मी आज तुम्हाला माझ्या आईने मला माझ्या लहानपणी सांगितलेली एक गोष्ट सांगणार आहे. म्हणजे मला ती अचानक आठवली. ती का आठवली यावर अजून माझा विचार आणि मौन चालू आहे.
ही कथा म्हणजे काहीशी प्रचलित बोधकथाच आहे. त्यामुळे नवीन कथा म्हणून त्यात किती मूल्य आहे कोण जाणे. पण "मूल्य" या गोष्टीबद्दल मात्र ही कथा नक्की बोलते.
एका गावात एक म्हातारे गृहस्थ राहत होते. त्यांचं वय असेल सत्तरच्या आसपास. त्यांना सगळे आबा म्हणून हाक मारायचे. आबा सत्तर वर्षांचे असले तरी काटक होते. व्यायाम करायचे. दिवसभर काबाडकष्ट करायचे. त्यांना बायको मुलं नव्हती. बायको पूर्वीच मरण पावली होती. मुलगा पोटापाण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये मिळेल ते काम करत होता आणि मुलगी लग्न होऊन सासरी गेली होती. त्या मुलीचा मुलगा म्हणजे आबांचा नातू. सदानंद. तोच काय तो आबांजवळ राहायचा.
या नातवाला सर्वजण सदा अशी हाक मारायचे. तो आधी अर्थातच आपल्या आईसोबत तिच्या सासरी राहायचा. पण हा सदा एरंडासारखा वाढत वाढत चांगला चवदा पंधरा वर्षांचा झाला. तो धगुरडा वयासोबत वाढत्या भांजणीने वांड होत गेला. मग या विधुळ्या पोराला सुधारण्यासाठी त्याला आबांकडे रवाना करण्यात आलं. आबा शक्य तितकी शिस्त त्याला लावण्याचा प्रयत्न करत. पण दिवसेंदिवस तो कार्टा आबांना एक डोकेदुखीच होत चालला होता.
तो उशीरा उठायचा. न्याहरी करून जो बाहेर पडायचा तो थेट दुपारी उशीरा फक्त जेवायला घरी यायचा. जेवण झालं ओसरीवर जी ताणून द्यायचा ते संध्याकाळीच उठायचा. पुन्हा एकदा बाहेर जायचा, ते रात्री जेवायला घरी उगवायचा. आबा त्याला म्हणायचे,"अरे राजा, माझं जरा ऐक. मला घरकामात थोडी तरी मदत कर. गावात कुठंतरी काहीतरी काम शोध. चार पैसे मिळव. आईला थोडे थोडे पैसे पाठव. तिला संसारात मदत कर. घराच्या पिठात आपलं मीठ घालून मदत कर. पैसे साठव. अजून पाच, सहा वर्षांनी तुझं लग्न लावून देऊ. तू काही कमाई केली नाहीस तर तुझ्या बायको, मुलांचा सांभाळ कसा करणार?"
पण आबांच्या या बोलण्याचा सदावर काहीही परिणाम होत नसे. त्याला काही काम करण्याची इच्छाच नव्हती. गावभर उंडारण्यात आणि लोकांच्या खोड्या काढण्यात मात्र रस होता आणि गावकऱ्यांच्या तक्रारींनी आबा हैराण होत होते.
सदा अठरा एकोणीस वर्षांचा झाला आणि मग मात्र एक दिवस आबांचा संयम संपला. ते सकाळी सकाळीच त्याला रागाने म्हणाले ,"यापुढे तू मी सांगतो तसं वागला नाहीस तर मात्र मी तुला काठीनं झोडपून काढेन आणि जेवायलासुद्धा देणार नाही. उपाशी ठेवीन किंवा हाकलून देईन घरातून. मग तू परत तुझ्या आईकडे जा नाहीतर कुठेही चालता हो.."
आबांच्या या धमकी चा मात्र सदावर परिणाम झाला. तो म्हणाला,"आबा, यापुढे मी तुम्ही म्हणता तसे वागेन. पण मला घरातून काढू नका. दूर गावी पाठवू नका. माझे सगळे मित्र इथेच आहेत."
आबा म्हणाले," त्या बेकार मित्रांसोबत उंडारणे आता बंद. उद्या सकाळी लवकर उठून तू गावात जायचं आणि काम शोधायचं. दिवसभर काहीही श्रम करून तू मला संध्याकाळी घरी आल्यावर मिळवलेले पैसे द्यायचे आणि त्या पैशाचं मी सांगेन ते करायचं. कितीही कमी पैसे का मिळेनात, पण रिकाम्या हाताने घरी यायचं नाही."
सदा म्हणाला,"हो हो.. चालेल. पण मला मारु नका आणि उपाशी ठेवू नका." आबांनी त्याचं म्हणणं कबूल केलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी सदा लवकर उठला. सगळं आवरून,आबांनी दिलेली चहा, चपाती खाऊन बाहेर पडला. कबूल केलं याचा अर्थ खरोखर कष्ट थोडेच करायचे असतात?
बाहेर पडल्यावर त्याने विचार केला, काय या म्हाताऱ्याची कटकट मायला! मी?.. आणि कष्ट करून पैसे मिळवणार? वाट बघा. आता दिवसभर मस्तपैकी या वडाच्या झाडाखाली पारावर झोप काढू आणि संध्याकाळी यशवंत्याच्या बापाकडून एक रुपया द्या म्हणून पैसे मागू आणि घरी गेल्यावर त्या आबाला देऊ. हाय काय आन नाय काय !"
सदानं दिवसभर मस्तपैकी झोप काढली. घरून आणलेली शिदोरी उघडून दुपारी जेवला, आणि संध्याकाळी मित्राच्या, म्हणजे यशवंत्याच्या बापाकडे जाऊन त्याला म्हणाला,"अहो काका, आमचे आबा हल्ली मी विचित्रच वागताहेत माझ्याशी. आज मला जेवायलाच दिलं नाही. आणि घराबाहेर काढलं. सकाळपासून उपाशी फिरतोय. खूप भूक लागलीय. जरा थोडे पैसे देता का? कायतरी खातो."
यशवंताच्या बापाला त्याची दया आली. त्यानं सदाला एक रुपया दिला. आणि म्हणाला,"मी पण गरीबच हाय. कमवून कसंतरी फ्यामिलीचं पोट भरतो. हा घे रुपया. घरी जा आबाची माफी माग. आन नीट वाग. आबा चांगला हाय. तुज्या चांगल्यासाठीच सांगतोय तो. तो तुला माफ करेल आन् जेवायला दील तुला."
तो एक रुपया घेऊन सदा घरी गेला. आबांना तो रुपया दाखवत तो म्हणाला,"हे बघा. मी गाडीतळावर हमाली करून हा रुपया मिळवला."
आबा म्हणाले,"छान.. आता मी सांगतो तसं कर. तो रुपया समोरच्या आपल्या विहिरीत फेकून दे."
सदा आ करून बघतच उभा राहिला.
"रुपया विहीरीत टाक, नाहीतर झोडपून काढेन.", आबा कडाडले.
सदा घाबरून बरं म्हणाला आणि त्याने तो रुपया समोरच्या विहीरीत टाकला.
आबांनी रुपया विहीरीत फेकायला सांगितला याचं त्याला खूप आश्चर्य वाटलं. पण तो घाबरून गप बसला. अजून तरी तो आबांना घाबरत असे.
थोड्या वेळाने तो आबांनी दिलेली भाजी, भाकरी जेवला. आणि दिली ताणून.
दुसऱ्या दिवशीही सदानं असंच केलं. दिवसभर झोप काढून, गावात आणखी कोणाकडे तरी जाऊन भीक मागितली आणि घरी येऊन आबांना त्यानं एक रुपया दाखवला. आबांनी त्याला तो विहीरीत फेकायला सांगितला. त्यानं तो फेकला.
असे पंधरा दिवस गेले. रोजच्या रोज इकडे तिकडे जाऊन, नव्या ठिकाणी हात पसरून, भीक मागून, मदत घेऊन सदानं एकेक रुपया, दोन दोन रुपये मिळवले आणि आबांच्या सांगण्यावरून ते सर्व रुपये रोज विहिरीत टाकले.
पण गाव होतं छोटं. हळूहळू सदाची पंचाईत व्हायला लागली. त्याला आता गावातलं कुणीही मदत करेना. उलट तो दिसला की लांबूनच लोक रस्ता बदलू लागले. किंवा तोंडावर नाही म्हणू लागले.
सदा विचारात पडला.,"आता काय करायचं? पैसे कसे मिळवायचे? बहुतेक आता खरंच काहीतरी काम मिळवावं लागणार. मेहनत करावी लागणार.". त्याच्या अंगावर काटा उभा राहिला.
शेवटी तो गावाबाहेर असलेल्या एका शेतावर गेला. लाज बाजूला ठेवून त्याने त्या शेताचा मालक असलेल्या शेतकऱ्याला विचारले,"काका, मला तुमच्या शेतावर मजुरीचं काम देता का? फार उपकार होतील."
शेतकरी म्हणाला,वयानं लहान वाटतोस. पण अंगापिंडानं मजबूत दिसतोस. बरं. देतो तुला काहीतरी काम. चल, हा शेताचा इकडचा भाग आज भांगलून काढ."
सदानं खुरपे, कुदळ, फावडे अशी हत्यारे ताब्यात घेतली आणि त्यानं भांगलणीला सुरुवात केली. संध्याकाळ होईपर्यंत तो भांगलत होता. शेतकरी त्याच्या मागोमाग सतत लक्ष ठेवून असल्याने नाईलाजाने त्याने टाळाटाळ न करता शेतातलं सगळं तण, कचरा काढून शेत स्वच्छ केलं. शेतकरी त्याचं काम बघून समाधानी झाला आणि त्यानं सदाला पाच रुपये दिले. म्हणाला, नवखा दिसतोस. पण उद्यापासून रोज ये. तुला काम देईन. शिकशील हळू हळू."
सदानं होकारार्थी मान हलवली. त्याला प्रचंड थकवा आलेला होता. तो कसाबसा चालत घरी गेला. त्यानं आबांना ते पैसे दाखवले, "आबा, आज पाच रुपये मिळाले."
आबा म्हणाले,"टाक ते विहिरीत. आणि हातपाय धुवून आत ये."
मग मात्र आबांच्या डोळ्याला डोळा भिडवत सदा म्हणाला,"आबा, मी आज हे पैसे विहिरीत टाकणार नाही. हे मी कष्ट करून मिळवलेले पैसे आहेत. यापुढेही मी माझे कष्टाचे पैसे विहिरीत टाकणार नाही. आबा, तुम्ही हे का करत होतात ते मला कळलं आहे. मी तुमची माफी मागतो. याआधी मी कधीच काम केलं नाही. मी रोज कुठेतरी भीक मागून, मदत मागून पैसे आणायचो आणि तुम्हांला दाखवायचो. तुम्ही सांगितल्यावर ते विहिरीत टाकायचो. मला तसं करताना काहीच वाटायचं नाही. मी म्हणायचो तुम्हाला वयामुळे कळेनासं झालं आहे. तुम्ही म्हणता ना? मग टाकूया पैसे विहिरीत.. आपल्याला काय फुकट खायला, जेवायला मिळतंय ना! बास झालं.. पण आबा,आज मी पैसे फेकणार नाही. दिवसभर काबाडकष्ट केलेत मी. घाम गाळलाय. मी पैसे विहिरीत टाकणार नाही. मला धडा शिकवायलाच तुम्ही असं वागलात. उद्यापासून रोज मी त्या शेतावर जाईन. आणि मजुरी करीन. फुकट काही मागणार नाही. फुकट, भिकेत मिळालेले पैसे कधीच घेणार नाही."
आबांच्या डोळ्यांत पाणी आलं. सदाही डोळे पुसत आबांच्या मिठीत शिरला.
दोघंही रडत होते.
"माझा लाडका नातू आज खरा शहाणा झाला. आता मला त्याची काळजी नाही.", आबा पुटपुटत होते.
प्रतिक्रिया
13 Nov 2024 - 2:15 pm | सौंदाळा
छानच आहे गोष्ट, पहिल्यांदाच ऐकली. मुलीला सांगतो.
लेखाचे नाव वाचून आजीनी राजकारणावर काही लिहिले की काय असे वाटले :)
14 Nov 2024 - 6:25 pm | वामन देशमुख
आजी,
बऱ्याच दिवसांनी वाचनात आलेली अशी साधी सोपी सरळ सुगम कथा आवडली.
बालदिनी बालपणाचा पुनःप्रत्यय आला.
16 Nov 2024 - 12:13 pm | गवि
खूप काळाने साधी सरळ बोधकथा वाचून बरे वाटले. मार्मिक आहे.
ही कथा नेमकी आत्ताच का आठवली यावर मात्र विचार आणि मौन..
हे वाक्य सूचक असावे. :-))
16 Nov 2024 - 8:34 pm | चौथा कोनाडा
आजींनी नेमकं नाव वेळ साधून दिलं...
आता ही आजी मिपाची लाडकी आजी झाल्यास नवल नई
16 Nov 2024 - 6:00 pm | १.५ शहाणा
खूप वर्षापूवी चांदोबा मध्ये साधारण या आशयाची गोष्ट वाचाली असावी, ससे वाटाते .
16 Nov 2024 - 8:32 pm | चौथा कोनाडा
छान कथा.. आवडली.