एक्सेल एक्सेल - भाग १८ - अक्षरांची रंगरंगोटी

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
24 Feb 2017 - 11:35 am

एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६ - भाग ७ - भाग ८ - भाग ९ - भाग १०

भाग ११ - भाग १२ - भाग १३ - भाग १४ - भाग १५ - भाग १६ - भाग १७ - भाग १८

टेबल आणि अंकांशी निगडीत बर्याच गोष्टी आपण बघितल्या. आता पुन्हा जरा एक्सेलमधे असलेले प्रेझेंटेशन संबंधित पर्याय बघू. एक अतिशय रोचक आणि सुंदर असा प्रकार एक्सेलमधे आपल्याला उपलब्ध केलेला आहे तो म्हणजे 'वर्ड आर्ट'. हे वर्ड आर्ट खरं तर मायक्रोसॉफ्ट ऑफिसचंच एक फीचर आहे त्यामुळे वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट अशा बहुतेक ऑफिस अ‍ॅप्लिकेशन्स मधे ते असतं. नावातच त्याचा अर्थ आहे. वर्ड म्हणजे अर्थातच हे अक्षरांच्या संबंधित टूल आहे आणि आर्ट म्हणजे त्यात रंगरंगोटी, कलात्मकतेला भरपूर वाव आहे.

मुख्य टूलबारच्या इन्सर्ट टॅब मधे वर्ड आर्ट चं बटण असतं.

a

यात तुम्हाला अक्षरांच्या रंग, आकार, व प्रकारांचे तीस वेगवेगळे पर्याय बघायला मिळतात. त्यापैकी आपल्याला आवडणारा पर्याय आपण निवडावा व त्यावर क्लिक करावं. हे करताच एक अक्षरं टंकण्यासाठीचा पर्याय आपल्यासमोर चालू होतो आणि त्यात संकेतार्थ YOUR TEXT HERE असं लिहिलेलं असतं. ती अक्षरं बदलून आपण आपल्याला हवा तो मजकूर त्यात टंकावा.

एखाद्या फाईलचं शीर्षक, किंवा एखाद्या चार्टचं, टेबलचं शीर्षक देण्यासाठी हा पर्याय अतिशय योग्य असून त्याच्या वापराने फाईल दिसायला चांगली दिसते व एक प्रकारची छाप बघणार्यावर पडते. या शिवायही अनेक बाबतीत वर्ड आर्टचा उपयोग करता येऊ शकतो.

दिलेल्या ३० पर्यायांवरच या फीचरची गंमत थांबत नाही. खरं तर ती तिथे सुरू होते. वर्ड आर्टद्वारे जेंव्हा आपण एखादा मजकूर स्क्रीनवर टंकतो, तेंव्हा त्या ऑब्जेक्टचे दोन भाग पडतात. एक म्हणजे शेप किंवा चौकट ज्यात ती अक्षरं आहेत आणि दुसरा म्हणजे ती अक्षरं. या दोनही गोष्टी आपण आपल्या मनानुसार अमर्याद बदलू शकतो. आणि हे करण्यासाठी टेबल, पिव्हट टेबल प्रमाणेच 'फॉर्मॅट' चा टॅब आपल्यापुढे सज्ज असतो. या फॉर्मॅट टॅबमधे पाच विभाग असतात.

डावीकडून पहिला मेनू असतो इन्सर्ट शेप्स चा. यात आपण गोल, चौकोन पासून ते मुक्तरेषेपर्यंत हवा तो आकार आपल्या फाईलमधे काढू शकतो, किंवा असलेल्या आकारातही फेरफार करू शकतो. म्हटलं तर एखादं छानसं चित्रही या एक्सेलमधे आपण काढू शकू इतकी या फीचरची ताकद आहे. पण शेप्सबद्दल आपण सविस्तर पुढे बघू. तूर्तास वर्ड आर्ट शी निगडीत विभाग बघू.

b

डावीकडून दुसर्या मेनूत आपण शेप स्टाईल्स म्हणजे आपल्या अक्षरांभोवतीच्या चौकटीची रंगरंगोटी करू शकतो. यातही काही आगोदर निर्धारित केलेले पर्याय आपल्याला दिलेले असतात. त्या व्यतिरिक्त आपण त्या आकारात भरायचा रंग, त्याचं शेडिंग, त्यातील नक्षी, किंवा त्यात भरायचं एखादं चित्र हे सगळं ठरवू शकतो. त्या चौकटीची बाह्यरेखा म्हणजेच आउटलाईन कुठल्या रंगाची, किती जाड असावी, त्याला शॅडो, एम्बॉस, रिफ्लेक्शन यापैकी कुठले इफेक्ट असावेत हे आपण निश्चित करू शकतो.

शेप स्टाईलच्याच बाजूला वर्ड आर्ट स्टाईल्स चा मेनू असून शेपप्रमाणेच अक्षरांत भरायचा रंग, नक्षी त्याच्या बाह्यरेखेचा रंग, वजन, नक्षी, त्या अक्षरांना द्यायचे इफेक्ट्स हे सगळं आपण या मेनूतून ठरवू शकतो. बाकी पर्याय जरी शेप स्टाईल्स प्रमाणेच असले तरी एक खूप महत्वाचा पर्याय इथे टेक्स्ट इफेक्ट्स या मेनूत आपल्याला दिसतो तो म्हणजे ट्रान्स्फॉर्म. यात अक्षरांचा आकार आपण बदलू शकतो. ती नागमोडी, वरच्या दिशेने कललेली, तिरकी, गोल, अशा असंख्य प्रकारे आपण बदलू शकतो आणि हे करणं फार मनोरंजक असतं.

c

त्या नंतर अरेंज चा मेनू असून त्यात अक्षरं किंवा कुठलंही ऑब्जेक्ट आपण रोटेट करू शकतो, एकापेक्षा अनेक ऑब्जेक्ट असतील तर त्यांचा दृश्यक्रम ठरवू शकतो आणि आकारासंबंधी इतर काही बाबी निर्धारित करू शकतो.

एक्सेलची खरी मजा हीच आहे की एखादं छोटंसं फीचरही जरी वरवर छोटं सोपं वाटलं, तरी जितकं खोलात शिरावं तितकी त्याची व्याप्ती वाढत जाते. वर्ड आर्टही याला अपवाद कसं असेल?