अमेरिका १- उडतं वडाप

निमी's picture
निमी in जनातलं, मनातलं
4 Aug 2023 - 5:31 pm

नमस्कार. मी आणि माझे हे नुकतेच आमच्या मुलीकडे अमेरिकेला (प्रथमच) कॅलिफोर्निया येथे गेलो होतो. त्यावेळी प्रवासादरम्यान काही लेख लिहिले.. त्यातील हा पहिला भाग.

....

ज्यांनी विमान प्रवास केलेला नसतो त्यांना त्याचं खूप अप्रूप असतं, ज्यांनी थोडाफारच केलेला असतो त्यांना कणभर अहंकारही असू शकतो, पण माझ्यासारखे... ज्यांनी 'मण'भर आणि 'मन'भर प्रवास रेल्वे, टमटम, हातगाडी, एस्. टी, बस, रिक्षा, लोकल्स्, ट्रेन, टू व्हीलर,फोर व्हिलर आणि स्वतःची 11 नंबरची पायी गाडी असा केलाय, ते मान्य करतील की विमान प्रवास तसा फारसा सुखाचा नसतो. प्रवासाचा वेळ वाचावा म्हणून करायच्या प्रवासाआधी दोन-तीन तास आणि नंतर किमान अर्धा पाऊण तास वेळ घालवावा लागतो. हे सगळं करताना विचित्र वेळेच्या फ्लाइट्स, घरापासून दूर असणारे एअरपोर्ट्स आणि त्यासाठी झोपेचं करावं लागणारं खोबरं लक्षात घेता मला स्वतःला रेल्वे प्रवासच जास्त सुखाचा वाटतो.

आमच्या सांगली-कोल्हापूर भागात शेअर रिक्षाला 'वडाप' म्हणतात. तीन जणांच्या सीटवर चार जण नक्की आणि पोलीस नसेल तर ड्रायव्हरच्या शेजारीही एक जण ड्रायव्हिंग सीट शेअर करतो. तीन चाकी-सहा डोकी प्रवासाला वडाप म्हणतात... विमानाला म्हणूनच मला "उडतं वडाप" म्हणावसं वाटतं.

एकमेकांना खेटून असणाऱ्या तीन-चार सीट्स चिंचोळ्या मार्गातून ढकलगाडीवरून वस्तू देणाऱ्या हवाई सुंदर्या (?) आणि हवाईसुंदर! हो, सुंदर दिसणारे हवाई सुंदर पण असतात.. सर्वात अन्कम्फर्टेबल असणारी कम्फर्ट रूम...अर्थात उडत्या वडापमधील टॉयलेट्स! ही इतकी अरुंद आणि दाटकी असतात की त्यांना कंफर्ट सोडाच रेस्टरूम का म्हणावं असा प्रश्न पडेल. त्यांचे दरवाजे फोल्डिंगचे आणि आत फोल्ड होणारे असतात आणि आत उभे राहिलं तर कमोड आडवा येतो. आत जेमतेम उभं राहता येईल इतकीच जागा असते. इच्छा असो वा नसो कमोडवरच बसावं लागतं! फ्लश बटन दाबलं की भीती वाटेल असा सक्शनचा आवाज येतो. लॉंग डिस्टन्सच्या फ्लाईटमध्ये आधेमधे हवामान खराब आहे तेव्हा लॅव्हेटरी (हा एक उडत्या वडापमध्ये वापरला जाणारा खास शब्द!) वापरू नका अशी तंबी वजा इशारा देतात. करू नका-जाऊ नका म्हटलं की करावं-जावं अशी तीव्र भावना होते तसेच काहीसं होतं. 'आता तुम्ही लॅव्हेटरीचा वापर करू शकता' म्हणून उद् घोषणा झाली की दोन-तीन जण नक्की उठतात आणि एक छोटासा क्यू लगेच तयार होतो. (इथे कम्फर्ट रूम म्हणायला काही हरकत नाही.)

मला तशी रांग लागलेली पाहून माझ्या लहानपणीची आठवण होते. पूर्वी वाड्यात तीन चार बिऱ्हाडात घर मालकांसह एक किंवा क्वचित दोन संडास असायचे. हो... त्याला कोणी वॉशरूम-रेस्टरूम-टॉयलेट म्हणत नसत. बाथरूम आपापल्या घरी.. त्याला मोरी किंवा न्हाणीघर (खरंतर नहाणीघर शब्द आहे) जिथे फक्त नहाणे, स्नान करणे अपेक्षित असते. पूर्वी शौचालय हे घराबाहेर.. थोडेसे दूर-परसदारी असायचे. माझ्या एका मामाकडे तर छोट्याश्या वनराईतून तिथपर्यंत जाताना रात्री 'कंदील आणि पाणी' दोन्ही न्यावं लागे. स्पष्ट सांगायचं तर नंबर 1 घरात नंबर 2 बाहेर अशी नक्की विभागणी असायची. एकत्र कुटुंबामुळे चार-पाच जण एका कुटुंबात आणि त्यामुळे पंधरा वीस जणांत एकच संडास असल्याने संडासबाहेर सकाळी इच्छुकांची रांग स्वाभाविकच असे. रांग नको असेल तर लवकर उठा...नाहीतर प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आवेग आवरा !

आमच्या वाड्यात नंबर2 साठी एका दादाला वेळ लागायचा. हे आम्हाला सगळ्यांना माहीत होतं. शनिवारी आमची शाळा सकाळी लवकर असे. त्यावेळी आम्ही त्या दादाला स्पष्ट विचारत असून 'मी जाऊ दादा तुझ्या आधी' ? किंवा 'दादा, लवकर येते, मी जाऊ'? अशी अजीजी पण दाखवायचो किंवा 'दादा, तुला वेळ लागतो' असं पण स्पष्ट सांगायचो.

आता काळ बदलला..टॉयलेटस् घरात आली. प्रत्येक कुटुंबासाठी स्वतंत्र टॉयलेट झाले. आमच्या पुढच्या पिढीत तर प्रत्येकासाठी स्वतंत्र टॉयलेट आहे/असू शकते. दिवसाकाठी खरंतर केवळ अर्धा तास लागणारी ही जागा.. त्यामुळे आता अशी रांग नव्या पिढीला पाहायला/अनुभवायला मिळणारं हक्काचे ठिकाण म्हणजे आपलं "उडतं वडाप"..

मांडणीसमाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

4 Aug 2023 - 6:05 pm | कर्नलतपस्वी

जणू काय आमचा अनुभव तुम्ही लिहीलात.

पुढील भाग लवकर टाका.

कोल्हापूरी उपमा आवडली की हो.

निमी's picture

8 Aug 2023 - 2:17 pm | निमी

मनःपूर्वक धन्यवाद.. आशा प्लॅटफॉर्मवर मी पहिल्यांदाच व्यक्त होत आहे. तुमच्या प्रोत्साहनामुळे या लेखनाचे भाग आवश्य पाठवत राहीन.. आणि तंत्रगुरूंच्या साह्याने हळूहळू उत्तरे देण्यासही शिकेन. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

चौथा कोनाडा's picture

4 Aug 2023 - 6:12 pm | चौथा कोनाडा

मस्त ... खुसखुशीत !
लेख आवडला !
वॉशरूम अर्थात न्हाणीवाल्या तुलना आणी आठवणी वाचून आम्हाला ही त्या आठवणी आल्या !

आता ...
पुढील लेखाच्या प्र ति क्षे त !

धन्यवाद.. पुढील दोन भाग यातील तंत्रज्ञ गुरुजींच्या सहाय्याने टाकले आहेत. कृपया असे वाचावे.

तुम्हाला धागा टाकताना एरर येत असल्याने धागे प्रकाशित होण्यात अडचण येत आहे किंवा एकाहून अधिक धागे प्रकाशित होत आहेत असे दिसते आहे. अशी समस्या आल्यास "साहित्य संपादक" या आयडीला व्यक्तिगत निरोप पाठवू शकता. तिथे तांत्रिक गुरुजींची टीम तुम्हाला मदत करेल.

अधिक तांत्रिक स्वरूपाची समस्या असल्यास प्रशांत नावाच्या आयडीला व्यक्तिगत निरोप करावा.

नेहमी येणाऱ्या समस्या आणि वरचेवर पडणारे प्रश्न यांसाठी खालील धागा वाचता येईल.

काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे:

https://www.misalpav.com/helpquestions.html

विवेकपटाईत's picture

4 Aug 2023 - 6:23 pm | विवेकपटाईत

विमानाची इकॉनॉमी क्लास आणि दिल्लीची ई-रिक्षा दोन्ही सारखेच.

इ रिक्षाने दिल्ली दर्शन केले पाहिजे..

मुक्त विहारि's picture

4 Aug 2023 - 8:03 pm | मुक्त विहारि

उड़ती बस

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Aug 2023 - 8:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन शैली भारी. खुसखुशीत लेखन. आवडलं. पुलेशु.

-दिलीप बिरुटे

मनःपूर्वक धन्यवाद.. पुलेशु हा शब्द माहित नव्हता..नव्याने अर्थ समजला. त्याबद्दलही धन्यवाद!

मनःपूर्वक धन्यवाद.. पुलेशु हा शब्द माहित नव्हता..नव्याने अर्थ समजला. त्याबद्दलही धन्यवाद!

वामन देशमुख's picture

4 Aug 2023 - 10:40 pm | वामन देशमुख

लेखन, लेखनशैली व आशय आवडले!

निमी's picture

8 Aug 2023 - 3:17 pm | निमी

धन्यवाद

(पहिलिटकरणीचा) परदेश- प्रवास, त्यासोबतच त्या त्या संबंधित जुन्या जगाचा 'गेले ते-दिवस' वाला फेरफटका, हे कॉम्बो का काय म्हणतात ते आवडले. पुढील सगळे भाग असेच अगदी निर्धास्तपणे लिहावेत. पहिल्याच लेखात चांगली सुरुवात, स्वागत.
तुम्ही अमेरिकेतील कोणत्या शहरात/भागात गेलात, फिरलात, त्यांची नावे देताना इंग्रजी स्पेलिंगही द्यावे म्हणजे जिज्ञासूंना गुगलणे सोपे पडते. योग्य तिथे नकाशे, फोटो, ऐतिहासिक माहिती वगैरे दिल्यास उत्तमच.

तुमच्या सूचनांचे स्वागत आहे..या प्रदेशात मी आत्ता बालवाडीत आहे, शाळेत वरच्या इयत्तेत गेले की नकाशे, अन्य माहिती, फोटोसह लेख पाठवायचा प्रयत्न करेन.

खरोखर वर लिहिल्याप्रमाणे पहिल्या विमानप्रवास नवलाईचा वाटत‌ होता पण प्रवास ‌केलयावर विशेष काहीच नाही उलट जास्त उशीर त्रास असाच अनुभव वाटला कारण तो. Indian airlines चा. उशीरा येण्याचा प्रवास होता व विमान‌प्रवास. म्हणजे नाव मोठे व लक्षण खोटे हाच मला अनुभव‌ वाटला. आमचा. कश्मिर जातानाचा विमानप्रवास म्हणजे शशी थरुर म्हणाल्या प्रमाणे. cattle class मधून प्रवास केल्याप्रमाणे वाटले ,भरपूर गर्दी , जवळ जवळ रांगा व जवळ जवळ खुर्च्या असणार्या सीट्स त्यातून बाथरुम साठी बाहेर येताना पण मुष्किल त्यापेक्षा पूर्वी चे रेलवेचे‌. स्वतंत्र सुंदर फस्ट क्लास किंवा आताचे सेकंड. एसी क्लास सुद्धा खूप छान. फक्त मोठ्या प्रवासात एकदा लोकांनी. शेवटपर्यंत ते खराब करुन‌ घाण तशीच ठेवून‌. दिले‌ होते‌, मुंबई वाराणसी प्रवासात पण नंतर मुंबई कलकत्ता दुरांतोत मात्र सतत स्वच्छता सेवक येऊन स्वच्छ करून‌.
जात होते‌. व. स्वच्छ राखले होते‌आमचया डब्यातला attendent व्यवस्थीत हवे नको ते आमचे खाणे पिणे बघत होता पण त्याला खूपच कमी पगार लो‌. कवालिटीचया कपड्यात तो अगदी गरीब ,केविलवाणे वाटला मला फारच‌. दया वाटली‌ व‌ त्याने आमच्यासाठी राबण्याची. दया आली गुलामगिरीत माणसेच माणसाशी क्रूर वागतात पशूंसारखे. मी मुळीच. पशूंसारखे म्हणणार नाही ,कारण पशू‌ भूक‌ व स्वसंरक्षण याशिवाय कधीही एकमेकांना त्रास देणे‌,लढणे वागत नाहीत.अशा खूप गोष्टी वाचल्यात. पण ब्रिटिशकाळात त्यांनी आपल्या कडून‌ अशा सेवा करणे राबवून घेणे केले असेल आपण काळे त्यांची प्रजा कितीही मारा झोडा मुकी बिचारी काहीही करा या सर्वांचा प्रतिक. तो attendent वाटला.स्वतंत्र भारतात इतक्या वर्षांनी पण अंदाजे 1991 ते 2006 मधील काळ . पण अजूनही रेल्वेत. अशा‌. घाणेरडया posts व वरच्या वर्गातील उतारुंची सेवा करायची ही काय घाणेरडी पद्धत . सर्वांनी बुफेप्रमाणे.स्वताचे काम. स्वताच करावे. फक्त स्वच्छता गृहे छान राखावीत. किंवा प्रवाशांना ठेवायला सक्ती करावी मगच लांबचा प्रवास सुखकर होतो.

निमी's picture

8 Aug 2023 - 3:07 pm | निमी

धन्यवाद

मदनबाण's picture

9 Aug 2023 - 8:35 pm | मदनबाण

लिखाण आवडले !

आमच्या सांगली-कोल्हापूर भागात शेअर रिक्षाला 'वडाप' म्हणतात.
कोल्हापूरात आजही अंबाबाईच्या देवळा समोर 'पावशेर" "मापड्यातुन" करंवदे मिळतात आणि रंकाळ्यावर "भडंग" असलेली भेळ देखील! बाकी वडाप वरुन "टमटम" हा शब्द आठवला. :)
आत्ता पर्यंत विमानात बसुन प्रवास करण्याचा अनुभव मोजुन ४ वेळा घेतला आहे. यात एकदा युरोपात जाऊन येणे असा आणि दुसर्‍यांदा हिंदुस्थानातच एका ठिकाणाहुन ये जा. "टॉयलेट्स" हा विमानातील सर्वात घाणेरडा भाग असतो असे या छोट्याश्या प्रवासुन माझे व्यक्तिगत मत बनले आहे. काही काळापूर्वी यूट्यूबवर एक विमान प्रवासाचा व्हिडियो पाहण्यात आला होता, तो इथे देऊन जातो... तो पाहिल्यावर मात्र मला असा विमान प्रवास करायला आणि अनुभवायला आवडेल असे वाटले. [ परमेश्वर करो आणि मला बक्कळ पैसा मिळुन असा प्रवास करायची संधी वारंवार मिळो ! :) ]

मिपावर Embed व्हिडियो देण्याची सुविधा बहुतेक बंद झालेली असावी असे वाटत असल्याने लिंक देतो :-
80hrs Around the World in First Class

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jain - Makeba (Official Video)

धन्यवाद. टमटम शब्दही अगदी बरोबर..