'हमेशा तुमको चहा'

सरनौबत's picture
सरनौबत in जनातलं, मनातलं
24 Jun 2017 - 11:52 am

'हमेशा तुमको चहा'

रविवार दुपार. जेवण करून वामकुक्षी साठी आदर्श वेळ. अचानक आपल्या पत्रिकेतील ग्रह फिरतात आणि ओळखीच्या कोणाचं तरी पुढच्या आठवड्यात 'कार्य निघतं'. 'आहेर म्हणून आपण पाकिटात पैसे घालून देऊ' असं ओठांवर आलेलं वाक्य पूर्वानुभवामुळे गिळावं लागतं. "फक्त मित्रांबरोबर बाहेर हिंडायला आवडतं, देण्याघेण्याचे व्यवहार अजिबात कळत नाहीत" वगैरे वाक्यं आपलीच वाट बघत असतात. लक्ष्मी रोड वर दुपारी (त्यातल्या त्यात) गर्दी कमी म्हणून दुपारी २ ला आपण अर्धांगिनी बरोबर 'आहेर म्हणून बाहेर' पडतो.

पहिल्या २-३ दुकानात काहीच पसंत पडत नाही. मग 'हस्तकला' मध्ये पंजाबी ड्रेस मटेरियल चा नवीन स्टॉक आलाय तर तिकडे जाऊ, असं ठरतं. दुपारी ३:३० ची वेळ. डोळ्यावर झोप आणि 'ह्यामध्ये अजून कुठले कलर आहेत?' हे ऐकून विटलेले कान. अश्या वेळी तळमजल्यावरील अमृततुल्य च्या दिशेने 'चहाचा वास' येतो. 'तू बघ तोपर्यंत मी जरा चहा (आणि माझी अनावर झोप!) मारून येतो" असं म्हणून आपण खाली सटकतो. पांढऱ्या जाड कपात तो (देवदूत) चहा ओततो. पहिल्या घोटातच सगळा शीण नाहीसा होऊन तरतरी येते. ह्या चहाच्या दुकानांना 'अमृततुल्य' इतकं समर्पक नाव दुसरं नाही! देव-दानवांना बायकोबरोबर दुपारी खरेदीला बाहेर पडायची वेळ आली नसावी. नाहीतर चहा सारखं पेय असताना अमृतमंथनाच्या भानगडीत ते कधीच पडले नसते.

पुण्याच्या मध्यवस्तीतील ही अमृततुल्ये केवळ चहाची दुकाने नाहीत. तिथला धगधगता स्टोव्ह चहा रुपी देवाची साधना करण्यासाठी मांडलेला यज्ञ आहे. मोठ्या पातेल्यात चहा पावडर, साखर ह्याची आहुती टाकली जाते. पितळेच्या खलबत्त्यात आलं-वेलदोडे कुटून घंटानाद होतो. सराईत पुजाऱ्याप्रमाणे सगळ्या कृती सुरु असतात. कापडातून चहा गाळून भक्तांना ‘Tea-र्थ’ वाटप करण्यात येते.

दिवसाच्या कुठल्याही वेळेला 'चहा घेणार का?' ह्या प्रश्नाला जर “घोटभर चालेल” अशी तुमची प्रतिक्रिया असेल तर समजा की तुम्ही (माझ्यासारखेच) चहाबाज आहात. पुण्यातच ऐकलेलं वाक्य नेहमी आठवतं- ‘बायकांनी कुंकवाला आणि पुरुषांनी चहाला कधी नाही म्हणू नये’. दारू न पिणाऱ्यास teetotaler म्हणतात. तर मग चहा न पिणाऱ्या लोकांना tea-totaler म्हणायला काय हरकत आहे? डिक्शनरी बनवणाऱ्या ऑक्सफर्ड, केम्ब्रिज वगैरे मंडळींनी ह्याची कृपया दखल घ्यावी.

गोर-गरिबांपासून अतिश्रीमंतापर्यंत सर्वत्र संचार करणारं हे एक महान द्रव्य आहे. हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या 'चहा-पोळी' नाश्त्यापासून ते अगदी श्रीमंतांच्या 'High Tea’ पर्यंत ह्याचा वावर असतो.

एकाच माणसाच्या व्यक्तिमत्वाचे विविध प्रसंगात अनेक पैलू समजतात तसंच चहाचं देखील आहे. सुट्टीच्या दिवशी सकाळी पेपर वाचत चहा एखाद्या निवांत माणसासारखा वाटतो. तर तोच चहा ऑफिस ला जाण्याच्या घाईगडबडीत 'लवकर मला पिऊन टाका' असा म्हणत असतो. ऑफिस मधला मशीन चा चहा रोजच्या रुटीन सारखा बेचव लागतो. तोच ऑफिसच्या रटाळ मीटिंग मध्ये 'करमणुकीचा आधार' वाटतो.

हॉस्पिटल मध्ये रात्रभर जागरण झाल्यावर सकाळी येणारा चहा हवाहवासा वाटतो. त्याचप्रमाणे रेल्वेप्रवासात येणारा 'चाय गरम'. टपरीवरचा ‘कटिंग’ चहा, सर्दी-खोकला झाल्यावर 'गवती चहा', कॉलेज कँटीनला मित्रांबरोबर 'चाय पे चर्चा', पाऊस न्याहाळत खिडकीतला चहा, ट्रेकिंग ला चूल मांडून केलेला चहा. मस्का-पाव बरोबरचा इराणी चहा, स्पेशल 'मलई मारके' चहा, उन्हाळ्यातला 'Ice Tea' अशी अनेक रूपे. सगळीच त्या-त्या वेळी हवी-हवीशी वाटणारी.

'फुकट ते पौष्टिक' हे बऱ्याच वेळा खरं असलं तरी दर वेळी फुकटात मिळणारा चहा चांगला असेलंच असं नाही. लांबच्या विमानप्रवासात रात्रीच्या जेवणानंतर मिळणारा चहा ह्याचं उत्तम उदाहरण आहे. रात्री १:३० ची फ्लाईट. विमानातील जेवण होईपर्यंत ३ वाजतात. आता ही वेळ काही चहाची आहे का हो? अश्या (अ)वेळी 'कोरा चहा' घेऊन तितक्याच कोऱ्या चेहेऱ्याची हवाई सुंदरी येते. कोरा चहा कपात ओतून कृत्रिम हसून निघून जाते. मग आपणच त्यात साखर आणि दुधाची पावडर घालून 'चहा(सदृश पदार्थ) बनवायचा. चहा ह्या पेयाचा इतका अपमान दुसऱ्या कोणीच केला नसेल!

चहाचा अजून एक अपमान म्हणजे authentic चायनीज रेस्टारंटसमध्ये जेवणानंतर मिळणारा 'जस्मिन टी'. चिनी लोकांनी एकही प्राणी आणि भाजीपाला सोडला नाही खायचा. सगळे प्राणी आणि भाज्या संपल्यावर फुलांकडे त्यांची (मिचमिची) दृष्टी पडली असावी. मोगरा, शेवंतीचा वास चांगला म्हणून त्याचा चहा? 'च्या'यला! ज्या देशात चहाचा शोध लागला त्याच लोकांनी असं करावं ह्यापेक्षा दुर्दैव कुठलं? कटिंग चहा आणि फूल चहा माहिती होतं. पण फुलं घातलेला चहा 'Is not my Cup of Tea'! चहा कसा करायचा हे समजत नसल्याने देशाचं नाव 'चाय'ना पडलं असावं.

चहाची कधी तलफ येते, कधी सवय होते, कधी शिष्टाचार म्हणून, तर कधी कंटाळा आला म्हणूनही चहा घेतला जातो. पूर्वी स्मार्ट-फोन्स नव्हते तेव्हा चहा हे उत्तम वेळ घालवण्याचं साधन होतं. जीवन सुरक्षेसाठी LIC ला आणि एखाद्या ठिकाणी अर्धा-पाऊण तास काढायचा असेल तर चहाला पर्याय नाही. प्रवासात पाय मोकळे करायला उतरतो तेव्हा भूक नसेल तर टाइम पास म्हणून चहा. भूक लागली असेल पण खायला नसेल तरी चहा. आयत्या वेळी येणाऱ्या पाहुण्यांसाठी चहा. लग्नाची बोलणी करायला देखील 'इसीलिये मम्मी ने मेरे तुझे चाय पे बुलाया हैं'. सहज घरी भेटायला या सांगायचं असेल तर 'चहाला या ना' असंच म्हणतो.

'चहाला आलंच पाहिजे' असं आग्रहाचं निमंत्रण मोडवत नाही म्हणून आपण जातो. मात्र चहात ‘आलंच’ नसेल तर हिरमोड होतो. सरकारी ऑफिसातली आपली कामे करून घेण्यासाठी जी चिरीमिरी द्यावी लागते त्यालाही 'चायपानी'चे आवरण मिळते. शुल्लक भांडणांना 'चहाच्या पेल्यातील वादळ' म्हणतात. जेम्स वॅट ला चहाची आवड नसती तर वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लागायला अजून 'वॅट' पहावी लागली असती.

चहा उत्तम साथीदार आहे. कंटाळवाण्या प्रवासात जसा साथ देतो तसा बिस्किटापासून वडापाव पर्यंत सगळ्या पदार्थांना देखील उत्कृष्ट साथ देतो. मूळ पदार्थाच्या चवीवर कुरघोडी न करता. असा बहुगुणी आहे (च)हा.

केरळ, तामिळनाडू भागांत एका कपातून उंचावरून दुसऱ्या कपात ओतून ‘फेसाळता’ चहा देतात. कापडाच्या दुकानात गजाने कापड मोजताना जेवढा लांब हात नेतात तितक्या उंचीवरून चहा ओततात. बहुधा 'मिलीलीटर' ऐवजी 'मीटर' वर चहा विकत असावेत.

कालानुरूप चहा बनवायची पद्धत बदलली तशी चहा द्यायची देखील. अमृततुल्य मध्ये पांढऱ्या जाड कपात चहा. टपरीवर काचेच्या छोट्या ग्लास मध्ये 'कटिंग' चहा. दाक्षिणात्य हॉटेलात स्टीलचा ग्लास आणि वाटी. लग्नकार्यात आणि ऑफिसात चॉकलेटी रंगाच्या कपात चहा. असा सुटसुटीत प्रकार असायचा. आधुनिकतेच्या जमान्यात चहाचा कान उपटला गेला आणि प्लास्टिकच्या छोट्या ग्लासात चहा देऊ लागले. हायवे वरील फूड मॉल्स वर तर इतक्या लहान कपात चहा देतात कि 'चहा कपात' चा चुकीचा अर्थ त्यांनी लावला असावा बहुधा.

Middle East ला नोकरी निमित्त स्थायिक झालो तेव्हा 'कडक चहा' च्या दुकानांवर चहाचे विविध प्रकार प्यायला मिळाले. दालचिनी आणि काळी मिरी वाला 'येमेनी' चहा जबरदस्त. Turkish रेस्टारंट मध्ये कोऱ्या चहात पुदिन्याचं पान घातलेला Turkish Tea देखील आवडला. इस्तंबूल (टर्की) ला तर चहा-कॉफी चे मोठे शौकीन आहेत. तिथल्या इस्तिकलाल स्ट्रीट वर तिथल्या स्पेशल कप-बशीत चहा पिणे एक सोहळा होतो. चहाला इतका मान देणारे 'चहा'ते बघून धन्यता वाटते.

'हमेशा तुमको चहा' ह्या गाण्याचा गर्भितार्थ देवदासच्या आई ने लक्षात घेतला नाही. नाहीतर तिने पारो ला टाकण्याऐवजी पोराला 'चहा टाकला' असता. देवदास ला ब्लॅक लेबल ऐवजी (ब्रुक बॉण्ड) रेड लेबल चा नाद लागला असता.

चहाची एवढी महती कळल्यावर एका अमृततुल्य बाहेर लिहिलेलं वाक्य मला अगदी पुरेपूर पटतं - 'चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा लागतो'.

मांडणीवावरप्रकटनविचार

प्रतिक्रिया

चहाबाज लेख! छान लघुनिबंधशैली. अजून लिहा.

विजुभाऊ's picture

27 Jun 2017 - 11:39 pm | विजुभाऊ

हा घ्या आणखी एक चहा.
http://misalpav.com/node/1354

विजुभाऊ's picture

27 Jun 2017 - 11:43 pm | विजुभाऊ

हा घ्या आणखी एक चहा.
http://misalpav.com/node/1354

अभ्या..'s picture

24 Jun 2017 - 12:46 pm | अभ्या..

आता पियुष येऊ द्या,
मग पर्वती, सारसबाग, तुळशीबाग, बादशाही, दुर्वांकुर, मानकर, ट्राफिक सिग्नल आहेच.

सरनौबत's picture

24 Jun 2017 - 7:13 pm | सरनौबत

अभ्या भाऊ! कटाक्षाने पुण्यातील अमृतुल्यांची नावे, पुण्याच्या पाण्याचा चहा इ. गोष्टी लिहिल्या नाहीत मी. लेखाच्या ओघात कमीत कमी पुण्याचं वर्णन येईल आणि इतर ठिकाणच्या (मी प्यायलेल्या) चहाचं वर्णन करूनदेखील तुम्हाला फक्त एवढीच गोष्ट दिसली? एवढा विशेष लोभ का हो पुण्यावर तुमचा?

लोभ वगैरे म्हणाल तर पुणे आहे ते. असनारच.
बाकी बसबस केलेय सगळीकडे आंजावर.
उगी चार चांगले मित्र आहेत त्याना वाइट वाटू नये म्हणून बोलत नाही.
पण झेडगव्याचा कारभार आहे सगळा.

एमी's picture

7 Jul 2017 - 8:23 am | एमी

:D सहमत आहे.

===
बाकी आपण काय रोज चहा पिणाऱ्यातले नाई. हिवाळापावसाळ्यात आठवड्यातून एकदाच ब्रेड - संत्रा मर्मालेड आणि भरपूर दूध घालून बनवलेला फिका चहा मात्र आवडीने पिते.

दशानन's picture

24 Jun 2017 - 1:32 pm | दशानन

चहा'पुराण आवडलं!

सचिन काळे's picture

24 Jun 2017 - 2:19 pm | सचिन काळे

आणि कोट्या तर काय एकसे एक भारी केल्यात. मी तर पुन्हा पुन्हा वाचल्या. झकास!!!!

सचिन काळे's picture

24 Jun 2017 - 2:21 pm | सचिन काळे

कोट्या वाचताना पुलंची आठवण आली.

जेम्स वांड's picture

24 Jun 2017 - 3:59 pm | जेम्स वांड

ज्ञानेश्वर पादुका चौकातील आमचा ठरलेला अमृततुल्य आठवला एकदम. चिंचेच्या झाडाबुडी हाती सिगरेट अन कडक मारामारी (चहाचा एक प्रकार) मारताना (म्हणजे पिताना) आलेला स्वर्गीय आनंद आठवतोय

विटेकर's picture

5 Jul 2017 - 11:09 am | विटेकर

माझे पन ते आवदते थिकान होते , उम्मेदचा सामोसा आणि तृप्तीचा चहा .. समितीत रहात असताना यान्च्या जीवावर जगून निघालो ! आज अहि त्या भागात गेलो तर चहा घेतो तृप्ती ला !

सरनौबत's picture

5 Jul 2017 - 4:11 pm | सरनौबत

तृप्ती टी सेंटर चा एक नंबर असतो चहा.

विनिता००२'s picture

24 Jun 2017 - 4:05 pm | विनिता००२

सुरेख! मजा आली वाचतांना :)

प्रमोद देर्देकर's picture

24 Jun 2017 - 4:06 pm | प्रमोद देर्देकर

+१
मस्त.
आपके चहा पुराण को हमने चाहा है !

संजय पाटिल's picture

24 Jun 2017 - 4:16 pm | संजय पाटिल

छान खुसखुशीत लेख! आणि पंचेस पण जबरदस्त!

बबन ताम्बे's picture

24 Jun 2017 - 4:26 pm | बबन ताम्बे

मस्त लेख!! "चहा"टळ कोट्या खूप आवडल्या.

अभिजीत अवलिया's picture

24 Jun 2017 - 9:17 pm | अभिजीत अवलिया

आवडलं

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jun 2017 - 2:12 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं लिहिलयं ! तुम्हाला मिपावरील "चहा'टळ कोट्याधिश" असं म्हणायला हरकत नाही. ;)

अजून काही वाचायला जरूर आवडेल.

मुक्त विहारि's picture

25 Jun 2017 - 3:46 am | मुक्त विहारि

लेख आवडला...

ज्योति अळवणी's picture

25 Jun 2017 - 6:51 am | ज्योति अळवणी

चहा अजीबात आवडत नाही. कधीही नाही प्यायले.पण तुमचा लेख वाचून तुमच्या लेखनाची 'चाह'ती झाले. खरच खूपच छान.असच लिहा. वाचायला आवडेल

Ranapratap's picture

25 Jun 2017 - 10:26 am | Ranapratap

चहा एके चहा, चहा दुणे बशी, दुनिया झाली कशी या चणे हो. लेख आवडला.

संजय क्षीरसागर's picture

25 Jun 2017 - 6:39 pm | संजय क्षीरसागर

लगे रहो .

जेनी...'s picture

25 Jun 2017 - 6:49 pm | जेनी...

छान ...

चाणक्य's picture

26 Jun 2017 - 7:30 am | चाणक्य

मजा आली वाचताना.

चिनार's picture

26 Jun 2017 - 10:18 am | चिनार

मस्त लिहिलय !!

जगप्रवासी's picture

26 Jun 2017 - 2:29 pm | जगप्रवासी

मीपण तुमच्यासारखा चहा चा चहाता आहे. अगदी रात्री बेरात्री कधीही दिला तरी तय्यार.

आणि हो आमच्याकडे म्हण आहे "बाईच्या ओठाला आणि चहाच्या घोटाला नाही म्हणू नये."

गामा पैलवान's picture

26 Jun 2017 - 11:35 pm | गामा पैलवान

सरनौबत,

तुम्ही पक्के चहांबाज दिसता. लेख आवडला. निपुणचहा (अर्थत जपानी चहा) विषयी वाचायला आवडलं असतं. मात्र तिथे चहा पिणे हे धार्मिक कृत्य आहे. ते अतिशय गांभीर्याने, सन्मानपूर्वक आणि रीतीभाती पाळून केलं जातं. बहुधा एक स्वतंत्र लेख सहज होऊ शकेल. जमल्यास त्यावरही लिहा. धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

निमिष ध.'s picture

26 Jun 2017 - 11:37 pm | निमिष ध.

चहा हे अतिशय आवडते पेय. तुमचा लेख आवडला. पुण्यातल्या अमृततुल्यांची तुलना तर उत्तम. पण त्या जास्मीन आणि ग्रीन टी ची गम्मत तुम्हाला अजून कळली नाहीये असे वाटते.

सरनौबत's picture

27 Jun 2017 - 9:39 am | सरनौबत

खरंय तुमचं. पुन्हा एकदा हिम्मत केली पाहिजे जास्मिन चहा पिण्याची.

अभिदेश's picture

27 Jun 2017 - 12:42 am | अभिदेश

तुमच्या लेखाचा 'चहा'ता झालो आहे...

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2017 - 9:46 am | धर्मराजमुटके

मस्त लिहिलयं. आवडलं!

सिरुसेरि's picture

27 Jun 2017 - 10:20 am | सिरुसेरि

छान लिहिलय . त्रिवेणी , तुलसी , तिलक असे अनेक अमृततुल्य डोळ्यासमोर आले . कपाळाला गंध लाउन , खांद्यावर उपरणे वजा फडके ठेउन , स्पेशल बैठकीवर बसुन चहाकडे लक्ष ठेवणारे ते दुकानदार . चहा मुरल्यावर एका ओगराळ्याने पातेल्यामधुन किंचीत चहा हातात घेउन , त्याचा भुरका मारुन चहाची अमृततुल्य चव जमली आहे का हे पारखुन बघणारे ते लोकोत्तर दुकानदार कायम लक्षात राहतील .

सरनौबत's picture

27 Jun 2017 - 7:17 pm | सरनौबत

क्या बात हैं! अगदी हुबेहूब वर्णन केलंय. इतकं उत्तम की 'हमेशा तुमको चहा Part २ किंवा the Conclusion' असा अजून एक भाग लिहून तुमचं लिखाण समाविष्ट करावसं वाटतंय. अर्थात तुमची हरकत नसेल तर.

सुबोध खरे's picture

27 Jun 2017 - 10:34 am | सुबोध खरे

छान लेख

निनाद आचार्य's picture

27 Jun 2017 - 2:52 pm | निनाद आचार्य

अप्रतिम लिहिलय. खूप आवडल.

भीडस्त's picture

27 Jun 2017 - 5:24 pm | भीडस्त

एकदमच 'चहा'टळ लेख उकळलाय.....

मस्त लिहिलंय! हस्तकलापाशीच बॅंकेच्या दरवाजाजवळ जे अमृततुल्य आहे, तेही अहाहा आहे!

इडली डोसा's picture

28 Jun 2017 - 2:19 am | इडली डोसा

जिव्हाळ्याचा विषय,

मोगरा, शेवंतीचा वास चांगला म्हणून त्याचा चहा? 'च्या'यला! ज्या देशात चहाचा शोध लागला त्याच लोकांनी असं करावं ह्यापेक्षा दुर्दैव कुठलं? कटिंग चहा आणि फूल चहा माहिती होतं. पण फुलं घातलेला चहा 'Is not my Cup of Tea'! चहा कसा करायचा हे समजत नसल्याने देशाचं नाव 'चाय'ना पडलं असावं.

हा परिच्छेद तर कहर आहे

आता लगेच उठुन रोजचा 'रोज' चा पिऊन येते.

हा हा! नावात 'रोज' असलं तरी रोज प्यायला तर मजा नाही येत रोज ची :-)

आगाऊ म्हादया......'s picture

28 Jun 2017 - 6:57 am | आगाऊ म्हादया......

छान लिहिलंयत, मित्रांमध्ये चहा नको, मी फक्त कॉफी पितो असं म्हणणाऱ्याकडे मी केवळ भूतदयेने पाहत असतो.

Nitin Palkar's picture

28 Jun 2017 - 8:54 pm | Nitin Palkar

आपुलिया जातीचा भेटल्याची जाणीव झाली. ये दिल तुमको 'चहा'ने लागा!

ज्ञाना's picture

28 Jun 2017 - 9:45 pm | ज्ञाना

मस्त लिहिलंय. Tea Totaler आणि Not my cup of Tea वगैरे कोट्यांनी तर षटकार मारले आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jun 2017 - 1:04 am | डॉ सुहास म्हात्रे

तुमचा लेख व्हॉटसॅपवर फिरू लागला आहे हे तुम्हाला माहीत आहे का ?

हो.मला देखील ४-५ लोकांकडून आला. सुदैवाने माझं नाव काढून न टाकता तसाच्या-तसाच पाठवला होता.

__विक्रम__'s picture

29 Jun 2017 - 10:46 am | __विक्रम__

छान लिहिलंय !!

राघव's picture

29 Jun 2017 - 12:08 pm | राघव

कोट्याधीश सरनौबत असे म्हणण्यास हरकत नसावी! ;-)

बादवे, चहापत्तीची स्वपत्तीचव कायम ठेवून दुधाळ चहा कसा करायचा हे मला अजूनही शिकायचे आहे.
दूध आणि साखर घातली की छॅ: छॅ : छॅ: व्हायला होतं! यावर काही माहिती कुणी देवू शकेल काय?

सतिश गावडे's picture

29 Jun 2017 - 12:13 pm | सतिश गावडे

किती "चहा"टळपणा करावा माणसाने :)

एकविरा's picture

29 Jun 2017 - 12:22 pm | एकविरा

हम तुम्हें चहा ते है ऐसे
मरने वाला कोई जिदंगी चाहता है जैसे .
मस्त लेख . काय एकेक कोट्या आहेत. मलाही चहा नको म्हणणार्यांचि दयाच येते .आणि चहाला आल पहिजेच हे 100 टक्के खरय .

इतक्या लहान कपात चहा देतात कि 'चहा कपात' चा चुकीचा अर्थ त्यांनी लावला असावा बहुधा.

हाहाहा..
मस्त आहे लेख.. पुलेशु

कायरा's picture

29 Jun 2017 - 2:48 pm | कायरा

हमेशा तुमको चहा' ह्या गाण्याचा गर्भितार्थ देवदासच्या आई ने लक्षात घेतला नाही. नाहीतर तिने पारो ला टाकण्याऐवजी पोराला 'चहा टाकला'
व्वा व्वा काय जबरदस्त लिखाण!
लेख वाचताना पुलं. ची आठवण आली. पट्टीचे लिहीणारे.मजा आली वाचताना.

गामा पैलवान's picture

29 Jun 2017 - 6:41 pm | गामा पैलवान

जगप्रवासी,

मीपण तुमच्यासारखा चहा चा चहाता आहे. अगदी रात्री बेरात्री कधीही दिला तरी तय्यार.

अट्टल चहाबाज तर ऐन वैशाखाच्या रणरणत्या उन्हात डांबरी सडकेवरच्या टपरीत दुपारी एक वाजता देखील चहा प्यायला एका पायावर तय्यार असतो.

आ.न.,
-गा.पै.

अजया's picture

29 Jun 2017 - 10:26 pm | अजया

चहापुराण आवडलं !

आज दुपारी पासुन च ' हमेशा तुमको चहा चहा चहा...मुझको कॉफी कॉफी कॉफी' असलं कायतरी पिजे गाणं डोक्यात फिरत होतं,
२/३ लोक्काना म्हणुन दाखवुन बिचार्‍याना चावलो पण , :)
आणी इकडं आलो तर इकडं पण तेच, च्या' मारी काय चाललय काय आज :)
मी पण बेक्कार चहाबाज माणुस, पण दातांचा बाजार उठ्ल्यापासुन कमी केलाय.
चाहा तो बहुत न चाहे तुझे चाहत पे मगर कोई जोर नही....

रुपी's picture

30 Jun 2017 - 1:19 am | रुपी

मात्र चहात ‘आलंच’ नसेल तर हिरमोड होतो. >> अगदी खरं. त्या कारणामुळे मी कित्येकांकडे चहा घ्यायचा टाळते. जरा जास्त मोकळेपणाने सांगता येत असेल तर 'आलं घालणार असशील तर चहा घेईन' असंसुद्धा सांगते :) कमी गोड वाटला तर आणखी साखरसुद्धा मागून घेते. भारतात आपण बनवतो तो चहा 'कडक, मिठा, खुशबूदार' असा हवा असतो.. पण इतर प्रकारांमधला 'जस्मिन टी' एकदाच घेतला, पण मला फार आवडला. थंडीतल्या एके दिवशी थाई जेवण आणि त्या छोट्या छोट्या कपांत दिलेला जस्मिन टी भुरके मारत मारत गप्पांचा फड असा भारी जमला होता, की तो चहा भरपूर रिचवला!

वकील साहेब's picture

30 Jun 2017 - 1:22 pm | वकील साहेब

चहा उत्तम शिजला आहे. अगदी घोट घोट चवीने पिला. मजा आली. अप्रतिम पण तलफ काही गेली नाही अजून. यासाठी दुसरा भाग येऊ द्या. त्यात आपल्या चहा चे अजून एक भावंड ग्रीन टी पासून तर चहा वाला, त्यांचे प्रकार तेथील गप्पांचे अड्डे, लोकल मधल्या चहा वाल्याची आवाज देण्याची पद्धत, चहाचे स्थानकाल परत्वे बदलनारे दर, वैगरे वैगरे विषय पण येऊ द्या पु भा प्र

पैसा's picture

1 Jul 2017 - 10:40 am | पैसा

चहापुराण आवडले.

मयुरेश फडके's picture

2 Jul 2017 - 7:56 pm | मयुरेश फडके

मस्तच.

चिगो's picture

3 Jul 2017 - 6:08 pm | चिगो

अत्यंत खुमासदार शैलीत लिहीलेलं कोटीबाज चहापुराण आवडले.. आणखी येऊ द्या..

चौकटराजा's picture

4 Jul 2017 - 6:22 am | चौकटराजा

नव्या पिढीला जवळ जवळ माहीत नसणारा हा लेखन प्रकार इथे आणल्याबद्द्ल धन्यवाद. असे लेखन लिहायला एक विशिष्ट मिस्किल स्वभाव व त्याच बरोबर अत्यंत गंभीर निरिक्षण यांचा मिलाफ असावा लागतो. तो दिसत आहे. वा ! आता एक उणीव चहाची. बर्‍याच वर्षानी "तो" तिला अचानक भेटल्यास ते दोघे "समोरच्या" कॅफेत जाउन कॉफी घेतात चहा नाही. कारण प्रेम प्रकरणात कधी "चल चहा घेउ" असे म्हणायचे नसते. ती प्रतिष्ठा चहाला नाही. " चला चहा घेउ ! " हे वाक्य सचिवालयातच शोभून दिसते.

खरंय तुमचं. कॉफी ला जसं एक प्रकारचं 'रोमँटिक वलय' आहे ते चहा ला नाही. रोज चहा पीत असल्यामुळे बदल म्हणून कॉफी प्यावीशी वाटत असेल अश्या वेळी. शिवाय बरिस्ता वगैरे मध्ये जसं वातावरण असतं तसे 'टी लाऊंज' तितकेसे नाहीत. ते चालू झाल्यास चहा देखील आताच्या 'ओपन कॅटेगरी' मधून VIP कॅटेगरीत येऊ शकेल.

‘बायकांनी कुंकवाला आणि पुरुषांनी चहाला कधी नाही म्हणू नये’

‘बायकांनी कुंकवाच्या आणि पुरुषांनं चहाच्या घोटाला कधी नाही म्हणू नये’

‘बायकांनी कुंकवाच्या बोटाला* आणि पुरुषांनं चहाच्या घोटाला कधी नाही म्हणू नये’

नारायण नाड्कणि's picture

5 Jul 2017 - 11:25 am | नारायण नाड्कणि

चहा हा तसा आमचा आवडीचा.
चहाबद्दल सुंदर लघु लेखा बद्दल धन्यवाद. चहा चा उगम बहुदा ऑस्ट्रेलिया मध्ये झाला असावा.

विटेकर's picture

5 Jul 2017 - 11:29 am | विटेकर

आवडला !
खूप च छान पन्चेस ! उत्तम लेखन !
मी चहाबाज आहे पण मला चहाचे पथ्थ्य आहे .. विटुकाकूचा डोळा चुकवून मी कधी कधी चहा पितो. कधी कधी - जानेवारीच्या सरत्या दुपारी / एखद्या पावसाळी सकाळी तिला येते माझी दया . पण आता मी चहाला मुकलोच आहे !

- शनवारातला मोतीबागेच्या समोरचे अमृत घेतले आहे का कधी ? ह्लली मिसळवाले बेदेकर ही बरा चहा देतात.
- परदेशी प्रवासात चहा वर्ज्य करावा ... काल्या चहात गार ढोण चहा पिण्यापेक्षा काडेचिरईताचा काढा बरा !
- पुने - मुम्बईप्रवासात गाडी जिथे थांबते .. तिथे भंकस चहा मिळतो .. अगदी द्त्तचा चहा पण फालतू !
- पुण्याहून विट्याला जाताना विरन्गुळा चा चहा बरा असतो पण भय्न्कर महाग , त्यपेक्षा सातारा सोडताना घाटाच्या उतारावर एक ट्परी आहे , तिथला वडापाव आणि चहा बेष्ट !
- तसेच कराडचा पूल ओलांडण्यापूर्वी डाव्या बाजूला एका गाड्यावर मस्त चहा मिळतो !
- जोतिबाच्या डोनगरावर , मदिरात आत जाण्यापूर्वी एका गाड्यावर अफलातून चहा मिळतो
- केरळ मध्ये बम्बातले पाणी वापरुन बनवलेले चहा हाय्क्लास !
- तसेच बन्गाली बिनदुधाचा चहा मसाला घातलेला चहा - लैच भारी हा एकदा मी उत्तरेत सरहिन्द स्टेशन वर पिला होता.
- भटिण्दा मधे एक्दा खडा चम्मच दूध - मलई चहा घेतला होता .. अजून चव विसरलो नाही !

पण सगळ्यात सुन्दर .. मैय्याच्या किनारी चूल पेट्वून , गुळ घालून केलेला बिन दुधाचा चहा .. ज्या माऊलीला तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा पाहिले आहे आणि पुन्हा आयुष्यात पहाण्याची शक्यता नाही .. तिच्या सुग्रण हातानी बनवलेला आप्ल्याच स्तील्च्या ग्लासात पिलेला चहा ... साक्षात मैय्याचे दूध ते.. त्याला तोडच नाही !
-

विटेकर's picture

5 Jul 2017 - 11:33 am | विटेकर

अफाट शुद्धलेखनाच्या चुकांबद्दल !
खूप दिवसानी मिपावर लिहिले , हल्ली गुगल कळफलकाची सवय लागली आहे .. त्यामुळे इथे वेगात लिहिताना चुका होतात.
कृपया बाजार उठवू नये !

गामा पैलवान's picture

5 Jul 2017 - 11:43 am | गामा पैलवान

विटेकर,

तुम्हीसुद्धा गूगल वापरता तर! मला वाटलं की गौगल्याचं लौल्य केवळ मलाच जडलं आहे. :-)

आ.न.,
-गा.पै.

सरनौबत's picture

5 Jul 2017 - 4:08 pm | सरनौबत

अमूल्य माहितीबद्दल धन्यवाद विटेकर. सातारा, कराड, जोतिबा इथला चहा प्यायला आहे. दत्त चा देखील आवडत नाही. कमला नेहरू पार्क बाहेर छान मिळतो चहा. नळस्टॉप ला मनोज चा चहा चांगला आहे. मैया किनारी गुळाचा प्यायला नाही कधी.

नारायण नाड्कणि's picture

7 Jul 2017 - 7:49 am | नारायण नाड्कणि

नळस्टॉप ला कुथे.

सौन्दर्य's picture

8 Jul 2017 - 5:33 am | सौन्दर्य

अगदी चहासारखाच मस्त कडकडीत लेख. आवडला. मला कधीही चहा चालतो. झोपेतून उठल्यावर ते झोपायला जायच्या आधी, कधीही.