आज्जी गेलीय सोडून

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
14 Jun 2022 - 9:54 pm

उशीराने आले ध्यानी
एकटे गर्दीत बसून
मला अनोळख्या देशी
आज्जी गेलीय सोडून

घरातून निघताना
का बोलली ती नाही?
तुला लेकरा घरात
जागा उरलीच नाही

आई बाबा गेल्यावर
आज्जी तूच उरलेली
कुणाकुणा पोसशील
तूही आता थकलेली

माझ्या इवल्या बहिणी
आणि भाऊ लहानगे
तुला आज्जी, म्हणतील
कुठे दादा आमुचा गे?

काय सांगशील त्यांना
मला सांगशील का ग?
आज्जी एवढ्याचसाठी
पुन्हा भेटशील का ग?

- संदीप चांदणे

जाणिवजीवनमनकरुणकविता

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

14 Jun 2022 - 11:04 pm | सौन्दर्य

आजी म्हणजे एक हळवा कोपरा.

कर्नलतपस्वी's picture

15 Jun 2022 - 6:11 am | कर्नलतपस्वी

आज्जी आजोबा सगळ्यात जवळचे नाते. पेरू पासून ते मेरू पर्यंत सर्व गोष्टी त्यांच्या बरोबर शेअर करू शकतो.
कवीता आवडली.

धर्मराजमुटके's picture

15 Jun 2022 - 8:47 am | धर्मराजमुटके

ओह ! शीर्षक वाचून मला मिपावरील आजी या आय डी ने मिसळपाव सोडले की काय अशी शंका आली.

का बॉ सोडले लैकराला एकट्यालाच आज्जीने ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Jun 2022 - 10:01 am | ज्ञानोबाचे पैजार

कविता वाचून हाच प्रश्ण पडला होता. कोणती बरं अशी मजबुरी असेल आज्जीची की लेकराला असे सोडून दिले?
पैजारबुवा,

गवि's picture

15 Jun 2022 - 10:02 am | गवि

आवडली.

कवितेचा आकार म्हणावा तर फार सुंदर आहे. हुरहूर लावणारा. पण अर्थ कळाला नाहीये. अर्थात अगदी टोकदार स्पष्ट अर्थ असलाच पाहिजे हे काही कविता या प्रकाराचं सौंदर्यस्थळ नव्हे.

कवीला नेहमीच्या उघड इंटरप्रिटेशनपेक्षा (आजी या नातेवाईकाची मरणोत्तर आठवण) यापेक्षा वेगळंच काहीतरी सुचवायचं आहे असं वाटतं. भावंडांच्या उल्लेखाने हे अधिकच वाटते. आजीला परलोकात आधीच गेलेली भावंडे भेटून विचारतील, किंवा सर्वजण आहेत आणि दादाच गेलाय असे काहीसे विचित्र वाटले अधेमधे.

पण हे न कळल्याने विचार चालू होतो. हेच कवितेचे यश.

आंबट गोड's picture

15 Jun 2022 - 11:43 am | आंबट गोड

तर असे वाटतेय की हा दादा च परलोकात गेला..आजी आणि लहान भावंडांना सोडून!

तीन-चारदा कविता वाचली. अतिशय आवडली.
वाचकांनी वेगवेगळ्या कल्पना केल्या आहेत त्याही मननीय आहेत. कविता चुटपुट लावणारी आहे, हेच तिचे सौंदर्य, असेही म्हणता येईल.
ज्या आजीने आजवर काबाडकष्ट करून (ज्यांचे आई-वडील देवाघरी गेलेले आहेत अश्या -) आपल्या लहान लहान नातवंडांना पाळले -पोसलेले आहे, तिचा सर्वात मोठा नातू आता कमावण्यालायक झालेला आहे, म्हणुन त्याला शहरात नेऊन, कुठेतरी कामावर लावून , किंवा नुस्तेच गर्दीच्या गाडीत बसवून ती निघून गेलेली आहे .... अशा त्या मोठ्या नातवाचे मनोगत या कवितेत व्यक्त झालेले आहे, असे मला वाटते.
"मला सांगशील का ग ?" ... आणि पुन्हा भेटशील का ग ?" या दोन ठिकाणी "ग" वापरला आहे, पण "कुठे दादा आमुचा 'गे' ? हे वाचून भलतीच कल्पना मनाला शिवून गेली, आणि कवितेचा आणखीही 'तसला' एक अर्थ लावता येईल, असे वाटून गेले.

गवि's picture

19 Jun 2022 - 11:41 am | गवि

हो की.. मान गये!!

जुन्या पिढीतल्या जुन्या विचारांत वाढलेल्या आजीला नसेल पटत हे. काढलंन घरातून बाहेर..

कुमार१'s picture

19 Jun 2022 - 11:33 am | कुमार१

आवडली.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Jun 2022 - 12:24 pm | राजेंद्र मेहेंदळे

हुरहुर लावणारी कविता!!
खाणारी तोंडे आणि कमाई यांचा मेळ बसत नसल्याने आजीने नातवाला कुठेतरी सोडुन दिले असेच प्रथम वाटले. पण ईतर प्रतिक्रिया बघुन असेही वेगवेगळे अर्थ निघु शकतात हे समजले.

गणेशा's picture

25 Jun 2022 - 2:18 pm | गणेशा

हळवे लिखान..
----

उसवले मायधागे
फाटले आकाश माझे..
तू निघून गेल्यावर
विरले सुखाचे अस्तर
--- गणेशा