जेवणात गुलाबजाम अन वाचनात लघुकथा आवडत नाहीत असा व्यक्ती सापडणे अवघड. नारळीकर, धारप, वपू, मिरासदार, मतकरी वगैरे कथाकारांच्या लिखाणाने कित्येक पिढ्यांची वाचनभूक भागवली आहे. मराठी वाचक नेहमीच उत्तमोत्तम कथांच्या शोधात असतो. आजच्या धकाधकीच्या अन तणावग्रस्त आयुष्यात काही खुसखुशीत वाचायला मिळालं तर ! हीच गरज निलेश मालवणकर यांचा 'ही आगळी कहाणी' हा नवीन कथासंग्रह पुर्ण करतो. सहज म्हणून मी पुस्तक हाती घेतलं आणि संपेपर्यंत हातातून सुटलं नाही.
इतक्या सहजपणे आणि विनोदी शैलीत कथाविषय मानण्याचं कसब फार कमी लेखकांकडे असतं.
पुस्तकाचं रुपडं चित्ताकर्षक आहे. मुखपृष्ठाची चित्र सूचक आणि रंगसंगती मन प्रसन्न करणारी. प्रत्येक कथेतला एक घटक घेऊन कोलाज स्वरूपात मुखपृष्ठावर गुंफणाऱ्या चित्रकारांना दाद द्यावीशी वाटते.
आतील अक्षरांची फ़ॉन्ट साईझ आणि फ़ॉन्ट स्टाईल मूडला साजेशी आणि सुटसुटीत. प्रुफं वाचण्यातही मेहनत घेतलेली दिसते.
विजयाताई वाड यांची प्रस्तावना लाभलेल्या या संग्रहात एकूण १८ कथा आहेत. सामाजिक कथा,विज्ञानकथा, अद्भुतिका, रहस्य, विनोदी असे नानाविध प्रकार लेखकाने हाताळले आहेत हे विशेष.
सर्वच कथा चांगल्या आहेत, कथनात कुठल्याही प्रकारची कृत्रिमता नाही.
"मी गोष्ट सांगतोय, ऐका रे" असं न म्हणता "मित्रांनो एक गंमत सांगायचीये." असं बोलतं पुस्तक.
खुमसदार शब्दांमधली फटकेबाजी पहिल्या पानापासून सुरु केलेली आहे. लिखाणशैलीही स्वतंत्र आहे.
काही मोजक्या कथांबद्दल थोडक्यात सांगतो :
१. परीकथेतील राजकुमारा...
राजकुमार आणि राजकुमारी यांच्या कथांचा शेवट नेहमीच सुखद असतो. पण ह्या परीकथा जेव्हा वास्तव कथेत बॅकड्रॉपला वापरल्या जातात तेव्हा त्या दुःखद बनतात. कारण Life is not a fairy tale असा नियम आपण करून ठेवलेला आहे.
ही कथा वाचताना मला वाटलं होतं की नायिका पुस्तकी खोट्या दुनियेला भूलून खऱ्या दुनियेत प्रवेश करतेय, याचा शेवट दुःखद होणार. तिला
वास्तवाची चपराक बसणार.
पण त्याऐवजी वाचकांनाच सुखद चपराक बसते.
२. डायनासोरची बेंबी
फुल टू धमाल कथा. काय रहस्य आहे हे लेखकाने सांगेपर्यंत कळत नाही. ब्रम्हदेवाशी जोडलेला संबंध अचाट.
शेवटच्या दोन ओळी तर एकदमच भन्नाट.
सोने पे सुहागाच जणू.
३. सोळावं वरीस धोक्याचं गं
या विज्ञानकथेला मराठी विज्ञान परिषदेने घेतलेल्या कथास्पर्धेत पारितोषिक मिळालेलं आहे. परिक्षकांचा निर्णय योग्य होता हे कथा वाचून कळतं.
४.कळविण्यास आनंद होतो की
फुलंसुद्धा वार करतात हे एखाद्याला तोंडी न सांगता आधी त्याला फुलांच्या बागेतून फिरवायचं अन शेवटी काट्यावाला गुलाब हातात द्यायचा अशाप्रकारे रचना आहे. मुद्दामहून काही न सांगताही खुप काही सांगून जाणारी कथा.
मानवी स्वभावातील व्यंग आणि विरोधाभास अगदी सहजपणे समोर येतात.
५. ये दुनिया...
विज्ञानकथा हा माझा विक पॉईंट आहे. त्यामुळे अपेक्षा अर्थातच उंचावल्या होत्या. पण ही कथुकडी वाचून डोक्याचं इंजिन खराब न होता वेगाने धावायला लागलं. टाईम मशीन या विषयावरील नाविन्यपुर्ण काहीतरी वाचून हायसं वाटलं. छान soft fiction
गुरुदत्त तर माझे फेवरेट म्हणून त्यांना भेटून आनंदही वाटला अन मन थोडंसं उदासही झालं.
६. नोटिस
कथा आवडली. बरेचजण सिनेमाच्या वाईट बाजूंबद्दल लिहतात. पण या मायावी नगरीतही चांगले लोक शिल्लक आहेत हे वास्तव मांडल्यामुळे चांगलं वाटलं.
७. जमीर खान...
सद्यपरिस्थितीवर भाष्य करणारी ही कथा डायरेक्ट निशान्यावर जाऊन भिडते. विरोधाभासाचा एलिमेंट खुपच मस्त वापरलाय.
याशिवाय गुगली, कादंबरी, अल्बम, सैतानाशी करार आणि लय मागणं नाही देवा ह्या कथासुद्धा मस्त जमल्या.
संग्रहातील कथा टुमदार, खुसखुशीत आणि पटकन वाचून होतील अशा आहेत.
चहाबरोबर बिस्किटं देण्याऐवजी अशा कथा किंवा कथुकल्या वाचायला दिली तरी काम भागेल.
महाराष्ट्र साहित्य संस्कृती महामंडळाचं यावर्षीचं अनुदान या संग्रहाने जिंकलंय.
-------------
कथासंग्रह : ही आगळी कहाणी
लेखक : निलेश मालवणकर
मायबोली प्रकाशन,
किंमत: फक्त ७२ रुपये
-----------
ज्या लिंकवरून मी हे पुस्तक मागवलं होतं ती खाली देत आहे. इथे दोन कथांचा Preview सुद्धा वाचायला मिळेल.
http://googleweblight.com/i?u=http://www.bookganga.com/eBooks/Books/deta...