एक सकाळ - मुंबईतली आणि अमेरिकेतली

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
27 Jan 2009 - 12:56 pm

गेले सोळा आठवडे अमेरिकेत राहून नुकताच मी मायदेशी परत आलो. साहजीकच मला अमेरिका कशी वाटली असे लोक विचारतात, त्याचे उत्तर काय द्यावे याचा विचार पडतो. तिकडे ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्यांना त्या चांगल्या आहेत असे कोणी म्हंटले की "तंकडचं सगळं लय भारी हाय हे आयकून आमाला आत्ता कंट्टाला आला हाये!" अशी प्रतिक्रिया एकाद्याकडून येते किंवा त्याचा बादरायण संबंध आपली संस्कृती, अस्मिता वगैरेशी जोडून राष्ट्राभिमान, देशभक्ती, धर्मनिष्ठा वगैरेवरले बौध्दिक दुसरा कोणी सुरू करतो. तिकडले जे आवडले नाही त्याला कोणी नांवे ठेवली की "याला त्यातलं कांही कळतंय् का ?" असा भाव तोंडावर आणून आणि 'कोल्ह्याला द्राक्षे आंबट' किंवा 'गाढवाला गुळाची चंव काय?' या म्हणीसकट त्या सांगणार्‍याची कुवत, समज, आवडनिवड वगैरेचा निकाल लावून वर आपली संकुचित मनोवृत्ती सोडून देऊन आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन त्याच्या कक्षा रुंदावण्याचा सल्ला वगैरे त्याला देणारा एकादा भेटतो. हे असेच चालायचे, त्यापेक्षा "घरोघर मातीच्या चुली" या चालीवर "तिकडं
सुध्दा बहुतेक सगळं आपल्यासारखंच आहे हो." असे आधी सांगून जे फरक ठळकपणे जाणवले तेवढे एक एक करीत सांगायचे हे बेश वाटते.

"रोज उगवणारा नवा दिवस वेगळाच असतो." असे कोणीतरी म्हंटले आहे. नसेल म्हंटले, तर ते कदाचित मलाच सुचले असेल! पण तरीसुध्दा काल, परवा आणि आज यात बरेच साम्य असते. त्यामुळे एकाद्या सर्वसामान्य दिवशी आपण काय काय केले असेल याचा एक अंदाज आपल्याला असतो. अशाच एका साधारण सकाळी मी इथे राहतांना रोज काय करतो आणि अमेरिकेत असतांना काय करत होतो हे असे कितीसे वेगळे असणार आहे? मुंबईत जो सूर्य उगवतो तोच अल्फारेटालाही उगवतो आणि घरातली माणसे त्यांना लहानपणापासून लागलेल्या संवयी बदलण्याइतकी अमेरिकाळली नाहीत. उठल्यानंतर पांघरुणाची घडी करून ठेवणे, शौचमुखमार्जनादि विधी, चहापान, न्याहरी, दाढी, आंघोळ, कपडे बदलणे वगैरे सारे कांही अंगवळणी पडलेल्या संवयीनुसार सकाळी होत असे. बाहेर अमेरिका असेल, पण घराच्या चार भिंतीच्या आंत तर आमचेच राज्य होते. त्यातून जे कांही किरकोळ फरक जाणवले तेवढे या जागी सांगायचा विचार आहे.

"सकाळी सर्वात आधी कोंबड्याला जाग येते, तो आरवून जगाला उठवतो आणि त्यानंतर सूर्य उगवतो." असे शाळेतल्या पुस्तकात वाचले होते तसेच लहानपणी लहान गांवातच कधी कधी ऐकले आणि पाहिलेही होते. पण आमच्या गांवातले कांही व्रात्य कोंबडे मात्र चांगले दिवसा उजेडीसुध्दा ऐटीत आपली मान उंचावून "कुकूचकू" करीत अंवती भोवती "कॉक कॉक" करत घुटमळणा-या कोंबड्यांवर आपली छाप मारायचा चावटपणा करायचे. त्यामुळे त्यांच्या आरवण्यावर माझा विश्वास उरला नव्हता. एका वैतागलेल्या म्हातारीने आपल्या कोंबड्याला झाकून ठेऊन सूर्याला उगवू न देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता म्हणे. "पुण्यातील यच्चयावत म्हातार्‍यांनी एकजुटीने आपापल्या कोंबड्यांना टोपलीखाली झाकून ठेवल्यामुळे तिथले लोक आळशी होऊ लागले होते आणि त्यांना जागृत करण्यासाठी श्रीमंत पेशवे सरकारने शनिवारवाड्याच्या नगारखान्यात रोज पहाटे चौघडा बडवण्याची व्यवस्था केली होती." असे सोमाजी गोमाजी थापाडे यांच्या बखरीत नमूद केले आहे असे म्हणतात. "दुडुम दुडुम वाजतो नगारा दुडुम दुडुम वाजतो । साखरझोपेतून पुण्याला जागे करू पाहतो ।।" या 'आठवणीतल्या गाण्या'त त्याचे छान वर्णनसुध्दा जुन्या काळातल्या कवीने केले आहे. मुंबईत आल्यानंतर इथे मात्र सकाळी उठायच्या वेळी कोंबड्याचे "कुकूचकू" किंवा नगार्‍याचे "दुडुम दुडुम" यातले कांहीच कानावर पडले नाही.

पण लोकांना सकाळ झाल्यानंतर निवांतपणे झोपून राहू न देण्यासाठी इतर प्रकारच्या ध्वनिसंयोजनांची उत्तम व्यवस्था मुंबईत आहे. माझ्या घराशेजारीच असलेल्या झाडावर रोज सकाळी भल्या पहाटे स्थानिक कावळ्यांची शाळा भरते आणि त्यातले विद्यार्थी आपापल्या वेगवेगळ्या भसाड्या सुरात बराच वेळ प्रार्थना म्हणत असतात. ते कधी श्वास घेण्यासाठी थांबले तर चिमणीपाखरांचा नाजुक चिवचिवाट आणि मधुर किलबिलसुध्दा ऐकू येतात. आमच्या गल्लीतली सगळी बेवारशी कुत्री बहुधा रोज सकाळी आमच्या
गेटपाशी येऊन भुंकण्याची स्पर्धा सुरू करतात. पण त्यांना वेळेचे एवढे भान नसल्यामुळे ते रात्री अपरात्री केंव्हाही केकाटायला लागतात. या आवाजांनी झोपमोड झाली तरी कानावर पांघरूण लपेटून पडून राहता येते, पण दूधवाला किंवा पेपरवाला यांनी दारावर ठकठक केले की लगेच अंथरुणातून उठून दरवाजा उघडावा लागतो आणि आमच्या दिवसाची सुरुवात होते. कधी कधी त्यातले कोणी आल्याचा नुसता भास होतो आणि मी स्वतःच उठून ते येण्याची वाट पहात बसतो. त्यांनी दांडी मारली हे उमजल्यावर खाली उतरून दूध किंवा वर्तमानपत्र घेऊन येतो.

सायकलच्या कॅरियरवर वर्तमानपत्रांचा अजस्त्र गठ्ठा ठेऊन किंवा हँडलच्या दोन्ही बाजूंना दुधाच्या पाकिटांनी भरलेल्या अवजड पिशव्या अडकवून त्यांचा तोल सांभाळत सायकल चालवण्याची सर्कस करणारे कित्येक सायकलपटु रस्त्यावरून येताजातांना दिसतातच. शिवाय दुधाच्या पिशव्यांची चळत किंवा चार भाषांमधील वीस पंचवीस दैनिकांचे गठ्टे रस्त्यावरच समोर मांडून ठेऊन विकणारे विक्रेते चौकाचौकात बसलेले असतात. हे दृष्य पाहूनच ही सकाळची वेळ असल्याचे निश्चितपणे लगेच लक्षात येते.

अमेरिकेत यातले कांही म्हणजे कांहीसुध्दा नव्हते. तिथे कोंबड्यांची संख्या निदान माणसांएवढी तरी असावी असे तिथल्या हॉटेलातली मेनूकार्डे वाचल्यानंतर वाटते, पण "कुकूचकू"किंवा "कॉक्कडूडल्डू" करणारा जीवंत कोंबडा माझ्या वास्तव्यात माझ्या नजरेला कधीच पडला नाही. पूर्वी उघडपणे आचरणात येणारा वर्णद्वेष पाहून अमेरिकेतल्या मूळच्या कावळ्यांनी तेथून पळ काढला असावा आणि कांही गौरवर्णीय लोकांच्या मनात तो अजून असल्याच्या शंकेमुळे भारतातील कावळ्यांनी अमेरिकेच्या ग्रीन कार्डसाठी अद्याप अर्ज केले नसावेत. त्यामुळे तिकडच्या लोकांना कावळा हा पक्षी प्रत्यक्ष पाहून माहित नसावा. तिथल्या एका मराठी चिमुरडीला मी काऊचिऊची गोष्ट सांगितली. म्हणजे चिऊचं घर होतं मेणाचं आणि काऊचं घर होतं शेणाचं ... वगैरे वगैरे. तिला ती कितपत समजली कुणास ठाऊक! नंतर मी तिला सहज विचारले, "काऊ कसं ओरडतो तुला ठाऊक आहे?" तिने लगेच आपली मुंडी नंदीबैलासारखी हलवत उत्तर दिले "मूँऊँऊँऊँऊँ." तिकडची चित्रांची पुस्तके आणि बालचित्रवाणी पाहून तिला 'काऊ' म्हणजे
गाय हेच माहीत होते. गोमातेला सुध्दा तिने प्रत्यक्षात कधी पाहिलेले नव्हतेच. झाडांवर बसणारे कावळेच अस्तित्वात नसल्यामुळे त्यांची शाळा कुठून भरणार?

रस्त्यातल्या भटक्या कुत्र्यांना बिस्किटे खायला घालून पुण्यसंपादन करणारे पुण्यश्लोक तिकडे नसतात आणि शिळे झालेले अन्न उघड्या उकिरड्यावर टाकायची सोयसुध्दा तिकडे नाही. तिकडल्या पाळीव कुत्र्यांसाठी सुग्रास, रुचकर आणि पौष्टिक श्वानान्न (डॉगफूड) बनवून ते अतिशय आकर्षक अशा डब्यातून महाग दराने पुरवले जाते पण त्यातला एकादा कुत्रा साखळी तोडून रस्त्यावर आला तर त्याला मात्र खाण्यासाठी अन्नाचा कणसुध्दा मिळू शकणार नाही अशी परिस्थिती असल्यामुळे बेवारशी कुत्र्यांची समस्या तिकडे निर्माण झाली नाही. अनेक लोकांकडे त्यांची लाडावलेली कुत्री असतात, पण शेजा-यांना ऐकू जाणार नाही अशा बेताने ती हळू हळू भुंकत असावीत. अशा कारणांमुळे "सकाळ झाली" असे जाहीर करणारा कोणताच ध्वनि तिकडल्या वातावरणात भरलेला नसतो.

एका हातात गरमागरम चहाचा कप धरून तो घोट घोट पीत असतांना दुस-या हातातल्या वर्तमानपत्रातल्या ताज्या बातम्या वाचण्यात केवढे सुख असते याचा शोध त्या लोकांना अजून लागला नसावा. बिचारे दिवसातून वेळ मिळेल तेंव्हा टीव्हीवरच्या बातम्या पाहतात आणि अधिक तपशील हवासा वाटल्यास त्यातच दिलेल्या जाहिरातीवरून इंटरनेटवरील स्थळ शोधून त्या ठिकाणी ती बातमी वाचतात. रोज सकाळी हिंडून घरोघरी ताज्या पेपरचा रतीब घालणारी पोरे तर तिथे नसतातच, नियतकालिकांची आणि रद्दीचीही वेगळी दुकाने सुध्दा नसतात. मोठ्या मॉल्सच्या किंवा विमानतळांच्या प्रवेशद्वारापाशीच वर्तमानपत्रे विकण्याचे एकाद दुसरे यंत्र ठेवलेले असते, त्यात नाणी किंवा नोटा सरकावून आपल्या आपणच तिथला पेपर उचलून घ्यायची सोय असते. ती देखील बहुधा वृत्तपत्रवेड्या परदेशी लोकांसाठीच केलेली असावी. तिथला स्थानिक रहिवासी तिथून पेपर
उचलतांना मला तरी कधी दिसला नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर सकाळचे ताजे वृत्तपत्र तिकडे सहजासहजी मिळत नाही, घरबसल्या तर नाहीच नाही.

दुधाची परिस्थिती किंचित वेगळी असली तरी त्याच धर्तीची आहे. चहाकॉफीमध्ये तिकडे सहसा दूध घालत नाहीत आणि घातलेच तर ते अत्यल्प प्रमाणात. दुधापासून दही, ताक, लोणी, तूप आदि पदार्थ घरच्याघरी बनवता येतात असे तिकडे समजले जात नाही. ताक आणि तूप या गोष्टी त्यांच्या खाण्यात नसतातच. क्रीम, योघर्ट, बटर, चीज आदि दुग्धजन्य पदार्थ डेअरीमध्ये तयार होतात आणि पॅकबंद अवस्थेत दुकानात विकत मिळतात. त्यासाठी लागणारे दूध गायींच्या थनातून यंत्राद्वारे काढले जाऊन ते थेट तेथील संयंत्राच्या टाकीत जमा होते आणि प्रक्रिया करून झाल्यानंतर वेगवेगळ्या पदार्थांच्या रूपाने बाहेर येते. त्यामुळे धारोष्ण दुधाची चंव कशी असते ते तिकडे कुणाला माहीत असायची शक्यता कमीच आहे. आजकाल मुंबईतल्याही बहुतेक मुलांनाही त्याची कल्पना नसते. गोरेगांवच्या आसपास राहणा-यांना कदाचित असेल आणि कांही मुलांनी सुटीत बाहेरगांवी गेलेल्या वेळी ती घेतली असली तर असेल. अमेरिकेत मात्र निरसे दूध पहायलासुध्दा मिळणार नाही. ज्या थोड्या लोकांना दूध विकत घ्यायचे असते त्यांच्यासाठी
दोन टक्के, चार टक्के अशा स्निग्धांशाच्या टक्केवारीने ओळखले जाणारे प्रक्रिया केलेले दूध एक गॅलन म्हणजे सुमारे चार लिटरच्या मोठ्या कॅनमध्ये मिळते. ते विकण्यासाठी रामा गवळी किंवा रामाश्रय यादव अशा लोकांची दुधदुभत्याची वेगळी दुकाने नसतात. वॉलमार्ट, कॉस्टको यासारख्या अस्ताव्यस्त पसरलेल्या स्टोअरमध्ये अवाढव्य आकाराच्या शीतकपाटात हे कॅन ठेवलेले असतात. आठवड्याच्या किंवा पंधरवड्याच्या खरेदीसाठी तिथे जाणारे लोक एका वेळी त्यातले दोन तीन कॅन उचलून आणतात आणि घरातल्या शीतकपाटात नेऊन ठेवतात. एक कॅन उघडल्यानंतरसुध्दा रोज लागेल तेवढेच दूध त्यातून काढून घेतात. एका कॅनवरील तारीख पाहून ताज्या कॅनमधून काढलेले आणि उघडून ठेवल्यानंतर दहा बारा दिवस घरात पडलेल्या जुन्या कॅनमधले दूध मी सहज कुतूहल म्हणून चाखून पाहिले. दोन्ही दुधे सारखीच बेचव लागली. त्यामुळे तिकडे असेपर्यंत मला दूध पिण्याची इच्छा कधी झाली नाही. पण या दुधावर कसली प्रक्रिया केलेली असते कोण जाणे कधीही ते तापवतांना नासून फुटले बिटले नाही. त्यामुळे ते केंव्हाही आणले जाते आणि तापवले जाते. त्याचा प्रातःकालाशी संबंध राहिलेला नाही.

उतारवयाची चाहूल लागल्यापासून मी रोज सकाळी दोनतीन किलोमीटर पायपीट करून येतो. अमेरिकेत असतांनासुध्दा तो परिपाठ चालू ठेवला होता. आम्ही तिथे पोचलो त्या वेळी तिकडले हवामान फारच प्रसन्न होते. सर्व इमारतींच्या आजूबाजूला 'हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे।' पसरलेले होते, त्यावर अधून मधून फुललेली शेवंतीच्या फुलांसारखी दिसणारी पिवळी फुले 'त्या सुंदर मखमालीवरती' छान खुलून दिसायची, सा-या मोकळ्या जागा वृक्षलतापल्लवी यांनी भरून गेल्या होत्या,
साधारणपणे हिरव्या पण वेगवेगळेपणा असलेल्या त्यांच्या रंगांवर लाल, पिवळ्या रंगांच्या विविध छटा उमटू लागल्या होत्या. त्या फारच मोहक दिसत होत्या. कांही झाडांना लिंबाएवढी मोठी काटेरी फळे हजारोंच्या संख्येने लगडली होती तर कांही झाडे गुंजेसारख्या लालबुंद बारीक फळांनी झांकून गेल्यासारखी दिसत होती. कसलाही दर्प, धूर आणि धूळ यांविरहित शुध्द हवा तनामनाला तजेला आणणारी होती. त्यामुळे फिरायला जाण्यात व्यायामाबरोबर निसर्गसौंदर्य पाहण्याचा आनंदही मिळत होता. पण ही परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. हवेतल्या गारव्याचा गारठा झाला आणि थंडीचा कडाका वाढत गेला. संपूर्ण झाडेच्या झाडेच लाल, पिवळ्या, सोनेरी, केशरी वगैरे रंगांत न्हाऊन निघाली, पण कांही दिवसांतच त्यांची सारीच्या सारी पाने गळून ती निष्पर्ण झाली आणि त्यांच्या फांद्यांचे भयाण वाटणारे सांगाडे तेवढे शिल्लक राहिले. थंड वारे अधिकाधिक बोचरे होऊ लागले. त्यात मधूनच कधी आकाशात ढग जमून त्यातून थेंब थेंब थंडगार पाणी गळायचे , कधी पावसाच्या सरीवर सरी यायच्या तर कधी हिमवर्षाव व्हायचा. ऋतूमानातील बदलाबरोबर माझी फिरण्याची वेळ पुढे ढकलत नेली आणि अंगात घालायचे कपडे वाढत गेले. सुरुवातीला फक्त एक टीशर्ट चढवून कोवळे ऊन पडताच 'हेमंताचे दिवस मजेचे, रविकिरणांत नहाया'साठी मी बाहेर पडत होतो, तो अखेरच्या काळात फुलशर्ट, स्वेटर, जॅकेट, मफलर, कानटोपी वगैरे जामानिमा करून भर दुपारी फिरून येऊ लागलो. म्हणजे सकाळच्या वेळातून फिरून येणे हद्दपार झाले.

एवढ्या गोष्टी सोडल्या तर अमेरिकेतली सकाळसुध्दा सकाळच असायची आणि दिवसाची सुरुवात रोज तिनेच व्हायची.

देशांतरविनोदराहणीलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

मऊमाऊ's picture

27 Jan 2009 - 2:59 pm | मऊमाऊ

अगदी सहज वर्णन वाटले..पण अजूनही येऊ दे पुढे, तुलनात्मक.

मीनल's picture

27 Jan 2009 - 5:34 pm | मीनल

अगदी भारतात नेऊन सोडलत आज सकाळी.
खूप खूप छान लेख आहे.
काही चिमटे आहेत तसेच सत्यता आहे.त्यामुळे आवडला.

भारतातली सकाळ म्हणजे सक्तीने उठवणारी सकाळ वाटते.म्हणजे दुस-याची सक्ती.
अमेरिकेत म्हणजे आपण उठू तेव्हा सकाळ.आपणच आपल्यावर केली तर सक्ती. नाहीतर पडून रहा की उबदार अंथरूणात कितीही वेळ.

मज्जा आली वाचताना लेख.

मीनल.

ब्रिटिश टिंग्या's picture

27 Jan 2009 - 5:48 pm | ब्रिटिश टिंग्या

माझ्या बाबतीत उलटं आहे बॉ.....

भारतातली सकाळ म्हणजे आरामात ९ वाजता उठायचे.....चहा,नाष्ता सगळं रेडी मिळायचं.... :)
आरामात आवरुन ११ वाजेपर्यंत हपिसात चकाट्या पिटायला :)

इथे मात्र सक्तीने पहाटे ७ वाजता उठावं लागत :(
चहा नाष्ता स्वत: बनवावा लागतो......सक्तीने हपिसात जावं लागतं :(
अन् मुख्य म्हणजे हपिसात कामसुद्धा करावं लागतं :(

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

दशानन's picture

27 Jan 2009 - 5:51 pm | दशानन

ह्याच एकमेव चारपाच कारणामुळे मला आपला भारत देश प्रीय आहे.. ;)

*******
सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!!
गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी

आनंद घारे's picture

27 Jan 2009 - 6:41 pm | आनंद घारे

भारतात असो की अमेरिकेत, आपल्या मनासारखे कुठे आणि किती प्रमाणात वागायला मिळते ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असते. मीनलताई अमेरिकेतल्या घरी स्वतंत्र आहेत , भारतात आल्यावर घरात वडीलधारी माणसे असतात. आपण अमेरिकेत नोकरी वा व्यवसायात गुंतलेले असता, भारतात सुटीवर येत असणार, त्यामुळे इकडे अधिक मोकळेपणा वाटणार.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

मिसळपाव's picture

27 Jan 2009 - 5:39 pm | मिसळपाव

काका, वृत्तपत्र मिळतं की इथ. आपल्याइथल्यासारखा 'पोरया' टाकून जातो - गाडितनं मात्र! आणि दुध तापवायच्या भानगडित पडत नाहीत हाही मोठ्ठा फरक. अजुन अनुभव जरूर लिहा.

आनंद घारे's picture

27 Jan 2009 - 6:15 pm | आनंद घारे

मी अमेरिकेतल्या जॉर्जियामधल्या अल्फारेटा नांवाच्या लहानशा गांवात राहिलो होतो. तो भाग अफाट पसरलेल्या अमेरिकेचा प्रातिनिधिक नाहीच. त्या भागात मोटारीतून येऊन सरसकट सगळ्या पोस्टबॉक्सच्याजवळ स्थानिक लंगोटीपत्रांची चिटोरी टाकलेली पाहिली, पण जाडजूड प्रतिष्ठित वर्तमानपत्र मात्र पाहिले नाही.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

सहज's picture

27 Jan 2009 - 6:28 pm | सहज

पूर्वी उघडपणे आचरणात येणारा वर्णद्वेष पाहून अमेरिकेतल्या मूळच्या कावळ्यांनी तेथून पळ काढला असावा आणि कांही गौरवर्णीय लोकांच्या मनात तो अजून असल्याच्या शंकेमुळे भारतातील कावळ्यांनी अमेरिकेच्या ग्रीन कार्डसाठी अद्याप अर्ज केले नसावेत.

जीवंत कोंबडा माझ्या वास्तव्यात माझ्या नजरेला कधीच पडला नाही.

दोन्ही दुधे सारखीच बेचव लागली. त्यामुळे तिकडे असेपर्यंत मला दूध पिण्याची इच्छा कधी झाली नाही.

धारोष्ण दुधाची चंव..,

भटक्या कुत्र्यांना बिस्किटे खायला घालून पुण्यसंपादन करणारे पुण्यश्लोक तिकडे नसतात
शिळे झालेले अन्न उघड्या उकिरड्यावर टाकायची सोयसुध्दा तिकडे नाही.

तिला 'काऊ' म्हणजे गाय हेच माहीत होते.

इ इ इ सोडले तर लेख ठीकठाक.

आम्हाला ओळख असलेले घारेसर शास्त्रीय दृष्टीकोनातुन परिस्थीती समजुन घेउन सगळ्या गोष्टींवर व्यवस्थीत उपाय शोधतात. :-)
असो.

आनंद घारे's picture

27 Jan 2009 - 6:30 pm | आनंद घारे

शास्त्रीय संशोधनात आयुष्य घालवून झाल्यावर आता सर्वसामान्य माणूस बनून मराठीत जमतील ते चार शब्द सुचतील तसे लिहायचा प्रयत्न चालला आहे. कधी कधी जुनी खोड न सुटल्यामुळे 'सर्र ' वगैरे होत असेन. तेंव्हासुद्धा विज्ञान व तंत्रज्ञान यातल्या जटिल वाटणार्‍या गोष्टी साध्यासोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न मी करतो.

इ इ इ सोडले तर लेख ठीकठाक.

ते सोडल्यावर काय शिल्लक राहणार?

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Jan 2009 - 6:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त लिहिलं आहेत काका! मला आवडलं. आत्ता कुठे सकाळ झाली आहे ... तेव्हा आणखीही लिहाच.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

अनामिक's picture

27 Jan 2009 - 7:16 pm | अनामिक

काका... सहज उतरलाय लेख! आवडला!!

अनामिक

प्राजु's picture

27 Jan 2009 - 9:46 pm | प्राजु

घारे काका,
अगदी भारतात नेऊन सोडलंत. धारोष्ण दूध मी भारतात असतानाही कधी प्याले नाही आणि आता तर संबंधच नाही.
पण सकाळी दूध वाले पेपरवाले यांचा चालणार हवाहवासा गोंधळ ... चिमण्यांची, कावळ्यांची शाळा हे मात्र खूप आठवत राहतं.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

तिकडे ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्यांना त्या चांगल्या आहेत असे कोणी म्हंटले की "तंकडचं सगळं लय भारी हाय हे आयकून आमाला आत्ता कंट्टाला आला हाये!" अशी प्रतिक्रिया एकाद्याकडून येते ... तिकडले जे आवडले नाही त्याला कोणी नांवे ठेवली की "याला त्यातलं कांही कळतंय् का ?" असा भाव तोंडावर आणून आणि 'कोल्ह्याला द्राक्षे आंबट' किंवा 'गाढवाला गुळाची चंव काय?' या म्हणीसकट ...

असे असते खरे.

पण "घरोघरी मातीच्या चुली" असे वर्णन केले तर "काय हा बोअर माणूस" म्हणून संभावना होते. काहीच बोलले नाही तर "काहीतरी पाणी मुरते आहे" अशी संशयी नजर...

हे सर्व टाळून आनंद घारे यांनी मनोरंजक, माहितीपूर्ण वर्णन केले आहे.

लिखाळ's picture

27 Jan 2009 - 11:02 pm | लिखाळ

छान ! लेख आवडला.

"तिकडं सुध्दा बहुतेक सगळं आपल्यासारखंच आहे हो." असे आधी सांगून जे फरक ठळकपणे जाणवले तेवढे एक एक करीत सांगायचे हे बेश वाटते.

हे बेशच आहे :)

-- लिखाळ.

चतुरंग's picture

27 Jan 2009 - 11:05 pm | चतुरंग

भारतातल्या मोठ्या शहरातल्या गजबजीतून आणि कोलाहलातून अमेरिकेत आलेला माणूस हा शांततेमुळे आधी हरखून जातो आणि थोड्याच दिवसात त्याला करमेनासे होते!
कारण कानांवर काही आवाजच नाहीत. तुम्ही उठून वावरायला लागाल तेव्हा दिवस सुरु, तुम्ही थांबलात की सगळे थांबले!
ह्या उलट भारतातल्या दिवसाची सुरुवात चांगलीच 'जिवंत' असते. ते तुम्ही अगदी सहज रंगवले आहेत. धन्यवाद!

चतुरंग

भाग्यश्री's picture

27 Jan 2009 - 11:18 pm | भाग्यश्री

मस्त लिहीलेय घारेकाका! खूप आवडलं!
मी इथे आल्यावर सकाळची ती लगबग, आणि गडबड गोंधळ खूप मिस केली होती..
इथे खरंच तुम्ही उठाल तेव्हा सकाळ!
आणि हो, रोजचा पेपरही नाही.. मी एकदा क्वार्टर डॉलर टाकून आणला एलेटाईम्स, तर महीना भर वाचत होते तो एकच पेपर! इतका प्रचंड! :|

http://bhagyashreee.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

28 Jan 2009 - 12:43 am | संदीप चित्रे

वाचूनही एल.ए.च्या बाहेरच्या किंवा फारतर अमेरिकेबाहेरच्या बातम्या नसतीलच :)

वेलदोडा's picture

28 Jan 2009 - 12:17 am | वेलदोडा

छान झालाय लेख. अ़जून अशा तुलनात्मक गोष्टी येऊद्यात,

तुमचे गाव कदाचित आयसोलेटेड असल्याने तुम्हाला जे जाणवले ते तुम्ही लिहीले. पण अगदीच सरसकट सर्वत्र असे नाहिये.
मी रहातो त्या वेस्टकोस्टातल्या भागात (वीकडेला) सकाळ झालेली बर्‍यापैकी जाणवते.

सकाळी सातसाडेसातपासून रस्त्यावर कामावर जाणार्‍यांची, शाळा कॉलेजला जाणार्‍या मुलांची गर्दी वाढू लागलेली असते. पिवळ्या रंगाच्या स्कूल बसेस रस्त्यावर धावू लागतात. आमच्या भागात मिडल स्कूल आणि हायस्कूल साडेसात आणि एलिमेंटरी स्कूल साडेआठ ला सुरू होते. मुलांना बसस्टॉप वर सोडायला पालक आणि मुले आलेले असतात. तिथे त्यांचा चिवचिवाट चालू असतो. स्टॉप वर स्कूलबस थांबली की मागील सर्व गाड्या थांबतात. स्कूलबस ला ओव्हरटेक करता येत नाही हा नियम आहे. त्यामुळे बर्‍यापैकी ट्रॅफिक जॅम होते. (पण हॉर्न चा कर्कश आवाज मात्र नाही.) शाळेला चालत जाणारी पण बरीच मुले दिसतात. (ज्यांची घरे शाळेपासून खूपच जवळ आहेत ते स्कूलबस वापरू शकत नाहीत.). कडाक्याच्या थंडीत ही चालत जातात फक्त पाऊस असेल तर मात्र नाही.

पेपरवाला पोर्‍या ही घरोघरी (अर्थात ज्यांनी पेपर लावला आहे त्यांच्याकडेच..काहींकडे तर फक्त रविवारचा पेपर येतो) जाउन पेपर टाकतो. फक्त तो सायकलने न येता कार मधून येतो.

बर्‍याच जवळपासच्या भागात दूधाची गाडी पण येते. येथील काही स्थानिक डेअरीज ताज्या दूधाची डिलीव्हरी देतात. ताजे म्हटले तरी ते प्रक्रिया केलेलेच असते. दूधाबरोबर क्रिम , चिझ, पाव हे पण सप्लाय करतात. अर्थात सुपरमार्केट मधील दूधापेक्षा हे दूध महाग असते..जवळपास दुप्पट भाव . त्यामुळे हे दूध घेणार्‍यांची संख्या फार जास्त नाहीये.

आठवड्यातून एकदा कचरा गोळा करायला गाडी येते..सहा- साडे सहालाच. प्रत्येक घरासमोर गाडी थांबून घरासमोर ठेवलेल्या कचर्‍याच्या कॅन मधील कचरा ट्रक मध्ये ओतला जातो. त्यामुळे ही गाडी जाईपर्यत तिचे अस्तित्व जाणवत रहाते.

एक मात्र खरे की सकाळ झाली हे डोळ्यांनाच जाणवते...कानांना फारसे नाही कारण कसले आवाजच नाहीत. गाड्यांच्या इंजिन चा एक आवाज सोडल्यास.

आनंद घारे's picture

28 Jan 2009 - 6:28 am | आनंद घारे

तुमचे गाव कदाचित आयसोलेटेड असल्याने तुम्हाला जे जाणवले ते तुम्ही लिहीले. पण अगदीच सरसकट सर्वत्र असे नाहिये.
मी रहातो त्या वेस्टकोस्टातल्या भागात (वीकडेला) सकाळ झालेली बर्‍यापैकी जाणवते.

मी जॉर्जियातल्या अल्फारेटा शहराच्या उपनगरातल्य एका कम्युनिटीत खूप खोलवर असलेल्या घरात राहिलो. ती जागा प्रातिनिधिक नव्हतीच.

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

सुनील's picture

28 Jan 2009 - 7:31 am | सुनील

नेहेमीप्रमाणे परदेशवारी करून आल्यानंतर ज्या प्रकारचे लेख येतात, त्यापेक्षा वेगळा लेख. आवडला.

धारोष्ण दूध - लहानपणची आठवण आली. गावी सकाळी दूघ काढतेवेळी आजी आम्हा नातवांच्या हातात एकेक ग्लास घेऊन गोठ्यात पाठवत असे. आचळातून थेट ग्लासात आलेले दूध काय चवदार लागत असे!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सर्किट's picture

28 Jan 2009 - 9:02 am | सर्किट (not verified)

घारेकाका,

सुंदर निरीक्षणे.

माझे म्हणाल, तर मला भारतात सकाळ नकोशी वाटायची (शाळेत असताना), आणि आता हवीहवीशी वाटते.

आणि अमेरिकेत सकाळ आधी हवीहवीशी वाटायची (फारशी जबाबदारी नसताना. यू नो व्हाय, नसल्यास विनायक प्रभूंना विचारा) आता नकोनकोशी वाटते.

-- सर्किट