मक्केतील उठाव ७ (शेवटचा भाग)

हुप्प्या's picture
हुप्प्या in जनातलं, मनातलं
6 Nov 2016 - 4:31 am

भाग ६

४ डिसेंबर १९७९. मक्केतील उठाव मोडून काढला गेला. सगळे बंडखोर एकतर मारले गेले किंवा पकडले गेले. मशिदीचे प्रचंड नुकसान झाले. काबाचा पाषाण शाबूत होता. पण बाकी मशिद उध्वस्त झाल्यासारखी दिसत होती. मारवा आणि सफा गेट आणि त्यांना जोडणारी मार्गिका ह्यांची खूप मोडतोड झाली होती. रणगाडे, चिलखती जीप ह्या चालवल्यामुळे फरशा उघडल्या होत्या. जिने तुटले होते. त्या दिवशी सगळ्या कैद केलेल्या बंडखोरांना टीव्हीवर दाखवले गेले. राजकुमार नायफ याने फुशारकी मारली की "आमच्या सैन्याचे इतके नगण्य नुकसान झाले की ते ऐकून मलाच आश्चर्य वाटले!"
"जे मेले ते जास्त भाग्यवान कारण ते थेट स्वर्गातच गेले असणार!" आणखी पुढे ही पुस्ती!

मग बंडखोरांची टीव्हीवर परेड झाली. सगळ्यात आघाडीवर जुहेमान. कळकट पायघोळ शर्ट घातलेला, केस पिंजारलेले, डोळे भेदक. (आजही तुम्ही हे युट्युबवर बघू शकता https://www.youtube.com/watch?v=Nax1UDYEnPk)
कुणाला बोलू देतच नव्हते. निवेदक अरबीत जे सांगत होता तेवढाच आवाज पार्श्वभूमीवर. "हा पहा जुहेमान अल ओतेबी. जगातील सगळ्यात दुष्ट लोकांतला एक. आम्ही ह्याला कधी विसरणार नाही आणि इतिहासही." मग कॅमेरा उरलेल्या बंद्यांवर फिरतो. "ज्या प्रकारे ह्या लोकांनी श्रद्धाळू आणि निष्पापप लोकांवर आपली दहशत लादली, त्यांचे रक्त सांडले, त्याकरता ते नरकात सडतील. ते देव, प्रेषित, धर्म आणि शरिया ह्यांच्याविरुद्ध गेले. ह्या नीच कृत्याकरता त्यांना पूर्ण आणि न्याय्य शिक्षा होणारच."
मग पुढची ट्रॉफी म्हणजे त्या तथाकथित माहदीची ओळख. मृताचा भाऊ, भाचा ह्यांना फोटो दाखवून, प्रश्न विचारून महम्मद अब्दुल्लाची ओळख पूर्ण झाली.
काही दिवसांनी सौदी हेरखात्याचा प्रमुख राजकुमार तुर्की हा जुहेमानला भेटायला आला. अचानक जुहेमान उभा राहिला आणि म्हणाला "महाराज, कृपा करा आणि राजाला सांगा की मला माफ करावे." तुर्कीला धक्काच बसला. "तुला आता फक्त देवच माफ करू शकेल!"

सौदी सरकारने मृत आणि जखमींची आकडेवारी दिली ती फारच कमी करून सांगितली. एकंदरीत २७० लोक मेले असे ते सांगत होते. काही बंडखोर भयंकर जखमी होते. कित्येकांच्या जखमा सोडून गँगरीन झाला होता. कारण पवित्र झमझमचे पाणी हेच जंतुनाशक होते. बाकी काही औषधोपचार नव्हताच.
खरा बळींचा आकडा हा हजार किंवा त्याहून बराच जास्त ४००० पर्यंत असणे शक्य आहे असे बाकी गुप्तचर संस्थांचे मत पडले.
मशिदीच्या तळघरात तर अत्यंत गलिच्छ स्थिती होती. जंतुनाशके मोठ्या प्रमाणात मारून तिथली भयानक दुर्गंधी कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. ६ डिसेम्बरला सौदी राजे मंडळी विजय साजरा करायला मशिदीत आले. मोठा सोहळा झाला. राजाने झमझमचे पाणी मोठ्या थाटामाटात पिऊन नंतर गुडघे टेकून प्रार्थना केली. पण राजा फार काळ मशिदीत टिकला नाही. तिथल्या असह्य दुर्गंधीमुळे त्याने लवकरच पळ काढला. नंतर जेद्दाला जाऊन तिथे मोठी मेजवानी केली. जगभरच्या मुसलमानी राष्ट्रांकडून त्याला पुन्हा एकदा अभिनंदनाच्या तारा आल्या. पाकिस्तानसारखे स्तुतिपाठक देशही होते.

ह्या सगळ्या थाटामाटात आणि आनंदसोहळ्यातही सौदी सरकारला ह्याची पूर्ण जाणीव होती की आपण थोडक्यात बचावलो आहोत! असे पुन्हा होता कामा नये! खरे तर सौदी गृहमंत्री व अन्य उच्चपदस्थांना अर्धचंद्र द्यायला हवा होता. हे असले बंडखोर काहीतरी उद्योग करत आहेत हे खरे तर आधी हेरखात्याला कळले होते. पण सौदी उलेमा आणि अन्य धार्मिक बुजुर्गांच्या मध्यस्थीमुळे हे सगळे सुटले होते. पण उच्चपदस्थ सगळे सौदी घराण्याचे असल्यामुळे वाचले. बाकी अधिकाऱ्यांना डच्चू दिला गेला. मक्केच्या गव्हर्नरला हाकलले. तो थोडा उदारमतवादी होता त्याचे फळ त्याला मिळाले! कुवेत व अन्य शेजारी देशात सौदीने मोठी धरपकड केली आणि जुहेमान आणि त्याला सहानुभूती असणाऱ्यांना पकडले.

सौदी हा आपल्या थर्ड डिग्री हालाकरता प्रसिद्ध आहे. पकडल्या गेलेल्या लोकांची खास सौदी पद्धतीने पूछताछ केली गेली. इथले छळ असे भयंकर की केवळ ते हाल थांबावेत म्हणून संशयित काय वाट्टेल तो गुन्हा कबूल करतील! अन्न पाणी बंद करणे, पकडीने नखे उपटून काढणे, विजेचे झटके, खरे बोलण्याचे इंजेक्शन देणे (सोडियम पेन्टेथॉल ). तसेही बहुतेक सगळे कैदी पराभूत मनस्थितीत होते. माह्दी मारला गेल्यामुळे त्यांना आपल्या मोहिमेतील पोकळपण कळले होते. त्यामुळे त्यांनी पटापट कबुलीजबाब दिले. जुहेमानने मात्र दाद दिली नाही. पकडल्या जाणार्यात सौदी, इजिप्त, पाकिस्तानी, कुवेती, सुदानी, इराकी हे होतेच. दोन काळे अमेरिकनही होते.

२ जानेवारी १९८० रोजी पुन्हा सगळे उलेमा राजासमोर जमले. ह्या बंडखोरांना काय शिक्षा द्यावी ह्याविषयी खल झाला. राजा कुणालाही माफ करण्याच्या मनस्थितीत नव्हताच. ह्या सर्वांना शिरच्छेद, क्रुसावर चढवणे, हात पाय तोडणे अशा शिक्षा द्याव्यात अशी शिफारस केली गेली. त्यानुसार ९ जानेवारीला ६३ बंडखोरांना वेगवेगळ्या शहरात जाहीर रित्या शिरच्छेद करून मारण्यात आले. मुख्य बंडखोरांना मक्केत मारले केले गेले. जुहेमानचे शीर सर्वप्रथम अलग झाले. नंतर सगळ्याची डोकी परत धडाला शिवली गेली आणि त्यांचे नियमानुसार दफन केले गेले.

शिरच्छेदाच्या जागा काळजीपूर्वक निवडल्या होत्या. जिथे बंडखोरीचे वातावरण आहे असा संशय होता तिथे स्थानिकांना दहशत बसावी म्हणून त्या शहरात शिरकाण केले गेले. सौदीत इतक्या मोठ्या प्रमाणात प्राणदंड दिल्याचे हे पहिलेच उदाहरण.

दोन अमेरिकनांचे काय झाले हे आजही कळलेले नाही. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे एकाला सोडून दिले असावे असा अंदाज आहे. पण अमेरिकेकडे कुणी अमेरिकन ह्या उठावात सहभागी असल्याची अधिकृत नोंदच नाही!

सौदी सरकारने ह्या घटनेवर रंगसफेती सुरु केली. रशियाने फूस दिल्याने हा उठाव झाला. उठवत सहभागी असणारे लोक अडाणी होते. त्यांना इस्लामचे ज्ञान नव्हते. इ. अर्थात पश्चिमेच्या देशांनी हे काही मनावर घेतले नाही. वॉशिंग्टन टाइम्सने जुहेमानाच्या एका पत्राचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित केला. त्यात त्याचा इस्लामचा अभ्यास, अतिरेकी धार्मिक विचार पुरेपूर व्यक्त झाले होते. ह्या पत्रावर सौदी अरेबियात बंदी होती. पण गुप्तपणे त्याच्या अनेक प्रती वितरित झाल्या होत्या. अन्य अरबी देशातही त्या मिळत होत्या. असे पत्र प्रकाशित झालेले पाहून सौदी चवताळलेच! पण काय करणार? मग त्यांनी आपला हुकमी एक्का काढला. "हे सगळे ज्यू लोकांचे कारस्थान आहे असा शोध लागला! अशा प्रकारे वर्तमानपत्रातले लिखाण हे ह्या ज्यूंच्या दुष्टपणामुळे होते आहे. अमेरिका आमची मित्र आहे पण अशा प्रकारे ज्यूंना साथ देऊन सौदी राज्याची अशी बदनामी होणार असेल तर आम्ही अन्य मित्र शोधू!" अशी धमकी दिली गेली.
"माध्यमांनी कट करून आमच्याविरुद्ध बौद्धिक बलात्कार करायचे ठरवले आहे" सप्टेंबर ११ २००१ च्या हल्ल्यानंतर जेव्हा सौदी लोकांवर टीका झाली तेव्हाही हीच भाषा वापरली गेली. एकंदरीत पश्चिमी संस्कृतीत असणारे अभिव्यक्तिस्वातंत्र्य पाहून धास्तावलेल्या सौदी सरकारने मक्केच्या बंडखोरांचा कबुलीजबाब, अन्य तपास ह्याची कुठलीही माहिती अमेरिका व अन्य देशांना दिली नाही. कडव्या इस्लामची कीड ही सौदी अरेबियात किती खोलवर पसरलेली आहे ह्याचा लोकांना थांगपत्ता लागू दिला गेला नाही.

ह्या सर्व घडामोडींकडे सोव्हियत रशियाचे बारीक लक्ष होते. जगातील एक महासत्ता असणाऱ्या सोवियतने मक्केचा हल्ला, पाकिस्तानातील अमेरिकन वकिलातीवरील हल्ला, अन्य इराण वगैरे देशातील घडामोडी हे सगळे पाहून तो आपली धोरणे कशी असावीत ह्याचा विचार क्रेमलिनमध्ये चालू होता. २० नोव्हेंबरला इराणच्या आखातात अमेरिकन युद्धनौका दाखल झाली. मक्केतील उठाव हा इराणकडून झाला आहे ही सुरवातीची माहिती होती त्याच्या आधारावर ही चाल खेळली गेली. "जर अमेरिका आपला प्रभाव टिकवायला हजारो मैल दूर समुद्रात आपले सैन्य पाठवत असेल तर आम्ही आमच्या शेजारच्या अफगाणिस्तानात तसे केले तर काय चूक?" असे मत दिमित्री उस्टीनोव्ह ह्या सोव्हियत संरक्षण मंत्र्याने मांडले होते. त्यानुसार १० डिसेम्बर १९७९ रोजी रशियाने सोविएत फौजा अफगाणिस्तानात पाठवल्या आणि एका नव्या संघर्षाला तोंड फोडले.

मक्केचे प्रकरण तात्पुरते संपले तरी पुन्हा असे काही होऊन नये म्हणून काय करावे ह्यावर सौदीमध्ये खल झाला. जुहेमानप्रमाणेच सौदी उलेमा (धर्मप्रमुख) लोकांनाही सौदी मध्ये महिलांना वाढते हक्क, टीव्हीवरील बुरख्याविरहित महिला निवेदक हे शल्यासारखे बोचत होते. तात्काळ सौदी राजपुत्र नायफने टीव्हीवरून महिला निवेदकांना रद्द केले. परदेशी पेपरमधूनही महिलांच्या चेहऱ्याना काळे फासून चेहरे दिसणार नाहीत अशा प्रकारे प्रकाशित करायचा हुकूम झाला. बायकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. गाडी चालवणे बंद. दारूवर जास्त कडक बंदी. पकडले गेल्यास जास्त कठोर शिक्षा. ह्यामुळे काळ्या बाजारतले दारूचे भाव गगनाला भिडले.

मुतव्वा नावाचे एक दल स्थापन केले गेले. हे धार्मिक पोलीस होते.लोक वेळेवर नमाज पढत आहेत का, स्त्रिया बुरख्यात आहेत का, त्यांच्या बरोबरच पुरुष हा त्यांचा बाप वा नवरा नसून दुसराच कुणी तर नाही ना? लोकांना दाढ्या आहेत का, रमझान चालू असताना कुणी खात पीत आहे का? असल्या गोष्टींकरता ह्या पोलिसांना शासन करण्याचे अधिकार होते. कित्येकदा हे लोक अडाणी असत. कुराण तोंडपाठ आहे ह्या जोरावर ते मुतव्वा बनत. अशांची मुजोरी सुरु झाली.

अजून एक घातक उपाय हा केला की वहाबी विचारांचा प्रसार व्हावा म्हणून सौदीने अफाट पैसे खर्च करून अन्य देशात मशिदी उभारल्या, तिथल्या मुल्ला, इमामांना बोलावून खरा इस्लाम काय ते शिकवले. असे लोक मग सिनेमा हराम, गाणे हराम, खेळ हराम, मनोरंजन हराम पीर दर्गे हराम, मूर्ती चित्रे हराम असे जहाल विचार स्थानिक मुस्लिमांना शिकवू लागले. झाकीर नाईक हा ह्याच माळेतला एक मणी!

अजून एक सुवर्णसंधी सौदीला मिळाली ती म्हणजे रशियाचे अफगाणिस्तानात आक्रमण. रशिया अमेरिकेचा शत्रू आणि इस्लामाचाही त्यामुळे दोघांनी संयुक्तपणे युद्ध सुरु केले. जिहाद करणारे मुजाहिदीन हे मोठे वीर आहेत असे अमेरिकेत मानले जाऊ लागले. सौदीने देशातील कडव्या लोकांना जाऊ दे ती पीडा अफगाणिस्तानात असे मनात म्हणत मोठा पैसा पुरवून अफगाणिस्तानात जिहाद करायला पाठवले. त्यातूनच बिन लादेन सारखे भस्मासुर निघाले आणि त्यांनी नंतर अमेरिकेतच उच्छाद केला.

ओसामा बिन लादेन उठावाच्या वेळेस सौदीत होता.तो आणि त्याचा भाऊ एका शेतावर होते तिथून निघून ते घरी जात होते. ही जागा मक्का जेद्दा हमरस्त्यावर आहे. नेमके त्यावेळेस सौदी पोलीस मक्केच्या हल्लेखोराना पळवून जाता येऊ नये म्हणून नाकाबंदी करत होते. ओसामाची वेगाने जाणारी कार पाहून पोलिसांनी दोघांना पकडले. दोन तीन दिवस तुरुंगातही ठेवले. पण बिन लादेन घराण्याच्या प्रभावामुळे सोडून दिले. २०-२२ वर्षाचा ओसामा तेव्हा सौदी घराण्याचा समर्थक होता. त्याला जुहेमान व अन्य लोकांचे वागणे आवडले नव्हते. मात्र तो अतिरेकी बनल्यावर मात्र त्याने ह्या लोकांना "खरे मुस्लिम", "पूर्णपणे निरपराधी" अशा शब्दात गौरवले होते.

१९७९ सालचा हा उठाव हा सौदी देशातील अतिरेकी सलाफी विचारांची एक झलक होता. त्या उठावात थेट सहभागी असणारे लोक संपवले गेले पण हा जहाल, असहिष्णू विचार मात्र जगभर फोफावताना दिसतो आहे. विविध अतिरेकी घटना, अल कायदा, अल शबाब, आयसिस, तालिबान ह्या राजकीय व धार्मिक संघटना ह्याच विचारांनी प्रेरित आहेत.
ह्या संघटना आज दळणवळणाची सर्व साधने वापरून फेसबुक, ट्विटर, मोबाईल, आपले विचार दूरवर पोचवू शकतात. जुहेमानचे विचार सौदी सरकार दाबू शकली पण आज ते शक्य नाही.

१९७९ मधे केवळ सौदीची डोकेदुखी असणारा हा जहाल वहाबी पंथ आता सर्व जगाची डोकेदुखी बनला आहे!

समाप्त.

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

अतिशय माहितीपूर्ण लेखमालिका. धन्यवाद!

वटवट's picture

6 Nov 2016 - 7:40 am | वटवट

अतिशय माहितीपूर्ण लेखमाला होती ही... तुमचे लिखाण खिळवून ठेवते... नव्या लेखमालेच्या प्रतीक्षेत... व्वा

एखादी छोटी वाटणारी घटनादेखील जागतिक पटलावर किती दूरगामी परिणाम घडवू शकते आणि काळाच्या रेषेवर किती दूरपर्यंत तिचे धक्के नंतर जाणवत राहतात याचे उदाहरण म्हणून या उठावाकडे बघता येईल. अतिशय वाचनीय लेखमाला. धन्यवाद या लिखाणाबद्दल.

मोदक's picture

6 Nov 2016 - 9:09 am | मोदक

+1111

वाचनीय लेखमाला

+१११११
सहमत
मस्त झाली लेखमाला

प्रसाद_१९८२'s picture

6 Nov 2016 - 10:44 am | प्रसाद_१९८२

संपूर्ण लेख मालिका आवडली,

मिपावरील चांगल्या मालिकांपैकी एक.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Nov 2016 - 12:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

माहितीपूर्ण आणि वाचनिय लेखमाला !

प्रदीप's picture

6 Nov 2016 - 12:52 pm | प्रदीप

लेखमाला आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Nov 2016 - 12:30 am | डॉ सुहास म्हात्रे

हुप्प्याजी, आता बैरूत/लेबॅनॉनच्या यादवीयुद्धाबाबत एक लेखमालिका लिहायला घ्या असे सुचवतो. त्या पंधरा वर्षांच्या राजकीय साठमारीने भरलेल्या रक्तरंजित कालखंडाबाबत फारसे वाचनात आलेले नाही.

स्वाती दिनेश's picture

6 Nov 2016 - 12:47 pm | स्वाती दिनेश

खूपच माहितीपूर्ण लेखमाला. अनेक नवीन गोष्टी व अनेक गोष्टी नव्याने समजल्या.
आता परत एकदा फुरसतीत सगळे भाग एकत्रित वाचेन.
स्वाती

श्रीगुरुजी's picture

6 Nov 2016 - 2:50 pm | श्रीगुरुजी

जबरदस्त लेखमाला! बरीच नवीन माहिती मिळाली.

एकंदरीत जेरूसलेम प्रमाणेच मक्का शहरातही अनेकदा रक्तरंजित घटना घडलेल्या आहेत.

ऑगस्ट १९८७ मध्ये हाजच्या दरम्यान शुक्रवारच्या नमाजानंतर इराणच्या शिया यात्रेकरूंनी मक्केत अमेरिका, रशिया व इस्राएल विरूद्ध निदर्शने करून घोषणा द्यायला सुरूवात केली. त्यावेळी सौदीमध्ये कोणत्याही प्रकारच्या राजकीय आंदोलनांना व निदर्शनांना बंदी असल्याने सौदीच्या पोलिसांनी निदर्शने थांबविण्याचे आदेश दिले व नंतर निदर्शने न थांबल्यामुळे पोलिसांनी गोळीबार सुरू केला. त्यात व त्यामुळे झालेल्या झटापटीत अधिकृतरित्या ४०२ लोकांचा मृत्यु झाला (२७५ इराणी, ८५ सौदी व ४२ इतर देशांचे नागरिक). १९८०-१९८८ या काळातील इराक-इराणचे युद्ध, युद्धात असलेला इराकचा वरचष्मा, या युद्धात इराकला मिळालेला सौदीचा पाठिंबा, कुवेती तेलवाहू जहाजांना मिळालेले अमेरिकेचे संरक्षण इ. अनेक गोष्टींची पार्श्वभूमी या निदर्शनांमागे होती.

नंतर १९९० मध्ये पुन्हा एकदा हाजच्या दरम्यान मक्केतील एका बोगद्यात चेंगराचेंगरी होऊन विविध देशांचे १४२६ नागरिक मृत्युमुखी पडले होते.

याच घटनेची पुनरावृत्ती २४ सप्टेंबर २०१५ ला होऊन पुन्हा एकदा चेंगराचेंगरीत २४११ नागरिकांचा मृत्यु झाला होता.

२३ मार्च १९९४ मध्ये मक्केत सैतानाला दगड मारण्याच्या समारंभात चेंगराचेंगरी होऊन २७० यात्रेकरू मृत्युमुखी पडले होते.

१९७५ मध्ये मक्केत तंबूला आग लागून २०० जण व १९९७ मध्ये पुन्हा एकदा हाजच्या दरम्यान मक्केत भारतीय यात्रेकरू रहात असलेल्या एका तंबूला आग लागून जवळपास ३४३ जण (त्यात २०० भारतीय) मृत्युमुखी पडले होते.

मक्केतील निव्वळ चेंगराचेंगरीत १९९८ मध्ये ११८, २००१ मध्ये ३५, २००४ मध्ये २५१, २००६ मध्ये ३४६ जणांचा मृत्यु झालेला आहे.

२०१५ मध्ये मक्केतच हाजच्या आधी बांधकामाची क्रेन कोसळून ११८ जण दगावले होते.

जिथे एकाचवेळी २० लाख लोक जमा होतात तिथे अशा दुर्घटना घडण्याची शक्यता खूपच जास्त असते.

आवडली
उत्तम माहीतीपुर्ण लेखमाला आहे वेगळ्या विषयावरची
अनेक नव्या बाबी या लेखमालेमुळे माहीत झाल्या.

rahul ghate's picture

6 Nov 2016 - 3:57 pm | rahul ghate

जबरदस्त लेखमाला!

सर्व भाग वाचले , लेखनशैली खूपच छान आहे .

राहुल

गामा पैलवान's picture

6 Nov 2016 - 5:10 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

२०१५ मध्ये मक्केतच हाजच्या आधी बांधकामाची क्रेन कोसळून ११८ जण दगावले होते.

यांस मक्केचे ९११ म्हणतात. कारण ती यारी (क्रेन) बिन-लादेन आस्थापनाकडून चालवलेली होती ! आता बोला !!

आ.न.,
-गा.पै.

९११ ११८

ह्म्म्म्म्म्म

हुप्प्या's picture

7 Nov 2016 - 3:48 am | हुप्प्या

लेखनात अनेक चुका राहिल्या आहेत त्याबद्दल क्षमस्व. संपादनाची सोय असती तर बरे झाले असते.
जुहेमान ह्या माणसाबद्दल फार तपशील लिहिला नाही. जमले तर तीही भर घालीन.

चित्रगुप्त's picture

7 Nov 2016 - 4:42 am | चित्रगुप्त

खिळवून ठेवणारी लेखमाला. आणखीही अश्या माहितीपूर्ण माला अवश्य लिहाव्यात.

हुप्प्या's picture

7 Nov 2016 - 10:58 am | हुप्प्या

एक गरीब पाकिस्तानी सुतार १९६७ साली काम मिळाले म्हणून सौदी अरेबियाला गेला. त्याचा एक मुलगा मुनीर तिथल्या सौदी धर्मपिसाटांच्या प्रभावामुळे जुहेमानच्या टोळीत सामील झाला. तो इतका कडवा मुस्लिम बनला होता की आपल्या पाकिस्तानी आईबापांचा तिरस्कार करु लागला. तुम्हाला इस्लाम कळतच नाही. त्यांच्या टीव्ही, सिनेमे बघण्यावर टीका. शिया मुस्लिमांशी संबंध ठेवल्यावर टीका. १९७८ च्या सुमारास तो घरी येईनासा झाला. आणि नंतर त्याचा थांगपत्ताही लागेना. १९८४ साली पाकिस्तानी वकिलातीने त्या बापाला सांगितले की मक्केच्या हल्ल्यात मुनीर पकडला गेला आणि त्याचा रियाध शहरात शिरच्छेद करण्यात आला.

पूर्ण गोष्ट इथे वाचा
http://www.dawn.com/news/1210185

अप्रतिम लेखमाला!!

धन्यवाद!

अनिंद्य's picture

8 Nov 2016 - 4:19 pm | अनिंद्य

मालिका आवडली.

नाखु's picture

8 Nov 2016 - 4:39 pm | नाखु

लेखमाला आहे ही.

रक्तरंजित इतिहास समोर दिसत असूनही भारतातल्या सगळ्याच (पुन्हा एकदा सगळ्याच) पक्षाचे डोळे का उघडत नाहीत कुणाचेही फाजील लाड करताना !!!!

लेखमालेसाठी धन्यवाद

अत्रुप्त आत्मा's picture

8 Nov 2016 - 6:57 pm | अत्रुप्त आत्मा

सदर लेखमालेसाठी आपले मन:पूर्वक धन्यवाद.

निओ's picture

9 Nov 2016 - 2:59 am | निओ

ऊतकंठा वाढवणारी लेखमाला. असं काही घडलं आहे, हे माहीतच नव्हते. अजून लिहा.

अथांग आकाश's picture

20 Sep 2018 - 9:17 pm | अथांग आकाश

खूप नवीन माहिती समजली!

.

  1. अजून एक घातक उपाय हा केला की वहाबी विचारांचा प्रसार व्हावा म्हणून सौदीने अफाट पैसे खर्च करून अन्य देशात मशिदी उभारल्या, तिथल्या मुल्ला, इमामांना बोलावून खरा इस्लाम काय ते शिकवले.

हे वरील उदार देणग्यांचे रूप आजही आपल्याला दिसते

डीप डाईव्हर's picture

16 Sep 2020 - 12:42 pm | डीप डाईव्हर

वाचनीय, माहितीपूर्ण अशी फारच छान लेखमाला 👍
video दिसत नाहीये
This video is no longer available because the YouTube account associated with this video has been terminated. असा मेसेज दिसतोय.
हुप्प्या भाऊ अशाच आणखीन माहितीपूर्ण लेखमाला लिहा अशी विनंती.