भाषिक अधःपतन आणि लिमिट n->0
______
#स्वांत:सुखाय्
#मनुवादी सनातनी लेखन
________
काही आठवड्यांपूर्वी हा लेख सुचलेला पण सारखं सारखं तेच तेच काय लिहित बसायचं म्हणून कंटाळा करत होतो. पण आता हे निमित्त झाले आहेच तर लिहीन म्हणतो.
बाकी हे म्हणजे अगदीच शास्त्रीय संगीतात एखाद्या रागाचे सादरीकरण करताना वारंवार तेच तेच शब्द वेगळ्या अंगाने परत परत सादर केले जाते तसे काहीसे चालू आहे.
हां तर निमित्त असे झाले की हिमालयातून मधून पंजाब मार्गे दिल्ली असा प्रवास करत होतो. नुसते गाडी चालवताना झोप येते म्हणून ड्रायव्हरने पंजाबी हिप हॉप , ढांग डांग गाणी लावली होती, तब्बल 12 तास तेच. ढिंच्याक ढिंच्याक. आणि गाण्यातील शब्द तर विचारूच नका. एका गाण्यात " तू तेरी अर्थी की तयारी रख ले "
असे शब्द होतो. तिथे मात्र संयमाचा बांध सुटला अन् ड्रायव्हरला म्हणालो - "ह्या सारखे (इतके दळभद्री ) एकही गीत मराठीत शोधूनही सापडणार नाही."
काय हे भाषिक अधःपतन !
हे भाषिक अधःपतन सर्वत्रच आहे. निरर्थक काहीही. अगदी अभिजात मराठीही संपूर्ण कोरडी राहिली आहे असे नाही. मराठीतील दळभद्री गाणी काही कमी नाहीत.
एक नंबर तुझी कंबर !
तांबडी चामडी चमकते उन्हात !!
(असो.अजून अनेक गाणी त्यांच्या कवींची नावे आडनावे देत नाही गहजब नको , अन् उगाच विषयांतर नको).
श्या , काय हे भाषिक अधःपतन !
मला बाबूजींच्या आवाजातील गाणी आठवतात. गदिमांचे गीतरामायण आठवते. पण तसं पाहिलं तर त्या आधीच्या काळातील संगीत नाटकातील गीतं ऐकली तर हेही एकप्रकारे भाषिक अधःपतन च म्हणावे लागेल.
संगीत नाटकं ही सेमी क्लासिकल झालं ना मग तेही अधःपतनच की ! शुद्ध शास्त्रीय संगीतापासून खाली उतरलेले संगीत. पण तूर्तास संगीत राहू दे , फक्त भाषेचे बोलू.
रॅप मध्ये असतो तो निरर्थक मुक्तछंद ,
त्या आधी किमान गेय गाणी,
त्या आधी वृत्तबद्ध कविता,
त्या आधी खोल अर्थ असणारी ओवी , श्लोक , आर्या ...
असं सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर सगळंच भाषिक अधःपतन.
"संस्कृत भाषा देवें केली l मग प्राकृत काय चोरांपासोनी झाली ??"
असा नाथांनी खणखणीत प्रश्न विचारला असला तरी नाथ स्वतः संस्कृत जाणकार होते, माउलींनी देखील भावार्थ दीपिका लिहिली असली तरी ते संस्कृत मधून खाली उतरणे आहे हेच होते. इथे लगेच "काही" लोकांचे अभिनिवेश उफाळून येतील पण त्यातल्या किती जणांना अमृतानुभव , चांगदेव पासष्टी मधील एक तरी ओवी उद्धृत करता येईल ? अभिनिवेश वाल्या लोकांना फक्त " अमुकतमुक की जय" अशा आरोळ्या ठोकता येतात, त्यांना त्या विषयातील काही गमक नसत हे दुर्दैवाने सत्य आहे.
हां , तर तात्पर्य इतकेच की प्राकृत हे संस्कृत च्या परिप्रेक्ष्यातून , शुद्ध मराठीत ज्याला परस्पेक्टीव म्हणतात त्यातून पहिलं तर भाषिक अधःपतन च आहे.
पण फक्त तिथेच का थांबा, अजून मागे जात जात लिमिट n ->0 करू . पहिले भाषिक अधःपतन काय हे शोधू म्हणजे शून्यावे आपोआप गवसेल !
आधुनिक संस्कृत बऱ्यापैकी सहज आहे सुलभ आहे, पण वैदिक संस्कृत हे जितके गूढ गहन अर्थवाही आहे, आधुनिक संस्कृत तितके नाही. हे जाणकारांना नक्की कळते.
गूढार्थ व्यक्त करणे हा भाषेचा मूळ उद्देश. तो कमीत कमी शब्दात व्यक्त करणे , अघळपघळ न बोलता व्यक्त करणे ही खरी कसोटी. ह्या अर्थाने पहिलं तर आधुनिक संस्कृत हे देखील प्राचीन वैदिक संस्कृतचे अधःपतन नव्हे काय !
किंवा ह्याच तर्काने कोणतेही भाष्य हे एक प्रकाराचे अधःपतन म्हणावे लागेल मूळ सूत्रांचे , उपनिषदांचे .
आणि मग सूत्रांच्या आधी काय होतं?
पाणिनि व्याकरण ? पण पाणीनीने ते नियम ज्यांना आपण माहेश्वर सूत्रे म्हणतो कशापासून बनवले ? आणि त्या आधी काय होतं ?
पुराणे ही महाभारत , रामायण ह्या अभिजात स्तरावरून एकप्रकारे खाली उतरणेच की
महाभारत रामायण काय आहेत तर स्मृती ग्रंथानुसार जीवन कसे जगले पाहिजे ह्याची उदाहरणे . अर्थात मनुस्मृती याज्ञवल्क्य स्मृती पराशर स्मृती आदी चे सोदाहरण स्पष्टीकरण.
आणि हे स्मृती ग्रंथ कशातून आले ? तर वेदोक्त उपनिषदपर धर्माचे आचरण कसे करावे ह्याचे नियम. हे एकप्रकारे वेदांच्या उपनिषदांचा स्तरावरून झालेले अधःपतन च की. ज्याला मूळ वेदोक्त धर्म "कळला आहे" त्याला काहीही गरज नाही ह्याची
?
यावानर्थ उदपाने सर्वत: सम्प्लुतोदके |
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानत: ||
"जाणकार" ब्राह्मणसाठी सर्व वेद हे तितकेच उपयुक्त आहेत जितके की तहान भागलेल्या मनुष्यकरता अथांग जलाशय !
पण ह्या वेदांच्या आधी काय होतं ? वेद हे कोठून "अधःपात" पावलेले आहेत ?
ll ॐ ll
गोंदवलेकर महाराज म्हणाले की - "प्रणव हा परब्रह्माचा हुंकार आहे".
हे आहे हे पहिले , the very first , भाषिक अधःपतन!
अरे पण हा हुंकार कोठून अध:पतित झालेला आहे ?
"ते" शून्यावे अधःपतन काय आहे ?
हं?
.
.
.
स:
हंस: सोहं
तो "मी" आहे.
वेद हे ब्रह्मीभूत पुरुषाच्या ब्रह्मअनुभवातून खाली उतरलेले आहेत ! आणि "तो " दुसरा तिसरा कोणी नसून "मीच" आहे !
सोऽहमपापो विरजो निर्मुक्तो मुक्तकिल्बिषः ll
ॐ तद्ब्रह्म ।
ॐ तद्वायु: ।
ॐ तदात्मा ।
ॐ तत्सत्यम् ।
ॐ तत्सर्वम् ।
ॐ तत्पुरोर्नमः ॥ १॥
ॐ अन्तश्वरति भूतेषु गुहायां विश्वमूर्तिषु ।
त्वं यज्ञस्त्वं वषट्कारस्त्वमिन्द्रस्त्वꣳ रुद्रस्त्वं विष्णुस्त्वं ब्रह्म त्वं प्रजापतिः ।
त्वं तदाप आपो ज्योती रसोऽमृतं ब्रह्म भूर्भुवः सुवरोम् ॥ २॥
______________
ll जानामि ll
पाहातां पाहातां अनुमानलें । कळतां कळतां कळों आलें ।
पाहातां अवघेंचि निवांत जालें । बोलणें आतां ॥ २२ ॥
ll ॐ ll
______________
प्रतिक्रिया
20 Jul 2025 - 2:43 pm | कानडाऊ योगेशु
पूर्ण जगच मटेरिअलिस्टीक ( मराठी शब्द?) होत आहे त्यात भाषा सुध्दा सध्याच्या मागणीनुसार वळण घेत आहे.
प्रत्येक चॅनेल गणिक डान्स रिअॅलिटी शोज चे पेव फुटले आहे आणि त्यात किती चॅनेल वर शुध्द शास्त्रीय नृत्य स्पर्धा असतात हे पाहणे शोधाचे विषय ठरेल.
त्यानुसार कसरत वाटावे लागणारे नृत्य व त्यांना पूरक गाणी हेच चलनी नाणे बनले आहे.
खुद्द जावेद अख्तरे भाषेच्या र्हासाबद्दल खंत व्यक्त केली होती.
त्याची अपत्ये हे हिंदी चित्रपट बनवतात पण त्यांची प्राथमिक भाषा इंग्रजी आहे आणि हिंदी चे स्क्रिट जे देवनागरी अथवा उर्दूत पाहण्याची जावेद अख्तरला सवय होती तिथे ही जनरेशन रोमन लिपी वापरुन हिंदी चित्रपटाचे संवाद अथवा कथानक लिहितात. अर्थात हे लोण घरोघरी पसरलेले आहेच.
20 Jul 2025 - 4:54 pm | कंजूस
अगदी टकाटक.
20 Jul 2025 - 5:19 pm | धर्मराजमुटके
भाषिक अधः पतनाचा मुद्दा सोडला तर गाणे एक प्रकारे आध्यात्मिक संदेशचं देत आहे.
उद्याचा काही भरोसा नाही, तु कधीही चितेवर जाऊ शकतोस त्यामुळे तु अर्थीची तयारी करुन ठेव. म्हणजे खर्या अर्थाने आपल्या भविष्याबद्दलचे प्लानिंग करुन ठेव, आपला इहलोक आणि परलोकीचा प्रवास सुखकर होईल अशी तयारी आतापासूनच करुन ठेव अशा प्रकारचा आशय असावा.
शिवाय तुम्ही हिमालयातून पंजाब मार्गे दिल्लीकडे प्रवास करत होता त्या अनुषंगाने देखील हा एक इशाराच होता. परंतू तुम्ही पडले संस्कृत चे प्रकांड पंडित. तुम्हाला साधी सोपी हरयाणवी भाषा कुठून कळणार ? बरं ते एक जाऊद्या. जाटांचा मेंदू गुडघ्यात असतो इतके देखील तुम्हाला माहिती असते तर तुमची इतकी चिडचिड झाली नसती.
असो .
21 Jul 2025 - 10:02 am | चेतन
एक जुना लेख आठवला :-)
https://www.misalpav.com/node/12396
21 Jul 2025 - 5:33 pm | अभ्या..
आपल्या सर्वच प्रकारच्या ऊर्ध्वरोहणासाठी शुभेच्छा.
ब्रिंगिटपम्यान........
21 Jul 2025 - 7:32 pm | प्रसाद गोडबोले
अभ्या, ऊर्ध्वरोहण म्हणजे काय रे ?
मी आपलं प्रयत्न करतो की ज्या भाषेत माऊली " अमृतातेही पैजा जिंके" असे म्हणाले त्या भाषेत किमान काहीतरी लिहायचा प्रयत्न करावा ! आणि माऊलींच्या माळेत स्वतःला ओवून घ्यावे !
सुवर्णाचे मणी केले। ते सोनियाचे सुतीं वोविले।
तैसें म्यां जग धरिलें। सबाह्याभ्यंतरीं ॥ ३२ ॥
तुमच्यासारख्या अगदी मोजक्या मित्रांना कळतं काय लिहितोय ते . हे खूप आनंदाची बाब आहे माझ्यासाठी !
मनःपूर्वक धन्यवाद !
21 Jul 2025 - 6:13 pm | श्वेता व्यास
सर्वच प्रकारचं अधःपतन झाल्याशिवाय कलियुग संपणार कसं, आणखी बरंच काही अधःपतनासाठी बाकी आहे :)
21 Jul 2025 - 7:43 pm | Bhakti
अंध:पतन खुप हार्श (कठीण?)/डिसरिसपेक्टफूल शब्द वाटते.प्रत्येक काळातील भाषेचे एक एक सौंदर्य होते.तत्कालीन भाषांनी सामाजिक क्रांतीकारक साहित्य घडवले नसते तर भक्तीमार्गाची/सलोख्याची चळवळ उभी राहिली नसती.बाकी लेख ब्रम्हा पर्यंत तसाही पोहचला असता.चराचर अद्वैत असताना,कशाला एका गाण्यामुळे इतकी चिड चिड करायची ;) :)
21 Jul 2025 - 11:02 pm | प्रसाद गोडबोले
>>>
गाडी चालवताना झोप येते म्हणून ड्रायव्हरने पंजाबी हिप हॉप , ढांग डांग गाणी लावली होती, तब्बल 12 तास तेच.
22 Jul 2025 - 7:41 am | Bhakti
अच्छा,मी अशावेळी माझे हेडफोन्स वापरते.१२ तास तर माझ्यासाठी खुपच मोठा बोनस झाला असता.एखादी खुप दिवसांपासुन पाहायची राहिलेली सिरीज, लेक्चर्स पाहून ऐकून झाले असते.जरा वेळ कापसाचे बोळे कानात टाकून बाहेर पाहत बसले असते ;)
असो,चिड चिड करून काही बदलणार नसेल .तेव्हा आपल्या आनंदाचे उपाय करण्याचा प्रयत्न केला तर सोपं होईल.
21 Jul 2025 - 11:51 pm | कॉमी
कला, संगीत, भाषा - ह्यांची "गुणवत्ता" ही सापेक्ष गोष्ट आहे. ही साधी सिंपल सत्य बाब आहे.
आजचे संगीत कसे कनिष्ठ आहे ह्यावर अत्यंत विनोदी संवाद खाली देतो आहे. त्या संवादातला माणूस सुद्धा एका प्रकारचा मनुवादी म्हणावा का? (थोडा मोठा व्हिडीओ आहे पण मजेशीर आहे.)
https://youtu.be/B4KYTUNg8lc?si=1krpvzKhUNgNDPYw