सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

तो शहाणा होतोय....

Primary tabs

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
28 Mar 2022 - 12:15 pm

एक जाहिरात आहे एका खाद्यतेलाची. त्यातल्या आईला नृत्याची आवड,पण संसारात अडकलेल्या तिला नृत्य करायला वेळ मिळत नाही. मुलगी खिन्न होते. आईला मदत कोणी करत नाही पण अमुकतमुक खाद्य तेल ती आई वापरते, आणि लगेच.. कढईभर तेलात साबुदाणा वडे तळते.(ते वडे चक्क कच्चे दिसतात.) एकाच जेवणात साबुदाणे वडे, पुलाव आणि पाच इतर पदार्थ भरुन टेबलवर ठेवते. नंतर फडक्याला हात पुसत, मुलीच्या खोलीत जाऊन नृत्याची पोझ घेते. (अशाच एका आधीच्या जाहिरातीत ती गृहिणी गायिका असते.) विशिष्ट खाद्यतेल वापरल्याने स्वयंपाक "लवकर" कसा काय होतो आणि गायन, नृत्यादी कला जोपासण्यासाठी वेळ कसा काय मिळतो हे मला कळले नाही.

त्या जाहिरातीत एक वाक्य आहे"आईची जागा फक्त स्वयंपाकघरात नाही". म्हणजे काय चातुर्य पाहा! तिनं स्वयंपाकघर सोडून नव्हे तर सांभाळून शिवाय नृत्यही करायचं.(आणि फक्त चार माणसांसाठी भदाडभर पदार्थ करायचे.) शेवटी जाहीरातच ती. ती एवढ्या सिरियसली घ्यायची नाही, असं मी ठरवते.

मग मला जाणवतं की अलिकडे बरेच पुरुष घरातल्या स्त्रियांना स्वयंपाकात आणि इतर कामात मदत करतात. अशा पुरुषांची संख्या कमी आहे पण नगण्य नाही. शहरात तरी. त्यामुळे स्त्रियांची कामं हलकी होतात. अनेक स्त्रिया त्यामुळे स्वतःचं करियर करु शकतात.

संसाराच्या रामरगाड्यात स्त्रीला स्वतःकडे, स्वतःच्या आवडीनिवडी, छंदाकडे लक्ष द्यायला फुरसत मिळत नाही हे खरे,पण पुरुषांना तरी असा वेळ कुठे मिळतो? नोकरीच्या चक्रात अडकलेला पुरुष त्याची इच्छा असली तरीही आपला विशिष्ट खेळ खेळण्याचा, विशिष्ट वाद्य वाजवण्याचा जोपासू शकतो का? त्याच्याही व्यक्तिमत्त्वाचा विकास रोखला जातोच. त्यालाही करियरकडे लक्ष देता येत नाहीच. दिवसभर काम करून तोही थकून जातो. अगदी शारिरीक श्रम नसलेल्या नोकरीतही लॅपटॉपवर दिवसभर खिळवलेले त्याचेही डोळे दमतातच. त्यानंतर पती येण्याच्या वेळेला सुहास्य वदनाने त्यांचे स्वागत करु न शकणाऱ्या गृहिणी प्रमाणे त्याचीही अवस्था होते. तो पत्नीपुढे हसऱ्या चेहऱ्याने आणि सर्व नीटनेटके आवरलेल्या अवस्थेत नाही जाऊ शकत! तिला जशी रविवारची सुट्टी एन्जॉय करता येत नाही,कारण घरातली कामं असतात. तशी त्यालाही रविवारी घरातली कामं असतात. इलेक्ट्रिशियनला बोलवा,प्लंबरला बोलवा त्यांच्याकडून कामं करून घ्या. त्यांच्यावर लक्ष ठेवा. त्यांना हवं असलेलं सामान मार्केटमध्ये चौकशी करून आणून द्या. पत्नीला, मुलांना संध्याकाळी फिरायला न्या. बाहेरच जेवा. या सगळ्यात रविवारी पूर्ण आराम जशी गृहिणी करु शकत नाही तसाच तोही करु शकत नाही. पत्नीला पसंत नसेल, तिला तिथं कंटाळा येत असेल तर अनेक जणींचे पती आताशा मित्रांकडेही नाही जात असं दिसतं..!

आजचा सुधारलेला, समजूतदार पुरुष घरातली अनेक कामं सुट्टीच्या दिवशी करताना दिसतो. घराची साफसफाई, उंचावरची जळमटं काढणं, मशीनमध्ये जास्तीचे कपडे धुणे, गरज असल्यास डॉक्टरकडे व्हिजिट, किराणा माल आणणं, अशी कितीतरी कामं तो करतो. त्याला तरी फुरसत मिळते का? पण स्त्रियांकडे करुण नजरेने पाहायचं, तिच्यावर दया दाखवायची, तिला अनुकंपेचा विषय बनवायचं अशी आपल्याला सवय लागली आहे. ती घरादारासाठी कष्ट उपसते, तसा तोही आपल्या कुटुंबासाठी ,कच्च्याबच्च्यांसाठी कष्ट उपसतोच. आपली पत्नी नोकरी करून पैसे कमवून आणते याची आजच्या शहाण्या पुरुषाला जाणीव आहे. आजचा नागर, सुशिक्षित पुरुष बदलत चाललाय. समजूतदार, सहिष्णु होत चाललाय, हा बदल हळुहळू पण निश्चितच घडतोय. त्याचं स्वागत करायला हवं.

माझ्या बघण्यात तर अशीही जोडपी आहेत जिथं पत्नी मिळवते आणि पुरुष घर सांभाळतो. मुलांकडे लक्ष देतो. काही सेलिब्रिटीजमध्येही अशी उदाहरणं आढळतात. बायको आजारी असेल तर नवरा तिची सेवा करताना दिसतो. मुलांचीही आजारपणं तो काढतो. त्यांचा अभ्यास करून घेतो. तो पालकसभांना जातो. त्यांच्या शाळेतल्या इव्हेंटसना जातो. आमच्या काळी आपली मुलं कितवीत आहेत हे वडिलांना माहीत नसायचं.

आजकाल IT इंडस्ट्रीत काम करणाऱ्या स्त्रीपुरुषांना रात्री अपरात्री सुद्धा काम करावे लागते. पती-पत्नी निवांतपणे एकमेकांना भेटूही शकत नाहीत. तरीही ते एकमेकांना सांभाळून घेतात.ॲडजस्ट होतात. को ऑपरेट करतात. आळीपाळीने स्वयंपाक करतात. एकमेकांचा आदर करतात. कदर करतात. भावना जपतात. यात पुरुषही काही काळापूर्वी होता तसा मुक्त मोकळा नाही. तोही अडकलेला, जखडलेला आहे. स्त्रीइतकाच!

अर्थात भारत देशातल्या अनेक खेड्यापाड्यातील अशिक्षित, असंस्कृत जनतेमध्ये स्त्री-पुरुष नातं असं बरोबरीचं नाही याची प्रखर जाणीव मला आहे. दारु पिऊन मारणे, छळ करणे, जिवंत जाळणे, हुंडाबळी, स्त्रीभ्रूणहत्या असे प्रकार घडतात, हे दुर्दैवाने खरे आहे. त्याबद्दल दुःख होतं. आपण त्यात बदल घडवून आणू शकत नाही. फार तर एखाददुसऱ्या स्त्रीला मदत करु शकतो. ही स्त्री वरील आणि पुरुषावरीलही अन्यायाची समस्या फारच जटिल आहे. तो एखाद्या लहानशा लेखाचा विषय नाही. ह्या समस्येला अनेक बाजू आहेत. आपल्या खंडप्राय देशातलं दारिद्रय आणि अज्ञान घनघोर आहे. पण ही परिस्थिती कायम राहणार नाही. ती बदलेल. काही दशकांत बदलेल. हा विश्वास आजचा शहाणा आणि सुसंस्कृत पुरुष आपल्याला देतो. स्त्रीप्रतीची ही सहिष्णुता समाजातील निम्न स्तरातील पुरुषांपर्यंतही झिरपेल. झिरपावी. तथास्तु!

मांडणीसमाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

Bhakti's picture

28 Mar 2022 - 12:37 pm | Bhakti

तथास्तु!

चौथा कोनाडा's picture

28 Mar 2022 - 12:41 pm | चौथा कोनाडा

दुसरी बाजू मांडणारा संतुलित सुरेख लेख !

💕

संसाराच्या रामरगाड्यात स्त्रीला स्वतःकडे, स्वतःच्या आवडीनिवडी, छंदाकडे लक्ष द्यायला फुरसत मिळत नाही हे खरे,पण पुरुषांना तरी असा वेळ कुठे मिळतो? नोकरीच्या चक्रात अडकलेला पुरुष त्याची इच्छा असली तरीही आपला विशिष्ट खेळ खेळण्याचा, विशिष्ट वाद्य वाजवण्याचा जोपासू शकतो का? त्याच्याही व्यक्तिमत्त्वाचा विकास रोखला जातोच. त्यालाही करियरकडे लक्ष देता येत नाहीच. दिवसभर काम करून तोही थकून जातो. अगदी शारिरीक श्रम नसलेल्या नोकरीतही लॅपटॉपवर दिवसभर खिळवलेले त्याचेही डोळे दमतातच. त्यानंतर पती येण्याच्या वेळेला सुहास्य वदनाने त्यांचे स्वागत करु न शकणाऱ्या गृहिणी प्रमाणे त्याचीही अवस्था होते. तो पत्नीपुढे हसऱ्या चेहऱ्याने आणि सर्व नीटनेटके आवरलेल्या अवस्थेत नाही जाऊ शकत! तिला जशी रविवारची सुट्टी एन्जॉय करता येत नाही,कारण घरातली कामं असतात. तशी त्यालाही रविवारी घरातली कामं असतात. इलेक्ट्रिशियनला बोलवा,प्लंबरला बोलवा त्यांच्याकडून कामं करून घ्या. त्यांच्यावर लक्ष ठेवा. त्यांना हवं असलेलं सामान मार्केटमध्ये चौकशी करून आणून द्या. पत्नीला, मुलांना संध्याकाळी फिरायला न्या. बाहेरच जेवा. या सगळ्यात रविवारी पूर्ण आराम जशी गृहिणी करु शकत नाही तसाच तोही करु शकत नाही. पत्नीला पसंत नसेल, तिला तिथं कंटाळा येत असेल तर अनेक जणींचे पती आताशा मित्रांकडेही नाही जात असं दिसतं..!

हे विशेष भावलं !

दोन्ही व्यक्ति समजून घेण्यार्‍या असतील, एकमेकाना योग्य ती मदत करत असतील तर तिथे समाधानासह आनंद नांदत असतो !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Mar 2022 - 2:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजी लेखन आवडलं दोन्हीही बाजू उत्तम आल्या आहेत. एकमेकांना समजून घेण्याचा काळ आहे, तरच एकमेकांच्या हौशी-मौजी करता येतात. एकमेकांचा आदर वाढतो. प्रेम वाढतं. सोबत एकमेकांच्या कामांमुळे वेळ जरी काढता येत नसेल तर काही मिनिटे, बोलणे, येनकेन मार्गे संवाद राहीलाच पाहिजे. आवडीच्या गोष्टी करत राहील्या पाहिजे.

बाकी, आजी लिहिते राहा. मराठी जालविश्वातल्या 'तु तु मै मै' च्या काळात आपलं 'संवादी' लेखन अनेकांना भावतं. तेव्हा लिहिते राहावे.

-दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

28 Mar 2022 - 2:20 pm | किसन शिंदे

सरांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.

चौथा कोनाडा's picture

29 Mar 2022 - 5:51 pm | चौथा कोनाडा

+१११

सस्नेह's picture

2 Apr 2022 - 2:05 pm | सस्नेह

मीही

अनिंद्य's picture

28 Mar 2022 - 3:36 pm | अनिंद्य

आपलं 'संवादी' लेखन भावतं.

+ १

यश राज's picture

28 Mar 2022 - 6:39 pm | यश राज

आजच्या काळात दुसरी बाजू सुद्धा समजून घेण्याची आवश्यकता आहे. ती तुम्ही या लेखात मांडली ते खूप भावले.
धन्यवाद.

सुबोध खरे's picture

28 Mar 2022 - 6:54 pm | सुबोध खरे

मागच्या एका पिढीने स्त्रियांना सबळ करण्यात हातभार लावला

पण

या सबळ झालेल्या स्त्रियांशी कसे वागायचे हे पुरुषांना शिकवलेच गेले नाही.

यामुळे आपल्याला संभ्रमित झालेले पुरुष घराघरात पाहायला मिळतात.

गवि's picture

28 Mar 2022 - 7:18 pm | गवि

परफ़ेक्ट. क्या बात है.

लेख छानच

या निमित्ताने पुरुषाच्या केल्या जाणार्या स्टिरीयोटायपिंगचे ढळढ़ळीत उदाहरण म्हणजे कितीही म्युच्युअल समजुतीने पुरुष घरी बसला/ नोकरी न करता घरकाम केले तरी आसपास सर्वच जण त्याच्याबाबत सतत हेच बोलत राहतात. "नवरा काहीच करत नाही ना तिचा. घरी बसून खातो. बिचारी.."
किंवा त्याला भेटायला जायचे ते त्याचे मन वळवून त्याला नोकरीसाठी उद्युक्त करणारा उपदेश करायलाच.. "तूच सांगून बघ बाबा आता.." वगैरे.

:-))

बापूसाहेब's picture

28 Mar 2022 - 10:31 pm | बापूसाहेब

खरे सर... या सबळ झालेल्या स्त्रियांशी कसे वागायचे हे पुरुषांना शिकवलेच गेले नाही.

आणि सबळ झाल्यावर स्त्रियांनी पुरुषांशी कसे वागावे याचादेखील बराच अभाव आहे.

बाकी लेख आवडला.

बाकी लेख आवडला

सरिता बांदेकर's picture

28 Mar 2022 - 9:54 pm | सरिता बांदेकर

छान लिहीता तुम्ही

नचिकेत जवखेडकर's picture

29 Mar 2022 - 6:42 am | नचिकेत जवखेडकर

छान लेख!

आमच्या काळी आपली मुलं कितवीत आहेत हे वडिलांना माहीत नसायचं

>>याच्यावरून एक किस्सा आठवला. मी जपानला शिकायला आलो होतो तेव्हा एका कुटुंबात होम स्टेला जायचा योग आला. त्यांच्या मुलाचा विषय निघाल्यावर मी त्यांना विचारलं की तुमचा मुलगा केवढा आहे? तर त्यांनी बायकोला फोन करून विचारलं की आपला मुलगा आत्ता किती वर्षांचा आहे 😀
कर्नलतपस्वी's picture

29 Mar 2022 - 8:03 am | कर्नलतपस्वी

समाज बदलतो पण स्वभाव नाही.

सविता००१'s picture

30 Mar 2022 - 5:20 pm | सविता००१

चांगला आणि संतुलित लेख आहे

आंबट गोड's picture

31 Mar 2022 - 11:22 am | आंबट गोड

परफेक्ट लेख!
सगळ्यांना वाचयला द्यायला हवा... स्त्रियांनाही, पुरुषांनाही!

उपयोजक's picture

31 Mar 2022 - 11:07 pm | उपयोजक

आजकाल IT इंडस्ट्रीत काम करणाऱ्या स्त्रीपुरुषांना रात्री अपरात्री सुद्धा काम करावे लागते. पती-पत्नी निवांतपणे एकमेकांना भेटूही शकत नाहीत.

ही कसली प्रगती?

बाकी लेख आवडला. वास्तववादी

चौथा कोनाडा's picture

1 Apr 2022 - 1:10 pm | चौथा कोनाडा

ही कसली प्रगती?

आर्थिक प्रगती, भौतिक प्रगती, वस्तूरुप प्रगती.
कालानुरूप अपरिहार्यता !
मग ... वर्क-लाईफ बॅलन्स, क्वालिटी टाईम अशा शब्दांची आठवण काढायची नसते !

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Apr 2022 - 1:33 pm | राजेंद्र मेहेंदळे

घरी बसुन ऑफिस व (जमेल तसे) घरकाम करणारा पुरुष आणि बाहेर नोकरी करुन कमावणारी स्त्री अशी उदाहरणे करोना काळात बरीच बघायला मिळतात. "जरा आहेस घरी तर हे पण कर की" वगैरे संवाद नेहमीचेच.

दोन वर्षे सतत घरातुन काम केल्याने मला तर थेट रिटायर्मेंट घेतल्यासारखे वाटत आहे. सकाळी जॉगिंग वगैरे करुन आलो की उघडला लॅपटॉप. मग मधे अधे पोस्टमन, ईस्त्रीवाला, कामवाल्या बायका, बेल मारणारे शेजारी किवा सेल्समन, वॉशिंग मशीनचे खटले, पाणी भरणे,चहा करणे एक ना दोन. आडुन आडुन चौकशाही सुरु झाल्यात "त्या अमक्याचे ऑफिस कधीच चालु झाले म्हणे, तुमचे काय? निदान आठवड्यातुन एक दोन वेळा तरी?"

असो. प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असे म्हणुन चाललेय.

सौंदाळा's picture

1 Apr 2022 - 3:30 pm | सौंदाळा

घरी बसुन ऑफिस व (जमेल तसे) घरकाम करणारा पुरुष आणि बाहेर नोकरी करुन कमावणारी स्त्री अशी उदाहरणे करोना काळात बरीच बघायला मिळतात. "जरा आहेस घरी तर हे पण कर की" वगैरे संवाद नेहमीचेच.

चोक्कस, मला समोर ठेवूनच प्रतिसाद लिहिल्यासारखा वाटतोय.
आम्ही पण यातलेच. बायको नोकरी निमित्त बाहेर, अस्मादिक घरी. मुलीची शाळेची तयारी, दूध आणणे, कचरा टाकणे, मुलीला स्कूलबस साठी सोडायला / आणयला जाणे. आल्यावर जेवण वाढून देणे, कधी कधी भरवणे वगैरे अनेक कामे नव्याने केली.

देशपांडे विनायक's picture

1 Apr 2022 - 4:54 pm | देशपांडे विनायक

महाराष्ट्रात फक्त मुंबई दूरदर्शन होते तेव्हाची गोष्ट.
कार्यक्रमाचे नाव लक्षात नाही.पण त्यात बायको कमावणारी आणि नवरा घराकडे पाहणारा अशा जोडप्याची मुलाखत असे.
घासकडबी असे नाव असणारे जोडप्यासाठी जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही हि पद्धत का स्वीकारलीत ? तेव्हा त्यांचे उत्तर खालीलप्रमाणे होते.
नवराबायको दोघेही नौकरी करत होते.नवर्याची बदली मुंबई बाहेर झाली.बायको रिझर्व ब्यांकेत नोकरीला होती आणि तिला राहण्यासाठी ब्यांकेचे क्वार्टर होते.
मुंबईतच रहाण्याचे नक्की होते त्यामुळे क्वार्टर सोडून राहणे परवडणारे नव्हते.त्यामुळे नवऱ्याने घर सांभाळणे सुरु केले आणि बायको नोकरी करत राहिली.
दूरदर्शनला मी पत्र लिहून कळवले की श्रीयुत घासकडबी यांनी माझ्याकडे माहेरवासास जरूर यावे.
पण ते आजपर्यंत आले नाहीत.
दूरदर्शनने ते पत्र दिले नसावे किंवा घासकडबिनी संकोचाने येणे मनावर घेतले नसेल . पण आजही या निमंत्रणास त्यांनी मान द्यावा हि माझी इच्छाआहे.
माहेरपणास validity नसते ना !!

वामन देशमुख's picture

1 Apr 2022 - 7:00 pm | वामन देशमुख

नेहमीप्रमाणेच खुप छान, भावस्पर्शी लिहिलंय. सुदैवाने आजूबाजूला असे अनेक स्त्री-पुरुष दिसतात; दुर्दैवाने याविरुध्दही दिसतात.

आज्जी, तू हा लेख लिहून, एक पुरुष म्हणून जणू काही माझ्याच भावभावना, परिस्थिती, विचार acknowledge केलेत असं वाटलं!

---

अवांतर: मिपावरचे काही धागालेखक, त्यांचे धागे वाचून झाल्यावर, "मला तर अगदी हेच म्हणायचं होतं", किंवा "मला तर अगदी हे म्हणायचंच होतं" अशी फीलिंग देतात त्यांपैकी तू एक आहेस आज्जी!

---

सवांतर: "तो शहाणा होतोय...." हे शीर्षक वाचून, एखाद्या किशोरवयीन मुलाबद्धल काहीतरी असेल असं वाटलं होतं! 😉

Nitin Palkar's picture

3 Apr 2022 - 12:47 pm | Nitin Palkar

लेख छानच आहे. अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत.
अवांतर: तुमचं मिपा नाम 'आजी' हे आहे. अनेक प्रतिसादकांनी 'आज्जी' असं लिहिलं आहे. हल्ली अनेक मालिकांमध्येही 'आजीचा' उच्चार, उल्लेख 'आज्जी' असा केला जातो, जो चुकीचा आहे. मराठी शब्द आजी असाच आहे 'आज्जी' असा नाही.

आजी's picture

12 Apr 2022 - 7:01 pm | आजी

Bhakti-धन्यवाद.
चौथा कोनाडा-"संतुलित लेख"हा तुमचा अभिप्राय समाधान देऊन गेला.
प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे-माझं लेखन"संवादी"आहे हा तुमचा अभिप्राय वाचून बरे वाटले.
किसन शिंदे, सस्नेह, अनिंद्य -तुम्हीही बिरुटेंशी सहमत! धन्यवाद.

यशराज-"या प्रश्नाची दुसरी बाजूही मांडलीत."हा अभिप्राय वाचून समाधान वाटले.

सुबोध खरे-अशा सबळ झालेल्या स्त्रीशी कसं वागावं हे पुरुषांना शिकवलंच गेलं नाही. त्यामुळे पुरुष संभ्रमित झालाय."हा तुमचा अभिप्राय ए वन!

गवि-"पुरुष घरी बसला तर त्याला नावं ठेवली जातात आणि त्याच्या बायकोची कीव केली जाते."हे तुम्ही म्हणता तसे होते खरे. मीही अनुभवलं आहे.

बापूसाहेब सरिता बांदेकर, धन्यवाद. थँक्यू

नचिकेत जवखेडकर-तुमचा जपानमधील अनुभव पुरेसा बोलका आहे.
कर्नलतपस्वी-"समाज बदलतो पण स्वभाव नाही."हे तुमचे मत योग्य आहे.
सविता ००१-धन्यवाद.
आंबटगोड- हा लेख सर्वांना वाचायला द्यायला हवा. स्त्रियांना ही आणि पुरुषांना ही."अभिप्राय वाचून समाधान वाटलं.

उपयोजक-"ही कसली प्रगती?"हा तुमचा प्रश्न योग्य. पण हीच वस्तुस्थिती आहे.

चौथा कोनाडा-उपयोजकना तुम्ही उत्तर दिलंय.
राजेंद्र मेहेंदळे-तुमचा"स्वानुभव"पटला.
सौंदाळा-तुमचाही"स्वानुभव"पटण्यासारखाच आहे.
देशपांडे विनायक-तुम्ही दिलेले दूरदर्शन च्या मुलाखती मधले उदाहरण विरळाच!
वामन देशमुख-"मलाही अगदी असेच म्हणायचे होते"असे फीलिंग तुझे लेख देतात आजी!"अभिप्राय समाधान देऊन गेला.
Nitin Palkar-हो"आजी"हेच बरोबर."आज्जी"नव्हे.

सर्वांचेच भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार.

मुक्त विहारि's picture

12 Apr 2022 - 8:35 pm | मुक्त विहारि

संसारातील दुसरी बाजू आवडली

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, संसार म्हणजे फक्त तडजोड ... ऑफिस मध्ये पण तडजोड आणि घरी पण तडजोड,...