मी मिपावर लिहिलेल्या "माझी मदतनीस" या लेखावर खूपच मस्त चर्चा रंगली. या लेखावर जवळपास पंचेचाळीस प्रतिसाद आले आणि अडीच हजार वाचने झाली.
मी सहज सुचलं म्हणून , मनात हा विषय काही दिवस घोळत होता म्हणून, हा लेख लिहिला. त्यावर इतकी चर्चा झालेली पाहून मला आनंद झाला. या प्रतिसादांमध्ये काही डाव्या तर काही उजव्या विचारसरणीचे, तर काही मध्यममार्गी,तर काही तटस्थ मतप्रवाह होते.
मी हिंदू आहे. हिंदू म्हणून जन्माला आले. हिंदू म्हणून लहानाची मोठी झाले. मला अर्थातच माझ्या धर्माचा अभिमान आहे. माझा धर्म मी बदलणार नाही. माझा मला सहन होणार नाही असा शारीरिक छळच झाला आणि मला धर्मपरिवर्तन करावं लागलं तर माझा नाईलाज आहे. पण पैशाचं, संपत्तीचं, किंवा इतर प्रलोभन दाखवलं म्हणून मी धर्मपरिवर्तन करणार नाही.
हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान, अद्वितीय ग्रंथसंपदा,आपला सांस्कृतिक वारसा, आपल्या धर्माचं प्राचीनत्व,आपली संस्कृती,आपली सहिष्णुता, यांचा मला अभिमान आहे. पण आपल्या धर्मातला जातिभेद, कर्मठपणा, कर्मकांडे, विषमता, अनिष्ट रूढी, परंपरा मला आवडत नाहीत. मी त्यांचा निषेध करते. तिरस्कार करते. मी त्या अजिबात पाळत नाही. तरीही मी हिंदूच आहे.
याचमुळे माझ्या ऐन तारुण्यात मी डाव्या विचारसरणीकडे झुकले होते. मला कार्ल मार्क्स चे विचार पटायचे. त्यातली जातिधर्मपंथनिरपेक्षता मला पटायची. मला तर असं वाटायचं की आपल्या देशातही कम्युन्स असावीत. तिथं मुलांवर राष्ट्रभक्तीचे संस्कार व्हावेत आणि स्त्रियांनी स्वतंत्रपणे, मुक्तपणे राष्ट्रकार्यात स्वतःला झोकून द्यावं. स्त्रीपुरूष विषमता नष्ट व्हावी.
पण नंतर माझा डावा दृष्टिकोन बदलला. विस्ताराने प्रचंड मोठ्या असलेल्या डाव्या देशातील पोलादी पडदा आणि त्याच्या आड होणारी तिथल्या नागरिकांची होणारी गळचेपी, त्यांचं परावलंबित्व वाचलं, ऐकलं आणि माझे विचार बदलले.
पण पुढे ऋग्वेद, उपनिषदं, भगवद्गीता अशांसारख्या ग्रंथांच्या वाचनातून माझे विचार बदलले. त्यातही गीतेतले चातुर्वर्ण्यं मया सृष्टं"सारखे विचार पटले नाहीतच. पण मला हिंदू धर्मातील स्वातंत्र्य आणि सहिष्णुता आवडली. ती अशाकरता की माझ्यासारखी एक सामान्य स्त्री सरळसरळ म्हणू शकते की,"मला आपल्या धर्मग्रंथातले ,गीतेतले प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने मांडलेले विचार पटत नाहीत."
मी नंतर टिळक , आगरकर, सावरकर वाचले. मला टिळकांपेक्षा आगरकर, सावरकर यांचे विचार पटले,आवडले. दोघांनीही हिंदू धर्मातल्या अनिष्ट रूढी, परंपरा दूर सारून, सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला. त्यांचा पुरस्कार केला.
हिंदू धर्म आणि हिंदू समाज असा झाला पाहिजे. आपण स्वतंत्र झालो तेव्हा आपल्या देशात लक्षावधी खेडी होती. आज त्यांची संख्या कमी होत चालली आहे. त्यांचं नागरीकरण होतं आहे. खेड्यांची निमशहरं, शहरांची महानगरं होताहेत. हा बदल आणि त्यामुळे बदलत जाणारी समाजरचना आणि बदलत जाणारी माणसं,त्यांची बदलत जाणारी मानसिकता पाहून मला आनंद होतो.
होय मी हिंदू आहे. मी इतर धर्मांबद्दलही आदर बाळगते. सर्वांनीच आपली कट्टरता सोडून द्यावी. गुण्यागोविंदाने एकत्र राहावे. वैर, हिंसाचार टाळावा. सर्वधर्मसमभाव हा शब्द वापरुन गुळगुळीत झालाय. पण तोच आचरणीय आहे.
मी जन्मले तेव्हा आपल्या देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं. बदलत्या भारतीय जीवनाचे अनेक अनुभव मीही घेतले. मला फरक जाणवतो. चांगलाच जाणवतो. हे माझं विधान मी अधोरेखित करते.
फरक पडलाय.
गॅस पेटवून त्यावर पाणी ठेवलं की खालचं पाणी तापवून, हलकं होऊन वर जातं. आणि वरचं जड पाणी खाली येऊन तेही तापून, हलकं होऊन वर जातं. मग सगळंच पाणी वरखाली होतं. एकसारखं होतं. मुळापासून उलथापालथ होते. यालाच "अभिसरण प्रक्रिया" म्हणतात. आपल्या समाजातही अशी "अभिसरण प्रक्रिया" घडते आहे.
असाच आपला समाज होतोय. बदलतोय. सुधारतोय. त्याचं एक लहानसं उदाहरण म्हणजे "माझी मदतनीस".
तो लेख लिहिला तो याच उद्देशाने.
तुम्ही सर्वांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिलात. मला बरं वाटलं. या बदलांना आपण सामोरे जातोच आहोत. त्याला हातभारही लावूया इतकंच. सर्वांचेच मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
प्रतिक्रिया
22 Mar 2025 - 10:51 am | कंजूस
हिंदू विचार म्हणजे काय?
टिळकांनी कोल्हापूरच्या शाहु महाराजांनी फारच पंगा घेतला होता हिंदू वैदिक धार्मिक आरक्षणावरून. पण लोकांनी ते स्वराज्य लढ्याच्या विचारांत कानाआड केलं.
Why I am a Hindu - Shashi Tharoor हे पुस्तक वाचता येईल.
22 Mar 2025 - 10:52 am | कंजूस
* आरक्षणावरून *.....xxxx
आचरणावरून.
22 Mar 2025 - 11:35 am | Bhakti
मला टिळकांवरच एक जुनं साप्ताहिक मिळालं आहे,लवकर वाचेन.पण गीतारहस्य वाचतांना त्यांचा वैदिक संस्कृतीचा दांडगा अभ्यास समजत आहे.पण याचा अट्टाहास दिसला नाही.उलट ज्ञान , ज्ञाता या गोष्टी अनुभव शकतो पण 'ज्ञेय' जाणणं म्हणजे उगाच दमछाक असं ते वेळोवेळी स्पष्ट करतात.याचा मला खरंच फायदा झाला.
तरी ते शाहूंविषयी अट्टाहास का होते हे लवकरच जाणून येईल.मग आगरकरांविषयी जाणून घेण्यासाठी प्रयत्न करेन :):)
22 Mar 2025 - 10:52 am | वामन देशमुख
त्या चर्चेचा समारोप या वेगळ्या धाग्यामध्ये छान केलाय, आजी.
22 Mar 2025 - 11:30 am | Bhakti
चांगलं मनोगत आजी_/\_
कोणतेही विचारसरणी स्वबोधापर्यंत नेणारी असलीच पण तो 'स्व' वैश्विकतेसाठी जोडला पाहिजे.हेच मिसिंग असतं बरेचदा,हेच ओळखता यायला हवं.पण काही विनाकारण अहंभाव घट्ट धरु ठेवतात.त्यामुळे खुप अडचणी वाढतात.