।। 'हिंग' पुराण - अध्याय पहिला ।।

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
10 Jul 2023 - 9:20 pm

मिसेस पोद्दार ने पेश कि बेसनगट्टे कि सब्जी
मिसेस मोंगा ने बनाई दाल मखनी
मिसेस चॅटर्जी कि बैंगन भाजी
मिसेस नायर का सांबार
मिसेस गुप्ता का राजमा
और मिसेस विरानी का उंधियू

वाह! सबको मिलते है दस में से दस...
अब चिट निकालके हि होगा मिसेस शेफ का फैसला...

इन दस नंबरीयोंने ऐसा क्या डाला कि स्वाद हुवा निराला?

घर घर कि पसंद वनदेवी हिंग...
स्वाद और सुगंध वनदेवी हींग...
चुटकीभर वनदेवी हिंग...
खाना बने रेलिशिंग...

वरील 'अतुल परचुरेंनी' केलेली वनदेवी हिंगाची जाहिरात आठवते का?
कंपनीने आपल्या उत्पादनाची जाहिरात करतानाच उत्तर, दक्षिण, मध्य, पूर्व आणि पश्चिम अशा जवळपास संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणारी आडनावे वापरून अखिल भारतीय खाद्यसंस्कृतीत होणारा हिंगाचा वापर आणि त्याचे स्वादमूल्यही त्या जाहिरातीतून मोठ्या कल्पकतेने विशद केले होते!

खाद्यपदार्थांना स्वादिष्ट बनवणारी खमंग फोडणी तयार करताना तापलेल्या तेलात मोहरी तडतडली कि त्यात घातला जाणारा एक महत्वाचा घटक पदार्थ म्हणून आपणा सर्वांनाच सुपरिचित असलेला 'हिंग' इतिहास संशोधकांच्या मते इ.स. पूर्व सहाव्या शतकात, म्हणजे आजपासून सुमारे २६०० वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातून भारतात आला आहे.

'महाभारत' ह्या महाकाव्याची रचना इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात झाल्याचे मानले जाते. ह्या महाकाव्यात त्यातले एक मुख्य पात्र, 'गांधारी' हि गांधार (आताच्या अफगाणिस्तानातील कंदहार प्रांत) देशाची राजकन्या असल्याचा आणि हिंगाचा उल्लेख आलेला आहे. तसेच 'बृहत्रयी' म्हणून ओळखले जाणारे तीन प्राचीन ग्रंथ, जे आयुर्वेदाचा पाया मानले जातात त्या 'चरक संहिता', 'सुश्रुत संहिता' आणि 'अष्टांग हृदय' मध्येही हिंगाचे औषधी गुणधर्म आणि उपचार वर्णिले आहेत. सर्वसाधारणपणे चरक संहिता रचनेचा कालखंड इ.स. पूर्व सातवे शतक ते इ.स. पूर्व पाचवे शतक, सुश्रुत संहिता रचनेचा कालखंड इ.स. पूर्व सहावे शतक ते इ.स. पूर्व पहिले शतक तर वाग्भट लिखित अष्टांग हृदय ग्रंथाचा कालखंड त्यामानाने बराच अलीकडचा म्हणजे इ.स. सातवे शतक असल्याचे मानले जाते. त्यामुळे महाभारत व अन्य प्राचीन हिंदू आणि बौद्ध ग्रंथांमधले उल्लेख व चरक आणि सुश्रुत संहिता रचनेचा कालावधी विचारात घेता इतिहास संशोधकांचे वरील मत बरोबर असावे असे मानण्यास हरकत नाही!

प्राचीन काळापासून भारतीयांना हिंगाचे पाककृतीतील स्वादमुल्य आणि औषधी उपयोग माहिती असल्याने छोटीशी का असेना पण हिंगाची डबी ज्यात नाही, असे शाकाहारी / मिश्राहारी घर भारतात सापडणे तसे अपवादात्मकच! जगात उत्पादित होणाऱ्या एकूण 'शुद्ध' हिंगापैकी सुमारे चाळीस टक्के हिंगाचा वापर एकट्या भारतात होतो पण भारतात हिंगाला एवढी मोठी बाजारपेठ उपलब्ध असली तरी औषधी उपयोग आणि खाण्यालायक हिंग तयार करण्यासाठी कच्चामाल म्हणून आवश्यक असलेल्या 'शुद्ध' स्वरूपातल्या दर्जेदार हिंगाचे उत्पादन आपल्याकडे होत नसल्याने असा शुद्ध स्वरूपातला हिंग आपल्याला मुख्यतः अफगाणिस्तान, इराण, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि काही प्रमाणात कझाकस्तान व तुर्कमेनिस्तान ह्या देशांतून आयात करावा लागतो. सद्यस्थितीत त्यासाठी ९०० ते १००० कोटी रुपये खर्च होत असून हिंगाच्या एकूण आयातीपैकी जवळपास ९२% हिंग अफगाणिस्तानातून आयात केला जातो.

भारतात खाण्यासाठी मागणी असलेल्या हिंगाचे दोन मुख्य प्रकार म्हणजे 'हिंग काबुली सुफैद' (पांढरा हिंग) आणि 'हिंग लाल' (लाल हिंग). काबुली सुफैद हिंग पाण्यात विरघळते, तर हिंग लाल तेलात विरघळते. शुद्ध स्वरूपातले हिंग त्याची तीव्र चव आणि उग्र वासामुळे थेट खाल्ले जात नाही. आपण स्वयंपाकासाठी जे हिंग वापरतो ते 'बांधानी हिंग' (Compounded Asafoetida) म्हणून ओळखले जाणारे हिंग हे शुद्ध स्वरूपातले हिंग नसून, आयात केलेल्या शुद्ध हिंगात गहू किंवा तांदुळाचे पीठ किंवा मैदा असे स्टार्चयुक्त पदार्थ आणि नैसर्गिक डिंक मिसळून ते तयार केले जाते.

'बांधानी हिंग' बनवताना कच्चामाल म्हणून वापरलेल्या शुद्ध हिंगाचा प्रकार (पांढरे किंवा लाल हिंग) आणि मिश्रणासाठी वापरलेल्या अन्य घटक पदार्थांचा प्रकार, दर्जा आणि प्रमाण ह्यावर तयार झालेल्या हिंगाचा रंग, स्वाद आणि किंमत अवलंबून असते.

हिंग निर्मिती प्रक्रिया:
'अफू' आणि 'हिंग' हे दोन्ही वनस्पतीजन्य नैसर्गिक पदार्थ मिळवण्याची पद्धत जवळपास सारखीच आहे. 'पपेव्हर समनीफेरम' (Papaver Somniferum) नावाच्या वनस्पतीपासून जसा अफू (अफिम / Opium) मिळवला जातो जवळपास तशाच पद्धतीने 'फेरुला असाफोटीडा' (Ferula Asafoetida) नामक वनस्पतीपासून हिंग मिळवला जातो.
पपेव्हर समनीफेरम ह्या वनस्पतीच्या बोंडाला छेद दिल्यावर त्यातून स्रवणाऱ्या दुधासारख्या पांढऱ्या चीकापासून (Latex) 'अफू' मिळतो तर फेरुला असाफोटीडा ह्या वनस्पतीचे खोड मुळापाशी कापल्यावर मुळातून स्रवणाऱ्या दुधासारख्या पांढऱ्या चीकापासून (Latex) 'हिंग' मिळते, एवढाच काय तो फरक. आणि विशेष म्हणजे अफू आणि हिंग अशा दोन्ही पदार्थांचे उत्पादन करण्यात जगामध्ये अफगाणिस्तान हा देश अग्रेसर आहे!

फेरुला असाफोटीडा ▼

'फेरुला असाफोटीडा' ही एक ते दीड मीटर (३ ते ५ फूट) उंचीपर्यंत वाढणारी पुष्पवर्गीय आणि बहुवर्षीय अशी रानटी वनस्पती असून तिचे मूळ इराणचे वाळवंट आणि अफगाणिस्तानातल्या डोंगराळ प्रदेशात आहे. फेरुला गटात मोडणाऱ्या पुष्पवर्गीय वनस्पतींच्या २२० प्रजाती असल्या तरी त्यातल्या केवळ तीन प्रजातींपासून चांगल्या प्रतीचा हिंग मिळवला जातो ज्यात फेरुला असाफोटीडाचा क्रमांक सर्वात वरचा आहे. चीन व पाकिस्तानच्या काही भागांत आणि भारतात पंजाब, काश्मीर आणि लडाख मध्ये फेरूलाच्या काही प्रजाती उगवतात पण त्या हिंग बनवण्यासाठी निरुपयोगी असल्याने स्थानिकांद्वारे त्या वनस्पतीच्या पानांचा आणि कोवळ्या कोंबांचा भाजी बनवण्यासाठी उपयोग केला जातो.

थंड पण कोरडे हवामान आणि पुरेसा सूर्यप्रकाश असे ह्या वनस्पतींच्या चांगल्या वाढीसाठी अनुकूल वातावरण असलेल्या मध्य आशियातील अफगाणिस्तान, इराण, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान व किर्गिझस्तान ह्या देशांमध्ये व्यावसायिक पद्धतीने हिंगोत्पादन केले जाते. अर्थात ह्या बहुवर्षीय वनस्पतीपासून हिंग मिळवणे हे सोपे काम नाही, त्यासाठी बरीच अंगमेहनत, संयम आणि कालावधी लागतो.

ह्या वनस्पतीचे मूळ गाजर किंवा मुळ्याप्रमाणे वरती फुगीर असून खाली निमुळते होत गेलेले असते आणि खोड बऱ्यापैकी पोकळ असून त्याच्या वरच्या भागावर बडिशोपेच्या फुलांसारखी पिवळी-पांढरी फुले येतात.
फेरुला असाफोटीडाचे मूळ, खोड, फांद्या, पाने, फुले आणि बिया दर्शवण्यासाठी 'इले जोहान एबरहार्ड' ह्यांनी सतराव्या शतकात रेखाटलेली आणि १८०६ साली'पास जॉन' ह्यांनी त्यात जलरंग भरलेली आकृती ▼

हि वनस्पती चार ते पाच वर्षांची झाल्यावर त्यापासून हिंग मिळायला सुरुवात होते. पूर्ण वाढ झालेल्या वनस्पतीच्या मुळाचा व्यास १२ ते १५ सेंटीमीटर झाल्यावर खोड मुळाजवळ कापले जाते ▼

खोड मुळाच्या शीर्षभागापर्यंत कापल्यावर त्यातून दुधासारखा पांढरा चीक (Latex) स्रवण्यास सुरुवात होते. उन्हापासून ह्या चिकाचे संरक्षण करण्यासाठी त्यावर टोपली सारख्या साधनाचा वापर करून मूळ झाकले जाते. हा चीक थोडा घट्ट झाल्यावर लोखंडी अवजाराने खरवडून गोळा केला जातो. साधारणपणे तीन महिने ह्या मुळांतून चीक स्त्रवत असल्याने ठराविक अंतराने तो गोळा करण्याची क्रियाही तेवढ्या कालावधीत वारंवार करावी लागते. अशाप्रकारे गोळा केल्यानंतर काही दिवस वाळवलेला हा चीक म्हणजेच शुद्ध स्वरूपातले हिंग होय.एका वनस्पतीच्या मुळापासून जवळपास अर्धा किलो उच्च प्रतीचे हिंग मिळते. ▼

हा शुद्ध हिंग भारतात आयात केल्यावर त्यापासून खाण्यायोग्य 'बांधानी हिंग' (Compounded Asafoetida) बनवण्यासाठी त्यात स्टार्चयुक्त पदार्थ आणि गुठळ्या होऊ नयेत म्हणून काही प्रमाणात नैसर्गिक डिंक मिसळून त्याचे मोठ्या आकाराचे खडे तयार केले जातात. स्टार्चयुक्त पदार्थ म्हणून उत्तर भारतात तयार होणाऱ्या हिंगात गव्हाचे पीठ किंवा मैद्याचा तर दक्षिण भारतात तयार होणाऱ्या हिंगात तांदुळाचे पीठ किंवा मैद्याचा त्यासाठी वापर केला जातो. साधारणपणे ३०% शुद्ध हिंगात वरीलपैकी एखादा स्टार्चयुक्त पदार्थ आणि नैसर्गिक डिंक मिसळून तयार होणारे 'बांधानी हिंग' चांगल्या प्रतीचे मानले जाते आणि त्याची किंमतही जास्त असते.
पांढऱ्या किंवा लाल हिंगावर वरील प्रक्रिया झाल्यानंतर तयार झालेले खडे फोडून मग ग्राईंडरवर दळून त्यांचे स्फटिक किंवा पावडर तयार केली जाते जी आपण बाजारातून विकत घेऊन स्वयंपाकासाठी वापरतो ▼

आयात केलेल्या शुद्ध हिंगावर प्रक्रिया करणारे अनेक लघु आणि मध्यम उद्योग व मोठे कारखाने भारतातील अनेक राज्यांत असले तरी उत्तर प्रदेशातील 'हाथरस' जिल्हा हिंगोत्पादनात अग्रणी आहे. तिथे हिंगावर प्रक्रिया करणारे ६० मोठे कारखाने आहेत ज्यांतून १५,००० लोकांना रोजगार मिळतो. इथे तयार होणारा हिंग भारतभर विकला जातो आणि विशेषतः: कुवेत, सौदी अरेबिया आणि बहारीन ह्या देशांना मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो.

।। इति श्री 'हिंग' पुराण प्रथमोध्याय समाप्त।।

तळटीप: 'हिंग' पुराणाच्या ह्या पहिल्या अध्यायात हिंगाचा भारतातील थोडा इतिहास आणि त्याच्या निर्मिती प्रक्रियेबद्दलची काही माहिती आली आहे. पुढच्या दुसऱ्या अध्यायात हिंगाचा (भारतासहीत) आशिया, आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरीकेपर्यंतचा प्रसार आणि वापर तसेच त्याचे काही चमत्कारिक उपयोग आणि तिसऱ्या (अंतिम) अध्यायात हिंगाचे रासायनिक आणि औषधी गुणधर्म, खाण्याव्यतिरिक्त होणारे त्याचे औषधी उपयोग आणि भारत सरकारने 'फेरुला असाफोटीडा' वनस्पतीची देशात लागवड करून स्वदेशी हिंगाचे उत्पादन करण्याच्या दृष्टीने सुरु केलेलया प्रयत्नांबद्दलची माहिती येणार आहे.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

पुढचा भागः
।। 'हिंग' पुराण - अध्याय दुसरा ।।

मांडणीइतिहासलेखमाहिती

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Jul 2023 - 9:32 pm | राजेंद्र मेहेंदळे

अजुन एका माहीतीपूर्ण लेखमालेची सुरुवात. ही मालिका नक्कीच उत्कंठावर्धक होणार यात शंका नाही. वाखुसा.

आणि हो!! मी पयला!!

Bhakti's picture

10 Jul 2023 - 10:32 pm | Bhakti

टर्मीनेटर कमाल लेख लिहिलात.खोडातील चिकापासून हिंग बनतो , आश्चर्यकारक!

किल्लेदार's picture

11 Jul 2023 - 1:42 am | किल्लेदार

सगळ्यात जास्त हिंग अफगाणिस्तानातून येतं एवढंच माहिती होतं. खऱ्या स्रोताची माहिती आत्ता कळली.

आता अफगाणिस्तानला "हिंगुस्तान" म्हणायला काही हरकत नाही.

राजेंद्र मेहेंदळे । भक्ति । किल्लेदार
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@किल्लेदार - अफगाणिस्तान साठी 'हिंगुस्तान' हे पर्यायी नाव आवडले 😀

रीडर's picture

11 Jul 2023 - 4:21 am | रीडर

खमंग लेखमाला

कुमार१'s picture

11 Jul 2023 - 5:18 am | कुमार१

माहीतीपूर्ण व उत्कंठावर्धक लेखमाला !
याचा वास दरवळत राहणार....

कंजूस's picture

11 Jul 2023 - 5:48 am | कंजूस

नवीन बाईपण सिनेमावर काही खुसखुशीत पण हिंगासारखी कडक टीका असावी वाटलं.
पण.... खरंच हिंग पुराण निघालं.
अजून दोन भाग म्हणजे अफगाणिस्तान भटकंती केलेली दिसतेय.

रीडर । कुमार१। कंकाका
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

अजून दोन भाग म्हणजे अफगाणिस्तान भटकंती केलेली दिसतेय.

@कंकाका - अफगाणिस्तानात भटकंती झाली नाहीये अजून, पण नजीकच्या भविष्यात एक धावती भेट दिली जाण्याची शक्यता मात्र आहे!
आणि पुढचा भाग शेवटचा असेल, खरंतर एकाच भागात लेख आवरायचा होता पण लांबी वाढत चालल्याने त्याचे दोन भाग करतोय 😀

चलत मुसाफिर's picture

11 Jul 2023 - 6:13 am | चलत मुसाफिर

हिंग कसे निर्माण होते हा प्रश्न कधीच डोक्यात आला नव्हता. सुंदर व माहितीपूर्ण लेख. मजा आली वाचायला.

रोचक आणि माहितीपूर्ण रंजक लेख.

विषय देखील खमंग.

हिंग हा सर्व बेसिक मसाल्यांतील सर्वाधिक आवडता.

अवांतर: आणखी एक जाणवले. अफगाणिस्तान, इराण, इराक यांबद्दल आपली एक विशिष्ट प्रतिमा असते मनात. वाळवंट, कोरडे रखरखीत. पण तरीही अनेक पदार्थ तिथेच खास किंवा अधिक प्रमाणात उत्पादित होतात. कॉफी (जरी सर्वाधिक उत्पादन हल्ली व्हिएतनाम करत असला तरी), पिस्ते, खजूर, अफू , ऑलिव्ह (चुभुद्याघ्या) आणि आता ही हिंग देखील तिथलीच.

टर्मीनेटर's picture

12 Jul 2023 - 10:47 am | टर्मीनेटर

वाळवंट, कोरडे रखरखीत. पण तरीही अनेक पदार्थ तिथेच खास किंवा अधिक प्रमाणात उत्पादित होतात.

खरं आहे! ह्या देशांना निसर्ग सौन्दर्य बहाल करण्याच्या बाबतीत सृष्टीनिर्मात्याने हात आखडता घेतला असला तरी काही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आणि पदार्थांचे वरदान दिले आहे.

कॉफी (जरी सर्वाधिक उत्पादन हल्ली व्हिएतनाम करत असला तरी), पिस्ते, खजूर, अफू , ऑलिव्ह (चुभुद्याघ्या)

कॉफी, पिस्ते, खजूर, अफू, ऑलिव्ह निर्मितीत आजघडीचे आघाडीचे देश म्हणजे:
कॉफी - ब्राझील, व्हिएतनाम आणि कोलंबिया
कॉफीच्या भारतातील आगमनाची कथा गमतीशीर आहे. १६७० साली 'बाबा बुदान' नावाच्या सुफी संताने मक्केच्या यात्रेहून परतताना येमेन मधून कॉफीच्या सात बिया 'आपल्या दाढीत लपवून' आणल्या (त्याकाळी कॉफीच्या बिया अरबस्तानाच्या बाहेर नेण्यास मज्जाव होता) आणि त्या कर्नाटकातील चिकमंगळुरु येथील टेकडीवर पेरल्या. परंतु इतिहास संशोधकांच्या मते त्याआधीही केरळच्या मलबार प्रांतात कॉफी अस्तित्वात असल्याचे पुरावे आहेत. १६१६ मध्ये जहांगीराच्या दरबारातही कॉफीच्या वापराचे उल्लेख आहेत त्यामुळे भारतात कॉफी आणण्याचे श्रेय ते अरब व्यापाऱ्यांना देतात. पुढे ब्रिटिशांनी भारतात व्यावसायिक स्तरावर कॉफीचे उत्पादन सुरु केले, आता कॉफी उत्पादनात भारत सहाव्या क्रमांकावर आहे.
पिस्ता - अमेरिका, इराण आणि टर्की
खजूर - इजिप्त, सौदी अरेबिया आणि इराण
अफू - अफगाणिस्तान, म्यानमार, कोलंबिया
अधिकृतरीत्या अफू उत्पादनात भारतही आघाडीवर आहे, अर्थात त्याची सुरुवात ब्रिटिशांनी केली. नीमच, मध्यप्रदेश येथे Government Opium and Alkaloid Works हि अफू (opium) बनवणारी/त्यावर प्रक्रिया करणारी जगातली सर्वात मोठी फॅक्टरी आहे जिथे मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात परवानाधारक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अफूवर प्रक्रिया केली जाते. गाझीपूर, उत्तरप्रदेश येथील ह्या कंपनीची दुसरी फॅक्टरी युपी प्रदूषण नियंत्रक मंडळाने २०१७ साली पर्यावरणाशी संबंधित कारणांमुळे बंद केली.
ऑलिव्ह - स्पेन, इटली, ग्रीस

इपित्तर इतिहासकार's picture

13 Jul 2023 - 5:39 pm | इपित्तर इतिहासकार

खरं आहे! ह्या देशांना निसर्ग सौन्दर्य बहाल करण्याच्या बाबतीत सृष्टीनिर्मात्याने हात आखडता घेतला असला तरी

ह्या वक्तव्याशी टोटल असहमत मी तरी. इराण/ अफगाणिस्तान हे निरतिशय सुंदर देश असून अफगाणिस्तान मधील कैक विभाग तर पार काश्मीर अन् गिलगिट ह्यांच्या तोडीचे असल्याचे पाहून मला नवल वाटले होते.
(संदर्भ - डिस्कवरी चॅनल वरील काही डॉक्युमेंटरी)

१६७० साली 'बाबा बुदान' नावाच्या सुफी संताने मक्केच्या यात्रेहून परतताना येमेन मधून कॉफीच्या सात बिया 'आपल्या दाढीत लपवून' आणल्या (त्याकाळी कॉफीच्या बिया अरबस्तानाच्या बाहेर नेण्यास मज्जाव होता)

हाच संदर्भ खरा. (टेकडीला) आता बाबा बुदानगिरी म्हणतात. लागवडी लायक कच्च्या कॉफी बिया आणणारी हस्ती बाबा बुदानच. त्याच्या आधी मुघल दरबार अन् केरळातील कॉफी references हे अरब व्यापाऱ्यांच्या संदर्भात आहेत ते बरोबर आहे पण हे अरब व्यापारी कॉफी पिण्याला इतके चाटावलेले असत की ते भाजलेल्या (रोस्टेड) कॉफी बीन्स घेऊनच फिरत आपापल्या शिध्यांत. तीच त्यांनी आपल्या केरळी अन् मुघल भारतीय यजमानांना पाजली असण्याचा संभव आहे असे वाटते.

त्याहून मोठी गंमत ही की कॉफीचे मूलस्थान हे अरब देश/ सौदी नाही तर इथिओपिया आहे. Ethiopian Highlands मध्ये एकदा एका मेंढपाळ माणसाला कोकरे एका विशिष्ट झाडाचा पाला खाऊन तेज होऊन उड्या मारत असताना दिसले आणि त्याने स्वतः पहिले तर तो पाला उकळून प्यायला. तिथून सुरुवात कॉफीची (हा संदर्भ मला एकदा तपासून घ्यायला हवा पण तो बरोबर असावा असे वाटते आहे. अर्थात लिटर लिटर कॉफी रोज रीचवणाऱ्या अमेरिकेतील नॅशनल कॉफी असोसिएशन ऑफ यू.एस. ए ने सुद्धा कॉफीचे इथिओपियन मूळ मान्य केले आहे).

तुषार काळभोर's picture

11 Jul 2023 - 7:16 am | तुषार काळभोर

मला आतापर्यंत वाटत होतं की बांधानी हिंग म्हणजे एखादा सिंधी उद्योग असेल.

आंद्रे वडापाव's picture

14 Jul 2023 - 9:37 am | आंद्रे वडापाव

मलासुद्धा असेच वाटायचं की 'बंधानी' हे अडवाणी... वासवानी... च्या धर्तीवरील सिंधी आडनाव (ब्रँड) आहे ... कि ज्याची मोनोपॉली आहे हिंग मार्केटवर ...

विवेकपटाईत's picture

11 Jul 2023 - 9:00 am | विवेकपटाईत

गेल्या वर्षी भारताने 829 कोटीचे हिंग आयात केले. शंभर कोटीचे निर्यात. आज लाहौल घाती आणि उत्तराखंड मध्ये उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न होत आहे.

प्रचेतस's picture

11 Jul 2023 - 9:23 am | प्रचेतस

व्वा...!, एकदम चवदार धागा. अगदी साध्या वरणाला देखील चिमूटभर हिंगाशिवाय चव येत नाही. हिंग मात्र वनस्पतीपजन्य आहे हे माहित नव्हते. हे नैसर्गिक खनिज (हिमालयीन मिठासारखे) असावे असाच समज होता.
हरिवंशात हिंगाचा उल्लेख पुढिलप्रमाणे येतो.

पार्श्वानि चान्ये शकलानि तत्र ददु: पशूनां घृतमृक्षितानि।
सामुद्रचूर्णैरवचूर्णितानि चूर्णेन मृष्टेन समारिचेन।।
समूलकैर्दाडिममातुलिंगै: पर्णासहिंग्वापर्द्रकभूस्तृणैश्च।
तदोपदंशै: सुमुखोत्त रैस्तेि पानानि हृष्टा: पपुरप्रमेया:।।

स्वयंपाक्यांनी तयार केलेली पशूंची शुद्ध मांसे व गोड तसेच मीठ इत्यादी पदार्थांची तयार केलेली पक्वान्ने त्यांना वाढली.
पुष्कळ तूप घालून तळलेले पशूंच्या कुशीच्या मांसाचे तुकडे मीठ आणि मिरपूड यात चांगले घोळून त्यांना दिले. मुळ्यासह डाळिंबे, अजबला, हिंग, आले व अळू यांचा त्यांनी आस्वाद घेतला. आनंदित (यादवांनी) सुंदर अशी पेयपात्रे आपल्या मुखास लावून पेय प्राशन केले.

ह्या अध्यायात तत्कालिन मांसाहारी बार्बेक्यूचे अजूनही चविष्ट वर्णन आहे.

चलत मुसाफिर । तुषार काळभोर । विवेकपटाईत । प्रचेतस
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ प्रचेतस
हरिवंशातील हिंगाच्या उल्लेखाची छान माहिती दिलीत...

ह्या अध्यायात तत्कालिन मांसाहारी बार्बेक्यूचे अजूनही चविष्ट वर्णन आहे.

भरताबाहेर काही देशांमध्ये आपण काही पदार्थांवर चाट मसाला शिंपडतो तसे फळांवर आणि बार्बेक्यूवर हिंग शिंपडण्यची पद्धत जुन्या काळापासुन आहे. मला सफरचंद, कलिंगड, अननस अशी फळे मिठ आणि चाट मसाला घालुन खायला आवडतात, आता एकदा त्यांवर (आणि तंदुरी चिकनवर) हिंग शिंपडुन खाउन बघायचंय चव कशी लागते ते 😀

बर्‍याच वडापाव वाल्यांकडे मी पाहिले की आतली भाजी बनवताना ते उकडलेले बटाटे, आले, मिरचि, कोथिंबीर मिक्स करतात. त्याची भाजी नाही बनवत आपण करतो तशी. तशा सारणावर ते हिंग टाकतात विदाऊट फोडणी.

अरे वाह! पुढच्या वेळी घरी बटाटावडा बनवायचा घाट घतला कि हा प्रयोग करुन बघणार!
तसंही आपण घरी पदार्थ बनवताना रेसिपिकडे फार काटेकोरपणे लक्ष देतो, तरी त्यांना बाहेरच्या पदार्थाची चव येतेच असे नाही 😀 त्यामुळे हि क्लुप्ती वापरुन बघयला हरकत नाही.

सौंदाळा's picture

11 Jul 2023 - 10:18 am | सौंदाळा

हिंगपुराण आवडले.
वरणाला चिमुटभर हिंगाशिवाय लज्जत नाही.

ज्येष्ठमध,गुग्गुळ,धूप,अफू/खसखस,गुलाब (तो आता इकडे होतो)

वामन देशमुख's picture

11 Jul 2023 - 11:02 am | वामन देशमुख

हिंगपुराण आवडले.

---

स्वयंपाकातील माझा आवडता घटक म्हणजे हिंग. परवा उत्तराखंडातील धनौल्टी इथून एक हिंग आणला. तो हिंग तेथीलच पहाडांतून गोळा केलाय असा तिथल्या विक्रेत्याचा दावा होता. खरेखोटे देव जाणो, पण त्या हिंगाचा वास अगदी भारी होता. अधूनमधून स्वयंपाकात वापरतो.

---

कुणाचा अवमान करण्याच्या हेतूरहित अवांतर: "बांधणी हिंग म्हणजे शुद्ध हिंगात इतर बंधके मिसळून तयार केलेला विक्रीयोग्य हिंग" हे अनेकांना माहित नाही हे आश्चर्यकारक वाटले.

अनिकेत वैद्य's picture

11 Jul 2023 - 11:08 am | अनिकेत वैद्य

उपवासाच्या पदार्थात हिंग वापरला जात नाही.
ह्यासंबंधी माहिती देताना मुंबई ग्राहक पंचायतीच्या एका कार्यक्रमात असे सांगितले होते कि, 'आपण वापरतो तो 'बांधानी' हिंग असतो. ह्याचा अर्थच बांधलेला, काही पदार्थ वापरून एकत्र केलेला असा हा हिंग आहे. त्यात उपवासाला न चालणारे घटक असतात म्हणून, उपवासाचे पदार्थ करताना हिंगाचा वापर करत नाहीत.'
आज ह्याबद्दल अधिक माहिती मिळाली.

चांदणे संदीप's picture

11 Jul 2023 - 12:32 pm | चांदणे संदीप

हिंगाचा लेख एवढ्या लवकर येईल असे वाटले नव्हते. :)
पुढील हिंगाच्या... आय मीन लेखाच्या प्रतिक्षेत.

सं - दी - प

यश राज's picture

11 Jul 2023 - 12:41 pm | यश राज

हिंग कसा बनतो याची जिज्ञासा होतीच. शंका निरसन झाले.
अप्रतिम लेख.

थोडेसे अवांतर: प्रतापगड(राजस्थान) मधून माझी आई बऱ्याचदा हिंग मागवते. हा हिंग अगदी द्रवसर असतो म्हणजेच बांधनी नसतो. या हिंगाचा खूप घमघमाट सुटतो. आई मग २ चमचे धण्याच्या पूड मध्ये अगदी चिमटीत मावेल एवढा हिंग मिसळून टाकते व डबीत भरून ठेवते.आणि मग ती हिंगाची धने पावडर बंधनी हिंगा प्रमाणे फोडणीत वापरते..
स्वादच स्वाद हिंगाचा.

आनन्दा's picture

11 Jul 2023 - 1:06 pm | आनन्दा

कुठून मागवता याची माहिती मिळेल का?
थोडा try करून बघावा म्हणतो.

यश राज's picture

12 Jul 2023 - 11:10 pm | यश राज

माझी एक मावस बहीण राजस्थानात राहते. तिच्या करवी आई हिंग मागवते. मी माहिती करून तुम्हाला कळवतो.

गवि's picture

11 Jul 2023 - 1:12 pm | गवि

रोचक.

उत्सुकता म्हणून शोधू जाता हे सापडले. राजस्थान प्रॉडक्ट दिसतेय.

https://www.amazon.in/jai-jinendra-Asafoetida-Natural-Namkeen/dp/B07HVSTYSC

टर्मीनेटर's picture

12 Jul 2023 - 1:04 pm | टर्मीनेटर

सौंदाळा । वामन देशमुख । अनिकेत वैद्य । चांदणे संदीप । यश राज
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ यश राज

प्रतापगड(राजस्थान) मधून माझी आई बऱ्याचदा हिंग मागवते. हा हिंग अगदी द्रवसर असतो म्हणजेच बांधनी नसतो. या हिंगाचा खूप घमघमाट सुटतो.

शुद्ध स्वरूपातल्या हिंगाचा वास खूप उग्र असल्याने स्वयंपाकासाठी वापरताना त्याचे प्रमाण ठरवणे अवघड असते. त्यावर सोयीस्कर उपाय म्हणून 'बांधानी हिंग' हा प्रकार अस्तित्वात आला. गुजरात, राजस्थान अशा राज्यांमध्ये घाऊक प्रमाणात जेवण बनवणारे आचारी (महाराज) लोकं बांधानी हिंगापेक्षा शेंगदाणा किंवा ऑलिव्ह अशा दिर्घकाळ टिकणाऱ्या तेलात विरघळवलेल्या लाल हिंगाचा वापर करण्यास प्राधान्य देतात. तुमची आई मागवते ते अशाप्रकारचे हिंग असावे अर्थात त्यात शुद्ध हिंगाचे प्रमाण बांधानी हिंगापेक्षा खूप जास्त असल्याने त्याचा वास सौम्य करण्यासाठी त्यात धन्याची पूड मिसळावी लागणे सहाजिक आहे.

शुद्ध हिंग, बांधानी हिंग (पावडर, क्रिस्टल आणि खडा), तेलात मिसळलेला द्रवरूप हिंग आणि इसेन्शिअल ऑइल अशा अनेक स्वरूपातला हिंग बाजरात मिळतो आणि त्याचा वापर स्वयंपाकासाठी आणि बांधानी व तेलमिश्रित सोडून अन्य प्रकारांचा औषध निर्मितीसाठी केला जातो तर खड्या बांधानी हिंगाचा वापर घाऊक प्रमाणात घरगुती आणि व्यावसायिक स्तरावर विविध मसाले तयार करण्यासाठी केला जातो. पण बांधानी हिंग घरगुती वापरासाठी सर्वात सोयीस्कर प्रकार असल्याने त्याला बाजारात प्रचंड मागणी आहे.

मुक्त विहारि's picture

11 Jul 2023 - 6:07 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

बांबू लागवडी नंतरची, हिंग लागवड, ही पण ह्या केंद्र सरकारची उत्तम योजना आहे ...

जितकी आयात कमी, तितके आर्थिक स्थैर्य जास्त ...

चित्रगुप्त's picture

11 Jul 2023 - 8:50 pm | चित्रगुप्त

छान माहितीपूर्ण लेख.

अवांतरः
हल्ली ज्याला अफगाणिस्थान म्हटले जाते, तो प्रदेश पूर्वी मौर्य साम्राज्याचा भाग होता, त्यापूर्वीचाही पुष्कळ इतिहास असणारच.

.

प्रचेतस's picture

11 Jul 2023 - 9:09 pm | प्रचेतस

हल्ली ज्याला अफगाणिस्थान म्हटले जाते, तो प्रदेश पूर्वी मौर्य साम्राज्याचा भाग होता,

भाग होता ह्याचा अर्थ म्हणजे चंद्रगुप्त मौर्याने तो भाग जिंकला होता, वास्तविक हा पूर्वापार चालत आलेल्या विविध भटक्या टोळ्यांनी भरलेला प्रदेश, ह्यावर दीर्घकाळपर्यन्त कोणत्याच राजाचे स्वामित्व राहिले नाही. चंद्रगुप्त ते अशोकापर्यन्त हा भाग मौर्यांच्या वर्चस्वाखाली राहिला मात्र नंतर पुन्हा इथे टोळ्यांचे राज्य सुरू झाले. महाभारतात कर्णपर्वात ह्या भागात राहणाऱ्या लोकांची कर्णाने भयंकर निंदा केली आहे, मद्र, वाहिक, बाल्हिक इत्यादी प्रांतांची कर्ण अत्यंत निर्भत्सना करतो. कर्ण-शल्य संवादाचे हे वर्णन मूळातूनच वाचण्यासारखे आहे.

मुक्त विहारि। चित्रगुप्त । कर्नलतपस्वी
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ चित्रगुप्त

तो प्रदेश पूर्वी मौर्य साम्राज्याचा भाग होता

हो... २००१ साली तालिबानचा माथेफिरू संस्थापक मुल्ला ओमर ह्याच्या आदेशावरून उध्वस्त करण्यात आलेल्या बामियानच्या, सहाव्या आणि सातव्या शतकात कोरलेल्या दोन भव्य प्राचीन बुद्धमूर्तींवर असलेला गुप्त कला शैलीचा प्रभाव हा त्याचा सबळ पुरावा मानता येईल. नवव्या शतकापर्यंत बौद्ध धर्मियांचे महत्वाचे धार्मिकस्थळ म्हणून ओळख असलेल्या ह्या प्रदेशावर पुढे झालेल्या इस्लामिक आक्रमणांनंतर दहाव्या शतकापर्यंत परिस्थिती पूर्ण बदलली.
वर प्रचेतस ह्यांनी म्हंटल्या प्रमाणे विविध भटक्या टोळ्यांनी भरलेल्या ह्या प्रदेशात पूर्वीही कधीच एकसंधता नव्हती आणि आता हजार वर्षांहून अधिक काळ इस्लामच्या झेंड्याखाली असला तरी ह्या प्रदेशातल्या टोळ्यांमधील वांशिक मतभेदांमुळे एक देश म्हणून अजूनही त्यांच्यात एकसंधता आलेली नाही.
असो, आता पुन्हा तो देश तालिबान्यांच्या हातात गेला आहे, त्यांच्या कुठल्या माथेफिरु नेत्याने भारताची पंचईत करण्यासाठी हिंगाच्या शेतांना आगी नाही लावल्या म्हणजे मिळवले 😀

चित्रगुप्त's picture

11 Jul 2023 - 10:03 pm | चित्रगुप्त

कर्ण-शल्य संवादाचे हे वर्णन मूळातूनच वाचण्यासारखे आहे.

महाभारताचे सगळे खंड घेऊन वाचायचे आजवर राहून गेले, आणि आता कितपत जमेल याची शंकाच आहे. जालावर मराठी वा हिंदीत ते उपलब्ध असल्यास कुठे आहे ? आणि कर्ण-शल्य संवाद त्यात कुठे आहे ?

प्रचेतस's picture

12 Jul 2023 - 6:18 am | प्रचेतस

सुरुवातीला सत्संगधारा संस्थळावर मराठी pdf च्या लिंक्स उपलब्ध होत्या असे स्मरते ओण आता दिसत नाहीत, मात्र sanskrit documentsवर महाभारताच्या विविध प्रती संस्कृत मधून उपलब्ध आहेत ते इंग्रजी अनुवाद sacred-texts वर उपलब्ध आहे, मराठी अनुवाद मात्र कुठे दिसत नाही, ग्रंथ विकत घेऊन वाचणेच श्रेयस्कर कारण हा महाग्रंथ जालावर मराठीत मिळाला तरी तो स्क्रीनवर वाचणे कठीणच.

कर्ण -शल्य संवाद कर्णपर्वाच्या सुरुवातीला, जेव्हा कर्ण शल्याची सारथी म्हणून नियुक्ती करतो तेव्हा येतो

चित्रगुप्त's picture

12 Jul 2023 - 6:02 pm | चित्रगुप्त

अनेक आभार प्रचेतस.
हिंदीत 'महासमर' या नावाने श्री. नरेन्द्र कोहली यांचा नऊ खंडातील ग्रंथ वाचनीय आहे.
https://amzn.eu/d/5b9BPLH

कर्नलतपस्वी's picture

12 Jul 2023 - 6:18 am | कर्नलतपस्वी

लेख मस्त.

पुरातन कालात अफगाणिस्तानातील हिंग महाराष्ट्र तील हिंगणघाटातून येवून हिंगोलीत जमा होत असे काही ऐकल्या सारखे....... हल्ली कान वाजतात.

सुखी's picture

12 Jul 2023 - 9:37 pm | सुखी

मस्त ओळख करून दिलीत

भरताबाहेर काही देशांमध्ये आपण काही पदार्थांवर चाट मसाला शिंपडतो तसे फळांवर आणि बार्बेक्यूवर हिंग शिंपडण्यची पद्धत जुन्या काळापासुन आहे.
हे पहिल्यांदाच ऐकले
BBQ "रब" साठी मसाले वापरतात पण त्यात काली मिरी किंवा चिनी मिरी असते, जिऱ्याची पूड असते कधी, पण हिंग नाही ऐकले
कोणत्या देशात?

सुखी | चौकस२१२
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

'सॉंग्स ऑफ ब्लड अँड स्वॉर्ड' हे फातिमा भुत्तो लिखित पुस्तक पाच-सहा वर्षांपूर्वी वाचनात आले होते. त्यांचे पिता, 'मुर्तझा भुत्तो' ह्यांची हत्या घडवून आणण्यात मुर्तझा भुत्तो ह्यांचीच सक्खी बहीण 'बेनझीर भुत्तो' आणि तिचे पती असिफ अली झरदारी ह्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप ह्या पुस्तकातून त्यांनी केला होता.
त्या पुस्तकात त्यांनी आपल्या पित्याबरोबर बैरुत आणि दमास्कस मध्ये घालवलेल्या काळाचे फार छान वर्णन केले होते, ज्यात बैरुत येथे सहलीला गेल्यावर तिथे मुर्तझा भुत्तो ह्यांनी बनवलेल्या 'बार्बेक्यू'चा उल्लेख वाचला आणि कुतूहल चाळवले म्हणून लेबनीज, सिरियन खाद्यसंस्कृती जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर शोध घेतला असता लेबनॉन, सीरिया आणि जॉर्डनमधल्या पारंपरिक खाद्यपदार्थांची माहिती असलेली एक PDF सापडली होती. त्यात भाजलेल्या मांसाचा (बार्बेक्यू) स्वाद वृद्धिंगत करण्यासाठी त्यावर हिंगाचा शिडकावा केला जात असल्याचे वाचले होते.

रोमन साम्राज्यात प्रतिष्ठा लाभलेल्या हिंगाचा वापर युरोपातही अशाप्रकारे होत होता, पण ते कोसळल्यानंतर सोळाव्या शतकापर्यंत युरोपात हिंगाचा वापर जवळजवळ बंदच झाला. (त्याविषयी थोडी महिती पुढच्या भागात येइल.)

धर्मराजमुटके's picture

13 Jul 2023 - 9:13 am | धर्मराजमुटके

छान ! हिंगपुराण आवडले.
अवांतर : "तुला कोणी हिंग लावूनही विचारणार नाही" या म्हणीचा उगम काय असावा बरे ?

"तुला कोणी हिंग लावूनही विचारणार नाही" या म्हणीचा उगम काय असावा बरे ?

नक्की माहिती नाही, पण तर्काधारे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो!
हिंगाचा वापर एखाद्या पदार्थाचे (स्वाद/रुची ह्या अर्थाने) मूल्यवर्धन करण्यासाठी होतो. वर प्रचेतस ह्यांनी म्हंटले आहे कि, "अगदी साध्या वरणाला देखील चिमूटभर हिंगाशिवाय चव येत नाही." त्याला सौंदाळा ह्यांनी दिलेला दुजोरा आणि व्यक्तिगत अनुभव त्या बाबतीतली हिंगाची महती स्पष्ट करतात. साध्या (गोडं) वरणाला खरंतर काहीच चव नसते पण डाळ शिजवताना त्यात चिमूटभर हिंग घातल्यावर तिचा स्वाद/चव एकदम बदलून ते देखील चविष्ट लागते. थोडक्यात एखाद्या बेचव पदार्थात हिंग घातले कि त्याचे स्वाद/रुचीमुल्य वृद्धिंगत होऊन तो पदार्थ चवदार होतो.

"एखादी व्यक्ती/पदार्थ इतकी उपयोगशून्य/बेचव आहे कि तिला/तिच्यात हिंग लावून/घालूनही तिची उपयुक्तता/चव वाढणार नाही, ती किंमतशून्यच राहणार" अशा काहीशा अर्थाने हि म्हण वापरली जात असावी असे मला वाटते. बाकी तज्ज्ञांनी त्यावर अधिक प्रकाश टाकावा हि विनंती!

कुमार१'s picture

14 Jul 2023 - 10:38 am | कुमार१

हिंग लावून विचारणें-मानणें-मोजणें-(नकारार्थी प्रयोग)
=
मानणें; आदर देणें; महत्त्व देणें (हिंग महाग असल्यानें महत्त्वाच्या पदार्थांतच वापरतात, यावरून).

आलो आलो's picture

13 Jul 2023 - 3:00 pm | आलो आलो

अगदीच हिंगाळून काढलाय लेख .
बाकी प्रतिक्रिया सुद्धा काही कमी रोचक नाहीत हो .... मस्त मस्त मस्त.
मिपा वर खूपच तज्ञ आणि अभ्यासू लोक असल्याची ग्वाही मिळते वेळोवेळी.
धन्यवाद टर्मिनेटर भाऊ अत्यंत अभ्यासू असा लेख तोही काहीशा दुर्लक्षित मात्र तरीही पाहिजेच अशा पदार्थावर लिहिलात.
दू भा प्र

बाकी प्रतिक्रिया सुद्धा काही कमी रोचक नाहीत हो .... मस्त मस्त मस्त.
मिपा वर खूपच तज्ञ आणि अभ्यासू लोक असल्याची ग्वाही मिळते वेळोवेळी.

अगदी...अगदी...
कित्येकदा मुळ धग्यातील माहितीपेक्षा अधिक चांगली आणि परिपुर्ण माहिती ही तज्ञ, अभ्यासू, व्यासंगी मिपाकरांच्या प्रतिसादांतुन मिळते असा माझाही अनुभव आहे!

इपित्तर इतिहासकार's picture

13 Jul 2023 - 5:26 pm | इपित्तर इतिहासकार

उत्तम हिंग परामर्श घेतलेला आहे पूर्ण लेखात. माझ्या माहितीत तरी फक्त तांदूळ पिठी मिसळून हिंग कंपौंड केला जातो असे वाचीव आठवते.

नैसर्गिक डिंक मिसळून ते तयार केले जाते.

हा नैसर्गिक डिंक मात्र गुवार गम/ गवार गम/ गवारीच्या शेंगा पासून मिळणारा चिकट डिंक असतो. कमोडिटी मार्केट मध्ये एक अतिशय रोबस्टली ट्रेडिंग होणारी कमोडिटी म्हणजे हा गम होय.

खाद्यपदार्थात चिकटपणा लागतो तिथे, जिथे पदार्थ "स्लरी" करून वापरायचे असतात तिथे कैक पदार्थांत गवार गम वापरला जातो, शिवाय त्याचे कैक इंडस्ट्रिअल युज पण असतात असे ऐकून आहे.

गुवार गम/ गवार गम बद्दलची माहिती रोचक आहे!
चांगल्या प्रतिचा कंपाउंडेड असफोटिडा बनवताना 'गम अरेबिक' (बाभळीचा डिंक) वापरतात असे ऐकुन्/वाचुन आहे. पण जसे लेखात म्हंटले आहे कि,

'बांधानी हिंग' बनवताना कच्चामाल म्हणून वापरलेल्या शुद्ध हिंगाचा प्रकार (पांढरे किंवा लाल हिंग) आणि मिश्रणासाठी वापरलेल्या अन्य घटक पदार्थांचा प्रकार, दर्जा आणि प्रमाण ह्यावर तयार झालेल्या हिंगाचा रंग, स्वाद आणि किंमत अवलंबून असते.

त्याप्रमाणे कॉस्ट कटिंग च्या उद्देशाने स्वस्त हिंग तयार करण्यासाठी ह्या 'गुवार गम/ गवार गम'चा वापर होत असण्याची शक्यता नाकरता येत नाही.

मुक्त विहारि's picture

14 Jul 2023 - 7:35 pm | मुक्त विहारि

नैसर्गिक तेल आणि वायु उत्खनन करतांना वापरतात...

इपित्तर इतिहासकार's picture

13 Jul 2023 - 5:45 pm | इपित्तर इतिहासकार

आणि अतिशय अभ्यासू प्रतिसाद मांदियाळी वाचून आनंद झाला.

ह्या निमित्ताने एक जबरी भारी लेखमाला सुरू करता येईल. त्या मध्ये आपण जर पोर्तुगीज ग्रेट एक्सचेंज घेतला तर अक्षरशः एक पूर्ण विशेषांक होईल इतके लेख पडतील.

पोर्तुगीज ग्रेट एक्सचेंज मुळे सकारात्मक पाहता कैक देशांतील भूकबळी कमी झालेत अन् नकारात्मक पाहता कैक देशातील एतद्देशी वाणे नष्ट झाल्याचे पण उदाहरणे आहेत.

Bhakti's picture

13 Jul 2023 - 10:02 pm | Bhakti

+१११

@ इपित्तर इतिहासकार,
ग्रेट एक्सचेंज विषयीची कल्पना फारच आवडली आहे!
गंमत म्हणजे तळटिपेत लिहिलेल्या 'भारता बाहेरील हिंगाचे काही चमत्कारिक उपयोग' ह्याविषयी पुढ्च्या भागात येणऱ्या ब्राझिल मध्ये हिंग कसा पोचला असाव ह्याचा विचार करताना त्यामागे हे पोर्तुगिज कनेक्शन असावे ह्याच निष्कर्षाप्रत मी आलो असल्याचे लिहिले आहे 😀 अर्थात तो केवळ माझा तर्क असून त्याला कुठलाही अधिकृत संदर्भ नाही.

असो, 'द ग्रेट एक्सचेंज'चे तीन पैलु आहेत - वनस्पती, प्राणी आणि रोग/आजार. ह्यापैकि हवा तो पैलु निवडुन आपण स्वयंस्फुर्तिने त्यावर लेख लिहुन सप्टेंबर मध्ये प्रकाशित होणऱ्या 'गणेश लेख मालिकेसाठी' पाठवु शकतो कि! तसंही गलेमा साठी थीम वगैरे नसते, आणि गणपती १९ सप्टेंबरला आहेत त्यामुळे जवळपास दोन महिने आपल्या हातात आहेत लेखन करण्यासाठी. पहिल्या दोन पैलुंवर आपण लिहिले आणि तिसऱ्या रोग्/आजाराच्या पैलुवर मिपावरच्या सन्माननिय डॉक्टर मंडळींनी लिहिले तर खरंच छान विशेषांक होउ शकेल ह्या विषयावर 👍

अथांग आकाश's picture

14 Jul 2023 - 12:39 pm | अथांग आकाश

खमंग हिंग पुराण आवडले! प्रतिसादही मस्त आहेत!!
0

चामुंडराय's picture

14 Jul 2023 - 4:35 pm | चामुंडराय

छान आणि माहितीपूर्ण लेख.

भारतीय अन्न आवडणाऱ्या आणि स्वतः घरी विविध पदार्थ करणाऱ्या माझ्या एका सहकाऱ्याला मी हिंगाबद्दल माहिती दिली. तेव्हा तो एका भारतीय ग्रोसरी स्टोअर मध्ये गेला आणि तेथील एकाला म्हणाला,
आय ऍम लुकिंग फॉर हिंग.
हिंग ??? हा हिंग म्हणतोय हे ऐकून त्या ग्रोसरीवाल्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले
डू यू नो व्हॉट हिंग इज?
येस, असाफेह्टीडा.

मग त्याचे हिंगावर विविध प्रयोग सुरू झाले. परंतु त्याने एक तक्रार केली. हिंगाची डबी पँन्ट्रीत ठेवली आणि पँन्ट्रीचा दरवाजा उघडला तर एकदम भपकन हिंगाचा तीव्र वास यायचा आणि सगळ्या स्वयंपाक घरात पसरायचा. तेव्हा त्याने हिंगाची डबी झिप्लॉक पिशवीत आणि हवाबंद डब्यात ठेवली व जेव्हा पाहिजे तेव्हाच उघडायला लागला.

मी त्याला म्हणालो आम्हाला लहानपणापासून सवय असते त्यामुळे असा तीव्र वास येत नाही आणि ह्या (बांधानी) हिंगात इतर पदार्थ मिसळून त्याची तीव्र चव आणि वास कमी करतात. शुद्ध स्वरूपातील हिंगाची तीव्रता खूप जास्त असते.

इति हिंगपुराणोध्यायः समाप्तम्

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2023 - 9:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हिंग' पुराण आवडलं.

-दिलीप बिरुटे

अभय भावे's picture

16 Jul 2023 - 10:35 pm | अभय भावे

ही लिंक मी शेअर करत आहे. हिंग कसा बनतो ते पाहा.
https://youtu.be/kryfK7vc-H4

अथांग आकाश। चामुंडराय । प्रा.डॉ.दिलीप बिरुटे । अभय भावे
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ चामुंडराय,
भारी किस्सा! हिंगाची डबी नीट बंद न करता फ्रिजमध्ये ठेवली तर त्यातले अन्य पदार्थ (जे शिजवताना हिंग वापरला जात नाही असे) खाण्यालायक राहात नाहीत हा अनुभव घेतल्याने तुमच्या सहकाऱ्याच्या किस्स्याशी चांगला रिलेट झालो 😀

@ अभय भावे,
२९:४५ मिनिटांचा व्हिडीओ आहे, फुरसत मध्ये बघतो 👍

कपिलमुनी's picture

17 Jul 2023 - 11:54 pm | कपिलमुनी

एवढ्या चर्चेत एक हिंग कविता राहिली आहे.

कोणीतरी हिंगा

टर्मीनेटर's picture

18 Jul 2023 - 12:05 am | टर्मीनेटर

अशी कविताही आहे?
अर्थात असेलही! कवितांशी काही प्रकाशवर्षांचे अंतर राखुन असल्याने मलातरी त्याबद्दल माहिती असणे शक्य नाही 😀
जाणकारांनी 'त्या' विषयी अवश्य प्रतिसादावे!

सौंदाळा's picture

18 Jul 2023 - 6:08 pm | सौंदाळा

कविता माहिती नाही पण 'हिंग लावून विचारणे/ न विचारणे' या वाक्प्रचाराचा उगम कसा झाला असेल?

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Aug 2023 - 8:28 pm | राजेंद्र मेहेंदळे

कोणी हिंगा, कोणी रंगा, पण पुलं शी नका घेउ पंगा!!
अशी पाखरे येती, चाळीमध्ये बटाट्याच्या
या चिमण्यांनो परत फिरा रे, साद देती हिमशिखरांच्या
फुलराणी मग नाजुक हसते, तांदूळ निवडता निवडता
आणि अंमलदार वटारुन डोळे, काठी घेई अंगा
कोणी हिंगा, कोणी रंगा, पण पुलं शी नका घेउ पंगा!!

ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न वरती एका प्रतिसादात केला आहे.
त्यावरच्या उप-प्रतिसादात कुमार१ साहेबांनी एक संदर्भही दिला आहे!

Nitin Palkar's picture

26 Jul 2023 - 7:22 pm | Nitin Palkar

अतिशय माहितीपूर्ण लेख .. नेहमीप्रमाणेच. आता लगेच दूसरा अध्याय वाचतो.

स्वराजित's picture

2 Aug 2023 - 3:39 pm | स्वराजित

हिंग' पुराण लेख खुप आवडला.

फारच छान, विस्तृत आणि योग्य शास्त्रीय माहिती मस्तच..

Nitin Palkar | स्वराजित | निमी
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ राजेंद्र मेहेंदळे

कोणी हिंगा, कोणी रंगा, पण पुलं शी नका घेउ पंगा!!
अशी पाखरे येती, चाळीमध्ये बटाट्याच्या...

हे अद्भुत काव्य स्वरचीत म्हणायचं का चोप्य पस्ते 😀

१)गांधार प्रांताची आजच आठवण झाली. अशोकाचे राज्य गांधार ते उत्कल,कलिंग (ओडिशा).

२)मुलींना तिसरी नंतर शाळा बंद हा कालच फतवा निघाला आहे.
३) इराण ( पर्शिया)सहल शक्य आहे. ती करा. कारण राजकीय घडामोडींमुळे इराणच्याच लोकांना इराण पाहता आला नव्हता . फळांचा देश,केशर,पुलाव,बागेचे कलाकार -जन्नत के चारबाग.

४)तसेच चीनच्या कम्युनिस्ट सरकारमुळे चिनी लोकांना चीन माहीत नव्हता.

ह्या लेख मालिकेची सुरुवातच ज्यांच्या एका जाहिरातीने केली होती ते सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे ह्यांचे आज दुःखद निधन झाले आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो 🙏

चौकस२१२'s picture

16 Oct 2024 - 10:18 am | चौकस२१२

अतुल परचुरे यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व
आणि त्याचे महत्व

या वरून आठवले ते आभाळमाया नामक गाजलेल्या मालिकेतील कलाकारांच्या मुलखाती चा हा कार्यक्रम बघ त्यात संजय मोने यांनी भाषा समजणे यावर म्होरून जाणे यावर एक किस्सा सांगितलला आहे
https://www.youtube.com/watch?v=OjwiBHP6ECg

टीपीके's picture

16 Oct 2024 - 1:07 pm | टीपीके

कितव्या मिनिटाला?

टर्मीनेटर's picture

17 Oct 2024 - 8:55 am | टर्मीनेटर

संपुर्ण व्हिडिओ छान आहे. पण फक्त उपरोल्लिखित प्रसंग बघायचा असल्यास ३५:१८ पासून बघा...
छोटासाच पण भारी किस्सा आहे.

टीपीके's picture

17 Oct 2024 - 4:33 pm | टीपीके

धन्यवाद
छान :)

टर्मीनेटर's picture

17 Oct 2024 - 9:27 am | टर्मीनेटर

मस्त व्हिडीओ आहे!
वास्तविक नाटक, दूरचित्रवाणी मालिका बघण्याचा मला अजिबात शौक नाही (उलट तिटकाराच आहे 😀) त्यामुळे 'आभाळमाया' ह्या मालिकेचा एकही एपिसोड मी कधीही बघितलेला नसला, आणि ह्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांपैकी चित्रपट माध्यमामूळे परिचित झालेल्या सुकन्या कुलकर्णी, संजय मोने आणि मनोज जोशी ह्या तीन दिग्गज कलाकारांव्यतिरिक्त कोणालाही नावाने किंवा त्यांच्या कामामुळे ओळखत नसलो तरी काल रात्री संपूर्ण व्हिडीओ पाहिला आणि तो आवडला 👍

'म्होरून' वाला किस्सा भारीच!

तसेच 'चांदनी बार', 'कॉर्पोरेट', 'एक चालीस कि लास्ट ट्रेन' वगैरे चित्रपटांतील भूमिकांमुळे परिचित झालेल्या परंतु,
"प्रभाकर्ण श्रीपेरवर्धना अटापट्टू जयसूर्या लक्ष्मण शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखर श्रीनिवासन त्रिचीपल्ली येक्य परमपील पेरंबदूर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर"
असे छोटेसे 'पेट नेम' असणाऱ्या व्यक्तीच्या 'धमाल' चित्रपटातील आपल्या अगदी लहानशा (उण्यापुऱ्या २ मिनिटांच्या) धमाल भूमिकेमूळे कायमस्वरूपी स्मरणात राहिलेल्या कै. विनय आपटे ह्या दिग्गज कलावंत/दिग्दर्शका विषयीचे किस्सेही खूप आवडले!

एका चांगल्या व्हिडीओच्या लिंकसाठी धन्यवाद 🙏