चहा पिणे अन पाजणे हे काही आपल्याकडे पुर्वी नव्हते. पुर्वी चहा नव्हताच. लोक गुळपाणी देवून स्वागत करायचे. नंतर कधीतरी बोस्टन टी पार्टी झाली. अमेरीका स्वातंत्र्य झाली. ब्रिटीश भारतात आले. चीन मधल्या चहाला शह देण्यासाठी त्यांनी चहाची भारतात लागवड केली अन त्यानंतर चहा भारतात उत्पादीत होत गेला. चीन नंतर भारत चहा उत्पादनात दोन क्रमांकावर गेला. दुसर्या महायुद्धाच्या काळात रेल्वेस्थानकांवर चहा विकला जावू लागला. चहाची विक्री जाहीरात करून केली गेली. चहा पिणे कसे चांगले हे जाहिरात करून सांगितले जायचे. नंतर लोक चहाचे चाहते झाले. मला आठवते ब्रूक ब्राँडचा चहा एका लाल रंगाच्या तिन चाकी हातगाडीवर आठवडे बाजारात विकायला यायचा. तो घ्यायला गर्दी व्हायची.
बरे चहाचे प्रकार तरी किती? साधा चहा, स्पेशल चहा, सुंठ घातलेला चहा, मसाला चहा पत्ती चहा, भरपुर दूधाचा चहा, काढा, तुळशी अन गवत टाकलेला गवती चहा, आयुर्वेदीक चहा, ब्लॅक टी, लेमन टी, ग्रीन टी, हर्बल टी, पिवळा चहा, बॉबी, कट, टक्कर, मारामारी, अगदी मनमाडी चहा देखील आहे.
तुम्हाला आण्णाचा चहा अन नानाचा चहा माहीत आहे काय? आपल्या दुकानात गिर्हाईक आले तर त्याला खरोखर चहा पाजायचा असेल तर नोकराला आण्णाचा चहा आणायला सांगायचे. अन तेच फुटकळ टाईमपास करणारे गिर्हाईक असेल तर नानाचा चहा मागवीत अन तो येत नसे, किंवा उशीरा येत असे अन गिर्हाईक तो पर्यंत कंटाळून निघून जात असे.
अनेक देशोदेशी चहा तयार करण्याचे अन तो पिण्याचे तंत्र निरनिराळे असते. चिनी चहा, कोरीयातला चहा, जपानमधला चहा, अमेरीकेतला चहा.
चहाची बहीण कॉफी अगदी निराळी. तिने तर मोठमोठ्या कॉफीशॉपच्या कंपन्या काढल्या ज्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झाल्या. पण कॉफी हा लेखाचा विषय नाहीये.
चहा हा ताजा केलेला असेल तरच चांगला. उकळून कडक झालेला चहा हा अॅसीडीटीला आमंत्रण ठरतो. काही जण चहा अजिबात पित नाही. अर्थात असे लोकं विरळेच. मग ते दूध तरी घेतात. हातावरचे पोट असणारे कित्येक जण भूक मारण्यासाठी चहा पितात. काही जण चहाबरोबर पाव, टोस्ट, बटर, खारी, नानकटाई, स्लाईस आदी खावून भूक भागवतात. चहासाठी लोकं फिरायला जातात. लोक निमित्त काढून चहा पितात. काही जण दिवसाला दहा बारा कप चहा पितात. चहा प्यायला बोलावणे हा आदरसत्काराचा भाग मानल्या जावू लागला. एखाद्याला भेटायला घरी गेलो अन चहा दिला नाही तरी लोक नाराज होतात. चहाचे पाणीदेखील पाजले नाही असा उल्लेख करतात.
जुनी गोष्ट आहे. खरी आहे. माझ्या पाहण्यात एक चहा विक्रेता आहे. नव्वदच्या दशकातली. तो सायकलवर चहा खेड्यापाड्यात विकत असे. आमच्या गावाजवळ रेल्वे जाते अन तेथल्या नदीवर रेल्वेपुलआहे. एकदा रेल्वे पुलावरून तो सायकल ढकलत चालला होता. तिकडून रेल्वे आली अन हवेच्या झोतामुळे तो उंच पुलावरून खाली कोसळला. नदीत पाणी वगैरे होते की नाही ते माहीत नाही. पण तो जबर जखमी झाला. नंतर हॉस्पीटलात राहीला. त्यानंतर त्याला कोणतेही अन्न पचेनासे झाले. काहीही खाल्ले तर ते बाहेर पडत असे. नंतर त्याच्या घरच्यांनी वेगवेगळ्या अन्नपदार्थांचा त्याचेवर प्रयोग केला. काहीच पचेनासे झाले. नंतर शेवटी ते अशा निष्कर्षापर्यंत आले की त्याला चहा पचतो! मग सुरूवातीला चहाचे पाणी अन नंतर काही दिवसांनी थोड्या जास्त दूधाचा चहा हाच त्याचा आहार झाला. बरे एवढाच आहार असूनही ती व्यक्ती शारीरिक कष्ट करत असे. किराणा दुकान चालवत असे. सायकल चालवत असे. तर चहा विकतांना अपघात झाला अन शेवटी चहाच त्याचा आहार बनला. जवळपास दहा एक वर्षे ती व्यक्ती चहावरच होती. तुम्हाला खोटे वाटेल हे. नंतर आम्ही गाव बदलले. त्या व्यक्तीनेही गाव अन व्यवसाय बदलला. मध्ये काही काळ गेला अन ती व्यक्ती शहरातल्या एमआयडीसीत एका कंपनीत सायकलवर जेवणाचे डबे पुरवतांना दिसली. शारीरिक ठेवण तशीच शिडशीडीत राहीली होती. असो.
खेडेगावात दूधाची कमतरता असते. जे दूध निघते ते सकाळीच शहरात विकायला पाठवले जाते. मग एखाद्या लहानग्याला हातात पेलाभर किंवा पाच दहा रूपयाचे दूध घ्यायला ज्याचे घरी दूभते असते त्याकडे पाठवतात. तर एकदा एका ठिकाणी मी पाहूणा गेलो होतो. खेडेगावच ते. दूध मिळालेच नाही. साखर नव्हती, गूळ होता. मग त्या माऊलीने गुळाचाच काळा चहा मला पाजला. मला तर त्याचे काही वाईट वाटले नाही कारण तसली परिस्थीती मला माहीत होती. पण त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी दिसले. अशासाठी की आलेल्या पाहूण्याला बिन दूधाचा, बिन साखरेचा चहा पाजला. त्याच्याच जवळपासचा अनुभव असा की एका माऊलीने चहा बनवला. तेथेही दूध नव्हते. साखरेचे नाही आठवत पण त्या माऊलीने पावडरचे दूध बनवले अन मग मला चहा पाजला.
चांदवडला आम्ही लहान असतांना देवीच्या दर्शनाला गावातून पायी गेलो. येतांना ढग भरून आले. अन जोरात पाऊस चालू झाला. आम्ही पूर्ण भिजलो. गाव तर लांब होते. आडोशाला काहीच नाही. रस्त्यात एका झोपडीत आम्ही गेलो. तेथे विस्तवाचा उबारा भेटला. तेथे त्या मालकाने चहा करून दिला. पण तेव्हढ्यात जोराचा वारा आला अन त्या वार्याने झोपडीचे एका बाजूचे कूड उघडे पाडले. आम्हाला वीजच कोसळली की काय असे वाटले पण तसे काही झाले नव्हते. असा प्रसंग लक्षात ठेवणारा चहा अन असे चहाचे अनुभव.
आताशा अनेक चहाचे ब्रांड तयार झालेले आहेत. अमूक चहा, अमृततुल्य इत्यादींची फ्रांचायजीचा धंदा झाला आहे. (म्हणूनच या लेखाला मी "पाभेचा चहा" असे नाव दिले आहे हे चतुर वाचकांच्या लक्षात आलेच असेल. तर आपण आता आपला लेखक पुढे काय म्हणतो आहे ते पाहूया.)
तर अशा ब्रांडांच्या किंवा फ्रांचायजींच्या चहाच्या दुकानात पु.ल. म्हणतात तसे आपले खायचे पान घेवून पानाच्या दुकानासारखे पान तयार करण्यासारखे वाटते. तेथे आपूलकी नसते. विक्रेता केवळ किती कप धंदा झाला याचा विचार करतो. एका कपात दोन जण चहा पिवू शकत नाही. उभे राहून चहा पिणे अन तेथून निघून जाणे एवढेच साध्य होते. चहा बरोबर गप्पा होत नाहीत. किंबहूना गप्पांसाठी चहाच्या दुकानात गेले तर त्याची लज्जत काही औरच असते. या नव्या कार्पोरेट चहाच्या दुकांनात हे साध्य होत नाही. उकळीचा चहा तेथे भेटत नाही. आधीच उकळलेला अन थर्मासमधला रेसेपीदार, त्यांचा प्रोप्रायटरी फॉर्मुला असणारा चहा तेथे भेटतो. त्यामुळे तसला फ्रांचायजीचा चहा पिवून खरा चहा पिण्याचे समाधान होत नाही. आणि तो चहा तुलनेने थंडदेखील असतो हा माझा अनुभव आहे. उकळीच्या चहातली मजा नाही त्यात. तो चहा फक्त पोटात जातो. त्याने पोट भरत नाही. ते चहाचे दुकान म्हणजे त्या दुकान मालकाची अधिकची आर्थिक गुंतवणूक असते. अन टपरीवरचा चहा म्हणजे त्या दुकानदाराचा संसार असतो.
असो. चहात पाणी टाकतात किंवा पाण्याचा फुळकट चहा असतो तसे लेखात अनेक संदर्भ येवून हा चहावरचा लेख मोठा होवू शकतो. चहा पोहे अन त्या बरोबरचे किस्से, चहा बरोबर खायचे पदार्थ घेवून केलेला लेख, चहा कशात घेतात त्या वस्तू, त्यांची ठेवण. असे केले तर हा लेख म्हणजे चहाचा मळाच होईल. म्हणून असो.
चहा हा फक्त चहाच नसतो तर तो एक आपूलकीचा धागा असतो. आणि असेच धागे काढत काढत अन ते विणून विणून त्याचे असले लेखवस्त्र होते.
अन हो, तुम्ही प्रतिक्रीया देवूनही हा चहालेख वाढवू शकतात ना!
( हा चहाचा लेख मागच्या आठवड्यात लेखनाच्या आधनावर ठेवला होता. मग एक एक अनुभवाच्या, प्रसंगांची सामग्री यात टाकत गेलो. अन आज हा चहा लेख उकळी पावला अन तो तुम्हाला गाळून (मुद्रीतशोधन करून) देतो आहे. त्याचे प्राशन करा अन कसा झाला आहे तेही सांगा.)
- पाषाणभेद
२४/०९/२०१९
प्रतिक्रिया
24 Sep 2019 - 10:51 pm | vcdatrange
मी पहिला
25 Sep 2019 - 5:44 am | मारवा
लेख आवडला व याच्याशी संबंधित आहे म्हणुन मला ब्रँडेड चहा विषयी काही प्रश्न आहेत
येवले इ. चहा चा बिझनेस फॉरमॅट काय आहे ?
त्यांच्या डीलर ला ते पत्ती साखर मसाला व दुध पावडर सर्व पोचवुन केवळ उकळवण्यापुरते काम देतात का ?
डीपॉझीट शेअरींग कसे असते ?
क्वालिटी कंट्रोल कसा केला जातो ?
यांच्या चहात कुठलेसे आक्षेपार्ह केमिकल वापरले जाते असे जे काय अफवा चर्चा आहे त्यात कितपत तथ्य आहे ?
25 Sep 2019 - 10:09 am | सर्वसाक्षी
ईतक्यातच भाष्य करणे बरे नाही पण...
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/fda-take-action-against-yewale-chaha-tea/articleshow/71283782.cms
या चहात रासायनिक भेसळ असल्याच्जे वृत्त एका वर्तमानपत्राने याआधी दिले होते.
25 Sep 2019 - 3:33 pm | जालिम लोशन
हा एक पाॅलिमरचा प्रकार आहे (प्लास्टिक) . चीन मधे बेबीफुड बनवणार्या कंपन्या हे वापरत असतात. अन्न व औषध प्रशासनची ह्याच्या वापरावर बंदी आहे. साधारण सहा महिन्यात ह्याच्या सेवनाने लिव्हर निकामी होऊ शकते. द्रवपदाथा नाृ घट्टपणा आणण्यासाठी त्याचा ऊपयोग करतात. थोडक्यात नफा मिळवण्यासाठी चितळे किंवा गोकुळ दुध न वापरता ते वापरल्याचा आभास निर्माण करतात. हाच प्रकार हाॅटेल वाले त्यांच्या रेसिपीजमधे निंरनिराळे औद्योगिक ग्रेडची आम्ल वापरुन करतात.
25 Sep 2019 - 4:56 pm | चौथा कोनाडा
मारवाजी, त्यांच्या दुकानाचा ले-ऑऊट, सिस्टिम ठरेल्या डिझ्झाईन नुसार करावी लागते.
त्यांच्या पातेल्यांची साईझ ठरेली असते, ज्यात किती लि दुध मावणार ते ठरलेले असते. प्रमाणानुसार रेडिमेड पुड्या (चहा पत्ती, साखर इ) तयार असतात, त्या उघडून दुधात टाकतात, त्यामुळे सर्व प्रमाण व्यवस्थित जमते. चहाची चव मेन्टेन राहते. या सर्व दुकानात येवले याण्चा बरा लागतो, मी बर्याच वेळा पितो.
कितीही कसलेही चहा ढोसले तरीही इराणी चहा तो इराणी चहा ! त्याला कुणाचीच सर नाही !
25 Sep 2019 - 7:31 am | कंजूस
चहाच्या फ्याक्ट्रीत चहाच्या पानांची वर्गवारी करतात. मग जो गाळ , पूड उरते ती पुर्वी विकली जायची. आता खप कमी झाला. ती काढण्याचा मार्ग.
25 Sep 2019 - 7:32 am | सुधीर कांदळकर
हे अगदी खरे. माझा गावचा चुलतभाऊ - नावसुद्धा त्याचे भारदस्त - कालिदास - तेव्हा तो दहाबारा वर्षांचा होता. डस्ट टी ऊर्फ चायची पूड वापरून गूळ आणि गाईचे दूध घालून फक्कड चहा बनवीत असे. त्याची आपुलकी चहात उतरे. काही ठिकाणी पाहुणा बराच वेळ जात नसे तर त्याला पुन्हा चहा विचारला जातो.
मस्त लेख. आवडला धन्यवाद.
25 Sep 2019 - 8:13 am | यशोधरा
चहापुराण छान.
25 Sep 2019 - 8:43 am | ज्ञानोबाचे पैजार
हा लेख वाचून मी तुमचा "चाहता" झालो.
या चहावर अनेक गाणी सुध्दा आली आहेत.
- शायद मेरी शादीका खयाल दिल मे आया है, इसीलिये मम्मी ने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है
- एक गरम चाय की प्याली हो कोई उसको पिलाने वाली हो, गोरी हो या काली हो, सीने से लगाने वाली हो
- गरम गरम चाय
पैजारबुवा,
25 Sep 2019 - 8:51 am | अमरेंद्र बाहुबली
मस्त लेख.
चहा ने अनेकांना हात दिलाय.
सर्वात कमी भांडवलात उभा राहणारा आणी खात्रीशीर पणे चालणारा धंदा म्हणजे चहाचे दुकान. कधीही कुठेही सुरू करता येतो.
अगदी पाचशे रुपये गुंतवून पहिल्याच संध्याकाळी भांडवल ही निघू शकतं.
सध्याचे पंतप्रधान चहा विकून pm झाले. म्हणून चहा विक्रेत्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला.
राजकारणाच्या गप्पा आता व्हाट्सअप्प वर होतात. त्या आधी चहाच्या दुकानावर व्हायच्या.
चहा आधी 2 रुपयात मिळायचा. तेव्हा पाजणारे आणी पिणारे मनसोक्त प्यायचे. पण आता छोट्या शहरात पाच आणि मोठ्या शहरात 10 रुपयाखाली मिळत नाही.
माझ्या ओळखीच्या एका चहाविक्रेत्या काकांनी चहाचा ग्लास बदलला. आणखी छोटा आणला. अस का केलं विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मोठा ग्लास पाहून 2 लोक आले तर ते अर्धा अर्धा करून प्यायचे. आता ह्या ग्लास मध्ये अर्धा करु शकणार नाहीत.
पुण्यात असलेल्या अमृततुल्य वगैरे वेगवेगळ्या ब्रँच च्या चहा बद्दल माहिती नाही. पण तिथली एक गोष्ट आवडते. ती म्हणजे स्वच्छता. जनरली चहाचे दुकान कळकट मळकट असतात. तिथे कोणीतरी येऊन पाणी तोंडात घेऊन गुळणी करणार. घशातून भयानक महाभयानक आवाज काढणार. बऱ्याच लोकांना अश्या आवाजाच काही वाटत नाही. मला भयानक किळस येते. काही येऊन तंबाखू, गुटखा वगैरे थुंकणार. काण्याकोपऱ्यात पडलेल्या लाल पिचकाऱ्या. उष्टे कप वरच्यावर पाण्यात विसळुन त्यात पुन्हा चहा देणे. अश्या भयानक वातावरणात चहा कसाकाय पितात लोक कळत नाही.
येवले चहा वगैरे अश्या ठिकाणी त्या मानाने चांगली स्वछता असते.
25 Sep 2019 - 10:52 am | जगप्रवासी
सकाळी एस टी स्टॅण्डवर लालपरीची वाट बघताना चहा घेत पुढच्या लागणाऱ्या "वाट"चालीबद्दल चर्चा होतात. चालून चालून पायाचे तुकडे पडलेले असतात आणि जेव्हा एखाद्या घरात चहा विचारला जातो तेव्हा तो ट्रेकर्ससाठी तर अमृतापेक्षाही कमी नसतो. कोकणात कोणाच्याही घरी कितीही वाजता जा तुम्हाला चहा दिला जातोच मग सकाळ असो दुपार असो किंवा रात्र असो.
थोड्या महिन्यांपूर्वी परळ स्टेशन जवळ अशाच एका फ्रॅन्चायजीचं चहाच दुकान चालू झालंय. म्हटलं चव घ्यावी म्हणून दुकानात गेलो तर चहाची मजेशीर नावं वाचून भारी वाटलं म्हणजे बासुंदी चहा, रोज चहा. मला वाटलं होत की बासुंदी चहात बासुंदी वगैरे घालून देतात की काय पण दुकानदाराला विचारलं तेव्हा कळालं की तो चहा थोडा गोड असतो. याआधीही चहावर धागे येऊन गेलेत पण तरी हा विषय नेहमीच ताजा असतो.
25 Sep 2019 - 11:01 am | दुर्गविहारी
"चाय पे चर्चा" आवडली. ;-)
25 Sep 2019 - 11:56 am | कुमार१
चहा आणि आरोग्य यावर थोडी माहिती:
१. ज्यांना जठराम्लतेचा त्रास होतो त्यांच्यासाठी कोरा चहा (अर्थात कमीत कमी उकळलेला) अधिक चांगला. दूध घातलेल्या चहाने जठराम्लता अधिक वाढते. स्वानुभव आहे. मी गेली १५ वर्षे कोराच पितोय.
२. कोऱ्या चहात antioxidant गुणधर्माची जी उपयुक्त रसायने असतात त्यांचा परिणाम दूध घातल्यावर नाहीसा होतो.
25 Sep 2019 - 1:36 pm | वकील साहेब
मस्त लेख,
अनेक सिक्वेल प्रसवण्याची क्षमता या विषयात आहे. चहाची चव चाखली नाही असा माणूस विरळाच म्हणायचा.
फ्रांचायजीचा चहा पिवून खरा चहा पिण्याचे समाधान होत नाही. आणि तो चहा तुलनेने थंडदेखील असतो. या बाबत सहमत.
चहाचे दुष्परिणाम सुद्धा यात समाविष्ट करायला हवे होते. मागे युटूब वर डॉ. ज्योत्स्ना पाटील यांचे व्याख्यान ऐकले होते त्यांनी त्यात सांगितले होते की आपल्याकडे जो उकळून उकळून चहा पिला जातो तो आरोग्यास खूप हानिकारक आहे. चहा करण्याच्या आदर्श पद्धतीस अनुसरून चहा केल्यास कुणालाच तो आवडणार नाही हे खरे.
प्रत्येकाचे चहा पिण्याचे प्रमाण वेगवेगळे असले तरी किमान दोन कप चहा हे साधारण प्रमाण आहे. म्हणजे किमान दोन चमचे साखर या चहाच्या निमित्ताने प्रत्येकजण दररोज सेवन करतो. त्यात बैठी जीवनशैली वाढीस लागल्याने भारत मधुमेहींची राजधानी आहे काय असे वाटते.
यात सत्ताधाऱ्यांचे चहापान आणि विरोधकांचा ठरलेला बहिष्कार याचाही अंतर्भाव करावा.
चहाटळ या शब्दाची निर्मिती होण्यामागे चहाचा काही संबंध आहे काय हे हि तपासून पाहायला हवे.
चहाचा काढा सर्वाना माहित असेल पण आमच्या लहानपणी आमची आजी चहाचा पाढा म्हणून दाखवायची. मला त्याच्या दोन ओळी आठवताहेत.कोणाला पूर्ण आठवत असेल तर त्यांनी इथे नक्की टाका.
चहा एके चहा
चहा दुणे किटली
सारी दुनिया बाटली
या चहाने हो या चहाने.
चहा एके चहा
चहा दुणे साखर
कमी जाते भाकर
या चहाने हो या चहाने.
25 Sep 2019 - 5:34 pm | चिगो
थोडासा असहमत.. चहा करण्याच्या आदर्श पद्धतीनुसार बनवलेला चहा अत्यंत तजेलदार असतो. (इथे चहा बनवण्याची आदर्श पद्धत म्हणजे एकतर पाणी उकळल्यावर गॅस बंद करुन त्यात एक टि-स्पून चहापावडर टाकून भांड्यावर झाकण ठेवावे, व एका मिनीटानी चहा गाळून घ्यावा ही आहे, किंवा ८०-८५ डिसेंच्या गरम पाण्यात २-३ मिनीट चहापावडर ठेवून मग तो प्यावा ही आहे.) अशा चहाचा रंग (खास करुन दुसर्या पद्धतीतला) स्कॉच सारखा दिसतो, खास करुन दार्जिलींग टी चा..
आपण जो मसाला चहा पितो, त्याचा पहीला 'अहाहा' हा जनरली साखरेच्या गोडपणाचा आणि मसाल्याच्या चवीचा परीणाम असतो.
वर कुमार१ बोललेत तसा, चहा कोरा आणि बीन-साखरेचा प्यावा.
25 Sep 2019 - 2:45 pm | राघव
आवडले! हा विषयच खास आहे..!
यावरून सरनौबतांचे एक जुने चहा पुराण आठवले -
हमेशा तुमको चहा
अजून एक कप, 'हमेशा तुमको चहा'
27 Sep 2019 - 8:10 am | नाखु
आवडले आहे
चाहता है संघांचा किरकोळ सदस्य नाखु
27 Sep 2019 - 11:27 am | श्वेता२४
पण फक्त आईच्या हातचा :) दादरला आयडीयल बुकच्या समोरच्या गल्लीत उजव्या हाताला चहाचे दुकान आहे. तीथे अप्रतीम चहा मिळतो. त्याची चव बरीचशी माझ्या आईच्या हातच्या चवीशी मिळतीजुळती आहे. तीथे गेल्यावर चहा पिणे होतेच. तुमच्या लेखाच्या निमित्ताने पुण्यातील अमृततुल्यजवळ जमणारे आम्हा मित्रमैत्रिणींचे कट्टे आठवले. छान लिहीलंय
27 Sep 2019 - 1:08 pm | भीडस्त
पितळीभर चहा
आठवडा बाजारातून आणलेली चाची भुक्की - पिवळे पुडे असायचे. बहुधा लिप्टनचे.
त्याबरोबर आजोबांनी आणलेली बटारं. पाच रुपये शेकडा. एक शेकडा तरी असायचीच. घरात पोरंच दहाबारा गोळा व्हायची सुट्ट्यात.
जान्ताल्यांना साखरेचा चहा,पोराबाळाना गुळाचा असे.
साखरेसाठी पितळी डबा असे. कडीकोयंड्याची सोय असलेला. साखर कुलुपबंदच असे. किल्ली घराची कारभारीण बाई असे तिच्या ताब्यात.
घरी दुधदुभतं होतं तरी चहात दुध नावालाच असे.
कधी मसणवट्यातून मैत करुन त्या घरी आल्यास प्यावा लागणारा कोरा चहा. हे अजूनही चालू असते.
पाभे मस्त लिहिलंय तुम्ही