१८१७ सालच्या दसऱ्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांविरुद्ध उघड युद्ध पुकारले. खडकी, येरवड्याच्या लढाईनंतर इंग्रजांनी पुणे घेतले, पण बाजीरावाने आपला खजिना आणि मौल्यवान वस्तू आधीच सिंहगड आणि रायगडावर हलवल्या होत्या. त्यामुळे २० फेब्रुवारी १८१८ या दिवशी साताऱ्याहून ब्रिटिश फौज सिंहगडच्या परिसरात पोचली. या फौजेने कुठे तोफा चढवल्या होत्या त्याचा एक नकाशा लढाईनंतर एका वर्षातच कर्नल व्हॅलेंटाईन ब्लॅकर याने एका पुस्तकात प्रकाशित केला.
या नकाशात आपल्याला डावीकडे पाच ठिकाणी तोफांची जागा, पुणे आणि कल्याण दरवाजा दाखवलेला दिसतो. तोफांचा मारा गडावर कोणत्या जागी होत होता हे ही या नकाशात दाखवलेले आहे. हा नकाशा फार महत्त्वाचा आहे, कारण त्यातून आपल्याला सांगता येतं की औरंगझेबाच्या कित्येक हजार फौजेला काही महिने झुंजवणारा गड इंग्रजांना पटकन कसा मिळाला.
उजवीकडे सिंहगडाची उंची आणि टेकड्या दाखवलेल्या आहेत. हा नकाशा प्रमाणात काढलेला असून त्यात नद्या आणि ओढे, डोंगरांची उंची दाखवलेली आहे. माझ्या पाहण्यातला हा सिंहगडाचा पहिला प्रमाणातील, अंदाजे उंची दाखवणारा नकाशा.
इंग्रजी फौज साताऱ्याहून १३ फेब्रुवारीला निघून सालपे घाट, नीरा, वीर, सारोळा, शिवापूर या रस्त्याने २० फ़ेब्रुवारीला सिंहगडाला आली, पुण्याकडून नव्हे. त्यामुळे फौजेचा मुख्य तळ कल्याण दरवाज्याच्या बाजूस पडला. प्रवासात फौजेच्या साहित्य, सामान, सैनिक यांच्या एकूण काफिल्याची लांबी चार मैल होती. वाटेत त्यांना मराठ्यांनी काही त्रास दिला नाही.
इंग्रज फौजेची संख्या
- तोफखाना १९४ यूओपिअन्स
- मद्रास ब्रिगेड १७७५
- बॉम्बे ब्रिगेड १७६६
एकूण ३७३५ सैनिक
इंग्रजांनी तीन प्रकारच्या तोफा वापरल्या
१) मोर्टर्स
या तोफा व्यासाला लहान आणि लांबीलाही लहान असून शक्यतो उभ्या उडवल्या जातात. त्यातून एखाद्या उंच अडथळ्याच्या मागे मारा करता येतो. त्यात जास्त दारू नसल्याने गोळे जास्त लांब जात नाहीत. यातून पोकळ गोळे जे दारू आणि शिस्याच्या रेजगारया यांनी भरलेले असतात ते उडवतात. गोळे हवेत फुटतात आणि खाली उभे असलेल्या सैनिकांवर गोळ्यांचा वर्षाव होतो. गो नि दांडेकर यांना टाक्याच्या तळाशी सापडलेला गोळा याच प्रकारचा होता.
२) हॉवित्झर्स
या तोफांचा व्यास मोठा आणि लांबी कमी असते. यांचा गोळा लांब जातो आणि शक्यतो ४५ अंश अथवा मध्यम कोनात उडवला जातो. यातही पोकळ विस्फोटक गोळे वापरतात.
३) सहा, बारा आणि अठरा पौंडी
या तोफांचा व्यास मध्यम आणि लांबी जास्त असते. गोळे साधारण सरळ रेषेत जातात. भरीव आणि पोकळ दोन्ही गोळे वापरता येतात. भरीव गोळे वापरून भिंत पाडता येते. त्यामुळे त्यांना नकाशात 'ब्रिचिंग बॅटरी' असे म्हणले आहे. (बॅटरी म्हणजे तोफांचा एकत्र मारा करणारा गट).
२१ फेब्रुवारी रोजी प्रथम किल्ल्याचे पुण्याच्या दिशेने होणारे दळणवळण बंद पाडण्यासाठी उत्तरेकडे थोडे सैनिक इंग्रजांनी पाठवले. तसेच आजच्या गडावर जायच्या रस्त्यालगत एका मोकळ्या जागेत (नकाशा पाहा) खालील तोफा चढवल्या. त्यांनी २१ तारखेस पुणे दरवाज्याच्या दिशेने मारा चालू केला.
- एक ८ इंच मॉर्टर
- एक ५.५ इंच हॉवित्झर
- दोन सहा पौंडी तोफा
कल्याण दरवाज्याच्या दिशेने २२ तारखेला मारा सुरु झाला. २५ तारीख आणि २८ तारखेला त्यात झुंजार बुरुजाच्या दिशेने असलेल्या उंचवट्यावरील तोफांची भर पडली. गडावर मारले गेलेले एकूण गोळे यांचा हिशोबही ठेवलेला दिसतो. १४१७ स्फोट होणारे गोळे (मोर्टर्स आणि हॉवित्झर्स) आणि २२८१ १८-पौंडी गोळे अशी संख्या आपल्याला सापडते.
गडाच्या दोन्ही दरवाज्यांवर ६, १० आणि १८ पौंडी तोफांच्या माऱ्यामुळे दोन हेतू साधता आले.
१) किल्ल्यातून कोणाला मोठ्या संख्येने बाहेर पडता येऊ नये. यामुळे किल्ल्यातील अरब आणि गोसावी यांना उलट आक्रमण करणे शक्य झाले नाही.
२) भिंत अथवा दरवाज्याला भगदाड पडून बाहेरच्या सैन्याला आत घुसता यावे. 'कल्याण गेट ब्रिच्ड' असा नकाशात उल्लेख आहे, त्यामुळे तिथे एखादे छोटे / मोठे खिंडार पडलेले असणे शक्य आहे.
मोर्टर्स आणि हॉवित्झर्स यांच्यातून डागल्या गेलेल्या विस्फोटक गोळ्यांमुळे किल्ल्यातील शिबंदीला सहज हालचाल करणे शक्य झाले नाही. त्यांची घरे (छप्पर सहसा गवताचे असे), जनावरे, माणसे यांचे नुकसान रोज होऊ लागले. आक्रमण आणि बचाव असे दोन्ही उपाय अवघड झाले. त्यातच भगदाडातून बाहेरचे सैनिक आत घुसून किल्ला घेतील अशी शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली तेंव्हा किल्ल्यातील सैन्य शरण आले.
रात्रीच्या अंधारात दरवाजे सोडून इतर जागांतून खाली उतरून इंग्रजी तोफांचे मोर्चे उधळून लावणे, किल्ल्यातील तोफा वापरून उलट मारा करणे असे उपाय किल्ल्यातील सैन्याच्या हाती होते, पण त्यांनी तसे काही केल्याची नोंद दिसत नाही. पुणे शहर आणि सातारा हातातून गेल्यामुळे शिबंदीची लढण्याची इच्छा कमी झालेली असणे शक्य आहे. अरब सैनिकांना जास्त पगारावर बाजीरावाच्या सैन्यात ठेवलेले होते, ते सैनिक खाल्ल्या मिठाला जागले नाहीत असे म्हणावे लागते. तीच गोष्ट बाजीरावाच्या खर्चाने ठेवलेल्या तैनाती फौजेची. अनेक प्रयत्न करूनही तिथे बाजीरावाचा फितुरीचा प्रयत्न सफल झाला नाही. तीच फौज बाजीरावाच्या विरुद्ध वापरली गेली.
१ मार्च रोजी किल्ल्यातील शिबंदीने (एकूण १२०० लोक) पांढरे निशाण फडकावले आणि एकही माणूस न गमावता, शून्य हानीसकट इंग्रजी सिंहगड ताब्यात घेतला. आणि लूटीला सुरुवात झाली. आणि त्यातून उद्भवले एक रामायण, त्याचा निर्णय कोर्टात लागला. अरविंद कोल्हटकर आणि नंतर संकेत कुलकर्णी यांनी याबद्दल आधीच लिहिले आहे, त्यामुळे अरविंद कोल्हटकर यांच्या लेखातला एक परिच्छेद फक्त इथे देतो.
.... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... ..
https://www.misalpav.com/node/41880
सिंहगड किल्ला २ मार्च १८१८ ह्या दिवशी पाडाव झाला आणि मराठ्यांनी किल्ला खाली केला. त्यावेळी ठरलेल्या अटींनुसार किल्ल्यातील लोकांना केवळ आपापले वैयक्तिक सामान बाहेर काढण्याची अनुमति देण्यात आली होती. नारो गोविंद औटी नावाचा बाजीरावाचा विश्वासू किल्ल्यात होता आणि तो बाहेर पडताना त्याच्याजवळ सोन्याच्या नाण्यांनी भरलेले चार पेटारे होते. ह्या नारो गोविंदाचा सर्व इंग्रजी लिखाणामध्ये केलेला उल्लेख Narroba Govind Outia असा आहे. नारो गोविंदच्या दाव्यानुसार ती सुमारे ३६ लाखाची मालमत्ता त्याची खाजगीतली होती. इंग्रजांना शंका होती की मालमत्ता बाजीरावाची असली पाहिजे आणि तसं असलं तर तिच्यावर विजेते म्हणून त्यांचा अधिकार होता. ती त्या जागी जप्त केली गेली पण नारो गोविंद आणि इंग्रजांच्यातील हा वाद बरेच वर्षं चालू रहिला. मध्यन्तरी केव्हातरी नारो गोविंदाचा मृत्यु झाला पण त्याच्या वतीनं दोघा मारवाडी व्यक्तींनी दावा पुढं चालू ठेवला. हा दावा त्यांनी रोख पैसे देऊन बहुधा नारो गोविंदाच्या पुढच्या पिढ्यांपासून विकत घेतला असला पाहिजे. आश्चर्याची गोष्ट अशी की मुंबईच्या सुप्रीम कोर्टात निर्णय नारो गोविंदाच्या बाजूनं लागला. त्या निर्णयाविरुद्ध कंपनी सरकारनं लंडनला प्रिव्ही कौन्सिलमध्ये अपील दाखल केलं. ह्या अपीलाचा निर्णय लागेपर्यंत डेक्कन प्राईझ मनीचं वाटप केलं जाऊ नये अशी पार्लमेंटात मागणी आली आणि त्यानुसार वाटप थांबवून ठेवण्यात आलं. प्रिव्ही कौन्सिलचा हा निर्णय कंपनीच्या अपीलाच्या बाजूनं लागला पण हे होता होता १८३० साल उजाडलं. हा निर्णय वाचायला उपलब्ध आहे.
.... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... .... ..
नंतरची कित्येक वर्षे गडावर काय होते आणि काय नाही याविषयी फार थोडी माहिती मिळते. या अंधारयुगातील कालखंडावर प्रकाश टाकणारी ही काही नवीन माहिती. १८७८ साली 'पूना ऑबझर्वर' नावाचे इंग्रजी वृत्तपत्र पुण्यातून प्रकाशित होत होते. या वृत्तपत्रात आलेल्या २ मे १८७८ रोजीच्या खालील जाहिरातींवरून आपल्याला काही नवीन गोष्टी समजतात.
सिंहगडावर असलेल्या इमारती -
१) जवाहीरखाना - विस्तीर्ण, दुहेरी कौलांचा, आत कुठलेतरी फर्निचर.
२) रत्नशाळा - दुहेरी कौलांचा, आत कुठलेतरी फर्निचर.
३) राजवाडा - गवताचे छप्पर असलेला, आत कुठलेतरी फर्निचर.
या सर्व इमारती कुणा एका दोराबजी पदमजी नावाच्या पारशी गृहस्थाच्या ताब्यात होत्या. त्यावरून असा तर्क करता येतो की ब्रिटिश काळात या इमारतींचा लिलाव अथवा विक्री ज्या वेळी केली गेली त्या वेळी पुण्यातल्या धनिक पारशी गृहस्थांनी या इमारती विकत घेतल्या आणि १८७८ साली त्या त्यांच्या ताब्यात होत्या.
प्रतिक्रिया
30 Dec 2018 - 5:54 am | तुषार काळभोर
सिंहगडाच्या बाबतीत 'तानाजी मालुसरे यांची लढाई' आणि 'शाहिस्तेखानावर हल्ल्यानंतर महाराजांचं सिंहगडावर जाणं' याच दोन गोष्टी माहिती होत्या.
सिंहगड म्हणजे आणखी बरंच काही आहे, हे आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
जीवित हानी होऊ न देता किल्ला जिंकणं, हे कौतुकास्पद म्हणावे लागेल. पण दीडशे वर्षे आधी जिथे मुघलांना या डोंगरांवर चढताना सैन्याची फेफे उडायची. इंग्रजांनी कसे जमवले असेल? मोक्याच्या जागी तोफा नेऊन ठेवायच्या, याला पुष्कळ वेळ लागणार. किल्ल्यातील सैन्याला वेगवान हालचाल करून तोफा कार्यान्वित होण्याआधीच निकामी करणे शक्य होते. पण ते आणि लेखात लिहिल्याप्रमाणे रात्रीच्या वेळी हल्ले करणे (गनिमी कावा) का केले गेले नसतील?
याशिवाय, इतिहासातून धडे घेऊन इंग्रजांनी प्रति-योजना तयार ठेवल्या असणेही शक्य आहे.
30 Dec 2018 - 5:56 am | तुषार काळभोर
ब्रिटिश, फ्रेंच, डच, पोर्तुगीज इत्यादी युरोपियन यांना वेगवेगळी नावे होती का? टोपीवाले, फिरंगी अशी नावे वाचली आहेत.
इतर कोणते युरोपियन जसे जर्मन आणि इटालियन व्यापार/वखार/वसाहत यासाठी भारतात/महाराष्ट्रात आले होते का?
30 Dec 2018 - 6:48 am | मनो
फार मोठा आणि गमतीदार विषय आहे हा. आत्ता थोडक्यात फक्त ३ गमतीदार नावें सांगतो.
वलंदेज (Hollandese) म्हणजे डच. इंद्रसेन हा कुणी पुराणकालीन राजा नसून Mr. Anderson या नावाचे मराठी रूपांतर आहे. तसाच Karmichael चा कर्मखल होतो.
अजून नावे टाकतो काही, थोड्या वेळाने.
30 Dec 2018 - 2:53 pm | तुषार काळभोर
त्यांनी आपल्या सिंहगडाचा Singhur केला, कल्याण दरवाजाचा Konkan gate केलं, आपण Anderson चा इंद्रसेन केला.
31 Dec 2018 - 9:14 am | प्रचेतस
टोपीकर-ईंग्रज-
फिरंगी-पोर्तुगीज
वलंदेज- डच
फरांसीसी- फ्रेंच
हबशी-हबसाणातून आले- अॅबिसिनियन.
जर्मन कोणी आल्याचे ज्ञात नाही पण निकोलाय मनुची हा इटालियन प्रवासी बरीच वर्ष भारतात त्यातही मुघल दरबारात होता.
12 Jun 2023 - 6:53 pm | विजुभाऊ
फ्रेंच = फिरंगी
ईंग्रज = ईग्रज
डच = वलंदेज
पोर्तुगीज = टोपीवाले
त्या काळी जर्मन इथे आले होते की नाही याबद्दल फारशी माहिती नाही
30 Dec 2018 - 4:08 pm | दुर्गविहारी
खुपच छान माहिती. काही गोष्टी नव्याने कळाल्या. आणखी अशाच स्वरुपाचे लिखाण येउ देत. पु.ले.शु.
30 Dec 2018 - 8:04 pm | शशिकांत ओक
मनो,
धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
दुर्गविहारीचे ही धन्यवाद त्यांनी ह्या धाग्याची लिंक दिली त्याबद्दल...
मध्यंतरीच्या २ शे वर्षांत कितीतरी स्थित्यंतरे झाली. त्यातूनही काही संदर्भ लागतात का याचा एक प्रयत्न... म्हणून काही लिंक्स सादर करायची इच्छा आहे.
सध्या डॉ दीक्षित यांच्या प्रभावाने खानपानाचे घड्याळ सांभाळत सांभाळत
सायंकालीन पायपीट करावी लागते. त्या वेळी केलेले लेखन आहे....
30 Dec 2018 - 10:00 pm | शशिकांत ओक
1 Jan 2019 - 7:22 pm | शशिकांत ओक
मित्रांनो, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
1. खान बहादुर पदमजी पेस्तनजी यांचा पॅलेस भवानी पेठेत होता तिथे आजकाल असे चित्र आहे...
2. सेट पॅट्रिक चर्चची सध्याची स्थिती -
3. अॅशबर्नर ( हे कोण ? CSI म्हणजे काय?)
Lionel Robert Ashburner CSI (1827 in Tasmania – 1907 in Marylebone, London) was the Acting governor of Bombay during the British Raj from 13 March 1880 to 28 April 1880. He was a appointed a Companion of the Order of the Star of India.[2]
4. यांच्या भव्य बंगल्याजवळच्या आऊट हाऊस असलेले भाडेऊ बंगले साधारण या भागात असावा असा अंदाज यावा.
5. 200शे वर्षे जुन्या नकाशाशी हा 3डी नकाशा ताडून पाहता.. त्याची अचुकता व तोफांच्या माऱ्याच्या बाबतीत अनेक सुसंगती दिसतात.
धाग्यातील व वरील असे दोन्ही नकाशाचे फोटो जवळ जवळ आणण्याचा प्रयत्न कोणी करेल का?
1 Jan 2019 - 10:37 pm | मनो
संकेत कुलकर्णी यांनी तो प्रयत्न केला आहे. त्यांचा नकाशा फेसबुकवर आहे. तो इथे सापडेल. (facebook login करावे लागण्याची शक्यता आहे)
https://m.facebook.com/photo.php?fbid=1950559224960247&id=10000018566092...
2 Jan 2019 - 12:42 am | शशिकांत ओक
धन्यवाद... तिथे शनिवारवाड्यासंबंधित लेखातील उल्लेखावर प्रतिसाद दिला आहे तो इथे डकवतो.
30 Dec 2018 - 9:33 pm | शशिकांत ओक
मनो,
धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
दुर्गविहारीचे ही धन्यवाद त्यांनी ह्या धाग्याची लिंक दिली त्याबद्दल...
मध्यंतरीच्या २ शे वर्षांत कितीतरी स्थित्यंतरे झाली. त्यातूनही काही संदर्भ लागतात का याचा एक प्रयत्न... म्हणून काही लिंक्स सादर करायची इच्छा आहे.
सध्या डॉ दीक्षित यांच्या प्रभावाने खानपानाचे घड्याळ सांभाळत सांभाळत
सायंकालीन पायपीट करावी लागते. त्या वेळी केलेले लेखन आहे....
30 Dec 2018 - 10:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
पूर्वी वाचनात न आलेली रोचक माहिती. असेच लिहित रहा.
31 Dec 2018 - 9:14 am | प्रचेतस
उत्तम माहितीपूर्ण लेख.
31 Dec 2018 - 11:34 am | मनो
आज माझा इंग्रजी लेख (चित्रकार उस्ताद मन्सूर) हा इथे प्रसिद्ध झाला.
https://www.livehistoryindia.com/cover-story/2018/12/30/ustad-mansur-a-w...
31 Dec 2018 - 1:53 pm | तुषार काळभोर
सोळाव्या सतराव्या शतकातील भारतीय चित्रे म्हणजे एका बाजूने रेखाटलेला चेहरा, अगदी दिल्ली ते सातारा-पुणे-कोल्हापूरपर्यंत!
अशामध्ये उस्ताद मन्सूर यांची निसर्गचित्रे वेगळी आहेत. (अर्थात तत्कालीन शैलीनुसार करकोचा अन झेब्राही एका बाजूनेच रेखातलेत.)
मनो, वेगवेगळ्या स्रोतांमधून अशी चित्रे निवडणे, हीच एक वेगळी कला आहे.
आभार.
31 Dec 2018 - 4:19 pm | खटपट्या
खूपच रोचक माहीती
31 Dec 2018 - 6:05 pm | मित्रहो
तानाजीने सिंहगड जिंकल्यावर पुढे काय झाले याची कल्पना नव्हती. रोचक माहिती.
1 Jan 2019 - 7:33 am | Blackcat (not verified)
छान माहिती
3 Feb 2019 - 3:55 am | Ramesh Patil
सिंहगडाच्या बाबतीत 'तानाजी मालुसरे यांची कोंढाण्याची लढाई' अन 'शाहिस्तेखानावर हल्ल्यानंतर महाराजांचं सिंहगडावर जाणं' याच दोन गोष्टी मला तरी माहिती होत्या.पण ही अत्यंत दुर्मिळ माहिती न अन सिंहगड म्हणजे आणखी बरंच काही आहे, हे आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद
4 Feb 2022 - 9:05 am | चन्यामन्या
मी नेहमीच विचार करायचो , मूठभर गोऱ्यांनी आपल्यावर इतकी वर्ष राज्य कसं केलं ? संख्येने तर आपण नेहमीच त्यांच्या पेक्षा वरचढ होतो.
शेवटी उत्तर मिळालं
३७३५ मध्ये फक्त १९४ गोरे !!
लेख खूपच उत्तम. भरपूर नवीन माहिती मिळाली.
धन्यवाद मनो
4 Feb 2022 - 11:12 am | मनो
ब्रिटिश लोकांनी एक महत्वाचा बदल केला - प्रत्येक सैनिकाला त्याचा पगार वेळेवर मिळेल असं आर्थिक नियोजन उत्तमप्रकारे केलं. हे कोणत्याही देशी सत्तेला १८०० सालच्या आसपास शक्य झालेलं नव्हतं. त्यामुळं त्यांना देशी सैनिकांची ददात कधीच भासली नाही. विदेशी अक्कल आणि देशी ताकद याच्या बळावर त्यांनी मग राहिलेलं जग ताब्यात घेतलं.
4 Feb 2022 - 1:43 pm | Trump
लाख मोलाची गोष्ट बोललात. शेवटी सैन्य पोटावर चालते.
अजुनही भारतामध्ये पैसे दिले कि इतरांसाठी हवे ते करण्यार्या लोकांची काही कमी नाही.
इंग्रजांनी भारतीयांना एकमेकांविरुध्द लढवुन आपले उखळ पांढरे केले. अजुनही इंग्रजांना त्यांची जाणिव नाही आणि लुटीचा किंवा इतरांना केल्याला त्रासाची पश्चापताप नाही.
4 Feb 2022 - 3:59 pm | कंजूस
असल्याने लिहिलं जात नाही. ब्रिटिशांनी भारतावर ( हिंदस्तानावर) ताबा कसा मिळवला हे वाचण्यासारखं आहे.
4 Feb 2022 - 4:26 pm | Trump
आम्हाला तर आवडते. जर आपण कोठे कमी पडलो किंवा पडत आहोत. हेच जर माहिती नसेल तर स्पर्धा कशी करणार!!!
4 Feb 2022 - 5:21 pm | कंजूस
तसेच ते लढत नसलेल्या लढायांवरही लक्ष ठेवत. इकडचे कंपनीचे इतर ब्रिटिश लोकही फावल्या वेळात भारतातील लक्षात लोकांची, राज्यांची माहिती गोळा करून वरती पाठवत.
4 Feb 2022 - 11:49 pm | मनो
आपले दैन्य आणि दारिद्य शतकानुशतके, पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे, ती काही आजची समस्या नाही. कालच एका इंग्रज प्रवाशाचे १८०५ सालच्या सुमाराचे पुणे प्रवासाचे वर्णन वाचत होतो. (https://www.loc.gov/resource/gdclccn.04019315v2/?sp=149) त्यात त्याने दक्षिणेत पेशवे आणि निजाम यांच्या मुलुखात पडलेल्या भीषण दुष्काळाचे वर्णन केले आहे. लोक आपली मुले अन्नासाठी विकत होते. आपल्या स्वार्थासाठी का होईना, पुण्याच्या इंग्रज रेसिडंटाने मुंबईत ४०,००० रुपये जमा करून पुण्यात दररोज दीड हजार लोकांना भात खाऊ घेण्याचे अन्नछत्र चालवले, तिथेही गोंधळ होऊ लागल्यावर रोख पैसे देणे चालू केले. जिथे प्रजेच्या एका भागाला पोट भरण्याची शाश्वती नाही तिथे ज्ञानार्जन, कुतुहूल इत्यादी गुण कसे निर्माण होणार? ज्यांची पोटे भरलेली होती असे थोडके त्या काळात लंडनला जाऊन इंग्रज प्रवाशांसारखेच चौकस दिसतात (उदाहरणार्थ हणमंतराव नावाचा राघोबादादांच्या वकिलाने ब्रिटिश पार्लमेंटमध्ये साक्ष दिली आहे). मला वाटते ही परिस्थिती १९४७ नंतर आणि मुख्यतः १९७० नंतर बदलली, नाहीतर १९४२ साली बंगालच्या दुष्काळात अशीच अवस्था होती.
5 Feb 2022 - 12:57 am | Trump
मग भारतात सोन्याचा धुर कधी निघायचा?
5 Feb 2022 - 12:46 pm | सर टोबी
हा खरंच एक कळीचा मुद्दा आहे. अगदी मागचा तीनशे वर्षाचा इतिहास पाहिला तर शिक्षणाचा अभाव, रोगराई, दुष्काळ आणि त्यामुळे असणारी गरिबी असे चित्र दिसते. एका स्टँड अप कॉमेडी शो मध्ये त्या कलाकाराने एक मजेशीर कमेंट केली होती. तो म्हणतो की कुठल्याही निर्वासिताला विचारा. त्याची पाकिस्तानात मोठ्ठी हवेली, जमीन जुमला होता. अकरा घोड्यांची बग्गी दाराबाहेर असायची. आता या सगळ्या निर्वासितांची पाकिस्तानात राहिलेली जमीन एकत्र केली तर ती पाकिस्तान पेक्षाही मोठी असायला हवी!
यातला विनोदाचा भाग सोडला तर सध्ध्या उजव्या विचारसरणीकडून जी सततची राळ उडवली जाते की काँग्रेसने हेतुपुरस्सर आपला दैदिप्यमान इतिहासाचं विकृतीकरण केलं त्यातला फोलपणा उघड व्हावा.
बाकी धाग्यांचा काश्मीर होऊ नये ही इच्छा. आमचा विचार पटला नाही तर ताण घेऊ नये.
5 Feb 2022 - 12:55 pm | Trump
परदेशी राजकर्त्यांखालचा ईतिहास भारतीय होऊ शकतो का? हा प्रश्न आहे. माझ्या माहीतीने, भाजप -> अंदाजे १००० वर्षाची गुलामगिरी आणि कॉण्ग्रेस म्हणजे २००-३०० वर्षांची सौम्य / रमतगमत गुलामगिरी असे प्रकार दिसत आहेत.
जे भाजप म्हणते ते १०० टक्के चुकीचे आहे का?
5 Feb 2022 - 1:53 pm | सर टोबी
निखालस चुकीचं आहे. माझं दुःख ते नाही. आपल्यासारखा सुशिक्षित माणूस त्या प्रचाराला बळी पडतो हे आहे.
6 Feb 2022 - 12:41 pm | Trump
धन्यवाद टोबीसर,
भाजप आणि तुम्ही दोन्ही वेगवेगळ्या ईतिहासांबद्दल बोलत आहात. जर त्यांचे १०० टक्के चुकीचे असेल तर बहुतांश भारतीय मतदार मुर्खच म्हटले पाहीजेत.
6 Feb 2022 - 7:58 pm | sunil kachure
मागच्या तीनशे वर्षाचा विचार केला तर भारत नेहमीच युद्धाच्या छायेत वावरत होता.
ब्रिटिश सत्तेच्या अगोदर भारत असंख्य सत्ता धारी होते.
ते पण ठीक आहे अनेक सत्ताधारी आणि प्रत्येकाची वेगळी राज्य असती तरी काही हरकत नव्हती
पण हे जनतेच्या हित राहू ध्या बाजूला फक्त हे सर्व राजे फक्त एक दुसऱ्याच्या राज्यावर हल्ले करणे ,सारख्या लढाया करणे ह्या मध्येच गुंतले होते.
ह्यांची सर्व ताकत लढाई करण्यात च वाया जात होती
त्या मुळे कोणत्याच राजाचे स्थिर राज्य नव्हते.
ह्या मुळे त्या काळात भारत गरीब च होता पण सत्ताधारी मात्र श्रीमंत होते.
त्या अगोदर जेव्हा भारतात स्थिर राज्य होती .
भारतात ब्रिटिश आले स्थिरावले मग परत संघर्ष सुरू झाला ब्रिटिश सत्ता आणि क्रांतिकारी.
त्या नंतर स्वतंत्र ,,फाळणी.
परत हिंसा ,स्फोटक वातावरण.
भारताला प्रगती करण्यासाठी शांतता अशी मिळालीच नाही.
अफगाणिस्तान जास्त नेहमी युद्ध सदृश स्थिती मध्ये असतो.
भारत पण तसाच होता.
मग गरिबी असणारच..
आणि त्या काळात जगात पण फार वेगळी स्थिती नव्हती
चीन पण तशाच स्थिती मधून जात होता.
5 Feb 2022 - 12:58 am | Trump
दुव्याबद्दल धन्यवाद. :)
6 Feb 2022 - 10:54 pm | sunil kachure
मोघल बादशाह हे अफगाणिस्तान,तुर्कस्थान,इराण येथून आलेले परकीय आक्रमक.
पण ह्यांनी भारतावर च का स्वाऱ्या केल्या.
त्यांचा आणि बाजूच्या युरोपियन राष्ट्रांचा कधी संघर्ष झाला होता का?
त्यांनी युरोप किंवा बाजूचा रशिया च प्रदेश जिंकण्यासाठी त्या भागावर स्वाऱ्या का नाही केल्या .
भारतावर वर च का केल्या.
चीन मध्ये मुगल साम्राज्य नव्हते,श्री लंकेत नव्हत.
ह्याची काय करणे असावीत ..
भारत हा सॉफ्ट टार्गेट का होता?
मुघल,ब्रिटिश,पोर्तुगीज,अफगाणी, डच ह्यांनी भारताला टार्गेट बनवले हा तर खरा इतिहास आहे
6 Feb 2022 - 11:02 pm | Trump
बरोबर प्रश्न विचारले आहेत...
13 Dec 2022 - 5:57 am | मनो
इकडे लक्ष न दिल्याने प्रश्न अनुत्तरितच राहिला. थोडक्यात सांगतो. १७०० च्या सुमारास जगाच्या एकूण जीडीपी पैकी २५% एकट्या भारतात होते. भरवशाचा पाऊस, प्रचंड मनुष्यबळ, आणि जगात यांत्रिक साधनांचा शोध लागण्यापूर्वीचा तो काळ असल्याने असे असणे स्वाभाविक आहे. पण ही प्रचंड संपत्ती मूठभर लोकांच्या हातात होती. एका बाजूला ताजमहाल तर दुसरीकडे गरिबांच्या मुंडक्यांचे मिनार गावाबाहेर अशी परिस्थिती होती. त्यामुळं लुटण्यासाठी भारतच का याचे उत्तर मिळेल.
इस्लामी आक्रमण फक्त इथेच नाही तर इराण, स्पेन, मध्यपूर्व, रशिया, चीनमध्ये सुद्धा झालेलं आहे. तैमूर, चंगीजखान इत्यादी नावे तुम्ही ऐकलीच असतील. त्यांना कुठे खूप यश मिळालं (इराण) आणि कुठून कुठून परत फिरावे लागले (स्पेन). शिवाजी महाराज झाले नसते तर ....?
ज्येष्ठ इतिहास अभ्यासक श्री गजानन भास्कर मेहेंदळे या विषयावर फेब्रुवारीपर्यंत (२०२३) आपले पुस्तक प्रकाशित करतील असं दिसतंय, त्यात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
14 Dec 2022 - 10:07 pm | शशिकांत ओक
मनो यांनी सांगितले आहे ते सध्याच्या काळात तपासले तर?
खरी मुंबई कुठली उच्चभ्रूंची कि चाळीत राहणाऱ्यांच्या संस्कृतीची कि झोपडपट्टीतील कष्टकऱ्यांच्या घामाची?
कोकणी लोकांची कि पारशी, गुजराती, मारवाडी, बिहारींची कि माफिया गँगच्या डॉन ची...?
तशीच अवस्था भारतीय उपखंडातील जनतेची असावी.
22 Dec 2022 - 3:12 pm | शेर भाई
सिंहगडाची अखेरची लढाई (भाग १) ची लिंक मिळेल का ??
23 Dec 2022 - 7:20 am | मनो
भाग १ https://www.misalpav.com/node/43804
माझे सर्व लेखन
https://www.misalpav.com/user/22568/authored