Brevet des Randonneurs Mondiaux 300

देशपांडेमामा's picture
देशपांडेमामा in जनातलं, मनातलं
9 Feb 2017 - 6:18 pm

शिर्षक थोडे विचित्र आहे कारण १) हे फ्रेंच भाषेतले आहे आणि २) हा प्रकार जो पर्यंत सायकलींगची आवड लागत नाही तोपर्यंत काही कळत नाही :-)

BRM च्या अधिक माहीतीकरता मोदकभाऊंच्या ह्या धाग्याला भेट द्या

डिसेंबर २०१६ मध्ये २०० ची BRM म्हणजेच long distance cycling चा २०० किमी चा प्रकार पुर्ण केला होता. त्यानंतर काही ना काही कारणाने पुढचा ३०० चा प्रकार करता आला नाही. पण फेब्रुवारी २०१७ चा करायचाच असे ठरवले कारण पुढला थेट जुन मध्ये होता/आहे.

नोंदणी वगरे सगळे सोपस्कार करुन तयारीला लागलो आणि नेमक तेव्हा काम वाढलं ! त्यामुळे सकाळी लवकर आवरुन सराव करण्याचे मनसुबे धुळीला मिळाले. पण मग आलेल्या सुट्ट्यांचा पुर्ण उपयोग करुन घ्यायचे ठरवले. सरावाची सुरुवात आपल्या मिसळपावच्या सायकल ग्रुप सोबत खेड-शिवापुर - कासारसाई राइडने झाली. २६ जानेवारीच्या सुट्टीला पुणे-खंबाटकी-पुणे अशी १५० किमीची राईड झाल्यावर थोडा आत्मविश्वास वाढला आणि मग एक शेवटची पुणे-लोणावळा-पुणे अशी १०० किमीची सराव राईड झाली. ह्या शिवाय मध्ये मध्ये कार्यालयात सायकलने येणे सुरुच होते. अंतर फार नव्ह्ते; येउन जाऊन ४० किमी पण तेव्हढाच सराव होतोय म्हणुन करत होतो.

BRM च्या ३ - ४ दिवस आधी मोदक भाऊं कडुन रात्रप्रवासा करता लाइट आणि श्री. शैलेंद्र ह्यांच्याकडुन पंप घेऊन ठेवला. ४ फेब ला BRM होती. त्याच्या दोन दिवस आधी सायकल ऑइलींग/साफ वगरे करणे सुरु होते आणि धक्का बसला. समोरचे चाक फिरताना चाकाच्या फोर्कमध्ये अडकत होते. सकाळी कार्यालयात लवकर यायचे होते त्यामुळे संध्याकाळी सायकल दुकानात नेली. रिंग आउट असल्याचे निदान करुन त्याने वेळ लागेल म्हणुन दुसर्या दिवशी बोलावले. शुक्रवारी कार्यालयातुन लवकर निघुन सायकल दुकानात घेउन गेलो. साधारण ३ एक तासात सायकल सुधरवुन झाल्यावर एक टेस्ट राइड घेउन घरी आलो. संध्याकाळी सगळी तयारी करत असताना गडबडीत डाव्या पायाच्या करंगळीच्या बाजुच्या बोटाला खुर्चीचा पाय लागला. मार एवढा जोरात होता की बोट काळे-नीळे होऊन दुखायला लागले होते. एक मिनीट वाटले की उद्या जावे की नाही पण एवढी तयारी झाल्यावर माघार न घेण्याचे ठरवुन परत तयारी सुरु केली.

४ ता. ला सकाळी ५:३० च्या सुमारास पुणे विद्यापिठाजवळ पोहोचलो तेव्हा बरेचसे सायकलस्वार आधीच आले होते. राइड रिसपॉन्सीबलकडुन सायकल BRM च्या निकषांप्रमाणे आहे की नाही हे बघुन झाले आणि एक बातमी कळली. BRM च्या तयारीच्या उत्साहात फी चे पैसे भरायचे राहुन गेले होते! माझ्याकडे पैसे होते पण आता इथे भरावे लागल्यामुळे परत पुढे ATM मध्ये वेळ घालवावा लागणार होता. फी पेमेंट करुन बरोब्बर ६ ला BRM सुरु झाली.

ह्या ग्रुप मध्ये माझ्या कंपनीत आधी काम केलेला एकजण भेटला. थोडा वेळ सोबत सायकल चालवुन ख्याली खुशाली विचारुन झाल्यावर मग तो बुंगाट सुटला! सकाळी वातावरण एकदम मस्त होते. सुर्यदेव वर यायच्या आधी शक्य तेवढे अंतर कापायचे ठरवुन सायकल हाणत होतो. कात्रज (नवीन) बोगदा येइपर्यंत पाय मस्त गरम (warm up) झाले होते आणि पुढे सगळा उतार असल्यामुळे वेगात जाणे शक्य होत होते. साधारण ६० किमी झाल्यावर मात्र डाव्या पायाचे बोट दुखणे सुरु झाले. नाश्ता ब्रेक खंबाटकी झाल्यावर घ्यायचे ठरवल्यामुळे थांबायचे नाही असे ठरवुन दुखण्याकडे दुर्लक्ष केले. खंबाटकीच्या अगदी अलीकडे कंपनीतल्या त्या जुन्या मित्राने हात दाखवुन बोलावले. नंतर थांबायचे तर आत्ताच थांबु असा (चुकीचा - का ? ते येईलच पुढे) विचार करुन खाण्याकरता ब्रेक घेतला. सायकल बुंगाट चालवणारा माझा मित्र खाण्याच्या बाबतीत मात्र अगदिच गोगलगाय होता :-) . माझे पोहे खाऊन झाले तेव्हा त्याचे अर्धे पण झाले नव्हते! माझ्या पायाच्या दुखर्या बोटामुळेस्पीड तसाही कमी होता म्हणुन मग त्याला टाटा करुन निघालो खंबाटकी पार करायला. खंबाटकीचा चढ सुरु झाला आणि नुकतेच खल्लेले पोहे घशाशी यायला लागले. ऊन वाढायला लागले होते त्यात खडा चढ आणि घाशाशी आलेले पोहे ..बेक्कार हालत व्हायला लागली होती. ऊलटी होते की काय असे वाटायला लागले पण सुदैवाने घाट सुखरुप पार पडला! खंबाटकी नंतर काही विशेष न घडता प्रवास सुरु होता. दर एक ते दिड तासानी पाणि किवा Enerzal पित होतो आणि दर २ ते ३ तासांनी एनर्जी बार खात होतो.

१५० कीमी नंतर १ वा १७ मि. नी ऊब्रंज नंतर कंट्रोल पॉईंट दिसला. तिथे १० मिनिटे थांबून कार्ड स्टँप करुन घेतले. दोन केळी खाऊन आणि पाणी पीऊन निघालो. साधारण ३ कीमी नंतर जेवण्याकरता थांबुन साधारण २० मि. नंतर परतीचा प्रवास सुरु झाला. थोडा आराम झाल्यामुळे फ्रेश वाटत होते पण त्याचसोबत पायांना जडत्व पण प्राप्त झाले होते! सुरुवातीला ४ ते ५ कीमी निवांत चालवल्यानंतर मात्र मग हळु हळु परत वेग पकडला. आता दुपारचे उन मी म्हणत होते आणि त्यात सातार्यापर्यंत बर्यापैकी चढाव असलेला रस्ता होता. कीतीही पाणी पिऊन तहान जात नव्ह्ती आणि अश्यावेळेस मग नको ते विचार डोक्यात यायला लागले. सुट्टीच्या दिवशी आरामात घरी बसायचे सोडुन हे काय करत बसलोय? कश्यासाठी ? काय सिध्द करायला बघतोय वगर वगरे ..आणि तेव्ह्ढ्यात ९० च्या दशकातल्या गाण्यांचा आवाज दुरुन यायला लागला आणि लक्ष दुसरीकडे जाउन फालतु विचार बंद झाले! ही गाणी पुढे असलेल्या ऊसांच्या ट्रक्ट्ररवर सुरु होती..पार सनम बेवफा वगरे विस्म्रुतीत गेलेल्या गाण्यांच्या आठवणींना ऊजाळा देत माझा प्रवास परत जोमाने सुरु झाला. मध्ये मध्ये थांबुन पाणी घेणे सुरु होतेच. सातार्याच्या अलीकडे दोन भक्कम चढाव आहेत. ते पार करताना फुल्ल वाट लागली होती. स्वतःशीच जोर जोरात बोलत आणि असल्या चढावाचे रस्ते बांधणार्यांना मनात शिव्या देत ते चढाव पार पडले ;-)

सातार्यानंतरचा रस्ता २०० च्या BRM मुळे ओळखिचा असल्यामुळे हुरुप वाढला होता. साधारण ५:३० ते ६:०० च्या सुमारास खंबाटकीचा परतीचा उतार पार करुन खायला थांबलो. साधारण ३० मिनीटांनंतर परत सायकलवर टांग टाकली आणि लक्षात आले की सायकलवर बुड टेकवताच बेक्कार दुखतय. हा १२ तासापासुन सुरु असलेल्या सायकलींगचा परीणाम होता! थोडावेळ हळु हळु जोर लावत आसन बसवल्यावर मग जरा बरे वाटले ..

आता साधारण ७० किमी चा पल्ला गाठायचा होता. उतार असल्यामुळे वेगपण बर्यापैकी होता. साधारण १:३० तास सायकल चालवुन झाल्यावर माग पाणी प्यायला ब्रेक घेतला, हात पाय स्ट्रेच केले आणि परत सायकल हाणणे सुरु केले. थोडावेळ गेला असेल आणि लक्षात आले की ऊजवा गुढघा दुखायला लागला आहे. हे आता नविनच प्रकरण होते..आधि डाव्या पायाचे बोट दुखत होते आणि आता ऊजवा गुढगा ..शांतपणे सायकल बाजुला घेतली , जोडे काढले आणि डाव्या आणि ऊजव्या पायावर स्प्रे मारत बसलो. ५ मि. असेच गेल्यावर मग परत ..धर हँन्ड्ल आणि मार पायडल सुरु केले :-)

आता प्रवासाचा शेवटचा टप्पा सुरु झाला होता..कमीत कमी ब्रेक्स घेऊन शक्य तितक्या लवकर पोहोचायचे ठरवले होते. जसजसा वेग आणि सायकलवरचा वेळ वाढवत गेला तसे गुढघ्याचे दुखणेपण वाढत गेले. खेड शिवापुर येता येता तर एवढे वाढले की स्प्रे खिशात ठे॑ऊनच सायकल चालवणे सुरु केले. दुखला की मार स्प्रे असे करत करत मग खेड शिवापुरला ८:१५ च्या आसपास पोहचलो. पाणी घेऊन २ मिनिटे थांबलो. पुण्याकडे येताना खेड शिवापुर पासुन चढ सुरु होऊन तो थेट कात्रज बोगद्यापर्यंत येउन संपतो. हाताशी असलेला वेळ बघता आरामात जायचे ठरवले. कैलास भेळ नंतरच्या चढाव निवांत पार करत होतो आणि तेवढ्यात गडबड झाली! तो रस्ता ३ पदरी आहे. मी सगळ्यात डावीकडल्या लेन मधुन हळु हळु जात होतो. नेमका त्याच वेळेत बाजुच्या म्हणजे मधल्या लेन मध्ये एक फुल्ल भरलेला ट्र्क आला. तो ट्र्क पण अगदी स्लो आणि मला समांतर होता.अचानक मागुन जोरात कर्णा ऐकु आला. मागे पि म टी होती आणि ड्रायवर भाऊंना मला ओलांडुन पुढे जायची घाई झाली होती! माझ्या डाव्या हाताला खडबडीत भाग होता आणि रस्ता आणि त्या भागात जवळ जवळ १.५ ते २ ईंच उंचीचा फरक होता त्यामुळे मला रस्ता सोडुन खाली उतरता येईना. मागचा पि म टी वाल पण कर्णा वाजवायचे थांबवत नव्ह्ता. मग काही दुसरा उपाय नाही हे बघुन देवाचे नाव घेतले आणि दुखर्या गुढघ्याने चढावावर सायकल वेगाने चालवणे सुरु केले. पि म टी ला रस्ता मिळाल्यावर मग कुठे जरा शांतता झाली

कात्रज बोगद्यापासुन मिळालेला वेग थेट सिंहगड रोड येईपर्यंत होता. त्यानंतर मात्र मग एकदम गर्दीचा रस्ता सुरु झाला. वारजे संपल्यावर मग चांदणी चौकातला चढ एकदम जोशात पुर्ण केला कारण तो संपल्या संपल्या BRM चा शेवट होता - CCD !!!

बस्स! ह्याच साठी केला होता हा अट्टाहास !! BRM पुर्ण करण्याच्या वेळेचा पुरावा म्हणुन CCD मध्ये गेल्या गेल्या एक सेल्फि काढुन BRM ग्रुप वर पाठवली आणि कोल्ड कॉफी घेण्यासाठी CCD मध्ये गेलो. कॉफीची वाट बघत असताना एक ग्रुहस्थ आले आणि तुम्ही BRM करुन आलात का असे विचारले. हो म्हणताच त्यांनी ओळख दिली. ते शेवट्च्या चेकपाँईटला आलेल्या सास्वांची वेळ नोंदवत होते. माझे नाव , रायडर नंबर आणि CCD ला पोहोचल्याची वेळ (रात्री ९:२३ ) ह्या सगळ्या गोष्टीची नोंद झाल्यावर आता मी घरी जाऊ शकतो असे सांगितले

सायकलवरुन घरी जाताना १५+ तासांच्या सलग सायकलींगचा थकवा तर जाणवत होता पण त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त समाधान होते ते BRM व्यवस्थित पार पडण्याचे!

देश

जीवनमानप्रवासक्रीडामौजमजालेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

डॉ श्रीहास's picture

9 Feb 2017 - 6:34 pm | डॉ श्रीहास

अभिनंदन... मामा

२००,३०० नंतर ४०० साठी या औरंगाबाद ला _/|\_

देशपांडेमामा's picture

12 Feb 2017 - 9:35 am | देशपांडेमामा

पण काम आहे नेमके त्या आठवड्यात. जर काही जमल तर फोनवतो तुम्हाला

देश

अरे व्वा... फायनली लिहिते झालात.. आता ४०० आणि ६०० करायचे आहेत हो तुम्हाला..!

हाभिणंदन..!!

.

स्थितप्रज्ञ's picture

9 Feb 2017 - 7:20 pm | स्थितप्रज्ञ

च्यायला उंब्रजला बाईकवर जाऊन यायच म्हंटलं तरी अक्खा दिवस जातो....तुम्ही सायकलवर जाऊन आलात...दंडवत _/\_

देशपांडेमामा's picture

12 Feb 2017 - 9:48 am | देशपांडेमामा

एकदा करुन बघाच ...

देश

आदूबाळ's picture

9 Feb 2017 - 8:14 pm | आदूबाळ

लय भारी! अभिनंदन!

इरसाल कार्टं's picture

9 Feb 2017 - 10:42 pm | इरसाल कार्टं

तिकडे सायकल सायकल वर एवढी आग का लागलीय ते आता कळले.

क्या बात है! अभिनंदन. पुढील बीआरएमसाठी शुभेच्छा.

बॅटमॅन's picture

10 Feb 2017 - 12:09 am | बॅटमॅन

अगा बाबौ.

साष्टांग दंडवत सर तुम्हांला. _/\_

गामा पैलवान's picture

10 Feb 2017 - 1:27 am | गामा पैलवान

देशपांडेमामा,

तुमचं अभिनंदन. आजून यशोकथा वाचायला आवडतील! :-)

आ.न.,
-गा.पै.

एक नंबर राईड..अभिनंदन..
लेख पण मस्त लिहिलाय..

देशपांडेमामा व्हायचय मला.

देशपांडेमामा's picture

12 Feb 2017 - 9:46 am | देशपांडेमामा

:-D :-D :-D _/\_

उगा काहितरीच's picture

10 Feb 2017 - 7:01 am | उगा काहितरीच

अभिनंदन !

पोहे !? दुपारी सायकल चालवायची असताना पोहे ?
अगदीच अमॅच्युअर सायकलिस्ट दिसता.:P
पुढील ब्रेवे साठी मार्गदर्शन हवे असल्यास व्यनि करा.

[जोरदार अभिनंदन ओ मामा]

अप्पा जोगळेकर's picture

10 Feb 2017 - 10:52 am | अप्पा जोगळेकर

मला वाटल मामा आता पोह्यांनंतर मिसळ खाल्ली वगैरे लिहिणार की काय ?
अभिनंदन हो मामा. मला पण देशपांडे मामा व्हायचय.

देशपांडेमामा's picture

12 Feb 2017 - 9:43 am | देशपांडेमामा

जोरदार हो अप्पा :-D

देश

देशपांडेमामा's picture

12 Feb 2017 - 9:36 am | देशपांडेमामा

स्वारी शक्तिमान ..पुढल्यावेळेस अशी चुक करणार नाही ! :-D

देश

देशपांडेमामा's picture

12 Feb 2017 - 9:41 am | देशपांडेमामा

sagarpdy ह्यांच्या पोस्टसाठी होता...

फ्फार्र सिनीयर सायकलिस्ट आहेत बरका ते ग्रुपचे. ते कुणाचेही कान उपटु शकतात :-P

देश

sagarpdy's picture

12 Feb 2017 - 11:01 am | sagarpdy

:P

फ्फार्र सिनीयर सायकलिस्ट आहेत बरका ते ग्रुपचे. ते कुणाचेही कान उपटु शकतात :-P

हो.. आणि त्यांना सेल्फी काढायला सेल्फीस्टिकची गरज लागत नाही. :D

खेडूत's picture

10 Feb 2017 - 10:18 am | खेडूत

अशक्य -भारी!
अभिनंदन आणि शुभेच्छा!!

देशपांडेमामा's picture

12 Feb 2017 - 9:32 am | देशपांडेमामा

सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनःपुर्वक आभार !!

देश

अरिंजय's picture

12 Feb 2017 - 12:45 pm | अरिंजय

जोरदार अभिनंदन मामा

अभिजीत अवलिया's picture

14 Feb 2017 - 1:09 pm | अभिजीत अवलिया

अभिनंदन

बाबा योगिराज's picture

14 Feb 2017 - 2:29 pm | बाबा योगिराज

300 ची ब्रम्ह. हाबीनंदन वो मामा. इथं आमी 200 करायची का याचा ईच्यार बी करणा, आन तुमी 200 काय 300 काय फटक्यात करू रायले.
आपला सलाम भौ तुमाला.___/\___.
मामा तुमी आशेच ब्रम्हरक्षस बनून राहण्यासाठी शूबेच्छा.

बाबा योगीराज

देशपांडेमामा's picture

15 Feb 2017 - 11:48 am | देशपांडेमामा

तुमचा आणि मानसभाऊंचा पराक्रम बघतोय रोज ग्रुपवर :)

देश

देशपांडेमामा's picture

15 Feb 2017 - 11:49 am | देशपांडेमामा

खतरनाक आहे हे नाव !! :D

देश

बाळ सप्रे's picture

14 Feb 2017 - 2:54 pm | बाळ सप्रे

१५ तासात ३०० झाले.. धन्य आहात मामा !! एकंदरीत मिपावरचे सगळेच सायकलवाले खतरनाक फास्ट आहेत असं दिसतय..

देशपांडेमामा's picture

15 Feb 2017 - 11:53 am | देशपांडेमामा

खरोखरच मिपावर एकाहुन एक सायकलपटु आणि धावपटु आहेत ..मि त्यात शेवटुन पहीला आहे :-D _/\_

देश

आबा पाटील's picture

12 Apr 2017 - 3:22 pm | आबा पाटील

एक नंबर ! जोरदार अभिनंदन .... पुढील ब्रह्म साठी शुभेच्या !

आबा

सूड's picture

12 Apr 2017 - 4:27 pm | सूड

अरे वा!! भारीच की!!

देशपांडेमामा's picture

12 Apr 2017 - 10:01 pm | देशपांडेमामा

धन्यवाद आबा आणि सूड!

देश

जोरदार अभिनंदन! आता उरलेले ४०० आणि ६०० करून टाका....

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Apr 2017 - 4:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वा वा.....जोरदार अभिनंदन. पुढील पायडलिंग साठी शुभेच्छा.

प्रशांत's picture

13 Apr 2017 - 11:07 pm | प्रशांत

एखादी राईड आमच्यासोबत करुन मार्गदर्शन करा

देशपांडेमामा's picture

17 Apr 2017 - 1:44 pm | देशपांडेमामा

आम्ही भरुन पावलो ! असाच लोभ असु द्या _/\_

रच्याकने ..तुम्हाला मार्गदर्शन करणे म्हणजे होकायंत्राला दिशा दाखवण्यासारखे आहे !! ;-)

देश