माझा जलप्रवास!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
26 Jun 2009 - 8:38 pm

"नाना, उद्यापासून ह्यालाही घेऊन जाल का पोहायला?" मला नानांच्यापुढे उभे करत आईने विचारले.
"हो गं त्यात काय, दे उद्या सकाळी ७ वाजता पाठवून. काढतो ह्यालाही सगळ्या पोरांबरोबर पोहायला!" नाना माझ्याकडे पाहत तोंडभर हसत म्हणाले.
नाना आणि इन्ना कुलकर्णी म्हणजे मिरजेच्या माझ्या आजोळच्या वाड्यातलं एक जगमित्र कुटुंब होतं. माझ्या आई, मामा, मावशींच्या पिढीला तर नानांनी पोहायला शिकवलं होतंच आणि आता ते त्यापुढच्या पिढीला म्हणजे आम्हा मावस, आत्ते-मामे भावंडांनाही पोहायला शिकवत होते.

मी ८-१० वर्षांचाच असेन त्यावेळी. दुसर्‍या दिवशी पोहायला जायचे आहे ह्या कल्पनेने झोपताना अंगाला कंप सुटला होता, घाबरुन नव्हे पण अतिउत्सुकतेनं. विचार करता करता कधी झोपलो ते समजलं नाही. सकाळी गच्चीवर सोनेरी उन्हं आली आणि मला जाग आली. परसदारच्या बागेत थंड हवेतले पक्षी बघत, राखुंडीने दात घासून, चुळा भरून त्या झाडांच्या बुंध्यांपर्यंत लांबचलांब उडवून मी स्वयंपाकघरात दूध प्यायला आलो. दूध पिऊन मी आणि मामेभाऊ राजापुरी पंचात आतले कपडे गुंडाळून आणि काथ्या बांधलेले, झाळलेले डालडाचे डबे घेऊन निघालो. दिंडी दरवाजातून बाहेर आलो तर वाड्याच्या दाराबाहेर बरीच जत्रा होती. धोतर आणि बंडी अशा वेषातल्या नानांचा, "चला रे पोरांनो!" असा पुकारा झाला आणि आमची वानरसेना उड्या मारत निघाली. जाताना आसपासच्या वाड्यांमधून डोकावत "ए आशक्या निघालोय रे! चल ये की लेका पटकन." " ए ते बाब्या आलं का बघ रे जरा? काल म्हणत होतं सगळ्यात फुडं निघनार म्हणून!" "पम्या लेका, दहा दिवस झाले अजून बिंडा सोडत नाहीस! पो की लेका सुट्टा! घाबरतंय तिच्यायला!" अशी मुक्ताफळांची आतषबाजी सुरु होती.

मिरजेला मैदानातल्या दत्तमंदिरामागल्या बोळातून बाहेर पडून किंचित डावीकडे वळलं आणि थोडं पुढं गेलं की खाडिलकर गल्ली लागते, ती डावीकडे ठेवून जरा गावाबाहेरचा रस्ता घेतला की दोनेक फर्लांगातच मोठ्ठीच्यामोठी विहीर लागते (माझी स्मृती दगा देत नसेल तर हीच ती फर्मानकट्ट्याची विहीर). ताशीव दगडात बांधलेली, चिंचेच्या झाडांनी वेढलेली भलीदांडगी विहीर जवळ आली. आसपास सगळीकडे चिंचेच्या पानांचा सडा पडला होता. विहिरीतून घुमणारा पोरांचा आरडाओरडा कानावर येत होता. आम्ही सगळे काठावर पोचलो. मी रहाटाच्या खांबाला धरुन हळूच आत डोकावून बघितलं. झाडांच्या सावल्यामुळे हिरवंगार दिसणारं पाणी डुचमळत होतं, पोरं आत कल्ला करत होती. विहिरीच्या भिंतीतून आलेली पिंपळाची हिरवीगार तरतरीत रोपटी वेगळीच दिसत होती. निसटलेल्या एखाद्या चिर्‍याच्या खाचेत केलेलं घरटं लक्ष वेधून घेत होतं. काठावरुन सर्पिलाकार निघालेल्या ताशीव पायर्‍या थेट पाण्यात दिसेनाशा झाल्या होत्या. मला जरा दडपल्यासारखं झालं. आमच्यातली सराईत पोरं कपडे काढून धडाधडा पायर्‍या उतरली सुद्धा. जरा भीड चेपलेली पण नवखी पोरं कपडे काढून पाठीला बिंडा, डबा असं काहीतरी बांधायला नानासमोर उभी होती. मी डोळे मोठे करुन सगळं बघत होतो. अजून कपडे काढायला धीर होत नव्हता. मला तसा उभा बघून नाना म्हणाले " काय रे, घाबरलायस होय? अरे मी आहे की, चल चल काढ कपडे आणि हा डबा बांध." डबा बांधून उघड्यानं पायर्‍या उतरताना सर्वांग शहारत होतं. जसजसा मी पाण्याजवळ जात होतो तसतसा माझा धीर होईना! खालून पाचव्या पायरीवर भिंतीला टेकून मी उभा राहिलो. पाण्यात बेडकासारखी सटासट पोहोणारी पिल्लावळ बघून गंमत वाटत होती पण भीतीही कमी होत नव्हती. मागे ओढ घेणार्‍या मला नानांनी धरुन खाली नेलं आणी पाण्यात ढकललं! आयायऽऽआयाय असं ओरडत मी धप्पकन पाण्यात पडलो, दोनेक गटांगळ्या खाल्यावर त्वेषानं हातपाय झाडायला सुरुवात केली नाहीतर आपण बुडणार असं वाटत होतं पण लगेच लक्षात आलं की आपण तरंगतो आहोत, पाठीच्या डब्याने मला तरंगवून धरलं होतं. मी काठाकडे पाहिलं नाना तिथेच पोहत सगळीकडे लक्ष ठेवत होते. मी झपाट्याने हात मारत खडकावर आलो. जरावेळ बसून परत हळूच पाण्यात डुबकी मारली मग भिंतीच्या कडेकडेने पोहत होतो. नाना मला हात कसे मारायचे हे सांगत होते त्याप्रमाणे मी करत होतो. एवढ्यात मोटेवरुन एकाने पाण्यात धाडकन उडी मारली. हवेतून येणारा तो मुलगा बघून मी आश्चर्याने थक्क झालो होतो! एव्हाना माझी पाण्याची भीती तर गेलीच होती हे नक्की. पुढल्या ३-४ दिवसात डब्याविनाही मी तरंगू लागलो आणि विहिरीला काठाकाठाने चक्कर मारण्यापर्यंत माझी प्रगती झाली.
त्यानंतर एके दिवशी कोणीतरी मला पाठीमागून पाण्यात दाबलं. मी थेट तळात ढकलला गेलो. ओरडायला तोंड उघडलं तर नाकातोंडात पाणी गेलं. डोळे उघडले तर सगळीकडे हिरवागार रंग दिसत होता आणि वरती विहिरीच्या तोंडातून येणारा प्रकाश. एक क्षण घाबरलो पण मग मला मजाच वाटू लागली. श्वास रोखून खोलवर बुडी घेण्याचे तंत्र मी तातडीने शिकलो. मग मात्र मी स्वतःहून पाण्यात खोलवर जाऊन तिथून वरती बघणे हा खेळच सुरु केला!
***************************************************************
त्यानंतर काही वर्षांनी पोहोण्याचा वेगळा आनंद मला अहमदनगरला मिळाला. सिद्धीबागेजवळ चांगला भलामोठ्ठा जलतरण तलाव बांधून नगरपालिकेनं एक फारच चांगलं काम केलं होतं. माझ्या आईला पोहोण्याची फार आवड त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी ३-४ च्या सुमारास मी, बहीण आणि आई असे तीघे पोहायला जात असू. बाबा क्वचितच यायचे. आई चांगलीच पोहायची. पोहोताना मधे तोंडात पाणी न जाउ देता योग्य वेळी श्वास कसा घ्यायचा हे तिनेच मला शिकवले. विहिरीसारख्या तळ पायाला न लागणार्‍या ठिकाणी पोहायला शिकल्यामुळे ३ फूट, ४ फूट, ६ फूट, ८ फूट अशा क्रमाने उतरत्या होत जाणार्‍या तलावात पोहोणे हा एक मनोरंजक अनुभव होता. फळीवरुन पाण्यात सुरेख सूर मारणारे लोक बघून मला हेवा वाटे, तसा सूर मला कधी मारता येईल? असंही वाटून जाई. एक दिवस धीर करुन मी फ़ळीवर गेलो. माझ्यापुढच्या माणसाने मारलेला सूर बघून मीही तसाच मारला आणी काय झाले कोणास ठाऊक पाण्यावर आडवा पडलो पोटावर! जाम मार बसला. सगळं पोट लालेलाल झालं होतं, हुळहुळंत होतं. लागल्यापेक्षा सूर जमला नाही ह्याचं मला जास्त दु:ख झालं होतं. त्यादिवशी मी पुढे पोहलोच नाही. दुसया दिवशी मी पुन्हा सूर मारायला गेलो. ह्यावेळी मात्र मी बर्‍यापैकी उंच उडी मारुन हात आणि डोके पाण्यात घातले आणि सूर बराचसा जमला, मला फ़ार आनंद झाला. मग एका आठवड्यात मी चांगला सूर मारू लागलो.
एकदिवस मी निश्चय केला की १० फूट खोलीपाशी तलाव एका दमात ओलांडायचा. एका बाजूने निघालो की पोहत. अर्धे अंतर सहज पार केले. मग थोडा पुढे गेलो. शेवटचे ६ एक फूट राहिले असतील नसतील, माझा दम तुटला! कडेला धरायला गेलो तर शेवाळलेल्या भिंतीवरुन हात सटकले. गटांगळ्या खाताना एकदा डोके वर निघाल्याबरोब्बर मी खच्चून ओरडलो! माझे ओरडणे ऐकून पलीकडेच पोहोणारे एक काका झपाट्याने जवळ आले, त्यांना मी मिठीच मारली, त्यांनी माझी चड्डी पकडून मला कडेला खेचले. जाम घाबरलो होतो.पण तरीही पोहायलाच नको असे मला कधी वाटले नाही हे आश्चर्य! ते काका बाबांच्या ओळखीचे होते त्यांनीच मला फ्रीस्टाईल, ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोक शिकवले आणि मग माझा मीच बटरफ्लाय शिकलो.
तो उन्हाळा संपता संपता ५० मीटर लांब तलाव एका दमात पोहोता येईल अशी प्रगती झाली. पोहून परत येताना हातपाय इतके थकलेले असायचे की घरापर्यंतचं पंधरा मिनिटांचं अंतरही कधीच संपणार नाही असं वाटायचं. घरी आल्या आल्या हापूस आंब्यांवर ताव मारणे हे व्हायचेच, त्याशिवाय पाऊलही टाकायचे नाही असे वाटत असे. ते दिवस फारच मजेचे होते.
***************************************************************
त्यानंतर मी बर्‍याचदा गणपतीपुळ्याच्या, हरिहरेश्वरच्या समुद्रातही पोहलो. अंगावर फुटणार्‍या खारट लाटा, परतीच्या ओढीबरोबर पायाखालून सरसरत निसटून जाणारी रेती असा अवर्णनीय आनंद अनुभवला. समुद्रस्नान हे अतिशय उत्साहदायी असते हा माझा आजवरचा अनुभव आहे. शरीराचा आणि मनाचा सगळा शीण घालवून टाकण्याचे एक जबरदस्त सामर्थ्य त्यात असते. पण त्याला पोहोणे म्हणणं मला जरा अवघड जातं. अर्थात पट्टीचे पोहोणारे आणि खाडी वगैरे ओलांडून जाणार्‍या जलतरण पटूंची बातच वेगळी!
मला पोहोण्याचा मनसोक्त आनंद पुन्हा बरेच वर्षांनी मिळाला तो सांगलीला कॄष्णामाईच्या सान्निध्यात.
माझ्या अभियांत्रिकी नंतरचं एक वर्ष मी सांगलीत राहिलो होतो त्यावेळी सकाळी सकाळी सायकलवर टांग टाकून गणपती मंदिरामागच्या घाटावर पोहायला जायचो. डावीकडे आयर्विन पूल दिसत असे. बायका धुणी धुवत असायच्या. पोरं पोहत असायची.
कपडे काढून, नीट गुंडाळून चपलांवर गठ्ठा करुन एखाद्या दगडाखाली ठेवायचे म्हणजे वार्‍याने उडायला नको. नदीला नमस्कार करायचा आणि मोठ्ठा श्वास छातीत भरुन घेऊन पाण्यात घुसायचे. एकसारख्या वेगाने हात मारत पाणी कापत अख्खी नदी ओलांडून मी पलीकडे जाई! पलीकडे गेल्यावर नदीकाठची ओली रेती अंगाला खसखसून घासून अंग धुवे आणि जरा दम निघाला की नदीला वरच्या अंगाला चालत जाई मग तिथून परतीच्या प्रवासाला सुरुवात. एकदाचा अलीकडल्या काठावर आलो की जरा दम टाकायचा मग कपडे बदलून गणपतीचं दर्शन घेऊन परत खोलीवर यायचो. इतकी भूक लागलेली असे की बर्‍याचदा दूधवाल्यानं दाराशी ठेवलेली अर्धा लीटरची पिशवी तापवायचाही दम निघायचा नाही, तशीच दातांनी फोडून एका दमात गटकवायचो! मग जवळच एसटी स्टँड बाहेरच्या पोहेवाल्याकडे जाऊन गरमागरम पोहे हाणायचे आणि पुढल्या कामाला सुरुवात! आहाहा काय दिवस होते ते! फारच मस्त.
***************************************************************
ऐन पावसाळ्यात एकदा कॄष्णेचा महापूर बघायला आम्ही नरसोबाच्या वाडीला गेलो होतो. नेहेमीचा देवळाचा घाट बुडून गेला होता, देऊळही अख्खं पाण्यात बुडालं होतं फक्त कळस दिसत होता. तांबडंलाल, गढूळ, खळाळणारं पाणी घेऊन कॄष्णा रोरावत होती! जागोजाग भोवरे फिरत होते. दोन मोठी झाडं आणि एक म्हैस वाहून चालली होती. ते दृश्य पाहून मी भयचकित झालो होतो. एरवी ज्या शांत नदीत आपण पाय धुवून दर्शन घ्यायला यायचो ती हीच का असा प्रश्न मला पडला होता. त्या महापुरात लोक नदीला नारळाच्या माळा अर्पण करत होते आणि काही पट्टीची पोहणारी पोरे सटासट त्या पाण्यात सूर मारुन भोवरे चुकवत त्या नारळाच्या माळा पकडून आणत होती! त्यांचं मला कौतुक वाटलं. इतकं पट्टीचं पोहणं मला कधीच जमलं नाही. त्यानंतर मी मुळा-मुठेला आलेला पूरही बघितला, संभाजीपुलाला पाणी लागत आलं होत. पण त्यातही तो कॄष्णेच्या पुराचा रौद्रभीषणपणा नव्हता. अर्थात दोन्ही तटाला सिमेंटची बंदी घातलेली गावातून वाहणारी नदी तशी केविलवाणीच दिसते म्हणा.

कर्वेरस्त्यावरच्या गरवारे शाळेमागल्या टिळक तलावात मी पोहलो आहे. स.प. कॉलेजचा तलावही छान आहे. तिथल्या दोनेक स्पर्धातही मी भाग घेतलेला मला आठवतोय. माझी जेमतेम एक फेरी संपत असतानाच उलट येऊन दुसरी फेरी संपवत आणलेले पट्टीचे पोहोणारे स्पर्धक बघून मी गार झालो होतो! त्यानंतर लक्षात आले की अतिशय खडतर प्रशिक्षणाशिवाय स्पर्धा म्हणजे काही खरे नाही. मग तो नाद मी सोडून दिला पण आनंदासाठी, व्यायाम म्हणून मी अजूनही पोहतो.

गेले तीनचार उन्हाळे इथे अमेरिकेच्या अटलांटिक किनार्‍यावर पोहोण्याची संधी मी घेतली. पण इथलं पाणी मरणाचं थंडगार असतं! ऐन उन्हाळ्यातही बाहेरचे तपमान ३५ डिग्री सें. असतानाही पाणी जेमतेम १२-१३ डिग्री सें असते त्यामुळे पाऊल टाकायचा धीर होत नाही पण मनाचा हिय्या करुन एकदा का आत शिरलात की मग विचारायची सोय नाही! बाहेर यावंसंच वाटत नाही वेगळीच मजा! माझ्या मुलालाही ते जाम आवडतं समुद्रस्नानाचा आनंद तोही घेतो माझ्या बरोबर.

मुलामुलींना पोहायला हे आलंच पाहिजे. झाडावर चढणे, पोहोणे आणि सायकल चालवता येणे हे रोटी, कपडा, मकान प्रमाणेच जीवनावश्यक गरजात मोडते असे माझे मत आहे! हल्ली मुलांना पोहायला काय काय सुविधा उपलब्ध असतात हे बघितलं तर त्यांचा हेवा वाटतो. वेगवेगळ्या डिझाईनचे रबरी टायर्स काय, गॉगल्स काय, स्वीमिंग सूट काय, डोक्याला कॅप काय सगळा सरंजाम करुन मुलं पाण्यात उतरतात तेव्हा रंगीबेरंगी मासोळ्यांसारखी दिसतात. बघायला मजा येते. मी ही तलावत उतरुन पोहोण्याचे चार हात मारुन अगदीच सराव जायला नको ह्याची काळजी घेत असतो पण विहिरीतली, नदीतली ती मजा येत नाही, ती वेगळीच!
***************************************************************
आता नदीत-विहिरीत पोहायला जायची सुरसुरी आली तरी गप्प बसावं लागतं. चारपाच वर्षाखाली इन्ना गेल्याचं समजलं. थकलेले नानाही मग त्यांच्या मुलाकडे रहायला गेलेत असं कळलं. माझंही चार-पाच वर्षात मिरजेला जाणं झालं नाहीये. फर्मानकट्ट्याच्या विहिरीत आता कदाचित पुढची पिढी सूर आणि मुटके मारत असेल आणि असेच कोणी नाना नव्या मुलांना पोहायला शिकवत असतील. तिथून सुरु झालेला माझा जलप्रवास अजूनही सुरु आहे आणि माझ्या मुलाला पोहायला शिकवून तो पुढे चालू ठेवीन अशी आशा मी बाळगून आहे.

चतुरंग

समाजजीवनमानराहणीप्रकटनविचारलेख

प्रतिक्रिया

एक's picture

26 Jun 2009 - 10:46 pm | एक

"..गेले तीनचार उन्हाळे इथे अमेरिकेच्या अटलांटिक किनार्‍यावर पोहोण्याची संधी मी घेतली. पण इथलं पाणी मरणाचं थंडगार असतं! ऐन उन्हाळ्यातही बाहेरचे तपमान ३५ डिग्री सें. असतानाही पाणी जेमतेम १२-१३ डिग्री सें असते..."

वेस्टकोस्टला पॅसिफिक ला पण हिच तर्‍हा आहे. भयानक गार पाणी. मला फक्त दोनदा थंडी जाणवते..पाण्यात पहिल्यांदा शिरल्यावर आणि बाहेर आल्यावर..
एकदा डोकं भिजलं की थंडी वगैरे काही वाजत नाही आणि बाहेर आल्यावर स्टारबक्स ;) फिर कायको टेन्शन! मज्जानू लाईफ!

"समुद्रस्नान हे अतिशय उत्साहदायी असते हा माझा आजवरचा अनुभव आहे. शरीराचा आणि मनाचा सगळा शीण घालवून टाकण्याचे एक जबरदस्त सामर्थ्य
त्यात असते."

१००००% सहमत.. या विकेंड ला परत एक ट्रीप होणार.

भाग्यश्री's picture

26 Jun 2009 - 11:16 pm | भाग्यश्री

अप्रतिम लिहीलंत हो चतुरंग!!
मी ८ वर्षाची असताना लक्षद्वीपला अरबी समुद्रात लाईफ जॅकेट घालून एका आजोबांनी मला ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोक शिकवले.. ते माझं पहीलं पोहोणं!
नंतर प्रत्येक सुट्टी इतकी सही गेली! पहीला व्यवस्थित डाईव्ह जमला तो दिवस अजुनही आठवतो मला! जबरी आनंद झालेला मला! :) अजुन बटरफ्लाय नाही जमत.. तुमचा तुम्ही कसा शिकलात?? :|

अजुन नदीत आणि विहीरीमधे पोहायचा चान्स नाही मिळाला..
इथे पॅसिफीक बेकार आहे.. पण 'एक' यांचा उपाय ट्राय करून बघावा! :)

मस्त लेख!!

http://www.bhagyashree.co.cc/

विनायक प्रभू's picture

27 Jun 2009 - 9:25 am | विनायक प्रभू

ब्रेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक,फ्री स्टाईल आवडतात.
पण जानसे प्यारा फ्रॉग स्ट्रोक (स्टाइल)

पाषाणभेद's picture

1 Jul 2009 - 1:17 pm | पाषाणभेद

फ्रॉग स्ट्रोक म्हणजे कुठला स्ट्रोक?
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

रामपुरी's picture

26 Jun 2009 - 11:38 pm | रामपुरी

पंचगंगेत पोहायला जायचे दिवस आठवले. पलिकडच्या काठाला जाउन लाल माती अंगाला लावून पडून रहायचे. मनसोक्त मृत्तिकास्नान आणि सुर्यस्नान झाले कि परत. तसंच वाडीची कृष्णा नदी. पावसाळ्यात कृष्णा नदीत पोहोणं म्हणजे आव्हानच असतं. केवढीतरी ओढ असते पाण्याला. छान आठवणी जाग्या केल्यात. मनापासून धन्यवाद.
अवांतरः समुद्रापेक्षा नदीत पोहायलाच मजा येते. समुद्रात उगिच दंगाच जास्त करायचा. तरणतलावात तर अगदीच अडीनडीला, पाण्याची आठवण आली आणि नदी जवळपास नाही, म्हणूनच जायचं. :)
परत एकदा धन्यवाद.

अनामिक's picture

26 Jun 2009 - 11:57 pm | अनामिक

लेख मस्तंच आहे...
एक खंत म्हणजे मला अजूनही पोहायला येत नाही... आणि या समरमधे शिकायचा प्रयत्न तरी करावा असं ठरवूनसुद्धा अजून पाण्यात उतरलो नाहीये!

-अनामिक

स्वाती२'s picture

27 Jun 2009 - 12:58 am | स्वाती२

मस्त लेख. पोहायला येत नाही ही माझीही खंत आहे. अगदी महाराष्ट्र मंडळात क्लास लाऊनही सुट्टे पोहता येत नाही. मुलगा जेव्हा पोहायला शिकला तेव्हा त्याचा चक्क हेवा वाटला होता.

Nile's picture

27 Jun 2009 - 3:04 am | Nile

तुमचं आणि आमचं सगळं सेम कसं काय बुवा? नगर, सांगली ,वाडी,,मिरज, सगळंच! :)

मि असाच ५-६ वर्षांचा असताना येतं येतं म्हणुन भीमेत उडी मारली अन थेट खाली!
३-४ आठवडे मला ते मी ओरडलेले बुडबुडे, मासे वगैरे दिसत होतं स्वप्नात! पण पोहोण्याचा मुहुर्त काही लागत नव्हता.

नुकतंच स्वतः हुन शिकलो इथे. कालच ७०० मीटर पोहलो आता वाट लागलीये! :D

मी स्वतःहुन कसा शिकलो ते इथे लिहलं आहे. कुणाला मदत झालीच तर अजुन काय हवं?

चतुरंगांचा धागा हायजॅक केल्याबद्दल माफी मागतो. :)

संदीप चित्रे's picture

27 Jun 2009 - 3:26 am | संदीप चित्रे

आत्ता जरा गडबडीत आहे.. सविस्तर नंतर बोलतो / लिहितो.

विसोबा खेचर's picture

27 Jun 2009 - 8:08 am | विसोबा खेचर

जलयात्रा आवडली रे रंगा.. :)

तात्या.

सहज's picture

27 Jun 2009 - 8:29 am | सहज

छान!

नाव वाचून वाटले होते की बहुदा लक्झरी क्रुझ किंवा (एडमिरल अब्रोमोव्हीच सारख्या )प्रायव्हेट यॉट्/याच(yacht) मधुन प्रवासवर्णन वगैरे असावे :-)

अनिता's picture

27 Jun 2009 - 8:29 am | अनिता

<छान!
असेच..
अवा॑तरः (माझा जलप्रवास! )
धब्ब् SSS बूडू़क... स्स्स्स्स ...ग्लग्..ग्लग्..आऑ..बूडू़क बूडू़क..वाचवा..
न॑तर सगळ्या॑नी जाम झापले..

मुक्तसुनीत's picture

27 Jun 2009 - 8:40 am | मुक्तसुनीत

लेख खूप आवडला. लेख पोहोण्याबद्दल आहेच. पण पोहोणे , पाण्याशी केलेली दोस्ती , विविध ठिकाणचे अनुभव , आजूबाजूचे वातावरण , माणसे.... एखादा चित्रपट पहात होतो असे वाटले.

तुमचा मागचा पतंगांवरचा लेख आणि हा पोहोण्यावरचा. दोन्ही अतिशय आवडले. हे लेख केवळ त्या त्या गोष्टींपुरते मर्यादित नाहीत. माझ्यालेखी ते अस्सल लिखाणापैकी आहेत. फारच सुरेख, चित्रदर्शी शैली, रसाळ वर्णन.

फार फार जुन्या गोष्टींमधले रंगरूपगंधादि सेंद्रिय अनुभव एखाद्या लिखाणात क्वचितच इतके जिवंत झालेले दिसतात. भरभरून जगण्याचा अनुभव पुरेपूर लिखाणात आला. मनःपूर्वक अभिनंदन.

सहज's picture

27 Jun 2009 - 4:56 pm | सहज

चतुरंग यांचे लिखाण अतिशय अस्सल व गेले काही लेख बघता दर्जा दर लेखागणिक उंचावतच आहे.

चित्रा's picture

1 Jul 2009 - 6:49 pm | चित्रा

अगदी अचूक.

लेख खूप आवडला.

टारझन's picture

27 Jun 2009 - 8:57 am | टारझन

चतुरंग सर ,
ह्या विषयावर लिहील्याबद्दल व्यक्तिगत आभार !!
लहाणपणी आम्ही ४-५ तास पोहत असू ... एक गेम असायचा .. विहिरीच्या एका कडेवरून ज्यावर राज्य आहे तो बाकिंना पकडायला येत असे ... बाकी सगळे दुसर्‍या टोकाला असंत .. खोल बुडी मारत पुण्हा विरूद्ध टोकाला पोचलो की आपण सुटलो .. ज्याला पकडला त्याच्यावर राज्य १!!! मी कधीच सापडलो नाही !! पण मी हैशेने राज्य घ्यायचो .. खोल बुडी मारण्यात आपण मास्टरी मिळवलेली :)

(पेटा लाऊन पोहायला शिकलेला) टारझन

अमोल केळकर's picture

27 Jun 2009 - 10:03 am | अमोल केळकर

आपल्या या लेखाने , शाळेत असताना सांगलीला कृष्णेच्या पुराच्या पाण्यात आयर्वीन पुलावरुन ( माचीवरुन ) काका, चुलत भाऊ यांच्या बरोबर मारलेल्या उड्या आणि पोह्त गाठलेला विष्णू घाट हे सर्व आठवले.
जुन्या स्मृतींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

ऋषिकेश's picture

27 Jun 2009 - 10:24 am | ऋषिकेश

वाह! पाणी हे असं रसायन आहे जे कवटाळणार्‍याला आनंदाने भिजवून टाकते :)
पोहणे ही माझ्यासाठी (झोपण्यानंतरची ;) ) सगळ्यात आनंदादायी गोष्ट! विहीरीपासून ते समुद्रापर्यंत वेगवेगळ्या जलतीर्थांमधे पोहण्याची मजा वेगवेगळी..

जलतरणावरचा असा आतून आलेला लेख खूप आवडला..

(ओलाचिंब)ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

विद्याधर३१'s picture

27 Jun 2009 - 10:35 am | विद्याधर३१

तुमचा जलप्रवास वाचला आणी मिरजेमध्ये घालवलेल्या ३ -४ आनंदी वर्षांची आठवण झाली. माझे आजोळ ब्राम्हणपूरीमध्येच आहे. खाडीलकर गल्लीच्या जवळ...
सांगली मिरज आणी वाडी छान आठ्वणी जाग्या झाल्या ... धन्यवाद...

विद्याधर

सुचेल तसं's picture

27 Jun 2009 - 10:35 am | सुचेल तसं

अप्रतिम लेख.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Jun 2009 - 12:59 pm | बिपिन कार्यकर्ते

रंगा, मस्तच लिहिलंय रे. तू अगदी बोटाला धरून त्या काळात / भागात फिरवून आणतोस. आपण वाचतोय असं वाटतंच नाही. तुझ्या बरोबर फिरतोय असं वाटतं. क्लास... फ्रिक्वेंसी वाढवा जरा जमल्यास.

मी कधी नदीत पोहलो नाहीये अजून. पण तलावात आणि विहिरीत मात्र बर्‍यापैकी पोहलो आहे. पुण्याला महाराष्ट्रीय मंडळाच्या विहिरीत पोहायला शिकलो होतो. पहिल्या दिवशी त्या सरांनी पाठीला लाकडी ठोकळा वगैरे बांधला. तसंच २-३ दिवस पाण्यात बागडू दिलं. आणि मग एक दिवस म्हणे की चला आता विहिरीत. ठोकळा नको, मी हात धरतो म्हणाले. काठावर माझ्या बाजूला उभे राहिले. हात वगैरे धरला (माझी चूक झाली की मी त्यांचा हात नाही धरला, त्यांनी माझा हात धरला) आणि म्हणाले मार उडी. मी कसली उडी मारतोय? खाली काळेशार पाणी. तेवढ्यात त्यांनी दिले मला ढकलून आणि माझ्या मागोमाग स्वतः उडी मारली. पाणी खूप खोल होते. किती खाली गेलो होतो कुणास ठाऊक पण भयानक घाबरलो होतो हे नक्की. पण नंतर आले पोहायला. आठवण जागवलीस रे.

बिपिन कार्यकर्ते

नंदन's picture

27 Jun 2009 - 1:39 pm | नंदन

लेख मस्त आहे, सुरेख रंगला आहे. चौथीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेतल्या शिक्षकांनी कांदिवलीच्या सरदार पटेल तरणतलावात घेतलेलं शिबिर, खाल्लेल्या गटांगळ्या आणि धीर एकवटून पंधरा फुटांवरून मारलेल्या उडीनंतर झालेला आनंद ह्या सगळ्या आठवणी पुन्हा जागवल्या लेखाने.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jun 2009 - 2:57 pm | परिकथेतील राजकुमार

एकदम खळखळीत लेखन.
पाण्याच्या आठवणींत मस्त डुबकी मारुन आणल्याबद्दल धन्यवाद हो रंगाशेठ.

º°¨¨°º© जलपरा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

टारझन's picture

27 Jun 2009 - 3:54 pm | टारझन

हीच प्रतिक्रिया "मास्तर"च्या एखाद्या लेखाला देऊन पाहिली ..
आणि हा परा कसल्या पाण्यात डुंबत असेल ह्याचा विचार करून अंमळ हसू आलं

- ( जलजिरा ) टारमासा

सुनील's picture

27 Jun 2009 - 4:48 pm | सुनील

व्वा झक्कास लेख, चतुरंगराव!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गणा मास्तर's picture

27 Jun 2009 - 4:51 pm | गणा मास्तर

रंगाशेठ , मस्त आठवणी जागवल्यात.
मी १२ वीच्या सुट्टीत पवनानदीमध्ये पोहायला शिकलो. माझा जिगरी दोस्त शिकवायचा. मित्राकडे जातो म्हणुन सांगायचो. घरी कोणाला काय पत्ता नसायचा.
ऑइलचे रिकामे डबे लावुन पोहायला शिकलो. महिन्याभरानंतर घरी सांगीतले तर सगळे आवाक. मग काय वडीलपण पोहायला सोबत येउ लागले.
पण जलतरण तलावात नदीसारखी मजा येत नाही.

इथे जपानला आल्यावर एक गोष्ट पाहिली. शनिवार , रविवारी चिल्ली पिल्ली पोर आणि त्यांचे आई बाप पोहायला गर्दी करतात.
फक्त पपा, ममा आणि इतर दोन चार शब्द बोलणारी चिमुरडी पोर पोहताना पाहुन त्यांचा हेवा वाटला.
गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

यशोधरा's picture

27 Jun 2009 - 5:11 pm | यशोधरा

अतिशय सुरेख लेख. खूपच आवडला!

बाकि आम्ही पोहण्यापुढे २-४ गटंगळ्यामारल्यावर हात टेकले.. दोन्हि पोरांना मात्र शिकवलय..

क्रान्ति's picture

27 Jun 2009 - 6:29 pm | क्रान्ति

अगदी सहज, समोर बसून मनमोकळ्या गप्पा सुरू आहेत, असा भास होतोय लेख वाचून! मस्त शैली!
अवांतर :- आमचं फक्त नळाच्या आणि टाकीच्या पाण्याशी सख्य!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

स्वाती दिनेश's picture

27 Jun 2009 - 6:36 pm | स्वाती दिनेश

आमच्या अंगणातल्या मोठ्ठ्या विहिरीत मोडककाका सगळ्यांना पोहोणे शिकवत असत, त्यावेळी आमच्या पूर्ण बिल्डिंगमध्ये एकही जण असा नव्हता की त्याला/तिला पोहोता येत नसे.
उन्हाळ्याच्या सुटीत रोज आणि कधी लहर आलीच तर एखाद्या रविवारी सकाळी सगळे जण पोहायला उतरायचे..
आता ना मोडककाका, ना ती बिल्डिंग, ना ती विहिर राहिली.. फक्त आठवणी उरल्यात..
स्वाती

आनंद घारे's picture

27 Jun 2009 - 6:53 pm | आनंद घारे

माझ्याही लहानपणच्या आठवणी जीवंत झाल्या. आम्ही सर्व भावंडेसुद्धा विहिरीतच पोहायला शिकलो. फक्त त्यावेळी कोणी एक नाना नव्हते. एकत्र कुटुंबात घरातच मुलांची रांग असायची. कॉलेजमध्ये शिकणारी मोठी भावंडे सुटीला घरी आली की सगळ्या लहान भावंडांना घेऊन गावाजवळच्या एकाद्या मळ्यातल्या विहिरीवर घेऊन जात असत. तिथे अनेक उत्साही नाना भेटत आणि नवशिक्या पोरांना हातपाय मारायला शिकवत. पोहून आल्यानंतर पोटात भुकेचा नुसता डोंब उसळायचा आणि क्षुधाशांतीची लय्यत तयारी घरी केलेली असायची.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

शाल्मली's picture

27 Jun 2009 - 7:29 pm | शाल्मली

सुंदर लेख!
अह्हाहा.. पोहणे ही माझी आवडती गोष्ट आहे.
आम्ही सकाळी ६ च्या बॅचला पोहायला जात असू.. झोप सोडून उठण्याचा, तलावापर्यंत जायचा खूप कंटाळा यायचा.. पण एकदा पाण्यात उतरलं की बाहेरच पडू नये असं वाटायचं ..

झाडावर चढणे, पोहोणे आणि सायकल चालवता येणे हे रोटी, कपडा, मकान प्रमाणेच जीवनावश्यक गरजात मोडते असे माझे मत आहे!
अगदी पटलं :)

--शाल्मली.

लिखाळ's picture

27 Jun 2009 - 10:30 pm | लिखाळ

वा .. एकदम झकास लेख :)
मला स.प.च्या तलावामध्ये बुडण्याचा एक लाहनसा अनुभव आहे ;) त्याची आठवण झाली .
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

अजय भागवत's picture

27 Jun 2009 - 11:05 pm | अजय भागवत

फर्मानपट्टा ते अटलांटा जलप्रवास सुळसुळीत झाला आहे. मजा आली वाचतांना.
डालडा व तत्सम डब्यांना जस्ताचे डाग देऊन पोहायचे डबे करुन आम्ही आणायचो ते आठवले.
पाण्यावर पुर्णपणे आडवे हल्चाल न करता तरंगता आले की खूप मजा येते.

शितल's picture

28 Jun 2009 - 8:22 am | शितल

चतुरंगजी,
तुमचा जलप्रवास आवडला. :)

डॉ.प्रसाद दाढे's picture

28 Jun 2009 - 11:20 am | डॉ.प्रसाद दाढे

पाण्याच्या आठवणी आवडल्या! पोहायला आणि सायकल चालवायला
लहानपणीच शिकणं सोपं जातं, प्रत्येक मुलाला आलंच पाहिजे

उपास's picture

30 Jun 2009 - 11:31 pm | उपास

चतुरंग, मस्त झालाय लेख आणि अगदी समयोचित!
मी गिरगावात मफतलाल मध्ये शिकलो पोहायला इतक्या लहानपणी की कधी ते आठवत देखील नाही. कधीही हुक्की आली की बाजूला गिरगाव चौपाटीत समुद्रात झोकून द्यायचो, विशेषतः फुटबॉल खेळून चिखलात बरबटलो की... रम्य दिवस आठवले!
एकदा ६वी /७ वीत असताना सातार्‍याला माऊली ग्रामी गेलो होतो उत्सवाला तेव्हा कृष्णेत गेलो डुंबायला, वळीव सुरु झाला होता नुकताच आणि नदीच्या पाण्याचा सराव नाही. मरता मरता वाचलो :-) किनार्‍यावरच्या मोठ्या पोरांनी उड्या मारल्या मी मिळतोय का बघायला आणि कपडे धुणार्‍या बायकांची आरडाओरड सुरु "मुलगा चाल्ला पाण्यातून.." पण मी काटकुळ्या हातांनी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत आलो.. अजून आठवलं की धडकी भरते.. :-) तेव्हापासून कानाला खडा अनोळखी ठिकाणी पाण्याशी मस्ती नाही
तुमचा लेख पुनश्च आवडला, जुन्या आठवणी जाग्या करुन गेला.

आपला अभिजित's picture

1 Jul 2009 - 2:34 am | आपला अभिजित

धमालच!

चतुरंगराव, तुमचे पोहण्याचे विलक्षण अनुभव वाचून आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले!

मला रत्नागिरीत असताना कधी पोहायला आलं नाही. एकतर आजूबाजूची पोरं दुपारी दोन ला नदीत उड्या टाकायला जायची. नि आमच्या घरातून दुपारी एक ते ४ बाहेर न पडण्याची कडक शिस्त.
पुण्यात आल्यावर चारच वर्षांपूर्वी पोहायला शिकलो. पण गेल्या वर्षी पुन्हा प्रयत्न केला, तर काही झेपत नाहीसं दिसतंय. मुळात ते आंघोळ बिंघोळ करून स्विमिंग ट्यांकात उतरायचाच वैताग येतो!
असो.
गेल्या वर्षी मुलीला शिकवण्याचाही व्यर्थ प्रयत्न केला. त्याविषयी इथे लिहिलं होतं.

मेघना भुस्कुटे's picture

1 Jul 2009 - 7:35 pm | मेघना भुस्कुटे

सुरेख झाला आहे लेख, चतुरंग.
पोहणार्‍या माणसांनी वर्णिलेला हा असा आनंद पाहिला, की माझ्या भेदरटपणाला वैतागलेल्या आई-बाबांची तोंडं आठवतात! गावाला गेल्यावर मला पोहायला शिकवायचं म्हणून बाबा विहिरीत उतरले. न राहवून मग मामा आणि आईही उतरले. आमचं ध्यान मात्र रडत रडत काठावरून गंमत बघतंय!
तसंच सायकलीचंही. आई किंवा बाबा मागे धरायला असत तोवरच माझी सायकल बरी चाले. त्यांनी हात सोडल्याचं कळलं रे कळलं की गच्छंती. शिवाय मला रस्ता पार मोकळा असावा लागे ते वेगळंच. दूSSSSSSरवर कुठेतरी एखादी रिक्षा किंवा मोटार दिसली, की तत्काळ सायकल रस्त्याच्या कडेला घेऊन मी निवांतपणे गाडीला अच्छा करत असे आणि गाडी गेली की मग सायकल हातातच घेऊन ढकलत रमतगमत पुढे चालू लागत असे. लांबवर बसलेले आई-बाबा पार वैतागायचे!
एकेकाचं नशीब असतं. :( आमच्या सायकलच्या नशिबात (आणि बहुतेक विहिरीच्याही!) मी नव्हते!

Pain's picture

17 Aug 2010 - 9:47 am | Pain

लेख फार आवडला. ह्यापुढे तो काहीच नाही.
मी माझ्या पालकांमुळे लहानपणीच शिकलो. दर उन्हाळ्याचा सुट्टीत आणि कधी इतर वेळीसुद्धा मित्रमैत्रिणींबरोबर पोहायला जायचो. मला इथल्या लोकांप्रमाणे पाण्याची नव्हे तर आधी घ्यायला लागणार्‍या टायफॉईडच्या इंजेक्शनची भीती वाटायची. कारण एकदा ते घेतले की २-३ दिवस पाय अजिबात हलवता यायचा नाही, भयंकर दुखायचा.

त्यानंतर मी बर्‍याचदा गणपतीपुळ्याच्या, हरिहरेश्वरच्या समुद्रातही पोहलो.

गणपतीपुळ्याच्या समुद्रात का आणि कसे पोहलात ? तिथे अनेक मृत्यू होतात आणि पोहू नये अशी सरकारची सूचना आहे.

नगरीनिरंजन's picture

17 Aug 2010 - 11:31 am | नगरीनिरंजन

छान लिहीलंय!
नगरचा जलतरण तलाव, केडगावची विहीर, हिंगण्यातला कालवा आणि बर्‍याच ठिकाणच्या समुद्रात झालेलं पोहणं आठवलं.
सध्या फक्त जलतरण तलावातच पोहणं होतंय.