कॅपिटल आय आणि स्माॅल आय.

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
4 Oct 2023 - 8:44 am

आता मी वानप्रस्थाश्रमात प्रवेश केलाय. सत्तरी ओलांडली. माझ्यासारखे अनेकजण आहेत ज्यांनी साठी, सत्तरी ओलांडली आहे. साठीनंतरच खरं तर वानप्रस्थाश्रम सुरु होतो.

कसं वागायचं वानप्रस्थाश्रमात? प्रश्न पडतो ना? त्याची उत्तरे अनेक आहेत. पहिलं म्हणजे आपण मुलाबाळांच्या संसारात "कॅपिटल आय" न होता "स्माॅल आय" व्हायचं. अहंकार, मीपणा झटकून टाकायचा. कॅपिटल आय तरुणपणी असतो. अंगात मस्ती मुसमुसत असते. माज असतो. जोश असतो. मनगटात ताकद असते. मनात ऊर्मी , उत्साह संचारलेला असतो. मी काहीही करेन असा अहंकार असतो. "कर्तुं,अकर्तुं, अन्यथा कर्तुम्"अशी ताकद असते. जिद्द असते . क्षमता असते. कर्तबगारी असते. नवनवीन क्षितीजं पादाक्रांत करावीशी वाटतात. हे सगळं म्हणजे कॅपिटल आय!मी,मी मी आणि"मीच".

पण हे सगळं वानप्रस्थाश्रमात सोडून द्यावं लागतं आणि "स्माॅल आय" बनावं लागतं. इथंही मी असतो. पण स्माॅल. लहान. फक्त मीच असा अट्टहास नसतो. इथं मी हवा पण कसा तर फक्त आत्मसन्मान हवा. Self concept हवा. मीच नको. मीही हवा. कुणीही यावं आणि माझा अपमान करावा, असं नको. मी हवा पण अहंकार नको. बा.भ.बोरकरांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे
"मीपण ज्यांचे पक्व फळापरि सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो". असं आपण व्हायला हवं.

मुलांच्या संसाराकडे तटस्थपणे, अलिप्त राहून पाहाता यायला हवं. पाण्यात राहून पाण्यात नसणाऱ्या कमलपत्राप्रमाणे! स्वतःचं आयुष्य अलिप्तपणे जगता यायला हवं. मुलं बिझी असतात ती आपल्याला वेळ देऊ शकत नाहीत हे स्वीकारायला हवे. आपण नाही का त्यांच्या लहानपणी आणि आपल्या तरुणपणी त्यांना एकटं टाकून कामावर गेलो? ते आपलेच आहेत पण त्यांच्या जीवनात लुडबुड करायची नाही. त्रयस्थपणे त्यांच्याकडं आणि स्वतः कडे पाहायला शिकायचं. त्यांनी विचारलं तर मत व्यक्त करायचं. सल्ला द्यायचा, नाही तर चूप बसायचं. त्यांना स्पेस द्यायची."कुठं जाता?का जाता?सारखे कसे जाता? काय खाता? किती पैसे खर्च करता?"असले प्रश्न विचारुन त्यांच्यावर वाॅच ठेवायचा नाही. त्यांना मोकळेपणा द्यायचा.

आर्थिकदृष्ट्या आपण स्वावलंबी असायला हवंच हवं. त्याची तरतूद आपल्या तरुणपणात आणि प्रौढपणात करायचीच. काही झालं तरी मुलांवर सर्व पैसे खर्च करून आपण कफल्लक व्हायचं नाही. मुलांना सतत आर्थिक मदत करुन आपण त्यांना पांगळे करून टाकतो. त्यांनी आर्थिक स्वावलंबन शिकायलाच हवे. आचरणात आणायला हवे. आपण आपल्या आरोग्यासाठी, औषधोपचारासाठी पैसे राखून ठेवावेत. मुख्य म्हणजे राहत्या घरावर आपलाही कायदेशीर हक्क हवा. "खायचं ताट द्यावं पण बसायचा पाट कधी देऊ नये"म्हणतात ते घेण्यासारखं आहे.

आपला दृष्टिकोन या वयात सकारात्मक हवा. आपण कधी निराश झालो तर आपण आपल्या जीवनातल्या अनेक संकटांवर कशी मात केली होती ते आठवावे. आपल्यातले प्लस पॉइंट्स,मायनस पाॅइंटस् लिहून काढावेत. बघा! नक्कीच प्लस पॉइंट्स जास्त भरतील. उगीच उदास तोंड करून बसू नये. मित्रमैत्रिणीत रमावं. हास्यक्लब, ब्रीजक्लब,रिडर्स क्लब, ज्येष्ठ नागरिक क्लब, अत्रे कट्टा, महिला मंडळ अशा ठिकाणी जावं. सगळ्यांच्यात मिसळावं. नवं ऐकायला मिळतं. झूम मीटिंग मध्ये आप्तेष्ट, नातेवाईक यांच्याशी गप्पा माराव्यात. एखादा नवा कोर्स ऑनलाईन शिकावा.

आपलं जग आणि नवं . आत्ताचं जग यांत आमूलाग्र बदल झाला आहे. त्यामुळे भांबावून जाऊ नये. नवं तंत्रज्ञान आपल्या मुलांकडून, नातवंडांकडून शिकून घ्यावे. टीव्ही बघावा.ओटीटी वरचे सिनेमे पाहावेत. किंडलवर वाचावं. कदाचित् जमणार नाही. कदाचित् अवघड वाटेल. पण लॅपटॉप शिकून घ्यावा. यू ट्यूब्जवरच्या पोस्ट्स वाचाव्यात. बघाव्यात. वेगवेगळ्या वेबसाइट्स वर जावं. आपण अगदीच फोर्थ जनरेशनचे वाटू नये इतपत माहिती करून घेतली पाहिजे. त्यासाठी आपल्या मुलांकडून नातवंडांकडून रागावून घ्यावं. आपण नाही का गमभन शिकवताना लहानपणी त्यांना धपाटे घातले!

नवे खाद्य पदार्थ पिझ्झा, बर्गर वगैरे वगैरे वगैरे आवडीने खायला शिकायचं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे "आमच्यावेळी असं होतं"हे दळण दळायचं नाही. तुलना करायची नाही. जग बदललं आहे. त्याच्याबरोबर धावायला जमलं नाही,तरी चालायला शिकायचं. आपल्या दुखण्यांची कुरकूर सतत करायची नाही. त्यामुळे दु:खी,उदास,किरकिरं व्हायचं नाही. मुलांना आपल्या दुखण्याबद्दल सांगितले पाहिजे ,पण त्रागा करून त्यांचं रोजचं जगणं मुश्कील करायचे नाही.

त्यांनी बोलावलं तर मुलांबरोबर प्रवासाला, पिकनिक ला जायचं. आपण स्वतःही आपल्या शारीरिक मर्यादा सांभाळून प्रवास करायचा. काहीजण एकटे असतात. सहचर आधी निघून गेलेला असतो. त्यांनीही उदास तोंड करून न बसता मित्रमैत्रिणी जोडून त्यांच्या सहवासात आनंदी राहायचे.

जो नव्या परिस्थितीनुसार बदलतो तो टिकतो. बदलेल तो टिकेल. जो टिकतो तो बुद्धिमान. Suvival of the fittest. हा जगाचा नियमच आहे, नाही का?

मी असं जगण्याचा प्रयत्न करते. मला खूप जिवलग मित्रमैत्रिणी नातेवाईक आहेत. माझा मुलगा माझा मित्रच आहे. सगळ्यांचं हे मैत्र पाहून, अनुभवून म्हणावंसं वाटतं,

"घेरी जव मज ढगाळ रजनी
हो तू तव मम अढळ चांदणी।।
स्मित उद्धारक तुझिया वदनी
न्याहाळित हे तडीस लागो
माझे जीर्ण जहाज।।

मांडणीसमाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

कंजूस's picture

4 Oct 2023 - 9:24 am | कंजूस

अगदी.

मनातलं. सर्वांशी हसून राहावं पण अलिप्त राहावं. वयाचं अंतर असतं. ते बोलले तरी ते वरून असतं,आतून मात्र टाळत असतात हे पक्कं लक्षात ठेवावं. आपल्या आपणात रमलं की सर्व जग आपलंच.

धर्मराजमुटके's picture

4 Oct 2023 - 11:40 am | धर्मराजमुटके

आतून मात्र टाळत असतात हे पक्कं लक्षात ठेवावं याच्याशी थोडीशी असहमती. अर्थात नियम अपवादानेच सिद्ध होतात.

मुक्त विहारि's picture

4 Oct 2023 - 10:46 am | मुक्त विहारि

गेली 5-6 वर्षे, वृद्धांच्या साठीच सेवा करत असल्याने, मी माझ्या पुरते काही नियम आखून घेतले आहेत ...

----

माणसांचा प्रवास ...WWW ते MMM...

तरूण पणी

W ....Wealth

W .... Wisely Investment

W ... Wine ( ताकद आणि उर्जा असे पर्यंत, जे जे आवडत आहे, त्याचा आनंद घ्या ...)

निवृत्ती नंतर, आपण कधी निवृत्त व्हायचे? हे प्रत्येकाने ठरवावे ..

M = Medical facilities

M = (Young) Manpower

M = (Sufficient) Money

-------

वरील नियम हे माझ्या पुरते आहेत आणि मानवी जीवन हे एका साच्यात बसत नाही ...

कुणाला प्रतिसाद द्यायचा आणि कुणाला नाही, हा माझा वैयक्तिक अधिकार आहे ...

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Oct 2023 - 1:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

छान लेख!! पण ईतकी स्पष्टता असणारे लोक कितीसे असतात? मग एकाच छताखाली राहुन २ किवा ३ पिढ्यांचा संघर्ष आणि त्यातुन कटुता येते. तरीही नाती तशीच ओढत माणसे एका छताखाली जगतात. मग कोणत्याही एका पिढीला सुख मिळत नाही. विषय खोल आहे, त्यामुळे थांबतो.

कर्नलतपस्वी's picture

4 Oct 2023 - 4:28 pm | कर्नलतपस्वी

मावळत्या सूर्य म्हणजे तापहीन मार्तंड. मावळतीवरचे बदलते रंग बघत बुडून जाणे एव्हढेच हातात उरते.

स्पष्टता असो नसो, मावळत्या दिनकराची फक्त फक्त उरते ती फरपट आणी मग वाटते.......

देखा है ज़िंदगी को कुछ इतने क़रीब से

चेहरे तमाम लगने लगे हैं अजीब से

Bhakti's picture

4 Oct 2023 - 1:33 pm | Bhakti

खुप छान!
अजून तीस -चाळीस वर्षांनी मी अशीच आजी होवो ;):)

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Oct 2023 - 2:34 pm | अमरेंद्र बाहुबली

पण तो पर्यंत मिपावर वाद विवाद करून तुम्ही भांडखोर झालेला असाल.

अहिरावण's picture

4 Oct 2023 - 7:15 pm | अहिरावण

म्हणजे? आत्ता नाहीयेत असा दावा आहे का आपला?

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Oct 2023 - 8:58 pm | अमरेंद्र बाहुबली

आत्ता कमीहेत. कारण आता सासू ह्या कमजोर आघाडीवर लढताहेत. ऊद्या सून नावाचा तगडा खेळाडू मैदानात ऊतरला की भक्तीताईंचा कस लागनार. मग चीडचीड होणार, भांडणे मग रूसवे फूगवे. : )
मग भक्तीआजीही असे धागे काढनार…. :)

Bhakti's picture

4 Oct 2023 - 9:33 pm | Bhakti

काहीही हं अबा!

निनाद's picture

5 Oct 2023 - 5:18 am | निनाद

मुख्य म्हणजे राहत्या घरावर आपलाही कायदेशीर हक्क हवा. "खायचं ताट द्यावं पण बसायचा पाट कधी देऊ नये"म्हणतात ते घेण्यासारखं आहे.
अगदी संपूर्ण सहमत आहे!

प्रकाश घाटपांडे's picture

5 Oct 2023 - 11:47 am | प्रकाश घाटपांडे

लेख खूपच छान आहे. पण भावे प्रयोग आहे. स्वतःला मोल्ड करता आले पाहिजे आणि नेमके तेच या वयात अवघड असते. जोडीदाराबरोबर सहजीवन सुद्धा या वयात अवघड जाते.

धर्मराजमुटके's picture

5 Oct 2023 - 1:32 pm | धर्मराजमुटके

छान लेख ! वाचून शिक्षक आणि विद्यार्थी यांचा एक विनोद आठवला. इथे लिहिण्यासारखा नाही.

अहिरावण's picture

5 Oct 2023 - 2:07 pm | अहिरावण

व्यनी करा

वामन देशमुख's picture

5 Oct 2023 - 4:00 pm | वामन देशमुख

मला पण

सौंदाळा's picture

5 Oct 2023 - 5:56 pm | सौंदाळा

मला पण

खूप छान लिहीले आहे आजी.
आपल्याला आयुष्याच्या अगदी शेवटल्या दिवसापर्यंतची साथ म्हणजे अपले शरीर आणि आपले छंद यांची. या दोन्हींची जपणूक हर प्रयत्नांनी करत राहिले पाहिजे.
माझ्यापुरते बोलायचे तर नुकतीच बहात्तर वर्षे पूर्ण झाली. वर्षातला बराचसा काळ मुला-नातवंडासोबतच रहातो. नातवंडांबरोबर घालवत असलेला काळ सर्वोत्तम. बाकी शक्य तितकी मदत मुलांच्या घरांसंबंधीच्या बाबतीत करतो. उदा. सुतारकाम, दुरुस्तीबद्दल नकाशे वगैरे बनवणे, बागकाम इत्यादि. नुक्तीच मोठी दगडी पाळ मुलासोबत काम करून बनवली. खूप मजा आली. बाकी बाबतीत अलिप्तता. चित्रकला, संगीत आणि मिपात रमणे. आहार-विहार वगैरेसंबंधी जागरूकता बाळगणे. नातवंडांना एरव्ही कुणी शिकवणार नाही असे काही शिकवणे, उदा. चित्रकला, ५०-६० च्या दशकातले सिनेसंगीत, नाट्यसंगीत, वॉल्ट्झ, मोझार्ट वगैरे ऐकवणे, आणि वाजून दाखवणे वगैरे. मी दुपारी झोपतो तेंव्हा दोन वर्षांची नात उठवून म्हणते, "आबा ऊथ, पिंतिंग कल" तेंव्हा जे काही वाटते, ते शब्दात मांडता येणार नाही.

कंजूस's picture

5 Oct 2023 - 7:33 pm | कंजूस

बरोबर.

शेवटी १) आपल्यासाठी कुणी थांबलंय,
२)आपल्याला वाचून कुणाचं अडलंय.
आणि चिमुटभर विनोद.

स्नेहा.K.'s picture

5 Oct 2023 - 7:51 pm | स्नेहा.K.

फक्त I चं रूपांतर i मध्ये केव्हा करायचं, हे उमगायला हवं!

सस्नेह's picture

6 Oct 2023 - 6:12 pm | सस्नेह

सर्व मुद्दे पटणेबल.
आता काही वर्षांत येऊ घातलेल्या साठीत प्रवेश करताना हे उपयोगी होईल. :)

माझ्या या लेखाला भरपूर वाचने लाभली आणि तुम्हां सर्वांचे भरभरून प्रतिसादही मिळाले.फार बरं वाटलं आणि आनंद झाला.वाचकांचं उदंड प्रेम मिळालं तर लेखकाला दुसरे काय हवे! सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

मागेही एकदा प्रतिसादात लिहिलं होतं.. आजही तसंच वाटतंय. हा लेख वाचून आदरार्थी अनेकवचन मोडून पडलं बघ! :-)

आजी, तुझं लेखन हे नेहमीच वेगळं, सहज आलेलं आणि थेट भिडणारं असतं!
इतकं सहज सोपं राहणं ही पातळीच अगदी निराळी आहे, आश्वस्त करणारी आहे आणि पुढील मार्ग दाखवणारी देखील आहे! खूप आवडले! :-)

(रंगास्टाईल) खुद के साथ बातां :- तुला ही सहजता अंगी लाख बाणवायची आहे रे राघवा, पण ती अशी प्रयत्नपूर्वक मिळवता येत नाही त्याचं काय? त्यासाठी स्वभाव बदलायला हवाय.. कसं?

मुक्त विहारि's picture

12 Oct 2023 - 8:36 pm | मुक्त विहारि

एकत्र कुुंबपद्धती असेल तर, आपले दैनंदिन कार्यक्रम, मुलांचे आणि नातवंडांचे कार्यक्रम उरकले की मग करायचे

आणि

चार माकडे बनायचे

१. मुलांचे वादविवाद ऐकायचे नाहीत

२. विचारल्या शिवाय सल्ला द्यायचा नाही

३. ते करत असलेला अनावश्यक खर्च बघायचा नाही

४. पुस्तक किंवा मासिके वाचत झोपायचे

पाचवा पर्याय सर्वोत्तम आहे

सरळ उत्तम वृद्धाश्रम गाठायचा

आपलाच टीव्ही आणि आपलाच ग्लास, नो झंझट