प्रसन्नतेच्या लहरी!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
10 May 2022 - 7:23 pm

नमस्कार. आजपर्यंत अनेक वेळेस मुलांना आकाशातल्या गमती दाखवल्या होत्या. वेगवेगळे तारे, ग्रह आणि चंद्रावरचे खड्डे बघताना मुलांच्या चेह-यावर येणारा आनंद आणि त्यांना होणारं समाधान नेहमीच अतिशय ऊर्जा देऊन जातं. 'ऑ! अरे बापरे!' 'ओह माय गॉड' अशी एक एक दृश्य बघतानाची मुलांची (आणि वयाने जास्त असलेल्या मुलांचीही) प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. त्यासारखाच पण थोडा वेगळा असा सुखद अनुभव आज घेता आला. निमित्त होतं परभणीतल्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्रामधल्या मुलांच्या सुट्टीतील शिबिरामध्ये घेतलेल्या ज्ञान रंजन अर्थात् fun and learn सत्राचं. आकाश दर्शनाच्या सत्रांमध्ये मुलांसोबत बोलताना वाटायचं की, इतरही गोष्टी त्यांच्यासोबत शेअर कराव्यात. रोजच्या जीवनातल्या, विज्ञानातल्या, गणितातल्या गमती जमती त्यांच्यासोबत शेअर कराव्यात. निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राच्या ह्या शिबिरामुळे हा 'योग' जुळून आला. तेव्हा सर्व प्रथम ही संधी दिल्याबद्दल निरामय संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.

मोठ्यांनी मुलांना शिकवायचं असतं हा एक खूप मोठा भ्रम आहे. जेव्हा केव्हा आपण लहान मुलांसोबत खेळतो, त्यांची एक एक धडपड समजून घेतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की, खरी गरज तर आपल्याला त्यांच्याकडून शिकण्याची आहे. त्यांची ऊर्जा, त्यांचा आनंद, त्यांची प्रसन्नता, त्यांच्या मनाची तन्मयता ह्या गोष्टी आपल्याला शिकायची गरज आहे. प्रख्यात कवी आणि विचारवंत खलिल जिब्रानने मुलांबद्दल म्हंटलं आहे की, त्यांच्यासारखं होण्याचा तुम्ही प्रयत्न करावा, परंतु त्यांना आपल्यासारखं घडवण्याचा अट्टाहास नको (You may strive to be like them, but seek not to make them like you). ह्याचा खूप सुंदर अनुभव हे सत्र घेताना मिळाला. हे अनुभव इतरांसोबत शेअर करावेत म्हणून हे लिहून काढायची इच्छा झाली. खरं तर सकाळी ६ वाजता मुलांचं शिबिर सुरू होतं हे कळालं तेव्हा थोडं अस्वस्थ वाटलं. कारण आपली रोजची जीवनशैली इतकी अनियमित आहे की, इतक्या पहाटे उठून मुलांना शिबिराला येणं अजिबात सोपं नाही. पण जेव्हा कळालं की, ४५ मुलं शिबिराला आली, तेव्हा आश्चर्याचा व आनंदाचा धक्का बसला...

शिबिराच्या दुस-या दिवशी योग- प्राणायाम झाल्यावर मला सेशन घ्यायचं आहे. मला साधारण ४५ मिनिट मुलांसोबतच्या संवादासाठी मिळणार आहेत. त्यासाठीचं नियोजन केलं की, कोणत्या छोट्या गमती- जमती- खेळ- गोष्टी- कृती ह्या वेळेत घेता येतील. त्यानुसार काही मुद्दे मनात ठरवले. मुलांना पहाटे उठण्याचं किंवा योग वर्गात येऊन कठीण आसनं करण्याचं टेन्शन आलं होतं का नाही माहित नाही, पण मला नक्कीच थोडं टेन्शन आलंय. कारण ह्या स्वरूपाच्या गप्पा- कृती मी इतक्या मोठ्या ग्रूपसोबत कधी घेतलेल्या नाहीत! घटक चाचणीपूर्वीची अस्वस्थता! पण तीही एंजॉय केली. सव्वा तास योग- प्राणायाम मुलांनी खूप उत्साहाने केले. एक एक कठीण आसन करताना त्यांची तयारी आणि ऊर्जा दिसत होती. ठरलेल्या वेळी मला शिबिरामध्ये सूत्रं देण्यात आली. सुरुवातीला सगळी मुलं पहाटे उठून शिबिराला आली व त्यांनी योग- प्राणायाम केला, ह्याबद्दल सर्वांचं कौतुक केलं. सर्वांनी सर्वांसाठी टाळ्या वाजवल्या. संवाद व सहभाग पद्धतीचं सत्र असल्यामुळे मुलं एकत्र जवळ येऊन बसली. सगळे मिळून खालीच बसले. किरकोळ परिचय झाल्यानंतर मुलांना विचारलं की, आपल्यापैकी कोणी स्वत:चा वेगळा असा परिचय करून देईल का. अमिषाने तिचा परिचय करून दिला व सांगितलं की, ती बॅडमिंटनमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळलेली आहे आणि तिला कब्बडीसुद्धा आवडते! अरिनने त्याचा परिचय करून दिला की तो महाराष्ट्राच्या अंडर १५ टीम क्रिकेट टीमचा सदस्य आहे! अनेकांना त्याचं नाव हरीण असं ऐकू आलं! मुलांची संख्या जास्त असल्यामुळे सगळ्यांच्या परिचयासाठी तितका वेळ नव्हता.

मनाची क्षमता

मुलांना चर्चेमध्ये सांगितलेली पहिली गोष्ट अशी की, एका गावात दोन लहान भाऊ खेळता खेळता गावापासून थोडे दूर गेले. आजूबाजूला कोणीच नाही अशा जागी ते गेले. खेळताना आपल्यालाही वेळेचं- रात्र झाल्याचं भान राहात नाही तसं ते खेळत खेळत लांब गेले. आणि त्यातला जो मोठा भाऊ होता- दुस-यापेक्षा २ वर्षं मोठा तो एका मोठ्या खड्ड्यात पडला. थोडा वेळ दोघांनाही रडू आलं. त्याने इतरांना हाक मारली, पण तिथे मदतीला कोणीही नव्हतं. लहान भाऊ थोडा वेळ रडला, पण त्याच्या लक्षात आलं की, त्यालाच मदत करावी लागेल. इकडे तिकडे तो फिरत असताना त्याला एका झाडाला बांधलेली दोरी दिसली. त्याने मन शांत करून दोरीची गाठ सोडवली आणि खड्ड्यात पडलेल्या भावाला दिली आणि त्याला पकडून धरायला सांगितलं. आणि मग २ वर्षं लहान असलेल्या भावाने खूप शक्ती लावली, सगळा जोर लावला आणि हळु हळु त्याला बाहेर खेचून काढलं. मग दोघांनाही आनंद झाला. छोटा भाऊ हे का आणि कसं करू शकला, असा प्रश्न मुलांना विचारला तेव्हा मुलं म्हणाले, त्याचं भावावर प्रेम होतं. त्याच्यात शक्ती होती. त्याने पॉझिटीव्ह थिंकिंग केलं. मग मुलांना सांगितलं की, अगदी बरोबर. पण ह्या सगळ्यांबरोबर अजून एक गंमत झाली होती. तिथे बाकी कोणीच नसल्यामुळे "हे तू करू शकत नाहीस," असं सांगणारं कोणी नव्हतं. त्यामुळे त्याच्या मनाने जिद्द केली आणि तो हे करू शकला. कब्बडीमध्ये नाही का कधी कधी बारीकसा मुलगा मोठ्या चार- चार मुलांनाही ओढून नेतो, तसं.

गोष्टीतली मजा मुलांना कळाली. तेवढ्यात एकच गोंधळ झाला. एकदम एक मुलगी जोराने ओरडली उंदीर आला, पळा पळा! एकच गोंधळ झाला. बरेच जण दचकले. एकदम उठून उभे राहिले. पण तिथे उंदीर नव्हताच. तरीही सगळे जण क्षणभर घाबरले होते. आणि उंदीर नाहीय, राधिकाने केवळ अभिनय केला असं बघितल्यावर सगळेच हसले. म्हणजे उंदीर तर खोटा होता, पण वाटलेली भिती खरी होती! राधिकाने एकदम सगळ्यांना घाबरवलं होतं! तिच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. असं आपण अनेकदा परिस्थिती बघण्याच्या आधीच घाबरतो!

एक डाव पत्त्यांचा

पुढच्या गमतीमध्ये मुलांना आवडणारी एक सोप्पी गोष्ट करायची होती. पत्ते कोणा कोणाला आवडतात असं विचारल्यावर अनेकांनी हात वर केले होते. मग त्यांना समोर बोलावलं आणि चार पाच जणांचा एक असे चार गट केले. आणि त्यांना काही पत्ते वाटले. आणि प्रत्येक गटाला काम दिलं की, त्यांनी मिळून पत्त्यांचा बंगला बनवायचा. मुलं एकदमच आनंदात आली. उत्साहामध्ये- घाई- घाईने एकमेकांच्या पुढे पुढे करून त्यांनी पत्ते घेतले. प्रत्येक गटाला १५- २० पत्ते मिळाले आणि मग त्यांनी बंगले बनवायला सुरुवात केली. बाकीच्या मुलांना गरज पडली तर त्यांच्या मदतीला जायला सांगितलं आणि ते कसे करत आहेत हे बघायला सांगितलं. पत्त्यांमधला मुलांचा उत्साह बघून मोठ्यांचीही उत्सुकता वाढली. पहिले काही मिनिट नीट बसून पत्ते मांडून बघण्यात गेले. मग प्रत्येकाने प्रयत्न सुरू केला. काही जणांचे उभे राहात होते, पडत होते. मुलींच्या एका गटाने हुशारी केली आणि भिंतीला खेटून पत्ते उभे करायला सुरुवात केली! पण त्यांचेही मजले नीट उभे राहिले नाहीत. दोन मिनिट राहिले, एक मिनिट, फक्त तीस सेकंद उरले असं करता करता मुलांचा वेळ संपला. केवळ एका गटाचा दुसरा मजला सुरू झाला होता.

त्यावर नंतर चर्चा सुरू झाली!

गटातल्या एकच जणाकडे सगळे पत्ते होते का सगळे जण मिळून करत होते?
सगळ्यांनी आपला आपला बंगला बनवायचा प्रयत्न केला की, गटासाठी बंगला बनवत होते? सगळ्यांनी मिळून केला असता तर चार आडवे मजले होण्याच्या वेळात दोन मजले उभेही होऊ शकले असते.
ज्यांना जमत नव्हतं त्यांनी इतरांना संधी दिली का?
कोण कोण इतरांना हसत होतं आणि कोण प्रोत्साहन देत होतं?
खाली बसलेल्या मुलांना कोणत्या गटाने मदतीसाठी बोलावलं का?
खाली बसलेल्यांपैकी कोणी मदतीला गेले का?
ह्यात कोणी जिंकले किंवा हरले नाही. सगळ्यांनी प्रयत्न केले आणि गमतीचा आनंदही घेतला.

ह्या प्रश्नांना अर्थातच मुलांनी मनमोकळेपणे मजेशीर उत्तर दिली. हा खेळ सोपा असला तरी त्यामध्ये खूप संयम, शांतपणा लागतो. सुरुवातीला झालेल्या गोंधळामुळे अनेकांच्या हातातून पत्ते घसरत होते. नंतर थोड्या वेळाने जमलं. एकाग्रता, संयम, अपयश आलं तरी परत प्रयत्न करण्याची जिद्द अशा गमती ह्या खेळात आहेत. योगाच्या भाषेमध्ये मुलांसाठी हा धारणेचा अभ्यास आहे. नंतर काही मुलांनी शिबिराच्या सहा दिवसांच्या मुदतीमध्ये सगळ्या म्हणजे ५२ पत्त्यांचा बंगला करण्याचं चॅलेंज स्वीकारलं! हे चॅलेंज सोपं वाटलं तरी अजिबात सोपं नाहीय! पण आता मुलं प्रयत्न करतील. पत्त्यांच्या अशा डावाची कल्पना मला माझी पुतणी अनन्याकडून मिळाली. तिने चिकाटीने आणि जिद्दीने सगळ्या म्हणजे ५२ पत्त्यांचा बंगला करून दाखवला होता!

पिकनिकच्या गोष्टीतलं ट्विस्ट!

एकदा परभणीतल्या एका शाळेची पिकनिक जाते. मुलांना समुद्र बघायचा असतो. म्हणून ते कोकणातल्या बीचवर जातात. रात्रभराचा प्रवास करून कोकणातल्या बीच असलेल्या एका गावात पोहचतात. खूप दमून ते पोहचत असतात तेव्हा बीचवर समुद्रापलीकडे सूर्योदय होत असतो. मग ते आवरतात, थोडा आराम करतात आणि मग इकडे तिकडे फिरायला जातात.

ह्या छोट्याशा गोष्टीतलं ट्विस्ट सुरुवातीला अनेकांना लक्षात आलं नाही. मग मोठ्या मुलांना कळालं की, कोकणातल्या बीचवर सूर्योदय कसा काय दिसेल? कारण समुद्र तर बीचच्या पश्चिमेला आहे, तिथे तर सूर्यास्त दिसेल. मग मुलं हसले. मग त्यांना विचारलं की, जर बीचवर सूर्योदय बघायचा असेल तर मुलांचं पिकनिक कुठे जावं लागेल? त्यावर काहींची उत्तरं होती, गोवा, महाबळेश्वर, मुंबई! हास्याची कारंजी उडत होती! मग एकाने रामेश्वरम सांगितलं. आणि मग सगळ्यांना कळालं की, पूर्वेला समुद्र आहे अशा बीचवर म्हणजेच ओदिशा, तमिळ नाडू, तेलंगणा इ. राज्यातल्या बीचवर जावं लागेल.

पिकनिकचीच अजून एक गोष्ट मुलांना थोडक्यात सांगितली. आपल्यापैकी समजा असा कोणी मुलगा असेल जो अजिबात सायकल चालवत नाही, काही व्यायाम करत नाही, घाम गाळत नाही. थोडाही उन्हात जात नाही, असा मुलगा समजा अशा पिकनिकला गेला जिथे ट्रेकिंग आहे. खूप चालायचं आहे. तर तिथे अशा मुलाचे कसे हाल होतील! सगळे हसले. त्यावर त्यांना बोललो की, व्यायाम- घाम आणि मेहनत आवश्यक आहे. नुसता आरामच केला तर तो जास्त आरामदायक ठरत नाही. Little discomfort is always comfortable!

तोंडी गणित सोडवण्याची गंमत

मुलांना एक गणित विचारलं. १ + २ + ३ + ४ . . . . असं करत + १०० अशी बेरीज किती होईल? तोंडी सोडवता येईल का? काही मुलांनी लगेच फॉर्म्युला वापरला. मग त्यांना वेगळ्या पद्धतीने करून पाहा असं सांगितलं. हेच उदाहरण सोपं करून १ + २ + ३ + .... + ९ + १० असं करता येईल का विचारलं. १ आणि १०, २ आणि ९, ३ आणि ८ अशा किती जोड्या होतील. पाच जोड्या होतील, मुलं बोलले. आणि प्रत्येक जोडीची बेरीज किती? १+ १० = २+ ९ = ३+ ८ म्हणजे ११. ११ च्या पाच जोड्या. म्हणजे एकूण बेरीज ११ X ५ = ५५. त्यानुसार १ आणि १००, २ आणि ९९, ३ आणि ९८ अशा किती जोड्या होतील. पुढे मुलांनी गणित भरभर सोडवलं. १०१ बेरीज असलेल्या ५० जोड्या. म्हणजे एकूण बेरीज किती होईल? इथे मात्र काही मुलांनी गंमत केली. काही जण ५५० म्हणाले. एक जण पाचशे हजार म्हणाला. नंतर मात्र सगळ्यांना कळालं ५० गुणिले १०० होतात ५०००. आणि त्यात अजून ५०. म्हणजे होतात ५०५०. असं हे गणित तोंडीही सोडवता आलं. वेगळ्य बाजूने विचार केला की होणारी गंमत सगळ्यांना बघता आली.

५९ सेकंद आणि १ सेकंद

खरं तर ८ वाजले आहेत आणि मला दिलेला वेळ संपला आहे. पण आयोजकांना विचारलं आणि मुलांनाही विचारलं. त्यांचा तर उत्साह आहेच. त्यामुळे आणखी एक गंमत घेता आली. अजून एक छोटीशी गोष्ट तिथल्या फळ्यावर लिहायची आहे. कोणाचं अक्षर चांगलं आहे असं मुलांना विचारलं. मी मी, असे अनेक जण म्हणाले. "माझं कर्सीव्ह छान आहे." तेव्हा बोललो की, मराठी अक्षर! शेवटी एका मुलीला फळ्यावर छोटी गोष्ट लिहायला सांगितली. मी कागदावर लिहीलेलं तुला वाचता येतंय का, असं तिला विचारलं. ती हो म्हणाली! मग तिने फळ्यावर गोष्ट लिहायला सुरुवात केली.

इकडे तोपर्यंत बसलेल्या मुलांना अजून एक गंमत विचारली. सलग १ मिनिट फक्त मराठी किंवा फक्त इंग्रजीमध्ये कोणी बोलू शकेल का असं विचारलं. इंग्लिशसाठी अनेक जण तयार आहेत. मग मराठीसाठी विचारल्यावर काही जणांचे हात वर आले. त्यातल्या एकाने गोष्ट सांगायला सुरुवात केली. खूपच छान शब्द आणि वाक्य वापरून त्याने त्याची गोष्ट सांगितली. पण १ मिनिट पूर्ण होता होता त्याने एक इंग्लिश शब्द वापरला आणि बाकी मुलं लगेच हसली. त्यांचं लक्ष होतंच. पण जरी एक इंग्लिश शब्द वापरला असला, तरी तो बाकी ५९ सेकंद तर मराठीत छानच बोलला होता! इकडे फळ्यावर लिहीणा-या मुलीला माझं अक्षर पुढे कळालं नाही, म्हणून मी लिहायला गेलो. एका मुलीने एक मिनिट मराठी बोलायला सुरुवात केली.

फळ्यावर लिहीलेली छोटी गोष्ट अशी होती-

घरामध्ये कोण काय काम करतं?

________ भाजी आणणार. ________ खेळायला जाणार. ________ आईला मदत करणार. ________ पेपर वाचत बसणार. ________ भांडी घासणार. मी ________ करणार.

पर्याय असे आहेत: आई, बाबा, मी, मित्र, ताई, आजी.

माझं अक्षर जवळ जवळ सगळ्यांना वाचता येतंय! मग काही मुलांनी येऊन रिकाम्या जागा भरल्या. एकाने लिहीलं बाबा भाजी आणणार. एका मुलीने लिहीलं आजी खेळायला जाणार. सगळ्यांच्या चेह-यावर हसू आलं. कौतुकाच्या टाळ्याही वाजल्या. एकाने लिहीलं मी आईला मदत करणार. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. एकाने मी मित्र करणार असं लिहीलं. एकाने लिहीलं ताई भांडी घासणार वगैरे वगैरे. त्यावर मग चर्चा झाली. भाजी आणणार, भांडी घासणार असं विचारलं की, आपल्याला आईच का आठवते? मुलं म्हणाले ताईसुद्धा आठवते! मग त्यांना विचारलं की, आई आणि ताईच का? आपल्याला असंच का वाटतं? किंवा बाबा पेपर वाचणार असं का?

कोणाच्या घरी बाबा भाजी आणतात? अनेकांचे हात वर.
कोणाच्या घरी बाबा भांडी घासतात? थोड्या मुलांचे हात वर. पण अनेकांच्या चेह-यावर हसू आलं!

त्यावर मग चर्चा झाली. डान्स क्लास असं म्हंटलं की, अनेकांना वाटतं मुलीच डान्स करतात. पण आज तर मुलंही डान्स शिकतात. आणि मुलीही कब्बडी खेळतात- कराटे शिकतात. सगळे जण सगळ्या गोष्टी करू शकतात.

अखेर घड्याळाकडे बघून हे सत्र थांबवावं लागलं. पहाटेपासून आलेल्या मुलांचा उत्साह मात्र टिकून आहे. सगळ्यांच्या उत्साहासाठी सगळ्यांचं कौतुक म्हणून टाळ्या वाजवल्या आणि हे सत्र संपलं.

... आकाश दर्शनासारखाच आनंद मुलांना ह्या fun- learn सत्रामध्ये देता आल्याचं समाधान मिळालं! सुरुवातीला कठीण जाईल असं वाटलेला पेपर मुलांच्या सोबतीत सोपा गेल्याचा आनंद झाला! अगदी हवं होतं तसं नाही, पण मुलांना आवडेल असं सत्र नक्कीच घेता आलं. मुलांनी सहभाग घेतला म्हणून ह्या प्रकारचं सत्र घेता आलं. मुलांकडून खूप काही शिकताही आलं. मुलांकडून खूप ऊर्जा मिळाली. निरामयच्या टीमनेही अनेक प्रकारे मदत केली आणि सत्र घेताना सोबत केली. मुलांचे प्रफुल्लित चेहरे आणि त्यांना झालेला आनंद बघताना समाधान वाटलं. तिथून निघताना ह्या ओळी आठवत आहेत-

भेद भाव अपने दिल से साफ़ कर सकें
दूसरों से भूल हो तो माफ़ कर सकें
झूठ से बचे रहें सच का दम भरें
दूसरों की जय से पहले खुद की जय करें
हम को मन की शक्ति देना...


- निरंजन वेलणकर 09422108376 माझे सर्व लेख इथे उपलब्ध- www.niranjan-vichar.blogspot.com.

धोरणसमाजलेखअनुभव

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

10 May 2022 - 10:54 pm | सौन्दर्य

तुमचा उपक्रम अतिशय चांगला आहे, प्रचंड आवडला. आपण जेव्हा लहान मुलांत मिसळतो त्यावेळी आपलयाला सुद्धा अनेक गोष्टी शिकायला मिळतात, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन लाभतो व सर्वात महत्त्वाचे म्हणजे नकळत आपणही लहान होऊन जातो.

मला लहान मुलांत मिसळायला आवडते, त्यांना साधे साधे प्रश्न विचारून बोलकं करायला तर खूपच.

तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा.

नगरी's picture

11 May 2022 - 6:35 am | नगरी

एकदा मी आणि माझा बालमित्र फिरायला गेलेलो.तिथे काही कॉलेजवयीन मुलामुलींचा धिंगाणा चालला होता. मी मित्राला विचारले तुला यांच्या बद्दल काय वाटते? तो म्हणाला वाया गेलेली मुलं आहेत. मी म्हणालो मला नाही तसे वाटत. त्यांची एनर्जी बघ , त्याला फक्त योग्य दिशा देण्याची गरज आहे. मुलं म्हणजे अक्षय ऊर्जा स्रोत

तुषार काळभोर's picture

11 May 2022 - 8:07 am | तुषार काळभोर

यातून खरोखर काही जगण्याची, वागण्याची तत्वे समजतात, जी एरवी सांगितली तर 'का लेक्चर देतोय!' असं वाटतं.
२०१८ मध्ये असच एक outbound learning camp आमचा पाँडिचेरीच्या समुद्रकिनाऱ्यावर झाला होता. एखादी ॲक्टिविटी खूप सोपी वाटते, पण करायला अवघड असते. एखादी खूप अवघड वाटते आणि जमतच नाही. मग सगळ्यांनी प्रयत्न करून झाले की कळायचं की आपण एखादी साधी गोष्ट साधेपणाने घेतच नाही. आपण गोष्टी, एकूणच आयुष्य खूप गुंतागुंतीचे करून ठेवलंय. बऱ्याच गोष्टींत आपले काही स्टिरीओटाईप विचार असतात, पूर्वग्रहदूषित विचार असतात, ते मोडून चाकोरीबाहेर विचार केला तर खूप चांगले परिणाम दिसून येतात.

पण हे कळलं पण वळलं नाही :)

मला वाटतं लहानपणापासून मुलांना असे विचार करायची सवय लागली तर बहुतेक त्यांना या गोष्टी साध्य करणे सोपे जाईल.

अभिनंदन.
आणि हा वेगळा अनुभव शेअर करण्यासाठी मनःपूर्वक आभार.

विजुभाऊ's picture

12 May 2022 - 8:48 am | विजुभाऊ

खूपच सुंदर

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 May 2022 - 11:45 am | ज्ञानोबाचे पैजार

तुमचे सगळे लेखन आवर्जून वाचावे असेच असते.
पैजारबुवा,

चौथा कोनाडा's picture

13 May 2022 - 5:49 pm | चौथा कोनाडा

+१

सुंदर उपक्रम !
लेखन आवडले !

सिरुसेरि's picture

14 May 2022 - 5:06 pm | सिरुसेरि

विधायक उपक्रम .

मुक्त विहारि's picture

14 May 2022 - 6:22 pm | मुक्त विहारि

+1

सुधीर कांदळकर's picture

14 May 2022 - 8:51 pm | सुधीर कांदळकर

फारच सुंदर. डोळ्यात स्वप्ने घेतलेल्या तरुणाईला शिकवणे हा सर्वात आनंददायी अनुभव आहे. मस्त. धन्यवाद.

मार्गी's picture

16 May 2022 - 10:57 am | मार्गी

ओहह! इतके प्रतिसाद! :)

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद आणि नमस्कार!!