प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन ) संगे !

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
20 Aug 2017 - 4:22 pm

हातात सामान घेऊन मी रेल्वे स्टेशनच्या एका फलाटावर उभा आहे. माझी गाडी थोड्याच वेळांत येथे येत असल्याची घोषणा झाली आहे. माझ्याकडे प्रवासाचे आरक्षित तिकीट आहे. त्यामुळे माझा बसायचा डबा जिथे थांबणार आहे तिथे मी थांबलेलो आहे. गाडीला नेहेमीप्रमाणेच खूप गर्दी आहे.
माझा डबा हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित गटातील असल्याने त्यात फक्त आरक्षित तिकीटधारकांनीच चढावे अशी माझी अपेक्षा आहे ! खरे तर तसा नियमही आहे. पण वास्तव मात्र तसे नाही. माझ्या डब्याच्या जागेवर बिगरआरक्षित प्रवाशांची अधिक झुंबड आहे. खरे तर या मंडळींनी ‘जनरल ‘ डब्यात जायला हवे आहे. परंतु, सामान्य तिकीट काढूनही आरक्षित डब्यात घुसणे हा त्यांचा शिरस्ता आहे ( नियम बियम कोणाला सांगता राव ?).

ok

आता गाडी फलाटाला लागते. अनारक्षित तिकीटवाले (व बिगर तिकीटवालेही) झुंडीने डब्यात घुसू लागतात. आम्ही आरक्षित तिकीटवाले बापडे मात्र शहाण्यासारखे दम धरून त्यांना आधी चढू देतो. शेवटी घामाघूम झालेल्या अवस्थेत मला एकदाचा डब्यात प्रवेश मिळतो. माझ्या आरक्षित आसनावर आक्रमण केलेल्या घुसखोराला मी उठवतो व माझे बूड टेकतो. हुश्श !
कामानिमित्त मी नियमित रेल्वे प्रवास करतो. डब्यात शिरतानाचा हा अनुभव नेहेमीचाच. बस, रेल्वे व विमान या तीनही प्रवासांमध्ये माझे रेल्वेवर आत्यंतिक प्रेम आहे. जेव्हा एखाद्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध असतो तेव्हा मी इतर पर्यायांचा विचारही करत नाही. आतापर्यंत केलेल्या भरपूर रेल्वे प्रवासामुळे ट्रेन ही माझी प्रेयसीच झाली आहे – जणू माझी सफर-सखीच. या प्रवासांचे अनेक भलेबुरे अनुभव माझ्या गाठीशी आहेत.
....
माझा आजचा प्रवास सुरू झालाय. गाडीने आता वेग घेतलाय. काही तास आता मी ट्रेनमध्ये असणार आहे. आज मला तीव्रतेने वाटतंय की माझी प्रवासातील सुख दुख्खे माझ्या या सखीलाच सांगावित.

तर एक सखे, तुझ्या नि माझ्या सहवासाचे काही किस्से ......
लहानपणी तुझ्यातून प्रवासाची खूपच मज्जा वाटायची. त्या काळचे तुझ्या प्रवासाचे तिकीट अजून आठवते. ते पुठ्याच्या कागदाचे छोटेसे आयताकृती तिकीट होते. ते तिकीट-खिडकीवरून घेताना आतली व्यक्ती ते एका यंत्रावर दाबून त्यावर तारीख व वेळ उमटवत असे. आम्ही मुले ती तिकीटे कौतुकाने जमवून जपून ठेवत असू.

तिकीट घेऊन फलाटावर गेल्यावर तुझी इंजिन्स कर्कश शिट्या करीत उभी असायची. त्या आवाजाची तर अगदी भीती वाटायची. सखे, तेव्हा तू खरोखरीच झुकझुक गाडी होतीस. तुझ्या काही मार्गांवर तू खूपदा बोगद्यातून जायचीस त्याचे तर आम्हाला कोण कौतुक. तुझ्या काही स्थानकांवरचे बटाटेवडे तर अगदी नावाजलेले. ते खाण्यासाठी लहानमोठे सगळेच आतुर असत. एकून काय, तर तुझ्या बरोबरचा प्रवास म्हणजे मुलांसाठी खाणेपिणे व धमाल करणे यासाठीच असायचा.

उपनगरी रेल्वे हा तुझा एक महानगरी अवतार आहे. लहानपणी मी माझ्या आजोबांबरोबर मुंबईच्या लोकल्सने प्रवास करी. तुडुंब गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या डब्यांमध्ये शिरणे व त्यातून उतरणे हे एक अग्निदिव्यच. असेच एकदा आम्ही फलाटावर गाडीची वाट पाहत होतो. गाडी आली. आमच्या समोरच्या डब्यात गर्दीचा महापूर होता. परंतु, त्याला लागूनच्या डब्यात बऱ्याच रिकाम्या जागा होत्या (हे वर्णन १९७५ मधले !). माझे आजोबा गर्दीच्या डब्याकडे बघत हताशपणे म्हणाले की त्यात शिरणे अवघड आहे, तेव्हा आपण ही गाडी सोडून देऊ. त्यावर मी त्यांना कुतूहलाने म्हणालो की आपण त्या शेजारच्या बऱ्यापैकी रिकाम्या डब्यात चढूयाकी. त्यावर ते किंचितसे हसले व मला म्हणाले, “ अरे, तो पहिल्या वर्गाचा डबा आहे.’’ मी ते ऐकले मात्र अन मला जणू ४४० व्होल्टचा विजेचा झटका बसला !
म्हणजे या डब्यांमध्ये अशी वर्गवारी असते तर.( खरं तर माणसांमधली वर्गवारी सुद्धा कळायचे माझे वय नव्हते ते ). मग मला आजोबांनी या दोन्ही वर्गांच्या भाड्यातील लक्षणीय फरक सांगितला. मला झालेला तो एक साक्षात्कारच होता. त्यानंतर बरीच वर्षे पहिल्या वर्गाचा डबा हा माझ्यासाठी फक्त ‘लांबून बघण्याचा’ डबा होता. तेव्हा निमूटपणे दुसऱ्या वर्गाच्या डब्यात घुसण्याला पर्याय नव्हता.

मोठेपणी मी कमावता झाल्यावर तुझ्या सर्व वरच्या वर्गाच्या प्रवासांचा पुरेपूर अनुभव घेतला. पण एक सांगू ? मला तुझ्या त्या वातानुकुलीत वर्गाचा प्रवास मनापासून आवडत नाही. त्यातला थंडपणा मला सोसत नाही. तसेच तिथल्या बंद खिडक्या, आतमध्ये झालेली झुरळे आणि कुंद वातावरण नकोसे वाटते. त्यातून तिथले प्रवासी पण कसे बघ. फारसे कोणीच कोणाशी बोलत नाही. बहुतेक सगळे एकतर मोबाईलवर चढ्या गप्पा मारण्यात मग्न किंवा कानात इअरफोन्स खुपसून हातातल्या स्मार्टफोन्स मध्ये गुंगून गेलेले. या सगळ्यांमुळे मी तिथे अक्षरशः गुदमरून जातो.

त्यामुळे मी एकटा प्रवास करताना शक्यतो तुझ्या दुसऱ्या वर्गाने जाणे पसंत करतो. तिथल्या उघड्या खिडक्या, सुसाट वारा, तुझ्या वेगाची होणारी जाणीव आणि एकूणच त्या डब्यातले मोकळेढाकळे वातावरण मला बेहोष करते. मला चांगले आठवतंय की मी काही प्रवास पूर्वीच्या तुझ्या बिगरवातानुकुलीत पहिल्या वर्गातून केले होते. खरं म्हणजे माझा सर्वात मनपसंत वर्ग तोच होता. जेव्हापासून तो साधा पहिला वर्गच रद्द झाला तेव्हापासून मी मनोमन खट्टू आहे.

अलीकडच्या काही वर्षात तुझ्या दुसऱ्या वर्गाच्या प्रवाशांना अजून एक त्रास सुरू झालाय. तू धावत असताना डब्याच्या उघड्या खिडक्यांतून हलते निसर्गसौंदर्य मनसोक्त पाहणे हे खरे तर या प्रवाशांचे हक्काचे सुख. पण, तुझ्या काही मार्गांवर या मूलभूत सुखावरच घाला घातला गेला आहे. या मार्गांवरून तू जात असताना बाहेरील काही दुष्ट मंडळी गाडीवर जोरात दगड मारतात. बहुदा असे लोक याप्रकारे त्यांच्यातील असंतोष व नैराश्य बाहेर काढत असावेत. पण त्यामुळे प्रवाशांनी मात्र जीव मुठीत धरून प्रवास करायचा. मग यावर उपाय म्हणून पोलीस प्रत्येक डब्यात येऊन प्रवाशांना खिडक्यांचे लोखंडी शटर्स सक्तीने लाऊन घ्यायला लावतात.
मग अशा बंदिस्त डब्यातून प्रवाशांनी जिवाची घालमेल सहन करत आणि एकमेकांकडे कंटाळा येईस्तोवर बघत बसायचे. बाकी प्रचंड गर्दीच्या वेळी तुझ्या दारात उभे राहून जाणाऱ्यांना तर कायमच धोका. अधेमध्ये असा जोराचा दगड लागून एखादा प्रवासी गंभीर जखमी झालाय वा मरणही पावलाय. किती चटका लावून जाते अशी घटना.

तुझ्यातून प्रवास करणे ही माझ्यासाठी आयुष्यभराची करमणूक आहे प्रवास सुखकर व्हावा म्हणून माझ्यासारखे अनेक जण तिकिटाचे व्यवस्थित आरक्षण करूनच प्रवास करतात.पण, आम्हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षितांचे एक कायमचे दुखः आहे.ते म्हणजे आरक्षित डब्यांत होणारी बिगरआरक्षित मंडळींची त्रासदायक व संतापजनक घुसखोरी.
या घुसखोरांमध्ये सामान्य तिकीटवाले, प्रतीक्षा यादीवाले, तृतीयपंथी आणि भिकारी असे विविधरंगी लोक असतात. या सर्वांचा असा ठाम समज असतो की कोणीही कुठल्याही डब्यात बसले तरी चालते. म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाण्यातला हा प्रकार. ही मंडळी एकदा का आरक्षित डब्यात घुसली की इतकी शिरजोर होतात की आम्हालाच विस्थापितासारखे वाटू लागते.एकंदरीत काय तर दुसऱ्या वर्गाचे आरक्षित डबे हे ‘’आओ जाओ घर तुम्हारा’’ असे झालेले आहेत. यातील प्रवाशांच्या सुखसोयीबाबत रेल्वे प्रशासनही बेफिकीर आहे. प्रवाशांच्या तक्रारींना तर काडीचीही किमंत दिली जात नाही.
दुसऱ्या वर्गाचे आरक्षण केलेल्या प्रवाशाला डब्यात मोकळा श्वास घेता येईल, त्याला त्याचे सामान त्याच्या आसपास हक्काने ठेवता येईल, डब्यातली मधली मार्गिका ही चालण्यासाठी मोकळी असेल आणि गरज लागेल तेव्हा त्याला स्वच्छतागृहात विनासंकोच जाता येईल अशा मूलभूत अपेक्षा हा ‘बिचारा प्रवासी’ ठेऊन आहे.

मध्यंतरी मी एकदा तुझ्या डब्याचे बाहेरून बारकाईने निरीक्षण केले. तुझ्या प्रत्येक डब्याला दोन दरवाजे आहेत. त्यातील एकावर ‘प्रवाशांनी चढण्यासाठी’ व दुसऱ्यावर ‘उतरण्यासाठी’ असे व्यवस्थित लिहेलेले आहे. मनात आले की खरोखरच जर याप्रमाणे आपली जनता वागली तर !
पण वास्तव मात्र भीषण आहे.उतरणाऱ्याना उतरू देण्यापूर्वीच चढणारे घुसखोर नकोनकोसे करून टाकतात. काही निर्लज्ज तर आधीच रुळांवर उतरून फलाटाच्या विरुद्ध बाजूच्या दाराने आत घुसतात. हे पाहून तिडीक येते व शिस्तीबाबतच्या आपल्या मागासपणाची अगदी लाज वाटते. एका दारातून प्रवासी उतरताहेत व जसा डबा रिकामा होतोय तसे शिस्तीत दुसऱ्या दारातून नवे प्रवासी चढताहेत असे ‘रम्य’ दृश्य बघायला एखाद्या सम्रुद्ध परदेशातच जावे लागेल !

तुझ्यामधून नियमित प्रवास करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांच्या जीवनाचा तू अविभाज्य भाग झाली आहेस. तुझ्या संगतीत मला जीवनातले आनंद व चैतन्यदायी प्रसंग अनुभवायला मिळाले आहेत. माझ्या बरोबरचे काही सहप्रवासी आता माझे जिवलग मित्र झाले आहेत. तू जेव्हा वेगाने धावत असतेस तेव्हा खिडकीतून बाहेर बघताना माझे विचारचक्रही वेगाने फिरत राहते. मग त्यातूनच काही भन्नाट कल्पनांचा जन्म होतो.

माझ्या लेखनाचे कित्येक विषय मला अशा प्रवासांमध्ये सुचले आहेत. अनेक विषयांचे सखोल चिंतन मी तुझ्या बरोबरच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात करू शकलो आहे. माझा जास्त प्रवास हा तुझ्या ‘एक्स्प्रेस’ व ‘लोकल’ या प्रकारांतून होतो. पण, अधूनमधून मी तुझ्या ’passenger’ या अवताराचाही अनुभव घेतलाय. त्या प्रवासामुळे मला स्वतःभोवतीच्या सुरक्षित कोशातून बाहेर पडता आले. तसेच ‘महासत्ता’ वगैरे गप्पा मारणारा भारत वास्तवात काय आहे याचे भान आले.
तुझ्या प्रवासादरम्यान कधीकधी होणारे गैरप्रकार आणि काही दुखःद प्रसंग मात्र अस्वस्थ करून जातात. कधी तुझ्यावर दरोडा पडतो अन प्रवाशांची लूटमार होते. कधी तुझ्या यंत्रणेत गडबडघोटाळा होतो अन छोटेमोठे अपघात होतात. काही देशद्रोही तुला घातपात करण्यात मग्न असतात. आयूष्यात प्रचंड नैराश्य आलेले काही जीव आत्महत्या करण्यासाठी तुझ्यापुढे उडी मारतात. तर कधीतरी काही भडक डोक्याचे प्रवासी आपापसातील भांडणातून एखाद्या प्रवाशाला गाडीतून बाहेर फेकतात. अशा हृदयद्रावक घटना कधीही न घडोत अशी माझी मनोमन प्रार्थना आहे.
तुला आपल्या देशात रूळांवरून धावायला लागून आता दीडशेहून अधिक वर्षे होऊन गेलीत. तुझ्यावर पूर्णपणे सरकारी मालकी आहे. तेव्हा सरकारी यंत्रणांमध्ये आढळणारे सगळे फायदे-तोटेही तुझ्या ठायी आढळतात. तुझ्या गलथानपणाबाबत आपण सतत ऐकताच असतो. पण, मध्यंतरी मला तुझा एक सुखद अनुभव आला.

तुझ्या एका मूळ स्थानकावर मी तुझ्यात बसलो होतो. तुला सुटायला अजून अवकाश होता.डब्यात तुरळक प्रवासी होते. मी खिडकीतून बाहेर बघत होतो.तेवढ्यात एक गणवेषधारी माणूस माझ्याजवळ आला. तो सफाई कामगारांवरचा पर्यवेक्षक होता. त्याने मला सांगितले की तुमच्या डब्यांची व स्वच्छतागृहांची साफसफाई कामगारांनी केली आहे. ती कशी झाली आहे यावर त्याला माझे लेखी मत हवे होते.

त्याने मला अधिकृत नमुन्यातील कागद भरण्यास दिला.मग मलाही हुरूप आला व मी प्रत्यक्ष जाऊन सगळे बघून आलो. सर्व स्वच्छता चांगली केलेली होती व तसे मी त्याला लिहून दिले. त्या कागदात शेवटी प्रतिसादकाचे नाव, आसन क्रमांक व फोन नं. इ. सर्व लिहायचे होते. हा अनपेक्षित प्रकार बघूनच मी सुखावलो व मनात म्हणालो, ‘’ चला आता भारतीय रेल्वेला ‘corporate look’ येतोय तर !” अर्थात हा अपवादात्मक अनुभव आहे. तो वरचेवर येवो ही अपेक्षा !! तसेच भविष्यात तुझी श्रीमंती व अतिवेगवान रूपे विकसित होण्यापूर्वी सध्याच्या तुझ्यातील मूलभूत सोयी सर्व वर्गाच्या प्रवाशांना व्यवस्थित मिळोत ही इच्छा.
...
माझा या प्रेयसी बरोबरचा संवाद हा न संपणारा आहे. पण, आताच्या प्रवासाचे चार तास मात्र आता संपत आले आहेत. आता गाडी स्थानकाच्या जवळ आल्याने हळू झाली आहे. काही प्रवासी त्यांच्या सामानासह दाराजवळ गर्दी करत आहेत. स्थानकात शिरून फलाटाला लागेपर्यंत गाडी खूप हळू जाते व थांबायला भरपूर वेळ घेते. म्हणून मी अजून शांतपणे माझ्या आसनावर बसून आहे. अहो, आता सखीच्या विरहाची वेळ आल्याने खरे तर उठवत नाहीये !
अखेर गाडी थांबते. लगेचच गाडीत चढू पाहणाऱ्या अति उतावीळ प्रवाशांना मोठ्या कष्टाने रोखत आम्ही खाली उतरतो. मी फलाटावरून चालत असतानाच एकीकडे ध्वनिवर्धकातून घोषणा होत असते, ‘’हे मध्य रेल्वेचे XXXX स्थानक आहे. इंटरसिटी एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशांचे आम्ही स्वागत करतो.’’ आम्हा हजारभर प्रवाशांचे होत असलेले हे स्वागत ऐकून मी भारावतो. माझ्या ‘प्रवास-सखी’ कडे निरोपादाखल एक प्रेमभरी नजर टाकतो आणि हातातले सामान सावरत मार्गस्थ होतो.
********************************

समाजलेख

प्रतिक्रिया

कंजूस's picture

30 Aug 2021 - 8:56 am | कंजूस

धन्यवाद.

कुमार१'s picture

31 Aug 2021 - 11:08 am | कुमार१

बंगाल मध्ये नवी जंगल सफर ट्रेन !

https://www-moneycontrol-com.cdn.ampproject.org/v/s/www.moneycontrol.com...

कुमार१'s picture

7 Sep 2021 - 12:26 pm | कुमार१

वंदे भारत ट्रेन्सचे उत्पादन वाढत आहे. काही रोचक माहिती इथे
https://m.timesofindia.com/business/india-business/vande-bharat-express-...

या ट्रेन्स ना ट्रेन 18( 2018साली तयार झाल्या म्हणून) असेही म्हणतात.
त्यांचे आधीचे नाव शताब्दी किलर्स असे ठरले होते !

कुमार१'s picture

9 Sep 2021 - 4:12 am | कुमार१

दोन्ही चित्रफिती छान आहेत.

कुमार१'s picture

9 Sep 2021 - 4:11 am | कुमार१

रेल्वे नियोजित वेळेपेक्षा चार तास उशीरा पोहोचल्यामुळे त्यातील एका प्रवाशाचे पुढील विमान चुकले.

त्यावर त्याने दावा दाखल केला होता. अखेर तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. न्यायालयाच्या निर्णयानुसार या व्यक्तीला रेल्वेने तीस हजार रुपये नऊ टक्के व्याजासह भरपाई द्यायची आहे.

असा हा महत्त्वपूर्ण निर्णय !
https://www.moneycontrol.com/news/india/train-delay-railways-to-pay-rs-3...

कुमार१'s picture

12 Sep 2021 - 10:06 am | कुमार१

रेल्वे तिकीट ऑनलाईन काढताना आधार किंवा पॅन क्रमांक विचारण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार

गामा पैलवान's picture

13 Sep 2021 - 5:25 pm | गामा पैलवान

प्रवासासाठी आधार वा प्यानची नेमकी गरज काय? हा घटनेने दिलेल्या संचारस्वातंत्र्याचा संकोच आहे. प्रवासी पैसे भरून प्रवास करतोय. फुकटांत नाही.

-गा.पै.

कुमार१'s picture

13 Sep 2021 - 6:08 pm | कुमार१

दलाल मंडळींच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी असं काहीसे त्या बातमीत म्हटलं आहे

गॉडजिला's picture

13 Sep 2021 - 6:47 pm | गॉडजिला

तपासनीस आयडी प्रूफ मागतोच.

गॉडझिला,

तुम्ही गॉडझिला आहात याचा पुरावा म्हणून आधार वा प्यान देणं वेगळं. आणि पुरावा म्हणून आधार वा प्यानची सक्ती करणं वेगळं. ओळखीचा पुरावा इतर काही असू शकतो. उदा. पूर्वी मुंबईत लोकलचा पास काढण्यासाठी ओळखपत्र काढावं लागे. तो ओळखीचा पुरावा आहे. किंवा मतदान आयोगाने जारी केलेलं ओळखपत्र हा ही पुरावा आहे. आधार वा प्यान ची सक्ती होता कामा नये.

आ.न.,
-गा.पै.

गॉडजिला's picture

27 Sep 2021 - 1:00 pm | गॉडजिला

फिरा की खाजगी वाहन अन् ड्रायवर भाड्याने घेऊन हवे तिथे हवे तसे...

तुम्हाला स्वस्त सरकारी (?) रेल्वे हवी पण तिकीट काढले एकाने प्रवास दुसरा करतोय हा गैरप्रकार टाळायला तुम्हाला आधार लिंक केल्याने काय नुकसान आहे ?

गामा पैलवान's picture

27 Sep 2021 - 2:17 pm | गामा पैलवान

गॉडझिला,

मूळ बातमीच्या मथळ्यात .... now these documents will have to be given असं लिहिलंय. म्हणजे सक्ती आहे. मात्र खालील मजकुरात .... IRCTC may also ask you for PAN, Aadhaar or passport information अशी संदिग्ध शब्दरचना आहे.

माझा मुद्दा अध्यार, आयकर क्रमांक, पारपत्र या तिघांच्या सक्तीच्या विरोधात आहे. इतर कुठलंही सरकारी ओळखपत्र चालून जायला पाहिजे. विशेषत: रेलवेने जारी केलेलं ओळखपत्र तर चालायलाच पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

संधिग्द रचना आजकाल नॉर्मल गोश्ट आहे न्युजपत्रांच्या बाबतीत. त्याना पेजहिट्स हवेत.

कंजूस's picture

13 Sep 2021 - 9:37 pm | कंजूस

तिकिट काढणारा प्रवासात असला तर दलाल जातील असं वाटायचं. पण तो नियम अशक्य कारण बरेचदा ज्येष्ठ नागरिकांची तिकिटं नातेवाईकांनी काढून दिलेली असतात.

कंजूस's picture

13 Sep 2021 - 9:32 pm | कंजूस

म्हणजे की खिडकीवर प्रिंटेड तिकिट काढताना लागत नाही फण प्रवासात कोणतेतरी ओळखपत्र {विचारल्यास} दाखवावे लागते.
ओनलाईन साठी बुकिंग करतांना जे लिहिलं तेच दाखवावं लागायचं.

पाच महिन्यांपूर्वी irctc site ला आधार verification होतं. तीन महिन्यांपूर्वी email verification वाढवलं.

कुमार१'s picture

13 Sep 2021 - 9:45 pm | कुमार१

आता ऑनलाईन तिकीट काढायच्या वेळेसच ते आधार क्रमांक ,ओटीपी असं काहीतरी मागून खातरजमा करणार असे दिसते आहे.

बुकिंग - सर्च ट्रेनवर गेलं की लगेच verify - 1,2,3,4 ..... येतं!!!

५ मेगा हर्ट्झ स्पेक्ट्रममुळे ‘फोर-जी’ नेटवर्क प्रत्यक्षात येणार आहे...

रेल्वेच्या सिग्नल व संदेश यंत्रणांमधील आधुनिकीकरण समजावून सांगणारा एक चांगला लेख.

कंजूस's picture

23 Sep 2021 - 9:20 pm | कंजूस

पुस्तक
भारतात ८० रेल्वेंतून प्रवास - अनुभव.
Around India In 80 Trains
ISBN Search >

कंजूस's picture

24 Sep 2021 - 4:30 am | कंजूस

पुस्तक
भारतात ८० रेल्वेतून प्रवास - अनुभव.
Around India In 80 Trains
ISBN Search >

कुमार१'s picture

24 Sep 2021 - 11:45 am | कुमार१

छान दिसतय पुस्तक. कुणी वाचले तर त्यावर लिहा.
..............................
रेल्वेच्या संगणकीय तिकीट आरक्षण यंत्रणेतील एक मोठा दोष बारावीत शिकणाऱ्या मुलाने उघडकीस आणला.
त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
अभिनंदन !

कंजूस's picture

24 Sep 2021 - 12:33 pm | कंजूस

William. Darlympleचा चांगला अभिप्राय आहे. अमेझोनवर used books स्वस्त मिळतात वाटतं.

Around the world in 80 daysवरून स्फूर्ती घेऊन लिहिलंय लेखिकेने.

कामाचं/ विनोदी असल्यास थोडक्यात लिहीन.

कंजूस's picture

1 Oct 2021 - 7:14 am | कंजूस

एक चांगलं पुस्तक झालं असतं. लेखिकेचे निरीक्षण, सांगण्याची कला आणि विनोदबुद्धी यामुळे वाचायला मजा येते. वेगवेगळ्या ट्रेन्समधून प्रवास करून थोडेफार स्थळदर्शन यावर लिहून काम भागले असते असते. दहा बारा प्रकारच्या घेऊन हे साध्य झाले असते.
पण दोन कारणांमुळे सगळा कार्यक्रम भोंगळ झाला. एक म्हणजे Around the world in 80 days या जुन्या गाजलेल्या पुस्तकाचे उदाहरण समोर ठेवून ८० गाड्यांतून उगाचच प्रवास केला. तो करायचा म्हणून केला आणि तोही टु टिअर स्लीपरमधून. ज्यातून भारतातील सामान्य जनता प्रवास करत नाही. शिवाय नाट्यमय घटना अशा काहीच नाहीत.

दुसरी चूक - पासपॉत हे पात्र सहकारी आणि सहप्रवासी म्हणून निवडण्यातली चूक. भांडणं झाली. एकूण ही योजना कशी तरी पूर्ण केली पण अर्ध्या प्रवासानंतर ते दोघे वेगळे झाले. लेखिकेने एकट्यानेच शेवटच्या चाळीस गाड्यांतून प्रवास केला. शेवटी सर्व त्रासाचे निराकरण हैदराबादच्या विपश्यना केंद्रात दहा दिवस काढून केले. ते प्रकरण कंटाळवाणं झालं.

एक चांगलं होणारं पुस्तक पॉसपॉतमुळे गळपाटलं.

पुस्तकाची किंमत वीस डॉलर ही फार वाटते कारण खूप खर्च आला चार महिने प्रवास आणि राहाणे,खाण्यावर.

महाराजा ट्रेनस- डेक्कन ओडिसीचं ( मुंबई ते दिल्ली) आठ दिवसांचं तिकिट आताच साडेसात लाख रुपये आहे. म्हणजे २०१२मध्ये पाचसहा लाख असावे. त्यातले जे इतर प्रवासी होते त्यातल्या बऱ्याच जणांना कोणत्यातरी टिव्ही कार्यक्रमांत या गाडीचा प्रवास बक्षिस मिळाला होता. सर्व परदेशी होते आणि एकच दिल्लिचा टुअर एजंट होता. कमी वेळात टार्गेट ट्रिपस बुक केल्याने त्यास ही ट्रिप फुकट मिळालेली.

कुमार१'s picture

29 Sep 2021 - 7:43 pm | कुमार१

युरोपमधील उत्तम आणि वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन असलेली ही टीजीव्ही ट्रेन :

ok

सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ही ट्रेन तिथे वापरात आली आणि त्यातून गतिमान शब्दाला एक नवाच अर्थ प्राप्त झाला.
युरोप भेटीमध्ये अनेक जण या ट्रेनला भेट देत असतात

गामा पैलवान's picture

30 Sep 2021 - 3:25 pm | गामा पैलवान

कुमारेक,

माहितीबद्दल धन्यवाद! :-)

गाडी वेगाने हाकण्यासाठी हिला साधारणपणे विजेची इंजिने असंत. मात्र तरीही गॅस टर्बाईन वर चालणारं एक टर्बोगॅस इंजिन प्रारूप फ्रान्समध्ये अनेक गाड्यांवर १९९० पर्यंत वापरात होतं.

https://cdn.retours.eu/nl/36-tres-grande-vitesse-turbotrain-TGV/enlarge/TGV-001-Aquitaine-1973.jpg

संदर्भ : https://retours.eu/en/36-tres-grande-vitesse-turbotrain-TGV/

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

30 Sep 2021 - 3:46 pm | कुमार१

टर्बोगॅस इंजिन प्रारूप
>>
रोचक !

फारएन्ड's picture

1 Oct 2021 - 4:29 am | फारएन्ड

इण्टरेस्टिंग!

फारएन्ड's picture

1 Oct 2021 - 4:43 am | फारएन्ड

युरोप मधे ट्रेन्स पाहिल्या की सुबक, ७-८ डबे पण सगळे एकत्रच जोडलेले व एकाच सेटचा भाग आहे असे वाटणारे. आख्खी गाडी एकसंधपणे जाताना दिसते. डबे हलत वगैरे नाहीत. अमेरिकेत पाहिले तर डबे व इंजिने आपल्यापेक्षा "उभट" वाटतात, कारण गेज आपल्यापेक्षा अरूंद आहे. तेच आपल्याकडच्या गाड्या लांबलचक - १८+ डबे, ब्रॉडगेज मुळे प्रचंड वाटणार्‍या दणदणीत आवाज करत सगळे डबे स्वतंत्रपणे डुलत जाताना दिसतात :) आख्खी गाडी एका फ्रेम मधे क्वचितच मावते.

उदा: ही "बड्डे गर्ल" डेक्कन दादरमधून सुसाटत, हॉर्न मारत, धुरळा उडवत जाताना. तो रूळांच्या सांध्यांमुळे होणारा खडखडाट प्रचंड नॉस्टॅल्जिक करतो. असला सीन परदेशात कधी पाहिला नाही.
https://www.youtube.com/watch?v=ZIaX235auao

कुमार१'s picture

1 Oct 2021 - 7:47 am | कुमार१

दादरमधून सुसाटत, हॉर्न मारत, धुरळा उडवत जाताना. तो रूळांच्या सांध्यांमुळे होणारा खडखडाट
>> भारीच !

कुमार१'s picture

9 Oct 2021 - 4:09 am | कुमार१

रेल्वेची त्रिशूल :त्रिशूल

तीन मालगाड्या एकत्र जोडून केली भली लांब मालगाडी :

https://www-msn-com.cdn.ampproject.org/v/s/www.msn.com/en-in/money/news/...

सुबोध खरे's picture

9 Oct 2021 - 9:24 am | सुबोध खरे

अशीच एक १४६ डब्यांची अजगर गाडी(python train) पूर्वीय तटवर्ती रेल्वेने २०१९ मध्ये चालवली होती त्याची आठवण झाली.

https://www.thehindu.com/news/national/railways-bet-on-this-fast-moving-...

गामा पैलवान's picture

9 Oct 2021 - 1:36 pm | गामा पैलवान

एव्हढी २ किलोमीटर लांबलचक मालगाडी ठेवायची कुठे हा प्रश्नंच आहे. विश्रामस्थळी वा गन्तव्यस्थानी तिचे तोडून आवाक्य तुकडे करून वापरीत असावेत. याकरिता अतिरिक्त वेळ द्यावा लागेलसं वाटतं. तसंच ही जोडतोड बहुधा गाडीपागेत करता येणार नाही. त्यासाठी मुख्यमार्ग वापरावा लागेल. तोही अतिरिक्त काळासाठी अडवून ठेवला जाईल. एकंदरीत नेहमीच्या प्रवासी मार्गावर ही मालगाडी वापरणं कटकटीचं दिसतंय. म्हणून समर्पित मार्गावर चालवली जाईलसं दिसतंय.

-गा.पै.

कुमार१'s picture

9 Oct 2021 - 1:43 pm | कुमार१

म्हणून समर्पित मार्गावर चालवली जाईलसं दिसतंय.
+११

कुमार१'s picture

9 Oct 2021 - 3:11 pm | कुमार१

सध्या सुद्धा लांबलचक गाड्यामुळे कसे प्रश्न येतात ते पहा.
१. आपल्याकडे बऱ्याच मार्गांचे अजून दुपदरीकरण झालेलं नाही. त्यामुळे समोरा समोर दोन विरुद्ध दिशेकडून गाड्या आल्या, की एकीला थांबूनच दुसरीला पुढे पाठवावे लागते. लहान गावांमधल्या स्थानकांमध्ये असे होते. जर एका दिशेने प्रवासी गाडी आणि दुसर्‍या दिशेने मालगाडी येत असेल तर आधी लांब मालगाडीला जाऊ द्यावे लागते. कारण लांबलचक मालगाडी स्थानकावरील एखादा फलाट अडवून जास्त काळ उभी ठेवता येत नाही.

२. दक्षिणेकडून नवी दिल्लीला जाणाऱ्या काही प्रवासी गाड्याना जास्त डबे आहेत. त्या जेव्हा अधल्या मधल्या लहान गावांमधून जातात तेव्हा तिथला एखादाच फलाट त्यांच्यासाठी खास तितका लांब बांधलेला असतो. त्यामुळे अन्य फलाटांवरून त्यांना नेताच येत नाही.

कुमार१'s picture

10 Oct 2021 - 10:20 am | कुमार१

गोवा ते दिल्ली वातानुकूलित डब्यांमधून चॉकलेट्सने केला प्रवास !
रेल्वेला छानपैकी उत्पन्न.
प्रथमच हा प्रयोग राबविण्यात आला आहे...

https://m.economictimes.com/industry/transportation/railways/in-a-first-...

कुमार१'s picture

11 Oct 2021 - 9:51 am | कुमार१

आता रेल्वेत थुंकण्यासाठी प्रोत्साहन…थुंकीतून घाण पसरणार नाही तर झाडे बहरतील…अशी आहे भारतीय रेल्वेची नवीन योजना…

https://mahavoicenews.com/encouragement-to-spit-on-trains-nowthis-is-the...

कुमार१'s picture

18 Oct 2021 - 8:07 pm | कुमार१

CSMT स्थानकात 'मील ऑन व्हील' रेस्टॉरंट सुरु होतेय

ok

कोणी याचा अनुभव घेतल्यास जरूर लिहा.