"अच्छा जल्दी बताओ हिंग को इंग्लिश में क्या बोलते हैं?"
२०१३ सालच्या 'क्वीन' (Queen) ह्या हिंदी चित्रपटात अॅमस्टरडॅम मधल्या इटालियन रेस्टोरंटचा मालक 'मार्सेलो' त्याच्या व्यवसायाला स्पर्धा निर्माण करू पाहणाऱ्या ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याच्या उद्देशाने 'रानी' (कंगना रानौत) समोर भारतीय खाद्यपदार्थ तयार करून विकण्याचा आव्हानात्मक प्रस्ताव ठेवतो.
मार्सेलोचा प्रस्ताव स्वीकारलेली रानी रेस्टोरंटच्या भटारखान्यात 'हिंग' शोधत असते, पण तिथे कोणालाच हिंग म्हणजे काय हे माहित नसल्याने ती भारतात रात्री ढाराढूर झोपलेल्या आपल्या आईला फोन करून "अच्छा जल्दी बताओ हिंग को इंग्लिश में क्या बोलते हैं?" असा प्रश्न विचारते.
त्यावर उत्तर माहिती नसलेली तिची आई हाच प्रश्न आपल्या नवऱ्याला विचारते, पण त्याच्याकडूनही काही उत्तर न मिळाल्याने ती मोबाईल फोनवरून अन्य तीन महिलांची झोपमोड करून त्यांना हा प्रश्न विचारते.
त्यांच्यापैकी पहिली महिला "आय थिंक... मस्टर्ड", दुसरी महिला "अरे वो डब्बी पे जो छोटासा लिक्खा होता है, कभी पर पढा नही क्या लिक्खा होता हैं" असे उत्तरतात तर तिसऱ्या महिलेकडून उत्तर मिळण्याऐवजी तिच्या घोरण्याचाच आवाज येतो.
शेवटी तिची आई "हॅलो रानी, बेटा, हिंग को हिंग हि केहते हैं इंग्लिश में" असे ढळढळीत चुकीचे उत्तर देऊन मोकळी होते.
आपल्यापैकी अनेकांनी हा चित्रपट पाहिला असेल, त्यातला वरील प्रसंग आठवतो का?
'क्वीन' हा चित्रपट चांगला होता, तो बॉक्स ऑफिसवरही चांगला यशस्वी ठरला, ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात ह्या चित्रपटाला "सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट" आणि कंगना रानौतला "सर्वोत्कृष्ट अभिनेत्री" आणि अन्य चार पुरस्कारही प्राप्त झाले होते, हे सगळं छानच पण त्याच बरोबर ह्या चित्रपटाने एका साध्याश्या, नर्मविनोदी प्रसंगातून 'हिंगाला इंग्रजीत काय म्हणतात' हे माहिती नसलेल्या लाखों प्रेक्षकांना त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास उद्युक्तही केले होते.
असो, इंग्रजीत - असाफोटीडा । संस्कृतमध्ये - 'हिंगु' । मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू आणि नेपाळीमध्ये - 'हिंग' । काश्मिरीत - यांग/यांगे । बंगालीत - 'हीं' । कानडीत - 'इंगु' । तामीळमध्ये - 'पेरूंगायम' । तेलगूमध्ये - 'इंगुवा' । मल्याळम मध्ये - कायम । ओडियामध्ये - 'हेंगु' अशा विविध भारतीय भाषांमध्ये विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या हिंगाचा भारतातला थोडा इतिहास आणि त्याची निर्मिती प्रक्रिया आपण पहिल्या अध्यायात पाहिली, आता भारतासहीत आशिया, आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरीका अशा चार खंडांपर्यंतचा हिंगाचा प्रसार आणि त्याच्या वापराची थोडी माहिती पाहू.
प्राचीन काळापासून युद्धासाठी असो कि व्यापारउदिमासाठी, जेव्हा माणसे आपल्या मूळ प्रदेशातून सीमोल्लंघन करत तेव्हा ते आपले अन्नपदार्थ सोबत घेऊन जात आणि परमुलुखातून परतताना तिथले अन्नपदार्थ आपल्या सोबत घेऊन येत असत, त्यामुळे जगभरात अनेक वस्तूंची आणि खाद्यसंस्कृती / खाद्यशैलींची आंतर्देशीयच नाही तर आंतरराष्ट्रीय आणि आंतरखंडीय देवाण-घेवाण झालेली आपल्याला बघायला मिळते. अरब व्यापारी, पर्शिअन, ग्रीक, रोमन, तुर्की, मोगल अशा साम्राज्यवादी आणि पोर्तुगीज, स्पॅनिश, डॅनिश, डच, ब्रिटिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन, बेल्जियन ह्या युरोपिअन साम्राज्य / वसाहतवादी राजवटींमुळे अशा देवाण-घेवाणी मोठ्या प्रमाणावर झाल्या.
★ आशिया आणि आफ्रिका :
आजचे इराक, सीरिया हे देश आणि इराणच्या पश्चिमेकडील व तुर्कस्तानच्या आग्नेयेकडील प्रदेशाचा समावेश होणाऱ्या 'मेसोपोटेमिया' मधल्या प्राचीन 'सुमेर' संस्कृतीचे वायव्य भारतात अस्तित्वात असलेल्या 'हडप्पा' संस्कृती (प्राचीन सिंधू संस्कृती) असलेले व्यापारी संबंध किमान चार हजार वर्षे जुने असल्याचे पुरावे १९५४ साली गुजरात मधल्या 'लोथल' (Lothal) येथे हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेल्या ठिकाणी झालेल्या उत्खननात मुद्रांच्या (seals) स्वरूपात सापडले आहेत. 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या' (Archaeological Survey of India) दाव्यानुसार ह्या परिसरात इ.स. पूर्व सुमारे चोवीसशे वर्षे जुन्या प्राचीन बंदराचे अवशेषही सापडले असून त्या दाव्याला 'राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, गोवा' (National Institute of Oceanography, Goa) ह्या संस्थेने दुजोरा दिला आहे. जवळपास साडेचार हजार वर्षे जुने बंदर असलेल्या ह्या प्राचीन शहरातुन मेसोपोटेमियाशी भारतााचा व्यापार चालत असे.
अरबी द्वीपकल्पाच्या (Arabian Peninsula) भारतीयांशी (Indian subcontinent) असलेल्या व्यापारी संबंधांनाही इ.स. पूर्व तब्बल तीन हजार वर्षे जुना इतिहास असल्याचे पुरावे उर, किश आणि बहारीन येथील उत्खननात सापडले आहेत, ज्यात प्राचीन सिंधू संस्कृतीतल्या वस्तूंचा आणि मुद्रांचा (seals) समावेश आहे. मोसेपोटेमियाचा दक्षिणेकडील अरबी द्वीपकल्पातला प्रदेश, म्हणजे आजच्या इराकमधील 'बसरा' ते भारतातील गुजरातमधल्या प्राचीन बंदरांपर्यंत ये-जा करणाऱ्या जहाजांसाठी अरबी द्वीपकल्पातले 'बहारीन' बंदर हे त्याकाळी मोक्याचे ठिकाण होते.
सुरुवातीच्या काळात अरब व्यापारी पर्शिया (इराण), अफगाणिस्तान मार्गे उंट व घोड्यांचा वापर करून जमिनीवरून, आणि पर्शियन आखातातील बंदरांमधून, जमिन दृष्टीआड होऊ न देता, किनारपट्टीच्या कडेकडेने लहान-मोठ्या बोटींतून प्रवास करत गुजरातच्या किनारपट्टीवरील बंदरांपर्यंत सागरी मार्गाने भारतात येऊन व्यापार करत असत. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी अरबांना नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मान्सून) दिशेचे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांनी सौदी अरेबियातील 'जेद्दा', येमेन, ओमान मधील बंदरांतून थेट केरळ मधील मलबार प्रांतापर्यंत मजल मारून हा व्यापार बराच वृद्धिंगत केला. उन्हाळ्यात, साधारण मे महिन्याच्या मध्यापासून मोसमी वारे भारताच्या दिशेने वाहू लागले कि अरब व्यापारी केरळमध्ये येत आणि हिवाळ्यात वारे उलट दिशेने वाहू लागले कि परतीचा प्रवास करत असत.
एकंदरीत भारताचे 'मेसोपोटेमिया' आणि 'अरबी द्वीपकल्पाशी' असलेले प्राचीन व्यापारी संबंध विचारात घेता भूमार्गे आणि जलमार्गे वायव्येकडून भारतात हिंगाचे आगमन फार आधी झाले असावे आणि आयुर्वेदाला त्याचा चांगला अभ्यास करण्याची संधी आणि वेळ मिळाला, तसेच अरब व्यापाऱ्यांकडून थेट आणि नियमित पुरवठा होऊ लागल्याने दक्षिण भारतातही त्याचा प्रसार अधिक वेगाने झाला असावा असे मानण्यास वाव आहे.
भारतीय उपखंडा सहित संपूर्ण आशिया खंडात आणि आफ्रिका खंडातही अरब व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर संचार होताच त्याशिवाय तुर्कस्तानमार्गे मध्य युरोपापर्यंत त्यांचा व्यापार चालत असे. उत्तर आफ्रिकेशी होणारा त्यांचा व्यापार इजिप्तमार्गे जमिनीवरून तर पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेशी होणारा व्यापार समुद्रमार्गे होत असे.
आजही जवळपास संपूर्ण आफ्रिका खंडात हिंगाचा कमी-अधिक प्रमाणात स्वयंपाकासाठी वापर होत असला तरी फार पूर्वीपासून अनेक अरब व्यापारी स्थायिक झालेल्या केनिया, टांझानिया आणि मोझाम्बिक सारख्या पूर्व आफ्रिकेतील देशांमध्ये मांसाहारी खाद्यपदार्थांत आणि औषधी म्हणून हिंगाचा वापर लक्षणीय आहे.
अर्थात अरबांनी हिंगाच्या व्यापारातुन आशिया, आफ्रिका आणि काही प्रमाणात युरोपात त्याचा प्रसार नक्कीच केला, पण जगभरातल्या हिंगाच्या औषधी वापरामागे आयुर्वेद आणि युनानी वैद्यकाचा मोठा हात आहे त्याविषयीची माहिती पुढच्या अध्यायात बघूयात.
इस्लामपूर्व सुमारे हजारेक वर्षे आधीपासून अरबांचे आशिया, आफ्रिका आणि युरोपात प्रचंड मोठे आणि मजबूत व्यापारी नेटवर्क होते. सातव्या शतकात अरबांनी इस्लाम स्वीकारल्यावर नव्याने अस्तित्वात आलेल्या त्या धर्माचा अल्पावधीतच मोठ्याप्रमाणावर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ह्या नेटवर्कचा त्यांनी पुरेपूर वापर केला. असो, अरबांचा हा इतिहासही रोचक आहे, पण त्याविषयी पुन्हा कधीतरी...
★ युरोप :
आपल्याकडे प्राचीन लेणी, गुंफा आणि मंदिरांबाबत काही माहिती नसेल तर बेधडकपणे ती 'पांडवकालीन' असल्याचे ठोकून देण्याची जी प्रथा आहे, ती मला वाटतं युरोपियन लोकांना आधी माहिती नसलेल्या कुठल्याही प्राचीन गोष्टीचे/वस्तूचे श्रेय 'अलेक्झांडर द ग्रेट' ला देण्याच्या आणि त्यातून अनेक सुरस अशा भाकड कथा जन्माला घालण्याच्या त्यांच्या प्रथेवरुन पडली असावी! जोक्स अपार्ट, तर ह्या 'सर्वज्ञानी' अलेक्झांडरला त्याच्या पर्शिया (आजचा इराण) स्वारीदरम्यान तिथे 'दैवी अन्नपदार्थ' (फूड ऑफ गॉड) असा लौकिक प्राप्त असलेल्या हिंगाबद्दल समजले होते, पण त्याला म्हणे हिंगाचा स्वाद तत्कालीन ग्रीक लोकं अन्नपदार्थांत वापर करत असलेल्या 'सिल्फिअम' (Silphium) ह्या हिंगाशी साधर्म्य असलेल्या वनस्पती / वनस्पतीजन्य पदार्थाच्या स्वादापेक्षा दुय्यम दर्जाचा वाटला होता.
ग्रीक आणि पुढे रोमन साम्राज्याचा भाग असलेल्या प्राचीन काळातल्या 'सायरीनी / कायरीनी' (Cyrene / Kyrene) म्हणजे आजच्या लिबियातील 'शह्हात' (Shahhat) ह्या शहरातून होणाऱ्या व्यापारात मोठा वाटा असलेली सिल्फिअम हि लिबियामध्ये मूळ असणारी वनस्पती पुढे नामशेष झाली असे मानले जाते. रोमन काव्यांतील तिचे उल्लेख आणि तीन नाण्यांवरची तिची आकृती, इतकेच तिच्या अस्तित्वाबद्दलचे पुरावे आहेत आणि नामशेष झाल्या कारणाने तिच्यावर कुठलेही शास्त्रीय संशोधन/अभ्यास झाला नसल्याने एकूणच तिच्या अलौकिक स्वादाविषयीचे आणि 'अपोलो देवाकडून मिळालेली देणगी' वगैरे रोमन काव्यांतील उल्लेख हे 'पुराणातली वानगी' किंवा हिंदी वाक्प्रचार "जंगलमें मोर नाचा किसने देखा" अशा प्रकारचे आहेत. काही अभ्यासक लुप्त झालेली सिल्फिअम हि फेरुला गटातलीच एक वनस्पती असावी असा अंदाज व्यक्त करतात, तर प्राचीन ग्रीक भूगोलशास्त्रज्ञ, तत्ववेत्ता आणि इतिहासकार 'स्ट्राबो' (Strabo) ह्याच्या मते सिल्फिअम आणि असाफोटीडा हे वेगवेगळे नसून तो एकच पदार्थ होता.
तीन नाण्यांवरील सिल्फिअमची आकृती ▼
असो, तर हि तथाकथित सिल्फिअम वनस्पती नामशेष झाल्यावर रोमन साम्राज्यात तिला पर्याय म्हणून हिंगाचा वापर सुरु झाला आणि त्याला प्रतिष्ठाही लाभली. 'हिंग' आणि 'चिलगोजा' (Pine Nuts) एकत्र करून बरणीत साठवून ठेवायची त्यांची पद्धत होती. (कदाचित शुद्ध हिंग आणि पाईन नट्सची पावडर एकत्र करून ते बांधानी हिंग / Compounded Asafoetida तयार करत असावेत असा माझा अंदाज.) ह्या हिंगाचा वापर ते औषध म्हणून आणि फळांचे काप व भाजलेल्या मांसावर शिंपडून खाण्यासाठी करत असत. पुढे पाचव्या शतकात रोमन साम्राज्य लयास गेल्यावर मात्र आजच्या इंग्लंड, वेल्स, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, ग्रीस, पोर्तुगाल, स्पेन, जिब्राल्टर, हंगेरी, लक्झेंबर्ग, बेल्जियम, ऑस्ट्रिया, बोस्निया, बल्गेरिया, अल्बानिया, रोमेनिया, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, मोल्दोव्हा, युक्रेन अशा तत्कालीन रोमन साम्राज्याचा भाग असलेल्या युरोपिअन देश / प्रांतांमध्ये खाण्यासाठी होणारा हिंगाचा वापर कमी कमी होत सोळाव्या शतकापर्यंत जवळपास पूर्ण बंद झाला.
एकेकाळी रोमन साम्राज्याचा भाग असलेल्या फ्रान्स मध्ये मात्र रोमन साम्राज्याच्या लयानंतरही काही प्रमाणात घरगुती व बराचसा व्यावसायिक स्तरावर होणारा हिंगाचा वापर सुरु राहण्यात किंवा पुन्हा सुरु होण्यात कदाचित त्यांच्या "पूर्वेचे पॅरिस" (Paris of the East) आणि "पूर्वेचे फ्रेंच रिव्हिएरा" (French Riviera of the East) अशा टोपणनावांनी ओळखल्या जाणाऱ्या 'पॉंडिचेरी' (Pondicherry - आताचे पुदुच्चेरी) ह्या सतराव्या शतकापासून पुढे सुमारे २८० वर्षे फ्रान्सच्या अधिपत्याखाली राहिलेल्या दक्षिण भारतातील फ्रेंच वसाहतीशी सुरु राहिलेली सांस्कृतिक देवाणघेवाण कारणीभूत ठरली असावी.
फ्रान्सची राजधानी, युरोपातील एक प्रमुख शहर, 'कला', 'फॅशन', 'आहारशास्त्र' (Gastronomy) आणि 'संस्कृतीचे' जागतिक केंद्र म्हणून लौकिक असलेले 'पॅरिस' शहर 'बहुगुणी' हिंगाचा वैविध्यपूर्ण असा शैलीदार वापर करण्याच्या बाबतीत मागे राहिले असते तरंच नवल! उत्तम अन्न खाण्याची आवड / अभिरुची बाळगणाऱ्या खवय्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये मसाल्यातला एक घटक म्हणून हिंगाचा प्रत्यक्षरित्या तर बीफ स्टीक्स आणि तत्सम पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हॉट प्लेट्स वर हिंगाचा खडा चोळून अप्रत्यक्षरीत्या त्यांचे स्वादमूल्य वाढवण्यासाठी पॅरिसमधल्या नामचीन उपहारगृहांमध्ये हिंगाचा वापर केला जातो.
अत्युच्च दर्जाची आणि मौल्यवान सुगंधी द्रव्ये (Perfumes) आणि सौन्दर्यप्रसाधने (Cosmetics) तयार करण्यासाठी जगभरात सुप्रसिद्ध असलेले पॅरिसमधील अनेक आघाडीचे उत्पादक आपल्या उत्पादनांमध्ये हिंगाचा वापर करतात. वरच्या फोटोत नमुन्यादाखल दिलेले 'कार्वेन' (Carven), 'लार्टीजन परफ्यूमर' (L'Artisan Parfumeur) आणि 'पिअर बालमीन' (Pierre Balmain) सारखे उच्चभ्रू ब्रॅंड्स आपल्या 'मा ग्रिफ' (ma griffe), 'प्रिमिअर फिजिए' (Premier Figuier) आणि 'व्हेन्ट व्हर्ट' (Vent Vert) सारख्या महागड्या परफ्यूम्सच्या टॉप नोट्स मधल्या घटक पदार्थांच्या यादीत 'असाफोटीडा'चा उल्लेख करतात हे विशेष!
वास्तविक 'फेरुला असाफोटीडा' ह्या वनस्पतीच्या शास्त्रीय नावावरून इंग्रजीत हिंगाला 'असाफोटीडा' असे नाव दिले गेले असले तरी हिंगाची तीव्र चव आणि उग्र वासामुळे इंग्रजी बोलीभाषेत ते 'Devil's dung' आणि फ्रेंच मध्ये 'Merde du Diable' (ज्याचा अर्थ 'सैतानाचे शेण' असा होतो) अशा हेटाळणी कारक नावांनी ओळखले जाते, ह्या पार्शवभूमीवर पॅरिसमधील उत्पादकांकडून परफ्युम्स आणि कॉस्मेटिक्स मध्ये सुगंध निर्मितीसाठी केला जाणारा हिंगाचा वापर विस्मयकारक वाटतो.
सतराव्या शतकात जर्मन निसर्गशास्त्रज्ञ आणि चिकित्सक 'एंगलबर्ट केम्फर' (Engelbert Kaempfer) ह्यांनी १६८३ ते १६९३ अशा दीर्घकाळात केलेल्या रशिया, पर्शिया, भारत, आग्नेय आशिया आणि जपानच्या अभ्यास दौऱ्यातुन मिळवलेल्या ज्ञानावर आधारित लिहिलेल्या पुस्तकात, तत्कालीन पर्शियातील 'लारीस्तान' (आजच्या इराण मधला फार्स प्रांत) येथे त्यांना आढळलेली फेरुला असाफोटीडा वनस्पती, हिंगाचा वापर आणि त्याच्या औषधी गुणधर्मांबद्दलची शास्त्रीय माहिती दिल्याने जर्मनीला हिंगाची पुन्हा नव्याने ओळख झाली.
फ्रान्सचा अपवाद वगळता उर्वरित युरोपात खाण्यासाठी होणारा हिंगाचा वापर आता नगण्य म्हणता येण्यासारखा असला तरी पूर्व युरोपातील आणि विशेषतः मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या युरोपिअन देशांमध्ये त्याचा औषधी वापर अजूनही बऱ्यापैकी केला जातो.
★ दक्षिण अमेरिका :
दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा आणि क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या आधारावर जगातील पाचव्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जाणाऱ्या 'ब्राझील' मध्ये हिंगाचा स्वयंपाकात आणि औषधी उपयोग बऱ्यापैकी केला जातो. पण ब्राझीलमध्ये हिंग केव्हा आणि कसा पोचला, आणि त्या खंडातील अन्य देश जसे कि कोलंबिया, व्हेनेझुएला, पेरू, बोलिव्हिया, अर्जेंटिना वगैरे देशांमध्ये देखील त्याचा वापर होतो कि नाही ह्याविषयी खात्रीलायक माहिती मात्र भरपूर शोधाशोध करूनही सापडली नाही, पण पोर्तुगीजांनी ब्राझीलमध्ये हिंग आणला असावा असे मानण्यास वाव आहे.
सुमारे ३४ वर्षांच्या आपल्या भारतातील वास्तव्यात दैनंदिन भारतीय जीवनातले मसाल्याचे महत्त्व जवळून अभ्यासलेले पोर्तुगीज निसर्गशास्त्रज्ञ आणि चिकित्सक 'गार्सिया डी ओर्टा' (Garcia de Orta) ह्यांनी १५६३ साली गोव्यातून प्रकाशित केलेल्या 'कॉलोकीज ऑन द सिंपल्स अँड ड्रग्स ऑफ इंडिया' (Coloquios dos Simples e Drogas da India) ह्या आपल्या २१७ पानी पुस्तकात त्यांनी लिहिले होते, “तुम्हाला हे माहित असलेच पाहिजे की संपूर्ण भारतात आणि त्याच्या सर्व भागांमध्ये स्वयंपाकात सर्वात जास्त वापरली जाणारी गोष्ट म्हणजे 'हिंग', प्रत्येक जेंटियो (हिंदू) ज्याला ते मिळवता येणे शक्य असते तो त्याचे अन्न स्वादिष्ट बनवण्यासाठी ते विकत घेतो.”
पाश्चिमात्य जगतात प्राच्य मसाल्यांवर लिहिलेले पहिले वैज्ञानिक पुस्तक मानले जाणाऱ्या ह्या पुस्तकाची १८७२ साली लिस्बन, पोर्तुगाल मधून दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.
पोर्तुगीजांचे भारतीय मसाल्यांवरचे प्रेम सर्वश्रुत आहे. त्यात 'गार्सिया डी ओर्टा' ह्यांच्या पुस्तकातून त्यांना समजलेले हिंगाचे स्वादमूल्य आणि औषधी गुणधर्म पाहता त्यांनी आपल्या वसाहतींमध्ये हिंगाचा प्रसार केला असावा. पोर्तुगाल - गोवा - पोर्तुगाल अशा प्रवासात त्यांचीच वसाहत असलेला ब्राझील हा एक महत्वाचा थांबा होता. तसेच ब्राझील मधली बहुतांश गुरे-ढोरे (गाय-बैल) पोर्तुगीजांनी भारतातून तिथे नेली आहेत हे विचारात घेता ब्राझीलमध्ये 'हिंग' सुद्धा पोर्तुगीजांद्वारे पोचला असावा. अर्थात हा केवळ माझा अंदाज असून त्याला कुठलाही अधिकृत संदर्भ नाही!
★ हिंगाचे काही चमत्कारिक उपयोग :
झोराष्ट्रीयन, ज्यू, ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध आणि हिंदू अशा सर्वच धर्मांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जात असल्या तरी देव, दैवी शक्ती, अमानवी शक्ती, सुष्ट-दुष्ट आत्मे, सैतान, भूत-प्रेत, पिशाच्च, दृष्ट लागणे अशा अनेक संकल्पनांना मान्यता आहे. त्यातल्या वाईट गोष्टी-शक्तींपासून बचाव करण्यासाठी त्यांच्या धर्मगुरू, मांत्रिक-तंत्रिकांकडे आपापले काही उपाय आणि तोडगेही आहेत. गमतीची गोष्ट म्हणजे अशा उपाय - तोडग्यांसाठी जगभरात अनेक ठिकाणी हिंगाचा वापर केला जात असल्याचेही ऐकून / वाचून आहे.
♦ प्राचीन पर्शिअन पौराणिक कथेनुसार "देवांचा राजा मनाला जाणाऱ्या 'आहूरा माझदा' (Ahura Mazda - ऋग्वेदात ज्याचा उल्लेख 'असुर महत' असा केला आहे.) ह्या त्यांच्या सर्वोच्च देवाचे वीर्य जमिनीवर पडण्यातून हिंगाच्या वनस्पतीची (फेरुला असाफोटीडाची) उत्पत्ती झाली असल्याने हिंगात दैवी शक्तीचा वास आहे". अशा धार्मिक संदर्भामुळे पर्शियात औषध म्हणून आणि जवळपास प्रत्येक अन्नपदार्थात हिंगाचा वापर होत असे तसेच दुष्ट शक्तींपासून बचाव होण्यासाठी घरात कोळशावर हिंग जाळणे, दुष्ट शक्तींनी ताबा घेतलेल्या व्यक्तीच्या गळ्यात हिंगाच्या वनस्पतीच्या खोडाच्या तुकड्यांची माळ घालणे असे उपाय केले जात. अर्थात आजच्या इस्लामिक इराण मधून झोराष्ट्रीयन धर्म जवळपास नामशेष झाला असला तरी खाण्यासाठी आणि 'सैताना' पासून बचाव होण्यासाठी हे उपाय आजही केले जातात.
♦ तिबेटी शमन / लामा अंतर्ज्ञान प्राप्तीसाठी हिंगाचे सेवन करतात आणि त्यांच्या धार्मिक विधींमध्ये देखील हिंगाचा वापर करतात. तसेच वातावरणातील जीवनावश्यक वायूंचे संरक्षण करण्यासाठी आणि चेटूक निवारणासाठी हिंग जाळण्याची त्यांची पद्धत आहे.
♦ टर्की आणि मध्यपूर्वेतही, पर्शिया (इराण) प्रमाणेच दुष्ट शक्ती / सैताना (Satan) पासून आणि दृष्ट लागण्यापासून (नजर लागणे / Evil Eye) बचाव करण्यासाठी धूप / लोबान प्रमाणे हिंग जाळण्याचा पारंपरिक उपाय जवळपास सर्व धर्मीयांद्वारे (ज्यू, ख्रिश्चन, मुस्लिम) केला जातो.
♦ इजिप्तमध्ये दृष्ट लागण्यापासून (नजर लागणे / Evil Eye) बचाव करण्यासाठी हिंगाचा ताईत बांधण्याची पद्धत आहे. एकंदरीतच इजिप्तबद्द्ल जगातील असंख्य लोकांना (विशेषतः युरोपियन लोकांना) एकप्रकारचे गूढ आकर्षण / कुतूहल असल्याने असे ताईत बांधण्याच्या इजिप्शिअन पद्धतीचा संपूर्ण युरोपात प्रसार झाला होता. आता युरोपात असे ताईत बांधण्याचे प्रकार फारसे होत नसले तरी कोणाची दृष्ट लागू नये म्हणून काहीजण काळ्या कापडाच्या तुकड्यात हिंगाचा खडा गुंडाळून ती पुरचुंडी खिशात/पर्समध्ये ठेवतात. तसेच भुताखेतांना दूर ठेवण्यासाठी 'बाधित' घरात पेटत्या मेणबत्तीच्या ज्योतीखाली वितळलेल्या मेणावर हिंगाच्या तेलाचे (इसेन्शिअल ऑइल) थेंब टाकून जाळण्याचा उपायही काही युरोपिअन देशांमध्ये केला जातो.
।। इति श्री 'हिंग' पुराण द्वितीयोध्याय संपूर्ण ।।
तळटीप: पुढच्या तिसऱ्या (अंतिम) अध्यायात हिंगाचे रासायनिक आणि औषधी गुणधर्म, खाण्याव्यतिरिक्त होणारे त्याचे औषधी उपयोग आणि भारत सरकारने 'फेरुला असाफोटीडा' वनस्पतीची देशात लागवड करून स्वदेशी हिंगाचे उत्पादन करण्याच्या दृष्टीने सुरु केलेलया प्रयत्नांबद्दलची माहिती येणार आहे./
आधिचा भाग : ।। 'हिंग' पुराण - अध्याय पहिला ।।
पुढचा भाग : ।। 'हिंग' पुराण - अध्याय तिसरा ।। (अंतिम)
जय हिंद! जय महाराष्ट्र!
प्रतिक्रिया
24 Jul 2023 - 5:20 pm | कुमार१
उत्तम स्वादिष्ट उत्तरार्ध !
हे झकास !
24 Jul 2023 - 5:47 pm | सौंदाळा
माहितीने भरगच्च असलेला हा भाग पण आवडला.
वाक्यावाक्याला लेख लिहिण्यासाठी घेतलेले परीश्रम जाणवले.
अंतिम भागाची वाट बघत आहे.
24 Jul 2023 - 6:11 pm | कर्नलतपस्वी
हा प्रबंधाचा विषय होऊ शकेल.
दमदार प्रस्तुती. अभिनंदन भौ.
24 Jul 2023 - 7:22 pm | वामन देशमुख
टर्मीनेटर भौ,
खूप परिश्रम घेऊन लिहिताय हे वाक्यावाक्यांमधून दिसतेच आहे. हिंग पुराण इतकं विस्तृत आहे असं वाटलं नव्हतं.
विषयाची विभागणी आवडली. पुभाप्र.
24 Jul 2023 - 7:41 pm | प्रचेतस
हा भागही आवडला.
ह्याबद्दल अशी समजूत होती की हे व्यापारी संघ शुद्ध अरबांचे नसून ज्यू लोकांचे असत व अरबस्तानातील मूळ अरबी लोक फक्त भटके टोळीवाळे होते. अर्थात नंतर अब्बासिद खिलाफतीत अरबांची व्यापारीदृष्ट्या प्रचंड भरभराट झाली.
इस्लामपूर्व अरबांच्या इतिहासाबद्दल एखादा लेख अवश्य येऊ द्यात.
'हिंगाचे काही चमत्कारिक उपयोग' आवडले. आपल्याकडील काही स्मृतींमध्येदेखील लसणासारखाच हिंगाचा अन्नपदार्थातला वापरही निशिब्द मानला आहे तो बहुधा त्याच्या उग्र वासामुळेच. अर्थात ११ व्या शतकातील कल्याण चालुक्य सोमेश्वर तिसरा ह्याने रचलेल्या मानसोल्लासात हिंगापासून केलेल्या काही चविष्ट शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पाककृतींचा उल्लेख आला आहे.
26 Jul 2023 - 11:55 am | टर्मीनेटर
कुमार१ । सौंदाळा । कर्नलतपस्वी । वामन देशमुख । प्रचेतस
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ प्रचेतस
जगभरात जवळपास सर्वच ठिकाणी 'ज्यू' लोकांचा जो पराकोटीचा द्वेष केला गेला / जातो त्यामागे असलेल्या अनेक कारणांपैकी एक कारण त्यांची "आयत्या बिळावर नागोबा", किंवा "मेहनत करे मुर्गा, अंडा खाये फकीर" अशी वृत्तीही आहे. अरबांचे व्यापारी नेटवर्क ज्यूंचे होते हा समजही त्यांच्याच धादांत खोट्या प्रचारातुन निर्माण झाला असावा.
अवांतर: कर्मठपणाच्या बाबतीत अन्य कुठल्याही धर्माला लाजवतील असे त्यांचे विचार होते. युरोप-आशियातील ज्या ज्या देशांत त्यांची लोकसंख्या वाढली आणि त्यांची अर्थशक्ती वाढली व सत्तेत अधिकारपदे मिळाली तिथल्या नागरिकांच्या सामाजिक समस्यांमध्ये वाढ झाली ज्याच्या परिणामी ज्यू द्वेष आणि त्यांच्या हत्याकांडाचे प्रकार घडले. जगभरातील ख्रिश्चन आणि इस्लामी देशांमध्ये त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या आणि भारतात मात्र त्यांना सौहार्दपूर्ण वागणूक मिळाल्याच्या कहाण्या आपण वाचल्या आहेत. जे बहुतांशी खरेही आहे कारण भारतात त्यांची संख्या कधीच त्रासदायक ठरण्याएवढी वाढली नाही पण पोर्तुगीजव्याप गोव्यात 'गोवा इन्क्विजीशन' अंतर्गत ज्युंनाही अत्याचाराचा सामना करावा लागला होता.
ह्या लेखात उल्लेख केलेले 'गार्सिया डी ओर्टा' (Garcia de Orta) हे देखील त्याचे उदाहरण आहेत. अर्थात त्यांच्या हयातीत त्यांना ह्या अत्याचारांची झळ बसली नव्हती पण वरकरणी पोर्तुगीज ख्रिश्चन पण छुप्या पद्धतीने 'ज्यू' धर्माचे पालन करणाऱ्या त्यांच्या बहिणीला ह्या गुन्ह्यासाठी जिवंत जाळण्यात आले होते आणि तिच्या साक्षीतून 'गार्सिया डी ओर्टा' देखील छुपे ज्यू होते असे समजल्यावर प्रतीकात्मक शिक्षा म्हणून त्यांच्या थडग्यातून अवशेष बाहेर काढून ते जाळण्यात आले होते. असो, ज्यू द्वेषा मागची अनेक करणे असली तरी ती सलगरित्या कुठे वाचायला मिळत नाहीत पण तुकड्या तुकड्यांच्या स्वरूपात त्यांचे भरपूर संदर्भ मिळतील.
हो, हे भटके टोळीवाले नौकानयनात पारंगत झाल्यावर त्यांच्यासाठी सागरतळातून मोती काढणे आणि आजूबाजूच्या प्रदेशात जाऊन व्यापार करणे अशा नव्या व्यवसायसंधी उपलब्ध झाल्या ज्यात उत्तरोत्तर त्यांनी प्रगती केली. अब्बासिद खिलाफतीत त्यांची सांस्कृतीक आणि व्यापारीदृष्ट्या भरभराट झाली, पण त्याला आफ्रिकेतून अरबांच्या किरकोळ प्रमाणात चालणाऱ्या गुलामांच्या व्यापाराला धर्ममान्यता मिळाल्याने त्यात झालेली प्रचंड वाढ अशी थोडी काळी बाजूही आहे.
हे सगळं फार गमतीशीर आहे. काश्मिरी पंडित मांस आणि मासे खातात पण त्यांना कांदा -लसूण मात्र वर्ज्य आहे. बंगाली ब्राह्मणांना मासे खाण्याची अनुमती आहे. कांदा-लसूण वर्ज्य असलेले जैन लोक हिंगाचा वापर करतात पण मला एक प्रश्न पडतो कि कुठलीहि जमिनीखाली उगवणारी वनस्पती, वनस्पतीचा भाग जर त्यांना वर्ज्य आहे तर मग वनस्पतीच्या मुळातून स्रवणारा हिंग त्यांना कसा काय चालत असावा?
असो, मानसोल्लासात असलेली हिंगाच्या वापराबद्दलची माहिती माझ्यासाठी नवीन आहे, त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद!
26 Jul 2023 - 12:41 pm | प्रचेतस
हो, हे ज्यू लोक खूप लोभी असत आणि श्रीमंतही त्यामुळे त्यांच्याविषयी तिरस्कार होताच, शिवाय येशूला सूळावर चढवण्यात ज्यूंचाच सहभाग होता म्हणूनही त्यांच्याविषयी अधिक द्वेष उत्पन्न झाला असावा असेही वाटते. बाकी गोव्यात इतरानांचा काय पण खुद्द एका फ्रेंच क्रिस्तियन डॉक्टरला देखील इन्क्विझिशनने पराकोटीचा त्रास दिला होता याचा विस्तृत वृत्तांत प्रियोळकरांनी त्यांच्या पुस्तकात कथित केला आहे.
अहो, खुद्द मलाही हिंग वनस्पतीजन्य आहे हे तुमच्या लेखावरुनच समजले नाहीतर मी देखील हिंग म्हणजे सैंधवासारखाच नैसर्गिक स्फटिक (खडा हिंग पाहून) असेच समजत होतो, तर त्यांना ते कुठून माहित असणार :), पण गंमतीचा भाग सोडा पण कदाचित रुचिवर्धक असल्याने त्यांना हिंग चालत असावा :)
26 Jul 2023 - 3:14 pm | गवि
सेम हियर. म्हणजे सैंधव टाईप नैसर्गिक स्फटिक असेल असे देखील कधी मनात आले नाही. किंबहुना तसा विचारच केला नाही.
कापूर या पदार्था विषयी अशीच समजूत आहे. किंवा काहीच समजूत नाही म्हणा.
स्पंज, मेण, सरस*, लाख# हे देखील त्यात ऍड करा.
* हा पदार्थ शाळेत हस्तव्यवसाय विषयात शिकवला जात असे. त्याचा वास अत्यंत घाण असे. खळ हादेखील अन्य चिकट पदार्थ. पण तोही घाण वासाचाच.
# हा पदार्थ काही पार्सलांवर एका शिक्क्यासहित दिसत असे.
वरील दोन्ही गोष्टींवरून आपण किती जुने आणि कालबाह्य झालो हे जाणवते .
26 Jul 2023 - 3:28 pm | टर्मीनेटर
😀
स्पंजाचे माहिती नाही ते बघावे लागेल, पण कापुर आणि लाख वनस्पतीजन्य आहेत, मेण मधमाश्यांच्या पोळ्यातुन मिळते आणि सरस जनावरांच्या हाडांपासुन बनते त्यामुळे त्याला फारच घाणेरडा वास येतो एवढंच माहिती आहे!
26 Jul 2023 - 4:31 pm | तुषार काळभोर
सरसचा एक उपयोग आमच्याकडे नव्वदीच्या दशकात खूप केला जायचा.
क्रिकेट खेळताना बॅटचा हँडल तुटला तर सरस वितळवून त्याने तो हॅंडल चिकटवायचा आणि नंतर दोर्याने (शक्य असल्यास मांजा) घट्ट गुंडाळायचा. बाकी बॅट तुटायची, पण हा सरसने चिकटवलेला हँडल परत कधी तुटत नसे :)
पण सरसचा असा स्रोत असेल असं कधी वाटलं नव्हतं. मला ते खनिज वाटायचं!
26 Jul 2023 - 4:59 pm | आंद्रे वडापाव
मांजा नव्हे, चांभाराचा दोरा असेल ...
कारण दोऱ्याला पहिले सरस लावून, नंतर लगेचच पुढच्या २-३ सेकंदात, त्यावर बारीक वस्त्रगाळ कुटलेल्या काचेची पुड लावल्यावर, "मांजा" तयार होतो.
असा मांजा मग काटाकाटी (पतंगाच्या)मध्ये वापरतात . , काही स्कुटरवाल्यांचा जीव गेलाय गळा कापल्या गेल्याने या मांजामुळे ...
26 Jul 2023 - 5:03 pm | टर्मीनेटर
😂 😂 😂
बॅटचे तुटलेले हँडल चिकटवायला आम्ही माझ्या आजोबांकडे असलेले 'अॅरालडाईट' (Araldite) वापरयचो!
सातवी-आठवीत असताना सर्वात भारी मांजा बनवण्याचा प्रयोग करताना आम्ही मीत्र मंडळींनी हार्डवेअरच्या दुकानातुन 'सरसच्या' पट्ट्या आणुन घराजवळच्या मैदानात जाळ पेटवुन वितळवल्या होत्या तेव्हा त्याचा इतका भयंकर वास सुटला होता कि मैदानाच्या आजुबाजुने जाणारे-येणारे लोकं नाकाला रुमाल लाउन जात-येत होते 😀
हा 'दिव्य' मांजा बनवण्यासाठी त्या वितळलेल्या सरसमध्ये मिसळण्यासाठी सोड्याच्या बाटल्या कुटुन त्याची पावडर बनवायला घरातल्या मिक्सरचा वापर केला होता. त्यातुन तयार झालेल्या मांजाने इतरांच्या पतंग तर गुल व्हायच्याच, पण आमची बोटेही कापयची.
अर्थात ती काचेची पावडर बनवण्याच्या खटाटोपात मिक्सरच्या भांड्यच्या ब्लेड्सची पार दुरावस्था झाल्यामुळे आईचा अभुतपुर्व असा मारही खाल्ला होता 😂
24 Jul 2023 - 8:22 pm | कंजूस
हभप हिंगभप
पुराण आवडत आहे. विशेष लेख असूनही दिवाळी अंकासाठी दाबून न ठेवता लगेच आषाढ श्रावणातच आणल्याबद्दल धन्यवाद. पावसाळ्यात हिंग लावून ताक पिणे हितकर.
कल्याण चालुक्याची गोष्टही प्रचेतसनी सांगितली.
24 Jul 2023 - 8:29 pm | मुक्त विहारि
अफाट परिश्रम घेऊन लिहिलेला, लेख आवडला ...
24 Jul 2023 - 9:16 pm | Bhakti
मस्त मस्त मस्त!
तीनही भाग प्रिंट काढून निवांत परत वाचणार आहे.प्रबंध छापला तर रेफरेन्समध्ये सैंधव मीठ आणि माझं नाव द्या बरं का :)
26 Jul 2023 - 12:12 pm | टर्मीनेटर
कंजूस । मुक्त विहारि । भक्ती
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ कंजूस,
कंकाका तुमची ३ भाग होतील ही भविष्यवाणी खरी ठरली हो 😀
एकाचे फारतर दोन होतील असा माझा प्राथमीक अंदाज होता, पण तुम्ही म्हंटल्याप्रमाणे ३ भाग झालेच!
@ भक्ती
हो, तुमचे आणि प्रचेतस असे दोघांचे नाव देइन हो 😂
24 Jul 2023 - 9:18 pm | विवेकपटाईत
ज्ञानवर्धक लेख. आवडला.
25 Jul 2023 - 10:08 am | आंद्रे वडापाव
लेख आवडला, ऐतिहासिक दाखले रोचक वाटले..
शुभेच्छा !
25 Jul 2023 - 12:49 pm | शलभ
मस्त लेख
25 Jul 2023 - 7:06 pm | चांदणे संदीप
हा लेखही प्रचंड आवडला.
तुमच्या आवडत्या विषयांची यादी नावडत्या विषयांपेक्षा कमी असावी कदाचित. हिंगासारख्या विषयावरही वाचन्/अभ्यास करून लगेच ते अशा पद्धतीने लिहून काढणे की ते लेखन अनेकांच्या पसंतीस उतरेल ही नक्कीच खायची गोष्ट नव्हे!
तुमच्या लेखणीस असेच उत्तरोत्तर बळ मिळो ही सदिच्छा!
सं - दी - प
26 Jul 2023 - 12:28 pm | टर्मीनेटर
विवेकपटाईत । आंद्रे वडापाव । शलभ । चांदणे संदीप
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ चांदणे संदीप
छे हो, एवढा कुठला उरक आला माझ्याकडे!
वास्तविक २०१९ मध्ये "हिंगाची, आयात - प्रक्रिया - निर्यात" अशा व्यवसायात उतरु पाहणाऱ्या एका स्टार्टअप साठी बिझनेस मॉड्यूल्स तयार करण्याच्या कामात सहभागी झालो असताना हिंगा विषयी भरपूर तांत्रिक आणि अवांतर माहिती जमा झाली होती, पण त्यावर लेख लिहीन असे कधी वाटले नव्हते 😀
काही दिवसांपूर्वी भक्तींचा सैंधव मिठावरचा धागा वाचताना 'हिंगाची' आठवण आली म्हणून त्यांना पुढच्या लेखासाठी हा विषय सुचवला होता पण त्यांनी (आणि प्रचेतस बुवांनी) तो चेंडू पुन्हा माझ्याच कोर्टात टोलवण्यातून हे हिंग पुराण जन्माला आले 😂
त्यावेळी गोळा झालेल्या माहितीचे लेखात रुपांतर करताना अनेक संदर्भ ताजे करण्यासाठी जालावर थोडी उचक-पाचक करण्याची आणि मुख्य म्हणजे हे सगळं मराठीत टंकायची मेहनत घ्यावी लागली एवढेच!
26 Jul 2023 - 3:20 pm | अथांग आकाश
हे बेस्ट झाले! त्यांच्यामुळे डिट्टेलवार माहिती वाचायला मिळाली!! त्या दोघांचे पण आभार!!!
26 Jul 2023 - 12:25 pm | सुरिया
26 Jul 2023 - 12:25 pm | सुरिया
ऑनिय्यन मेरा, लस्स्सून मेरा.
आसाफोटीडा का ड्ब्बा दे दे मेरा
.
26 Jul 2023 - 4:17 pm | Bhakti
हे हे चालीत मनातल्या मनात गायलं:)
26 Jul 2023 - 4:38 pm | टर्मीनेटर
तुमचा प्रतिसाद वाचल्यावर मी पण हा प्रयोग करुन बघीतला 😀
"बादाम बादाम दादा काचा बादाम
आमार काछे नाइखो बुबू भाजा बादाम"
च्या चालीवर 😂
तुम्ही कोणत्या चालीत गायलंत?
बाय द वे सुरिया, हे कुठल्या गाण्यातले बोल आहेत की तुम्ही स्वतः प्रसवलेल्या कव्यपंक्ती? स्वरचीत असेल तर क्रिएटीव्हीटी भारी आहे 👍
26 Jul 2023 - 4:44 pm | Bhakti
https://youtube.com/shorts/mlNrP3sVSkc?feature=share
26 Jul 2023 - 5:38 pm | टर्मीनेटर
असं आहे होय...
तुम्ही दिलेली लिंक वरचा शॉर्ट पहाताना हा ऑफिशीअल व्हिडिओ सजेशन मध्ये आला, हे गाणं माहिती नव्हतं.
म्हणजे सुरिया ह्यांनी 'ये फेकि तुझको पिनकोड मास्टर व्हिसा कार्ड' च्या जागी 'आसाफोटीडा का ड्ब्बा दे दे मेरा' असा कल्पक बदल केला आहे काय 😀
छान!
26 Jul 2023 - 5:55 pm | Bhakti
हो,
पहिल्या दोन ओळी common आहेत
ऑनिय्यन मेरा, लस्स्सून मेरा...
तिसरी ओळ आपल्या मनाने देऊ शकता
पण तिसरी ओळ
परीतोक्ष का पिनकोड मुझसे ना छुपा
ही जास्त व्हायरल आहे :)
26 Jul 2023 - 6:19 pm | टर्मीनेटर
टिक टॉक, इंस्टा की जय 🙏
नशिबवान आहे हो तुमची पिढी...
आमच्या वेळी नव्हतं बुवा असलं काही
😂 😂 😂
26 Jul 2023 - 3:01 pm | अथांग आकाश
अप्रतिम लेख! माहिती संकलनासाठी घेतलेली मेहनत जाणवते आहे!! पुढच्या भागाविषयीची उत्सुकता वाढली आहे!!!
26 Jul 2023 - 8:00 pm | Nitin Palkar
टर्मीनेटरजी तुमचे सर्वच लेख आवडीने वाचतो त्याचं कारण म्हणजे तुमची लेखनशैली.
दोन्ही लेख खूपच छान उतरलेत.
माझी आई करत असलेला घरगुती हिंगाचा एक औषधी उपयोग, पोटदुखी थांबण्यासाठी चिमूटभर हिंग बेंबीला चोळावा. खूप प्रभावी उपाय आहे, कोणताही अपाय नक्की नाही.
पापड करताना 'हिरा हिंग' नावाचा हिंग खास आणला जाई (हे ब्रॅंड नेम असावे). तो अधिक तीव्र (स्ट्रॉंग) वासाचा असे.
पुभप्र .
26 Jul 2023 - 8:10 pm | Nitin Palkar
पुभाप्र
_/\_
27 Jul 2023 - 5:16 am | कंजूस
'पुढच्या लेखासाठी पदार्थ सुचवा'
केशर.
लेखक साहेब हिमालयात,काश्मिरात {बऱ्याचदा }फिरले आहेत म्हणजे असली केशर धागा येणार.
28 Jul 2023 - 9:30 pm | टर्मीनेटर
कंकाका 'लाल सोना' असे बिरुद मिरवणारा केशर जम्मू आणि काश्मीरमध्ये भरपूर बघितला आणि प्रत्येकवेळी तिथून आणलाही होता, पण त्याचे शेत मात्र तिथे कधी बघायला मिळाले नाही, ते बघितले भूतानमध्ये 😀 अर्थात काही वर्षांपूर्वी भूतानमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु झालेलया व्यावसायिक केशर लागवडीतून होणारे उत्पादन अगदी नगण्य असले आणि तो केशर हा फार काही चांगल्या दर्जाचा म्हणून ओळखला जात नसला तरी निदान शेतात त्याची फुले बघायला मिळाली होती.
आणखीन एक गम्मत म्हणजे 'काला सोना' असे बिरुद मिळवणारे 'चरस' आणि 'अफू' हे पदार्थ हिमाचल प्रदेशात, उत्तराखंड आणि पंजाब मध्ये व्यवस्थित निरखून-हाताळून बघायला मिळाले होते (त्यावर लेख लिहिणार नाही, काळजी नसावी 😂) पण चरस हे बाय-प्रोडक्ट मिळणारी भांग / गांजाची अधिकृत शेती पण भुतान मध्येच पाहायला मिळाली होती. आमचा ड्रायव्हरही फार हौशी होता,त्याने दोन्हीच्या फांद्या तोडून आणून त्यांच्यातला फरक समजावला आणि Cannabis sativa ह्या एकाच वनस्पतीच्या नर आणि मादी झाडांपासून हे वेगवेगळे पदार्थ मिळत असल्याचे 'मौलिक' ज्ञानही दिले होते.
अफूच्या बाबतीत एक गमतीशीर किस्साही घडला होता. वीस-बावीस वर्षांपूर्वी मराठी आणि हिंदी चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या एक सुप्रसिद्ध अभिनेत्री कुटुंबासहित सिमला-कुलू-मनाली-वैष्णो देवी अशा सहलीवर आमच्यासोबत आल्या होत्या. (अर्थात सेलिब्रेटी असल्या तरी व्यवस्थित पैसे भरून, झिम्मा-फुगड्या खेळण्यासाठी 'भाऊजींना' किंवा अन्य सेलिब्रेटींना सहलींवर नेण्यासारखे प्रकार तेव्हा कोणी संयोजक करत नसत 😀)
कुलूला पोचल्यावर त्यांना असे काही जुलाब सुरु झाले कि ते थांबायचे नावच घेईनात. दुसऱ्या दिवशी मणिकरणला जायचा कार्यक्रम होता आणि तो त्यांना अजिबात चुकवायचा नव्हता, डॉक्टर हॉटेलवर येऊन औषध-पाणी देऊन गेले पण ह्यांच्या वाऱ्या काही थांबेनात. संध्याकाळी उशिरा आम्ही मित्र आणि आमच्या बसेसचे ड्रायव्हर्स शेकोटी पेटवून बसलो असताना हा विषय निघाला तेव्हा एक ड्रायव्हर म्हणाला "हमारी देसी दवाई दे क्या मॅडम को, ऐसे बंद होगा जैसे पेहले कभी हुवा हि नही था", आम्हि म्हंटलं विचारून बघतो त्यांना, गावठी उपाय चालेल का ते! त्यांचा होकार मिळाल्यावर त्याने साधारण मोहरीच्या दाण्यापेक्षा थोडी मोठी अफूची गोळी करून दिली आणि पाण्याबरोबर घ्यायला सांगितली.
दुसऱ्या दिवशी मॅडम एकदम ठणठणीत! त्यांच्या इच्छेप्रमाणे मणिकरण वगैरे व्यवस्थित बघता आल्याने स्वारी एकदम खुश होती, पुढच्या दोन दिवसांत त्यांनी कितीवेळा 'त्या' औषधासाठी ड्रायव्हर मंडळी आणि आमचे आभार मानले असतील ह्यची गणती नाही. तिसऱ्या दिवशी मात्र सकाळी एक छोटीशी तक्रार घेऊन आल्या "अरे काय औषध होतं ते, गेल्या दोन दिवसांपासून मला अजिबात टॉयलेटला झाली नाही."
'ते' काय औषध होतं, हे आम्हाला माहिती असलं तरी त्यांना सांगितलं नव्हतं पण आता ते सांगायची वेळ आली होती. मग ड्रायव्हर महाशयांकडून मिळालेले "काळजी करू नका तीन दिवस बंद म्हणजे एकदम बंद राहील पण मग सगळं व्यवस्थित होईल" हे ज्ञान त्यांना दिले. त्यावर हसून "मग हरकत नाही, पण गुण मात्र चांगला आला" असे बोलून पुन्हा आमचे आभार मानते झाल्या होत्या 😀
29 Jul 2023 - 12:31 pm | तुषार काळभोर
१९७० च्या दशकात लहान मुलांना, जर झोपत नसतील किंवा सारखी रडत असतील तर मोहरीच्या दाण्याएवढी अफू देऊन झोपवणं किमान ग्रामीण भागात कॉमन होतं.
हे एक:
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अमेरिकेत लहान मुलांना अशी औषधे देणे सामान्य होते :
29 Jul 2023 - 1:23 pm | टर्मीनेटर
हो! त्यातुन अनेक बालकांचे अपरिमित नुकसान झाल्याच्या कहाण्या जुन्या-जाणत्यांकडुन ऐकल्या आहेत. तसेच ब्रिटिशांच्या काळात अफु सेवनसाठी परवाना दिली गेलेली अनेक शंभरीच्या वयात पोचलेली 'जुनी खोडे' अजुनही भारतात आहेत 😀
27 Jul 2023 - 7:35 am | आंद्रे वडापाव
शिलाजीत
27 Jul 2023 - 11:11 am | रंगीला रतन
साष्टांग दंडवत दादुस!! दोन्ही भाग वाचले. पुराण एक नंबर लिवलंय.
अरबांचा हा इतिहासही रोचक आहे, पण त्याविषयी पुन्हा कधीतरी...
यावर लिहाच. आतापरेंत अरब म्हणजे मुसलमान असच वाटत होतं :=)
27 Jul 2023 - 1:02 pm | वामन देशमुख
पुढच्या लेखासाठी पदार्थ्स् -
- केशर
- शिलाजीत
- मीठ
27 Jul 2023 - 1:14 pm | कंजूस
मीठ विषय झाला आहे.
मिरची घ्या.
27 Jul 2023 - 1:48 pm | आंद्रे वडापाव
"मिरे" सुद्धा घेऊ शकता विषय ...
घोड्याला सुद्धा मिरे खाऊ घालतात म्हणे .. नवरदेवाच्या ... (ऐकीव माहिती )
27 Jul 2023 - 1:56 pm | गवि
कापूर, स्पंज , लाख , मेण हे आहेतच विषय .
पण हल्ली बरेचदा ऐकू येणारा उमामी हा स्वाद म्हणा किंवा जी काही एक नवीन एक्सट्रा सहावी की पाचवी निराळी चव म्हणतात त्याबद्दल काही तपशील कळला तर रोचक होईल. धन्यवाद.
बहुधा अजिनोमोटो हा पदार्थ या उमामी स्वादाशी संबंधित असतो. चुभुद्याघ्या ..
27 Jul 2023 - 4:26 pm | हणमंतअण्णा शंकर...
'मसाला लॅब' हे क्रिश अशोक यांचे पुस्तक सुचवतो.
या पुस्तकाने मजवर बरेच उपकार केले आहेत.
क्रिश अशोक यांचे वैज्ञानिक नुस्खे ( उर्फ विज्ञाननायकीण सुगरणीचे सल्ले ) छापाचे जे सल्ले आहेत ते वापरून माझ्या अन्नाचा दर्जा सुधारला.
विशेषतः मटणाला ब्रायनिंग करणे, रश्याच्या फोडणीत दारू ओतणे अशा साध्या पण क्रिटिकल नुस्ख्यांनी माझ्या रश्याला चार चांद लागतात.
हे त्यांचे लेक्चर ऐका. सायन्स ऑफ इंडियन कुकिंग
त्याच्यात शेवटी उमामी म्हणजे काय हे ते सांगतात.
27 Jul 2023 - 6:31 pm | गवि
बघतो. धन्यवाद..
28 Jul 2023 - 12:05 pm | Bhakti
धन्यवाद, अजून एका डायडेशिअनही सुचवले होते, पुस्तक मागवत आहे.
28 Jul 2023 - 4:54 pm | टर्मीनेटर
सायन्स ऑफ इंडियन कुकिंग हा व्हिडिओ थोडा पाहिला, मस्त वाटला 👍
मुख्य म्हणजे दांडगा अभ्यास असला तरी सर्वज्ञानी असल्यासारखा आव न आणता बोलायची त्यांची पद्धत डिसेंट वाटली.
व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा आहे, जवळपास दोन तासांचा, मगाशी 'कोरियामध्ये वाढ्लेल्या नाकाच्या प्लास्टीक सर्जरीज आणि इंस्टाग्राम चे कनेक्शन' पर्यंत पाहिला बाकीचा उद्या-परवा सवडीने नक्की बघतो.
धन्यवाद!
27 Jul 2023 - 3:08 pm | आंद्रे वडापाव
उमामी ही चव प्रोटीनच्या विशिष्ठ स्वादामुळे येते .. अजिनोमोटो कृत्रिमपणे उमामी चा भास निर्माण करते ..
नॉन व्हेज खाणाऱ्यांना उमामीची कमी शक्यतो भासत नाही ..
बाकी व्हेज वाले शीतसाके मश्रुम वैगरे कडून उमामीचा अनुभव घेऊ शकतात ..
27 Jul 2023 - 3:15 pm | चित्रगुप्त
जबरदस्त अभ्यासपूर्ण, ज्ञानवर्धक, मनोरंजक लेख खूप आवडला. हिंगापासूनचे होमियोपाथिक औषध आणि आयुर्वेदिक हिग्वाष्टक चूर्ण वापरलेले आहे. फ्रेंच सुगंधी द्रव्यात हिंगही वापरतात हे प्रथमच समजले.
27 Jul 2023 - 7:50 pm | कंजूस
लिंबुडा लिंबुडा लिंबुडा
सोडून काहीही घ्या.
27 Jul 2023 - 9:12 pm | रंगीला रतन
आता ह्या काय नवीन? मधीच लिंबुडा कुठून आला :=)
पण आपलं आवडत गाणं आहे. डान्सबार मधे बारबाला लई भारी नाचायच्या या गाण्यावर. गेले ते दिवस :=(
https://youtu.be/YLsIl0G0qlM
28 Jul 2023 - 5:46 pm | कंजूस
(लिंबूडा)लिंबू सोडून इतर फळे चालतील.
28 Jul 2023 - 10:19 am | गोरगावलेकर
रोजच्या वापरातील चिमूटभर गोष्टीबद्दल विस्तृत माहिती. लेख लिहिण्यामागील आपला अभ्यास आणि मेहनत दोन्हीला सलाम. लेखनशैली जबरदस्त .
28 Jul 2023 - 5:04 pm | rahul ghate
टर्मीनेटर भाऊ हिंग पुराण चे २ हि भाग फारच माहिती पूर्ण आहेत . कृपया ३ रा भाग टाका वाचायला उत्सुक आहे
28 Jul 2023 - 6:14 pm | टर्मीनेटर
सुरिया । अथांग आकाश । Nitin Palkar । रंगीला रतन । चित्रगुप्त । गोरगावलेकर । rahul ghate
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
वाह... लेखासाठी विषय भारीच सुचवले आहेत एक एक!
ह्यापैकी 'उमामी' विषयी फार काही माहिती नसली तरी बाकी सर्व पदार्थ हाताळले आहेत आणि त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती आहे. आणखीन थोडी माहिती मिळवून, हिंग पुराणामुळे प्रतीक्षा यादीत पडून असलेला (आता वराती मागून घोडे म्हणता येईल असा 😀) 'मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन' वरचा लेख झाला कि येत्या 'गलेमा' मध्ये एकाच किंवा दोन लेखात ह्या सगळ्यांचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करतो 🙏
31 Jul 2023 - 9:52 am | शानबा५१२
फार छान माहीती दीलीत, लेख खुप मोथा असला तरी वाचयाला मजा वाटली. आपणास धन्यवाद व खुप शुभेच्छा!