नवी दिल्ली @ 110

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
12 Dec 2021 - 8:52 am

ब्रिटनचे राजे जॉर्ज (पंचम) आणि राणी मेरी यांचा भारताचे सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक सोहळा 12 डिसेंबर 1911 ला दिल्लीतील निरंकारी सरोवराजवळच्या बुरारी मार्गावर पार पडला होता. त्यासाठी खास ‘दिल्ली दरबार’ भरवण्यात आला होता. ब्रिटनच्या राजा आणि राणीचा भारताचा सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक करण्यासाठी दिल्लीत भरवण्यात आलेला हा तिसरा दरबार होता. राज्याभिषेकानंतर लगेचच सम्राट जॉर्ज (पंचम) याने ब्रिटिश भारताची राजधानी कोलकत्याहून दिल्लीला स्थानांतरित केल्याचे घोषित केले. त्यानंतर 15 डिसेंबर 1911 रोजी दिल्लीतील कँपाच्या ठिकाणी सम्राट जॉर्ज यांनी नव्या राजधानीची कोनशिला बसवली.
12 डिसेंबर 1911 च्या ‘दिल्ली दरबार’नंतर रायसीना टेकडीवर भारताच्या व्हाईसरॉयसाठीचे निवासस्थान आणि अन्य इमारती उभारण्यास सुरुवात झाली आणि नवी राजधानी नवी दिल्ली म्हणून उदयाला येऊ लागली. नव्या राजधानीच्या उभारणीचे काम तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्स यांच्या देखरेखीखाली सुरू झाले. ही नवी राजधानी वसवण्याची जबाबदारी सर एडविन ल्युटेंस आणि हर्बर्ट बेकर या ब्रिटिश वास्तुरचनाकारांकडे सोपवण्यात आली.

ब्रिटिश साम्राज्यातील सर्वात महत्वाची वसाहत असलेल्या भारताच्या प्रशासकीय प्रमुखाचे, गव्हर्नर-जनरलचे निवासस्थानही भव्य, वैशिष्टपूर्ण आणि ब्रिटिश साम्राज्याच्या लौकिकाला साजेसे असावे याकडे विशेष लक्ष दिले गेले होते. त्यामुळे व्हाईसरॉय्ज हाऊसची उभारणी करत असतानाच व्हाईसरॉयच्या विविध प्रशासकीय विभागांसाठी व्हाईसरॉय्ज हाऊसच्या जवळच साऊथ आणि नॉर्थ ब्लॉक्सही उभारण्यास सुरुवात झाली. नव्या राजधानीत उभारल्या गेलेल्या सर्व महत्वाच्या इमारतींसाठी पिवळसर आणि तांबूस रंगातील दगड आणि वालुकाश्माचा वापर करण्यात आलेला आहे. व्हाईसरॉयच्या निवासस्थानाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी 17 वर्षे लागली. 1931 मध्ये नव्या राजधानीच्या उद्घाटनाबरोबरच व्हाईसरॉय्ज हाऊसचेही औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
पहिल्या महायुद्धातील भारतीयांचे योगदान आपण विसरलेलो नाही हे दर्शवण्यासाठी त्या महायुद्धातील शहीद भारतीय जवानांच्या शौर्याची आठवण म्हणून नवी दिल्लीत एक युद्धस्मारक उभारण्याची घोषणा केली गेली. ते स्मारक म्हणजे आजचे इंडिया गेट (सुरुवातीचे नाव – ऑल इंडिया वॉर मेमोरियल).

स्वातंत्र्यपूर्व काळात इंडिया गेटच्या मागील बाजूच्या तळात असलेल्या तांबड्या दगडातील छत्रीमध्ये सम्राट जॉर्ज (पंचम) याचा पुतळा होता. स्वातंत्र्यानंतर तो पुतळा तेथून हटवला गेला. या इंडिया गेट आणि व्हाईसरॉय्ज हाऊसदरम्यान तीन किलोमीटर लांबीचा आणि साठ फूट रुंदीचा किंग्स वे उभारण्यात आला. स्वातंत्र्यानंतर तो राजपथ म्हणून ओळखला जाऊ लागला.

पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर माँटेस्ग्यू-चेम्सफर्ड सुधारणांमुळे लागू झालेल्या भारत सरकार अधिनियम-1919 नुसार केंद्रीय विधिमंडळ अस्तित्वात येणार होते. त्याची इमारत रायसीना टेकडीच्या परिसरातच बांधण्याचे ठरले. ती इमारत म्हणजेच आजचे संसद भवन (Parliament House). 12 फेब्रुवारी 1921 रोजी ड्युक ऑफ कनॉट यांच्या हस्ते त्याची पायाभरणी आणि गव्हर्नर-जनरल लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते 18 जानेवारी 1927 रोजी उद्घाटन झाले. पिवळसर आणि तांबड्या दगडांचा वापर करून उभारलेली ही वर्तुळाकार इमारत असून तिच्या पहिल्या मजल्यावरील व्हरांड्याच्या भोवतीने असलेले 26 फूट उंचीचे 144 स्तंभ या इमारतीची शोभा वाढवत आहेत.

नव्या राजधानीतील व्यावसायिक केंद्र म्हणून 1929 ते 1933 दरम्यान कनॉट प्लेसची निर्मिती केली गेली. त्याचबरोबर तीन मूर्ती भवन, नॅशनल स्टेडिअम, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, संस्थानिकांसाठीची निवासस्थाने अशा अनेक महत्वाच्या इमारतीही या काळात नवी दिल्लीत उभारल्या गेल्या.

आज नवी दिल्ली भारताची राजधानी होऊन 110 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पाठोपाठ भारताच्या स्वातंत्र्यालाही 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून नवी दिल्लीतील राजपथ, रायसीना परिसर आणि अन्य ठिकाणांचा चेहरामोहरा बदलला जात आहे. त्यासाठी सुमारे 30,000 कोटी रुपयांचा Central Vista प्रकल्प राबवला जात आहे.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2021/12/110.html

कलाइतिहासमुक्तकराजकारणलेख

प्रतिक्रिया

कंजूस's picture

13 Dec 2021 - 5:01 am | कंजूस

याची गरज काय भारताला?

अनन्त अवधुत's picture

14 Dec 2021 - 4:07 am | अनन्त अवधुत

.

सेन्ट्रल विस्टा प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत, आत्ताकुठं विजय चौक वगैरे खोदत आणले आहेत, पुढे पायाभरणी अन बांधकाम वेळेत कसे होईल कळेना मला तरी.

पुढेमागे खासदार संख्या जवळपास १००० होणार असे काही लोक बोलतात, त्यांना (वाढीव लोकप्रतिनिधी मंडळीला) बसायला, काम करायला इत्यादी जागा अपुरी पडू नये म्हणून नवीन सेन्ट्रल विस्टा बनविण्याचा उद्योग सुरू आहे असे वाटते.

बाकी अजून अद्ययावत माहिती कोणाकडे असली तर वाचायला आवडेल.

पराग१२२६३'s picture

14 Dec 2021 - 10:26 am | पराग१२२६३

26 जानेवारीच्या हे काम उरकायचं आहे. त्याबाबत शंका आहेच. दिल्लीला माझे काही वर्षांत जाणे झालेले नाही. तरीही सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प रखडलेला आहे असे जाणवत आहे.