अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग २)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in जनातलं, मनातलं
7 Oct 2020 - 2:40 pm

अफझलखानः-
अफझलखान हा मुळचा अब्दुल्लाखान.एका भटारीण बाईचा मुलगा.पण आपल्या अंगभुत गुणाने आणि पराक्रमाने तो मोठा झालेला होता. अफझलखान हि त्याला विजापुर दरबाराने दिलेली पदवी होती. स्वभावाने अत्यंत क्रुर असा हा ईसम.कपट आणि दगाबाजी हि त्याच्या स्वभावाची वैशिष्ट्येच होती. ज्या शहाजी राजांच्या खांद्याला खांदा लावून बसवपट्टणची लढाई जिंकली त्या शहाजी राजांना जिंजीच्या वेढ्यात कैद करताना त्याचे हात जराही थरथरले नाहीत.
खानाच्या कपटी स्वभावाची आणखी दोन उदाहरणे सांगता येतील.शिवरायांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांच्या मृत्यस हाच अफझलखान कारणीभूत ठरला, कर्नाटक मध्ये संभाजीराजे आदिलशहकडून लढत असताना त्यांना कुमक कमी पडली, आदिलशहाने खानाला कुमक घेऊन जाण्यास सांगितले पण खान गेला नाही, अन त्यामुळे संभाजीराजे पडले.
तसेच रणदुल्ला खान अन कस्तुरीरंगन राजाचे तुंबळ युद्ध सुरू होते. दोन्ही बाजूंचे अतोनात नुकसान झाले होते अन शेवटी त्यांच्यात तह करायचा ठरला. रणदुल्ला खानाकडून अफजलखान तहाला बसला. अन कपटाने खानाने कस्तुरीरंगनचे मुंडके तलवारीने उडवले व बाहेर नेऊन सैन्याला दाखवले अन सैन्य शरण आले. असा हा खान महाकपटी अन कावेबाज होता. त्याची खूपच दहशत होती. त्यामुळे खानाला भयंकर अहंकार होता. त्यामुळे त्याने स्वतःचाच एक वेगळा शिक्का तयार करवून घेतला होता.


तो गर्वाने स्वताला कुफ्रशिकन आणि बुतशिकन म्हणवून घेइ. बुतशिकन म्हणजे 'मुर्तीचा विध्वंस करणारा' आणि कुफ्रशिकन म्हणजे 'मुर्तीपुजकांचा नाश करणारा'.त्याला एक स्वतंत्र शिक्का होता त्याच्या शिक्क्यात मजकूर असा
"गर अर्ज कुनद सीपहर अअला फजल फुजला व फजल अफजल अझ हर मुलकी बजाए, तसबीह आवाझ आयद अफजल अफजल." याचा अर्थ- उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारलं कि, या पृथ्वीतलावरचा श्रेष्ठ माणूस कोणय ? तर सगळीकडून आवाज येईल "अफजल" "अफजल."
विजापुरजवळचे तोरवे हे गाव त्याने वसवले आणि त्याला नाव दिले अफझलपुर. विशेष म्हणजे हाच ईसम कर्तव्यकठोर मात्र होता.परमेश्वर मानवाला जन्म देताना त्याच्यात सदगुण आणि दुर्गुण यांचे आश्चर्यकारक मिश्रण करतो. 

अफझलची सातारा जिल्ह्यातील बोरखळ व किन्हई येथील ब्राम्हणांना दिलेले खुर्दखत उपलब्ध आहेत. अली आदिलशहाच्या कारकीर्दीत कोकणातील संगमेश्वरजवळ केसो व रंगो सरदेसाई यांचे ईनाम अब्दुल नबी फक्रुद्दीन पटीदार याने बळकावले होते.हा अन्याय दुर करुन ते पुन्हा सरदेसाई यांना मिळावे असे आदिलशाही फर्मान अफझलच्या शिफारसीवरुन दिले गेले. 

 

 तसेच हे पत्र शिरवळच्या निगडे देशमुखांना आलेले आहे,ज्यात अफझलखानाने एक तसु ही जमीन पडीक राहु देउ नका असे बजावले आहे. अर्थात हि वागणुक सहिष्णुतेची आणि न्यायाची असली तरी त्याला कारण बहुधा राज्यकर्ते मुसलमान असले तरी बरेच लढणारे सरदार हिंदू होते आणि मुख्य म्हणजे बहुसंख्य प्रजा हिंदु होती.त्यांना दुखावून चालणार नव्हते.

 नरसोभट बिन रंगभट चित्राव यास वडिलोपार्जित धर्मादाय सनद दिली...ती अफझलखानने पुन्हा नवी (renew) करून दिली !
अफझलखान हा १२-१५ वर्षे वाईचा सुभेदार होता,याने परगण्यातील कित्येत देवळांना,पुजार्यांना तसेच पूजेअर्चेसाठी सनदा दिल्याचे पुरावे आहेत.त्यातीलच एक हा वरील पुरावा.

   
शिवाजी महाराजांनी जावळीच्या गादीवर कोण बसणार यात हस्तक्षेप करुन विजापुर दरबाराला न भीक घालता आपल्या मर्जीतील यशवंतराव मोरेला चंद्रराव केल्यामुळे आदिलशाही भयंकर चिडली होती.त्यांनी अफझलखानाला वाईला पाठवून जावळी ताब्यात घ्यायचा आदेश  दिला.अशाप्रकारे अफझलखान वाईचा सुभेदार झाला.
शिवाजी राजांनी नेमलेला यशवंतराव या चंद्ररावला बाजुला करुन आदिलशाही दरबाराला सोयीची व्यक्ती नेमणे व जावळीचा प्रदेश पुन्हा ताब्यात घेणे यासाठी अफझलखानाची नेमणुक झाली होती, शिवाय जोर खोरे हणमंतराव मोरे याने काबीज केले होते.तेही ताब्यात घेणे हा अफझलखानाचा हेतु होता.अर्थात हे काम स्थानिक माहितगार व्यक्तिशिवाय होणे शक्यच नव्हते.म्हणून अफझलखानाने कान्होजी जेध्यांना जुलै १६४९ पत्र पाठविले ते असे.

 या पत्रानंतर ३० जुलै १६४९ मध्ये दुसरे पत्र पाठविले.ते असे

 

 या पत्रात अफझलखान स्वतः जावळीवर जाणार असून आपल्या मदतीला येण्यासाठी त्यांने कान्होजींना अनेक सवलती व बक्षीसे देउ केलीत.कान्होजी प्रमाणे अशीच पत्रे बाकीच्या देशमुखांनाही गेली होती.त्यापैकी काहीजण मदतीला गेलेही होते.

   
पुढे हणमंतराव मोर्‍याला मारुन जोर खोरे ताब्यात घ्यायचा खानाचा इरादा होता.त्यासाठी कान्होजी जेध्यांची मदत पाहिजे म्हणून त्याने कान्होजींना सप्टेंबर १६४९ मध्ये आणखी एक पत्र लिहीले. मात्र कान्होजींनी शिवाजी राजांना स्वराज्य कार्यात मदत करायचे वचन दिले असल्यामुळे खानाच्या या पत्रांना भीक घातली नाही.अर्थात खानाला फार मोठी हालचाल करता आली नाही.दरम्यान इ.स.१६५५ मध्ये कर्नाटकात बंड झाल्यामुळे आदिलशहाने खानाला तिकडे पाठवून दिले.अफझलखान वाईत होता तोपर्यंत मोठी लष्करी हालचाल टाळणार्‍या शिवाजी महाराजांचा दाब आता नाहीसा झाला.त्यांनी तातडीने हालचाल करुन जावळी ताब्यात घेतली.
मोघलांशी तह झाल्यामुळे विजापुर दरबाराला उसंत मिळाली आणि त्यांनी आपले सगळे लक्ष शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्याकडे केंद्रीत केले. अर्थात या स्वारीला नामजद कोणाला करायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे नव्हता.शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे दुसरा विजापुरचा सरदार राजांवर चालून जायला तयार
नव्हता आणी वाई,जावळीचा माहितगार व वाईचा सुभेदार या नात्याने अफझलखानालाच हि जबाबदारी घ्यावी लागणार होती.
मोहीमेचा विडा उचलला:
मार्च १६५९ चा एक दिवस.विजापुर दरबार नेहमीप्रमाणे भरला. आदिलशहाचे आगमन दरबारात झाले, व अल्काबच्या आरोळ्या देण्यात आल्या. त्यावेळी दरबारात अनेक मातब्बर सरदार हजर होते जसे की रणदुल्ला खान, मुस्तफा खान, मुसेखान, अंकुश खान, पैलवान खान. तसेच काही मराठा सरदार मंबाजी भोसले म्हणजे शिवरायांचे चुलत चुलते हे त्यावेळी दरबारी उपस्थित होते. शिवरायांचे मेहुणे फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे दरबारात उपस्थित नव्हते. अन दरबार भरला, कोणत्याही सरदाराला दरबाराचे प्रयोजन ठाऊक नव्हते. नुसती कुजबुज चालू होती सगळीकडे. बडी बेगम ही आदिलशहाच्या डाव्या बाजूला बसली होती. आणि त्यात मागे एका तबकात एक विडा ठेवला, तो सर्वांना दिसला अन मग सरदारांना कळले की कोणतीतरी मोहीम असावी.
बडी बेगम साहिबा संतापून बोलली, “हमने ये दरबार क्यू बुलाया है जानकारी है किसीको?” सर्वांनी नकारार्थी माना डोलवल्या, “उस नाचीज सीवा को गिरफतार करना है, जिंदा या मुर्दा. है ऐसा कोई मर्द सरदार जो इस मूहिम को फतेह कर सके?” अन सगळा दरबार एकदम शांत झाला. सगळे सरदार घाबरले, कारण सर्वजण शिवरायांकडून कधी न कधी पराभूत झाले होते. सर्व आदिलशाही सरदारांचा असा समज होता की शिवाजी म्हणजे भूत. कधी येतो, कुठून येतो, मारतो, कुठे जातो, कोणालाही ठाऊक नव्हते. कोणीही त्यांना पाहिले नव्हते. शिवाजी म्हणजे एक अदृश्य माणूस अशी नोंद तत्कालीन सलातीन मध्ये आढळते. अन या सर्व कारणांमुळे कोणीही विडा उचलायला तयार होईना. बडी बेगम खवळली.
तेवढ्यात मागच्या रांगेतून एक सरदार उठला, अंगाने धिप्पाड, साडेसहा फूट उंच, जणू काही हत्तीचं. त्याच नाव होतं, खान ए मोहम्मद अफजलखान. तो पूढे चालू लागला अन चालताना त्याच्या जडावांचा कररर कररर असा आवाज येऊ लागला. सगळीकडे एकच कुजबुज सुरू झाली, अफझलखान, अफझलखान…. खानाने विडा उचलला आणि त्याने शपथ घेतली. खान म्हणाला “ये सिवा सिवा क्या लगा रखा है. कोण है ये सिवा, पहाड का चुहा.” सगळा दरबार खुश झाला, बडी बेगम खुश झाली. अन तेव्हा खानाला त्या दरबारात खिल्लत दिल्याची नोंद आहे, अन सोबतच आदिलशहाची रत्नजडित कट्यार अन एक लुगडं. लुगडं म्हणजे आपल्याकडे असत ते नाही, लुगडं हा पर्शियन भाषेतील शब्द आहे, सत्कार करताना आपण शाल वगैरे देतो ना त्याप्रकारे एक तलम रेशमी वस्त्र असते त्याला तिकडे लुगडं म्हणतात.
खानाने मोहिमेची तयारी चालू केली. त्यावेळी साधारणतः मार्च १६५९ चा काळ होता. खानाने सैन्याची जमवाजमव केली. खानाचे लष्कर असे होते बारा हजार घोडेस्वार, दहा हजार पायदळ,पंचहत्तर मोठ्या तोफा,चारशे छोट्या तोफा .शिवाय बरोबर अंबरखान्,याकुतखान्,मुसेखान,हसनखान पठाण,अब्दुल सैय्यद्,बडा सैय्यद्,तुझा पहिलवानखान,सैफ खान, सिद्दी हिलाल, अंकुशखान,घोरपडे, पांढरे नाईक, खराटे नाईक, काटे,झुजांरराव घाटगे, कल्याणजी यादव्,शिवाजी देवकांते, शहाजीचा चुलतभाउ मंबाजी भोसले,पिलाजी व शंकराजी मोहीते हे सगळे सरदार होते.वकील म्हणून कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होते.

 

 
याशिवाय अफझलखानाचा मुलगा फाझलखान व आणखी दोन मुल तसेच पुतण्या रहिमखानाला होता.याशिवाय जावळीचा प्रतापराव मोरे खानाला मदत करण्यासाठी होताच.त्याला शिवाजी राजांवर सुड उगवून जावळी पुन्हा ताब्यात घ्यायची होती.
खानाचा पहिला मुक्काम विजापूर वेशीवर पडला. तेव्हा खान युद्धाचे डावपेचआखत होता. अन तेवढ्यात त्याला एक खबर मिळाली की त्याचा निशाणाचा फत्तेलष्कर नावाचा हत्ती मरण पावला. खानाला जबर धक्का बसला. याशिवाय छावणीवर सारखे कावळे ओरडत होते, भर दुपारी सुर्य दिसेना झाला,परवा तर आकाशात ढग नाहीत तरी मोठा आवाज झाला, उल्का पड्ली , रात्री अपरात्री छावणीजवळ कोल्हे ओरडत आहेत, दोनदा निशाणाची काठी मोडली. खडे,धूळ उडवणारा वारा छावणीला नुकसान करुन गेला.  एक हत्ती अंकुश लावून ही उलटा पळत सुटला.असे अनेक अपशकून अफझलखानाला झाले हे सविस्तर शिवभारतात आले आहे.
त्यात खानाचा गुरु, काझी त्याला बोलला माझ्या स्वप्नात दोन दिवस झालं तुझं मुंडक नसलेलं धड येतंय, तू मोहिमेवर जाऊ नये, तुला धोका आहे. खान
रागावला अन खानाने काझीला मारले. खान अशा गोष्टी मानत नव्हताच मुळी.

खानाने स्वतासाठी बनवून घेतलेली कबर ...पण बिचारा तेथे दफन नाही होऊ शकला !(शहाबाग,विजापूर )

स्वारीवर जाण्यापूर्वी निर्वाणीचे उपाय म्हणून त्याने आपल्या ६३ बायकांना जीवे मारले...हाच आकडा काहीजण २०० हि सांगतात नक्की माहिती नाही. स्त्रियांना मारायचे कारण असे कि आपल्या नंतर त्यांनी काही बदमामल करू नये किंवा दुसर्या पुरुषास आपले सुखाचा वारीस करून आपल्या नावास बट्टा लावू नये. Abe Carey’ने आपल्या प्रवास वर्णनात हे सर्व टिपून ठेवले आहे म्हणून आज आपल्याला हा इतिहास समजला.

 या कबरी विजापूर जवळील अफजलपूर येथे पहावयास मिळतात.

अफझलखानच का ?
अफझलच्या निवडीमागे बऱ्याच इतिहासकारांनी अफझल व भोसले घराण्याचा दावा असल्याचा एक सिद्धांत प्रचलित केला आहे. त्याची सत्यासत्यता पडताळून पाहण्याआधी काही गोष्टी येथे विचारात घेणे आवश्यक आहे. विजापूरची आदिलशाही मोडकळीस आली असून काही मोजके एकनिष्ठ सरदार अपवाद केल्यास उर्वरित आदिलशाहीसरदारांचा भर सवता सुभा निर्माण करण्यावरच होता. दुसरे असे कि, महंमद नंतर तख्तावर बसलेला अली हा अनौरस पुत्र असल्याने शहाजी, बहलोलखान, रुस्तमजमा इ. चा त्याच्या वारसा हक्कावर आक्षेप होता. अशा स्थितीत निव्वळ आदिलशाही अभिमानी व पराक्रमी असा अफझलखान आदिलशहास शिवाजीरुपी संकटावर उतारा वाटल्यास त्यात नवल ते काय !
शिवाजी महाराजांवर अफझखानास रवाना करण्यामागे आदिलशहा --- विशेषतः बडी बेगमचे निश्चितच एक धोरण ठरलेलं होतं. शिवाजी राजांचे अस्तित्व व त्याचं वाढत जाणारं प्रस्थ आदिलशाहीच्या नाशास कारणीभूत ठरण्याची तिला रास्त भीती वाटत होती. जरी मोगल दख्खनी सत्तांचे स्वाभाविक शत्रू असले तरी समानधर्मीय तसेच प्रसंगी गोवळकोंड्याच्या मदतीच्या भरवशावर आदिलशाही स्वतःचा बचाव करू शकत होती. शिवाय अफझलची शिवाजी महाराजांवर नियुक्ती करेपर्यंत जरी वारसा युद्धाचा निकाल लागला नसला व अफझल विजापूरातून निघण्यापूर्वी औरंगजेब तख्तावर बसला असला तरी आधी म्हटल्याप्रमाणे धार्मिक कट्टरता वा प्रेमाच्या बळावर मोगली तडाख्यातून या शाहीचा बचाव करण्याची बडी बेगमला उमेद असावी. अर्थात, जास्त व्यावहारिक विचार केला असता शहजादा औरंगजेबाने स्वतःच्या मर्जीने अनाधिकारपणे का होईना विजापूरकरांना निजामशाही कोकणचा भूप्रदेश घेतल्याने जो सध्या शिवाजी राजांच्या ताब्यात होता --- तो प्रदेश फिरून जिंकून घेऊन आपले बळ वाढवणे व भविष्यातील मोगल - शिवाजी अशा संभाव्य युतीला मुळातच खुडून टाकणे असाही दृष्टीकोन विजापूरकरांचा असू शकतो. तात्पर्य, शिवाजी - आदिलशहा यांच्यातील झगडा एका निर्णायक टप्प्याजवळ येऊन पोहोचला होता. या लढ्यात जो जिंकेल त्याचेच नंतर वर्चस्व राहणार होते, हे उघड आहे.
विजापूरकरांनी शिवाजी राजांवर स्वारी आखली खरी परंतु अलीकडच्या काळातील सततच्या मोहिमांमुळे लष्करीदृष्ट्या त्यांना आवश्यक तितके बळ जमवता न आल्याचे उपलब्ध साधनांवरून दिसून येते. अफझलच्या सैन्याचा सरासरी आकडा पंधरा ते वीस हजारांच्या दरम्यान जातो. त्याउलट शिवाजी राजांकडे याहून अधिक सैन्य असल्याचे दिसून येते. परंतु इतिहासकारांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने घटनेचं आकलन करून न घेता, या प्रकरणाचे एकंदरच काल्पनिक - अद्भुत वर्णन करण्यातच धन्यता मानल्याचे दिसून येते.
इ.स. १६५८-५९ च्या सुमारास शिवाजी राजांचे लष्करी सामर्थ्य, विजापूरच्या तुलनेने अधिक वाढले होते किंवा त्याच्या बरोबरीचे बनले होते. शिवाजीसोबत खुल्या मैदानात टक्कर देण्याची ताकद आता आदिलशाहीत तितकीशी राहिली नव्हती. वर्षानुवर्षे चालणाऱ्या अंतर्गत बंडाळ्या आणि निजामशाही, कुतुबशाही व मोगल तसेच कर्नाटकातील लहान - मोठ्या सत्ताधीशांशी वारंवार झुंजण्यात आदिलशाहीचे बरेच नुकसान झाले होते. एकेकाळी असलेला तिचा रुबाब, सामर्थ्य आता पार मोडकळीस आले होते. विजापूरच्या तुलनेने शिवाजी राजांच्या राज्याचा विस्तार जरी लहानअसला तरी लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत शिवाजी महाराजांची तयारी विजापूरकरांच्या तुलनेने अधिक होती. उदाहरणार्थ शिवाजी राजांवरील नियोजित स्वारीत अफझलखानाचे लष्कर घोडदळ व पायदळ मिळून सुमारे वीस - पंचवीस हजार इतके होते तरीही आदिलशाही दरबाराने अफझलखानास शिवाजी राजांसोबत प्रत्यक्ष लढाई न देता शक्यतो त्यांना भेटीच्या निमित्ताने बोलावून दगा करण्याचा कानमंत्र दिल्याचे उल्लेख मिळतात. यावरून असे दिसून येते कि, यावेळी शिवाजी राजांचे लष्करी सामर्थ्य बरेच वाढले होते. सभासद बखरीचा आधार घेतला असता या मोहिमेच्या वेळी खानाइतकेच सैन्य शिवाजी राजांच्या पदरी होते. परंतु या सैन्यात गड - किल्ल्यांवर असलेल्या शिबंदीचा अंतर्भाव केला आहे कि नाही याची निश्चिती होत नाही. असे असले तरी शिवाजी महाराज आणि तत्कालीन सत्ताधीशांच्या लष्करी व्यवस्थेत एक महत्त्वाचा फरक होता व तो म्हणजे त्याचे सैन्य हे खडे सैन्य असून त्यावर प्रत्यक्ष शिवाजी राजांची हुकुमत चाले ! त्याउलट तत्कालीन सत्ताधीशांकडे असे खडे सैन्य तुलनेने कमी असे. मोहीम किंवा युद्धप्रसंग उद्भवल्यास पदरी असलेल्या जहागीरदारांकडून लष्करात खोगीरभरती केली जात असे. या बाबतीत अफझलखानाची फौज देखील अपवाद नव्हती. शिवाजी राजांचे राज्य लहान असल्याने व पदरी बलाढ्य लष्कर असल्यामुळे या सैन्याचा खर्च भागवण्यासाठी त्यांना वर्षभर शत्रूप्रदेशात मोहिमा आखाव्या लागत. सधन प्रदेशात लूटमार कारणे किंवा खंडणी गोळा करणे या दोन मार्गांनी शिवाजी महाराज आपल्या सैन्याचा बव्हंशी खर्च भागवत असत. याठिकाणी हे नमूद कारणे योग्य होईल कि, पूर्णवेळ पगारी सैन्य पदरी बाळगण्याची आर्थिक ताकद शहाजी राजांमध्ये असल्यामुळेच शहाजी महाराजाना एकाचवेळी मोगली आणि विजापुरी फौजांचा सामना करून पेमगीरीवर निजामशाहीची उभारणी करता आली होती !

शिवाजी राजांची वाढती सत्ता जमल्यास नियंत्रणात आणण्यासाठी वा नष्ट करण्यासाठी आदिलशाही विशेष उत्सुक असली तरी याकरता लागणारे पुरेसं सैनिकी सामर्थ्य त्यांच्याकडे अजिबात नव्हतं. त्यामुळेच हरप्रयत्ने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याकरता त्यांनी आपला सर्वोत्तम सरदार --- अफझलखान याकामी नेमला.
विजापूर दरबाराने शिवाजीवरील नियोजित स्वारीसाठी अफझलखानाचीच का निवड केली असावी ? ' शककर्ते शिवराय ' या शिवचरित्राचे लेखक श्री. विजय देशमुख यांच्या मते त्यावेळी एक अफझलखान अपवाद केल्यास विजापूर दरबारी आता कोणी पराक्रमी, स्वामिनिष्ठ व शूर असा सेनानी राहिला नव्हता. उपलब्ध साधनांतील माहिती पाहता देशमुख यांचे मत अगदीच चुकीचे नसल्याचे दिसून येते. अफझलखान विजापुरातून रवाना झाल्याची बातमी शिवाजी महाराजांना त्याच्या हेरांकडून मिळाली असे म्हणता येईल. तसेच खानाच्या अंतस्थ हेतूंची कल्पना विजापूर दरबारातील शिवाजी राजांच्या मित्रांनी कळवली असण्याची अधिक शक्यता आहे. त्याशिवाय मोहिमेची सूत्रे हाती घेताच आदिलशहाने व अफझलखानाने मावळातील देशमुख - वतनदारानंना जी काही आज्ञापत्रे पाठवली त्यातील भाषा पाहता खान शिवाजी महाराजांचा पुरता बंदोबस्त करण्याच्या उद्देशानेच बाहेर पडल्याचे दिसून येते.
इकडे अफझलखानाचा काटा कोणत्याही परिस्थिती काढण्याचा बेत शिवाजी महाराजांनी मनोमन पक्का केल्याचे दिसून येते. कदाचित खानाला मारून टाकण्याची योजना आरंभापासून त्यांच्या मनात नसेल पण त्याचा एकदा सडकून समाचार घेण्याची / पराभव करण्याची इच्छा शिवाजी राजांच्या मनात नसेल असे म्हणता येत नाही. अर्थात, खानाचे भोसले घराण्याशी असलेले वैर, विजापूर दरबारातील त्याचे प्रस्थ आणि त्या दरबाराचे त्याच्यावर अवलंबून असणे व शिवाजी राजांचे तिशीच्या आतील वय लक्षात घेता महाराजांची इच्छा त्याच्या वयानुरूप अशीच होती.
शिवाजी - अफझलखान प्रकरणाचे साधार विश्लेषण श्री. विजयराव देशमुख यांनी आपल्या ' शककर्ते शिवराय ' या ग्रंथात केले आहे. ज्यांना या प्रकरणातील अधिक तपशील जाणून घ्यायचे आहेत अशा जिज्ञासू वाचकांनी त्या ग्रंथाचे वाचन करावे. श्री. देशमुख यांच्या मते, खान आरंभी जावळीमध्ये उतरण्यास तयार नव्हता. उलट शिवाजी राजांना खुल्या मैदानात खेचण्याचा त्याने भरपूर प्रयत्न केला. परंतु पुढे राजकीय परिस्थती इतक्या झपाट्याने बदलली कि खानालाच जावळी प्रांतात उतरणे भाग पडले. देशमुखांनी आपल्या निष्कर्षासाठी जे काही पुरावे दिले आहेत त्यावरून त्यांचे मत यथायोग्य असल्याचे दिसून येते. कित्येक इतिहासकारांचे देखील देशमुखांप्रमाणेच मत असल्याचे दिसून येते
खानाचे हे नियोजित बेत उधळून लावण्याची शिवाजी महाराजांनी दोन आघाड्यांवर तयारी चालवली. खान आला तर थेट वाई वा जावळी परिसराच्या रोखानेच येणार हे हेरून शिवाजी महाराजांनी जशी बचावाची सिद्धता चळवळी --- ज्यामध्ये ओस पडलेला जासलोडगडाचे ' मोहनगड ' असे नामांतर करून तो वसवण्याची त्यांनी तजवीज केली --- त्याचप्रमाणे खानाच्या जहागीर प्रदेशात -- तेरदळ भागावरही एक आघाडी रवाना केली. जेणेकरून खान आपल्या जहागिरीच्या बचावार्थ पुण्याचा रोख सोडून कर्नाटकात गुंतून पडेल. परंतु शिवाजी महाराजांच्या सैन्याला त्या भागातील कृष्ण गौड देसाईने उधळून लावले व खानानेही या स्वारीची फारशी तमा बाळगल्याचे दिसून येत नाही.
या संदर्भात शिवचरित्र प्रदीप मध्ये पृष्ठ क्र. ८३ ते ८६ वर छापलेली पत्रं विशेष उपयुक्त असून त्यानुसार शिवाजी महाराजांनी या प्रांती सुभेदार गंगाजी महादेवला पाठवल्याचे स्पष्ट होते. या स्वारीत कृष्ण गौडा मारला गेल्याचा एका पत्रात उल्लेख आहे परंतु हा प्रकार नेमका कधी घडला म्हणजे दि. ७ ऑक्टोबर १६५९ चं अफझलचं पत्र तेरदळ परगण्याच्या कारकुनांना उद्देशन लिहिलेलं असून त्यानुसार शिवाजी राजांच्या सैन्याचा बंदोबस्त केल्याबद्दल कृष्ण देसाईला इनाम दिल्याचा उल्लेख आहे. परंतु कृष्ण देसाई मेल्याविषयीचा उल्लेख नाही. असो. परंतु यावरून असे दिसून येते कि, खान शिवाजी राजांला मोकळ्या मैदानात खेचायला बघत होता व शिवाजी महाराज खानला जावळीत ओढू पाहत होता, असा सर्वसाधारण समज असल्याप्रमाणे प्रकार नसून प्रत्यक्षात उभयतांचे डावपेच काही वेगळेच असल्याचे दिसून येते. असो.
विजयराव देशमुख आणि इतर इतिहासकारांचे मत काहीही असले तरी जी काही साधने उपलब्ध झाली, त्यांच्या अभ्यासावरून निष्कर्ष हा वेगळाच आहे. विजापुरातून खान जेव्हा बाहेर पडला तेव्हाच त्याला खुल्या मैदानात किंवा सोयीच्या ठिकाणी घेरून त्याचा नाश करण्याचा शिवाजी राजांचा आरंभीचा बेत होता. परंतु, 'अफझलखान ' या नावाचा दरारा असा होता कि, शिवाजी राजांच्या मुत्सद्द्यांनी, सरदारांनी महाराजांच्या विरोधात आपले मत व्यक्त केले. खानाशी लढाई न करता तहाच्या वाटाघाटी करून हा प्रश्न सोडवावा असे शिवाजी राजांच्या सल्लागारांचे मत होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपला मूळचा लढाईचा बेत बदलून नवीन डाव टाकला. याविषयी सभासद बखरीमधील उल्लेख मननीय आहे. या बखरीनुसार खान विजापुरातून बाहेर पडला तेव्हाच शिवाजीं महाराजांनी त्याला जावळीमध्ये घेरण्याचे ठरवले होते परंतु त्याच्या सल्लागारांनी लढाईच्या विपरीत सल्ला दिल्याने शिवाजी राजांनी तो बेत रद्द केला. पुढे भवानीमातेचा त्यांना दृष्टांत झाला व हे वर्तमान सर्व मुत्सद्द्यांना समजल्यावर त्यांना एकप्रकारे मानसिक बळ प्राप्त झाले व जावळीमध्येच खानाचा निकाल लावण्याच्या शिवरायांच्या बेतास त्यांनी संमती दिली.
अफझलखानास मारून टाकण्याची शिवाजी महाराजांची इच्छा आरंभापासून होती किंवा नव्हती पण, जावळीमध्ये जेव्हा खानाला येण्यास भाग पाडण्याचे ठरले तेव्हाच खानाचा काटा काढण्याचे शिवाजी महाराजांनी नक्की केले होते. या दृष्टीने सभासद बखरीत पंताजी गोपीनाथ व शिवाजी राजे यांचा जो संवाद आलेला आहे तो सूचक आहे. हा संवाद जसाच्या तसा घडला नसला तरी खानाचा निकाल लावण्याचे शिवाजी महाराजांनी आधीच नक्की केले असल्याचे यातून दिसून येते.
तुळजापुर्,पंढरपुर तिर्थस्थळांना उपद्रवः-
अफझल विजापूर येथून निघाला, पण शिवाजी महाराजांचा मुख्य जहागीर असलेल्या पुण्यात येण्याऐवजी त्याने तुळजापूर, पंढरपूर इत्यादी ठिकाणी हल्ला करुन तेथील मंदिरे नष्ट केली. शिवाजीं राजांना डोंगरावरून मोकळ्या मैदानावर खेचणे हा त्याचा हेतू होता, जिथे मराठ्यांचा पराभव करणे सोपे होईल. त्याचा मार्ग, हा थोडा हास्यास्पद वाटतो. असा प्रयत्न करणे ही एक चांगली रणनीती होती, परंतु मराठ्यांना त्यांची शक्ती आणि कमकुवतपणा यांचे उत्कृष्ट ज्ञान होते आणि म्हणूनच त्यांनी बाहेर येण्यास नकार दिला. 
  विजापुर ते वाई- अफझलखानाचा मार्ग

शिवरायांची मुत्सद्देगिरी
शिवाजी महाराजांची मुत्सद्देगिरी येथे नोंद करावी. अफझलला विनाश थांबवण्यासाठी पत्र पाठविण्याची तसदीही घेतली नाही. अफझलला अशा प्रकारे ती योजना सोडावी लागली.

काही अभ्यासकांच्या मते अफझलखानाने तुळजापुर्,पंढरपुराला उपद्रव दिला नाही.तुळजापुर तर त्याच्या मार्गात येतच नव्हते.मात्र एक लक्षात घेणे गरजेचे आहे कि हि चाल अफझलखानाने मुद्दाम केली होती.जावळीच्या बिकट मुलुखातून शिवाजी राजांना बाहेर काढणे यासाठी त्याला काहीही करणे आवश्यक होते,शिवाय सभासदाच्या बखरीत तसे स्पष्ट वर्णन आहे. आणखी एक मुद्दा ,हे युद्ध सोडले तर पुढे शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या परिसरात कोणतेही मोठे युध्द केले नाही आणि त्यांचा मुक्काम राजगडावर असायचा तरीही त्यांनी प्रतापगडावरच भवानी मातेची मुर्ती स्थापन करुन मंदिर उभारले ते घटनेची आठवण म्हणून असावे.
अफझलखानाचा मोहीम मार्ग विजापूर -तोरवे-डोन-माणकेश्वर-करकंव-भोस-शंभू महादेव-मलवडी-रहिमतपूर-वाई.
(भोसले बखर मध्ये खान भिमातीरी होता असा उल्लेख आहे, )
खान स्वराज्यावर चालून निघाला:-
अफझलखान जुन १६५९ मध्ये विजापुरवरुन स्वराज्याच्या दिशेने निघाला.त्यावेळी अलि आदिलशहाने मावळातील देशमुखांना खानास मदत करण्याची पत्रे
पाठविली.त्यात एक फर्मान कान्होजी जेधेंना आले ते असे.

हे मुळ फारसी फर्मान

     हे त्याचे भाषांतर

कान्होजी जेधे शिवरायांस मिळाले !

     जेधे बाजी पासलकर यांचे जावई असल्याने जेधे आले कि पासलकर येतील असे खानाला वाटले, खानाने जेध्यांना आपल्या वाई प्रांत हवालदार त्र्यंबक कान्होच्या कडून निरोप पाठवला.

"आपला जमाव घेऊन सिताबीने यावे,खर्चाची तरतूद स्थळी केली जाईल,आम्ही तायाघाट ओलांडून गेलो आहोत"

खान तोपर्यंत वाईहून निघोन कुसगाव,चिखली,तायाघाट ,गुव्हेघर,गुताड असे करत लिंगमळ्यापर्यंत पोचला.

खालील पत्र जेध्यांस खानकडून आलेले आहे, ते पत्र जोडून अजून एक पत्र जेध्यांनी शिवरायांना पाठवले व या कमी त्यांचा सल्ला विचारला.

जेध्यांना आलेले खानाचे पत्र जोडून जेध्यांनी शिवरायांना पाठवले. यावेळी साधारणतः ऑक्टोबरचा दुसरा आठवडा सुरू होता. नाईकांनी आपली पाचही मुलांना सोबत घेतलं अन राजगडच्या खोऱ्यात शिवापट्टण येथे ते महाराजांच्या भेटीस आले, त्यांनी राजांना फर्मान दाखवलं. राजे बोलले “कान्होजी काका तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. प्रतापराव मोरे गेले, खंडोजी खोपडे गेले, तुम्हीही जावं खानाकडे, वतन मिळेल.” अन राजांचे हे करारी शब्द कान्होजींच्या काळजाला लागले. मागेच ओसरीवर ठेवलेला पाण्याचा तांब्या त्यांनी हातात घेतला, अंगठ्यावर तो रिकामा केला व सगळं पाणी आपल्या पाचही मुलांवर शिंपडल. अन कान्होजी कडाडले, ” राज वतनाची गुडी न्हाई अमास्नी, रक्तात हरामखोरी न्हाई आमच्या. एकदा सबुद दिला की मागे हटणारी जात न्हाई या म्हाताऱ्याची. ” अन असे म्हणताच राजांनी कान्होजींना कडकडून मिठी मारली.
कान्होजी जेधे हे शहाजीराजांचा उजवा हात होते. बारा मावळांत त्यांचा शब्द मोडायची कोणाच्यात हिंमत नव्हती. अन राजांनी त्यांना जबाबदारी दिली की
मावळातील सर्व मराठा सरदारांना एक करून स्वराज्यात आणायची. अन कान्होजींनी सर्व सरदारांना एकत्र आणले, त्यात हैबतराव शिळीमकर, मोरे, काटके, बेचकर असेच अनेक सरदार होते.
जेधे आपल्या बाजूने आल्यावर राजांनी खलबते करण्यास मोरोपंत,सोनोपंत,नेतोजी पालकर,निळोपंत,रघुनाथ बल्लाळ,गोमाजी नाईक पानसंबळ,सुभानराव नाईक इ. मातब्बर बोलावले.
शिवराय आणि खानाची सरदारांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी केलेली मुत्सद्देगिरी: -
पांढरे,घाटगे,घोरपडे,इंगळे हे लोक तर खानच्या बरोबर होतेच त्या बरोबरच खानाने मोठी गौरवाची पत्रे लिहून मावळातील लोक आपल्या बाजूने वळविण्यास सुरुवात केली.शिळीमकर,जेधे ,बांदल,जगदाळे,धुमाळ इ. लोकास आपल्या हस्तका मार्फत आपल्या बाजूने घेण्यास सुरुवात केली.शिळींमकरांचा तंटा शिवाजी राजांनी सोडवला होता त्यामुळे ते २ भाऊ शिवाजी राजांच्या बाजूने आले तर विठोजी नाईक खानच्या बाजूला गेला. तसेच मंबाजी भोसलेला खानाने ओढला तर बाबाजी भोसलेला चिठ्ठी लिहून शिवरायांनी बोलावून घेतले.
अशी हि ओढाओढी दोन्ही बाजूने चालू होती पासलकर,ढोर (धुमाळ),मरळ,बांदल ,ढमाले यांना आपल्या बाजूने वळवून शिवाजी महाराजांनी त्यांस कडून शपथा घेतल्या!
(तळटीप:- ढमाले हे मुळचे मद्रासकडील तिरुनवेल्ली प्रांतात रहाणारे.मुळशी पेट्यातील पौड खोर्‍यात यांची शेकडो वर्षांची वस्ती आहे.यांचा किताब 'राउतराव' असा होता.यांचे नाव रामाजी राउतराव ढमाले.शिळीमकरांच्या शके १५७९ मधील शिवाजी राजांनी दिलेल्या एका महजरावर यांची साक्ष आहे.
मरळ-यांचे नाव बाबाजी बिन कान्होजी मरळ.हे झुंजारराव असा किताब लावीत.हे कानद खोर्‍यातील देशमुख.
ढोर- हे वेळवंड खोर्‍यातील देशमुख.मुळ आडनाव धुमाळ.यांचा भाउबंदकीचा तंटा शिवाजी महाराजांनी सोडवून दिला होता.सध्या भोरजवळील पसुर्‍यात यांचे वशंज आहेत.)
या युद्धात २ मराठा महिलांनी हि प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे भाग घेतला,दीपाबाई बांदल आणि बबई खोपडे.दीपाबाई यांनी म्हसवडे या बांदल यांच्या कारभाऱ्या सोबत आपले सैन्य राजांच्या बाजूने लढायला पाठवले ,तर बबई खोपडेंनी आपले सैन्य खानाच्या बाजूने लढविले !

क्रमशः

आपण माझे सर्व लिखाण एकत्रित वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची

इतिहासविचारसमीक्षालेखमाहिती

प्रतिक्रिया

लॉरी टांगटूंगकर's picture

8 Oct 2020 - 3:12 pm | लॉरी टांगटूंगकर

नेहमी प्रमाणे जबरदस्त आवडला.
पुढील भाग लवकर टाकणे.

तुषार काळभोर's picture

9 Oct 2020 - 7:42 am | तुषार काळभोर

जे झालं ते ऐतिहासिक होतंच, पण ज्याप्रकारे अभ्यासू लेखन तुम्ही करताय, मला वाटतं हे बखरीहून कमी दर्जाचे नाही!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Oct 2020 - 9:42 am | ज्ञानोबाचे पैजार

खानाच्या मोहिमेच्या वेळची तदकालिन राजकिय परिस्थिती कशी असावी याची कल्पना हा लेख वाचल्यावर येते.

एकी कडे बडी बेगम अदिलशाहीचा कारभार चालवत होती आणि त्याच काळात मोहिमेवर निघताना अफजुल्ल्याने स्वतःच्या ६३ बायकांना शेळ्यामेंढ्यांसारखे मारुन टाकले?

केवढा हा विरोधाभास?

पैजारबुवा,

धनन्जय मोरे's picture

10 Oct 2020 - 6:01 am | धनन्जय मोरे

दुर्गविहारी, सर ही तुम्ही लिहीतअसलेली लेखमाला खरंच माहितीपुर्ण व वाचनिय आहे. किती तरी सखोल माहिती आहे. खुप छान. लिहीत राहा.

नावातकायआहे's picture

10 Oct 2020 - 12:16 pm | नावातकायआहे

रोचक!
पु. भा. प्र.

खूप सुंदर आणि प्रचंड माहितीपूर्ण लेख. आपण खूप खूप कष्ट घेतलेले जाणवताहेत. खूप खूप धन्यवाद. अफजल खानाचे चित्र वास्तवदर्शी वाटते.
घोड्यावरचे चित्र शिवाजी महाराजांचे आहे का?
तसेच काझीची भविष्यवाणी, अफजलखानाने त्याला आणि स्वतःच्या बायकांना मारणे यावरून त्याला कदाचित थोडी धाकधूक होती असा निष्कर्ष काढावा का? कारण या गोष्टींवर विश्वास नव्हता म्हणावे तर मग त्याने बायका का मारून टाकल्या? एव्हढे करून तो मोहिमेवर निघाला कारण त्याने काझीचे ऐकले असते तर बादशहा , बडी बेगम आणि दरबारात डरपोक म्हणून नाचक्की झाली असती आणि त्याच्या तोपर्यंतच्या किर्तीला काळिमा लागला असता असेच ना?

दुर्गविहारी's picture

15 Oct 2020 - 10:30 pm | दुर्गविहारी

प्रतिसादासाठी धन्यवाद!

घोड्यावरचे चित्र शिवाजी महाराजांचे आहे का?

नाही.ते अफझलखानाचे आहे.

काझीचे ऐकले असते तर बादशहा , बडी बेगम आणि दरबारात डरपोक म्हणून नाचक्की झाली असती आणि त्याच्या तोपर्यंतच्या किर्तीला काळिमा लागला असता असेच ना?

मुळात अफझलखान पराक्रमी होता.डरपोक नक्कीच नव्हता.शिवाय ईतक्या वर्षाच्या यशाचा त्याच्यावर दबाव होता.एकदा स्विकारलेली मोहीम टाळणे म्हणजे प्रचंड मोठी मानहानी होती जी अफझलखानासारखा तळागाळातून इतक्या वर चढलेली व्यक्ती स्विकारणे शक्य नव्हते.कोणत्याही परिस्थितीत त्याला शिवाजी महाराजांविरुध्दची मोहिम पुर्ण करणे आवश्यक होती.