हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ११: उद्ध्वस्त बस्तडी गावाच्या परिसरातील ट्रेक

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
15 Feb 2022 - 4:02 pm

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ४: गूंजीच्या दिशेने...
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ५: है ये जमीं गूंजी गूंजी!
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ६: गूंजीचा हँगओव्हर!
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ७: सत्गड- कनालीछीना ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ८: ग्रामीण जीवनाची झलक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ९: अदूसोबत केलेला ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १०: ध्वज मंदिराचा सुंदर ट्रेक

६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी शिंगाली गावात पोहचलो. तेव्हा मनामध्ये बस्तडी गावातल्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. ह्या गावातल्या नातेवाईकांकडे मी डिसेंबर २०११ मध्ये एकदाच राहिलो होतो. डोंगर उतारावर आणि दरीच्या थोडं अलीकडे वसलेलं हे गाव आहे. हा सगळा पहाड़ी परिसर. जिथे डोंगर असतात तिथे द-या असतातच. आणि रस्ते तर सतत घाटांचेच असतात. हे गाव अशा जागी हे आहे की, पिथौरागढ़ला परत येताना रस्ता जेव्हा काही घाट चढून परत खाली व दरीच्या पलीकडे समोर येतो, तेव्हा तिथूनही बस्तड़ीचा परिसर दिसतो. ३० जून २०१६ ची रात्र इथे काळरात्र ठरली. खूप मोठा पाऊस सुरू होता. ढगफुटी, वीजांचा कडकडाट आणि साचत चाललेलं पाणी. आणि लोकांना रात्री भितीची जाणीव झाली. सगळे लोक जागे झाले आणि आमच्या नातेवाईकांपैकी गावात होते ते सगळे जण एका घरामध्ये एकत्र आले. आणि पूर्ण गावावरच दरड कोसळली! अचानक झालेल्या पावसामुळे वरच्या बाजूने पाण्याचा खूप मोठा प्रवाह वेगाने खाली आला आणि तो डोंगराच्या क्षमतेपेक्षा मोठा ठरला. त्यामुळे डोंगर कोसळला आणि त्याखाली असलेलं बस्तडी गांव गाडलं गेलं. गावातल्या २१ व्यक्तींचे प्राण त्यात गेले आणि जवळ जवळ सगळं गाव उजाड झालं. आणि डोंगराची माती इतकी जास्त पडली होती की अनेक दिवस शोध करूनही मृतांचे अवशेषही मिळू शकले नाहीत. आमचे त्या वेळी तिथे असलेले अनेक नातेवाईक त्यात गेले. जे योगायोगाने बाहेर होते, तेच वाचले. महाराष्ट्रात २०१४ मध्ये माळीण गावामध्ये जी दुर्घटना घडली होती, काहीशी तशीच ही आपत्ती होती...

ह्या मोठ्या घटनेची कारणं तशी बघितली तर स्पष्ट आहेत. निसर्गामध्ये अचानक काहीच होत नाही. निसर्ग अनेक प्रकारे पूर्व सूचना देत असतो. पण आपण त्यातून शिकत नाही. हिमालयात जसे जसे झाडं कमी होत गेले, निसर्गावरचा मानवी ताण जसा वाढला, तशी तिथली पर्यावरणीय व्यवस्था कमकुवत होत गेली. लँड स्लाईडमध्ये गावंच्या गावं आता अनेकदा गाडले जातात. पण त्याची सुरुवात ही पाण्याच्या अचानक आलेल्या प्रवाहामुळे एक घर वाहून जाणे अशी असते. मानवी कृत्यांमुळे व झाडं विरळ झाल्यामुळे डोंगराचा पाया कमकुवत होतो. शेतीमध्ये बदल झालेले असतात. त्या परिसरामधल्या निसर्गाची काळजी घेणारं मनुष्यबळ स्थलांतरामुळे कमी झालेलं असतं. शिवाय पाणी वाहून जाण्याचे मार्ग ताणामुळे कमकुवत झालेले असतात. आज सगळ्या शहरांच्या जवळपासचे डोंगर अगदी पोखरलेले दिसतात. पाण्याच्या वाहून जाण्याच्या वाटा रोखल्या जातात. त्यामुळे आता प्रत्येक पावसाळाच चिंताजनक ठरणार आहे. त्याबरोबर वातावरण बदलामुळे एकाच वेळी खूप जास्त पाऊस पडण्याचं प्रमाण वाढलंय. एकदम इतका पाऊस झाला तर तिथली पर्यावरणीय व्यवस्था तो सहन करू शकत नाही... कमी अधिक हे सगळीकडेच होणार आहे. आणि ह्या बाबतीत आपली मानसिकता कशी की सरकारी पातळीवर २०१३ चा उत्तराखंडचा महापूर किंवा ही आपत्ती ह्यांना "दैवी आपत्ती" म्हंटलं जातं!! ह्या अपघातानंतर बस्तड़ी गांव राहण्यायोग्य राहिलं नाही. त्या संदर्भातली एक बातमी इथे वाचता येईल.

ज्यांनी जवळचे लोक गमावले त्यांची कधीही भरून न येणारी हानी झाली. अशी दुर्घटना वस्तुत: मृत्युचा संदेश असतो की, जागे व्हा, सावध हा. भ्रमात राहू नका. आणि आपण दुस-या कुठल्या जागी असलो तरी हा इशारा आपल्यासाठीही तितकाच लागू आहे. असो. आमचे जे नातेवाईक वाचले, त्यांनी नंतर बस्तडीच्या जवळ असलेल्या व थोडं जास्त सुरक्षित असलेल्या शिंगाली गावामध्ये परत नवी इनिंग सुरू केली. जीवन थांबत नाही. काही प्रवासी उतरले म्हणून‌ ट्रेन थांबत नसते. इथे त्यांनी नवीन घर बांधलं आणि पुढचा संसार सुरू झाला. त्यांच्या घरी पोहचलो तेव्हा आधी अंगणातल्या चुलीवर मस्त ऊब घेतली. ह्या भेटीच्या वेळेस त्या आठवणींचं सावट नाहीय. कारण आता साडेचार वर्षं होतील. ट्रेनने नंतर पुढे बरंच अंतर कापलं आहे. इथल्या घरात आता छोटी दोन जुळी बाळं झाली आहेत! इथे अदू २०१७ मध्ये एकदा येऊन गेली होती- दीड वर्षांची असताना. तेव्हा ती ज्या कुत्र्याच्या पाठीवर बसली होती, तो कुत्रा कल्लूही भेटला! बाकी भरपूर गप्पा- टप्पा झाल्या. बाकीचे गप्पांमध्ये व्यस्त असले तरी माझ्या मनातून बस्तड़ीचा विषय जात नाहीय. इथून अगदी पंधरा मिनिट पायवाटेने उतरून गेल्यावर त्या गावात गेलो होतो हे आठवतंय सारखं...

सकाळी लवकर जाग आली. आवरून बाहेर आलो आणि आसपासचा परिसर बघितला. पूर्वी रस्ता शिंगालीला संपायचा. पण आता रस्ता थोडा आतपर्यंत गेलाय. बस्तड़ी गांव नकाशावर आहे व थोडी वस्तीही आहे तिथे. इथे अंगणातूनसुद्धा पंचचूली शिखर सुंदर दिसत आहेत! पूर्वेला डोंगर असल्यामुळे सूर्याचं ऊन यायला मात्र बराच वेळ लागला. तोपर्यंत चहाचे अनेक राउंडस झाले. बाकीच्यांना मुख्य रोडवर ओगला येथे भेटतो असं सांगून निघालो. आधी बस्तड़ीच्या परिसरात गेलो. मला नातेवाईकांनी सांगितलं होतं की, आता तिथे काहीच अवशेष नाही आहेत. तरी एकदा बघावसं वाटलं. गावात उतरणा-या पायवाटेपर्यंत गेलो आणि तिथून परत फिरलो. आता साधारण पाच किलोमीटरचा मस्त ट्रेक करायला मिळणार आहे.

पंचचूली व इतर शिखर दिसत आहेत. इतका सुंदर निसर्ग आहे की, इथे चालणं निव्वळ सुख आहे. अगदी शांत रस्ता, मोकळं आकाश, रमणीय परिसर! और क्या! मनसोक्त फोटो घेत घेत निघालो. दूरवरचे गावंही दिसत आहेत. दूरवरून दिसणारं अस्कोट ओळखू आलं. डोंगरांच्या मध्ये दिसणारे पिवळे पॅचेस लँडस्लाईडसची आठवण करून देत आहेत! रस्ता जसा वळत वळत जातोय तसे अनेक दूरवरचे हिमशिखर वेगवेगळ्या बाजूने दिसत आहेत. खरंच खूप मोठं सुख आहे हे. नशीबच लागत असावं अशा फिरण्यासाठीही. वाटेत छोटी छोटी गावं आहेत. घर रस्त्याच्या खाली असल्यामुळे एका घराची गच्ची रस्त्याला लागून असलेली दिसली. पुढे देवदारांचं सुंदर वन लागलं. तसं इथे वन सगळीकडेच आहे. त्यामुळे रात्री इथे कोणी एकट्याने पायी फिरत नाहीत. हिमालयातील पायथ्यापासून सुरू होणारा पहाड़! असंख्य वळणं, असंख्य डोंगर रांगा- द-या ह्यामधून होणारा त्याचा प्रवास आणि मग हिमशिखरांचा कळस! हिमालयाचा हा आवाका, हिमशिखरांमधल्या कळसामध्येही त्याच्यामागच्या पायथ्याचा पाया बघताना अध्यात्मिक साधनेची आठवण झाली. साधनाही अशीच असते ना. निम्न स्तरापासून असंख्य अनुभव, असंख्य वळणं आणि चढ- उतार घेत पुढे जाणारी. तेही एक शिखरच ना. असो.

तासाभराचा सुंदर ट्रेक झाला आणि ओगलाला पोहचलो. बाकीचे नंतर वाहनाने आले. परत जाताना सत्गडला थांबण्याच्या ऐवजी पिथौरागढ़ला एका नातेवाईकांकडे आलो. दुपारी थोडा आराम झाला. नंतर बाकीचे जणं शॉपिंगसाठी गेले. मी पिथौरागढ़मध्ये माहिती घेतली की, इथे ट्रेकिंगसाठी कुठे फिरायला चांगली जागा आहे. तेव्हा कळालं की, इथे चंडाक हिल म्हणून सुंदर परिसर आहे. खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. तेव्हा तिथे जायचं ठरवलं. संध्याकाळी पिथौरागढ़मध्ये थोडं फिरलो. इथे तशी थंडी नेहमीच असते. पण कडक थंडी दोन- तीन महिने असते. अर्थात् इथेही आता पूर्वीच्या तुलनेत बर्फ खूप उशीरा आणि कमी पडतो. पूर्वी डिसेंबरमध्ये बर्फ पडायचा. आता लोक सांगतात की जानेवारीमध्ये थोडे दिवसच पडतो. पण थंडी असतेच. त्यामुळे घरोघरी रूम हीटर आहेतच. त्याशिवाय घरांच्या भिंतीही जाड असतात. शहर बघताना घरांचा हा फरक लगेच जाणवतो. इकडे फिरताना ॐ पर्वताचं पोस्टर शोधतोय, पण कुठेच मिळत नाहीय. आता लवकरच परत जायचं आहे. पण तत्पूर्वी शक्य तितकं फिरल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.

पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १२: रमणीय चंडाक हिल परिसरात २० किमी ट्रेक

(माझे हिमालय भ्रमंती, ध्यान, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख वरच्या ब्लॉगवर उपलब्ध. निरंजन वेलणकर 09422108376 niranjanwelankar@gmail.com फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन इ. संदर्भातील उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर आपला नंबर आणि नाव वरील क्रमांकावर पाठवू शकता. धन्यवाद.)

समाजजीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

16 Feb 2022 - 5:26 pm | चौथा कोनाडा

किती सुंदर !
💖
साधंसुधं ओघवतं वर्णन आणि अप्रतिम प्रचि या मुळं स्वत:च या प्रदेशातून फिरतो आहे की काय असं वाटतं !

निसर्गरम्य अश्या बस्तडी गावाची वाताहत वाचताना कसं तरी झालं, या प्रदेशातल्या लोकांचं जीणंच खडतर !

|| पु भा प्र ||

Nitin Palkar's picture

16 Feb 2022 - 8:29 pm | Nitin Palkar

हेच म्हणतो.

अतिशय सुरेख लेखमाला चालली आहे. सगळे भाग एका पाठोपाठ वाचले.
फोटो तर छान आहेतच. पण तुमचे लेखनही अगदी वेगळ्याच विश्वात घेऊन जाते.

आमच्याने तर अशी ट्रीप होणे अवघड आहे. खूप वर्षांपूर्वी हिमाचल आणि इतर जागी गेले होते. तुम्ही म्हणता तसे खरंच इथे आयुष्य सोपे नाही. एकेक बादली पाणी आणायला एव्ढ्याश्या पायवाटेवरुन चालणारे लोक दिसायचे. बस्तडीच्या घटनेबद्दल वाचून वाईट वाटले. पण जीवनचक्र थांबत नाही हेही खरेच.

मार्गी's picture

18 Feb 2022 - 9:16 am | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Feb 2022 - 9:25 am | ज्ञानोबाचे पैजार

वाचतो आहे,
पैजारबुवा,