एक दिवस माझ्या एका सहकर्मीने त्याची व्यथा माझ्यासमोर मांडली. पगाराच्या दिवशी घरी पोहचताच त्याला महिन्याचा पगार त्याला बायकोच्या चरणी अर्पण करावा लागतो. त्याची बायको ऑफिस जाण्या-येण्यासाठी आणि चहासाठी मोजून जेबखर्ची त्याला देते. त्याला घरी यायला थोडा उशीर झालाकि त्याची बायको आकांड-तांडव करते. कधी-कधी त्याचा तोंडाचा वास ही घेते. त्याला लहान-सहान गोष्टींसाठी तिची संमती घ्यावी लागते. बायकोच्या जाचाला कंटाळून त्याला आत्महत्या करावीशी वाटत होती. सहकर्मीचे गऱ्हाणे ऐकून मी म्हणालो, लेका, आत्महत्येचा विचार मनातून काढून टाक. या जगात लग्न झालेले सर्व पुरुष हे त्यांच्या बायकोच्या मुठीतच असतात. तिच्या आदेशानुसारच सर्वांना जगावे लागते. जी तुझी अवस्था तीच माझीहि आहे. पुरुषांना वैदिक काळापासूनच बायकोच्या मुठीत राहण्याचा श्राप मिळालेला आहे. एवढेच काय, वज्र धारण करणारा देवांचा राजा इंद्रहि त्याच्या बायकोच्या मुठीत होता. माझा सहकर्मी उद्गारला, काहीही बोलू नको, पूर्वी कोण पुरुष बायकोच्या मुठीत राहत होता. काहि पुरावा आहे का?
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १५९ ( सपत्नी नाशनसूक्त)
(ऋषिका - शची पौलोमी : देवता - आत्मस्तुती)l
उत् असौ सूर्यः अगात् उत् अयं मामकः भगः
अहं तत् विद्वला पतिं अभि आसाक्षि वि-ससहिः
अर्थ: हा पहा सूर्य जसा उदय पावला, तसे माझे दैवहि उघडले. मी हे जाणूनच आपल्या पतीला पूर्णपणे वश केले. मी त्याची स्त्री आहे; तरी पण त्याला अगदी माझ्या मुठीत ठेवणारी अशी आहे.
देवांचा राजा महापराक्रमी वज्र धारण करणारा इंद्र. असुरांचे दुर्ग उद्ध्वस्त करणारा इंद्र. वृत्रासुराचा वध करणारा इंद्र. इंद्र कृपेसाठी ऋषीमुनी त्याची स्तुती करायचे. त्याच्या विजयाची गाथा गायचे. त्याकाळच्या परंपरेनुसार देवराज इंद्राच्या अनेक पत्नी होत्या. इंद्राची एक पत्नी शचीहि होती. इंद्र पत्नी शचीचा त्या काळी एवढा दरारा होताकि तिने स्वत:च्या स्तुतीसाठी सवतीचा नाश सूक्त रचले आणि त्या सूक्ताला ऋग्वेदात स्थानहि मिळाले.
स्वत:ची आत्मस्तुती करताना ती म्हणते. मीच घराण्याची शोभा आहे. मीच मस्तक आहे. मी कठोर स्वभावाची आहे. मी विजय शालिनी आहे. मी सर्व सवतींचा वर चष्मा नाहीसा केला आहे. माझे पुत्र शत्रूचा फडशा उडवितात. माझी पुत्रीहि चक्रवर्ती आहे. माझे पती ओजस्वी व सर्वश्रेष्ठ आहेत. जो भक्त त्यांना हविभाग अर्पित करतो त्यांचे इच्छित पूर्ण करतात. तेच मीहि केले आहे अर्थात मीही भक्तांकडून हवि भाग स्वीकार करते आणि त्यांचे मनोरथ पूर्ण करते. त्यामुळे मी सवत रहित झाले आहे. माझ्या प्रत्येक कृत्याचे अनुमोदन माझे पती करतात. (करणे भाग आहे). मी माझ्या पतीला पूर्णपणे वशमधे केले आहे. तो माझ्या मुठीत आहे. जसे मी माझ्या पतीवर अधिकार गाजवते तसेच मी इतरांवरहि गाजवते.
आजच्या काळातही बायकोच्या अधीन राहणारे नवरे सुखी असतात. बायकांच्या मुठी सारखी सुरक्षित जागा जगात दुसरी नाही. बायकांच्या अत्याचारांच्या विरुद्ध आवाज उठविणाऱ्या नावर्यांवर सरकारी पाहुणचार घेण्याची नौबत येते. माझ्या त्या सहकर्मीने पूर्वापारपासून चालत आलेले कठोर सांसारिक सत्य जाणले. नंतर त्याने कधीही त्याच्या बायकोची तक्रार केली नाही.
माझे म्हणाल तर मी माझ्या गृहराज्याचे प्रधानमंत्री पद सौ.ला अर्पित केले आहे आणि स्वत:ला राष्ट्रपती घोषित केले आहे. माझ्या नावावर सौ. सर्व निर्णय घेते आणि मी तिच्या सर्व निर्णयाचे राजी खुशी समर्थन करतो. मी सुखी आहे कारण मी बायकोच्या मुठीत आहे.
प्रतिक्रिया
25 Jul 2023 - 9:46 am | सुबोध खरे
मी बायकोच्या मुठीत अजिबात नाही.
आणि
असे समाजात सांगण्याची परवानगी तिने मला दिलेली आहे.
25 Jul 2023 - 11:05 am | साहना
> एक दिवस माझ्या एका सहकर्मीने त्याची व्यथा माझ्यासमोर मांडली. पगाराच्या दिवशी घरी पोहचताच त्याला महिन्याचा पगार त्याला बायकोच्या चरणी अर्पण करावा लागतो. त्याची बायको ऑफिस जाण्या-येण्यासाठी आणि चहासाठी मोजून जेबखर्ची त्याला देते. त्याला घरी यायला थोडा उशीर झालाकि त्याची बायको आकांड-तांडव करते. कधी-कधी त्याचा तोंडाचा वास ही घेते. त्याला लहान-सहान गोष्टींसाठी तिची संमती घ्यावी लागते. बायकोच्या जाचाला कंटाळून त्याला आत्महत्या करावीशी वाटत होती.
आता विनोद म्हणून हे सर्व काही ठीक आहे पण सत्य असेल तर अश्या पत्नीला घरातून हाकलून देणेच योग्य.
हे मुठीत वगैरे ठेवणे भाभीजी घरपे है छाप सिटकॉम मध्ये बरे आहे पण प्रत्यक्ष जीवनात अत्यंत जाचक आणि मानसिक दृष्टया लोकांना पूर्णपणे खचविणारे आहे.
25 Jul 2023 - 1:35 pm | विवेकपटाईत
प्रतिसाद आवडला. पण एकदा वहिनींना वाचायला द्या. जेव्हा ऋग्वेदात हे सूक्त वाचलं तेव्हा सत्य पेटले.बाकी माझी सौ. मी लिहलेले कधीच वाचत नाही. मिसळ पाव नावाचे संकेतस्थळ आहे याबाबत तिला माहिती नाही. माहिती असते तर असा लेख लिहिण्याचा पराक्रम केला नसता.
26 Jul 2023 - 12:05 pm | कानडाऊ योगेशु
त्या स्वतःच वहिनी आहेत हो काका!
26 Jul 2023 - 3:42 pm | वामन देशमुख
25 Jul 2023 - 11:07 am | कंजूस
तरुणपणी मुठीत राहाल तर म्हातारपणी सुखी व्हाल. कारण चुकलेल्या निर्णयांची जबाबदारी कुणावर ढकलणार? कुणाचेच सर्वच्या सर्व निर्णय बरोबर येत नाहीत.
25 Jul 2023 - 1:40 pm | चित्रगुप्त
@ विवेक पटाईतः या निमित्ताने भारतवर्षाच्या प्राचीन साहित्याची, त्यातील वैविध्याची ओळख करून देण्याचे स्पृहणीय कार्य करत आहात, हे थोरच.
बरेच वर्षांपूर्वी तुम्ही उल्लेख केला होता, की 'नियोग' या विषयावर मनुस्मृतीत जो दंडक सांगितलेला आहे, त्यातून पाच पांडवांपैकी कुंतीची तीन(च) मुले आणि माद्रीची दोन, असे का - याचा उलगडा होतो. महाभारतावरील कोणत्याच पुस्तकात हे लिहीलेले माझ्या तरी वाचनात आलेले नाही.
कृपया पुढील लेख यावर लिहावा. मनुस्मृतीतला तो श्लोक आणि त्याचा अर्थ, तसेच महाभारतातील त्याविषयीचे श्लोक देता आले, तर एका महत्वाच्या विषयावर प्रकाश टाकला जाईल. तसेच कर्णाचा जन्म आणि कुंतीने त्याचा त्याग करणे, याविषयी पण त्यात काही आहे का?
प्रचेतस यांना विनंती: तुमच्या माहितीत याबद्दल काही आहे का ?
25 Jul 2023 - 3:33 pm | प्रचेतस
धन्यवाद काका.
मनुने सुरुवातीला नियोगाचे समर्थन केलेले असून नंतर मात्र कठोर धिक्कार केलेला आढळून येतो.
देवराद्वा सपिण्डाद्वा स्त्रिया सम्यक्नियुक्तया ।
प्रजेप्सिताऽऽधिगन्तव्या संतानस्य परिक्षये ॥
विधवायां नियुक्तस्तु घृताक्तो वाग्यतो निशि ।
एकमुत्पादयेत्पुत्रं न द्वितीयं कथं चन ॥
द्वितीयमेके प्रजनं मन्यन्ते स्त्रीषु तद्विदः ।
अनिर्वृतं नियोगार्थं पश्यन्तो धर्मतस्तयोः ॥
विधवायां नियोगार्थे निर्वृत्ते तु यथाविधि ।
निवृत्ते गुरुवत्च स्नुषावत्च वर्तेयातां परस्परम् ॥
नियुक्तौ यौ विधिं हित्वा वर्तेयातां तु कामतः ।
तावुभौ पतितौ स्यातां स्नुषागगुरुतल्पगौ ॥
नियोगासाठी युक्त केलेला पुरुष विधवेच्या मृत पतीचा बंधू अथवा सगोत्री असावा, पतीकडून अपत्यप्राप्ती शक्य नाही असे सिद्ध झाले तर ती स्त्री दिराशी नियोग करुन पुत्रप्राप्ती करु शकते तसे नसेल तर पतीच्या कुटुंबात असलेल्या कोणत्याही पुरुषाकडुन पुत्रप्राप्ती करवून घेऊ शकते यात काहीही दोष नाही, जो विधवेशी संभोग करण्यास प्राप्त ठरला असेल तो रात्री भेटून तूप लावून एकदाच पुत्रपाप्ती करेल, दुसर्यांदा तो तिला भेटणार नाही. नियोगाचा कार्यभाग साध्य झाल्यावर त्या स्त्रीचे त्या पुरुषाशी नाते सासरा सुनेचेच असेल.
मनु आता नियोगाचा धिक्कार करताना म्हणतो-
नान्यस्मिन् विधवा नारी नियोक्तव्या द्विजातिभिः ।
अन्यस्मिन् हि नियुञ्जाना धर्मं हन्युः सनातनम् ॥
नोद्वाहिकेषु मन्त्रेषु नियोगः कीर्त्यते क्व चित् ।
न विवाहविधावुक्तं विधवावेदनं पुनः ॥
अयं द्विजैर्हि विद्वद्भिः पशुधर्मो विगर्हितः ।
मनुष्याणामपि प्रोक्तो वेने राज्यं प्रशासति ॥
स महीमखिलां भुञ्जन् राजर्षिप्रवरः पुरा ।
वर्णानां सङ्करं चक्रे कामोपहतचेतनः ॥
ततः प्रभृति यो मोहात्प्रमीतपतिकां स्त्रियम् ।
नियोजयत्यपत्यार्थं तं विगर्हन्ति साधवः ॥
द्विजांनी एखाद्या विधवेला दुसर्या पुरुषाशी नियोह करायला सांगितला तर ते धर्माच्या विरुद्ध होईल. प्राचीन नियमात नियोगाविषयी काहीही लिहिलेले नाही किंवा विधवेच्या पुनर्विवाहाचा देखील उल्लेख नाही. हा नियम पशुधर्मासमान समजत असून वेन राजाच्या राज्यात गाईला देखील लागू होता. ह्या राजर्षी वेनाने वर्णसंकराला मान्यता देऊन सर्वत्र गोंधळ केला होता. त्या वेळेपासून सज्जन पुरुष स्त्रियांना इतरत्र नियोगाद्वारे पुत्रप्राप्तीसाठी पाठवत नाहीत.
अर्थात मनु अत्यंत प्रतिगामी असल्याने आणि ही स्मृती तशी अलीकडची (इसवी पू ५०० ते १००) असल्याने यात नियोगाला स्त्रीपुरुष समागम समजणे किंवा नियोगाचा धिक्कार असणे साहजिकच आहे.
या उलट प्राचीन भारतीय आर्यावर्तात पुत्रप्राप्तीसाठी नियोगाचे विपुल उल्लेख आढळतात, महाभारतात आदिपर्वात बलि आणि दिर्घतमा ऋषीशी कथा आली आहे.
जग्राह चैनं धर्मात्मा बलिः सत्यपराक्रमः |
ज्ञात्वा चैनं स वव्रेऽथ पुत्रार्थं मनुजर्षभ ||
सन्तानार्थं महाभाग भार्यासु मम मानद |
पुत्रान्धर्मार्थकुशलानुत्पादयितुमर्हसि ||
नंतर बलिराजाने संतानप्राप्तीसाठी दीर्घतम्याला घरी बाळगले आणि माझ्या भार्यांचे ठायी धर्मार्थकुशल असे पुत्र कुलसंततीसाठी उत्पन्न करण्यासाठी मी तुमचे परिपालन कर्तो अशी त्याची प्रार्थना केली. सत्यवतीनेही व्यासाला नियोगाद्वारे आपल्या सूनांच्या ठायी पुत्रप्राप्तीसाठी आदेश देऊन कुरुकुलाचा वंश चालूच ठेवला.
काही धर्मसूत्रांमध्ये नियोगाविषयक समर्थन तसेच धिक्काराचेही उल्लेख असल्याने नियोग हे सर्वसामान्य नसावे असेच वाटते. कदाचित काळाच्या प्रभावाने वाढलेल्या स्त्री पातिव्रत्याच्या कल्पना, नियोग अयोग्यच आहे समजण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे नंतरच्या स्मृतींमध्ये हा गोंधळ झालेला दिसून येतो. नियोगाद्वारे झालेल्या पुत्राला 'क्षेत्रज'अशी संज्ञा आहे. उदा. पांडु, धृतराष्ट्र हे व्यासांचे क्षेत्रज पुत्र.
कुंतीने कर्णाचा त्याग म्हणजे कर्ण हा नियोगाद्वारे नसून कुमारी स्त्रीद्वारे व्यभिचाराद्वारे झालेल्या पुत्राचा त्याग अशा स्वरुपाचा होता.
26 Jul 2023 - 1:02 am | प्रसाद गोडबोले
चुकीचा अन्वयार्थ !
वल्लीसर , मुळ संस्कृत श्लोकाचा अर्थ लावण्यात आपण गफलत केली आहे. मनूने सरसकट नियोगाचा धिक्कार न करता केवळ विधवा स्त्रीयांबाबतीत नियोग निषिध्द आहे असे म्हणलेले आहे. ह्यात प्रतिगामी काय ? आधीही अन्यत्र म्हणल्याप्रमाणे तत्कालीन परिस्थीतीच अशी होती की स्त्री म्हणजे क्षेत्र. अर्थात जमीन अर्थात प्रजोत्पादनासाठीच स्त्रीजन्म अशी धारणा होती. पण तरीही झालेल्या अपत्यांची मालकी पुरुषाचीच असायची ! तस्मात विधवा स्त्रीने नियोग करुन अपत्य प्राप्ती करणे म्हणजे सावळा गोंधळ झाला असता ! त्या अपत्यांन्ना बाप कोण ? त्यांचे योगक्षेम कोण पहाणार ! तस्मात मनूने केवळ विधवांच्या बाबतीत नियोगाचा धिकार केलेला आहे, सरसकट नाही. मनू प्रतिगामी नव्हे तर एकदम तर्कशुध्द बोलत आहे !
(अवांतर : विवाहित स्त्रीला परपुरुषाकडून, नियोगाने वा अन्यथा, अपत्य प्राप्ती झाली तरी त्या अपप्त्यांचे पितृत्व हे परपुर्षाकडे जात नसुन मुळ पतीकडेच जाते. )
तुमच्या स्त्रीमुक्ती वगैरे आधुनिक संकल्पना आहेत. तुमच्या चष्म्यातुन मनू प्रतिगामी आहे, अन मनूच्या चष्म्यातुन तुम्ही अनार्य, धर्मभ्रष्ट, कुलघातक, उत्सन्नकुलधर्म: !
बाकी तुम्हालाही मनूस्मृती जाळायची असल्यास आमची हरकत नाही. ह्यावेळी आम्ही पॉपकॉर्न खात मजा पाहणार आहोत फक्त =))))
26 Jul 2023 - 9:17 am | प्रचेतस
नष्टे मृते प्रवज्जिते क्लीबे च् पतिते पतौ।
पञ्चस्वापत्सु नारीणां पतिरन्यो विधीयते।।
यदि सा बालविधवा: बलात्तयक्ताथवा क्वाचित । तदा भूयस्तु संस्कार्या गृहिता यैनकेनचित ।।
अर्थात जुन्या स्मृतींत असे श्लोक असले तरी मनुने मात्र त्याच्या स्मृतीत विधवा नियोगालाच काय तर विधवा विवाहाला देखील मान्यता दिल्याचे दिसत नाही, असा मनु प्रतिगामीच नव्हे काय? उलट तुम्ही ज्या वेदांचे नेहमी उदाहरण देता त्यात उलट स्त्रियांना बरीच समानता दिलेली दिसते. मनुस्मृतींत हे दिसत नाही, तस्मात मनु प्रतिगामी की पुरोगामी?
उत् ईर्ष्व नारि अभि जीव-लोकं गत-असुं एतं उप शेषे आ इहि
हस्त-ग्राभस्य दिधिषोः तव इदं पत्युः जनि-त्वं अभि सं बभूथ ॥
हे स्त्रिये, ह्या जिवंत मनुष्यांनी भरलेल्या जगाकडे पाहून तरी येऊन ऊठ. तूं या मृताच्या शेजारीं निजून राहिली आहेस; पण आतां इकडे ये. ज्या प्रियकरानें तुझें पाणिग्रहण केले, त्या तुझ्या पतिसंबंधाचे स्त्री या नात्यानें तुझे कर्तव्य तूं उत्कृष्टपणें केलेले आहेस.
ख्या ख्या ख्या, आम्ही कोणतेही ग्रंथ जाळण्याच्या अगदी विरुद्ध् आहोत, अगदी ग्रांथिक धर्म देखील आम्ही मौजेने वाचतो. :)
26 Jul 2023 - 11:17 am | प्रसाद गोडबोले
असा मनु प्रतिगामीच नव्हे काय?
>>>
नाही. मुळ प्रतिसाद हा नियोग संदर्भात आहे आणि त्याबाबत मनू ने सांगितलेले तत्व अजिबात प्रतिगामी नाही , पुर्णपणे तर्कशुध्द आहे.
आता सरसकटीकरण करुन मनू ला प्रतिगामी ठरवायचा घाट घातला असेल तर हे दळण सविस्तर्पणे निवांत वेळी दळायला घेऊ =))))
26 Jul 2023 - 11:20 am | प्रचेतस
येत्या वीकांती धो धो पावसात चर्चा करु :)
25 Jul 2023 - 8:11 pm | कंजूस
मूळ ग्रंथ फारच भारी विचार करणारे आहेत.
25 Jul 2023 - 8:43 pm | भीमराव
शंकर पार्वतीच्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टी फार छान असतात, त्यात शंकर पार्वती जग प्रदक्षिणा करत असतात. त्यावेळी त्यांना कोणी तरी रडताना आवाज येतो. बिचारे भोलेनाथ निघायच्या गडबडीत असतात. त्यांची बायको हट्ट करून कोण रडतंय का रडतंय ते बघायला सांगते आणि भोळ्या शंकराला ऐकायला लागतं.
सांगायचा मुद्दा एवढाच आहे की बायको पुढं जिथं देवाधीदेव महादेवाचं काही चालेना तिथं इंद्राची अगरबत्ती कुठे ओवाळता.
25 Jul 2023 - 8:51 pm | चित्रगुप्त
@प्रचेतसः विस्तृत, माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल अनेक आभार.
'सूर्य', 'यम' वगैरेंपासून कुंतीला गर्भधारणा झाली वगैरे हल्ली कुणाला पटणार नाही. भैरप्पांनी 'पर्व' मधे लिहीलेले हल्लीच्या वाचकांना पटण्यासारखे आहे. परंतु प्रत्यक्ष महाभारतात याला 'नियोग' म्हटले आहे किंवा कसे ?
पटाईतांनी पुष्कळ वर्षांपूर्वी सांगितले होते (आता नीटसे लक्षात नाही) ते काहीसे असे: मनुस्मृतीप्रमाणे षंढ पतीच्या स्त्रियांना त्यांच्या इच्छेनुसार कितीही अन्य पुरुषांशी रत होऊन संतती प्राप्त करण्याची मुभा जरी असली, तरी पतीच्या वंशपरंपरेने चालत आलेल्या राज्य, संपत्ती वगैरेंवर मात्र त्या स्त्रीच्या सर्वात मोठ्या तीन मुलांनाच अधिकार मिळू शकतो, असा पूर्वापार चालत आलेला दंडक होता. याच कारणामुळे कुंतीने 'मंत्र' वापरून तीन अपत्ये जन्माला घातल्यानंतर तो 'मंत्र' माद्रीला दिला. परिणामी पाची पांडवांना राज्याचा अधिकार मिळू शकला. मात्र कर्णाचा स्वीकार केला असता, तर कर्ण, युधिष्ठीर आणि भीम हेच उत्तराधिकारी होऊ शकले असते (आणि हल्लीच्या भषेत अर्जुनाचा 'पत्ता कट' झाला असता...) वगैरे.
--- विवेक पटाईत यांना विनंती की त्यांनी या मुद्द्याच्या पुष्ट्यर्थ मनुस्मृतीतील यथायोग्य उतारे इथे द्यावेत.
25 Jul 2023 - 9:55 pm | प्रचेतस
अर्थातच, पांडुने कुंतीला प्राचीन उदाहरणे देऊन, शिवाय खुद्द स्वतःच्या जन्माचेही उदाहरण देऊन स्पष्टपणे नियोगाची प्रेरणा दिली आणि एखाद्या श्रेष्ठ ब्राह्मणाकडून पुत्रप्राप्ती करून घेण्याचा आदेश दिला, तेव्हा कुंतीने दुर्वासाकडून मिळालेल्या वरप्रदानाचा उल्लेख करून पांडुच्या संमतीने देवतांकडून पुत्रप्राप्ती करून घेतली. तीन पुत्र उत्पन्न होऊनही पांडुस अजूनही पुत्रमोह सुटेना तेव्हा मात्र कुंतीने ठाम नकार देऊन विविध शास्त्रवचने ऐकवून अधिक पुत्रनिर्मिती करण्यास नकार दिला, तेव्हा माद्रीनेही तो मंत्र घेऊन दोन पुत्रांना जन्म दिला.
कर्णजन्म मात्र कुमारी मातेच्या पोटी झाल्याने तो नियोग नव्हताच.
25 Jul 2023 - 9:58 pm | कर्नलतपस्वी
मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रसिद्ध कादंबरी वर आधारित चित्रपट. कुलभूषण खरबंदा,हेमामालिनी व ऋषिकपूर. अप्रतिम.
नियोगासाठी युक्त केलेला पुरुष विधवेच्या मृत पतीचा बंधू अथवा सगोत्री असावा, पतीकडून अपत्यप्राप्ती शक्य नाही असे सिद्ध झाले तर ती स्त्री दिराशी नियोग करुन पुत्रप्राप्ती करु शकते
पतीच्या असामायीक मृत्युनंतर पतीचा लहान भाऊ वहिनीवर चादर टाकतो म्हणजे लग्न करतो. उत्तर भारतातील एक रुढी यावरच आधारित असावी.
तसेच कर्ण हा कुंतीचा कानीन पुत्र असा पर्व मधे लेखक भैरप्पा यांनी नमूद केले आहे.
बाकी, नवरा बायकोचा जर जीव की प्राण असेल तर तो मुठीत असणारच.
छान लेख छान प्रतिसाद.
25 Jul 2023 - 10:38 pm | प्रचेतस
कानीन-कन्या अवस्थेत झालेला, अर्थात कन्येला विवाहापूर्वी झालेला पुत्र असा अर्थ आहे.
25 Jul 2023 - 10:08 pm | कर्नलतपस्वी
असाच एक विचार,
https://www.misalpav.com/user/34339
25 Jul 2023 - 10:10 pm | कर्नलतपस्वी
https://www.misalpav.com/node/51194
26 Jul 2023 - 6:56 am | विवेकपटाईत
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना धन्यवाद.
26 Jul 2023 - 12:06 pm | कानडाऊ योगेशु
पण पुढे काय झाले त्या सहकार्याचे!
26 Jul 2023 - 12:12 pm | सुरिया
पुढे काय?
स्वर्गातही मूठ आणि मुठीतच स्वर्ग हे पटवून दिले ना काकांनी पुराव्यासहीत.
26 Jul 2023 - 3:38 pm | चांदणे संदीप
कहर प्रतिसाद. =))
सं - दी - प
26 Jul 2023 - 9:44 pm | सुखी
खिक
26 Jul 2023 - 4:53 pm | तर्कवादी
कजाग बायकोच्या मुठीत राहण्यापेक्षा मुठीने काम चालवलेले कधीही बरे :)
विनोदाचा भाग सोडल्यास बायकोच्या प्रेमळ आग्रहाला संमंती देणे वेगळे आणि तिच्या आक्रस्ताळेपणाला घाबरुन शरणागती पत्करणे वेगळे. पहिल्यात सुख असते पण दुसरे त्रासदायक. आणि स्वतःचे अर्थिक स्वातंत्र्य गमावून हातखर्चाला बायकोपुढे हात पसरणे म्हणजे शरणागतीचा कहर.
26 Jul 2023 - 7:58 pm | राजेंद्र मेहेंदळे
लेख वाचुन मिठित, मुठीत आणि मठीत चा विनोद आठवला. बाकी बहुतेक प्रतिसादकांशी सहमत. जे काय डोकं चालवायचं ते हापिसात. आपण घरी फक्त मम पुरते.
27 Jul 2023 - 12:17 am | शेर भाई
नवरा जर बायकोच्या मुठीत असेल तर मिठीचे काय / कोण / कुठे?
27 Jul 2023 - 5:22 am | कंजूस
होम मिनिस्टर कार्यक्रम बघा.
नवरे लोक काय काय करतात सुखशांती राहावी म्हणून ते कळेल.
28 Jul 2023 - 1:30 pm | आंद्रे वडापाव
पौलोमी शची चे ओरिजिनल चित्र ...
"पार्वती" असेही उपनाव धारण केल्याचे उल्लेख काही पुराणात आहेत ..
"निसटलेली पुराण ऐतिहासिक पाने" तून साभार
28 Jul 2023 - 3:32 pm | सुरिया
नवर्याने टाकलीय हिला
28 Jul 2023 - 4:28 pm | टर्मीनेटर
Lol...
घरातली करती सवरती बाई तु आहेस, तुला घर सांभाळावंच लागणार आहे.
थोरली जाउबाई म्हणुन तुला काहितरी करावंच लागेल कि नाही...