मुन्तजिर

मिडास's picture
मिडास in जनातलं, मनातलं
20 Mar 2017 - 6:27 am

राग, मत्सर, लोभ, द्वेष, अहंकार कुठल्याही नातेसंबंधात अपरिहार्यपणे येणारे हे भोग. कुणी कधी जिंकतं तर कधी कुणी हरल्याचं दाखवतं. पण साचत जातं काहीतरी आतल्या आत. घुसमट होते. तापलेल्या मनावर पुटं चढत जातात अपमानाची आणि मग कधीतरी कोंडलेली वाफ नको तिथे फुटते. पोळून निघतात मनं. मग रस्ते वेगळे होतात. दिवस जातात, वर्षं उलटतात. आणि मग एखाद्या नाजूक क्षणी जुनी पायवाट आठवते. भुरभुरणाऱ्या पावसात पसरणारा मातीचा गंध दाटून येतो छाती भरून. फिरून कुणाला तरी परत भेटावं अशी आस लागते. दूर आहे म्हणून काय झालं, शेवटी कुठलातरी चिवट बंध रेंगाळतोच मागे. त्याच रेशमी धाग्याला पकडून कुणीतरी साद घालतं.

रंजीश हि सही दिल दुखाने के लिये आ
आ फिर से मुझे छोडने के लिये आ

आला असेल तुला राग माझा मग मला दुखवायला म्हणून ये. एक आवाहन आहे इथे आव्हान नाही. एकदा ये इथे आणि बोल मला वाट्टेल ते. हरकत नाही, पण त्याच्याकरता तरी तुला यावं लागेल इथे.परत मला सोडून जाण्यासाठी ये. जे फक्त आपलं म्हणून नातं होतं ते परत पहिल्यासारखं नाही होणार हे माहीत आहे मला. हे सांगायला का होईना पण येऊन जा.

अब तक दिल-ए-खुशफहम को है तुझसे उम्मीदे
ये आखरी शम्मे बुझाने के लिये हि आ

मनाला अजून पण तुझी आस आहे. चुकतंय हे कळतंय मला. पण हे तू स्वतः सांगितल्याशिवाय समजणार नाही मला.हा फोलपणा समजावण्याकरता तरी ये.

एक उम्र से हू लज्जत-ए-गिरिया से भी मेहरूम
ऐ राहत-ए-जान मुझको रुलाने के लिये आ

दुःखाची चव चाखून खूप काळ लोटलाय. तू आल्याशिवाय चैन नाही पडणार आता, एकदाचं मला रडवण्या करता तरी ये.

किस किस को बतायेंगे जुदाई का सबब हम
तू अगर मुझसे खफा है तो जमाने के लिये आ

माझी एकटेपणाची व्यथा आता किती जणांना सांगत बसू. चल माझ्यावर नाराज आहेस ना मग फक्त जगाला दाखवण्यापुरतं का असेना पण ये.

एक नितांत सुंदर अशी विनवणी आहे इथे. स्वतःच गुंतलेले पेच स्वतःच सोडवून घेतले आहेत फक्त एका भेटी करता. पण कितीही मोहक आर्तता असली तरी ती निरर्थक आहे. एक विरंगुळा म्हणून अशी स्वप्नं बघणं ठीक आहे पण वास्तवाला सामोरं जाण्याचा क्षण आता लांबवता नाही येणार. शेवटी काळाची अशी एक शक्ती असतेच कि. सगळ्या जखमा भरून काढतो काळ. आता काही व्रण कायमचे राहून जातात त्याला इलाज नाही. अशा वेळी खुल्या दिलाने आणि स्वछ मनाने समोरच्याला निरोप देणे हेच योग्य.

यूं तो जाते हुए मैने उसे रोका भी नही
प्यार उससे ना रहा हो मुझे ऐसा भी नही

If you love somebody, set them free. कुणावर प्रेम करत असाल तर मोकळं सोडा त्याला. शेवटी प्रत्येकाला भुलवणारी शील वेगळी असते. मी थांबवलं नाही 'ती'ला पण माझं प्रेम नव्हतं तिच्यावर असं काही नाही.

मुन्तजिर मै भी किसी शाम नही था उसका
और वादे पे कभी शक्स वो आया भी नही

तिने मला भेटायचं वाचन द्यावं आणि मी संध्याकाळभर तिची वाट बघत बसावं असं कधी झालं नाही आमच्यामध्ये. प्रेमात असलो म्हणून काय झालं. प्रत्येकाची अशी एक खाजगी स्पेस असते हि जाणीव दोघांनीही पाळली. एकमेकांच्या राज्यात अशी विनाकारण घुसखोरी कधी तिनेही नाही केली आणि मी ही.

जिसकि आहट पे निकल पडता था कल सीने से
देखकर आज उसे दिल मेरा धडका भी नही.

आत्ता काल-परवा पर्यंत जिच्या चाहुलीने काळजाचा ठोका चुकत होता आज तिला समोर बघून पण आत काहीच नाही हललं. दोघांमध्ये कधीतरी फुललेल्या नात्याला समंजसपणे विराम दिलाय आता. ते हळव्या आठवणींचं, भिजलेल्या पायवाटेचं, शांत जलाशयाच्या काठी वसलेलं असं फक्त आमच्या दोघांचं असलेलं गाव एका वळणावर मागे टाकलेलं आहे आम्ही. याचा अर्थ असा नाही कि ते गाव तिथे नव्हतंच. ते तिथेच आहे अजून पुस्तकात जपून ठेवलेल्या गुलाबासारखं. भले आता ते टवटवीत राहिला नसेल पण त्याला सुवास मात्र अजूनही तितकाच जीवघेणा येतो बरंका.

(अहमद फराझ आणि फरहात शहजाद ज्यांच्या गझलांवर वरील लेख आधारित आहे त्यांना आणि अर्थातच जगजीत सिंग आणि मेहदी हसन यांना विनयपूर्वक अर्पण )

संगीतमुक्तकगझलप्रकटनआस्वादलेख

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

20 Mar 2017 - 8:16 am | प्राची अश्विनी

सुरेख!

संजय क्षीरसागर's picture

20 Mar 2017 - 3:09 pm | संजय क्षीरसागर

इतकी सुरेख गझल आहे ही पण रसग्रहण समरसून लिहील्यासारखं वाटलं नाही.

या ओळी खरं तर अशा आहेत :

रंजीश हि सही दिल दुखाने के लिये आ
आ फिर से मुझे छोडके जाने लिये आ

म्हणजे तुझं भेटणं मला दुखवून जाईल (रंजीश) कारण तुझ्या स्मृतीतून मी केव्हाच पुसला गेलोयं. प्रेमाचा अव्हेर करुन तू मला सोडून गेलीयेस... पण तरीही तू एकदा माझ्या हृदयाला दुखवून जायला ये आणि ....पुन्हा एकदा मला सोडून जा.

ती सोडून गेली याचं दु:ख नाही, जातांना ती भेटली नाही ही खंत उरात आहे. प्रियकराची आशा मात्र अजूनही मालवलेली नाही. ती जर परत एकदा आली तर कदाचित आपलं प्रेम तिला बांधून घेईल ही त्याची आशा आहे. म्हणून तिला विनवतांना तो म्हणतो, `आ फिर से मुझे छोडके जानेके लिये आ '

हे `आ फिर से मुझे छोडके जानेके लिये आ ' इतकं आर्त आहे की ज्याचं नांव ते ! एका अर्थानं त्याला विश्वास आहे की ती एकदा आली की तिला आपलीशी करायला वेळ लागणार नाही. पण दुसरीकडे तिला परत बोलावण्यासाठी असा बहाना हवा की ती येईल ! अहमद फ़राज़ची शायरी प्रेयसीला निमंत्रण इतक्या खुबीनं देते की माशल्ला !`आ फिर से मुझे छोडके जानेके लिये आ '

कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहब्बतका भरम रख
तू भी तो कभी मुझको मनाने के लिए आ

पहले से मरासिम न सही, फिर भी कभी तो
रस्मों-रहे दुनिया ही निभाने के लिए आ

आणि

मानाके मुहोब्बतका छुपाना है मुहोब्बत,
आ यूंही किसी रोज जतानेके लिए आ

ही आणखी तीन बेहतरीन कडवी या गझलेत आहेत.

आपका गुनाहगार हु और माफी का हक़दार भी. समजून घ्या लेकराला.

संजय क्षीरसागर's picture

20 Mar 2017 - 4:09 pm | संजय क्षीरसागर

त्या गझलच्या फुल मूडमधे जाऊन लिहीलं की जमतं. माझा मूड लागला तर जमेल तेवढी इथे अ‍ॅडीशन करीन.

ट्रेड मार्क's picture

20 Mar 2017 - 10:24 pm | ट्रेड मार्क

मी पण हेच लिहायला आलो होतो. ही तीन अतिशय सुंदर कडवी आहेत.

मेहदी हसन यांचे लाईव्ह ऐकल्याशिवाय या गज़लची गम्मत कळणार नाही.

https://www.youtube.com/watch?v=dxv5U0F0nzw

वेल्लाभट's picture

20 Mar 2017 - 10:59 pm | वेल्लाभट

कडवी

कडवी नाही हो; शेर म्हणा शेर. कडवी कवितेत असतात. :) हलकेच घ्या.