प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन ) संगे !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
20 Aug 2017 - 4:22 pm

हातात सामान घेऊन मी रेल्वे स्टेशनच्या एका फलाटावर उभा आहे. माझी गाडी थोड्याच वेळांत येथे येत असल्याची घोषणा झाली आहे. माझ्याकडे प्रवासाचे आरक्षित तिकीट आहे. त्यामुळे माझा बसायचा डबा जिथे थांबणार आहे तिथे मी थांबलेलो आहे. गाडीला नेहेमीप्रमाणेच खूप गर्दी आहे.
माझा डबा हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित गटातील असल्याने त्यात फक्त आरक्षित तिकीटधारकांनीच चढावे अशी माझी अपेक्षा आहे ! खरे तर तसा नियमही आहे. पण वास्तव मात्र तसे नाही. माझ्या डब्याच्या जागेवर बिगरआरक्षित प्रवाशांची अधिक झुंबड आहे. खरे तर या मंडळींनी ‘जनरल ‘ डब्यात जायला हवे आहे. परंतु, सामान्य तिकीट काढूनही आरक्षित डब्यात घुसणे हा त्यांचा शिरस्ता आहे ( नियम बियम कोणाला सांगता राव ?).

ok

आता गाडी फलाटाला लागते. अनारक्षित तिकीटवाले (व बिगर तिकीटवालेही) झुंडीने डब्यात घुसू लागतात. आम्ही आरक्षित तिकीटवाले बापडे मात्र शहाण्यासारखे दम धरून त्यांना आधी चढू देतो. शेवटी घामाघूम झालेल्या अवस्थेत मला एकदाचा डब्यात प्रवेश मिळतो. माझ्या आरक्षित आसनावर आक्रमण केलेल्या घुसखोराला मी उठवतो व माझे बूड टेकतो. हुश्श !
कामानिमित्त मी नियमित रेल्वे प्रवास करतो. डब्यात शिरतानाचा हा अनुभव नेहेमीचाच. बस, रेल्वे व विमान या तीनही प्रवासांमध्ये माझे रेल्वेवर आत्यंतिक प्रेम आहे. जेव्हा एखाद्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध असतो तेव्हा मी इतर पर्यायांचा विचारही करत नाही. आतापर्यंत केलेल्या भरपूर रेल्वे प्रवासामुळे ट्रेन ही माझी प्रेयसीच झाली आहे – जणू माझी सफर-सखीच. या प्रवासांचे अनेक भलेबुरे अनुभव माझ्या गाठीशी आहेत.
....
माझा आजचा प्रवास सुरू झालाय. गाडीने आता वेग घेतलाय. काही तास आता मी ट्रेनमध्ये असणार आहे. आज मला तीव्रतेने वाटतंय की माझी प्रवासातील सुख दुख्खे माझ्या या सखीलाच सांगावित.

तर एक सखे, तुझ्या नि माझ्या सहवासाचे काही किस्से ......
लहानपणी तुझ्यातून प्रवासाची खूपच मज्जा वाटायची. त्या काळचे तुझ्या प्रवासाचे तिकीट अजून आठवते. ते पुठ्याच्या कागदाचे छोटेसे आयताकृती तिकीट होते. ते तिकीट-खिडकीवरून घेताना आतली व्यक्ती ते एका यंत्रावर दाबून त्यावर तारीख व वेळ उमटवत असे. आम्ही मुले ती तिकीटे कौतुकाने जमवून जपून ठेवत असू.

तिकीट घेऊन फलाटावर गेल्यावर तुझी इंजिन्स कर्कश शिट्या करीत उभी असायची. त्या आवाजाची तर अगदी भीती वाटायची. सखे, तेव्हा तू खरोखरीच झुकझुक गाडी होतीस. तुझ्या काही मार्गांवर तू खूपदा बोगद्यातून जायचीस त्याचे तर आम्हाला कोण कौतुक. तुझ्या काही स्थानकांवरचे बटाटेवडे तर अगदी नावाजलेले. ते खाण्यासाठी लहानमोठे सगळेच आतुर असत. एकून काय, तर तुझ्या बरोबरचा प्रवास म्हणजे मुलांसाठी खाणेपिणे व धमाल करणे यासाठीच असायचा.

उपनगरी रेल्वे हा तुझा एक महानगरी अवतार आहे. लहानपणी मी माझ्या आजोबांबरोबर मुंबईच्या लोकल्सने प्रवास करी. तुडुंब गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या डब्यांमध्ये शिरणे व त्यातून उतरणे हे एक अग्निदिव्यच. असेच एकदा आम्ही फलाटावर गाडीची वाट पाहत होतो. गाडी आली. आमच्या समोरच्या डब्यात गर्दीचा महापूर होता. परंतु, त्याला लागूनच्या डब्यात बऱ्याच रिकाम्या जागा होत्या (हे वर्णन १९७५ मधले !). माझे आजोबा गर्दीच्या डब्याकडे बघत हताशपणे म्हणाले की त्यात शिरणे अवघड आहे, तेव्हा आपण ही गाडी सोडून देऊ. त्यावर मी त्यांना कुतूहलाने म्हणालो की आपण त्या शेजारच्या बऱ्यापैकी रिकाम्या डब्यात चढूयाकी. त्यावर ते किंचितसे हसले व मला म्हणाले, “ अरे, तो पहिल्या वर्गाचा डबा आहे.’’ मी ते ऐकले मात्र अन मला जणू ४४० व्होल्टचा विजेचा झटका बसला !
म्हणजे या डब्यांमध्ये अशी वर्गवारी असते तर.( खरं तर माणसांमधली वर्गवारी सुद्धा कळायचे माझे वय नव्हते ते ). मग मला आजोबांनी या दोन्ही वर्गांच्या भाड्यातील लक्षणीय फरक सांगितला. मला झालेला तो एक साक्षात्कारच होता. त्यानंतर बरीच वर्षे पहिल्या वर्गाचा डबा हा माझ्यासाठी फक्त ‘लांबून बघण्याचा’ डबा होता. तेव्हा निमूटपणे दुसऱ्या वर्गाच्या डब्यात घुसण्याला पर्याय नव्हता.

मोठेपणी मी कमावता झाल्यावर तुझ्या सर्व वरच्या वर्गाच्या प्रवासांचा पुरेपूर अनुभव घेतला. पण एक सांगू ? मला तुझ्या त्या वातानुकुलीत वर्गाचा प्रवास मनापासून आवडत नाही. त्यातला थंडपणा मला सोसत नाही. तसेच तिथल्या बंद खिडक्या, आतमध्ये झालेली झुरळे आणि कुंद वातावरण नकोसे वाटते. त्यातून तिथले प्रवासी पण कसे बघ. फारसे कोणीच कोणाशी बोलत नाही. बहुतेक सगळे एकतर मोबाईलवर चढ्या गप्पा मारण्यात मग्न किंवा कानात इअरफोन्स खुपसून हातातल्या स्मार्टफोन्स मध्ये गुंगून गेलेले. या सगळ्यांमुळे मी तिथे अक्षरशः गुदमरून जातो.

त्यामुळे मी एकटा प्रवास करताना शक्यतो तुझ्या दुसऱ्या वर्गाने जाणे पसंत करतो. तिथल्या उघड्या खिडक्या, सुसाट वारा, तुझ्या वेगाची होणारी जाणीव आणि एकूणच त्या डब्यातले मोकळेढाकळे वातावरण मला बेहोष करते. मला चांगले आठवतंय की मी काही प्रवास पूर्वीच्या तुझ्या बिगरवातानुकुलीत पहिल्या वर्गातून केले होते. खरं म्हणजे माझा सर्वात मनपसंत वर्ग तोच होता. जेव्हापासून तो साधा पहिला वर्गच रद्द झाला तेव्हापासून मी मनोमन खट्टू आहे.

अलीकडच्या काही वर्षात तुझ्या दुसऱ्या वर्गाच्या प्रवाशांना अजून एक त्रास सुरू झालाय. तू धावत असताना डब्याच्या उघड्या खिडक्यांतून हलते निसर्गसौंदर्य मनसोक्त पाहणे हे खरे तर या प्रवाशांचे हक्काचे सुख. पण, तुझ्या काही मार्गांवर या मूलभूत सुखावरच घाला घातला गेला आहे. या मार्गांवरून तू जात असताना बाहेरील काही दुष्ट मंडळी गाडीवर जोरात दगड मारतात. बहुदा असे लोक याप्रकारे त्यांच्यातील असंतोष व नैराश्य बाहेर काढत असावेत. पण त्यामुळे प्रवाशांनी मात्र जीव मुठीत धरून प्रवास करायचा. मग यावर उपाय म्हणून पोलीस प्रत्येक डब्यात येऊन प्रवाशांना खिडक्यांचे लोखंडी शटर्स सक्तीने लाऊन घ्यायला लावतात.
मग अशा बंदिस्त डब्यातून प्रवाशांनी जिवाची घालमेल सहन करत आणि एकमेकांकडे कंटाळा येईस्तोवर बघत बसायचे. बाकी प्रचंड गर्दीच्या वेळी तुझ्या दारात उभे राहून जाणाऱ्यांना तर कायमच धोका. अधेमध्ये असा जोराचा दगड लागून एखादा प्रवासी गंभीर जखमी झालाय वा मरणही पावलाय. किती चटका लावून जाते अशी घटना.

तुझ्यातून प्रवास करणे ही माझ्यासाठी आयुष्यभराची करमणूक आहे प्रवास सुखकर व्हावा म्हणून माझ्यासारखे अनेक जण तिकिटाचे व्यवस्थित आरक्षण करूनच प्रवास करतात.पण, आम्हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षितांचे एक कायमचे दुखः आहे.ते म्हणजे आरक्षित डब्यांत होणारी बिगरआरक्षित मंडळींची त्रासदायक व संतापजनक घुसखोरी.
या घुसखोरांमध्ये सामान्य तिकीटवाले, प्रतीक्षा यादीवाले, तृतीयपंथी आणि भिकारी असे विविधरंगी लोक असतात. या सर्वांचा असा ठाम समज असतो की कोणीही कुठल्याही डब्यात बसले तरी चालते. म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाण्यातला हा प्रकार. ही मंडळी एकदा का आरक्षित डब्यात घुसली की इतकी शिरजोर होतात की आम्हालाच विस्थापितासारखे वाटू लागते.एकंदरीत काय तर दुसऱ्या वर्गाचे आरक्षित डबे हे ‘’आओ जाओ घर तुम्हारा’’ असे झालेले आहेत. यातील प्रवाशांच्या सुखसोयीबाबत रेल्वे प्रशासनही बेफिकीर आहे. प्रवाशांच्या तक्रारींना तर काडीचीही किमंत दिली जात नाही.
दुसऱ्या वर्गाचे आरक्षण केलेल्या प्रवाशाला डब्यात मोकळा श्वास घेता येईल, त्याला त्याचे सामान त्याच्या आसपास हक्काने ठेवता येईल, डब्यातली मधली मार्गिका ही चालण्यासाठी मोकळी असेल आणि गरज लागेल तेव्हा त्याला स्वच्छतागृहात विनासंकोच जाता येईल अशा मूलभूत अपेक्षा हा ‘बिचारा प्रवासी’ ठेऊन आहे.

मध्यंतरी मी एकदा तुझ्या डब्याचे बाहेरून बारकाईने निरीक्षण केले. तुझ्या प्रत्येक डब्याला दोन दरवाजे आहेत. त्यातील एकावर ‘प्रवाशांनी चढण्यासाठी’ व दुसऱ्यावर ‘उतरण्यासाठी’ असे व्यवस्थित लिहेलेले आहे. मनात आले की खरोखरच जर याप्रमाणे आपली जनता वागली तर !
पण वास्तव मात्र भीषण आहे.उतरणाऱ्याना उतरू देण्यापूर्वीच चढणारे घुसखोर नकोनकोसे करून टाकतात. काही निर्लज्ज तर आधीच रुळांवर उतरून फलाटाच्या विरुद्ध बाजूच्या दाराने आत घुसतात. हे पाहून तिडीक येते व शिस्तीबाबतच्या आपल्या मागासपणाची अगदी लाज वाटते. एका दारातून प्रवासी उतरताहेत व जसा डबा रिकामा होतोय तसे शिस्तीत दुसऱ्या दारातून नवे प्रवासी चढताहेत असे ‘रम्य’ दृश्य बघायला एखाद्या सम्रुद्ध परदेशातच जावे लागेल !

तुझ्यामधून नियमित प्रवास करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांच्या जीवनाचा तू अविभाज्य भाग झाली आहेस. तुझ्या संगतीत मला जीवनातले आनंद व चैतन्यदायी प्रसंग अनुभवायला मिळाले आहेत. माझ्या बरोबरचे काही सहप्रवासी आता माझे जिवलग मित्र झाले आहेत. तू जेव्हा वेगाने धावत असतेस तेव्हा खिडकीतून बाहेर बघताना माझे विचारचक्रही वेगाने फिरत राहते. मग त्यातूनच काही भन्नाट कल्पनांचा जन्म होतो.

माझ्या लेखनाचे कित्येक विषय मला अशा प्रवासांमध्ये सुचले आहेत. अनेक विषयांचे सखोल चिंतन मी तुझ्या बरोबरच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात करू शकलो आहे. माझा जास्त प्रवास हा तुझ्या ‘एक्स्प्रेस’ व ‘लोकल’ या प्रकारांतून होतो. पण, अधूनमधून मी तुझ्या ’passenger’ या अवताराचाही अनुभव घेतलाय. त्या प्रवासामुळे मला स्वतःभोवतीच्या सुरक्षित कोशातून बाहेर पडता आले. तसेच ‘महासत्ता’ वगैरे गप्पा मारणारा भारत वास्तवात काय आहे याचे भान आले.

तुझ्या प्रवासादरम्यान कधीकधी होणारे गैरप्रकार आणि काही दुखःद प्रसंग मात्र अस्वस्थ करून जातात. कधी तुझ्यावर दरोडा पडतो अन प्रवाशांची लूटमार होते. कधी तुझ्या यंत्रणेत गडबडघोटाळा होतो अन छोटेमोठे अपघात होतात. काही देशद्रोही तुला घातपात करण्यात मग्न असतात. आयूष्यात प्रचंड नैराश्य आलेले काही जीव आत्महत्या करण्यासाठी तुझ्यापुढे उडी मारतात. तर कधीतरी काही भडक डोक्याचे प्रवासी आपापसातील भांडणातून एखाद्या प्रवाशाला गाडीतून बाहेर फेकतात. अशा हृदयद्रावक घटना कधीही न घडोत अशी माझी मनोमन प्रार्थना आहे.

तुला आपल्या देशात रूळांवरून धावायला लागून आता दीडशेहून अधिक वर्षे होऊन गेलीत. तुझ्यावर पूर्णपणे सरकारी मालकी आहे. तेव्हा सरकारी यंत्रणांमध्ये आढळणारे सगळे फायदे-तोटेही तुझ्या ठायी आढळतात. तुझ्या गलथानपणाबाबत आपण सतत ऐकताच असतो. पण, मध्यंतरी मला तुझा एक सुखद अनुभव आला.
तुझ्या एका मूळ स्थानकावर मी तुझ्यात बसलो होतो. तुला सुटायला अजून अवकाश होता.डब्यात तुरळक प्रवासी होते. मी खिडकीतून बाहेर बघत होतो.तेवढ्यात एक गणवेषधारी माणूस माझ्याजवळ आला. तो सफाई कामगारांवरचा पर्यवेक्षक होता. त्याने मला सांगितले की तुमच्या डब्यांची व स्वच्छतागृहांची साफसफाई कामगारांनी केली आहे. ती कशी झाली आहे यावर त्याला माझे लेखी मत हवे होते.

त्याने मला अधिकृत नमुन्यातील कागद भरण्यास दिला.मग मलाही हुरूप आला व मी प्रत्यक्ष जाऊन सगळे बघून आलो. सर्व स्वच्छता चांगली केलेली होती व तसे मी त्याला लिहून दिले. त्या कागदात शेवटी प्रतिसादकाचे नाव, आसन क्रमांक व फोन नं. इ. सर्व लिहायचे होते. हा अनपेक्षित प्रकार बघूनच मी सुखावलो व मनात म्हणालो, ‘’ चला आता भारतीय रेल्वेला ‘corporate look’ येतोय तर !” अर्थात हा अपवादात्मक अनुभव आहे. तो वरचेवर येवो ही अपेक्षा !! तसेच भविष्यात तुझी श्रीमंती व अतिवेगवान रूपे विकसित होण्यापूर्वी सध्याच्या तुझ्यातील मूलभूत सोयी सर्व वर्गाच्या प्रवाशांना व्यवस्थित मिळोत ही इच्छा.
...
माझा या प्रेयसी बरोबरचा संवाद हा न संपणारा आहे. पण, आताच्या प्रवासाचे चार तास मात्र आता संपत आले आहेत. आता गाडी स्थानकाच्या जवळ आल्याने हळू झाली आहे. काही प्रवासी त्यांच्या सामानासह दाराजवळ गर्दी करत आहेत. स्थानकात शिरून फलाटाला लागेपर्यंत गाडी खूप हळू जाते व थांबायला भरपूर वेळ घेते. म्हणून मी अजून शांतपणे माझ्या आसनावर बसून आहे. अहो, आता सखीच्या विरहाची वेळ आल्याने खरे तर उठवत नाहीये !

अखेर गाडी थांबते. लगेचच गाडीत चढू पाहणाऱ्या अति उतावीळ प्रवाशांना मोठ्या कष्टाने रोखत आम्ही खाली उतरतो. मी फलाटावरून चालत असतानाच एकीकडे ध्वनिवर्धकातून घोषणा होत असते, ‘’हे मध्य रेल्वेचे XXXX स्थानक आहे. इंटरसिटी एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशांचे आम्ही स्वागत करतो.’’ आम्हा हजारभर प्रवाशांचे होत असलेले हे स्वागत ऐकून मी भारावतो. माझ्या ‘प्रवास-सखी’ कडे निरोपादाखल एक प्रेमभरी नजर टाकतो आणि हातातले सामान सावरत मार्गस्थ होतो.
********************************

समाजलेख

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

26 Aug 2021 - 3:15 pm | कुमार१

भारतीय रेल्वेने रशियन बनावटीच्या Ntechlab या प्रकारच्या कॅमेरा सुरक्षा यंत्रणा गुजरात व महाराष्ट्रात काही ठिकाणी बसवल्या आहेत.
यामध्ये प्रवाशांचे चेहरे ओळखण्याची सोय आहे. या यंत्रणांचा उपयोग खालील कामांसाठी होणार आहे :

प्रवाशांची मोजणी
वाहतूक नियंत्रण
हरवलेल्या व्यक्ती आणि गुन्हेगारांचा शोध

https://eurasiantimes-com.cdn.ampproject.org/v/s/eurasiantimes.com/india...

मदनबाण's picture

29 Aug 2021 - 10:10 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Aap Kiske Vanshaj Hain | Manoj Muntashir Live Latest | Hindi Poetry

कुमार१'s picture

29 Aug 2021 - 11:07 pm | कुमार१

हंपी ऑन व्हील्स
लवकरच चालू होतेय....

सुवर्ण रथ रेल्वे कर्नाटकचे ६ नाईट प्राइड, दख्खनच्या ५ नाइट ज्वेल आणि ३ रात्री कर्नाटकची झलक अशा सहली नेते. पुढील सहल ऑक्टोबर मध्ये दिसते आहे.

कंजूस's picture

30 Aug 2021 - 8:56 am | कंजूस

धन्यवाद.

कुमार१'s picture

31 Aug 2021 - 11:08 am | कुमार१

बंगाल मध्ये नवी जंगल सफर ट्रेन !

https://www-moneycontrol-com.cdn.ampproject.org/v/s/www.moneycontrol.com...

कुमार१'s picture

7 Sep 2021 - 12:26 pm | कुमार१

वंदे भारत ट्रेन्सचे उत्पादन वाढत आहे. काही रोचक माहिती इथे
https://m.timesofindia.com/business/india-business/vande-bharat-express-...

या ट्रेन्स ना ट्रेन 18( 2018साली तयार झाल्या म्हणून) असेही म्हणतात.
त्यांचे आधीचे नाव शताब्दी किलर्स असे ठरले होते !

कुमार१'s picture

9 Sep 2021 - 4:12 am | कुमार१

दोन्ही चित्रफिती छान आहेत.

कुमार१'s picture

9 Sep 2021 - 4:11 am | कुमार१

रेल्वे नियोजित वेळेपेक्षा चार तास उशीरा पोहोचल्यामुळे त्यातील एका प्रवाशाचे पुढील विमान चुकले.

त्यावर त्याने दावा दाखल केला होता. अखेर तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. न्यायालयाच्या निर्णयानुसार या व्यक्तीला रेल्वेने तीस हजार रुपये नऊ टक्के व्याजासह भरपाई द्यायची आहे.

असा हा महत्त्वपूर्ण निर्णय !
https://www.moneycontrol.com/news/india/train-delay-railways-to-pay-rs-3...

कुमार१'s picture

12 Sep 2021 - 10:06 am | कुमार१

रेल्वे तिकीट ऑनलाईन काढताना आधार किंवा पॅन क्रमांक विचारण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार

गामा पैलवान's picture

13 Sep 2021 - 5:25 pm | गामा पैलवान

प्रवासासाठी आधार वा प्यानची नेमकी गरज काय? हा घटनेने दिलेल्या संचारस्वातंत्र्याचा संकोच आहे. प्रवासी पैसे भरून प्रवास करतोय. फुकटांत नाही.

-गा.पै.

कुमार१'s picture

13 Sep 2021 - 6:08 pm | कुमार१

दलाल मंडळींच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी असं काहीसे त्या बातमीत म्हटलं आहे

गॉडजिला's picture

13 Sep 2021 - 6:47 pm | गॉडजिला

तपासनीस आयडी प्रूफ मागतोच.

गॉडझिला,

तुम्ही गॉडझिला आहात याचा पुरावा म्हणून आधार वा प्यान देणं वेगळं. आणि पुरावा म्हणून आधार वा प्यानची सक्ती करणं वेगळं. ओळखीचा पुरावा इतर काही असू शकतो. उदा. पूर्वी मुंबईत लोकलचा पास काढण्यासाठी ओळखपत्र काढावं लागे. तो ओळखीचा पुरावा आहे. किंवा मतदान आयोगाने जारी केलेलं ओळखपत्र हा ही पुरावा आहे. आधार वा प्यान ची सक्ती होता कामा नये.

आ.न.,
-गा.पै.

गॉडजिला's picture

27 Sep 2021 - 1:00 pm | गॉडजिला

फिरा की खाजगी वाहन अन् ड्रायवर भाड्याने घेऊन हवे तिथे हवे तसे...

तुम्हाला स्वस्त सरकारी (?) रेल्वे हवी पण तिकीट काढले एकाने प्रवास दुसरा करतोय हा गैरप्रकार टाळायला तुम्हाला आधार लिंक केल्याने काय नुकसान आहे ?

गामा पैलवान's picture

27 Sep 2021 - 2:17 pm | गामा पैलवान

गॉडझिला,

मूळ बातमीच्या मथळ्यात .... now these documents will have to be given असं लिहिलंय. म्हणजे सक्ती आहे. मात्र खालील मजकुरात .... IRCTC may also ask you for PAN, Aadhaar or passport information अशी संदिग्ध शब्दरचना आहे.

माझा मुद्दा अध्यार, आयकर क्रमांक, पारपत्र या तिघांच्या सक्तीच्या विरोधात आहे. इतर कुठलंही सरकारी ओळखपत्र चालून जायला पाहिजे. विशेषत: रेलवेने जारी केलेलं ओळखपत्र तर चालायलाच पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

संधिग्द रचना आजकाल नॉर्मल गोश्ट आहे न्युजपत्रांच्या बाबतीत. त्याना पेजहिट्स हवेत.

कंजूस's picture

13 Sep 2021 - 9:37 pm | कंजूस

तिकिट काढणारा प्रवासात असला तर दलाल जातील असं वाटायचं. पण तो नियम अशक्य कारण बरेचदा ज्येष्ठ नागरिकांची तिकिटं नातेवाईकांनी काढून दिलेली असतात.

कंजूस's picture

13 Sep 2021 - 9:32 pm | कंजूस

म्हणजे की खिडकीवर प्रिंटेड तिकिट काढताना लागत नाही फण प्रवासात कोणतेतरी ओळखपत्र {विचारल्यास} दाखवावे लागते.
ओनलाईन साठी बुकिंग करतांना जे लिहिलं तेच दाखवावं लागायचं.

पाच महिन्यांपूर्वी irctc site ला आधार verification होतं. तीन महिन्यांपूर्वी email verification वाढवलं.

कुमार१'s picture

13 Sep 2021 - 9:45 pm | कुमार१

आता ऑनलाईन तिकीट काढायच्या वेळेसच ते आधार क्रमांक ,ओटीपी असं काहीतरी मागून खातरजमा करणार असे दिसते आहे.

बुकिंग - सर्च ट्रेनवर गेलं की लगेच verify - 1,2,3,4 ..... येतं!!!

५ मेगा हर्ट्झ स्पेक्ट्रममुळे ‘फोर-जी’ नेटवर्क प्रत्यक्षात येणार आहे...

रेल्वेच्या सिग्नल व संदेश यंत्रणांमधील आधुनिकीकरण समजावून सांगणारा एक चांगला लेख.

कंजूस's picture

23 Sep 2021 - 9:20 pm | कंजूस

पुस्तक
भारतात ८० रेल्वेंतून प्रवास - अनुभव.
Around India In 80 Trains
ISBN Search

कंजूस's picture

24 Sep 2021 - 4:30 am | कंजूस

पुस्तक
भारतात ८० रेल्वेतून प्रवास - अनुभव.
Around India In 80 Trains
ISBN Search

कुमार१'s picture

24 Sep 2021 - 11:45 am | कुमार१

छान दिसतय पुस्तक. कुणी वाचले तर त्यावर लिहा.
..............................
रेल्वेच्या संगणकीय तिकीट आरक्षण यंत्रणेतील एक मोठा दोष बारावीत शिकणाऱ्या मुलाने उघडकीस आणला.
त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
अभिनंदन !

कंजूस's picture

24 Sep 2021 - 12:33 pm | कंजूस

William. Darlympleचा चांगला अभिप्राय आहे. अमेझोनवर used books स्वस्त मिळतात वाटतं.

Around the world in 80 daysवरून स्फूर्ती घेऊन लिहिलंय लेखिकेने.

कामाचं/ विनोदी असल्यास थोडक्यात लिहीन.

कंजूस's picture

1 Oct 2021 - 7:14 am | कंजूस

एक चांगलं पुस्तक झालं असतं. लेखिकेचे निरीक्षण, सांगण्याची कला आणि विनोदबुद्धी यामुळे वाचायला मजा येते. वेगवेगळ्या ट्रेन्समधून प्रवास करून थोडेफार स्थळदर्शन यावर लिहून काम भागले असते असते. दहा बारा प्रकारच्या घेऊन हे साध्य झाले असते.
पण दोन कारणांमुळे सगळा कार्यक्रम भोंगळ झाला. एक म्हणजे Around the world in 80 days या जुन्या गाजलेल्या पुस्तकाचे उदाहरण समोर ठेवून ८० गाड्यांतून उगाचच प्रवास केला. तो करायचा म्हणून केला आणि तोही टु टिअर स्लीपरमधून. ज्यातून भारतातील सामान्य जनता प्रवास करत नाही. शिवाय नाट्यमय घटना अशा काहीच नाहीत.

दुसरी चूक - पासपॉत हे पात्र सहकारी आणि सहप्रवासी म्हणून निवडण्यातली चूक. भांडणं झाली. एकूण ही योजना कशी तरी पूर्ण केली पण अर्ध्या प्रवासानंतर ते दोघे वेगळे झाले. लेखिकेने एकट्यानेच शेवटच्या चाळीस गाड्यांतून प्रवास केला. शेवटी सर्व त्रासाचे निराकरण हैदराबादच्या विपश्यना केंद्रात दहा दिवस काढून केले. ते प्रकरण कंटाळवाणं झालं.

एक चांगलं होणारं पुस्तक पॉसपॉतमुळे गळपाटलं.

पुस्तकाची किंमत वीस डॉलर ही फार वाटते कारण खूप खर्च आला चार महिने प्रवास आणि राहाणे,खाण्यावर.

महाराजा ट्रेनस- डेक्कन ओडिसीचं ( मुंबई ते दिल्ली) आठ दिवसांचं तिकिट आताच साडेसात लाख रुपये आहे. म्हणजे २०१२मध्ये पाचसहा लाख असावे. त्यातले जे इतर प्रवासी होते त्यातल्या बऱ्याच जणांना कोणत्यातरी टिव्ही कार्यक्रमांत या गाडीचा प्रवास बक्षिस मिळाला होता. सर्व परदेशी होते आणि एकच दिल्लिचा टुअर एजंट होता. कमी वेळात टार्गेट ट्रिपस बुक केल्याने त्यास ही ट्रिप फुकट मिळालेली.

कुमार१'s picture

29 Sep 2021 - 7:43 pm | कुमार१

युरोपमधील उत्तम आणि वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन असलेली ही टीजीव्ही ट्रेन :

ok

सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ही ट्रेन तिथे वापरात आली आणि त्यातून गतिमान शब्दाला एक नवाच अर्थ प्राप्त झाला.
युरोप भेटीमध्ये अनेक जण या ट्रेनला भेट देत असतात

गामा पैलवान's picture

30 Sep 2021 - 3:25 pm | गामा पैलवान

कुमारेक,

माहितीबद्दल धन्यवाद! :-)

गाडी वेगाने हाकण्यासाठी हिला साधारणपणे विजेची इंजिने असंत. मात्र तरीही गॅस टर्बाईन वर चालणारं एक टर्बोगॅस इंजिन प्रारूप फ्रान्समध्ये अनेक गाड्यांवर १९९० पर्यंत वापरात होतं.

https://cdn.retours.eu/nl/36-tres-grande-vitesse-turbotrain-TGV/enlarge/TGV-001-Aquitaine-1973.jpg

संदर्भ : https://retours.eu/en/36-tres-grande-vitesse-turbotrain-TGV/

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

30 Sep 2021 - 3:46 pm | कुमार१

टर्बोगॅस इंजिन प्रारूप
>>
रोचक !

फारएन्ड's picture

1 Oct 2021 - 4:29 am | फारएन्ड

इण्टरेस्टिंग!

फारएन्ड's picture

1 Oct 2021 - 4:43 am | फारएन्ड

युरोप मधे ट्रेन्स पाहिल्या की सुबक, ७-८ डबे पण सगळे एकत्रच जोडलेले व एकाच सेटचा भाग आहे असे वाटणारे. आख्खी गाडी एकसंधपणे जाताना दिसते. डबे हलत वगैरे नाहीत. अमेरिकेत पाहिले तर डबे व इंजिने आपल्यापेक्षा "उभट" वाटतात, कारण गेज आपल्यापेक्षा अरूंद आहे. तेच आपल्याकडच्या गाड्या लांबलचक - १८+ डबे, ब्रॉडगेज मुळे प्रचंड वाटणार्‍या दणदणीत आवाज करत सगळे डबे स्वतंत्रपणे डुलत जाताना दिसतात :) आख्खी गाडी एका फ्रेम मधे क्वचितच मावते.

उदा: ही "बड्डे गर्ल" डेक्कन दादरमधून सुसाटत, हॉर्न मारत, धुरळा उडवत जाताना. तो रूळांच्या सांध्यांमुळे होणारा खडखडाट प्रचंड नॉस्टॅल्जिक करतो. असला सीन परदेशात कधी पाहिला नाही.
https://www.youtube.com/watch?v=ZIaX235auao

कुमार१'s picture

1 Oct 2021 - 7:47 am | कुमार१

दादरमधून सुसाटत, हॉर्न मारत, धुरळा उडवत जाताना. तो रूळांच्या सांध्यांमुळे होणारा खडखडाट
>> भारीच !

कुमार१'s picture

9 Oct 2021 - 4:09 am | कुमार१

रेल्वेची त्रिशूल :त्रिशूल

तीन मालगाड्या एकत्र जोडून केली भली लांब मालगाडी :

https://www-msn-com.cdn.ampproject.org/v/s/www.msn.com/en-in/money/news/...

सुबोध खरे's picture

9 Oct 2021 - 9:24 am | सुबोध खरे

अशीच एक १४६ डब्यांची अजगर गाडी(python train) पूर्वीय तटवर्ती रेल्वेने २०१९ मध्ये चालवली होती त्याची आठवण झाली.

https://www.thehindu.com/news/national/railways-bet-on-this-fast-moving-...

गामा पैलवान's picture

9 Oct 2021 - 1:36 pm | गामा पैलवान

एव्हढी २ किलोमीटर लांबलचक मालगाडी ठेवायची कुठे हा प्रश्नंच आहे. विश्रामस्थळी वा गन्तव्यस्थानी तिचे तोडून आवाक्य तुकडे करून वापरीत असावेत. याकरिता अतिरिक्त वेळ द्यावा लागेलसं वाटतं. तसंच ही जोडतोड बहुधा गाडीपागेत करता येणार नाही. त्यासाठी मुख्यमार्ग वापरावा लागेल. तोही अतिरिक्त काळासाठी अडवून ठेवला जाईल. एकंदरीत नेहमीच्या प्रवासी मार्गावर ही मालगाडी वापरणं कटकटीचं दिसतंय. म्हणून समर्पित मार्गावर चालवली जाईलसं दिसतंय.

-गा.पै.

कुमार१'s picture

9 Oct 2021 - 1:43 pm | कुमार१

म्हणून समर्पित मार्गावर चालवली जाईलसं दिसतंय.
+११

कुमार१'s picture

9 Oct 2021 - 3:11 pm | कुमार१

सध्या सुद्धा लांबलचक गाड्यामुळे कसे प्रश्न येतात ते पहा.
१. आपल्याकडे बऱ्याच मार्गांचे अजून दुपदरीकरण झालेलं नाही. त्यामुळे समोरा समोर दोन विरुद्ध दिशेकडून गाड्या आल्या, की एकीला थांबूनच दुसरीला पुढे पाठवावे लागते. लहान गावांमधल्या स्थानकांमध्ये असे होते. जर एका दिशेने प्रवासी गाडी आणि दुसर्‍या दिशेने मालगाडी येत असेल तर आधी लांब मालगाडीला जाऊ द्यावे लागते. कारण लांबलचक मालगाडी स्थानकावरील एखादा फलाट अडवून जास्त काळ उभी ठेवता येत नाही.

२. दक्षिणेकडून नवी दिल्लीला जाणाऱ्या काही प्रवासी गाड्याना जास्त डबे आहेत. त्या जेव्हा अधल्या मधल्या लहान गावांमधून जातात तेव्हा तिथला एखादाच फलाट त्यांच्यासाठी खास तितका लांब बांधलेला असतो. त्यामुळे अन्य फलाटांवरून त्यांना नेताच येत नाही.

कुमार१'s picture

10 Oct 2021 - 10:20 am | कुमार१

गोवा ते दिल्ली वातानुकूलित डब्यांमधून चॉकलेट्सने केला प्रवास !
रेल्वेला छानपैकी उत्पन्न.
प्रथमच हा प्रयोग राबविण्यात आला आहे...

https://m.economictimes.com/industry/transportation/railways/in-a-first-...

कुमार१'s picture

11 Oct 2021 - 9:51 am | कुमार१

आता रेल्वेत थुंकण्यासाठी प्रोत्साहन…थुंकीतून घाण पसरणार नाही तर झाडे बहरतील…अशी आहे भारतीय रेल्वेची नवीन योजना…

https://mahavoicenews.com/encouragement-to-spit-on-trains-nowthis-is-the...

कुमार१'s picture

18 Oct 2021 - 8:07 pm | कुमार१

CSMT स्थानकात 'मील ऑन व्हील' रेस्टॉरंट सुरु होतेय

ok

कोणी याचा अनुभव घेतल्यास जरूर लिहा.

कुमार१'s picture

13 Nov 2021 - 11:21 am | कुमार१

१९७४ मधील रेल्वेच्या अभूतपूर्व संपाची आठवण इथे :

https://bolbhidu.com/george-fernandes-railway-strike/

सुबोध खरे's picture

13 Nov 2021 - 12:00 pm | सुबोध खरे

Railways to restore passenger trains to pre-Covid level
https://indianexpress.com/article/india/railways-to-restore-passenger-tr...

चौथा कोनाडा's picture

14 Nov 2021 - 8:12 pm | चौथा कोनाडा

व्वा, बरं झालं सुरु होणार, फार कुचंबण होत होत होती !

कुमार१'s picture

14 Nov 2021 - 8:23 pm | कुमार१

नक्की दिनांकाच्या प्रतीक्षेत...
...
भोपालचे राणी कमलापती रेल्वे स्टेशन स्टेशन एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळासारखे केले असून उद्या त्याचे उद्घाटन आहे.

बघूया ते बघण्याचा योग कधी येतोय

चौकस२१२'s picture

15 Nov 2021 - 10:21 am | चौकस२१२

सहकार आणि आपला राजकीय स्वार्थ / संधी याचा मेतकुट तर सर्वश्रुत आहे त्याचा वसंतदादांनी असा फायदा करून घेतला हे माहित नवहते... असो पश्चिम महाराष्ट्रातील सहकारात असून ( साखर, दुष्ट इत्यादी) राजकारणात फार ना पडलेलं म्हणजे वारणा समूहाचे तात्या कोरे... पुढे काय पण सुरवातीला तरी त्यांनी सहकार आणि स्थानिक विकास यावर लक्ष केंद्रित केलं होते जयवं वेळी सांगली चा कारखाना मोठा होता त्यावेळेस वॉर्नला प्रगती जास्त झाली होती !

बाकी मोदी शहा नननंतर भाजप... काळजी नसावी करणं वाजपेयी यादवांनन्तर कोण असा प्रश्न होताच कि! भाजप ला संघ कडून पूर्वतः होत राहील तेव्हा सतत राहील किंवा नाही माहित नाही पण भाजपात नेतृत्व राहील

गांधी नसताना ची काँग्रेस मात्र उभी राहावी असे मनापासून वाटते .. घराणेशाही फार झाली

कुमार१'s picture

15 Nov 2021 - 10:43 am | कुमार१

वरील प्रतिसादाची गल्ली चुकलेली दिसते !

कुमार१'s picture

16 Nov 2021 - 4:01 pm | कुमार१

हडपसर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म लगतच वाहन लावायची सोय होणार !
महाराष्ट्रातील या प्रकारचे हे पहिलेच रेल्वे स्थानक असेल :

https://www.whatshot.in/pune/punes-hadapsar-station-to-become-maharashtr...

कुमार१'s picture

26 Nov 2021 - 2:42 pm | कुमार१

ट्रेनच्या साखळी ओढण्याच्या प्रमाणाचे व कारणांचे विश्लेषण इथे आहे.
अशा घटना मुंबईत सर्वाधिक होतात.

कुमार१'s picture

9 Dec 2021 - 6:12 pm | कुमार१

'माथेरानची राणी' लवकरच पुन्हा रुळावर!

https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-matheran-toy-tr...

या ट्रेन साठी दोन फुटांची नॅरो गेज लाईन एका शतकापूर्वी 1907 मध्ये बांधली गेली होती आणि आता ती युनेस्कोच्या यादीमध्ये आहे.

कुमार१'s picture

12 Dec 2021 - 4:43 pm | कुमार१

भारतातील काही रेल्वे स्थानकांची लांबलचक नावे हा एक कुतूहलाचा विषय आहे. मार्च 2019 पर्यंत या संदर्भात आंध्र प्रदेश मधील हे स्थानक लांब नावांच्या यादीत प्रथम क्रमांकावर होते :
Venkatanarasimharajuvaripeta

मात्र एप्रिल 2019 पासून चेन्नईचे हे स्थानक आता पहिल्या क्रमांकावर आहे :

Puratchi Thalaivar Dr. M.G. Ramachandran Central Railway Station

गामा पैलवान's picture

12 Dec 2021 - 7:55 pm | गामा पैलवान

छ्या, काहीतरीच ! गोब्राह्मणप्रतिपालकक्षत्रियकुलावतंसप्रौढप्रतापपुरंदरसिंहासनाधीश्वरमहाराजाधिराजछत्रपतीशिवाजीमहाराज टर्मिनसची सर कुण्णालाही नाही.
-गा.पै.

कुमार१'s picture

12 Dec 2021 - 8:58 pm | कुमार१

भारीच !

फतेहाबाद चंद्रावतीगंज जंक्शन
महंमदावाद अने खेडा रोड

जेम्स वांड's picture

13 Dec 2021 - 9:27 am | जेम्स वांड

पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन (पूर्वाश्रमीचे मुगलसराय)

सुबोध खरे's picture

13 Dec 2021 - 10:24 am | सुबोध खरे

क्रांतिवीर संगोळी रायन्ना बेंगळुरू शहर स्थानक

कुमार१'s picture

14 Dec 2021 - 10:02 am | कुमार१

वरील सर्व नावे भारीच !
.........
1973-74 मध्ये भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या ‘जनता एक्सप्रेस’ चालू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यातील पहिल्या दिल्ली - एरणाकुलम या जयंती जनता एक्‍स्प्रेसला विशेष संस्कृतिक महत्त्व आहे.
त्या संदर्भातील एक चांगला लेख इथे

वरील गाडीमध्ये फक्त दोन रुपये भरून अंथरूण-पांघरूणाची सोय केली जात असे !

फारएन्ड's picture

14 Dec 2021 - 6:02 pm | फारएन्ड

इण्टरेस्टिंग माहिती! गेल्या काही वर्षात या गाडीचे (मुंबईहून निघणार्‍या) नाव ऐकले नव्हते त्यामुळे ती अजून सुरू आहे की आता वेगळ्या नावाने चालते असा प्रश्न पडला होता. तो लेख बघून ती पॅण्डेमिक सुरू होईपर्यंत तरी सुरू होती असे दिसते. मला वाटले नेत्रावती किंवा नागरकॉइल एक्स्प्रेस नावाने ज्या गाड्या धावतात त्यापैकी एखादी मूळची जयंती जनता की काय. एकेकाळी मुंबई-पुणे दरम्यानच्या सगळ्या गाड्या पाठ होत्या, त्यात एक ही पण.

यातल्या काही गाड्या नंतर पुढे वाढवण्याचे कारण म्हणजे बहुधा तमिळनाडुच्या दक्षिण भागात असलेले मीटर गेज नंतर ब्रॉड गेज मधे बदलले असावे. अगदी लहानपणी त्या भागात मीटरगेज ने केलेला प्रवास आठवतो. "मद्रास एग्मोअर" लाइन वर अगदी १९९९ पर्यंत मीटरगेज होती हे लक्षात आहे. त्या लोकल्स एकदम टुमदार वाटायच्या. मुंबईच्या मानाने कमी गर्दी होती मी गेलो त्या दिवशी तरी.

मागच्या दशकापर्यंत मुंबई/पुण्यात काम करणार्‍या मूळच्या तमिळनाडु, केरळ वगैरेमधल्या लोकांच्या रेल्वेप्रवासाचे एक वेगळेच विश्व होते. ते या लेखात थोडेफार आले आहे. मला आठवते ते म्हणजे माझे मित्र पुण्याहून निघण्याची तारीख बघून त्याआधी ६० की ४५ दिवस मोजून त्या दिवशी सकाळी रिझर्वेशन सेण्टरला धावत. पाहिजे ते रिझर्वेशन मिळाले की खुश असत. नाहीतर मग वेटिंग लिस्ट, आरएसी वगैरेची चर्चा चाले. हे आता बहुधा बरेचसे बदलले असावे - काही आता विमान प्रवास करत असतील, तर अनेक लोक खाजगी बसही वापरत असतील. पण रेल्वेतही होणार्‍या सुधारणा पाहता तो प्रवास अपीलिंग असू शकेल अजूनही.

मीही एकदोनदा उद्यान एक्स, चेन्नई मेल ने प्रवास केलेला असल्याने लेखात उल्लेख केलेले बदलते वातावरण, लॅण्डस्केप्स, विविध पदार्थ वगैरे सगळ्याची आठवण झाली. अगदी बंगलोरला जाणारी गाडी सुद्धा आंध्र मधून जायची - बहुधा तो रायचूर, गुंटकल वगैरे भाग दक्षिणेकडे जाणार्‍या सर्व रूट्स मधे कॉमन आहे.

पण "जनता एक्स्प्रेस" ही कॅटेगरी आणि "जयंती जनता" या दोन्ही सेमच का? पूर्वी डेक्कन क्वीनच्या आधी भल्या पहाटे पुण्याहून निघणारी "जनता एक्सप्रेस" होती. नंतर तिची डबल डेकर झाली व नावही "सिंहगड" झाले. ती डबल डेकर मला खूप आवडायची. अनेकदा दुपारी रिझर्वेशन न करता कल्याणहून पुण्याला तिने आलो आहे. एक पर्सनॅलिटी होती त्या गाडीला. नंतर ती इतर गाड्यांसारखीच झाली.

कुमार१'s picture

14 Dec 2021 - 6:12 pm | कुमार१

माहितीपूर्ण प्र.

पण "जनता एक्स्प्रेस" ही कॅटेगरी आणि "जयंती जनता" या दोन्ही सेमच का?

>>
त्या लेखानुसार तरी तसेच वाटते आहे.
कोकण रेल्वे सुरू होण्यापूर्वीचा लांबलचक प्रवास त्या लेखात वर्णिला आहे. त्यातील प्रवाशांचा एकमेकांशी संवाद आणि मुलांची एकमेकांची गट्टी होणे हा भाग छान आहे. तेव्हाचा (आंतरजालपूर्व ) भारत वेगळाच होता हेही वाक्य भावले.

सुबोध खरे's picture

15 Dec 2021 - 11:52 am | सुबोध खरे

जनता एक्स्प्रेस चा अर्थच असा होता कि त्यात फक्त तृतीय (आता द्वितीय) वर्गाचे डबे होते. यात आरक्षित आणि अनारक्षित असे दोन्ही भाग होते पण या गाडयांना वातानुकूलित किंवा प्रथमी वर्गाचा डबा नसे.

श्री मधू दंडवते रेल्वे मंत्री झाल्यावर त्यांनी द्वितीय वर्गाच्या बर्थला मऊ आरामदायक फोमच्या गादीची सुविधा दिली . त्याअगोदर त्या ऐवजी लाकडी बाक असे. जो रात्री झोपताना फार कडक भासत असे.

आता जनसाधारण एक्स्प्रेस या संपूर्ण द्वितीय वर्गाच्या आणि पूर्णपणे अनारक्षित गाड्या चालवल्या जातात. त्यातील काही गाड्यांचे अन्त्योदय एक्स्प्रेस या दुसऱ्या पिढीतील अद्ययावत गाड्यांमध्ये मध्ये रूपांतरण केलेले आहे. या अन्त्योदय एक्स्प्रेस सुद्धा द्वितीय वर्गाच्या आणि पूर्णपणे अनारक्षित गाड्या असून त्यात बायो टॉयलेट, शुद्ध पाण्यासाठी ऍक्वा गार्ड आणि फोन चार्जिंग ची सुविधा सारख्या सोयी दिलेल्या आहेत

कुमार१'s picture

14 Dec 2021 - 6:14 pm | कुमार१

लहान बाळासह रेल्वे प्रवास करणाऱ्या मातांना प्रवासात निर्धास्त झोप घेता यावी म्हणून नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलचे प्राध्यापक नितीन देवरे आणि त्यांच्या पत्नी हर्षली देवरे यांनी संशोधन करून बाळांच्या बर्थची निर्मिती केली आहे.

या फोल्डेबल बेबी बर्थला पेटंट मिळाले असून हे संशोधन भारतीय रेल्वेला मोफत देण्याचा निर्णय या दाम्पत्याने घेतला आहे.
अभिनंदन !
त्या दुव्यातील चित्र पहाच. गोड आहे !

कुमार१'s picture

17 Dec 2021 - 10:22 am | कुमार१

जगातील सर्वात लांब पल्ल्याचा आंतरराष्ट्रीय रेल्वे प्रवास कुठला असू शकेल, यावर काही रेल्वेप्रेमीनी प्रारूप तयार केले आहे.
ते इथे पाहता येईल.

हा प्रवास पोर्तुगाल ते सिंगापूर असा 21 दिवसांचा राहील.
पुढे जाऊन त्यांनी याच मार्गावरील विमान प्रवास आणि हा रेल्वे प्रवास यांच्यातून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाची तुलना केली आहे. ती रोचक आहे :

विमान : 1.67 टन कर्बवायू
रेल्वे : 0.08 टन ,,

जेम्स वांड's picture

17 Dec 2021 - 11:32 am | जेम्स वांड

पोर्तुगल ते सिंगापूर रेल्वे, कार्बन उत्सर्जन वगैरे मुद्दे मान्य केले तरी ह्या ट्रेनला तो चार्म नसेल जो ह्या आमच्या खालील लाडक्या ट्रेनला असे.

.

सिम्प्लॉन ओरिएंट एक्स्प्रेस

आधी पॅरिस नंतर लंडन ते इस्तंबूल पूर्ण लक्झरी, खाणेपिणे ते साईट सीइंग अन कटलरी ते सर्विस सर्वोत्तम असणारी फ्रेंच रसिकतेने सजवलेली अशी द ओरिएंट एक्स्प्रेस अलगच चार्म कॅरी करते राव.

अगाथा क्रिस्टीचं मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस, त्यातील एर्क्युल पॉइरो, बुक इत्यादी पात्रे लैच खास तिच्यायला. हल्लीच आलेल्या ह्याच नावाच्या सिनेमात पण एक मोठा भाग ह्या रेल्वेलाच समर्पित आहे.

कुमार१'s picture

17 Dec 2021 - 11:37 am | कुमार१

अगदी अगदी !
**अगाथा क्रिस्टीचं मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस,
>>
हे वाचून युगे लोटली!
आता कधीतरी उजळणी केली पाहिजे

टोनी रॉबिन्सन ( https://www.youtube.com/watch?v=5ikFBjctYHE)
ब्रिटिश कलाकार यांचा हा रेल्वेने जगभ्रमण हा माहितीपट नक्की बघावा https://www.youtube.com/watch?v=Jc3H4_ff0eM&list=PLpUtzKc66ABODy14IN5Yjp...

आणि तो आवडला तर मायकेल पेलिन यांची आरौन्ड द वर्ल्ड किंवा पोल टू पोळ हे प्रवासपट हि बघा

चौकस२१२'s picture

17 Dec 2021 - 11:55 am | चौकस२१२

खर आहे यूरोप मधील रेल्वे प्रवास हा एक वेगळ्याच विश्वात घेऊन जातो कारण नुसते ती रेल्वे नाही तर आजू बाजूची गावे , तेथील वास्तू इत्यादी
तशी ईस्टर्न ओरिएंट एक्सप्रेस हि आहे सिंगापोर ते बँकॉक पण ईस्टर्न ओरिएंट पेकशा साध्या रेल्वे ने थांबत थांबत सिंगपोर ते बँकॉक आणि पुढे कोलकत्यापर्यंत जात येईल का हे एकदा आयुष्यात करून बघायचंय

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Dec 2021 - 11:42 am | ज्ञानोबाचे पैजार

२१ दिवसांचा प्रवास सुध्दा काही ठिकाणी मुक्काम करावा लागेल म्हणून आहे. ते मुक्काम टाळता आले तर हा१६,८९८ किमीचा प्रवास अजून जलद होउ शकतो.
तरी सुध्दा सध्याचा ८०४ किमि प्रति दिवस हा सरासरी वेग सुध्दा ठिकच आहे.

कार्बन उत्सर्जन जरी कमी असले तरी तिकिटाची किंम्मत विमाना पेक्षा फारच जास्त आहे १३५० डॉलर प्रतिव्यक्ती. म्हणजे साधारण १०२,००० भारतिय रुपये. (म्हणजे ६ रुपये प्रति किलोमिटर होइल). अधिक ज्या १३ देशांमधुन हा प्रवास होइल त्या देशांचा व्हिसाचा खर्च अधिक येईल.

विकी ने दिलेल्या माहिती नुसार दिब्रुगड ते कन्याकुमारी विवेक एक्स्प्रेस ही भारतातली सर्वात लांब पल्याची रेल्वे सेवा आहे. ४२३४ किमी आणि ५७ थांबे घेत ही गाडी ७९ तासात हा प्रवास करते. (सरासरी ५३ किमी प्रति तास किंवा १२८६ किमी प्रति दिवस)

सेकंड सिटींग चे तिकिट रु ७४५ ( १७पैसे प्रति किमी), स्लिपरचे रु ११८५ (२८ पैसे प्रति कीमी), थर्ड एसी रु ३०१५ (७१ पैसे प्रति कीमी) व सेकंड एसी रु ४४५० (रु १.०५ प्रति किमी)

पैजारबुवा,

युटिलिटेरियन रेल्वेज आहेत ह्या, इतका प्रचंड माल, माणसे इतक्या मोठाल्या अंतरावर इतक्या कमी पैशात नेणे म्हणजे काय गंमत नाहीच राव.

चौकस२१२'s picture

17 Dec 2021 - 11:49 am | चौकस२१२

१६,८९८ किमी साठी $ १३५० मग काय फार नाही कि ...
आणि पोर्तुगाल ते सिंगापोर विमान <१३५० मिळेल? वाटत नाही ( कोविद नसताना सुद्धा )

चौकस२१२'s picture

17 Dec 2021 - 11:51 am | चौकस२१२

४००० किमी साठी सेकंड सिटींग चे तिकिट रु ७४५! हे केवळ सरकार भुर्दंड उचलते म्हणून , वास्तवाशी संबंध नाही याचा

जेम्स वांड's picture

17 Dec 2021 - 11:53 am | जेम्स वांड

सरकार कसला भुर्दंड उचलते भारतीय रेल्वेत?

जेम्स वांड's picture

17 Dec 2021 - 11:57 am | जेम्स वांड

The Indian Railways, on average, pays 43 paise per rupee for each ticket as 'subsidy'. This is not a traditional subsidy, insofar as it comes from the central exchequer, but is instead cross-subsidised from the money the national transporter makes from its freight operations

चौकस२१२'s picture

17 Dec 2021 - 11:59 am | चौकस२१२

रेल्वे . एसटी सरकार ( म्हणजे आपणच करामार्फत ) "सबसिडी " नाही का देत ? ४००० किमी ७४५ कसे परवडेल ?
मला बरेच वर्षे ते वाटायचे कि डिझेल हे जगात सगळीकडे पेट्रोल पेक्षा स्वस्तच असते ,, पण भारताबाहेर पडल्यावर कळले कि तसे नसू हि शकते सगळं करा कसा लावतात // सवलत कश्यावर दिली जाते त्यावर नाही का सगळे १
असो रुक्ष केला धागा... प्रवासाबद्दल बोलूयात

जेम्स वांड's picture

17 Dec 2021 - 12:05 pm | जेम्स वांड

तेच तर लिहिले आहे वरती,

इंडियन रेल्वेज क्रॉस सबसिडाईज करते पॅसेंजर ऑपरेशन्स, म्हणजेच मालगाड्यातून येणाऱ्या इन्कममधून प्रवासी ऑपरेशन्सचा तोटा भरून काढते, इतके असूनही मागील काही वर्षे वार्षिक लाभांश, मिशन झीरो, बायोडिझेल वगैरे क्षेत्रात मोठी मजल मारली आहे भारतीय रेल्वेजनं

गामा पैलवान's picture

20 Dec 2021 - 7:14 pm | गामा पैलवान

जेम्स वांड,

तुमच्याशी सहमत. जगात सर्वत्र रेलवे मालवाहतुकीवर चालते. प्रवासी वाहतूक नेहमी तोट्यातच चालते. तो तोटा मालवाहतुकीतून भरून काढला जातो. अपवाद फक्त मुंबई उपनगरी रेल्वेचा आहे. हा प्रवासी रेल्वेचा उपक्रम चक्क फायद्यात आहे. कारण की गाड्यांत माणसं गुरासारखी कोंबली जातात.

हेच सत्य उलट पद्धतीने सांगतो. मुंबईत लोकल गाड्यांत फक्त सामानाचे डबे असतात. एक डबा निर्जीव सामानासाठी व उरलेले सजीव मानवी सामानासाठी असतात.

आ.न.,
-गा.पै.

जेम्स वांड's picture

21 Dec 2021 - 9:50 am | जेम्स वांड

अपवाद फक्त मुंबई उपनगरी रेल्वेचा आहे. हा प्रवासी रेल्वेचा उपक्रम चक्क फायद्यात आहे.

हे आकडे आणि तथ्य एकदा क्रॉसचेक करून घ्यावेत ही विनंती.

आजच काही कामाने (आठवड्याला ३-४ दिवस असतो त्याप्रमाणे) मुंबईला आलो आहे. वाशी ते अंधेरी वडाळा मार्गे तिकीट बुक केले भारतीय रेल्वेज (मध्य रेल्वेच्या) हार्बर लाईनवरून युटीएस ऍप मधून तिकीट बुक केल्यावर मॅसेज आला की

"Indian Railways recovers only 36% of the travel cost on suburban train services"

अर्थात सुरक्षा फीचर्समुळे मला त्याचा स्क्रीनशॉट घेता आला नाहीए पण तुम्ही प्रयोग करून पाहा सहज फ्लॅश होतो तो मॅसेज,

एकंदरीतच प्रवासी (लांब अंतराचे/ एक्स्प्रेस-मेल) सेवेत कॉस्ट रिकव्हरी ५२ का ५६% आहे आणि उपनगरीय सेवेत तर तोच दर फक्त ३६% आहे ह्यावरून लक्षात यावे की प्रवासी सेवेत तोटा किती मोठा इशू आहे ते.

एकंदरीत, अजगरासारख्या पसरलेल्या अन गतीने बऱ्यापैकी सुस्त असलेल्या मालगाड्याच आपले प्रवास फंड करीत आहेत, बाकी निर्जीव सामान आणि (लोकलमध्ये लटकलेले) सजीव सामान ही कोटी विलक्षण आवडलेली आहे मला.

जेम्स वांड,

मध्यंतरीच्या काळात ( २०१४ ते २०१७ ) काही वर्षं मुंबई उपनगरीय मार्ग तोट्यात होता. कारण की विकासकामं जोरात होती. मात्र नंतर नेहमीप्रमाणे नफ्यात आलेला असावा. भारतातल्या सर्व उपनगरीय गाड्यांचा नफातोटा एकत्रित मांडला जातो. त्यामुळे उपनगरीय रेलवेचा केवळ ३६ % परतावा मिळालेला दिसतो. मुंबई मंडळ स्वतंत्र केल्यास फायद्यात राहील, असा मला वाटतं. हा मुद्दा बराच जुना म्हणजे १९८० च्या दशकापासून चर्चेत आहे.

आ.न.,
-गा.पै.

जेम्स वांड's picture

21 Dec 2021 - 9:17 pm | जेम्स वांड

वाटत नाही तसं, तसं असतं तर तो मॅसेज प्रणालीतून बाद करणे सहज जमले असते की सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम (क्रिस)ला.

कुमार१'s picture

17 Dec 2021 - 12:12 pm | कुमार१

वरील सांगोपांग चर्चा आवडली !
सर्वांना धन्यवाद

कंजूस's picture

17 Dec 2021 - 2:38 pm | कंजूस

याचे ओनलाईन रेझर्वेशन २०२१ मार्चमध्ये रेल्वेने बंद केले. आणि मजा गेली.
( Taxi association ने बंद पाडले असा कयास आहे.)

कुमार१'s picture

24 Dec 2021 - 7:55 pm | कुमार१

येत्या रेल्वे अर्थसंकल्पात खालील तीन महत्त्वाच्या गोष्टींसाठी तरतूद करण्यात येणार आहे :

१. हायड्रोजन इंधन
२. हायपरलूप प्रवास ​तंत्रज्ञान
३. कमी वजनाचे ॲल्युमिनियमचे डबे

ok

कुमार१'s picture

27 Dec 2021 - 9:25 pm | कुमार१

अरेच्चा! ही बस आहे की ट्रेन? जपानमध्ये सुरू झाली ड्युअल मोड व्हेइकल

ok

(सौजन्य : ए बी पी )

कंजूस's picture

28 Dec 2021 - 1:47 pm | कंजूस

पण ती मेंटेनन्सवाले वापरत.
पहिले ISO स्टेशन.
'रानी कमलापती रेल्वे स्टेशन' = ( RKMP), जुने हबीबगंज स्टैशन, भोपाळजवळ . नोव्हेंबरमध्ये नूतनीकरण झाले.
https://youtu.be/o4LVetOZnQk
26:00

जिथे वेटिंगही मजेदार असेल.

कुमार१'s picture

28 Dec 2021 - 9:24 pm | कुमार१

'रानी कमलापती रेल्वे स्टेशन'

मस्तच ! सर्व विद्युत यंत्रणा सौर उर्जेवर आहे हेही छान

जेम्स वांड's picture

29 Dec 2021 - 10:07 am | जेम्स वांड

ही खालील गोंडस प्रकरणे आठवतात.

.

.

.

त्सुनामी नंतर भारताने श्रीलंकेत इरकॉन कंपनीच्या अंतर्गत कंत्राट घेऊन कोस्टल रेल्वेची पुनर्बांधणी करून दिली होती श्रीलंकेला. त्यात डेमु सेट्स अन काही फिडर लाईन्सवर रेलबस पण होत्या, एकंदरीत लोकसंख्येचा अनुपात अन उपयुक्तता पाहता श्रीलंकेच्या आकाराच्या देशात रेलबस उत्तम हिट होऊ शकते. भारतात ते शक्य होत नाही, कारण गर्दी कायम तोबा असते, तरीही जुन्याकाळच्या काही रुट्स वर रेलबस होती. अचलपूर यवतमाळ शकुंतला एक्स्प्रेस होती महाराष्ट्रात नॅरोगेज तिच्यावर नंतर नंतर सुरू झाली होती रेल बस एनडीएम सिरीज इंजिन अन बोगी सेट्स काढून, गुजरातमध्ये भावनगरकडे पण होती, परत बंगलोर कर्नाटक जवळ बंगारपेट लाईनवर पण ही होती, नंतर जवळपास सगळ्या बंद झाल्यात.

कुमार१'s picture

29 Dec 2021 - 10:41 am | कुमार१

खूप छान व गोंडस !
राच्याकने...
अनुपात >>>
भलताच आवडला आहे !

जेम्स वांड's picture

29 Dec 2021 - 11:12 am | जेम्स वांड

समकालीन, ऐतिहासिक, वर्तमान, भूतकाळ अश्या कुठल्याच संदर्भात ब्रॅडशॉ गाईडचा उल्लेख आला नाही म्हणजे नवलच आहे, तत्कालीन लंडनमधून प्रकाशित होणारी आणि कॉंटिनेंटल युरोप, मिडल ईस्ट, आफ्रिका आणि आशिया (आणि भारतातून) रेल्वे प्रवास करताना कामी येईल अशा ह्या चोपडीत स्टेशन, ट्रेन कुठं बदलावी ते जंक्शन, प्रत्येक ठिकाणी असलेले लोक, व्यापार, खानपान, मसाले, संस्कृती इत्यादींचे मस्त वर्णन असे, त्याशिवाय रेल्वे टाईमटेबल पण !

.