पर्व -भैरप्पा लिखित महाकादंबरी (ऐसी अक्षरे -३७)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
29 Dec 2025 - 3:36 pm

पर्व

1
मूळ कन्नडमध्ये १९७९ साली प्रकाशित झालेली दिग्गज लेखक डॉ. एस. एल. #भैरप्पा यांची महाकादंबरी 'पर्व' साहित्यातील एक मैलाचा दगड आहे.उमा कुलकर्णी यांनी ती मराठीत भाषांतरीत केली आहे.
व्यासरचित महाभारत वाचायची इच्छा असणाऱ्यांना, परंतु इतका मोठा ग्रंथ आतापर्यंत शक्य नसल्याची जाणीव असते. अशा वेळी 'पर्व' वाचून त्याची छोटी, प्रभावी आणि वास्तववादी वाचण्याची तहान काहीशी शमली जाते.
आताच्या पिढीतील वाचकांसाठी खास सुंदरता म्हणजे अमानवी संकल्पना ,चमत्कार दूर करून महाभारतातील पात्रांच्या मनोव्यापाराचे वास्तववादी चित्रण करणारी ही कादंबरी आहे.भैरप्पा यांनी कादंबरी लिहिताना अनेक वर्षे संशोधन केले. त्यांनी महाभारतात वर्णन केलेल्या स्थळांना – द्वारका, राजगृह, लोथल, कुरुक्षेत्र इ. ठिकाणांना भेट दिली होती. असं वाचनात आलं की हिमालयातील गढवाल प्रदेशात बहुपतित्व प्रथा आजही आहे, ती द्रौपदीच्या काळापासून चालू असल्याचे संशोधन त्यांना प्रेरणा देऊन गेले. कादंबरीत सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी अतिशय विश्वसनीय वास्तववादी वाटते.
सुरुवात मद्रदेशातील राजघराण्यांतीळ पात्रांच्या युद्धासंबंधी संवादातून होते.हळूहळू कथा पांडवांच्या जन्माकडे कथा सरकते. इथला भाग पर्यंतचा 'देवसाहाय्याने पांडव जन्म' हे मिथक याचा उलगडा ,त्यांच्या नियोग जन्मरहस्याने होतो. उत्तरेकडील भारतात राहणाऱ्या हिमालयातील तत्कालीन लोकांना 'देव' संबोधले गेले आहे .तसेच राक्षस, नागयांनादेखील कादंबरीत लोकगण म्हणून वर्णन केले आहे. आपल्याला टीव्हीवरच्या महाभारताने खूप काळ भ्रमात ठेवले असं समजते :) :)

2
आतापर्यंत द्रौपदी, कर्ण, अर्जुन हे विविध लेखकांनी स्वतंत्रपणे मांडले आहेत. पण 'पर्व' कादंबरीत अनेक नावीन्यपूर्व तत्वचिंतनाने पात्रांची ओळख होते. भीम बलवान नायक तर दिसलाच, पण तो एक संवेदनशील, द्रौपदीसाठी जीव ओवाळणारा, प्रेम आणि कर्तव्य यात अडकलेला, हिडिंबा व घटोत्कचाबद्दल अपराधी भावनेने ग्रासलेला 'माणूस' म्हणून दिसला.
"मी हिडिंबेला वनात सोडून आलो, तिच्या मुलाला युद्धात बलिदान दिले. मी पांडवांचा भाऊ म्हणून जगलो, पण पती आणि वडील म्हणून अपयशी ठरलो."
'पर्व' मधील सर्वात व्यावहारिक आणि राजकीय-बुद्धिमान पात्र मला 'कुंती' वाटली. पण ती दृष्ट्या गांधारीपेक्षा वेगळी. आधी आपल्याला मूल हवं, ज्येष्ठत्व हवं यासाठी ती पांडूच्या नियोगाचा वापर करायचे ठरवते. याआधीच तिने कर्णाचा जन्म, त्याग गुप्त ठेवीत सामाजिक स्थितीचे रक्षण केले असते.
नंतरही पांडवांना नेहमी वास्तवाची जाणीव करून देते आणि त्यांना नैतिक अधःपतनापासून वाचवते. ती पांडवांना कधीही दासींबरोबर संबंधांना नकार द्यायला सांगते. भीम हिडिंबा व मुलात अडकलेला दिसताच ती लवकरच भीमासह ते स्थान सोडते. तिचा द्रौपदीला बहुपतित्व मानायला भाग पाडून भावांभाषांचे एकत्रित करणे? कर्णाकडे आपल्या पाच मुलांना जीवनदान मागते. इतकेच नाही तर शेवटी युद्धात कुरुवंशाचा महाविनाशानंतरही ती पुन्हा वंशासाठी गर्भधारणेचा द्रौपदीला सल्ला देते.
यामधील कायम भव्यदिव्य दिसणाऱ्या राजमहालांचे वातावरण युद्धकाळात चणचण भासणाऱ्या काळ्या सावटाखाली होते, हे वाचणे अगदी वेगळा अनुभव देते. जसे –
दिवा लावायला तेल नाही म्हणून धृतराष्ट्र दासीला ऋण घेऊन तेल आणण्यास सांगतो.द्रोण दुधावर वा पाण्यात सातूवर भूक भागवतात.
युद्धात सर्व मनुष्य, प्राणी शक्ती पूर्णपणे वापरली जाते. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सैनिकांचे, सेनापतींचे दैनंदिन जीवन, खाण्यापिण्याची व्यवस्था आणि युद्धपटांचे वर्णन इतके तपशीलवार आहे की वाचताना पोटात खळबळ वाटते.
--युद्धात इतकी जीवितहानी होते की सर्वत्र मांस, रक्त यांचा खच पडतो, प क्षी प्राणी प्रेतांवर झुंबड उडवतात.
--माणसांच्या मलाचा सर्वत्र दुर्गंध पसरतो.
या अशा कारणांमुळे युद्धभूमी-युद्धाचे ठिकाण बदलून ठराविक काळाने वा दररोज पुढे पुढे स्थान सरकवले जात असे.
--युद्धात मेलेल्या घोड्याच्या मांसाचे भक्षण अन्नटंचाईमुळे करावे लागते.
--संजयाला कुरुक्षेत्राकडे मोठमोठाले यानंतर कापत जाई आणि तितक्याच वेगाला पुन्हा परत महाली येऊन सर्व युध्द खबरबात धृतराष्ट्राला सान्गत असे ,दूरदृष्टीचा प्रश्नच मिटला.
--शेवटी कृष्ण गांधारीला आपल्या डोळ्यावरची पट्टी काढायला सांगतो ,असा अकल्पनीय शेवट मी पाहिल्याचं वाचला .
महाभारत ---
"कुरुक्षेत्र हे युद्धाचे मैदान नव्हे, ते एक प्रचंड कत्तलखाना होते. मनुष्य, प्राणी, रक्त, मांस आणि हाडांचा ढिगारा. जे जिंकले त्यांनाही काही मिळत नाही.
फक्त रिकामे हात आणि रक्ताने माखलेले मन."
-भक्ती

तुनळीवरचा परिचय
https://youtu.be/Er_aInmde8c?si=_xjWNyREWw9bpAgw

इतिहासवाङ्मयप्रकटनआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

29 Dec 2025 - 11:15 pm | सौन्दर्य

भक्तीजी ,

मी अमेरिकेत राहतो, हे पुस्तक मला कसे व कोठून विकत घेता येईल हे कळविल्यास आभार.

माहिती शोधावी लागेल.मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित कादंबरी आहे.

प्रचेतस's picture

30 Dec 2025 - 12:11 pm | प्रचेतस

उत्तम परिचय.
'पर्व' वाचलेली आहेच, संग्रहीही आहे. मात्र भैरप्पांची असूनही मला ती तितकीशी नाही आवडली. कदाचित मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत. मात्र भैरप्पांची ही कादंबरी खूप वेगळी आहे. 'युगंधर' मध्ये शिवाजी सावतांनी कशी श्रीकृष्णचरित्राची वाट लावली आहे तसे न करता भैरप्पा ह्यांनी एक नवाच दृष्टीकोन दिला आहे.

मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत.

अगदी प्रत्यक्ष सुर्य जवळ असताना काजवा कसा खुणावेल :) माझ्यासारख्या सन्थ वाचकाला मुळ महाभारत वाचायला अजुन किमान ६-७ वर्षे तयारी करावी लागेल.'युगंधर',युगान्त,आणि आता अर्जुन ,द्रौपदी अशीही पुस्तके येतात ती वाचायची इच्छा कधीच होत नाही..पण भैरप्पा यान्चि इतकी उत्तम कादम्बरी अजुन लोकप्रिय व्हायला पाहिजे ती तितकी झाली नाही.

धर्मराजमुटके's picture

30 Dec 2025 - 5:38 pm | धर्मराजमुटके

मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत.

सहमत आहे. मी सुद्धा मुळ ग्रंथ पहिले वाचले आणि नंतर त्यावरील टीका (म्हणजे इतर पुस्तके).

कांदा लिंबू's picture

31 Dec 2025 - 4:25 pm | कांदा लिंबू

परिचय आवडला. भैरप्पांची आवरण ही कादंबरीही वाचनीय आहे.

आवरण वाचली आहे.खुपच अभ्यासपूर्ण कादंबरी आहे,तशीच करूण घटनांनी भरलेली आहे.
पहिल्या ४ वर्षांतच या कादंबरीच्या ३४ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या, जो भारतीय कादंबरीविश्वात एक महत्त्वाचा विक्रम मानला जातो.

मिपावरीलच आवारण कादंबरीचा हा एक धागा आहे.
https://www.misalpav.com/node/43313