न आकळलेलं काही... ४

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
8 Oct 2008 - 3:26 pm

शास्त्रीय नाही, पण तोच पक्का आधार असलेली दोन गाणी आहेत. "हे सुरांनो चंद्र व्हा..." आणि "रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी..." दोन्हींना माझ्या माहितीप्रमाणे संगीत आहे ते अभिषेकींचंच. एक 'ययाती'मधलं आणि दुसरं... ठाऊक नाही. इतकंच कळतं की ही गझलेच्या अंगानं जाणारी रचना असावी. शंकर रामाणी यांची कविता. माझ्याकडं "हे सुरांनो..." बहुदा अर्चना कान्हेरे यांच्या आवाजातलं आहे. राग बहुदा चारुकेशी. जीवघेणी पेशकारी. कमालीची आर्तता आणि विनवणी. सूर साक्षात उभे राहिले आणि ती आर्तता त्यांनी ऐकली तर कदाचित त्या आर्ततेपोटीच प्रियकराकडं धावत जाऊन चांदण्यांचे ते कोष पोचवतील. "रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी..." आवाज बुवांचाच. हे गीत सरळसरळ विरहानं व्याकूळ झालेल्या प्रियकराच्या आक्रोशाचं आहे, हे माझं आकलन. अर्थ वेगळाही असू शकेल. पण माझं या गीताशी जुळलेलं नातं "हे सुरांनो" सोबतच येत गेलं. कारण संगणकावर ऐकताना एका फोल्डरमध्ये ते त्याच क्रमानं येत गेलं. त्यामुळं तो अर्थ. आता या गाण्यातले शब्द समजतात आणि अर्थ लागतो असं म्हणणं इतक्या काळानंतर सोपंच आहे. पण सुरवातीला माझं ध्यान त्या शब्दांकडं फारसं नसायचंच. अनेकदा तर 'हे सुरांनो'मधील "वाट एकाकी तमाची..." याऐवजी मी "वाट एकाकीच माझी..." असं घेऊन बसायचो. कारण मनात घर केलं होतं ते त्यातल्या सुरांच्या आर्ततेनं. मग शब्दांकडे ध्यान जायचंच नाही. तीच गोष्ट 'रंध्रात'ची. त्यातली आर्तता अनुभवायची असेल, आक्रोश समजून घ्यायचा असेल तर प्रेमविरह हवाच का? नाहीच. ती पोचतेच त्याविनाही. त्या, आपण स्वतः नसलेल्या, प्रेयसी आणि प्रियकराच्या भूमिकेत हे सूर नेतातच.
आणखी एक. राग भूप. किशोरीताई. "सहेला रे". केवळ अनुभवण्याची चीज (हा शब्द त्या अर्थानं नाही. एक गोष्ट या अर्थानं). 'सहेला'सोबत सप्तसूर, त्यांचं ज्ञान करून घेणं. मुळात कल्पनाच जीवघेणी. त्यातल्या "आ मिल गाये" मधल्या "आ" मधला पुकार... वेगवेगळ्या धर्तीचा. मघाचे ते "चांदण्यांचे कोष" पोचवणारे सूर आता इथं प्रियकरालाच समोर आणून उभे करतात. शब्दच नाहीत, असा हा अनुभव येतोच.
कशामुळं घडतं हे? काय करतात हे सूर नेमकं आपल्याला?
दाखले असे द्यावेत तरी किती? एकेक रचना, मनात जाऊन बसलेल्या, बाहेर काढायच्या ठरवल्या तरी प्रश्नांचं स्वरूप तेच राहतं. मग ते रागदारी गायन असो, शुद्ध रागदारी किंवा फ्यूजन प्रकारातलं वाद्यसंगीत असो, ठुमऱ्या असो, दादरा तालातल्या रचना किंवा अनंत गझला. भावगीतेही आहेत. त्यातलीही एखादी जागा अशी मनात जाऊन बसलेली असते. सोबत तिच्या अशा खास आठवणी असतात.
---
ही एक अशीच गोष्ट. मध्यंतरी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातला काही अनुवाद करण्याची एक संधी मिळाली होती. त्यातून माणसासमोर चिरंतन काळापासून असलेले काही मूलभूत प्रश्न समजत गेले. हे सारं गद्यातून लिहिलं गेलेलं. कधी कल्पनाही केली नव्हती की त्यातील काही पायाभूत प्रश्न संगीताच्या रूपानं आपल्या डोक्यात थोडा प्रकाश टाकून जातील. संतांच्या रचना आहेतच. त्या ऐकल्याही होत्या. पण तशा अर्थानं ते प्रश्न आत जाऊन पूर्ण भिडलेले नव्हते. उदाहरणार्थ, "वृक्षवल्ली आम्हा सोयरे..." यात किंवा "पसायदान"मध्ये वैश्विक मुद्यांचीच हाताळणी झाली आहे. त्या अर्थानं ते तत्वज्ञानच. आणि त्या संताच्या संपूर्ण कृतींचा विचार करून त्या रचना पाहिल्या तर पूर्ण तत्त्वज्ञान असंही म्हणता येतं. पण माणसापुढं वैयक्तिक स्वरूपातला प्रश्न असतो त्याची मांडणी माझ्या ध्यानी आली ती जितेंद्र अभिषेकी यांनीच गायलेल्या एका भैरवीतून. रचना कबीरांची आहे. "मेरा तेरा मनवा कैसा एक होय रे..." बास्स. या एका प्रश्नात खरं तर कबीरांनी सारं काही सांगून टाकलंय, पण ते ज्यानं थोडं तत्त्वज्ञान वाचलंय त्याच्यासाठी. इतरांचं काय? पुढचा दोहा आहे, "मैं कहता अखियन देखी, तू कहता कागजकी लिखी..." हेही उत्तर पुरत नसेल तर पुढच्या एका दोह्यात कबीर अगदी अंतिम स्वरूपाचा पर्याय सांगून जातात. म्हणतात, "मै कहता तू जागत रहीयो, तू रहता है सोयी रे...!" अभिषेकी आणि बहुदा शौनक या दोघांनी त्यात 'जागत' आणि 'सोयी' या दोन शब्दांवर जो काही स्वरांचा - सुरांचा खेळ केला आहे काही क्षणांसाठी, तो तिथंच मनाचा प्रवास थांबवतो त्या काळासाठी. पुढं सरकावंसं वाटू नये असं काय आहे त्या शब्दांमध्ये? आहे ते, त्या शब्दांच्या अली-पलीकडील शब्दांतून येतंच. पण तरी मन तिथंच थांबू पाहतं. थांबत असलं तरी, त्या दोह्याचा अर्थ पक्का सांगून जातं. मग विपश्यना म्हणजे काय हे समजू लागतं, ध्यान म्हणजे काय हे समजू लागतं. ध्यान किंवा विपश्यना भले जमणार नाही, पण त्याचं तंत्र समजल्यानं एकदम बुद्धाला क्वांटम फिजिक्स कळलं असेल का, असा भलताच प्रश्न डोक्यात जागा होऊन जातो. ही केवळ त्या 'जागत' आणि 'सोयी' या दोन शब्दांवर झालेल्या सूर-तालाच्या करामतीची किमया आहे का? पुन्हा इथं तेच. इतर काही रचनांतून न भावलेलं वैश्विक सत्य इथं या रचनेतच का भावावं? रचना भैरवीत आहे. पण भैरवी तर मला ओळखताही येत नाही. पण मग शब्दांचा अर्थ एरवी जितक्या ताकदीनं संप्रेषित होत नाही तितका इथंच का होतोय? सुरांची ताकद हे उत्तर ठीक. पण म्हणजे काय?
तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून म्हणे, खरं तर कोणत्याच प्रश्नाची उत्तरं मिळत नसतात. प्रश्नांच्या उत्तरांचा शोध कुठं थांबवायचा याचं प्रत्येकाचं आकलन त्यातून तयार होतं. हे असंच संगीताचं असावं बहुदा...
---
संगीत समजून ऐकणं आणि न आकळताही संगीत ऐकणं हे द्वंद्व माझ्या मनात कायमचं घर करून बसलंय. मन आणि मेंदू यातलं हे द्वंद्व आहे का? असावं बहुदा. ऐकताना कुठंही काहीही कमी वाटत नाही. तरी जे ऐकतोय त्यातून निर्माण होणाऱ्या अनुभूतीचा अर्थ लावण्यासाठी मनाला पुरेशी ताकद लागते ती मिळत नाही. ती बुद्धीची ताकद असं तर नाही? तिथं मेंदू कामाला येतो का? म्हणजे तो सूर, ताल, लय, स्वर वगैरेंचं विश्लेषण करून मनापर्यंत पोचवत असावा का? गुरू केल्याशिवाय हे झेपणे नाही हे उत्तर देऊन तात्पुरतं मनाचं समाधान होतं, पण तो प्रयत्न होत नाही आणि मग पुन्हा असं काही ऐकलं की जिवाची घालमेल होतेच. अशी अनुभूती चित्रगीत, भावगीत यासंबंधात होते का? माझा अनुभव असा आहे की, होतो; पण तेथे त्याचा गहिरेपणा अपवादात्मकच असतो. अपवादाचीच गोष्ट सुरू आहे म्हणून त्यापैकी दोन गीतांचा उल्लेख करावा लागेल. एक आहे चित्रगीत "कभी तनहाईमें यूँ", संगीत स्नेहल भाटकरांचं; आणि दुसरी आहे गुलाम अलींच्या (थोरल्या नव्हे; छोट्या) आवाजातली एक ठुमरी, "गोरी तोरे नैना..." पारंपरिक पद्धतीनं पेश केलेली आणि सोबत तिचा दादरा. या दोन्ही रचनांमध्ये काय भिडतं आत जाऊन? सांगणं शक्य नाही. पण वेडावतात या दोन्ही रचना. यातली पहिली अनेकांना आवडत असेल. "गोरी तोरे नैना" ही ठुमरी सगळ्यांनाच भावते की नाही ठाऊक नाही.
अशाच एका चर्चेत माझ्या मित्रानं सांगितलं होतं, या अपवादाचा नियम करावयाचा असेल तर थोडं शास्त्रीय संगीत शिकून घ्यावंच लागेल तुला. त्यासाठीचा दाखला साधा सरळ होता. आमच्याच संवादातला. मी म्हणालो होतो, अनेकदा सुरेश वाडकरांच्या 'ओंकार स्वरूपा'मधल्या काही रचना सकाळी ऐकल्या की खूप प्रसन्न वाटतं. त्यानं ताडकन सांगितलं होतं, "कारण त्या सकाळच्या रागांमध्ये बांधलेल्या आहेत."
पुन्हा संगीत, सूर, लय, ताल आणि काळाचं नातं...
म्हणजे काय, तर प्रश्नच.
त्या मित्रानंच पुलंच्या एका दाखल्याचा आधार घेत सांगितलं, "न समजताही संगीत ऐकणं आणि त्यातला आनंद मिळवणं, शोधणं हे ठीक. पण ते कसं आहे की आंधळ्या शिल्पप्रेमीसारखं. तो आपला शिल्प चाचपडत राहतो, त्यातलं शिल्प त्याच्या हाती लागतंही. पण ते त्याला दिसत नसतं. शिल्पाचा आनंद त्याच्यालेखी स्पर्शाचाच असतो. तो असेलही त्याच्यापुरता पूर्ण; पण नेत्राच्या पातळीवर तो येत नाही. तसा आला नाही की हे असे प्रश्न येतात. तसंच हे तुझं." पुलंच्या बंगचित्रंमध्ये या चित्रकाराचा दाखला असावा. अंध असूनही तो हातानं दाखवत चित्र करून घेतो असा काहीसा. तसं हे माझं. तो चित्रकार तिथं चित्र काढतानाचा आनंद जरूर मिळवतो. पण तयार चित्रकृतीचा दृष्टीसुखाला मात्र तो तसा पारखाच असतो.
हे द्वंद्व असं सुटणार नाही हे नक्की.
पटतं की, गुरूच हवा.
प्रश्नांच्या उत्तराचा शोध इथंच थांबवावा काय?
हाही एक प्रश्नच...
- पूर्ण -

संस्कृतीसंगीतप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

8 Oct 2008 - 3:43 pm | विजुभाऊ

वा मेहेफीलीचा आनन्द मिळाला
सगळे लेख एकत्र एकदम वाचता आल्याचा आनन्द काही वेगळाच असतो.
मस्तच.

नंदन's picture

8 Oct 2008 - 3:59 pm | नंदन

अप्रतिम लेखमाला. तुम्ही ज्याला विनयाने बालवाडीची पायरी म्हणता, ती तरी गाठता आली तरी स्वतःला भाग्यवान समजू. जगण्यातल्या अनुभवांशी अशी नाळ गुंतलेले काही वाचायला फारच क्वचित मिळते. (रामदास यांनी मागे एकदा कवितेबद्दल लिहिले होते, त्याची आठवण झाली.)

चारूकेशी, लताबाईंची जुनी गाणी आणि अगदी अलीकडेच ऐकलेला एल. सुब्रमण्यम यांचा व्हायोलिनवरचा एक आर्त राग. कुठल्या तरी खोल, गहिऱ्या, आधी ठाऊकही नसणाऱ्या दुःखाला हात घातला जातो असं काही ऐकताना. तुम्ही शेवटी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर जाणकार लिहितीलच, पण संगीताच्या ह्या न आकळणाऱ्या अपूर्ण हुरहुरीची गोडी कदाचित संपूर्ण ज्ञानापेक्षा अधिक असू शकेल.

बाकी हे अनुभव मांडताना शब्द तोकडे पडणे साहजिक आहे. मौनरागमध्ये एलकुंचवारांनी एका सुंदर विधानाचा दाखला दिला आहे - 'सर्व कलांना संगीत व्हायचे असते'. संगीत जो परिणाम साधते, जिथे पोचते तिथवर पोचण्याची इतर कलांची धडपड चालू असते. संगीताचा तो अव्याख्येय अनुभव शब्दांत पकडणे, इतरांपर्यंत पोचवणे महाकठीण. तुमची लेखमाला हे साधते, वाचकांच्या याच जातीच्या अनुभवांना उजाळा देऊन जाते; हे सिद्धहस्त लेखकाचेच लक्षण.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

8 Oct 2008 - 4:07 pm | विसोबा खेचर

श्रावणराव,

आत्ताच चारही भाग वाचले..

आपल्या श्रवणसाधनेचा प्रवास छानच झाला आहे, उत्तम लिहिले आहे.. आपली श्रवणभक्ति अशीच सुरू राहो ही सदिच्छा...

ही लेखमाला वाचता वाचता मलाही गेल्या पंचवीसएक वर्षांतली मी केलेली श्रवणभक्ति आठवली. अगदी हुबळी, कुंदगोळ, सवाईगंधर्व महोत्सव, तानसेन समारोह, भोपाळ, इंदूर उज्जैनी, कलकत्त्यामधले काही महोत्सव, बाणगंगा, गुणीदास यांसारख्या मोठमोठ्या संगीतसभांपसून ते अगदी चार भिंतीतल्या, मोजक्या श्रोत्यांपुढच्या अत्यंत रंगलेल्या असंख्य घरगुती, खाजगी मैफली आठवल्या..!

आत्तापर्यंतच्या आयुष्यात अगदी भरपूर श्रवणभक्ति केली, अनेकानेक लहानमोठ्या कलाकारांपासून ते थेट अण्णा, मन्सूरांसारख्या दिग्गजांसारख्यांच्या गायकीचा थोडाबहुत अभ्यास केला. अनेक रागरागिण्यांशी दोस्ती करण्याचा प्रयत्न केला, प्रसगी काही गुणीजन, विद्वतजनांच्या पायाशी बसून चार स्वर शिकायचाही योग आला. अष्टांगप्रधान ग्वाल्हेर गायकीपासून ते किराणा, जयपूर, आग्रा, पतियाळा, भेंडिबजार आदी घराण्यांच्या खासियती समजून घ्यायचा प्रयत्न आजही सुरू आहे. मध्येच एखाद्या बंदिशीतून, एखाद्या स्वरावलीतून, एखाद्या दिग्गजाच्या घराणेदार, कसदार गायकीतून एखाद्या रागाचं एखादा सौंदर्यपैलू माणिकमोत्यांसारखा हाती लागतो तेव्हा होणारा आनंद हा अवर्णनीय असतो. पण तेवढ्याने कधीच भागत नाही. पुन्हा तळ गाठावा लागतो, डुबकी मारून बसावं लागतं!

हा न संपणारा प्रवास...! आणि तो कधी संपत नाही म्हणून पुन्हा परत त्याच अपूर्ण गोडीच्या शोधात पुन्हा भटकू लागतो, श्रवणभक्ति सुरूच राहते..!

हे द्वंद्व असं सुटणार नाही हे नक्की.
पटतं की, गुरूच हवा.

खरं आहे! गुरुशिवाय विद्या नाही!

काहीही समजत नसतांनादेखील एखादं गाणं आवडू शकतं, थेट हृदयाला भिडू शकतं, मनाला अतीव आनंद देऊ शकतं हे निश्चितच! परंतु त्यातील विविध स्वरावलींची गोडी, न्यास सुराची गोडी, तालालयीची गंमत जर अनुभवायाची असेल तर कुणा चांगल्या गुरुकडे थोडं तरी गाणं शिकणं आवश्यक आहे, ते समजून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं!

असो,

चारही भाग उत्तम! अभिनंदन...!

आणि आपल्या श्रवणभक्तिच्या पुढील प्रवासाकरता अनेकानेक शुभेच्छा!

अच्छा सुनो, बढिया सुनो..! :)

आपला,
(गाण्यातला) तात्या.

सर्व भागांचे एकत्रित दुवे:

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४

वाचताना खूप काही लिहायचे होते. आता काहीच सुचत नाही. तुमचे संगीत प्रवासवर्णन वाचून माझाही प्रवास घडला.

अरुण वडुलेकर's picture

8 Oct 2008 - 8:12 pm | अरुण वडुलेकर

अप्रतिम लेखमाला. लेखाची सुरुवातच इतकी मनोहारी की पुढचे सगळे भाग वाचण्याची उत्कंठा लागलीच.

सूर, रंग, रेषा, आकार या चारापैकी किमान एक तरी मिती तिथं असते आणि या चारांमधूनच स्वतःला साकारणारी आणि तरीही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्त्व ठेवणारी निसर्ग नावाची एक किमया शिल्लक राहतेच; ती तर पाचवी मिती! हे वाक्य तर खासच.

थोडी फार श्रवण यात्रा आमचीही झालेली. विशेषतः सत्तर किंवा एकाहत्तर (नक्की आठवत नाही)च्या सुमारास, सवाई गंधर्वात कार्यक्रमाच्यासांगता पर्वात
गानभास्करर पं. भीमसेन जोशी यांना पु.ल.देशपांडे यांनी हार्मोनियमवर केलेली साथ आजही आठवली मन गुंग होऊन जाते.
त्या अत्तराच्या कुप्या आता पुन्हा गवसत नाहीत पण ते नाद मनाच्या आत अजूनही विसावलेले नाहीतच.

लेखाबद्धल अभिनंदन. जियो

घाटावरचे भट's picture

8 Oct 2008 - 8:21 pm | घाटावरचे भट

उत्तम लेखमाला, श्रावणराव. कोणत्याही शास्त्रीय संगीत ऐकणार्‍याची सुरुवात आणि त्याच्या प्रवासाचे टप्पे साधारणतः सारखेच असतात असं मला माझ्या आणि माझ्या इतर काही संगीतातील जाणकार मित्रांच्या अनुभवांवरून लक्षात आलं आहे. माझ्या मते फक्त ऐकणार्‍यांचाच नव्हे तर कलावंतांचा प्रवास देखील अनुभूती -> ज्ञान -> अनुभूती असाच होत असावा. जेव्हा एखादा माणूस शास्त्रीय संगीताकडे आकर्षिला जातो तेव्हा त्याला त्यातल्या सुरांतून मिळणारी एक वेगळी अनुभूती आकर्षित करते. उत्साही माणूस त्यातून संगीतविषयक ज्ञानार्जनाकडे वळतो आणि बर्‍याचदा संगीताच्या साधनेनंतर पुन्हा तो अनुभूतीच्या पातळीवर येतो. पण ही अनुभूती वेगळी, जिथे संगीतातला मूळ तांत्रिक विचार किंवा शास्त्र त्या व्यक्तीसाठी अत्यंत नैसर्गिक होउन बसतं आणि त्यातून येणारी उच्च अनुभूती महत्वाची ठरते.
असो, अजून अज्ञानी असल्याने जास्त बडबड करत नाही. पुन्हा एकदा असा एक उत्तम लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन!!!

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

यशोधरा's picture

8 Oct 2008 - 10:23 pm | यशोधरा

सुरेख. ही अनुभूती आमच्यासमोर इतक्या सुंदर शब्दांत उलगडल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

स्वाती दिनेश's picture

9 Oct 2008 - 11:30 am | स्वाती दिनेश

सुरेख. ही अनुभूती आमच्यासमोर इतक्या सुंदर शब्दांत उलगडल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
यशोसारखेच म्हणते.
स्वाती

संदीप चित्रे's picture

8 Oct 2008 - 11:17 pm | संदीप चित्रे

माझ्याही मनातल्या द्वंद्वाला तुम्ही वाचा दिलीत.
आत्ताच काही आठवड्यांपूर्वी माझ्या आतेभावाबरोबर गाडीतून चाललो होतो -- संदीप खरे / सलील कुलकर्णीची गाणी ऐकत. गाणी तर खूप एन्जॉय करत होतोच; एका क्षणी सूर आत लागल्याची कळ गेली -- त्याच वेळी आतेभावाने पटकन त्याच सुरांची सरगम गुणगुणली. तेव्हा मनापासून वाटलं की गाणं आवडतं तसे ते कळले ही असतं जास्त आवडलं असतं :)

शास्त्रीय संगीत ऐकताना तर हा अनुभव पदोपदी येतो !!

भाग्यश्री's picture

8 Oct 2008 - 11:19 pm | भाग्यश्री

फार सुंदर लेखमाला! तुमच्याइतकीही श्रवणभक्ती नाहीए माझी, पण तरी जे काही असं संगीत ऐकते तेव्हा सेम असंच होतं.. शब्दात मात्र मला कधीच मांडता आलं नसतं.. ते तुम्ही छान मांडलंत..
ज्यानी कधीच काही असं संगीत ऐकलं नाही तो सुद्धा उत्सुकतेने ऐकायला जाईल, इतक्या ताकदीचं झालंय लिखाण..खूप आवडलं!!

मुशाफिर's picture

8 Oct 2008 - 11:33 pm | मुशाफिर

बास इतकचं म्हणतो!

सगळे भाग एकत्र वाचले तेव्हा दाद द्यायला खुप काही लिहावं, असं वाटलं. पण लिहायला गेलो त्यावेळी तुमच्या सुंदर विचारांपुढे माझ्या शब्दांच थिटेपण जाणवलं.

(नि:शब्द)
मुशाफिर.

केशवसुमार's picture

8 Oct 2008 - 11:37 pm | केशवसुमार

मोडकशेठ,
खूप झान लेख मला.. सगळे भाग एकदम दिलेत हे बरे केलेत..हल्ली जे काही लेखन या नावाखाली मिपावर चाललं आहे त्याची उबग आली होती.. तुमचा लेख वाचून कस फ्रेश .. ताजे तवाने वाटले.. धन्यवाद...सवाईच्या आठवणी जाग्या झाल्या.. मिरजेच्या उरसात टाळ्या न वाजवण्या बद्दल मी पण ऐकले आहे..
(कानसेन)केशवसुमार

विसोबा खेचर's picture

9 Oct 2008 - 12:52 am | विसोबा खेचर

हल्ली जे काही लेखन या नावाखाली मिपावर चाललं आहे त्याची उबग आली होती..

किमान दहा उदाहरणे द्याल का? म्हणजे त्यावर काही विचार करता येईल! मला वाटत नाही की या लेखाइतका गंभीर अन् मॅच्युअर्ड लेख अन्य कुठल्या संस्थळावर आजपर्यंत आला असेल! सदर लेखाच्या केवळ जिनियस या शब्दात वर्णन करता येईल अश्या लेखकाला ज्या एका विश्वासाने हा लेख मिपावर टाकावासा वाटला, हा मी मिपाचा सन्मान समजतो..!

अलिकडेच नंदनचे हे दोन अप्रतीम लेख मिपावर प्रसिद्ध झाले आहेत. त्या लेखांनाही आपला एका ओळीचाही प्रतिसाद नाही! कदाचित आपल्या उच्च अभिरुची चोखंदळ वृत्तीला हे दोन लेखही उबग आणणारे वाटले असतील..! असो...

मिपाचे संपादकीय सदरही व्यवस्थित सुरू आहे. मिपाचे कलादालनही उत्तम सुरू आहे. निरनिराळ्या पाकृंचीही रेलचेल आहे, त्यापैकी एखाददोन लेखात आपणच काही खातांना दिसताय!

मोडकरावांनी ही चार भागांची मालिका अन्य एका संस्थळावरही प्रसिद्ध केली आहे तिथे अद्यापही कुणी या सुंदर मालिकेची दखल घेतलेली माझ्या पाहण्यात नाही! त्यापेक्षा आपल्याला ज्या मिपाचा उबग आला आहे त्या मिपावर या सुंदर मालिकेची आवर्जून दखल घेणारे काही प्रतिसाद तरी आले आहेत हे मी महत्वाचे मानतो..!

आणि हो, इथे तरूण, जिन्दादिल वर्गही खूप आहे. त्यामुळे धमाल, चेष्टामस्करी, गप्पाटप्पाही खूप चालतात! त्यामुळे सतत बाप मेल्यासारखे चेहेरे केलेली अन् सुसंस्कृत, अन् मारे उच्च साहित्यिक अभिरुचीच्या वगैरे गप्पा मारण्यार्‍यांना इथे उबग वाटणेही साहजिक आहे!

असो, मिपा हे आहे हे असं आहे. आपल्याला जर तिचा उबग वगैरे आला असेल तर आपण इथे नाही आलात तरी चालेल! त्यामुळे आपल्याला येणार्‍या उबगाचा आपल्याला होणारा मनस्ताप तरी वाचेल अशी आशा आहे!

शेवटी या उबग येणार्‍या संस्थळावर येणं न येणं हा संपूर्णपणे आपला चॉईस आहे!

आपला,
("उचलली जीभ अन् लावली टाळ्याला.." वाल्यांना वेळीच सरळ करंणारा!) तात्या.

मोडकराव, आपल्या या सुंदर मालिकेतील या विषयांतराबद्दल मी आपली क्षमा मागतो. ही मालिका आपल्याला मिपावरही टाकाविशी वाटली याचं मला समाधान आहे!

आपला,
(काहींच्या मते एका उबग येणार्‍या संस्थळाचा चालक-मालक) तात्या.

केशवसुमार's picture

9 Oct 2008 - 1:01 am | केशवसुमार

अतिशय दर्जेदार प्रतिसाद.. धन्य झालो..
अता मालकांनाच जर काही वाटत नाही तर मग चालू द्या..
(दर्जेदार लेखनाचा उबग आलेला) केशवसुमार

विसोबा खेचर's picture

9 Oct 2008 - 1:08 am | विसोबा खेचर

अता मालकांनाच जर काही वाटत नाही तर मग चालू द्या..

चालूच राहणार आहे! आपण सांगण्याची गरज नाही..!

अतिशय दर्जेदार प्रतिसाद.. धन्य झालो..

धन्य होण्यापेक्षा माझ्या प्रतिसादात मी जे मुद्दे मांडले आहेत आणि अलिकडेच नंदन आणि धन्याशेठसारख्यांचे उत्तम लेख मिपावर आल्याचे जे दाखले दिले आहेत त्याला काही मुद्देसूद उत्तर दिलं असतंत तर अधिक बरं झालं असतं!

परंतु मुद्देच नसले किंवा संपले असले की,

अतिशय दर्जेदार प्रतिसाद.. धन्य झालो..

अशी त्रोटक वाक्य टाकून पळ काढता येतो..!

असो,

तात्या.

केशवसुमार's picture

9 Oct 2008 - 1:19 am | केशवसुमार

आजच बरेच दिवसांनी निवांत वेळ मिळाला आहे.. तू दिलेले दुवे नक्कीच वाचतो.. आणि त्याला प्रतिसाद पण देतो..
अता जर तू म्हणतोस की मुद्दे नाहीत.. तर मग तुझा प्रतिसाद कशाला?
झोपलेल्याला जागे करता येते झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही..
असो..
(मुद्दे नसलेला) केशवसुमार

विसोबा खेचर's picture

9 Oct 2008 - 1:37 am | विसोबा खेचर

आजच बरेच दिवसांनी निवांत वेळ मिळाला आहे.. तू दिलेले दुवे नक्कीच वाचतो..

मी दिलेले दुवे काही फार जुने नाहीत, अलिकडचेच आहेत. ते जरा चाळल्यावर काही जाहीर विधाने केली असतीत तर बरे झाले असते! खास करून मिपाच्या संपादकाकडून अशी घाईघाईत विधाने होणे बरोबर नाही असे वाटते..!

झोपलेल्याला जागे करता येते झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही..

ही जबाबदारी आपल्यावर कुणीही दिलेली नाही...

त्याचप्रमाणे, उबग आणणार्‍या लेखनप्रकारांना मिपावरून काढून टाकण्याचे संपादकीय अधिकारही आपल्याला आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्या अधिकारातही मी कधी हस्तक्षेप केलेला नाही! असे असताना मिपाबद्दल उबग आणणारे आपले मत वाचून आश्चर्यही वाटले आणि दु:खही झाले! आपले मत द्यायला आपल्याला कुणाचीही ना नक्कीच नाही, परंतु मिपासंपादकाने असे सरसकट विधान करणे योग्य नव्हे असे मला वाटते!

असो, पदरचे चार पैसे खर्च करून, खूप वेळ, खूप मनस्ताप सहन करून येथपर्यंत हे संस्थळ आणले. त्याची ज्याला आत्तापर्यंत एक जबाबदार आणि काही एक सेन्सिबल व्यक्ति मानत होतो अश्या माणसाने लेखणीच्या एका फटकार्‍यानिशी उबग आणणारे संस्थळ म्हणून संभावना केली याचे किंचित दु:ख झाले...

असो...

या पुढे मला आपल्याशी या किंवा इतर कुठल्याच विषयावर काहीच बोलायचे नाही! कमीअधिक शब्दाबद्दल मनापासून क्षमस्व..!

तात्या.

केशवसुमार's picture

9 Oct 2008 - 1:59 am | केशवसुमार

नीट वाच..
स्थळाला उबग म्हणले आहे की काही लेखांना.. ते नीट वाच
मला जर तेव्हा वेळ झाला असता तर आज हे लिहायची वेळच आली नसती..जेव्हा वेळ होता तेव्हा तुझे देखिल लेखन उडवले आहे आठवून बघ..
असो.. बाकी तुझी जशी इच्छा..

केशवसुमार..

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Oct 2008 - 12:49 am | बिपिन कार्यकर्ते

श्रावणभाऊ, मस्त मजा आला. तुम्ही खूप छान उलगडल्या आठवणींच्या लडी.

प्रश्नांच्या उत्तराचा शोध इथंच थांबवावा काय?

काही प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात जास्त. आपोआप सुटतात ते.

http://in.youtube.com/watch?v=hxbGASbdbbQ&eurl=

बिपिन.

बिपिनराव, कृपया इथे युट्यूबच्या चित्रफिती जोडू नका. त्यामुळे बर्‍याच जणांना आय ई उघडायला त्रास होतो..
कळकळीची विनंती..

-- तात्या.

चित्रा's picture

9 Oct 2008 - 2:46 am | चित्रा

हे सुरांनो मी ही अर्चना कान्हेरेचेच ऐकले आहे, असेच कधीतरी प्रवासात असताना. त्यानंतरही इतरांच्या गळ्यातून तेच गाणे ऐकले पण तिच्याएवढे कुठचेच भावले नाही.
फार सुंदर.
तुमचे या मालेतील लेख फारच आवडले.

मुक्तसुनीत's picture

9 Oct 2008 - 9:19 am | मुक्तसुनीत

"करवीर नगरी थोरल्या शाहू महाराजांनी अनेक कलावंतांचे केशराचे शेतच जणू लावले होते. मी त्यातून थोडा चाललो , तर अंतर्बाह्य सुगंधाने न्हाहून निघालो." हे उद्गार आहेत बाबूराव पेंढारकरांच्या आत्मचरित्रातले.

तुमची लेखमाला वाचली तेव्हा देखील असेच वाटले. तुमच्या या सुरांच्या आठवणींच्या सुगंधात आम्हीसुद्धा थोडे न्हाहून घेतले आहे. तुमचे या संस्थळावरचे आगमन आणि ही पहिल्या दर्जाची लेखमाला एक अतिशय आनंदाची बातमी आहे असे मला वाटते. इथे असे अजून अजून तुम्ही लिहा ही आग्रहाची विनंती.

विसोबा खेचर's picture

9 Oct 2008 - 10:40 am | विसोबा खेचर

तुमचे या संस्थळावरचे आगमन आणि ही पहिल्या दर्जाची लेखमाला एक अतिशय आनंदाची बातमी आहे असे मला वाटते. इथे असे अजून अजून तुम्ही लिहा ही आग्रहाची विनंती.

हेच म्हणतो..!

किरकोळ वादविवाद, मारामार्‍या, पेल्यातली भांडणे इथे चालतातच. त्याकडे कृपया दुर्लक्ष करा. मारामार्‍यांच्या फोडणीशिवाय मिपावर मजा नाही हे लक्षात घेऊन कृपया इथे वावरा आणि स्वान्सुखाय, मनमुराद लेखन करा ही विनंती.. मिपाकर आपल्या लेखनाची दखल अगदी आवर्जून घेतील एवढेच सांगावेसे वाटते! :)

आणि ज्या दिवशी इथला उबग येईल त्या दिवशी येथनं अगदी खुशाल चालू पडा. मिपाकर नेहमीच आपली आठवण ठेवतील अन् त्यांच्या शुभेच्छा नेहमीच आपल्या पाठिशी असतील.. :)

तात्या.

श्रावण मोडक's picture

10 Oct 2008 - 4:00 pm | श्रावण मोडक

सर्वांनाच.

आगाऊ कार्टा's picture

10 Oct 2008 - 8:56 pm | आगाऊ कार्टा

चारही भाग अधाशासारखे वाचून काढले....
अतिशय छान लिहिले आहे...
अवांतरः तात्या आणि केशवकुमारांची जुगलबंदी खूपच छान रंगली....
बाकी काही म्हणा... वादविवादाशिवाय मजा नाही.

मेघना भुस्कुटे's picture

10 Oct 2008 - 9:56 pm | मेघना भुस्कुटे

मीही चारही भाग अधाशासारखे वाचून काढले. फार फार सुरेख लिखाण वाचायला मिळाले.
नंदनने सगळ्यांच्याच भावना मोठ्या समर्पक शब्दांत व्यक्त केल्या आहेत. अजून काय बोलावे? वरचेवर लिहीत चला... :)

शुचि's picture

27 Mar 2010 - 5:20 am | शुचि

४ ही भाग फार आवडले. ४ था फारच.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Love is older than you but the light shining through makes me see your love is all new.

II विकास II's picture

28 Mar 2010 - 7:52 pm | II विकास II

अगदी उच्च लिखाण.
सगळे भाग सलग वाचुन काढले.
शुचि यांचे आभार, धागा वर काढल्याबद्दल.

---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.