लॉकडाऊननंतरचा पहिला प्रवास

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
24 Oct 2021 - 11:25 am

कोयनेचे आरक्षण केल्यावर मी सकाळी लवकरच कोल्हापूरच्या श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर पोहचलो. लॉकडाऊनच्या परिस्थितीचा परिणाम रेल्वेच्या प्रत्येक बाबीवरही दिसत होता. स्थानकात प्रत्येकाला तिकीट तपासूनच प्रवेश दिला जात होता. दोन नंबरच्या फलाटावर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी कोयना उभी होतीच. अजून बाकीच्या गाड्या सुरू झालेल्या नव्हत्या. त्यामुळे एरवी कोयना सुटण्याच्या आधी दिसणारी प्रवाशांची गर्दी आणि लगबग यावेळी दिसत नव्हती.

कल्याणचे निळ्या रंगातील दोघे डब्ल्यूडीएम-3 डी कार्यअश्व आमच्या गाडीचे सारथ्य करण्यासाठी सज्ज होते. लोको पायलट्सकडून गाडी सुरू करण्याआधीची सर्व प्रक्रिया पार पाडली जात होती. स्टेशनवरच्या शांत-शांत वातावरणातच मी कोयनेमध्ये माझ्या डब्याजवळ पोहचलो. त्या डब्याचे दोनच महिन्यांपूर्वी ‘उत्कृष्ट डब्या’मध्ये रुपांतर करण्यात आलेले होते; तरीही डबा फारसा सुस्थितीत वाटत नव्हता.

सकाळी ठीक 08:05 वाजता कोव्हीड-19 विशेष कोयनेने मुंबईच्या दिशेने कूच केले. नेहमी कोल्हापूरहूनच भरणारे डबे आज मोकळे-मोकळे होते. कारण लोकांचे गावाला जाणे आता कमी झालेले होते आणि प्रवासावरही अजून काही निर्बंध होते. माझ्या पुढच्या सीटवर बसलेल्या हिंदीभाषिक प्रवाशांचीही कोरोना, लॉकडाऊन आणि कमी गर्दी यावर चर्चा सुरू होती. सकाळचं कोवळं उन अंगावर घेत मी प्रवास अनुभवायला लागलो होतो. 08:35 ला हातकणंगल्यात गाडी आली आणि अगदी मोजकेच प्रवासी गाडीत चढले. आधीच्या आणि आताच्या परिस्थितीतील विरोधाभास पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसला. पुढे मिरजेच्या आधी 15 किलोमीटरवर लोहमार्गाच्या दुरुस्तीमुळे ताशी 30 किलोमीटरची वेगमर्यादा ठेवली गेली होती. तिथे कोयनेचा वेग त्यानुसार कमी करण्यात आला होता.

कोयना 09:11 ला मिरजेत दाखल झाली. इथेही गर्दी आत आलीच नाही. फळवाले, इडली-सांबार, वडापाववाले हेही कुठे फारसे नव्हते. बाकीचे फलाटही लोकांची वाट पाहत होते. सगळंच पूर्वीच्या मानानं सामसुम होतं. तिकडे लोको पायलट आणि गार्ड लॉबीत मात्र ड्युटीवर आलेल्या लोको पायलट्स आणि गार्डची ड्युटीवर रुजू होण्याची पूर्वतयारी झालेली होती. लॉबीतील ब्रेथ लायझर चाचण्या, उपस्थिती, इंजिनियरींग बुकमधल्या नोंदींची पडताळणी या सगळ्या बाबींची पूर्तता करून ते फलाटावर उभे होते. म्हैसुरूला जाण्याऱ्या एक्सप्रेसवर त्यांची ड्युटी होती आणि ती गाडी कोयना गेल्यावर मिरजेत दाखल होत होती.

कोयना भिलवडीला आली, तेव्हा तिथे रिकामी डेमू आणि केशरी-पिवळसर रंगातील डब्ल्यूडीएम-3 डी इंजिनासोबत एक क्रेन गाडी (Departmental Train) तिची वाट बघत उभ्या होत्या. त्यापैकी डेमूला मिरजेकडे, तर क्रेनच्या गाडीला पुण्याकडे जायचे होते. भिलवडीतून सुटल्यावर सातच मिनिटांत किलोमीटर क्रमांक 243 वर कोयनेला आपला वेग पुन्हा कमी करावा लागला, कारण पुन्हा ताशी 30 किलोमीटरची वेगमर्यादा तिथे होती. खरं तर या वेळी कोयना किर्लोस्करवाडीत हवी होती, पण सततच्या वेगमर्यादांमुळे आज ती 17 मिनिटं उशिरा किर्लोस्करवाडीत पोहचली. तिथे गोंदिया जं.-कोल्हापूर महाराष्ट्र कोव्हिड-19 विशेष पुण्याच्या गोऱ्यापान डब्ल्यूडीपी-4डी कार्यअश्वांच्या जोडीबरोबर उभी होती.

12:24 ला साताऱ्यात पोहचलो, तेव्हा तिथे एक पूर्ण आणि एक अर्धी अशा रिकाम्या डीएमयू उभ्या होत्या.
आता वाठारनंतर यू-टर्न असलेला छोटा घाट जवळ आला होता. आदर्की स्थानकाच्या आधी, स्थानकात आणि त्याच्या पुढे अनेक तीव्र वळणे आहेत. ती झिग-झॅग वळणे पार करत आदर्कीला पोहचलो. तिथे कोयनेसाठी हजरत निझामुद्दीन-यशवंतपूर जं. कोव्हीड-19 विशेष कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्पेस रोखून ठेवलेली होती. कोयना आदर्की ओलांडून बोगद्यात यू-टर्न घेऊन पुढे जात असताना संपर्क क्रांती पुढच्या प्रवासाला निघालेली दिसली.

आता 13:32 ला लोणंद आले आणि तिथे कोयनेत थोडीशी गर्दी चढली. त्यानंतर दहाच मिनिटांत निरा नदी ओलांडून कोयनेनं पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. निऱ्याला दोन मिनिटांचा थांबा घेऊन माझ्या प्रवासातील शेवटच्या अधिकृत थांब्याच्या दिशेने (जेजुरी) कोयना वेगाने निघाली.

दुपारी ठीक सव्वादोन वाजता कोयना जेजुरीत आली होती. तिथे कोल्हापूरकडे जाणारी कोयना पुण्याच्या डब्ल्यूडीपी-4 डी कार्यअश्वाबरोबर आधी येऊन आमची वाट बघत थांबली होती. तिच्या पलीकडे नव्याकोऱ्या रिकाम्या एलएचबी डब्यांची गाडी उभी करून ठेवलेली होती. पुढे शिंदवण्याचा घाट उतरून आळंदीत आलो. त्यावेळी मिरजेच्या दिशेने जाणारी मालगाडी दोन डल्ब्यूडीजी-4 इंजिनांसह लूप लाईनवर कोयनेनं मार्ग मोकळा करून देण्याची वाट पाहत उभी होती. त्यानंतर फुरसुंगी, सासवड रोड, घोरपडी स्थानकांना ओलांडत कोयना दुपारी 15:22 वाजता म्हणजे नियोजित वेळेच्या 18 मिनिटं आधीच पुण्यात पोहचत होती. त्यानंतर लॉकडाऊनोत्तर काळातील माझा पहिला प्रवास अनेक बदल अनुभवत पूर्ण झाला. नेहमी कोयनेतून पुण्यात उतरल्यावर दिसणारी गर्दी यावेळी मात्र नव्हती.

लिन्क
https://avateebhavatee.blogspot.com/2021/10/blog-post_24.html

मुक्तकप्रवासलेखअनुभव

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

24 Oct 2021 - 5:19 pm | चौथा कोनाडा

रोचक प्रवास तपशील !
नेहमी पेक्षा विपरित परिस्थितीत प्रवास करणे एक वेगळाच अनुभाव असतो तो लेखनातून जाणवला !

पराग१२२६३'s picture

24 Oct 2021 - 6:33 pm | पराग१२२६३

धन्यवाद.

तुम्हाला रेल्वे एंजिन किंवा एकूण रेल्वे मनापासून आवडते असं वाटतं आहे.. छान details लिहिले आहेत

पराग१२२६३'s picture

25 Oct 2021 - 8:21 am | पराग१२२६३

रेल्वे हा माझा खरंच जिव्हाळ्याचा विषय आहे. धन्यवाद.

सुबोध खरे's picture

26 Oct 2021 - 10:18 am | सुबोध खरे

रेल्वेचे विद्युतीकरण वेगाने होत असल्याने अतिरिक्त डिझेलची इंजिने उपलब्ध होत आहेत त्यामुळे बऱ्याचशा गाडयांना पूर्वी जिथे एकच इंजिन होते तेथे दोन इंजिने लावलेली दिसत आहेत. उदा कोकण रेल्वे वरच्या गाडयांना सर्रास दोन इंजिने दिसतात.

पूर्वी (आणि अजूनही) कोयना एक्स्प्रेस या गाडीला डब्ल्यूडीपी-4डी हे ४५०० अश्वशक्तीचे इंजिन असे त्याजागी दोन डब्ल्यूडीएम-3 डी इंजिने म्हणजे ३३०० + ३३०० = ६६०० अश्वशक्ती उपलब्ध झाली आहे यामुळे आता गाडयांना वेग घेण्यासाठी आणि थांबवण्यासाठी लागणार वेळ कमी झाला आहे.

जाता जाता-- दूरदृष्टीचा अभाव म्हणा किंवा राजकारण म्हणा पूर्ण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण होत असताना १२००० अश्वशक्तीची डिझेल इंजिने भारतात बनवण्याचा प्रकल्प चालू केला आहे त्यामागचे नक्की कारण समजत नाही.

पराग१२२६३'s picture

26 Oct 2021 - 10:28 pm | पराग१२२६३

सुबोध खरे जी, पूर्ण लोहमार्गांचे विद्युतीकरण होत असताना १२००० अश्वशक्तीची डिझेल इंजिने भारतात बनवून ती निर्यात करण्यावर भर दिला जाईल. पूर्ण विद्युतीकरणामुळे रेल्वेचे या ना त्या प्रकारचे नुकसान होणार आहेच.