांना मूळच्या सहृदय वॉल्टरला जाणवतं की आपण या दोघांना रस्त्यावर काढलं तर त्यांचं भावविश्वच नष्ट होईल. तो त्या दोघांना घरात ठेवून घेतो.
या सर्व प्रसंगांच्या वेळचा छाया-प्रकाशाचा उपयोग केवळ अप्रतिम!
एका दृश्यात, न्यूयॉर्कमध्ये कॉन्फरन्ससाठी जाण्याच्या वाटेत प्लास्टिकचे पालथे डबडे बडवणारे दोन तरूण पाहून, वॉल्टर मंत्रमुग्ध झाल्यासारखा उभा राहून नकळत ठेक्यावर झुलायला लागतो, तेंव्हा आपल्याला (आणि वॉल्टरला स्वतःलाही) त्याला ड्रमिंगची आवड असावी असं प्रथमच जाणवतं तो प्रसंग छानच!
एकदा अर्ध्या चड्डीतला तारेक ड्रम वाजवत असतांना अचानक घरी आलेल्या वॉल्टरला पाहून खजील होऊन उठतो, पँट घालतो आणि माफी मागतो, तेंव्हा वॉल्टर "Go on, you don't have to stop playing" असं म्हणतो.
त्यावेळी तारेकने म्हंटलेल्या "OK, I promise, I will keep my pants on" या वाक्याचा वापर वॉल्टर पुढे झेनबशी बोलतांना करतो तेंव्हा त्याचं मिस्कील हास्य आणि झेनबची प्रतिक्रिया ही चित्रपटातच पहावी!
त्यानंतर ड्रम्स वाजवायला शिकणे हे साधंसं सूत्र धरून हळूहळू तारेकच्या बरोबर वॉल्टरची मैत्री वाढत जाते आणि तो न्यूयॉर्कमधलं वास्तव्य काही दिवसांसाठी वाढवतो.
सुरुवातीला वॉल्टर विषयी संशय बाळगणारी झेनबही हळूहळू बदलायला लागते. एके दिवशी सेंट्रल पार्क मध्ये वॉल्टर बरोबर ड्रम वाजवून परतत असताना न्यूयॉर्कच्या सब वे मध्ये टर्न्स्टाईल अडकलं म्हणुन त्यावरून उडी मारणारा तारेक तिकीट असुनही मेट्रो पोलिसांच्या तावडीत सापडतो, त्याच्याकडे अमेरिकेतील कायदेशीर वास्तव्य सिद्ध करू शकणारी कागदपत्रं नसल्याचं कळल्यावर पोलिस त्याला अटक करतात अणि बेकायदेशीर
वास्तव्याबद्दल त्याची detention center मध्ये रवानगी होते, त्याची मदत करू पहाणारा वॉल्टर पोलिसांनी दरडावल्यावर हताश पणे पाहत राहतो.
http://www.ecranlarge.com/movie_video-view-12566-2844.php
इकडे तारेकची वाट पाहणारी झेनब मनाने कोसळून पडते.
तारेकचं तुरूंगात जाणं ही आपली चूक मानणारा वॉल्टर झेनबची काळजी घेण्यासाठी अणि तारेकच्या सुटकेसाठी कायदेशीर मदत करण्यासाठी न्युयॉर्कलाच थांबतो. 'मुक्त' अमेरिकेतला detention center मधला दृश्य विरोधाभास दिग्दर्शकाने काही फ्रेम्स मधून अतिशय सहजपणाने दाखवला आहे.
Detention center मध्ये भेटायला जाणार्या वॉल्टरला तारेक 'ताल विसरू नको' म्हणत आपण छातीवर ठेका धरत वॉल्टरला टेबल वाजवायला सांगतो, तो प्रसंग सुंदरच.
पुढे अचानक तारेकची आई मौना मिशिगन येथून येउन कथेतला चौकोन पूर्ण करते. तीही बेकायदेशीररीत्या राहत असल्याने तारेकला भेटायला detention center मध्ये जाऊ शकत नाही, तेंव्हाचा तिचा पाठमोरा, तिठयावर उभं असतांनाचा shot तर अतिशय बोलका!
तिच्या अणि झेनाबच्या भेटीच्या वेळचा प्रसंग तर खास पाहण्यासारखा! यातील आधी 'झेनब किती काळी आहे' म्हणणारी मौना तिचं तारेकवरचं प्रेम कळल्यावर पुढे किती प्रेमाने वागते ते पाहण्यासारखंच.
http://www.ecranlarge.com/movie_video-view-12566-2845.php
या चित्रपटात सप्टेम्बर ११, २००१ नंतरचं अमेरिकतलं xenophobia चं वातावरण मुळीच शब्दबंबाळपणा न करता फार समर्थपणे दाखवलेलं आहे. अमेरिकेतल्या अनिवासी रहिवाश्यांचं आयुष्य, कायद्यामधला फ़ोलपणा अणि त्रुटी, आणि या क्लेशकारक पार्श्वभूमीवर प्रेमाचं, मैत्रीचं, अणि माणुसकीचं हृद्य दर्शन हळूवारपणे दिसतं. आयुष्याकडून नेमक्या अपेक्षा ठेवणारे सदा-आनंदी उत्साहाने सळसळणारे तारेक आणि झेनब, आणि अगदी याच गोष्टींचा सुरुवातीला अभाव असणारा पण नंतर त्या आत्मसात करू पाहणारा वॉल्टर, यांच्या परिस्थितीत हे वादळ जे बदल घडवतं ते पडद्यावरच पहावं.
आपण नकळत, आयुष्याच्या अर्थाचा शोध घेणार्या या अलगद सरकत जाणार्या कथेत गुंतून जातो, इतकं, की या कथेतली पात्रं आपल्याला आपली वाटायला लागतात. आपणही सहजच पुढे काय होणार त्याची वाट पाहत राहतो. काही दर्शक अमेरिकेत रिकामं आयुष्य जगणार्या वॉल्टरशी, तर काही त्यांच्याजवळ खुप काही देण्यासारखं असुनही न देऊ शकणार्या परदेशी रहिवाश्यांशी तादात्म्य पावतात. केवळ चार पात्र घेउन पुढे सरकणारी ही कथा असंख्य उपेक्षितांचं आयुष्य दीडच तासात आपल्यापुढे सक्षमपणे उभे करते. यात दिग्दर्शकाचा जेवढा वाटा तेवढाच वाटा मला सर्व कलाकारांचाही वाटला. यातला/ली प्रत्येक जण आपापलं पात्र पूर्णपणे जगलेला/जगलेली आहे. उदाहरणच पहायचं असेल तर झेनब ची भूमिका वठवणारी दानाई जेकेसाई गुरीरा ही तारेकविषयी बोलतांना बालीशपणे "ही इज सो फोन्नी" असं म्हणते तेंव्हा एखादी पश्चिम अफ्रीकन महिलाच डोळ्यापुढे उभी राहते.
तुरुंगात असलेला तारेक जेंव्हा भेटीला आलेल्या वॉल्टरला कळवळून विचारतो, ""This is not fair! I have not committed any crime! What do they think? I am not a terrorist!",
तेंव्हा वॉल्टर त्याला म्हणतो, "I know!" त्यावर उसळून तारेक म्हणतो, "How do you know? You are not there?" वॉल्टरचा पराभूत, विषण्ण चेहेरा मनात रुतून राहतो.
तारेक त्याला म्हणतो, 'I just wanted to live my life and play my music, what’s so wrong with that?'
असे अनेक अवघड उत्तराचे प्रश्न हा चित्रपट आपल्यापुढे टाकत राहतो.
बर्याच प्रसंगात असे वाटले की इथे इतर कलाकार किंवा दिग्दर्शक असते तर नक्कीच overacting किंवा underplay पहायला मिळाला असता, पण कथेतल्या पात्रांशी या चित्रपटातले कलाकार इतके प्रामाणिक आहेत की कुठेही ते घडत नाही, आणि त्यांच्या परकायाप्रवेशाचे हेच कौतुक आहे की ही कथा जणू त्यांचीच असून समोर घडत असल्यासारखी सामोरी येत राहते.
मला हा चित्रपट आवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्याचा अंत मला आशा होती तसा नाही झाला, तो झाला जसा logically व्हायला हवा तसाच! ही कथा आहे नैराश्याची, पराभवाची, आशेची अणि स्व-शोधाची; जी स्वभावत:च टोकदार, दुखरी अणि भळभळत्या संवेदनांची असायला हवी - ती तशीच आहे. तुम्हाला कथेतल्या काही प्रसंगांनी आनंद जरी वाटला, तरी तुम्ही आयुष्यातील विषमतेबद्दल चिडणं अणि असहाय्यपणाची जाणीव तुम्हाला होणं हेच दिग्दर्शकाला अपेक्षित आहे, ते पुरेपुर घडतं हेच या चित्रपटाचं यश आहे.
मला या चित्रपटाचं शीर्षक वाचून अणि उत्तरार्धात घडणार्या घटना पाहून ही एक साधनसंपन्न देशात बेकायदेशीर प्रवेश करणार्या परदेशीयांची कथा आहे आहे असं वाटलं, पण चित्रपट संपला तेंव्हा असं वाटलं की यातला visitor तर वॉल्टर आहे, ज्याला तारेक- झेनब च्या आयुष्यात भेट देउन आपला आत्मा सापडतो.
हा चित्रपट कुणाचं, कशाचंच समर्थन करीत नाही. तो प्रांजळपणे हेच मांडतो की लोक चुका करू शकतात, कधी कधी अजाणपणे, आणि त्यांच्या या सहज चुका करण्यामागे असतो एक माणुसकीच्याविषयीचा विश्वास, जो कधी कधी अनाठायी ठरतो. मौना चित्रपटाच्या शेवटी वॉल्टरला एका भावोत्कट क्षणी म्हणते "After a while, you forget and you feel like you belong..." वस्तुस्थिती मात्र अशी असते की in a foreign land, you may never belong!
वॉल्टरचा detention center मधला अखेरचा उद्रेक पाहून या कलाकाराचं ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन का झालं असावं ते कळतं. (या प्रसंगानंतर मला अनुपम खेर च्या सारांश चित्रपटातील पोलिस स्टेशनातील अभिनयाची आठवण झाली, अणि त्याही अभिनेत्याची ऑस्करने नोंद घेतली असती तर बरं झालं असतं असं वाटुन गेलं.)
मी हेतुपुरस्सर चित्रपटाची अखेर इथे सांगत नाहीये, तुम्ही हा चित्रपट मिळवून आवर्जुन पहावा, एकट्याने किंवा प्रेमाच्या व्यक्तीबरोबर, मला वाटतं की एक दीर्घ काळ लक्षात राहील असा उत्तम चित्रपट पाहिल्याचं समाधान तुम्हाला नक्की मिळेल.
प्रतिक्रिया
15 Jul 2009 - 9:56 am | नीधप
मी पाह्यलाय हा चित्रपट. छान लिहिलंयत.
एकेक सीन मस्त आहे.
पण तारेकला पकडेपर्यंत एक आणि पकडल्यानंतर दुसरा असे दोन वेगळे चित्रपट असल्या सारखे वाटतात.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
15 Jul 2009 - 11:54 am | ज्ञानेश...
रसग्रहण आवडले.
काही प्रसंग डोळ्यापुढे उभे राहिले.
"Great Power Comes With Great Responssibilities"
15 Jul 2009 - 12:02 pm | सहज
रसग्रहण मस्तच आहे. आवडले. आता सिनेमा बघायची गरज वाटत नाही आहे.
15 Jul 2009 - 12:26 pm | श्रावण मोडक
पहावा लागेल हा चित्रपट. परिचय चांगला.
एक सूचना - छायाचित्रे मध्येच येतात. एक तर ती मजकुरात रॅप करावीत किंवा त्यांना ओळी देऊन लेखाच्या आरंभी, मध्ये किंवा शेवटी एकत्र द्यावीत. वाचनही सलग होते, छायाचित्र पाहणेही सलग होऊ शकते. काम थोडे वाढेल, पण परिणाम सुटसुटीत असेल.
15 Jul 2009 - 12:32 pm | Nile
छायाचित्रांबद्द्ल सहमत आहे. पण मागील वेळेस बर्याच जणांनी त्यांना छायाचित्र टाकाच असा आग्रह असल्याने त्यांनी ती टाकली असावीत असे वाटते. :)
(आता सिनेमा मागवला आहे त्यामुळे पाहुन मगच वाचेन म्हणतो.) :)
15 Jul 2009 - 12:46 pm | वेताळ
खुपच सुंदर जमले आहे. चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो.
वेताळ
15 Jul 2009 - 1:20 pm | यशोधरा
सुरेख लिहिलं आहे परीक्षण! अतिशय आवडलं. हा चित्रपट मिळवून नक्की पाहीन. धन्यवाद.
15 Jul 2009 - 9:59 pm | प्राजु
चित्रपटाचे परिक्षण खूप आवडले.
छान लिहिले आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Jul 2009 - 10:00 pm | प्राजु
चित्रपटाचे परिक्षण खूप आवडले.
छान लिहिले आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Jul 2009 - 11:16 pm | अवलिया
चांगले परिक्षण.
--अवलिया
=============================
रामायण महाभारत घडायला स्त्रीची गरज आहे असे नाही, आजकाल सही किंवा एक खरड ते काम करते. ;)
16 Jul 2009 - 12:19 am | धनंजय
परीक्षण वाचून बघावासा वाटतो आहे चित्रपट.
16 Jul 2009 - 2:44 am | स्वाती२
छान परिक्षण. सवड काढून नक्की बघेन. धन्यवाद.