अनेक वर्ष मध्ये निघून गेली, डिग्री झालीं, स्थलांतर झाले, नोकरी लागली आणि मग लिहिण्यासाठी हात सळसळू लागले. इ.स.पू. मध्ये मी बिनविषारी सापांच्या लेखाची सुरवात धामणी वरील लेखाने केली होती, आता या लेखात इतर बिनविषारी सापांबद्दल बोलतो.
साधारणतः लोकासाठी कुठला पण साप "विषारीच" असतो आणि तो मारलाच पाहिजे असे विचार असतात. खरे म्हणजे जवळपास ८०% साप बिनविषारी आहेत. अगदी आपल्या आख्या (पुणे) शहरी आयुष्यात सारसबाग गणपतीच्या आरती मध्ये इखादी मुलगी वळून आपल्या कडे बघेल किंवा कुलकर्णी पंपावर पेट्रोलच्या रांगेत पेठीय मुलगी वळून हसेल पण आख्या आयुष्यात एक विषारी साप दिसणार नाही.
पुणे शहरात ४ विषारी (नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे) सोडले तर सगळे बिनविषारी आहेत असे बोलायला काही हरकत नाही. कधी कधी बाहेरचा (विषारी ) एखादा काळा नाग (ब्ल्याक कोब्रा, मुक्काम पोस्ट राजेस्थान) भाजीच्या ट्रक बरोबर हीच-हैकिंग करत मार्केट यार्ड मध्ये येतो, पण हे प्रमाण फार कमी.
अण्णांचे (निलीमकुमार खैरे) तुम्ही "भारतीय साप" हे पुस्तक बघितले तर ही भली मोठी यादी सापडेल बिनविषारी सापांची- धामण, गवत्या, इरोळा,अजगर, कवड्या, तस्कर इ.
निसर्गाने यांना भक्ष मारायला विषाचे अस्त्र दिले नाही पण बाकीची अनेक अस्त्रे दिली - हुसेन बोल्ट सारखी एखादी धामण सळकन आपल्या डोळ्यासमोरून कलटी मारेल, पण तुम्हाला समजणार पण नाही, मैत्रिणीला द्यायला रातराणीचे डहाळी काढताना डोळ्यासमोर हरणटोळ असेल पण दिसंणार नाही, सरळसोट भिंती वरून चढून टूबलाईट च्या मागून उलटा लटकून कवड्या साप पाल पकडेल आणि तुम्ही बघत राहाल; असे अनेक काही..
विषारी साप स्वरक्षणार्थ प्रथम "खर्ज" लावतात, तसे साधारणपणे (धामण कधी कधी आवाज काढते.)बिनविषारी साप करत नाहीत. त्यांची सगळी मदार लपून बसण्यावर आणि नंतर पटकन कल्टी मारण्यावर ! आम्ही मित्र टल्ली झाल्यावर माझ्या घरात रात्री १२ नंतर लपाछपी खेळायचो तेंव्हा "आधीच रात्र त्यातून मद्य प्याला!" अशी अवस्था असताना लपलेल्या मित्रांना शोधताना वाट लागायची. तीच परिस्थिती माझी पूर्ण शुद्धीत असताना दिवसाढवळ्या गवत्या (grass snake ) साप लोकांच्या बागेत पकडताना व्हायची. "आत्ताच तर इकडे होता !" हे वाक्य मी त्यावेळी कमीत कमी हजार वेळा तरी ऐकले असेल.
गवत्या साप (grass स्नेक ).
एकदा मुकुंदनगर (स्वारगेट) मधून संध्यकाळी कॉल आला. सुबक सुंदर बैठे घर होते. हॉलच्या शोकेस मध्ये रुखवत मांडून ठेवले होते, व्हिडीओकॉनचा टीव्ही होता, भिंतीवर निसर्गचित्रे होती. मी घरात जाताच "शोकेस मध्ये साप शिरताना बघितला!" ही माहिती मिळाली. मी आपला सावधानीने शोकेस बाजूला केला, शोकेस मध्ये सगळ्या वस्तू जागच्या जागी होत्या. टीव्ही सरकवला, वायर चे जाळे, (त्यात अडकलेले केसांचे गुंते) बाजूला केले. पण तरी सापाचा पत्ता नाही. मग हळू च शोकेस मध्ये डोके घातले, हळू हळू करत अर्धे शोकेस खाली काढले. जसा सावंतवाडीच्या (लाकडाच्या) केळ्याचा उचलला तसा सरकन "तस्कर" (Trinket) साप बाहेर पडला. पटकन त्याला पोत्यात घातला.
तस्कर साप (Trinket Snake).
तस्कर हा सुंदर आणि शांत साप. (एवढा शांत की हिवाळ्यात एकदा पिशवी नसताना, विंटर ज्याकेट आणि शर्ट च्या मध्ये टाकून सर्पोद्यान ला घेऊन गेलो होतो.)घरात पाली, उंदीर खायला हा तस्कर बिनधास्त शिरतो (म्हणूनच तस्कर नाव पडले असावे!). उशीचा अभ्रा, पितळ्याची कळशी,जुनी गोधडी, टांगून ठेवलेली झाडे, पडद्याचे रॉड, उंबरठ्याचे पाणी जायचे भोक,धोब्याला द्यायचे कपडे या त्याच्या आवडीच्या जागा असाव्यात, मला तरी तिकडे तो सापडला आहे. तस्कर शांत असला तरी जेंव्हा चिडतो तेंव्हा "कहानी"मधल्या शेवटच्या शॉटमधली विद्या बालन डोळ्यासमोर उभी करतो.
चिडलेला तस्कर साप !
गरवारेला असताना अलकाला पहिल्यांदा spiderman सिनेमा पहिला तेंव्हा पासून विचार करत होतो की हा भाऊ भिंतीवर चढतो कसा ? म्हणजे विचार करा, चिटकून पण राहायचे आणि नंतर उडी पण मारायची, मी तर कधी कधी हे सपाट जमिनीवर पण करू शकत नाही. हे spiderman ला शक्य आहे फक्त "van der Waal फोर्समुळे. घरातली पाल सरकन भिंतीवर जाते आणि टूबच्या मागून येऊन किडे पकडते, काय नजाकत असते. तिच्या पायावरचे खूप बारीक केसांतील घडामोडीमुळे +ve आणि -ve चार्जेस खूप जास्त प्रमाणात तयार होतात आणि त्याचा परिणाम म्हणजे नेट attractive फोर्स (van der Waal) तयार होऊन पाल भिंतीला चिकटते. पण तीच पाल, उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात धपकन लग्नकार्याच्या स्वयंपाकत पडते. कारण म्हणजे उन्हाळ्यातल्या खूप कमी (dry) आणि पावसाळ्यातल्या जास्त (वेट) humidity मुळे हा फोर्स कमकुवत होतो. त्यामुळे हिवाळ्यात बर्फावर जसा मी काही कळायच्या आत साष्टांग नमस्कार घालतो त्याच पद्धतीने पाल वरून खाली पडते. असो.
मुद्दा असा की, कवड्या सापाचे आवडते जेवण म्हणजे पाल, त्याला ते मिळवण्यासाठी निसर्गाने भिंती वर, उभ्या कातळावर चढायचे वरदान दिले आहे. कवड्याला अंगावर केस नसतात त्यामुळे बहुतेक त्याच्या त्वचेवरचे छोटे छोटे खवले van der Waal फोर्स तयार करतात. हा छोटा आणि बारीक साप सरसर भिंतीवर चढून पाली पकडतो. ज्यांनी कोणी पुलप्स मारल्या असतील त्यांना माहित असेलच की जसे वय आणि वजन वाढत जाते तश्या पुलप्स मारताना हालत खराब होते, काही करून बॉडी बारच्या वरती जातच नाही. न्यूटनची गुरुत्वाकर्षण प्रत्येक क्षणाला 'मी' म्हणत असते. पण हेच गुरुत्वाकर्षण "कवड्या" सापापुढे सपशेल हार मानते.
रात्री 9 च्या सुमाराला तळजाई वस्ती मध्ये मी शिरलो. कमीत कमी ५०-१०० लोक घराबाहेर उभी होती. दोनमजली, पत्रा आणि सिमेंट ची झोपडी होते. कालवणाचा वास पत्र्याच्या घरात भरून राहिला होता. गृहिणी समोर आली (बाप्या ताईट होऊन पडला असणार!), 'कपाटाच्या वरती, पत्रा आणि तुळईच्या ग्याप मध्ये साप गेला..' अशी माहिती समजली. कपाटाच्या एका पायाच्या जागी विटा लावल्यामुळे कपाटावर चढणे शक्य नव्हते. म्हणून पत्र्याच्या पलंगावर डालद्याचे डबे ठेवून मी उभा राहिलो. तोंडात टोर्च, एका हातात स्नेक स्टिक आणि एका हाताने पत्रा टारझन सारखा ढकलायचा प्रयत्न करत होतो. ती सर्कस बघून एक माणूस मदतीला आला, स्वतः डालड्याच्या डब्यावर उभा राहिला."तुमी साप धरा, म्या पत्रा ढोसकतो, तळजाई वर लई मोठे नाग धरले आहेत आपण!" असे म्हणत तो पत्रा ढकलायला लागला. मला काही कळायच्या आतच तो पत्र्याला हेडिंग (फुटबॉलमधले) करायला लागला. एक पहिल्या धारेचा ethanol molecule माणसाची काय अवस्था करू शकतो हे अनुभवत होतो. एवढ्यात तुळई मागून शेपटी बाहेर आली, कवड्या दिसताच हात घालून मी त्याला पकडले. हा साप "मी थोडा लवकर वैतागणार" प्रकारातील असल्यामुळे त्याने माझ्या हातावर स्टेपलरच्या पिना मारव्या तसे दात लावायला चालू केली, लवकरच त्याला त्याची चूक उमगली असावी, मग गप्प बसला. मी त्याला पोत्यात घातले आणि डब्यावरून खाली उतरलो.
कवड्या सापांची विविधता !
आता समजा या बिनविषारी सापांनी चपळतेने आणि लपूनछपून उंदीर पकडलाच, तर तो उंदीर काय शांत राहणार आहे का ? मला पहिल्यांदा महाराष्ट्र मंडळाच्या स्विमिंग टयांक मध्ये टाकल्यावर जसा मी जीव खाऊन हात-पाय मारले होते, तसाच तो उंदीर वागतो. निसर्गाने सापाला त्या उंदराला तोंडात पकडून ठेवायची पण सोय दिली आहे, सगळ्या बिनविषारी सापांचे दात मासे पकडायच्या गळासारखे आतल्या बाजूला वळलेले असतात. त्यामुळे उंदीर जेवढी जास्त धडपड करतो तेवढा जास्त अडकून बसतो. पाण्यातले साप - दिवड (देंडू ,इरोळा )तर फिशिंगच करतात, (फक्त ते गळ टाकून,बियरची बाटली बाजूला घेऊन ते तासंतास बसत नाहीत.) त्यासाठी त्यांच्या तोंडात या अणुकुचीदार दातांची रांगच असते, मासा पकडताच तो या दातात अडकून बसतो, आणि मग त्याला सावकाश गिळून ढेकर देतात. आधीच्या लेखात लिहिल्याप्रमाणे मी कॉलला कुठलापण साप चावून न घेण्याची काळजी घ्यायचो. कारण बिनविषारी साप जरी चावला तरी लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरायची शक्यता खूप जास्त असते. पण देंडूच्या कॉलला ते खूप अवघड असायचे, त्याला उचलला की धरला माझा हात ! डासांनंतर जर कोणी माझे रक्त काढले असेल तर या सापाने, म्हणा त्यांची पण काही चूक नाही, पाण्यातले आयुष्यच अनिश्चिततेचे !
पाण-साप इरोळा किंवा देंडू (Checkered keelback)
दुपारची वेळ होती मी सर्पोद्यान मधले देंडूचे पिट (ज्यामध्ये ३०-४० देंडू हे पाण-साप असायचे.) साफ करायला निघालो होतो. त्या पिट मध्ये अर्ध्याफुट खोलीचा साधारण ६ बाय ६ चा पाण्याने भरलेला खड्डा होता आणि त्यामध्ये झाडाचे बुंधे (सापांना लपायला)ठेवले होते. एक नवीन कार्यकर्ती माझ्या बरोबर पिट मध्ये उतरली, बिनविषारी साप असल्यामुळे मी पण जास्त लोड घेतला नाही. मुलगी पिट मध्ये बघून, पिट चा TRP एकदम वाढला, खूप पब्लिक जमले. मी आपला सुफळीने पाणी काढून बादली मध्ये भरत होतो आणि ती पाण्यात पडलेला कचरा बादलीत टाकत होती. एका बाजूने पाणी काढत काढत मी ओंडक्यापाशी पोचलो आणि नेहमीच्या सवयीने मी ओंडका उचलला.... १५-२० देंडू सटासंट पिट मध्ये पांगले, ४-५ ओंडक्यावर लटकले आणि एका -दोघांनी माझा एक हात दातांनी (आधारासाठी!) पकडला. मला याची पूर्ण कल्पना आणि सवय होती. पण दुसरयाच क्षणी माझा दुसरा हात आणि खांदा त्या कार्यकर्तीने तिला भोवळ आली म्हणून पकडला. आत्ता मात्र माझी परिस्थीती बिकट झाली, एका हातावर हात देंडू साप आणि दुसऱ्यात ती आणि पिट च्या बाजूला पब्लिक...! तसेच ते देंडू एका हातात घेऊन (जो पर्यंत ते सोडत नाहीत तो पर्यंत त्यांना काढता येत नाही आणि ओढले तर त्यांचे उलटे दात मासं ओरबाडून काढतात.) तिला पिटच्या कडेवर बसवले आणि नंतर बाकीचे पिट साफ केले.
देंडूने मासा पकडला आहे.
पोटभरल्या नंतर वेळ येते ती आत्मसंरक्षणाची, बिनविषारी सापांचे घार गरुड, मोर, मुंगुस इ.असे छोटे शत्रू आणि सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे माणूस! नाही म्हणले तरी विषारी सापाशी साधारण करून नडायला कोणी जात नाही; नागाचा फणा, घोणासाची शिट्टी भल्याभल्यांची झोप उडवते. याचा बहुतेक निसर्गाला अंदाज असावा म्हणून त्याने काही बिनविषारी सापांना हुबेहूब विषारी सापांसारखे बनवले.त्यामुळे बिनविषारी साप समजून इझी फूड म्हणून किंवा इझी स्टंट कोणी सापाशी नडला तर तो विषारी साप निघू शकतो आणि चूक महागात पडू शकते. हे इतके सहज होते की पुण्यात स्कूटीवरच्या (स्कार्फ घातलेल्या) मुलीला आपण हूल द्यावी आणि ती आपली गर्लफ्रेंडच निघावी..!(त्यामुळे आपल्या गर्ल फ्रेंडचे 'शूज' नेहमी लक्षात ठेवावेत, नंतर वाईट वेळ येणार नाही.)
वरचा साप बिनविषारी भारतीय अजगर साप तर खालचा विषारी घोणस साप.
साप पकडताना नवख्यांचे अपघात याच नजरचुकीतून होतात, अजगराचे पिल्लू (बिनविषारी) समजून हात घालावा तर घोणस (विषारी) निघावा, मांजरया (बिनविषारी) समजून खेळवावे तर फुरस्याने (विषारी) प्रसाद द्यावा. त्यामुळेच एक वेळ मी पुणे युनिव्हर्सिटी च्या अभियांत्रिकीच्या पेपर मध्ये प्रश्न न वाचता उत्तर लिहिले असेल पण साप ओळखल्या शिवाय कधीच सापाला हात घातला नाही. एडिसनच्या (ज्याने शोध चोरून छापला तो ! ) बल्ब च्या प्रकाशत दिसणारा कवड्या (बिनविषारी) साप हा हेन्री वुडवर्डच्या टूब लाईट मध्ये मण्यार (विषारी) पण असू शकतो.
वरचा साप बिनविषारी कवड्या साप तर खालचा विषारी मण्यार साप.
विषारी-बिनविषारी सापांमधील फरक कसे ओळखायचे कसे हा या लेखाचा विषय नाही (आणि मला अजून गैरसमजुती वाढवायच्या पण नाहीत ..) म्हणून मी इकडेच थांबतो. मी एवढेच सांगीन की "कुठला पण साप दिसला तर चार हात दूरच राहा, आपले आयुष्य, हात, पाय आणि बोटं ही एकदाच मिळतात."
याच सगळ्या क्लुप्त्या वापरून या सगळ्या सापांनी निसर्गाला लाखो वर्ष तोंड दिले आहे पण आत्ता माणसापुढे त्यांचे जास्त काही चालत नाही. म्हणूनच आपण तरी (विषारी-बिनविषारी) सापांचा आदर करूयात आणि लाखो वर्षांची अन्नसाखळी जपून ठेवूयात !
साप दिसल्यावर काय कराल ?
कात्रज सर्पोद्यानला (किंवा सर्पमित्राला) फोन करा. - ०२०-२४३७०७४७
सापांबद्दल माहितीची उत्कृष्ट पुस्तके - "भारतीय साप - निलीमकुमार खैरे", Snakes of India: The Field Guide - Romulus Whitaker & Captain Ashok.
आत्ता पर्यंत १४ लेखांची ही लेखमाला लिहिताना मिपाकरांच्या प्रतिसादामुळे लिहिताना खूप मजा आली. मध्ये काही लेख लिहायला माझ्या शिक्षणामुळे खूप वेळ गेला पण आत्ता नियमित लिखाण चालू ठेवीन. चियर्स !
(या लेखातले सर्व फोटो अंतरजालावरून कडून घेतले आहेत.त्यांना कुठल्या पद्धतीने बदलण्यात आले नाही.)
प्रतिक्रिया
31 May 2017 - 10:25 am | सुबोध खरे
पुण्यात स्कूटीवरच्या (स्कार्फ घातलेल्या) मुलीला आपण हूल द्यावी आणि ती आपली गर्लफ्रेंडच निघावी
हे लैच भारी हाय
स्वानुभव दिसतोय ((===))
बाकी लेख सुंदर
31 May 2017 - 10:34 am | जॅक डनियल्स
धन्यवाद् ! गोंधळ खूप वेळा झाला आहे.
31 May 2017 - 10:27 am | एस
समाप्त?????? इ नॉ चॉलबे! पुभाप्र.
31 May 2017 - 10:35 am | जॅक डनियल्स
नवीन विषयवार लिखाण करायचे ठरवले आहे.
31 May 2017 - 10:31 am | अनुप ढेरे
मस्तं!
31 May 2017 - 10:43 am | आदूबाळ
ये कहां से आया!!
वेलकम बॅक टोपलीवाल्या ;) . लिहीत रहा!
देंडूच्या खड्ड्यातला प्रसंग डोळ्यांसमोर येऊन बेकार हसलो. मी असतो तिथे तर करण अर्जुनचं मुजीक वाजवलं असतं.
31 May 2017 - 11:27 am | अद्द्या
नेहमीप्रमाणेच .. जबरदस्त लेख .. आणि तेवढीच मस्त शैली .. देंडूवाला प्रसंग तर अतीच भारी .. अजुनी लेख येउद्या
31 May 2017 - 11:39 am | खेडूत
माहिती अन मनोरंजनाने भरलेली लेखमाला सलीम जावेदच्या पिच्चरपेक्षा अनेकपटीने थरारक होती. धन्यवाद!!
जुने संदर्भ विसरल्याने आता पुन: पहिल्यापासून वाचणार.
.
आता नवा विषय घेऊन लवकर दाखल व्हा!
31 May 2017 - 12:45 pm | शलभ
खूपच माहितीपूर्ण मालिका..तुमची लेखनशैली पण मस्त आहे.
31 May 2017 - 1:05 pm | मोदक
झक्कास लेखमाला.. अनेक नवीन नवीन गोष्टी कळाल्या. पुढील लेखमालेच्या प्रतिक्षेत.
31 May 2017 - 2:13 pm | टवाळ कार्टा
भन्नाट
31 May 2017 - 2:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
खुसखुशीत आणि महत्वपूर्ण माहितीने भरलेली लेखमाला. आता मोकळे झाला आहात तर बोलल्याप्रमाणे खरेच नियमीत्पणे लिहित जा. इथे तुमचे अनेक चाहते आहेत. पुलेप्र.
1 Jun 2017 - 6:55 am | जॅक डनियल्स
हो काका, आत्ता नियमित लिहित जाईन. धन्यवाद !
31 May 2017 - 3:11 pm | अत्रुप्त आत्मा
सल्लाम! जबराट मनोरंजक माहितीपट.
31 May 2017 - 3:25 pm | चिनार
जबरदस्त लेखमाला भाऊ !!
अजून लिहा...
31 May 2017 - 5:00 pm | लाडू
छान होती लेखमाला . पुढच्या लेखमालेच्या प्रतिक्षेत
31 May 2017 - 5:07 pm | सिरुसेरि
छान लेखमाला . +१००
31 May 2017 - 5:48 pm | सतीश कुडतरकर
छान लेखमाला
31 May 2017 - 7:59 pm | यशोधरा
अख्खी लेखमालिकाच सुरेख झाली. धन्यवाद.
31 May 2017 - 8:14 pm | वरुण मोहिते
विषय कुठलापण असो आपली शैली मस्त आहे .
31 May 2017 - 8:40 pm | मयुरा गुप्ते
देंडुचा टीआरपी वाचुन फिसकन हसले.. बाकि सर्व माहिती मस्तच.
केव्हढे सारखे दिसतात विषारी आणि बिनविषारी साप. खरोखर निसर्गाची किमया.
आमच्या इथे ही बरेच साप व त्यांची पिलावळ दिसते साधारण त्यांच्या विणीची हंगामात. पण अवघ्या ४-५ सेकंदाच्या धामधुमीत समजायचे कसे हा मोठा प्रश्न आहे..म्हणुन पहिल्या रिअॅक्शन मध्ये मारण्याकडे कल असतो हे ही तितकेच खरे.
--मयुरा.
1 Jun 2017 - 6:58 am | जॅक डनियल्स
धन्यवाद् !
तुम्ही जे करत आहात तेच करत राहा, परिस्थिती बघून जमले तर कधी तरी सर्पमित्राला बोलवून बघा.
साधारण पणे कात्रज सर्पोद्यान कडे महाराष्ट्रातील (देशातील ) सर्पमित्रांचे नंबर असतात.
1 Jun 2017 - 1:24 am | अमितदादा
उत्तम लेख....एका हून एक भारी पंचेस आहेत.
प्राणी आणि van der Waal फोर्स बद्दलची माहिती प्रथमच कळली, अधिक माहिती घेतली असता पाली बाबत हे संशोधनाने सिद्ध झाले आहे परंतु सापाबाबत अशी माहिती आढळत नाही, दुवा असेल तर अधिक माहिती वाचाय आवडेल कुहुतुल म्हणून. खालील दुव्यात थोड वेगळ कारण आहे.
दुवा
तुमची लेखन शैली भारी आहे , लिहित राहा..
1 Jun 2017 - 7:29 am | जॅक डनियल्स
तुमचा मुद्दा बरोबर आहे, लेख दिल्या बद्दल धन्यवाद् !
मला पाली बद्दल आणि कोळ्याबद्दल चे संशोधन गुगल स्कॉलर वर सापडले पण सापांबद्दल काही सापडले नाही. तुमच्या लेखात दिल्याप्रमाणे साप मणके लॉक करत वरती चढतो. त्या बरोबर त्याच्या त्वचेचा van der Waal फोर्स पण मदत करत असेल असे मला वाटले म्हणून मी उदाहरण दिले आहे. हे मणके लॉक होण्याचे मी सगळ्यात जास्त पाईप मधला साप बाहेर काढताना अनुभवले आहे. लाकडात स्क्रू फिरवावा तसा साप पाईप मध्ये स्वःताला लॉक करून घेतो, आणि मग शेपटीला ढील देऊन देऊन त्याला काढावे लागते. आणि कधी कधी शेपटी धरून तासंतास बसावे लागते.
1 Jun 2017 - 3:03 am | प्रीत-मोहर
जेडी ते समाप्त काढुन टाक बाबा. काही लेखमाला ह्या सतत कधीच पुर्ण होऊ नये, अधिकाधिक वाचत राहता यावं या क्याटेगरीतल्या असतात आणि ही त्या क्याटेगरीतली अाहे.
ह्या नितांत सुंदर लेखमालेसाठी खूप जास्त धन्यवाद.
1 Jun 2017 - 11:22 am | सानझरी
भन्नाट लिहीलंय..!!
1 Jun 2017 - 12:13 pm | अभिजित कुमावत
तुझी साप या विषयातली आवड पहिल्यापासून बघितली आहे. अजूनही आवड जोपासून लोकांना माहिती देतो आहेस भारी...!!! लेख छान लिहिला आहेस...
1 Jun 2017 - 4:17 pm | अप्पा जोगळेकर
छानच.
1 Jun 2017 - 5:35 pm | किसन शिंदे
लेख आणि लेखमाला दोन्ही झक्कास !!
राजगडावर पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा संजीवनी माचीवर सुरूवातीच्या टप्प्यात एक काळा साप दुसर्या करड्या रंगांच्या सापाला गिळताना पाहीला होता. हे दोन्ही साप अतिशय लहान होते. तो काळा साप ब्लॅक कोब्रा असावा का? कारण ऑस्टीन स्टीव्हनच्या कार्यक्रमात दुसरे सापच (मग ते कितीही विषारी असोत) कोब्राचे अन्न असते.
2 Jun 2017 - 7:51 am | जॅक डनियल्स
धन्यवाद् !
तुमच्या वर्णनानुसार काळा साप - मण्यार असावी आणि करडा साप - धामण, नाग , धूळ नागीण (बिन विषारी), कवड्या इ. मधले कुठले पण भक्ष असू शकते. भारतात साधारण पणे फक्त मण्यार आणि किंग कोब्रा (राज नाग) हे इतर साप खातात. कधी कधी अपवादामुळे (अन्नाच्या तुटवड्याने) दुसरे साप पण इतर सापांना खाऊ शकतात.
माझा हा लेख वाचा त्यामध्ये मी मण्यार बद्दल लिहिले आहे -
एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार !
1 Jun 2017 - 8:18 pm | सूड
लिहीत राहा, तुमचं नाव बघून धागा उघडला. नवीन लेखमालेसाठी शुभेच्छा!!
1 Jun 2017 - 8:35 pm | असंका
फारच सुरेख!
धन्यवाद...!!
1 Jun 2017 - 9:14 pm | पैसा
नेहमीप्रमाणे भन्नाट लेख!
1 Jun 2017 - 10:37 pm | रामपुरी
बरीच नविन माहीती मिळाली.
धन्यवाद
2 Jun 2017 - 10:36 am | नि३सोलपुरकर
नितांत सुंदर लेखमालेसाठी खूप खूप धन्यवाद.
2 Jun 2017 - 1:52 pm | चिगो
वेलकम बॅक, जेडी.. सुरेख लेखमाला.. ह्या मालिकेची प्रिंट काढून घरात ठेवावी, इतकी मस्त जमली आहे..
3 Jun 2017 - 3:29 am | निशाचर
माहितीपूर्ण, पण तितकंच भन्नाट लिहिलंय तुम्ही. प्रवासात असल्याने सगळे लेख गेल्या दोन दिवसांत वाचून काढले. अजून गारूड उतरलं नाही.
5 Jun 2017 - 9:11 pm | मुक्त विहारि
सापां विषयी सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद....
वाखूसा .....
7 Jun 2017 - 4:49 pm | अजया
नाव बघून लेख वाचायला घेतला. मुरलेल्या वाइनसारखा आधीच्या लेखांपेक्षाही जबरदस्त निघाला :)
आमच्या अंगणात मागे एक साप फिरतोय तो कवड्या आहे अशी समजूत करुन घेतली आहे. बाकी आम्ही एकमेकांच्या नादी लागत नाही आहोत. सर्पमित्र जवळच राहतोय. त्यामुळे बरे चाललेय आमचे आणि सापाचे. पण रात्री मात्र गाडी लावताना सर्रकन जातो तेव्हा धडधडतेच.
8 Jun 2017 - 8:49 am | माझीही शॅम्पेन
मिपाच्या इतिहासातील सर्वात अप्रतिम लेखमला __/\__
स्टॅंडिंग ओवेशन !!!
आता इतर प्राण्यांकडे मोर्चा वाळवा की :) बाकी ठाण्यात तुम्हाला भेटता आल नाही !!!
8 Jun 2017 - 10:03 am | अत्रे
आत्ताच या लेखमालेतील पहिला लेख वाचला. बाकीचे वाचत आहे. मस्त!
वरती मूळ लेखात दिलेले फोटू दिसत नाहीयेत.
12 Jun 2017 - 5:04 pm | स्मिता चौगुले
खूप छान लेखमाला, पहिल्यापासून वाचत आहे . आवडली
पुलेशु
12 Jun 2017 - 5:57 pm | Nitin Palkar
अतिशय सुंदर लेख! 'एडिसनच्या (ज्याने शोध चोरून छापला तो ! ' याचा अर्थ कळला नाही....
पुलेशु.
13 Jun 2017 - 7:12 am | जॅक डनियल्स
ज्याने शोध चोरून छापला तो ! - एडिसन ने बल्ब चा शोध लावला नाही..फक्त पैसा असल्यामुळे पेटंट घेऊन त्याची खूप न्यूयोर्क च्या श्रीमंत लोकांमध्ये प्रसिद्धी केली. त्यामुळे सगळ्या जगात त्यानेच बल्ब चा शोध लावला अशी समजूत आहे.
13 Jun 2017 - 12:14 am | रुपी
मस्त.. फार सुंदर लेखमाला. मिपावरच्या सर्वोत्कृष्ट लेखमालांपैकी एक!
सर्व भाग अगदी मन लावून वाचलेच, शिवाय प्रतिसादांमधले प्रश्न आणि उत्तरेही वाचून बरीच माहिती मिळाली, त्यामुळे सगळे प्रतिसादसुद्धा वाचले.
या लेखमालेसाठी धन्यवाद!
13 Jun 2017 - 12:18 am | रातराणी
माझ्या मिपातिहासात पहिल्यांदा धाग्यातले फोटो दिसले नसते तर बरं झालं असतं असं वाटलं :(
तुमच्या पायांचा एक फोटो द्या. रोज नमस्कार करून सापांची भीती जाते का बघते ;)
13 Jun 2017 - 11:25 pm | इष्टुर फाकडा
कोणत्या वयात प्यायला सुरुवात केलीत? ;)
14 Jun 2017 - 6:08 am | जॅक डनियल्स
लपाछपी खेळायला वयाची कालमर्यादा नाही, त्यामुळे मोठे असताना पण २४-२५ वर्षाचे असताना पण हा प्रकार केला आहे :).
14 Jun 2017 - 4:30 pm | सस्नेह
आम्हाला सगळे साप सारखेच ! विषारी की बिनविषारी हा विचार करायला बुद्धी थाऱ्यावर राहिली तर ना ! :)
बाकी या अफाट मालिकेसाठी शतश: धन्यवाद !
27 Jun 2017 - 3:57 pm | धर्मराजमुटके
छान लेखमाला ! मिपावर यावे ते याच करिता !
27 Jun 2017 - 5:04 pm | स्वराजित
मिपाच्या इतिहासातील सर्वात अप्रतिम लेखमला __/\__
स्टॅंडिंग ओवेशन !!!
आता इतर प्राण्यांकडे मोर्चा वाळवा की
+११११११११
27 Jun 2017 - 7:36 pm | सरनौबत
माहितीपूर्ण असूनदेखील अतिशय मनोरंजक. लेखनशैली मस्तंय. सगळ्या लेखमालेची एखादी साप-सीडी काढा.
27 Jun 2017 - 7:57 pm | दुर्गविहारी
थोडा उशिरा प्रतिसाद देत आहे, तुम्ही धाग्यात काही विषारी आणि बिनविषारी सापांची उदाहरणे दिली आहेत. मी त्यात थोडी भर घालतो.
गवत्या साप जो बिनविषारी असतो (Grass Snake )
त्याचाच हा विषारी भाईबंद अर्थात चापडा ( Pit Viper )
त्याच प्रकारे सह्याद्रीत बर्याचदा दिसणारा कॄष्णशीर्ष (Dumeril's Black Headed Snake )
त्याच्यासारखा दिसणारा शेपटीचा आठ आकडा करणारा पोवळा किंवा Slendar Coral Snake
हा एकेरी किंवा File Snake
त्याच्या डेंजर डमी समुद्री सर्प (Sea Snake )
हा चट्टेरी पट्टेरी बाज ल्यालेला कुकरी (Kukri Snake )
तर दुर्मिळ असणारा पट्टेरी मण्यार किंवा आगी मण्यार ( Banded Krait )
या खेरीज मी लोणावळ्याजवळच्या तुंग किल्ल्याच्या ट्रेकला धुसळखांबवरुन तुंगवाडीकडे निघालो होतो. वाटेत हा साप दिसला. त्यावेळी ओळख नव्हती म्हणून काठीने शांतपणे बाजुच्या झाडीत सोडला. आल्यानंतर पुस्तकात माहिती शोधली तेव्हा कळले हा "खापरखवल्या"( Shieldtail Snake) साप आहे, हा बिनविषारी तर असतोच पण बराच दुर्मीळ्ही झालाय.
सर्पासंबधी एक उत्कृष्ट पुस्तक माझ्या कडे आहे. सर्पमित्र ज्ञानेश्वर म्हात्रे ( संपर्क क्रं. ९४२२३८२१३६) यांनी लिहीलेल पुर्णपणे आर्ट पेपरवर छापलेले आणि उत्तम छायाचित्र आणि माहितीने भरलेल आणि अल्प किंमतीत उपलब्ध असलेल पुस्तक ज्याना या विषयात रुची आहे त्यांनी जरुर खरेदी करावे असे मी सुचवेन.
तसेच www.indiansnakes.org हि वेबसाईटही भारतीय सांपासंदर्भात चांगली माहिती देते.
27 Jun 2017 - 10:29 pm | दशानन
अतिशय उत्तम व माहितीपूर्ण प्रतिसाद, आभारी आहे.
27 Jun 2017 - 11:14 pm | अत्रुप्त आत्मा
प्लस वन टू दशानन.
30 Jun 2017 - 7:01 am | जॅक डनियल्स
धन्यवाद् ! फोटो मस्त आहेत. मी ज्ञानेश्वर म्हात्रेना भेटलो आहे. ते सर्पोद्यान मध्ये नेहमी यायचे. त्यांचे पुस्तक खूप चांगले आहे. तसेच त्यांचे स्वअनुभवावरचे एक पुस्तक आहे ते पण खूप चांगले आहे.
3 Jul 2017 - 4:15 pm | मनराव
खुप दिवस लागले पुर्ण व्हायला......
7 Jul 2017 - 10:06 pm | मयुरा गुप्ते
जुन जुलै मध्ये टेक्सास चा उन्हाळा चांगलाच जाणवायला लागतो. आधिच कोरड्या हवेत उष्मा वाढला कि जमिनीतुनही वाफा येतायत्स वाटतं. आमच्या घराजवळ पुर्वीची मोठ मोठाली रँचेस असलेली जमिन, खरतरं वन्य प्राण्यांची जागा. उन्हाळा चालु झाला कि आपापले अस्तित्व दाखवायला लागतातच.
काल दोन एक फुटभर लांबीचे साप निघाले. एक ड्राईव्हे वर होता, व दुसरा फुलझाडां मध्ये. बारिक बोटाचया जाडीचे असावेत. मातकट रंगाचे. बहुतेक गार्डन स्नेक प्रजातीचे असावेत.
पण आता मुलांना सावधगिरीच्या सुचना देउन ठेवल्या आहेत. झुडुपां मध्ये बॉल गेला की भसकन हात घालुन बॉल काढयला जायचं नाही..दार उघडं ठेवायचं नाही. सूर्यास्ता नंतर झुडुपात काहिही शोधायला जाय्चे नाही, दुसर्या दिवशी शोधु. वगैरे वगैरे.
-मयुरा
24 Jul 2019 - 5:32 pm | vikrammadhav
प्रतिसादामधले फोटो दिसताहेत पण लेखामधले फोटो दिसत नाहीत !!!