३ डिसेंबरची सकाळ! कालची रात्र उघड्या बस स्टॉपवर थंडीत काढल्यानंतरचा पहाटेचा अंधारातला घाटाचा प्रवास! ही रात्र संपणारच नाहीय असं वाटत होतं. पण चक्क रात्र लवकर गेली. डुलकी लागली आणि तास गेलेले कळालं नाही. टाईम लॅप्स फोटोग्राफीमध्ये जसे काही तासांचे काही सेकंद होतात, तशीच रात्र भरभर गेल्यासारखी वाटली! टनकपूरवरून तीनला निघालेली बस साडेपाचला चंपावतला चहासाठी थांबली तेव्हा पहाट झाल्याचं दिसलं! सर्वदूर उंच पर्वत! वळणा वळणांचा रस्ता! डोंगरात थोडी थोडी घरं आणि उतारावरची शेती! "बीआरओ" च्या हिरक परियोजनेच्या अंतर्गत हा रस्ता येतो. नंतर लोहाघाट, गुरना मार्गे पिथौरागढ़! रस्ता कुठे बंद नाहीय आणि ट्रॅफिक जामही नाहीय. त्यामुळे तसं लवकरच म्हणजे साडेआठला पिथौरागढ़ला पोहचलो.
(हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल. )
लग्नाकरता येणा-या नातेवाईकांसाठीच्या हॉटेलमध्ये जायचं आहे. पिथौरागढ़! साधारण १६०० मीटर उंचीवर वसलेलं शहर. दूरवर हिमशिखरं दिसत आहेत! कोवळ्या ऊन्हाचा आनंद घेत रस्ता विचारत निघालो. काही मुलं सोबतीला आली. त्यांनी शॉर्ट कट असलेल्या पायवाटा (पगडंडी) दाखवल्या. पहाड़ी लोक खरंच खूप वेगळे आहेत. त्यांच्यासोबत छोटा पण मस्त वॉक झाला. नंतर बायकोच्या बाजूचे नातेवाईक भेटले. गप्पा- गोष्टी झाल्या. लग्नासाठी आलेल्यांच्या भेटी झाल्या. नंतर भरपूर आरामही झाला.
डिसेंबर महिना असल्यामुळे इथे सूर्यास्त लवकर होतो. साडेपाचनंतर लगेच अंधार होतो! आणि दुपारी कमी असलेली थंडी लगेच फणा काढते! पिथौरागढ़च्या हॉटेलच्या गच्चीतून आकाश बघितलं. शहराचे दिवे बरेच आहेत आणि चंद्रही पोर्णिमेजवळ आहे. त्यामुळे चांगल्या स्वच्छ आकाशासाठी अजून वाट बघावी लागेल.
.
.
.
रात्री चांगला आराम झाल्यावर दुस-या दिवशी ४ डिसेंबरला चंडाक हिलकडे जायला निघालो. लग्नाचे विधी दुपारनंतर आहेत. त्यामुळे सकाळी १० पर्यंत मोकळा वेळ आहे. हॉटेलपासून चंडाक हिल साधारण साडेसात किलोमीटर येतं. गावातला मुख्य रस्ता माहिती आहे. त्यामुळे सहजपणे निघालो. एका हॉटेलात चहा- बिस्कीट घेतले आणि पुढे निघालो. हळु हळु घरं, दुकानं, सरकारी कार्यालयं मागे पडली आणि डोंगर सुरू झाला. दूरवरचे नजारेही सुरू झाले! अहा हा! हिमालयाच्या भव्यतेचा अनुभव देणारा हा परिसर! सकाळचे फिरायला आलेले तुरळक लोक सोडले तर निर्जन असा घाटाचा रस्ता! बाजूला डोंगरात व खाली छोटी गावं! सुंदर भ्रमंती झाली. पूर्ण डोंगर चढल्यावर दूरवर अनेक हिमशिखरं नजरेच्या कक्षेत आली! त्याशिवाय दूरवरच्या डोंगरातले नागमोडी रस्ते आणि गावंही दिसत आहेत. एका ठिकाणी देवदार झाडांमध्ये जाणारी सुंदर पायवाट आहे! अहा हा! अवर्णनीय अनुभव! मनसोक्त फिरलो. थंडी इतकी कडक की, पूर्ण १५ किलोमीटर झाले तरी एक थेंबही घाम आला नाही आणि अजिबात तहानही लागली नाही! फक्त स्वेटर काढता आलं इतकंच. परतीच्या मार्गावर परत चहाचा ब्रेक घेतला आणि हॉटेलवर पोहचलो. बरेलीमधल्या "सॅटेलाईट" बसस्टँडनंतर इथे "उल्का माता मंदिर" आणि "अंतरिक्ष बंगलासुद्धा" बघायला मिळाला!
दुपारनंतर हळु हळु लग्नाचे विधी सुरू झाले. हिमालयात तरी डीजेचा त्रास नसावा अशी अपेक्षा होती. पण ती पूर्ण झाली नाही. अर्थात् दिल्लीसारख्या ठिकाणी होतो तितका त्रास नव्हता. लग्नामध्ये बँड वाजवणारे लोक मस्त सजून आले आहेत. पारंपारिक वाद्य आणि पहाड़ी संगीत! वरात मुलीकडच्या मंगल कार्यालयात गेल्यानंतरच दुपारचं जेवण झालं. इथल्या संगीताची शैली आणि वरातीतल्या लोकांचा पोशाख काहीसा तिबेटी बौद्ध पद्धतीचा वाटला. ऊन असेपर्यंत थंडी वाट बघत थांबलीय! लग्नाचे उरलेले विधी नंतर आहेत आणि ते खूप वेळ चालू राहतील. त्यामुळे आम्ही काही जण संध्याकाळी पिथौरागढ़वरून सत्गढ़ ह्या गावाला जायला निघालो.
.
.
सत्गढ़! पिथौरागढ़पासून २० किलोमीटर अंतरावर पण अगदी डोंगरात वसलेलं हिमालयातलं पहाड़ी गांव! मागच्या वेळी इथलं आकाश अ वि श्व स नी य होतं! दरीमध्ये असलेली गावं अंधारात बुडाली आहेत! हळु हळु संधीप्रकाश जातोय. अंधारातच सत्गढ़ला पोहचलो! इथे जाताना आता कच्चा रस्ता झालाय. पण सुदैवाने आम्ही अशा जागी उतरलो जिथून मस्त पायवाटेने जावं लागेल. तीव्र चढाची पण छोटी सात मिनिटांची पायवाट! एक सुंदर ट्रेक. चला, निदान पायी चालताना तरी थंडीपासून सुटका मिळतेय! पण कसलं काय! जेमतेम चालत असेपर्यंत आणि पाच एक मिनिट गरम वाटलं. नंतर लगेच थंडीचा कडाका सुरू! आकाश दर्शन करणं खरंच सोपं नाहीय! थंडी भयाण होतेय! आकाशात थोडे ढग आहेत! कुठे कुठे अंधुक तारे दिसत आहेत. पण चंद्राचं तेज आकाशात पसरलंय! समोर डोंगरात ध्वज मंदिरातला दिवा चमकतोय! हिमालय! वा!
पुढील भाग: कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ३: सत्गढ़- हिमालयाच्या कुशीतलं गाव
वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 2 जानेवारी 2026.
प्रतिक्रिया
3 Jan 2026 - 8:25 am | किल्लेदार
मस्त... पुभाप्र