वसूली

Govind's picture
Govind in जनातलं, मनातलं
24 Aug 2020 - 12:32 pm

निवरादादा आता खूपच थकला आहे पण आजदेखील तो शिलाई मशिनवर बसून कपडे शिवत असतो. तीनही मुलींची लग्नं झाली आणि त्यांना मुलंबाळंदेखील झाली. आता कसली म्हणून चिंता उरली नाही. एक दीड एकर जमिनीचा तुकडा आहे तिथं त्याची बायको शेतीची कामं करते आणि निवृत्ती उर्फ निवरादादा आपला अपंग पाय घेऊन लोकांचे कपडे शिवत बसतो.
मला बघताच त्यानं हाक मारली आणि मी त्याच्याकडं गेलो. गावातील बर्‍याच लोकांच्या आतल्या गोष्टी याला ठाऊक. त्याच्यासोबत गप्पा मारत बसणं हा एक विलक्षण विरंगुळा असे. खूप सार्‍या गोष्टी त्याच्याकडून कानावर येत. त्याच्या जवानीतल्या कित्येक गोष्टी मी त्याच्याकडून ऐकल्या आहेत.
"काय मग मुकिंदराव, कवा जायचं औरंगाबादला? "
"बघू, अजून दोनेक दिवस आहे. तुमचं कसंकाय चाललंय? "
"आमचं काय हाय रोजचं रडगाणं.. !दिवसभर बसून माश्या मारायच्या. "
"का बरं, कपडे शिवायचं काम नाही का? "
"त्ये हाय कि पण, एवडं कुटं येतंय गिराईक आता. उगाच चारदोन चिंदकं शिवत बसतो आता. "
"मग नवीन काय घडलंय का नाही गावात? "
"छ्या ऽ कसलं नवीन न काय घेउन बसला राजेहो, सगळं हाय तितंच हाय. नाही म्हणायला एक मजा झालती मागच्या महिन्यात.. .!"
"कसली मजा? आम्हालापण सांगा कि राव!"
"अवो तीच तर सांगायला आवाज दिला की... !"
त्यानं आत बघत बायकोला दोन कप चहा करायची अॉर्डर दिली आणि काय मजा झाली ते सांगायला लागला...
दरवर्षी आमच्या गावात अनेक फिरते विक्रेते येतात. चादरी, शाली, घोंगड्या,ताडपत्री,तर कधी संसारोपयोगी अनेक वस्तू विकायला येतात. अशा वस्तूंच्या विक्रीचे करार हे उधारीवर असतात. म्हणजे समजा हिवाळ्यात घोंगडी विकत घेतली तर तिचे पैसे गुढीपाडव्याला दिले जातात. बहुतेक सर्व करार हे पाडव्याच्या मुहूर्तावर पैसे देण्याच्या बोलीवर केले जातात.
आंध्र बॉर्डरवरून नेहमी येणारा खादर बाशा फेरीवाला मागच्या वर्षी आला नाही. तो आजारी असल्याने त्यांच्याऐवजी त्याचा पुतण्या फिरोज बाशा आला होता. त्याची सर्व माहीती काढल्यावर निवरादादानं त्याला आपल्या दारातच रस्त्याकडेला दुकान मांडायची परवानगी दिली. गावातील लोक येत घोंगड्या पाहून किंमत विचारीत. तो त्यांना किंमती सांगून थोडंफार बार्गेनिंग करत सौदा जमवी आणि मग विक्री करार झालेला माल देताना ग्राहकाचे नाव आणि पैशांची रक्कम लिहून पावतीवर सही घेतली जाई.
दोन दिवसात बराच माल विकला गेला. त्यावेळी मोबाईल नव्हते. हा धंदा केवळ विश्वासावर चाले. खादर बाशा आमच्या गावातील बहुतेकांना नावानिशी ओळखत असे. त्याचा पुतण्या नवीन असल्याने त्याची गंमत करायची लहर आली. मग काय विचारता, आमच्या गावचा अर्धा शहाणा हिंदूराव पुढे आला आणि घोंगडी बघायची आहेत म्हणत त्याच्यासमोर बसला. आपल्या अफाट गुलाबी हिंदीत त्यानं सौदा जमवायला सुरूवात केली.
"अरे मामू,ये घोंगडी उतनी जाडी नै है रे। कैसा क्या जमेंगा बाबा। हमारे इदर थंडी बहुत पडती है ।"
"अरे नही मायबाप, उसकी जाडी मत देखो! बहोत अच्छी है। तुम इसको लपेटके सोएगा तो रातभर नींद नही खुलेगी। "फिरोजनं सांगितलं.
"हां, रातभर सोताय मै। इसकू खेत मे लेजाके लपेटताय और सबेरेतक सो जाताय। रात को सो जाएगा तो ऊस की पानी कौन देगा? "
"ऊसको मतलब किसको? "फिरोजला ऊस कळला नाही.
"अरे ऊसको, हमारा ऊसका खेत है। सात एक्कर ऊस लगाया है। रातभर जागके पानी देना मंगताय!"
"अरे तुम किसकोभी पाणी देव हमको क्या? ये रख लो अच्छी रजाई है। "
"हां तो किंमत बोलो। "
"ये वाली चारसौ कि है, और ये साढेछेसौ की। बोलो कौनसी देनी है? "
"ये बहूत मह्यंग्या है रे।जरा सस्ते मे लगाव तो। "
"देखो सावकार, हम तुमको अभी माल बेचता है और छे महिनेके बाद आकर पैसा लेता है। तो इसका मोल भाव नय होता जी। लेना है तो जल्दी बोलो! "फिरोजनं स्पष्ट सांगितले.
"ठीक है, ये साडेछेसो वाली दोन देदो।"
"हां, ये हुई ना बात! "सौदा झाला म्हणून फिरोज खुश झाला. त्याचा बऱ्यापैकी माल विकला गेला होता. काही मोजकीच घोंगडी राहिली होती ती विकून तो आजच गावाकडे जाणार होता. त्यानं हिंदूरावनं निवडलेली दोन घोंगडी पटकन पॅक केली आणि पावती पुस्तक काढलं.
"हां सावकार, तुम्हारा नाम बोलो। "फिरोज नं विचारलं.
आता याला आपलं नाव माहीत नाही. याला काय नाव सांगावं असा विचार करीत असताना त्याला आमच्या गल्लीत राहणारा लक्ष्मण दिसला. ताबडतोब हिंदूराव म्हणाला, "मेरा नाम लक्ष्मण।"
"बाबूजीका नाम बोलो..! "फिरोज
"बाबूजीका नाम.. बाबूजी..!हिंदूराव
"अरे सावकार, बाबूजीका का मतलब पिता! "फिरोज
"मे नय पिता, मैं पिया तो मेरा बीबी मेरेकू लय मारता। " हिंदूराव
"अरे, बाप का नाम बोलो ना..! "फिरोज वैतागला होता.
"किसके बाप का? "
"अरे सावकार, तुम्हारे बाप का और किसके?"जमलेला सौदा फिसकटू नये याची काळजी करत फिरोज वैताग आवरत म्हणाला.
समोरच्या घरातील विठोबाकडं पाहत हिंदूरावनं सांगितलं, "बाप का नाम.. विठोबा..! "
"और लास्ट नेम? "
"मतलब? "
" आडनाव," ही गंमत पहात असणार्‍या लोकांपैकी प्रकाश म्हणाला.
"लास्ट नेम... परकाशे...! " हिंदूरावनं ठोकून दिलं.
आता इतक्या लोकांसमोर हा खोटं बोलणार नाही याची खात्री असल्यानं फिरोजनं त्याच्या नावाची पावती तयार करून त्याची सही घेतली. "देखो सावकार हम या हमारा चचा आएगा। पैशा तैयार रक्खो।पाडवा के दिन आएगा हम। "
झालं, घोंगडी घेऊन हिंदूराव मजेत घरी गेला.
गुढीपाडव्याला खादर बाशा फेरीवाला वसुली साठी गावात आला. चौकात असणार्‍या जावेदच्या दुकानातून विडीचं बंडल घेतलं. एक विडी पेटवून झुरका घेत त्यानं विचारलं, "ये गांव में लक्ष्मण विठोबा परकाशे कोन है रे? "
"कुछ मालूम नै चचा! ये नाम का तो कोनभी नै इस गाव मे। "
"क्या? तो ये फिरज्या ने दो घोंगडी किसकू बेचा? "
पुढचे दोन दिवस तो गावातील भेटेल त्याला 'लक्ष्मण विठोबा परकाशे' कोण आहे हे विचारत राहिला. सर्वांनी सांगितलं कि या नावाचं कुणीही गावात नाही.
दोनेक दिवसांनी फिरोजला घेऊन आला. नेमका त्याला हिंदूराव दिसला. आणि त्याच्याकडं हात करत फिरोज म्हणाला, "चचा, यही तो है, लक्ष्मण विठोबा परकाशे..!"
"क्या? अरे ये तो हिंदूराव है। " खादर बाशा हिंदूरावला ओळखायचा.
" अरे नही चचा, माँ कसम यही है वो ! "
फिरोजनं शपथ घेउन सांगितल्यावर खादर बाशानं हिंदूरावला पकडलं. हिंदूरावनं अभूतपूर्व गोंधळ घातला. गावातील लोकांची ही गर्दी जमली. जो तो फक्त तमाशा बघत होता. शेवटी गावातील प्रतिष्ठित नागरिक असणारे तात्या पुढं आले. त्यांनी सारंकाही समजून घेतलं. मग फिरोजकडील पावती बघितली आणि त्याला विचारलं, "तू नक्की यालाच घोंगडी विकली? "
"जी हुजूर, इसकू ही तो बेचा हूँ! "
तात्यांनी हिंदूरावकडं पाहिलं आणि नजरेनं जाब विचारला. हिंदूराव गर्दीकडं पाहून म्हणाला, "गावातल्या लोकांनू, तुमच्यापैकी कुणीबी म्होरं या. अन् माजं नाव काय हाय ते सांगा.. !"
गर्दीतून लोक म्हणाले, "हिंदूराव..! "
"आता बोला.. !" हिंदूरावनं खडा सवाल टाकला.
"तो ये लक्ष्मण विठोबा परकाशे कोन है? "खादर बाशानं विचारलं. "क्या मालूम.. .!"खालचा ओठ मुडपत हिंदूरावनं खांदे झटकले आणि खादर बाशा आणि त्याचा पुतण्या फिरोज चुपचाप निघून गेले.
"इस गाव के लोग बहूत हरामी है, और एक ये बेवकूफ साला...! "गावातून निघताना खादरबाशा निवरादादाला सांगत होता.

कथाविनोदविचारआस्वादलेखविरंगुळा