सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ८: कलबुर्गी- मन्नेखेली (९६ किमी)

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
16 Mar 2023 - 2:02 pm

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ४: बेळगांव ते लोकापूर (१०८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ५: लोकापूर- बागलकोट- कोल्हार (७१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ७: सिंदगी- गाणगापूर- कलबुर्गी (९० किमी)

✪ डोंगराळ प्रदेशातून राईड
✪ सायकल आणि निसर्गाची सततची साथ
✪ शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत भेट
✪ शिक्षकांचा उत्साह
✪ ७ दिवसांमध्ये ६३३ किमी पूर्ण

३० सप्टेंबरची सकाळ, मोहीमेचा सातवा दिवस! काल रात्री कलबुर्गीमध्ये पाऊस पडला. पण रोजच्याप्रमाणे सकाळी हवामान छान आहे. कलबुर्गीतले काही सायकलिस्ट मी निघताना सकाळी भेटतील, असं मला सांगितलं गेलं होतं. त्यांच्यासाठी काही मिनिटे थांबलो. पण ते आले नाहीत. त्याऐवजी मला एक दुसरा सायकलवाला भेटला, त्याच्याशी थोडं बोललो, गावातून बाहेर पडण्याचा रस्ता त्याला विचारला आणि निघालो. ह्या सायकल मोहीमेच्या सगळ्या संस्था- मंडळींच्या ग्रूपवर माझं लाईव्ह लोकेशन शेअर केलं आणि निघालो. आज माझा कर्नाटकातला शेवटचा मुक्काम मनेहळ्ळी गावात असेल.

(सर्व लेख फोटोंसह इथे वाचता येतील: http://niranjan-vichar.blogspot.com/2023/03/cycling-in-4-states-on-singl... त्याशिवाय ब्लॉगवर ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील.)


.

कधी कधी सकाळच्या वेळी पाय थोडा दुखतो. पण राईड सुरू केल्यानंतर हलका होऊन जातो. हळु हळु कलबुर्गी शहरातून बाहेर आलो. रस्ता फारच मस्त आहे. ह्या पूर्ण प्रवासामध्ये रस्ते फार चांगले मिळाले. काही अंतरानंतर छोटा घाट लागला. त्याने मला स्पीतितल्या माझ्या राईडची आठवण करून दिली! हा रस्ता हुमनाबादमार्गे हैद्राबादला जातो. वाटेत मी काल ज्यांना भेटलो होतो, त्या श्री बसवराजजींच्या नावे असलेला एक पेट्रोल पंपही दिसला. सायकल चालवत असताना कधी कधी तर विश्वास बसत नाहीय की, हा चक्क सातवा दिवस आहे आणि मी ६५० किमीपेक्षा जास्त अंतर पुढे आलो आहे! सायकलीने व निसर्गाने मला किती साथ दिली आहे! मी कुठून व कसा प्रवास करून आलोय हे लोकांना सांगणंही आता कठीण जातंय.

आजच्या राईडमध्ये थोडा डोंगराळ भाग असल्यामुळे किंचित कमी वेग येतो आहे. पण काहीच अडचण नाही. रोजच्यासारखे दोन ब्रेक्स घेतले. दुसरा ब्रेक हुमनाबादमध्ये हायवेवर घेतला. कर्नाटकची सीमा जवळ येतेय. मी आता कल्याण कर्नाटक सोडून पूर्वीच्या हैद्राबाद संस्थानाच्या दिशेने जातोय. दुकानांची नावं आणि स्थानिक बोलीमध्येही फरक जाणवतोय. थोडासा महाराष्ट्राचा प्रभावही दिसतोय. लोकांच्या बोलण्यात नाही साठी "नको" शब्द येतोय. मन्नेखेलीला वेळेवर पोहचलो आणि शाळेतले शिक्षक श्री प्रभुराव जींना भेटलो. थेट आधी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना भेटलो. माझा प्रवास, त्याची कल्पना व अनुभव त्यांच्यासोबत शेअर केले. मानसिक व शारीरिक फिटनेसबद्दलही बोललो. शाळेतल्या शिक्षकांनीही त्याचं अधिक स्पष्टीकरण करून त्यांना सांगितलं. विद्यार्थ्यांनी मस्त प्रश्न विचारले आणि नंतर माझी सायकलही बघितली.


.

हे सगळं झाल्यावर शिक्षक प्रभुरावजींना माझ्या मुक्कामाबद्दल विचारलं. सुरुवातीला ते मला मंदिरात मुक्काम कर म्हणून सांगत होते, त्यामुळे तिकडे गेलो. पण तिथे पुरेशी व्यवस्था नव्हती. त्यामुळे परत हॉटेल बघितले, पण हायवेवरचं गाव असल्यामुळे जास्त बारच होते. शेवटी त्यांनी मला सांगितलं की, शाळेतही मुक्काम करता येईल आणि आज नंतर वर्गही नाही आहेत. तेही माझ्यासोबत शाळेतच मुक्काम करतील. मग परत शाळेपर्यंत सायकल चालवली. दुपारी रोडवर एका हॉटेलात जेवलो. गंमत म्हणजे ह्या छोट्या गावामध्ये एक ध्यान केंद्रही दिसलं!

संध्याकाळी शिक्षकांसोबत थोडं बोलणं झालं. त्यांनी मला सांगितलं की, गावामध्ये एक सण सुरू असल्यामुळे त्यांना माझ्या अनुभव कथनाचा कार्यक्रम ठेवता येत नाहीय. पण ते बोलले की, अशा छोट्या गावामध्ये मुलांना असा अनुभव काही नेहमी देता येत नाही, त्यामुळे असा कार्यक्रम ठेवता आला असता तर चांगलं झालं असतं. त्यांचं बोलणं ऐकून सायकलिंग करत असल्याचं एका अर्थाने सार्थक झाल्यासारखं वाटलं. रात्री दोन वाजता जाग आली व त्यानंतर झोप लागलीच नाही. असो.


.

पुढील भाग: सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ९: मन्नेखेली- संगारेड्डी (८२ किमी)

(लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! सायकलिंगमधले फोटो वर दिलेल्या ब्लॉगवर बघता येतील व ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील. अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376)

प्रवासक्रीडालेखअनुभव