मंगळवार दिनांक ११ सप्टेंबर २००१, संध्याकाळी सात-सव्वा सातची वेळ.
रोजच्या प्रमाणे त्या संध्याकाळीही चकाट्या पिटण्यासाठीचा आमचा अड्डा असलेल्या एका मित्राच्या सायबर कॅफेवर आम्ही काही मित्रमंडळी हजर होतो.
आतमध्ये अमेरिकेतील आपल्या नातेवाईकाशी याहू मेसेंजरवर चॅट करत बसलेला एक नेहमीचा ग्राहक लगबगीने बाहेर आला आणि त्याने अमेरिकेतील 'वर्ल्ड ट्रेड सेंटरवर' विमान धडकल्याची त्याला नुकतीच समजलेली बातमी आम्हाला सांगितली.
त्या बातमीची शाहनिशा करण्यासाठी आम्ही तडक समोरच असलेल्या गोमंतक हॉटेलकडे धाव घेतली तेव्हा टीव्हीवर बातम्यांमध्ये ट्वीन टॉवर्स पैकी एका टॉवरवर विमान धडकून त्याला लागलेल्या आगीची आणि धुराच्या लोटांची दृश्ये वारंवार दाखवली जात होती.
पण अवघ्या काही मिनिटांत दाखवल्या जाणाऱ्या दृश्यांचे आणि बातमीचे स्वरूप बदलले. सुरुवातीला वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या उत्तरेकडील टॉवरवर विमान धडकून 'अपघात' झाल्याचे सांगणाऱ्या बातम्यांचा सूर बदलून सोळा मिनिटांच्या फरकाने दक्षिणेकडील टॉवरवर दुसरे विमान येऊन आदळल्यावर हा अपघात नसून 'घातपात' असल्याचे त्यात सांगितले जाऊ लागले आणि दोन्ही टॉवर्सना लागलेल्या भीषण आगीची दृश्ये पडद्यावर झळकू लागली
हॉटेलमध्ये पाहिलेली टीव्हीवरील दृश्ये आणि बातम्यांवर चर्चा करत आपापली घरे गाठल्यावर येऊन पाहतो तर प्रकरणाचे गांभीर्य आणखीनच वाढल्याच्या बातम्या पाहायला मिळाल्या. दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आलेल्या एकूण चार विमानांपैकी दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ आणि साऊथ अशा दोन्ही टॉवर्सवर आदळली तर तिसरे विमान पेंटागॉनच्या पश्चिमेकडील भागावर आदळले आणि चौथे विमान शॅंक्सविल जवळ एका शेतात कोसळल्याचे समजले.
ह्या घटनेनंतर पुढे कित्येक दिवस टीव्ही वरची न्यूज बुलेटिन्स आणि वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने ९/११ च्या अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्याच्या बातम्यांनी व्यापून टाकले होते, तर याहूच्या देशो-देशींच्या चॅटरूम्स ह्याच विषयावरील चर्चांनी ओसंडून वहात होत्या हे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले असेल. आणि एकंदरीत त्या चर्चांचा सूर 'बरं झालं छान झालं... म्हातारीचं काम झालं' म्हणतात त्याप्रमाणे अमेरिकेचं नाक कापले गेल्याचा आनंद व्यक्त करणारा असल्याचे त्यावेळी अनेकांना प्रकर्षाने जाणवलेही असेल. सदानकदा इतरांच्या घरादारांची राखरांगोळी करण्याची खोड असलेल्या एखाद्याच्या घराला जर कोणी आग लावली तर त्याच्यावर जसा कौतुकाचा वर्षाव केला जाईल तसेच काहीसे ह्या हल्ल्यामागे अल-कायदा ह्या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे पुढे आल्यावर ओसामा बिन लादेनच्या बाबतीत झाले, जगभरातील अनेकांच्या नजरेत तो रातोरात 'हिरो' ठरून गेला!
अमेरिकेचा पूर्वइतिहास, दुसऱ्या महायुद्धात त्यांनी जपानविरुद्ध केलेला अणुबॉंब्जचा वापर, व्हिएतनाम युद्ध, भारतासाठी घातक असणारी त्यांची पाकिस्तानशी सलगी, अफगाणिस्तानात रशिया विरुद्ध लढण्यासाठी मुजाहिद्दीनांना केलेला अर्थपुरवठा आणि शस्त्रास्त्रांची मदत (जी पुढे भारतासाठी प्रचंड मोठी डोकेदुखी ठरली), मध्यपूर्वेतील अनेक देशांची केलेली राखरांगोळी आणि त्यातून झालेला नरसंहार अशा अनेक कारणांमुळे मला व्यक्तिशः अमेरिकेबद्दल आजतागायत कधीच आत्मीयता वाटली नसली तरी अमेरिका आणि अमेरिकनांविषयी तिरस्कार किंवा द्वेषही कधी वाटला नाही. त्यामुळे असेल कदाचित पण ९/११ च्या ह्या हल्ल्यात हजारो लोकांचा गेलेला बळी, असंख्य लोकांना आलेले कायमचे अपंगत्व आणि दिमाखदार ट्वीन टॉवर्सची झालेली भीषण दुरावस्था पाहून मन विषण्ण झाले होते.
ट्वीन टॉवर्सचा झालेला तो विध्वंस पाहून त्या परिस्थितीत १९९२ सालच्या 'होम अलोन २: लॉस्ट इन न्यू यॉर्क' (Home Alone 2: Lost in New York) ह्या चित्रपटाची आठवण आली नसती तरच नवल होते. ह्या चित्रपटात पहिल्यांदा पाहताक्षणीच प्रचंड आवडलेल्या ह्या दोन उत्तुंग मनोऱ्यांचे गतवैभव पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी संग्रहात असलेली त्याची व्हीसीडी कितीवेळा लावून त्यातला 'केवीन'च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर भेटीचा आणि टॉवर वरून त्याने केलेल्या फोटोग्राफीचा प्रसंग रिवाइंड करून करून कितीवेळा पहिला असेल ह्याची मोजदात नाही.
९/११ च्या घटनेनंतर चित्रपटातील हा प्रसंग काही अमेरिकन दूरचित्रवाणी वाहिन्या दाखवत नाहीत असे ऐकून आहे.
दोन विमानांच्या धडकण्याने झालेल्या स्फोटांतून निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेने त्यांच्या उभारणीसाठी वापरलेले पोलाद वितळून अवघ्या काही तासांमध्ये दोन्ही टॉवर्स जमीनदोस्त झाले. ह्या विध्वंसातून निर्माण झालेला वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या अवशेषांचा ढिगारा साफ करण्यास आठ महिने लागले होते. ११ सप्टेंबर २००१ ला झालेल्या ह्या हल्ल्यानंतर तब्बल ४४२ दिवसांनी म्हणजे २७ नोव्हेंबर २००२ रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश आणि अमेरिकन काँग्रेसद्वारे न्यू जर्सीचे माजी गव्हर्नर थॉमस किन ह्यांच्या अध्यक्षतेखाली एका चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली.
दहा देशांतील १२०० पेक्षा जास्त व्यक्तींची जबानी/चौकशी करून सुमारे पंचवीस लाख कागदपत्रांची पडताळणी करून झाल्यावर सदर आयोगाने तयार केलेला अहवाल २२ जुलै २००४ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. प्रसिद्धीनंतर लगेचच सार्वजनिक करण्यात आलेला हा अहवाल विक्री आणि मोफत डाउनलोड करण्यासाठीही उपलब्ध करण्यात आला असला तरी बऱ्याच उशिराने म्हणजे साधारणपणे चार ते पाच वर्षांपूर्वी तो माझ्या वाचनात आला.
ह्या हल्ल्यात सहभागी झालेले सर्वच्या सर्व १९ दहशतवादी मृत्यमुखी पडले असले तरी वर म्हंटल्याप्रमाणे व्यापक प्रमाणात नोंदवल्या गेलेल्या जबान्या, त्यातून मिळालेली माहिती, छाननी केलेली गोपनीय कागदपत्रे / दस्तावेज आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर तयार करण्यात आलेला हा तपशीलवार अहवाल अपेक्षेपेक्षा जास्त चांगला आणि वस्तुनिष्ठ वाटला होता. एखाद्या थ्रिलर चित्रपटाची पटकथा वाटावी असे ह्या हल्ल्याचे केलेले नियोजन आणि अत्यंत व्यावसायिक पद्धतीने केली गेलेली त्याची अंमलबजावणी थक्क करणारी होती.
५८५ पानांच्या ह्या प्रदीर्घ अहवालाचे तुकड्या तुकड्यात वाचन सुरु असतानाच योगायोगाने २०१० साली प्रदर्शित झालेला 'फ्रोजन' (Frozen) हा हॉलीवूडपट माझ्या पाहण्यात आला. वास्तविक ह्या सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटाचा आणि ९/११ च्या घटनेचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही पण त्यातल्या एका प्रसंगातील संवादाने एक वैचारिक कीडा डोक्यात सोडण्याचे काम मात्र केले होते.
एके रविवारी दोन कॉलेज विद्यार्थी मित्र आणि त्यातल्या एकाची प्रेयसी असे तिघेजण स्कीईंग करण्यासाठी एका स्की-रिसॉर्टला जातात आणि तिथल्या चेअर लिफ्ट ऑपरेटरच्या हलगर्जीपणामुळे म्हणा किंवा गैरसमजामुळे म्हणा पण रात्रीच्या वेळी त्यांना डोंगरावर घेऊन जाणारी चेअर लिफ्ट यंत्रणा बंद करण्यात आल्याने ते मध्यावरच अडकून पडतात.
बिघडणारे हवामान आणि सुरु झालेली हिमवृष्टी त्यात दुसऱ्या दिवसापासून म्हणजे सोमवार ते शुक्रवार स्की रिसॉर्ट बंद राहणार असल्याने अशा अडकून पडण्याच्या परिस्थितीत त्यांची भीतीने गाळण उडणे स्वाभाविक असते. भीती दूर करण्यासाठी काहीतरी गप्पा माराव्यात ह्या उद्देशाने एकजण 'कोणत्या प्रकारे आलेला मृत्यू सर्वात भयानक असतो?' असा, खरंतर त्या परिस्थितीत चुकीचा वाटणारा प्रश्न विचारतो.
त्यावर प्रश्नकर्ता स्वतःच भर समुद्रात सर्फिंग करताना शार्क माशाने खाल्ल्याने होणारा मृत्यू सर्वात भयानक असल्याचे मत व्यक्त करतो. त्यावर त्याची प्रेयसी 'जिवंतपणी आगीत जळून येणारा मृत्यू सर्वात भयानक असतो' असे उत्तरते आणि आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ ती ९/११ च्या घटनेचे उदाहरण देते. ती म्हणते ९/११ च्या घटनेनंतर मी टीव्हीवर वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीतून कित्येकांनी उडी मारतानाची दृश्ये बघितली होती, विचार करा इमारतीच्या आतली परिस्थिती किती भयानक असेल कि त्या लोकांनी जळून मरण्यापेक्षा इतक्या उंचीवरून उडी मारून मरणे पसंत केले!
अशा अर्थाचा हा संवाद मेंदूत कुठेतरी फिट बसला होता आणि लगेचच पुढच्या दोन-तीन दिवसांत आठवडा पंधरा दिवसांतून होणाऱ्या आम्हा काही जुन्या मित्रमंडळींच्या मैफिलीत सध्या काय वाचतोय/बघतोय टाईप चर्चेत ९/११ च्या रिपोर्टचा आणि ह्या संवादाचा विषय मी काढला होता.
आमच्या ह्या ग्रुपमध्ये मी आणि आणखीन एक मित्र अशा दोघांचा (तसा तो जगात अनेकांचा असेल) एक सामायिक छंद आहे. चित्रपटातील किंवा कथा-कादंबरीतील एखादा प्रसंगात मग तो काल्पनिक असो कि वास्तव, अथवा प्रत्यक्षात घडलेली एखादी घटना असो, त्या प्रसंगात / घटनेत सहभागी असलेल्या एखाद्या पात्राच्या भूमिकेत शिरून उपलब्ध तपशील, आपली कल्पनाशक्ती आणि जाणिवा-नेणिवांच्या बळावर त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तो प्रसंग आभासीरीत्या अनुभवायचा, त्यांची त्यावेळी मन:स्थिती काय आणि कशी असेल ते अनुभवायचे, प्रसंग आनंददायी असेल तर त्यातला आनंद आणि थरारक असेल तर त्यातले साहस अनुभवायचे. खूप मजा येते अधून-मधून हा मानसशास्त्रीय प्रयोग करायला. पण अर्थात त्यासाठी एक 'विशिष्ट मूड' बनावा लागतो, कधीपण वाटले म्हणून केले असे होत नाही!
ह्या चर्चेतून उपरोल्लिखित प्रयोग करण्यासाठी आम्ही दोन पात्रे निवडली होती, त्यापैकी एक होते ९/११ च्या घटनेत अमेरिकन एअरलाईन्सचे बोईंग ७६७-२२३ ईआर हे विमान वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ टॉवरवर धडकावून हल्ल्याची सुरवात करणारा 'मोहम्मद अट्टा' आणि दुसरे म्हणजे त्यावेळी नॉर्थ टॉवरच्या ९३ ते ९९ अशा सात पैकी कुठल्याही एका मजल्यावर उपस्थित असलेल्या, आणि खिडक्यांच्या काचांतून सुसाट वेगाने त्यांच्या दिशेने येणारा विमानरूपी यमदूत प्रत्यक्षपणे पाहणाऱ्या अनेक व्यक्तीं पैकी कोणीही एक, ज्याला आपण 'निनावी' म्हणूयात.
तर पहिल्यावेळी (जेव्हा मूड लागेल तेव्हा) आमच्यापैकी एकाने 'मोहम्मद अट्टाच्या' भूमिकेत शिरायचे तर दुसऱ्याने 'निनावी' पात्राच्या भूमिकेत शिरायचे आणि दुसऱ्यावेळी ह्या पात्रांची अदलाबदल करून हा प्रयोग पुन्हा करून आपल्याला आलेले दोन्ही अनुभव शेअर करायचे असे ठरले. त्याप्रमाणे थोडे दिवस लागले पण दोघांनी स्वतंत्रपणे घेतलेले दोन्ही अनुभव शब्दातीत होते!
वाचलेला ९/११ आयोगाचा अहवाल, फ्रोजन चित्रपटातील तो प्रसंग आणि वरीलप्रमाणे घेतलेले अनुभव ह्यांचा एकत्रित परिणाम म्हणून असेल किंवा तोपर्यंत मिपावर बरे-वाईट लेखन करू लागल्यामुळे 'आपणही लिहू शकत असल्याचा झालेला साक्षात्कार' कारणीभूत ठरला असल्याने असेल कदाचित पण ९/११ च्या घटनेवर एखादी दीर्घकथा/कादंबरी लिहावी ह्या विचाराने मला बराच काळ पछाडले होते, पण कालांतराने तो विचार बासनात गुंडाळून ठेवला गेला.
परवा प्रचेतस ह्यांच्या धाग्यावरच्या एका प्रतिसादात गवि साहेबांनी नाईन इलेव्हनच्या रिपोर्टचा विषय काढला आणि अडगळीत पडलेल्या माझ्या जुन्या विचारावरची धूळ झटकली गेली आणि पुन्हा त्याने नव्याने उचल खाल्ली.
समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' त्या धर्तीवर 'लिहिल्याने होत आहे रे, आधी लिहिलेची पाहिजे' असा विचार करून ह्या प्रस्तावनेचा निमित्ताने नव्या लेखनाला सुरुवात तर केली आहे पण त्याचा पुढचा प्रवास कसा होईल, म्हणजे ती दीर्घकथा होईल?, कादंबरी होईल? कि निव्वळ लेख मालिका होईल? आणि हे लेखन पूर्ण होण्यास किती आठवडे, महिने, वर्षे लागतील ह्या विषयी मी तूर्तास तरी संपूर्णपणे अनभिद्न्य आहे.
"आगाज तो कर दिया हैं, अंजाम क्या होगा 'राम जाने'... चलो जो होगा देखा जायेगा और क्या!"
जय हिंद ! जय महाराष्ट्र !
पुढचा भाग :
नाईन इलेव्हन - Twin To-Worse: भाग १
प्रतिक्रिया
17 Aug 2023 - 12:53 pm | आंद्रे वडापाव
अनेक शुभेच्छा !
ह्या अश्या प्रकारच्या लेखासाठीच मी मिपा वर येतो ...
राजकीय कचऱ्याकुंड्यावर मिपावर बंदी आल्याने ...
असे अनेक चांगल्या लेखक व लेखांना .. ऑक्सिजन मिळेल ...
17 Aug 2023 - 1:45 pm | गवि
वाह वाह उस्ताद.
इतक्या लगेच सुरुवात करून सूर देखील लागला.
या घटनेबद्दल बोलावे तितके कमी आहे. मुळात इंधनाने भरलेली विमाने (पंखात इंधन असते हे बहुतांश लोकांना माहीत असेलच) ही किती टोकाची शक्तिशाली स्फोटक अस्त्रे ठरू शकतात हा विचार मुळात मनात येणे, यासाठी अभ्यास आणि तांत्रिक ज्ञान हवे. त्यानंतर विमान उड्डाण प्रशिक्षण घेणे. सर्व काही भलतेच मोठे प्लॅनिंग. मुळात यातील कोणालाही त्यातले कोणतेही विमान रीतसर लँड देखील करता आले नसते. मोठ्या टर्बोफॅन जेट विमानांचे रेटिंग देखील त्यांच्या लायसेन्स वर किंवा शिक्षणात नव्हते असे दिसते. विमान एखाद्या दिशेने नेऊन क्रॅश करणे इतके काम मात्र प्राथमिक फ्लाईंग ट्रेनिंगने शक्य होते. नेमके तेच त्यांनी केले, कारण कोणत्याही परिस्थितीत लँडिंग करण्याचा ऑप्शनच त्यांना आवश्यक वाटत नव्हता. यावरूनच त्यातील भयानक उद्देश लक्षात येतो. आणि यातील बहुतांश लोक व्यवस्थित शिक्षित होते. लुक्स देखील सामान्य नागरिकांसारखे होते. म्हणजे अनेक अर्थांनी स्टिरीओ टाइप मोडले या घटनेत.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत..
20 Aug 2023 - 4:22 pm | टर्मीनेटर
आंद्रे वडापाव आणि गवि,
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
अगदी अगदी... आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मरायचंच आहे तेव्हा आपल्या बरोबर जास्तीत जास्त लोकांचा जिव घेणे आणि शक्य तेवढ्या मालमत्तेचे नुकसान करणे एवढेच त्यांचे लक्ष्य होते!
ह्या प्रचंड विध्वंसासाठी भरपुर इंधन असलेल्या लांब पल्ल्याच्या विमानांची 'एरोप्लेन बाँब' म्हणुन केलेली निवड, मुख्य टार्गेट असलेल्या ट्वीन टॉवर्सचा अचुक वेध घेउ शकतील इतपत कौशल्य प्राप्त असलेल्या व्यक्तिंचीच त्या कामगीरीसाठी 'पायलट' म्हणुन विचारपुर्वक केलेली नेमणुक अशा एक ना अनेक गोष्टींमधुन ह्या हल्ल्याच्या नियोजनामागे असलेल्या असामान्य मेंदुची कल्पना येते.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या ह्या घटनेचे कोणीच समर्थन करु शकत नाही, पण अल-कायदा आणि अमेरिकन सरकार अशा दोन्ही पक्षांच्या मते हे अमेरिकेविरुद्ध पुकारलेले युद्ध होते. त्यामुळे ह्या घटनेकडे केवळ एक दहशतवादी हल्ला किंवा भावनीक दृष्टिकोनातून न पहाता थोड्या वेगळ्या अॅंगलने पाहिल्यास १९ आत्मघातकी दहशतवादी आणि काही लक्ष डॉलर्स खर्चुन शत्रुचीच चार विमाने वापरुन अल्पावधीत जवळपास ३००० लोकांचा घेतलेला बळी आणि काही ट्रिलीयन डॉलर्सचे केलेले नुकसान असे जिवित आणि वित्तहानीचे आकडे प्रचंड बोलके आहेत. अल-कायदा हि एक कंपनी आहे अशी कल्पना केल्यास तीचे प्लॅनिंग, एच. आर., ट्रेनिंग अशी वेगवेगळी डिपार्टमेंट्स व तीचा शिक्षित/उच्चशिक्षित अशा व्यावसायिक आत्मघातकी दहशतवाद्यांचा स्टाफ आणि त्यांच्यातला समन्वय अशा गोष्टी एकदम कॉर्पोरेट लेव्हलच्या वाटु लागतात.
17 Aug 2023 - 1:46 pm | नि३सोलपुरकर
वाचण्यास उत्सुक आहे .
17 Aug 2023 - 2:05 pm | अमरेंद्र बाहुबली
अरे वा. प्रचेतस ह्यांच्या त्याच धाग्यावर मी रिपोर्ट बद्दल विचारले होते. इतका प्रदीर्घ रिपोर्ट वाचायची वाचयाची इच्छा नव्हती. पण चला लेखमाला येतेय हे ऐकून बरं वाटलं. लवकरात लवकर लिहा. वाट पाहतोय.
रच्याकने मी सूध्दा आफ्टर मोहम्मद/ मोहम्मदांनतरचे खलिफे ह्यांच्यावर लेखमाला लिहायचा विचार करतोय. मोहम्मदांनंतर मोरोक्को ते भारत इस्लामी साम्राज्य आडवं कसं पसरलं, मोहम्मदांनतरचे चार रशीदून खलिफे, नी नंतरच्या ऊमय्याद नी अब्बासीद खिलाफत पासून ते शेवटच्या तूर्की खलिफा जो केमाल पाशा ने संपवला. (म्हणजे खलिफापद संपवलं) हे सर्व लिहीयचंय. ज्यात शिया- सून्नी वाद, अरब-तूर्की वाद, तसेच अरब ईराण वाद सर्व येईल पण वेळ मिळेना झालाय.
26 Aug 2023 - 6:16 pm | टर्मीनेटर
नि३सोलपुरकर | अमरेंद्र बाहुबली
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ अमरेंद्र बाहुबली
जरूर लिहा, वाचायला नक्कीच आवडेल 👍
17 Aug 2023 - 2:46 pm | राजेंद्र मेहेंदळे
पहीला भाग रोचक वाटला आणि लेखमालाही जोरदार होणार यात शंकाच नाही. पुभाप्र. मात्र पु भा ल टा.
17 Aug 2023 - 2:57 pm | कंजूस
तो विषय माझ्यापुरता संपला आहे.
आत्मघातकी पथके काहीही करू शकतात. आणि धर्मग्रंथ पुढे करून पाठिंबा मिळवू शकतात. अफगाणिस्तानमध्ये काय चाललं आहे. इतर देश,एक सोडून सर्व पुस्तकं नष्ट करायची आहेत. स्त्री हवी आणि नकोही. त्यांच्याकडूनच त्यांना विरोध झाला नाही तर कठीण आहे.
अतिरेक्यांच्या कारवायांच्या कुंड्या उपसून काय करमणूक?
शेवट.
17 Aug 2023 - 3:51 pm | टर्मीनेटर
त्याला काही इलाज नाही! असतात व्यक्तिगणिक वेगवेगळ्या आवडी-निवडी 😀
कोणाची अत्यंत दारुण पराभवाच्या इतिहासाची 'कबर' आपलं बखर खणून त्यातले अवशेष चिवडण्यातून करमणूक होते तर आमच्यासारख्यांची अशा अतिरेक्यांच्या कारवायांच्या कचराकुंड्या उपसून करमणूक होते...
हे असं चालायचंच, त्याला काही इलाज नाही 😂
17 Aug 2023 - 3:47 pm | स्वधर्म
अवघड काम उचललंय तुंम्ही. पहिला भाग चांगलाच झालाय. लवकर लवकर येऊ द्या. शुभेच्छा.
17 Aug 2023 - 4:51 pm | कर्नलतपस्वी
वाचतोय.
पुलेशु.
17 Aug 2023 - 7:28 pm | तुषार काळभोर
नऊ सप्टेंबरला मला शेवटच्या फेरीत प्रवेश मिळाला. अकरा सप्टेंबरला कॉलेजमध्ये जाऊन प्रवेशाची पूर्तता केली.
मेरिट सीटमध्ये घराशेजारच्या कॉलेजात प्रवेश मिळाल्याच्या आनंदात जगात काय चाललंय तिकडे लक्षच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरात भली मोठ्ठी बातमी होतीच. असलं काही त्याच्या आधी कधी वाचलेलं नव्हतं. अभूतपूर्व आणि अकल्पनीय अशी घटना. पण त्याच दिवशी कॉलेज सुरू झालं. पुढे दोन तीन आठवडे रोज गप्पांमध्ये हा विषय असायचाच.
अकरा सप्टेंबरला २००१ ला हजारो जीवाचे बळी घेऊन सुरू झालेला या अध्यायाचा पहिला अंक २ मे २०११ ला आणि शेवटचा अंक १५ ऑगस्ट २०२१ ला संपला.
लेखमाला या शेवटच्या फोटोपर्यंत चालावी... अशा शुभेच्छा!!
26 Aug 2023 - 6:31 pm | टर्मीनेटर
राजेंद्र मेहेंदळे | स्वधर्म | कर्नलतपस्वी | तुषार काळभोर
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ तुषार काळभोर
अनुभव भारीच!
पण लेखमालिका इतकी लांबवण्याच्या सुचनेबद्दल तीव्र णीषेध... टंकनाचा अतिशय कंटाळा असलेल्या माणसाला किती टंकन कष्ट द्यायचे ह्याला काही मर्यादा? 😀 😀 😀
17 Aug 2023 - 9:54 pm | शानबा५१२
अजुन काय मग.....करुन टाका, प्रेक्षक आहेत ईथे.
18 Aug 2023 - 5:23 am | रंगीला रतन
लैच लोकांच्या शेपटीवर पाय दिलाय :=)
पुभाप्र.
26 Aug 2023 - 10:33 pm | टर्मीनेटर
शानबा५१२ | रंगीला रतन
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ रंगीला रतन
आधी ह्या प्रतिसादाचा अर्थ समजला नव्हता, थोडा वेळ लागला समजायला 😀
18 Aug 2023 - 9:54 am | नचिकेत जवखेडकर
लेखमाला जोरदार होणार यांच्यात वाद नाहीच. परंतु लेखन पूर्ण करायचे मनावर घ्याच! तुमचा लेख आणि त्या अनुषंगाने गविंची येणारी माहिती हा दुग्धशर्करा योग असणार आहे!!!!!
18 Aug 2023 - 10:35 am | सौंदाळा
मस्तच, परवाच म्हटल्या म्हटल्या आज पहिला भाग आला पण!!
भारीच, पुभाप्र.
९/११ ची माझी आठवण
त्याच दिवशी तुफान चालत असलेला दिल चाहता है चित्रपट 'मिळाला' होता. कॉलेजमधून असले चित्रपट, डिस्कव्हरीचे प्रसिध्द शोज, रोडरॅश सारखे गेम्स असे कोणाला तरी एकाला मिळाले की त्याचे हार्डडिस्क सगळीकडे फिरायची. अशीच हार्डडिस्क घेऊन घरी आलो होतो. संध्याकाळी ६.३०-७ ला लावली आणि डाटा ट्रान्स्फर चालू केले. ९ पर्यन्त सर्व आटपले. नेहमी यापासून अलिप्त असणारी माझी बहिण दिल चाहता है म्हटल्यावर बघायच्या एकदम तयारीत होती. ९.१५ ला चित्रपट चालू केला. साधारण १०.१५ ला वडील सेकण्ड शिफ्ट संपवून घरी आले. आल्या आल्या म्हणाले, "अरे पहिल्यांदा टीव्ही लावा हे काय बघत बसलाय, अमेरिकेवर अॅटॅक झाला आहे, तिसरे महायुद्ध व्हायची शक्यता आहे" मी ताबडतोब हॉलमधे पळालो आणि बातम्या बघत बसलो. बहीणीने मात्र चित्रपट सोडला नाही. खरच महायुद्ध झाले तर नंतर परत बघायला मिळेल का नाही असा विचार तिने केला असावा. मी मात्र उरलेला चित्रपट नंतर ४-५ दिवसांनी पाहीला. (तोपर्यंत खरच महायुद्ध सुरु होतेय की काय असे वाटत होते)
26 Aug 2023 - 11:04 pm | टर्मीनेटर
नचिकेत जवखेडकर | सौंदाळा
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ नचिकेत जवखेडकर
अर्थातच... तांत्रिक गोष्टींबद्दल जर अधिकारी व्यक्ती कडुन माहिती आली तर तीचे लाल गालीच्या घालुन स्वागतच असेल!
@ सौंदाळा
चा विषय काढुन तुम्ही दुखत्या नसेवर हात ठेवला आहे! भन्नाट आवडला होता तो चित्रपट त्यावेळी... इनफॅक्ट त्यावेळी माझ्या PC च्या हार्ड डिस्क वर पहिली जागा व्यापणारा पहिला चित्रपट हाच होता...
अवांतरः त्याचा सीक्वेल म्हणवला जाणारा 'झिंदगी ना मिले दोबारा' हा चित्रपट देखील माझ्या प्रचंड आवडीचा....
18 Aug 2023 - 10:51 am | गवि
आता त्या दिवसाच्या आठवणी सगळे जण सांगत आहेत म्हटल्यावर लिहिणे आले.
त्या काळी मी संगणक प्रशिक्षण वर्गांमध्ये शिकवत असे. संगणक प्रशिक्षण देण्याची जागा म्हणजे इंटरनेट आलेच प्रत्येकाच्या टर्मिनलवर. तर असेच जावा किंवा तत्सम काहीतरी (पडेल ते शिकवणे या बोलीवर चरितार्थ होता ) शिकवत असताना एक विद्यार्थी मधेच म्हणाला की वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमान पडले. त्यातले अनेक विद्यार्थी थोडेफार शिकून अमेरिकेत जाण्यासाठी अर्ज भरणारे होते. त्याकाळी इंटरनेट हे न्यूज बघायला, विशेषत: लाईव्ह घटना बघायला फारसे वापरले जात नसे. कशासाठी वापरले जात असे ते तूर्त बाजूला ठेवू.
तर वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमान पडले म्हणताच मला इतरांपेक्षा जास्तच धक्का बसला. कारण अमेरिकन काँटेक्स्टच माहीत नव्हता. विमान अपघात हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने कुलाब्याला जाऊन नेमकी परिस्थिती पहावी हा विचार मनात उसळून आला. पण लेक्चर पूर्ण करणे आवश्यक असल्याने कसेबसे ते विचार मागे सारून तास पूर्ण केला. घरी येताच टिव्ही लावून पाहिले तर या इमारती अमेरिकेत न्यूयॉर्क मध्ये आहेत असे कळले. अर्थात तिथे जाणे शक्य नाही हेही कळले. शिवाय तो घातपाताचा प्रकार आहे हेही कळले. घटना मात्र इतकी भीषण होती की पूर्ण विमानन क्षेत्रात त्यामुळे पूर्वी कधीही स्वप्नातही न आलेले बदल घडले. ते या लेखमालेत बहुधा येतीलच. त्यामुळे द्विरुक्ती नको तूर्त.
18 Aug 2023 - 3:06 pm | निमी
फारच उत्तम लेख आणि या विषयावरील आपल्या लिखाणाला मनःपूर्वक शुभेच्छा..मानसशास्त्रीय प्रयोग आणि परिणाम याची चर्चा जास्त आवडली.
18 Aug 2023 - 7:20 pm | अथांग आकाश
जोरदार आणि दमदार सुरुवात!
या अभुतपुर्व घटनेबद्दल सविस्तर वाचायला उत्सुक आहे!! पुढचे भाग लवकर येउद्यात!!!
18 Aug 2023 - 8:30 pm | चांदणे संदीप
इथे आतापर्यंत प्रतिसाद देणार्या प्रत्येकासारखीच उत्कंठा मलाही आहे. लवकरच पुढचा भाग येऊ द्या.
सं - दी - प
20 Aug 2023 - 12:55 pm | प्रचेतस
दमदार सुरुवात. एकदम तगडी मालिका होणार आहे ह्या विषयावर. अर्थात अमेरिका, बॉम्बस्फोट, किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण, दहशतवाद हे विषय जरी आवडत नसले तरीही तुमचे लेखन अतिशय आवडत असल्याने एकूण एक भाग व्यवस्थित वाचणार आहे.
20 Aug 2023 - 6:54 pm | अमरेंद्र बाहुबली
ही घटना घडली तेव्हा मी तिसरीत होतो. शाळेत आमच्या मॅडमने दुसर्या (की दोन चार दिवसा नंतर) दिवशी घडलेल्या घटने बद्दल सांगीतले होते ना “पुण्य नगरी“ पेपरात अतिरेक्याचा फोटो आलाय. मी शाळा सूटल्यावर पुण्य नगरी पेपर मिळवून त्या अतिरेक्याचा फोटो पाहीला. काळ्या टी शर्ट मध्ये बिना दाढी मिश्यांचा अतिरेकी होता त्यानेच विमान धडकवले होते. तो फोटो अजूनही लक्षात होता. मला वाटतं हा फोटो असावा तो.
https://images.app.goo.gl/4M8L7gDiauvMas25A
रच्याकने,
एवढ्या मोठ्या घटनेवर हाॅलीवूडने आजतागायत सिनेमा किंवा वेब सिरीज का नसेल बनवली? लादेनला मारलं गेलं त्यावरही नाही.
20 Aug 2023 - 7:37 pm | प्रचेतस
आहे की झिरो डार्क थर्टी. एकदम फेमस आणि भारी आहे सिनेमा.
21 Aug 2023 - 4:41 pm | श्वेता व्यास
मनःपूर्वक शुभेच्छा!
दीर्घकथा / कादंबरीच्या प्रतीक्षेत :)
21 Aug 2023 - 6:23 pm | आलो आलो
वा: काय विषय निवडलाय !
उत्सुकता ताणली गेलीये कथा / दीर्घकथा / कादंबरी किंवा लेखमाला जे काही असेल ......
त्यातील न विसरण्याजोगे काही सुदैवी पात्र म्हणजे ब्रुनो डेलिंगर (Bruno Dellinger), गुझमॅन मॅकमिलन (Guzman-McMillan) आणि सुपरहिरो रिक रेसकोरला (Rick Rescorla) यांच्या विषयी वाचण्यास विशेष उत्सुक
27 Aug 2023 - 5:31 pm | कुमार१
पहीला भाग रोचक आणि लेखमालाही जोरदार होणार !
31 Aug 2023 - 10:09 am | विजुभाऊ
पुढचा भाग कधी प्रकाशित करताय?
31 Aug 2023 - 1:26 pm | टर्मीनेटर
गलेमा नंतर करतो....
31 Aug 2023 - 6:43 pm | अमरेंद्र बाहुबली
फार ऊशीर होईल सर. जरा लवकर करा सुरूवात अशी विनंती.
31 Aug 2023 - 8:39 pm | गवि
नाही नाही. तसे चालणार नाही. पटपट येऊ दे दोन दिवसांत. विकांताची वाचन सोय करून टाका.
31 Aug 2023 - 9:57 pm | टर्मीनेटर
अबा आणि गवि शेठ १०-११ सप्टेंबर पर्यंत नेपाळ ट्रीपवर आहे, (त्यामुळे आधी कदाचित नेपाळ प्रवास वर्णनाचा नंबर लागायचा चान्स असल्याने 😀) परत येईपर्यंत गलेमाचे पडघम वाजतील त्यामुळे त्यानंतरच 9/11 सुरु केलेली बरी असे वाटते 🙏
31 Aug 2023 - 10:22 pm | चामुंडराय
म्हणजे 9/11 च्या पुढच्या लेखाची 11/9 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार तर !
18 Sep 2023 - 8:27 pm | टर्मीनेटर
@ चामुंडराय,
तारखेचा हा योगायोग विलक्षण आहे एक्दम. तो निदर्शनास आणुन दिल्याबद्दल आपले विशेष आभार!
स्वगतः तरीच च्यामारी इमिग्रेशन वालयांनी (त्रिभुवन आणि मुंबई दोन्ही एअरपोर्ट्सवर) नेहमीपेक्षा जरा जास्तीच प्रश्न विचारले होते 😀
20 Sep 2023 - 8:02 pm | नठ्यारा
७ वर्ल्ड ट्रेड सेंटर ही बिल्डिंग पडल्याचा वा पाडल्याचा उल्लेख थॉमस किंच्या अहवालात आहे का? नसेल तर हा अहवाल टाकाऊ आहे. विमानं धडकवून इमारती पडंत नसतात.
- नाठाळ नठ्या