``तू पहिल्यासारखा राहिला नाहीस.`` पहिल्याच वाक्यानं त्याचं कामातलं लक्ष उडालं.
``आता काय झालं?`` त्यानं काळजीनं विचारलं.
``काही नाही. जाऊ दे.`` तिनं दोनचार तोंडवाकडे, लालबुंदे, भुवईउडवे इमोजी टाकले.
अशा प्रसंगी काय करायचं असतं, हे त्याला लग्नाच्या दहा आणि व्हॉट्स अपच्या सहा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर नीटच माहीत झालेलं होतं.
``अगं सांग ना, काल तुला फोन केला नाही, त्याचा राग आलाय का तुला?``
``कालचं काय विशेष? हल्ली फोनच करावासा वाटत नाही तुला! चॅट करायलाही वेळ नसतो!``
``….``
``आता काही बोलणार नाहीस, माहितेय मला. मी इकडे एकटी असते, सगळं घर सांभाळते, काही कुरकुर न करता. मुलांचं बघा, सासूबाईंचे मूड सांभाळा, दळणं टाका, कामवाली आली नाही तर तिची कामं करा, मुलांना आणायला जा, त्यांच्या परीक्षेचा अभ्यास घ्या, प्रोजेक्ट्स पूर्ण करा, बिलं वेळेत भरण्यासाठी धावपळ करा, आज पाणी आलं नाही, उद्या गॅस संपला तर त्यामागे धावा, पेस्ट कंट्रोल करून घ्या, कुरिअर गहाळ झालं तर ते निस्तरा, वेळेवर सगळे हप्ते भरा, मुलांना प्रदर्शनं दाखवायला न्या, आवडते सिनेमे दाखवा, एखाद दिवशी बागेत न्या, बाहेर खायला न्या, बाहेरचं बाधलं तर घरी त्यांच्या आवडीचं चमचमीत, रुचकर खाणं करा, तुझ्या आईची तब्येत बिघडली तर हॉस्पिटलची धावाधाव करा...हे करता करता नाकी नऊ येतात माझ्या! तुझं बरंय रे, तू तिकडे नोकरीच्या निमित्तानं घरापासून लांब असतोस, मजेत असतोस!``
``…``
``का? बोल की आता. आता काही सुचणार नाही तुला. कंटाळा आला असेल ना माझ्या बडबडीचा? साधं दोन शब्द टाइप करायचाही कंटाळा आला असेल, हो ना?``
``नाही गं, असं नाहीये.``
``मग कसं आहे?``
``ऐक ना...``
``काही बोलू नकोस. जा, झोप आली असेल ना? गुड नाइट.``
``गुड नाइट डार्लिंग.``
``बाय.``
``बाय. उद्यासुद्धा फोन करू नकोस किंवा साधं चॅटही करू नकोस हं!``
``बाय द वे...``
``काही सांगू नकोस. मला झोप आलेय. दमलेय खूप.``
``बरं. मी फक्त एवढंच म्हणणार होतो, की...``
``नको बोलू. बाय.``
``डीपी मस्त आहे गं. बारीक झालेली वाटतेयंस.``
``ए हो? खरंच? खरंच बारीक वाटतेय ना? वाटलंच मला! तरी मला खात्री होतीच, ही ह्या डाएटमुळे मी बारीक होणार. अरे, तुला माहितेय का, गेल्या महिन्यात घेतलेले ड्रेस मला आता लूज व्हायला लागलेत. तुला विश्वासही बसणार नाही! खरंच वेगळी दिसतेय ना मी? म्हणजे माझं मला जाणवत होतंच, मैत्रिणी पण म्हणाल्या. आज तुझ्या लक्षात आलं, त्यामुळे अगदी खात्रीच झालेय माझी. तुला माहितेय का, हल्ली मी....``
अभिजित पेंढारकर.
प्रतिक्रिया
8 Jun 2020 - 6:56 pm | राजेंद्र मेहेंदळे
फारच टेंशनवाला लेख!!
तरी बरे शेवट गोड झाला म्हणुन, नका हो असे लेख लॉक डाउन मध्ये टाकु.
असो. मी पयला
11 Jun 2020 - 8:04 am | आपला अभिजित
.
8 Jun 2020 - 11:05 pm | मराठी कथालेखक
मस्त ..
8 Jun 2020 - 11:34 pm | शेर भाई
"डीपी मस्त आहे गं. बारीक झालेली वाटतेयंस", ह्याच टायमिंग जरा मागे पुढे झाल कि मात्र बेक्कार वाट लागू शकते.
तुमचा कावेबाजपणा आवडला
9 Jun 2020 - 2:35 am | वीणा३
हे हे हे, बदमाश पण बायकोला खुश कसं करायचं ते कळलेला नवरा !!! मस्त गोष्ट :D
11 Jun 2020 - 8:05 am | आपला अभिजित
.
9 Jun 2020 - 2:43 am | तुर्रमखान
भूत, प्रेत और मासूम बीवी मन का वहम है, ऐसा कुछ नहीं होता.
9 Jun 2020 - 3:34 am | सौन्दर्य
दहा वर्षात चांगलाच अनुभव गाठीशी बांधलात, आता पुढचे आयुष्य सुखात जाईल.
छान लेख.
9 Jun 2020 - 8:38 am | आपला अभिजित
खरंय. धन्यवाद...! :)