पुस्तकं..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
26 May 2025 - 11:16 am

आपण सगळेच पुस्तकाला पवित्र मानतो. समग्र जगाचं ज्ञान देणारी खिडकी मानतो. "न हि ज्ञानेनसदृशं पवित्रं इह विद्यते", म्हणजे ज्ञानाइतकं पवित्र या जगात दुसरं काही नाही. असं वचन आहे. हे ज्ञान आपल्याला पुस्तकं देतात.

जेव्हा माणसाला छपाईचं तंत्र अवगत नव्हतं तेव्हा मौखिक परंपरेने ज्ञान मिळवले जात होते. आपले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपनिषदे,ही मौखिक परंपरेने चालत आलेली आहेत. नंतर त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली. या ग्रंथांचे लेखक अज्ञात आहेत, म्हणून त्यांना अपौरुषेय असं म्हटलं जातं. आज ऋग्वेदाला सर्वांत प्राचीन ग्रंथ म्हणून मान्यता मिळाली आहे.

छपाईचं तंत्र आणि यंत्र विकसित झालं आणि मग पुस्तक छापली गेली, प्रकाशित झाली. हे खरंच मानवाच्या प्रगतीमधलं मोठंच स्थित्यंतर आहे. मग ही पुस्तकं घरोघरी पोहोचली. लिहिली जायला लागली. वाचली जायला लागली.

मला माझ्या आईनं वाचनाची गोडी लावली. ती फार शिकलेली नव्हती. (त्या काळी मुलींना जास्त शिक्षण दिलं जात नसे. वयात आली की तिचं लग्न लावून दिलं जात असे.)

ती फक्त आठवी पास होती. पण ती अतिशय बुद्धिमान , कर्तबगार, सामाजिक कार्य करणारी होती. तिला वाचनाची आवड होती. ती रोजचा पेपर तर वाचायचीच, पण जवळच्या लायब्ररीतून पुस्तकं आणून तीही वाचायची. वडील डाॅक्टर होते. तेही भरपूर वाचन करत असत. पण ते इंग्रजी पुस्तकं वाचत असत.

त्यावेळी लहान मुलांसाठी "चांदोबा" हे मासिक तेव्हाच्या मद्रास मधून, अनेक भाषांमध्ये प्रकाशित होत असे. माझ्यासाठी माझ्या आईनं ते वर्गणी भरून सुरू केले. ती माझ्या जवळ बसून माझ्याकडून ते वाचून घेत असे. ती माझ्या पुस्तक वाचनाची सुरुवात होती. माझ्यात आणि पुस्तकांमध्ये एक अतूट नातं तयार झालं ते माझ्या आईमुळे.

माझ्या आईला पुस्तकं विकत घेऊन वाचायची सवय होती. मला आठवतंय ब.मो.पुरंदरे यांनी लिहिलेल्या "राजा शिवछत्रपती"चे सर्व भाग तिनं विकत घेतले होते. नंतर हे पुस्तक बहुधा एकत्रित मोठ्या आकारात प्रकाशित झालं.

स्वामी विवेकानंदांच्या व्याख्यानांचे सर्व भाग आमच्याकडे होते. रोज रात्री झोपण्यापूर्वी माझा दादा त्या पुस्तकाचे प्रकट वाचन करत असे आणि आम्ही घरातले सगळेजण ते ऐकत असू. मी आणि माझं घर पुस्तकमय झालो होतो.

पुढे मी खूप वाचलं. खूप म्हणजे अगदी खूपच खूप. मराठी भाषेत लिहिणाऱ्या खूपशा प्रसिद्ध आणि लोकप्रिय लेखकांची पुस्तकं मी माझ्या लहानपणात, तरुणपणात, प्रौढावस्थेत आणि आता म्हातारपणात (डोळ्यांत ड्राॅप्स टाकत) वाचलेली आहेत. वाचते आहे. रामदास स्वामींनी म्हटलंय की "दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे." तसं आयुष्यभर मी वाचलं. थोडं लिहिलंही. मी पूर्वी एका दिवसात एका पुस्तकाचा फडशा पाडायची. आता जास्त दिवस लागतात इतकंच.

माझ्या लहानपणी आणि तरुणपणीही टी व्ही नव्हते. त्यामुळे वाचन हीच एकमेव करमणूक. दुसरी करमणूक म्हणजे रेडिओ. त्यावेळी विविध भारती सुरू झाली नव्हती. रेडिओ सिलोन वरची गाणी हीच करमणूक. लता, रफी च्या स्वर्गीय आवाजातली असंख्य सुमधुर गाणी ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो हे आमचं महद्भाग्य. ह्या सुरेल आवाजांमुळे आमचे कान तयार झाले. आणि पुस्तकांमुळे आमची मनं कोरुन कातून घडवली गेली.

आमच्या वेळी "पाल्याचे वय, जन्मतारीख, शालेय वर्ष, शाळा जून महिन्यात आठ तारखेला सुरू होणार, त्यावेळचं पाल्याचं वय, अन्यथा पाल्य प्रवेशासाठी अपात्र "असली प्रकरणं नव्हती. पाडव्याच्या दिवशी माझा शाळा प्रवेश झाला. आईनं नवीकोरी, काळीकुळकुळीत दगडी पाटी,एक पांढरी शुभ्र पेन्सिल,एका डबीत पाटी पुसण्यासाठी स्पंजाचा ओला तुकडा. एका लहानशा पिशवीत पाटीपूजनासाठी फुलं आणि एक नव्या करकरीत सुवासाची अंकलिपी दिली होती. त्या अंकलिपीच्या रुपानं माझ्या बालजीवनात एका पुस्तकानं पहिला प्रवेश केला.

त्यानंतर चित्रांची पुस्तकं आली. चांदोबा आला, चंपक , कुमार, किशोर मासिकं,मग टारझन आला, फास्टर फेणे आला असे कितीतरी भाऊबंद आले.

मी इंग्रजी पुस्तकंही थोडी फार वाचली. पण ती बरीचशी उडन छू प्रकारात मोडतात. लोकप्रिय पुस्तकं वाचली. पण खूप दर्जेदार,सकस असं काही वाचलं नाही. करमणूक म्हणून वाचलं. ॲगाथा ख्रिस्ती, शेरलॉक होम्स, जेम्स हॅडली चेस,वाचले. आयन रॅंड ची एक, दोन पुस्तकं वाचली. इन्ग्रिड बर्गमन च्या आत्मचरित्राचे पहिले दोन भाग वाचले. जेफ्री आर्चर ची एक, दोन पुस्तकं वाचली. पण मी शेक्सपिअर वगैरेंच्या वाट्याला गेले नाही बाई! झेपलं नसतं. मी भारतीय लेखकांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकांचे बऱ्यापैकी वाचन केलं. ती समजायला सोपी जायची. चेतन भगत ची सगळी पुस्तकं मी मूळ इंग्रजीतूनच वाचली आहेत. सुधा मूर्तींचं इंग्रजी तर खूपच सोपं.

मी अनेक भारतीय भाषांतील पण इंग्रजी किंवा मराठीत अनुवादित पुस्तकांचं वाचन केलं. त्यामुळे बंगाली, कानडी, गुजराती, पंजाबी, उडिया भाषेतील दर्जेदार लेखनाशी परिचय झाला.

हिंदी पुस्तकं मात्र फारशी वाचली गेली नाहीत. वाचायला हवी होती. प्रेमचंद, सुमित्रानंदन पंत,महादेवी वर्मा असे अनेक थोर साहित्यिक हिंदी भाषेत आहेत. पण माझं तिकडं दुर्लक्ष झालं. आय एम द लूजर. नॉट देम..

पुस्तकांच्या वाचनातून माणूस ज्ञानी , शहाणा, सुसंस्कृत,विचारी, संवेदनशील बनतो. त्याचं जगणं सोपं होतं.आपल्या भोवतालचं जग समजून घ्यायला त्याला सोपं जातं."वाचतो तो वाचतो" एका प्रसिद्ध कवनाच्या उत्तरार्धात म्हटल्याप्रमाणे "शास्त्रग्रंथविलोकन मनुजा चातुर्य येतसे फार."

मी अनेक पुस्तकं विकत घेतली. माझी स्वतःची अशी एक लायब्ररीच तयार झाली. ती नीट ठेवणं, त्यांचं जतन करणं,त्यांची निगा राखणं हे काम मी आनंदाने करत असे. बदलीच्या गावी पुस्तकांचं ते जडशीळ बारदान मी लीलया नेत असे. ह्या माझ्या लायब्ररीतली पुस्तकं कुणी कुणी वाचायला मागत असे. मी ते आनंदाने त्याच्या स्वाधीन करत असे.

पण.... पण या वाचायला दिलेल्या पुस्तकांची ती माझ्याकडे परत येताना झालेली दुरवस्था मला अस्वस्थ करणारी असे.
एक म्हणजे माझ्याकडून नेलेलं पुस्तक वेळेवर परत केलं जात नसे. अनेकदा आठवण करावी लागत असे आणि त्या "वाचका"चं परत "देतो, लवकरच देतो", हे ऐकून घ्यावे लागत असे.

मग उत्तरं यायची,१) अजून वाचून व्हायचंय.२) बहीण वाचतेय, तिचं वाचून झालं की देतो.३)मित्रानं नेलंय, त्यानं आणून दिलं की परत करतो. ४) पुस्तक सापडत नाहीये.५) कुठं ठेवलं आठवत नाहीये.६) साॅरी हं मी तुम्हांला दुसरं नवीन आणून देतो.७) दुकानात बघितलं तर ते आऊट ऑफ स्टॉक आहे.

काही जण पुस्तकं परत करतात. पण त्यांच्या पानांचे कोपरे खूण म्हणून दुमडलेले असतात. काही पुस्तकांच्या पानांवर त्यांच्या घरातल्या निष्पाप बालकलाकारांनी पेनानं रेघोट्या मारुन चित्रं काढलेली असतात. एका पुस्तकाच्या पानावर चहा सांडल्याच्या खुणा होत्या. एका पुस्तकाच्या पानावर आमटीचे थेंब सांडल्याच्या खुणा होत्या. आणि भाताची दोन शितं चिकटली होती. बहुधा प्रिय वाचकानं जेवता जेवता पुस्तक वाचलं. काही पुस्तकं जीर्ण,शीर्ण होऊन फाटक्या अवस्थेत मला परत केली जातात.

फार फार यातना होतात मनाला!

असं बरीच वर्षं झाल्यावर मी एक केलं. एके दिवशी मी विकत घेतलेली सर्व पुस्तकं मी गोळा केली आणि एका लायब्ररीला दान करुन टाकली.

संपला आपला आणि पुस्तकांचा ऋणानुबंध.

पण आई, मी काही पुस्तकं मात्र अजून जपून ठेवली आहेत गं !

त्यात "शाळा"आहे,"झेन गार्डन"आहे. चिं वि. आहेत. पुलंचा नंदा प्रधान आहे. एक जुना,पिवळट पडलेला चांदोबा आहे. बाबांचा आवडता एक जीर्ण झालेला "पेरी मॅसन"आहे. झालंच तर........

साहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

26 May 2025 - 2:45 pm | युयुत्सु

मी पण मूळचा पुस्तक-वेडा पण आता युटयूबला पुस्तकांपेक्षा श्रेष्ठ मानतो- कारण केवळ एकरेषीय ज्ञानग्रहणापेक्षा दृक-श्राव्य ज्ञानग्रहण केव्हाही उत्तम! काही विषय पुस्तकं वाचून शिकायला किती वर्षे लागली असती माहित नाही, पण युटयूबमुळे अनेक अवघड गोष्टी कधी कळायला लागल्या लक्षातच आलं नाही. त्यातही भारतीय सादरकर्ते आणि शिक्षक यांच्यापेक्षा पाश्चात्य शिक्षक मला जास्त प्रभावीपणे या माध्यमाचा वापर करतात. इतकं की त्यामुळे आता आमच्या आय० आय० टी० मधले अनेक "विद्यार्थीप्रिय" प्राध्यापक सुद्धा आता रटाळ वाटतात.

कंजूस's picture

26 May 2025 - 3:26 pm | कंजूस

पुस्तक वाचनवेड आवडलं.
मलाही होतं आणि अजूनही आहे. पण चांगली वाचनालये जवळ असल्याने संग्रह करावा लागला नाही. जी काही आहेत ती संदर्भ ग्रंथ किंवा स्वस्तात मिळालेली घेतली आहेत. पुढे ती रद्दीतच जाणार हे निश्चित.

किल्लेदार's picture

27 May 2025 - 10:47 am | किल्लेदार

मलाही लहानपणापासूनच पुस्तकांची गोडी लागली त्यात चांदोबा, चंपक आदी मराठी आणि बऱ्याचश्या हिंदी कॉमिक्सचा समावेश होता. हिंदी सुधारण्यात तर कॉमिक्सनी सिंहाचा वाटा उचललाय. कॉमिक्स फार पूर्वी लायब्ररीला दान करून टाकली असली तरी दोन कपाटं भरून पुस्तकं आजही आहेत. एक खाणा साडेतीनशे - चारशे नॅशनल जिओग्राफिकच्या अंकांनी खच्चून भरलाय.

पूर्वी कुणाला पुस्तक दिलं की त्याची नोंद एका पिवळ्या "पोस्टइट" कागदावर करून तो मी बाहेरच्या दाराच्या आतल्या बाजूला चिकट वून ठेवत असे . त्यामुळे दर वेळी प्रत्येकाला घरातून बाहेर पडताना बाहेर गेलेल्या पुस्तकांची यादी, पुस्तक नेल्याची तारीख नेणाऱ्याच्या नावासकट दिसायची. पुस्तकं निमूटपणे परत केल्या जायची.